आणि आता गूगल नॉल

वाचतावाचता गूगल आता विकीपेडियाच्या धर्तीवर आपला नॉल काढणार असल्याचे समजले.
(कदाचित येथील अनेक मंडळींना ही बातमी जुनी असावी.)
गूगलला कोणत्याही गोष्टीचा आपल्या फायद्यासाठी वापर करायला छान जमते.
विकी विकत घेता येणार नाही हे लक्षात येताच त्या लोकांनी स्वतःचाच एक नॉलेज मॉल (नॉल) काढायचे ठरवलेले दिसते.
तिथे लिहिणार्‍या प्रत्येक लेखकाच्या नावाचा आवर्जून उल्लेख होणार असल्याचे म्हटले आहे.
शिवाय लेखकाच्या मर्जीप्रमाणे त्या मजकुराशेजारी जाहिराती देऊन त्यातून मिळणार्‍या उत्पन्नाचा काही भाग लेखकाला दिला जाईल.
(ही माहिती आहे. जाहिरात नव्हे.)
इतकेच काय? पण नॉलचा वापर करून त्याची कम्युनिटी सुद्धासुरू झालेली आहे.

हे वाचून काही प्रश्न मनात आले -
१. विकिपेडिया सारखा मुक्त माहितीस्त्रोत उपलब्ध असताना नव्या माहितीस्त्रोताची आवश्यकता भासेल का?
२. विकीपेडियावर उपलब्ध माहिती जशीच्या तशी तिथे चिकटवली गेल्यास त्याबद्दल कॉपीराईट काय करणार?
३. उपक्रमाच्या सदस्यांना गूगल नॉल या कल्पनेबद्दल काय वाटते?
४. उपक्रमावर जाहिराती देऊन या संस्थळाच्या चालकांनी आणि लेखकांनी पैसे मिळवले तर तुम्हाला काय वाटेल?

Comments

हम्म

याबद्दल उपक्रमींची मते जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. माझी उत्तरे अशी :

१. विकिपेडिया सारखा मुक्त माहितीस्त्रोत उपलब्ध असताना नव्या माहितीस्त्रोताची आवश्यकता भासेल का?
विकी आणि नॉलमधील महत्वाचा फरक म्हणजे नॉलमध्ये त्या त्या विषयातील तज्ञ व्यक्तींना आमंत्रित केले जाणार आहे. हे विकीपेक्षा नक्कीच वेगळे आहे. याचे परिणाम काय होतील हे कळेलच पण निरोगी स्पर्धा असल्यास त्यात वावगे वाटण्याचे कारण नाही.

२. विकीपेडियावर उपलब्ध माहिती जशीच्या तशी तिथे चिकटवली गेल्यास त्याबद्दल कॉपीराईट काय करणार?
याबद्दल पुरेशी तांत्रिक माहिती नाही त्यामुळे याचे उत्तर सध्या तरी देता येणार नाही.

३. उपक्रमाच्या सदस्यांना गूगल नॉल या कल्पनेबद्दल काय वाटते?
क्र. १ मध्ये म्हटल्याप्रमाणे 'प्रिमा फेसी' यात काही वावगे वाटत नाही.

४. उपक्रमावर जाहिराती देऊन या संस्थळाच्या चालकांनी आणि लेखकांनी पैसे मिळवले तर तुम्हाला काय वाटेल?
त्यांनी तसे करायचे की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. माझ्या मते यातही काही वावगे नाही. सध्याच्या अनुदिन्या आणि आंतरजालाच्या जगात बरेच लोक आपली चांगली नोकरी सोडून संस्थळांच्या जाहिरातीवरून उत्पन्न मिळवत आहेत. जर तुमच्या पानावर लोक मोठ्या संख्येने येत असतील, तर यातून मिळणारे उत्पन्न थोडेथोडके नसते. तुमच्या अनुदिनी/संस्थळासाठी तुम्ही मेहनत घेत असाल आणि त्याचा तुम्हाला मोबदला अपेक्षित असेल तर त्यात काही गैर नाही. अर्थात हे कसे करायचे हा थोडा कौशल्याचा मुद्दा आहे, विशेषतः अनुदिन्यांच्या बाबतीत. जाहिराती किती ठेवायच्या, त्यामुळे पानाचे सौंदर्य बिघडते आहे का इ. मुद्दे विचारात घ्यायला लागतील.

