नंदी बैल

Nandibail 2

गुबूगुबूचा नाद करत नंदीबैलाचे आगमन


बेल्हे, ता. १९ - परिसरात सध्याच्या काळात दाणागोटा, जुना कपडा-लत्ता, दीपावलीतील गोडधोडाचे दोन घास पदरी पाडून घेण्यासाठी, नंदीबैलांची स्वारी ढोलक्‍यावर गुबूगुबूच्या नाद करत घरोघर हजेरी लावत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
साधारणपणे पावसाळा संपल्यानंतर नंदीबैलवाले शेतकऱ्यांकडून हक्काने धान्य, जुने कपडे, पैसे, खाण्याचे पदार्थ मागण्यासाठी फिरताना दिसून येतात. पारंपरिक पोशाखात वर्षातून एकदाच दारासमोर येणाऱ्या या नंदीबैलाची महिला वर्गाकडून पूजा केली जाते. गुबू-गुबूच्या विशिष्ट आवाजामुळे त्यांच्या मागेपुढे बाळगोपाळांची नेहमीच गर्दी असते. सुगीच्या काळात शेतात पिकविलेल्या धान्याचा काही भाग दारी येणाऱ्या गोरगरिबांसाठी दानधर्म करण्याची परंपरा ग्रामीण भागातील शेतकरी आर्थिक परवड होत असतानाच्या काळातही जपत असल्याचे दिसून येते.
याशिवाय काही प्रशिक्षित नंदीबैलमालकाच्या इशाऱ्यानुसार हालचाली करत असल्याने, या मंडळींना बक्षीसरूपानेही काही मदत मिळते. सध्या परिसरात सूर्योदयानंतर नंदीबैलवाल्या मंडळींचा "गुबू-गुबू' आवाज कुठे ना कुठे घुमत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
Daily Sakal 20/11/2007 मधील नेट आवृत्तीतील ही बातमी मला भूतकाळात घेउन गेली. माझ्या लहानपणी वाड्यावर येणारा हाच तो नंदीबैलवाला . माझ्या मुलीच्या वेळीपण तोच . मुलीच्या सुट्टीत गावी गेल्यावर तो नेमका आला होता. सात आठ वर्षे झाली असतील या फोटोला. "रामभाउ पाटलाच्या नावांन ....गुबुगुबु...." मग दानशूर , प्रेमळ वगैरे विशेषणे त्या कवनात घालत असे. नंतर वाद्यांचा गजर.नंदीबैल मला खुप आवडतो. कसा रुबाबदार दिसतो बघा.नंदीबैलाला कधी शेतातल्या कामाला जुंपत नाहीत. इतर बैलांना त्याचा हेवा वाटत असणार. कारण त्याचा रोजच पोळा. इतर बैलांना हे भाग्य फक्त बैल पोळ्यालाच वाट्याला येत असे .बैलपोळ्याला वेशीपासून प्रथम येण्याचा मान आमच्या बैलांचा होता. कारण अर्थातच परंपरा. पाटलाची बैलं हे असावे. त्या दिवशी त्यांना नंदीबैलासारखे सजवले जाई. दाराशी आल्यावर आई त्यांची पुजा करुन त्यांना ओवाळीत असे व पुरणपोळी खायला घालीत असे. इतर दिवशी कडबा वा घास खाणार्‍या बैलांना त्या दिवशी पुरणपोळी खाताना बर वाटत असणारं असे मला नेहमीच वाटायचं. त्यांच्या ही डोळ्यात त्या दिवशी मला कृतज्ञतेचा भाव दिसे.
नंदीबैलवाल्याला त्यादिवशी मी आमच्या गतस्मृतीतील बैलांचा सरंजाम व इतर साहित्य देउन टाकले.

लेखनविषय: दुवे:

Comments

भोलानाथ!

मस्त विषय प्रकाशराव! लहानपणच्या आठवणी जागृत झाल्या आणि निखळ आनंद साध्या गोष्टीत पण असू शकतो हे परत जाणवले...

"नंदीबैल" हे संबोधन म्हणले तर अर्थ काय होतो हे माहीत आहेच! पण तरी देखील अजून एका कारणाने थोड्याफार प्रमाणात हा आजच्या लहान पिढीत पण "भोलानाथ"च्या गाण्याने त्याचे जतन झाले आहे असे वाटते.

सुरेख

चित्र आवडले आणि लहानपणच्या आठवणी आल्या.
सुगीच्या काळात शेतात पिकविलेल्या धान्याचा काही भाग दारी येणाऱ्या गोरगरिबांसाठी दानधर्म करण्याची परंपरा ग्रामीण भागातील शेतकरी आर्थिक परवड होत असतानाच्या काळातही जपत असल्याचे दिसून येते.

हे विशेष.

चित्र आवडले

घाटपांडे साहेब,
ब-याच दिवसात माझ्याही दारात नंदीबैल दिसला नाही आणि "गुबू-गुबू' चा आवाजही ब-याच दिवसात घुमला नाही. मात्र या निमित्ताने आपण लहाणपणीच्या आठवणी जाग्या केल्या. लहाणपणी नंदीबैलाला मी कितीतरी वेळेस विचारले आहे की मी पास होईन का ? आणि त्याने प्रत्येक वेळी मान हलवून 'हो' चा सिग्नल दिल्याचे आठवते.

'काय नंदीबैलासारखा मान हलवतो' असे मला शाळेतल्या मास्तरानं अनेकदा विचारले आहे. :)

नंदीबैल, वासुदेव, स्मशानजोगी, (म्हसनजोगी) कुडमुड्या जोशी, या सर्वच लोकांची अशा निमित्ताने पुन्हा पुन्हा आठवण होते. खरं तर या जागतिकीकरणाच्या प्रवाहात आपण ही लोकसंस्कृती केव्हाच हरवून बसलो आहोत असे वाटते.

अर्थात

छोटेखानी लिखाण आवडले.

नंदीबैलवाल्याला त्यादिवशी मी आमच्या गतस्मृतीतील बैलांचा सरंजाम व इतर साहित्य देउन टाकले.

आशा आहे त्याची प्रकाशचित्रे काढून ठेवली असतीलच. परत कधी तरी ऋषिकेशला त्यावर लिहायची हुक्की आली तर तर...?

आपला
गुंडोपंत

मस्त लेख !

"गु बु गु बु"!!

अतिशय आवडला!
आमची तारीफ वाचुन बरे वाटले.

विनोदाचा भाग सोडुन द्या पण
क्वचित पाहिलेल्या या गोष्टींच्या आठवणी जाग्या झाल्या.
बैल आणि ईतर दूध दुभत्या जनावरांचे ग्रामीण जीवनातील स्थान दाखवणारी एक परंपरा आहे असे वाटते.
(उदाहरण :- सध्याचे मराठी चित्रपट "वळु" आणि"टिंग्या " (दोन्हीही लवकरच बघणार आहे.))

एका नंदीचे मन

कविता

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
जुन्या पाठ्यपुस्तकात एक कविता होती. ती अशी:

आला बघ नंदिबैल ! आई, जाऊं दे
सोड अतां लौकर मज मौज पाहुं दे
ऊन नको पाणी मज ओत थंड तें
चोळुं नको अंग न का स्वच्छ वाटते?
.....पुसले मी अंगातें सर्व राहुं दे.
बुगु बुगु बुगु गोड कसा ढोल चालतो
खुळु खुळु खुळु घुंगुरही मधुनि वाजतो
....नाचूं दे नंदी हा मान हलवुं दे
सुंदर कशि अंगावर झूल घातली
पोरें बघ बघण्या हीं कुठुन धावलीं
....नंदीला पैसा दे ! खेळ होऊं दे

................वा.गो मायदेव.

नंदीबैल

नंदीबैलावर लिहिलेला छोटेखानी लेख आवडला,लहानपणच्या आठवणी ताज्या तर झाल्याच आणि ऋषिकेशने आजीआजोबांच्या गोष्टींच्या पुढच्या भागात नंदीबैलावर लिहावे ही गुंडोपंताची सूचना तर फारच छान! ऋषिकेश,मनावर घे,:)
सुगीच्या काळात शेतात पिकविलेल्या धान्याचा काही भाग दारी येणाऱ्या गोरगरिबांसाठी दानधर्म करण्याची परंपरा ग्रामीण भागातील शेतकरी आर्थिक परवड होत असतानाच्या काळातही जपत असल्याचे दिसून येते.
हे विशेष वाटले.
स्वाती

असेच/यूट्यूब

नंदीबैलावर लिहिलेला छोटेखानी लेख आवडला,लहानपणच्या आठवणी ताज्या तर झाल्याच आणि ऋषिकेशने आजीआजोबांच्या गोष्टींच्या पुढच्या भागात नंदीबैलावर लिहावे ही गुंडोपंताची सूचना तर फारच छान! ऋषिकेश,मनावर घे,:)

असेच म्हणतो. मस्त लेख.

यूट्यूबवर नंदीबैलाची ऍनिमेटेड आवृत्ती पाहता येईल.

मनावर घेतले :)

सर्वप्रथम या छानश्या छोटेखानी लेखाबद्दल प्रकाशरावांचे आभार. बाकी खूपच नॉस्टॅल्जिक झालात राव ! :)

असो.
बाकी उपक्रमींना माझ्या लेखनाची या निमित्ताने आठवण झाली याने मी अगदी भरून पावलो. आजच अहमदाबादहून १३ ताचंच प्रवास करून मुंबईत दाखल झालो आणि तो थकवा ह्या प्रतिसादांनी दूर पळवला. असच लोभ असु द्या! धन्यु!

त्या उत्साहाच्या भरात आजी - आजोबांची विशेष माणसे हा लेख एकहाती लिहिला आहे गोड मानून घ्यावा :)

-ऋषिकेश

सांग सांग भोलानाथ

नंदीबैलावरचा लेख आवडला. मुंबईत मी लहान असतानाही बरेचदा गुबूगुबूचा नाद ऐकू येत असे. त्यावेळी तो माना वेळावणारा नंदीबैल पाहून मजा वाटे. लहानपणी मला स्वतःला फटके मारून घेणार्‍या कडकलक्ष्मी प्रकाराचा अतिशय तिटकारा आणि शिसारी, भीती सर्व वाटे. त्याचाही गुबूगुबूच आवाज येतो. तेव्हा गुबूगुबू आवाजाचा आधी कानोसा घेतला जाई. नंदीबैल दिसला तर हायसे वाटे.

 
^ वर