----
"Those are my principles. If you don't like them, I have others." -- Groucho Marx

गूगल नॉल

गूगल नॉलबद्दल पूर्वी वाचनात आलं होतं.

गूगलला कोणत्याही गोष्टीचा आपल्या फायद्यासाठी वापर करायला छान जमते.

सहमत आहे.

१. विकिपेडिया सारखा मुक्त माहितीस्त्रोत उपलब्ध असताना नव्या माहितीस्त्रोताची आवश्यकता भासेल का?

कल्पना चांगली आहे, मला आवडली. शिवाय येथे त्या त्या विषयांतील तज्ज्ञ मंडळी लिहिणार असल्याने खात्रीलायक दुवा म्हणून देणे आवडेल. (याचा अर्थ तज्ज्ञ चुका करत नाहीत असं नाही पण त्या चुकांचं खापर त्यांच्यावर फोडता यावं - ह. घ्या.) विकिचा दुवा विश्वासार्ह म्हणून देण्यास बरेचदा साशंकता वाटते. विकिचे दुवे देताना बरेचदा मी ते इतरत्र पडताळून पाहिलेले असतात. इथे मात्र तज्ज्ञांचे मत असं छातीठोक सांगता येईल.

२. विकीपेडियावर उपलब्ध माहिती जशीच्या तशी तिथे चिकटवली गेल्यास त्याबद्दल कॉपीराईट काय करणार?

विकिची माहिती आजही अनेक संकेतस्थळे जशीच्या तशी छापतात. त्यापेक्षा गूगल नॉल वेगळेपणा राखून ठेवेल अशी आशा करू.

३. उपक्रमाच्या सदस्यांना गूगल नॉल या कल्पनेबद्दल काय वाटते?

मला तरी अत्यंत उपयोगाची वाटली.

४. उपक्रमावर जाहिराती देऊन या संस्थळाच्या चालकांनी आणि लेखकांनी पैसे मिळवले तर तुम्हाला काय वाटेल?

चालकांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न. लेखक म्हणून चार पैसे अधिक मिळाले तर मला आवडेल परंतु पैशांसाठी लिहायला आवडेल असे सांगता येत नाही.

साधारण कळले

वरील दोन प्रतिसादांवरून -
तज्ज्ञांचे मत :
पण दोन विरोधी विचारसरणींच्या तज्ञांची मते वेगवेगळी असली तर त्यातील कोणते ग्राह्य / सत्य धरणार? ('मी'चे सत्याचे प्रयोग :))

इतर वेळेस करतो तेच

पण दोन विरोधी विचारसरणींच्या तज्ञांची मते वेगवेगळी असली तर त्यातील कोणते ग्राह्य / सत्य धरणार? ('मी'चे सत्याचे प्रयोग :))

आपल्याला हव्या त्या ;-)

माझी सत्याची व्याख्या : जे आपल्याला पटतं तेच सत्य. ;-)

ह. घ्या.

परंतु, विरोधी विचारसरणीच्या तज्ञांचे गूगल नॉल काय करणार हा प्रश्नच आहे. :-) विकी यावर बरेच उपाय करते. जसे हे एक.

स्फोटक लेख हवे तेव्हा आठवत नाहीयेत :-( पण आठवले तर त्यात विकी कसे उपाय करते त्याचे दुवे दिले असते. -- हे इथे मिळाले. "त्याची" कृपा दुसरे काय? याप्रमाणे गूगल नॉल डिस्क्लेमरं टाकत जाईल का काय ते न कळे.

नूपिडिया

नूपिडिया होऊ नये म्हणजे मिळवली.

विकीची माहिती आणि प्रत अधिकार

याबाबत विकीपेडियावर माहिती सापडते (दुवा)
विकीवरचे पाठ्य (चित्रे नव्हेत) जी-एन-यू या विशिष्ट प्रकारे प्रत-अधिकार मुक्त आहेत. त्यांची प्रत कुठे चिकटवली, तर नवीन कृतीही तशीच मुक्त असावी लागते. वापरून बनवलेली नवी कृती मुक्त नसेल, तर विकीवरचे पाठ्य वापरता येत नाही.
विकीवरची चित्रे मुक्त असतील किंवा नसतील, ते प्रत्येक चित्रावर अवलंबून आहे.

नॉल, गूगल आणि जाहिराती

१. विकिपेडिया सारखा मुक्त माहितीस्त्रोत उपलब्ध असताना नव्या माहितीस्त्रोताची आवश्यकता भासेल का?
जितके जास्त स्रोत असतील तितके चांगले. मनॉपली कोणत्याही क्षेत्रात वाइटच. भलेही मनॉपली असणारी व्यक्ती/संस्था/कंपनी यांचा उद्देश कितीही साफ असला तरी मनॉपली प्रगतीच्या आड येते. (अवांतर - नव्या माहितीस्रोताची आवश्यकता आहे म्हणून गूगल नॉल असे नसून गूगल या अतिशय व्यावसायिक कंपनीला इथे बिझनेसची संधी दिसली म्हणून गूगल नॉल येतेय हे नेहमी लक्षात ठेवावे.)

२. विकीपेडियावर उपलब्ध माहिती जशीच्या तशी तिथे चिकटवली गेल्यास त्याबद्दल कॉपीराईट काय करणार?
याचे उत्तर धनंजयांच्या उत्तराप्रमाणेच

३. उपक्रमाच्या सदस्यांना गूगल नॉल या कल्पनेबद्दल काय वाटते?
स्पर्धेमुळे अधिकाधिक माहिती वाचकांना उपलब्ध होईल हे सर्वांसाठीच फायद्याचे आहे. नॉल ची व्याप्ती प्रचंड असणार आहे आणि त्यासाठी प्रचंड आणि गुंतागुंतीचे इन्फ्रास्ट्रक्चर, माहिती साठवणे आणि उपलब्ध करून देणे, ज्ञान व्यवस्थापन इ. इ. अनेक तंत्रज्ञानाचा अंत पाहणारे प्रश्न आहेत. गूगल कडे या सर्वांना तोंड देण्याची क्षमता असावी असे वाटते. नॉल जर खरेच लोकप्रिय झाले तर त्याचा पसारा गूगल सर्च च्या पसार्‍यापेक्षा फारच मोठा असेल यात शंका नाही.

४. उपक्रमावर जाहिराती देऊन या संस्थळाच्या चालकांनी आणि लेखकांनी पैसे मिळवले तर तुम्हाला काय वाटेल?
मराठी साइट्सवर कोणत्या रिलेव्हंट जाहिराती दाखवणार हा प्रश्नच आहे. ज्या मराठी साइट्सवर/ब्लॉगवर अश्या जाहिराती दाखवतात त्यात फक्त मॅट्रिमोनियल्स आणि जॉब सर्च यांच्याच जाहिराती दिसतात. जाहिरातींचा योग्य वापर करायचा असेल तर गूगल ऍड्सच्या नादाला न लागता स्वतः जाहिराती मिळवाव्यात आणि दाखवाव्यात किंवा मराठी पानांवर जाहिराती दाखवणारी स्वतंत्र संस्था काढावी. उपक्रम सारख्या साइटवर जाहिराती दाखवण्याऐवजी पेपॅल सारख्या सुविधेमार्फत डोनेशनची सोय करावी.

तोपर्यंत नॉलच्या पानाचे एक प्रत्यक्ष उदाहरण पाहा http://www.google.com/help/knol_screenshot.html

विकिपिडियावरील नॉलचे पान (http://en.wikipedia.org/wiki/Knol) देखील वाचनीय आहे. "The more good free content, the better for the world" ही विकिपिडियावाल्यांची प्रतिक्रियाही बोलकी आहे.

^ वर