सुधीर गाडगीळ यांचा "लोकमित्र"साठी सल्ला

नंदन यांच्या ओळखीने, नामवंत मराठी व्यक्तिमत्त्व सुधीर गाडगीळ यांच्याशी काल चर्चा झाली. सुधीर गाडगीळ यांना मुलाखती घेताना, कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करताना, आपण बघितलेच असेल. त्यांची वृत्तपत्रे/मासिके यातही गती आहे.

त्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. पैकी अनेक अंगीकारता येण्यासारखे आहेत. त्यांनी स्वप्नास प्रोत्साहनही दिले, आणि स्वप्नरंजनास लगामही घातला.

१. फक्त ५०० शब्द! यास अपवाद करू नये.
२. केवळ माहितीप्रद लेख, जर पाठ्यपुस्तकासारखे भासलेत, तर वर्तमानपत्र छापणार नाही. लेख ताज्या घडामोडींशी निगडित असावा. (त्यांची [अमेरिकेतील लेखकांसाठी] उदाहरणे :अमेरिकन अर्थकारण, ऑस्कर पारितोषिके, स्पेस शटलचे उड्डाण वगैरे.)
३. चटपटीतपणा (शब्द माझा आहे, त्यांचा नव्हे) असावा.
मुख्य :
४. ते सल्ला देत राहातील, मदत करत राहातील! या सौहार्द्याने सुखावलो :-) या सहकार्यात समाविष्ट : (अ.) सुरुवातीच्या लेखांबद्दल संपादकीय टीका करणे. (आ.) क्षेत्रातील त्यांच्या ओळखींचा फायदा आपल्या मंडळाला करून देणे.

माझे मत :
१. ५०० शब्दांबद्दल पटले. पण दोन प्रकारचे लेख असतात. वर्तमानपत्रातील मुख्य भागातले लेख, आणि पुरवणीतले लेख. प्रथम प्रकारचे <५०० असावेत. कसोशीने आपल्या लेखकांनी प्रयत्न करावा. पण मंडळ ~१००० शब्दांचे लेखही स्वीकारेल. लेखकांनी जाणावे, की <५०० लेख हलतील, १००० शब्दांचे लेख अधिक काळ डब्यात राहातील.
२. आता "उपक्रमा"वरचे माहितीप्रद लेख पुष्कळदा "ताजे" नसतात. इतकेच काय, बातम्या देणे हे आपल्या मंडळाचे उद्दिष्ट्य नव्हे. (आपली स्पर्धा पत्रकारांशी नाही. आपण लोकशिक्षणाची गरज भागवत आहोत.) मग गाडगीळ यांचा सल्ला कसा आपलासा करावा? वाटतो तितका विरोधाभास नाही. खरी "माहिती" अशी असते की अनेक संदर्भात ती उपयोगी पडते. पुढे मी आपणा लेखकांना एक आह्वान देत आहे, ते बघावे.
३. चटपटीतपणा हवा हे खरेच. वर्तमानपत्र भराभर नजर टाकून वाचले जाते. लिखाणाची शैली सोपी, मनोरंजक हवी. गुंतागुंतीची नको.

आह्वान :
आपल्यापैकी ज्या लेखकांनी लेख लिहिणे सुरू केले नाही, अजून विचार करत आहोत, त्यांच्यासाठी.

आपल्याला हव्या त्या माहितीचा ४०० शब्दांचा गाभा लिहावा. त्याला वेगवेगळी ५०-शब्दी प्रास्ताविके आणि ५०-शब्दी समारोप जोडणे शक्य असले पाहिजे.

उदा :
प्रास्ताविक भारतातील/अमेरिकेतील/जपानमधील/जगातील शेअर घसरण्याबाबत किंवा चढण्याबाबत - ताजी बातमी असेल त्याप्रमाणे. (५० शब्द)
गाभा : निर्देशांक म्हणजे काय. त्याचा उपयोग काय. फायदे काय. तोटे काय. (४०० शब्द)
समारोप : प्रास्ताविकातला निर्देशांक तो चढला किंवा घसरला म्हणजे काय झाले, काय धडा घ्यावा. (५० शब्द)

म्हणजे प्रास्ताविक+समारोप ताज्या बातमीप्रमाणे बदलावा.

दुसरे उदाहरण :
प्रास्ताविक : एखाद्या प्रसिद्ध लावणी कलावंताला पुरस्कार, किंवा सफल परदेश सफर, किंवा मुंबईत लोककला महोत्सवाचे आयोजन. किंवा एखाद्या कलाकाराच्या मृत्यूची १० वर्षे. (५० शब्द)
गाभा : लावणी बद्दल ऐतिहासिक, किंवा कलात्मक माहिती (४०० शब्द)
समारोप : पुन्हा प्रास्ताविकाशी संबंध जोडायचा, आणि गाभ्यातली माहिती समर्पक कशी ते जोडायचे. (५० शब्द)

पुन्हा हे खास प्रास्ताविक+समारोप ताज्या बातमीप्रमाणे बदलावा.

या प्रकारचा एक लेख मासल्यादाखल लिहून येथे चढवण्याचा प्रयत्न मी लवकरच करेन.

असे गाभे जर आपल्या मंडळाकडे तयार असतील, तर कुठली घटना, बातमी घडताच, बारीक-सारीक संपादन करून (लेखकानेच ते करावे) एक ताज्या खबरेचे विश्लेषण तयार होईल. वर्तमानपत्राला ते छापण्यात रस वाटेल. आपल्या मंडळाचे वाचकांपर्यंत "माहिती" पोचवण्याचे ध्येय (मधल्या ४०० शब्दांच्या गाभ्यामुळे) साध्य होईल.

गाडगिळांना मी पुन्हा एप्रिल-अंती/मे महिन्यात प्रत्यक्ष भेटेन. त्यावेळी जर काही नवीन प्रश्न, मार्गदर्शन विचारता आले तर बघतो. त्यांना (एक अनुभवी व्यक्ती या नात्याने) विचारण्यासाठी प्रश्न सुचवावेत.

अति-ताजे नसलेले लेखनही आपल्या मंडळाला हवे आहे. पण ते "खपवण्यासाठी" (हेच शिक्षण आपले एक उद्दिष्ट्य आहे, तरी) सोपे नाही - आपले नाव होईल तसे हळूहळू ते लेख साप्ताहिक पुरवण्यांमध्ये घालण्यास आपण संपादकांना उद्युक्त करू शकू.

Comments

पटले

प्रास्ताविक-गाभा-समारोप या प्रकारे लेख विभागणे योग्य वाटले. प्रास्ताविक+समारोप ताजा आणि गाभा -माहितीच्या साठयावर बेतलेला.

फारसे वैयक्तिक नसेल तर गाडगिळांशी तुमची भेट कशी झाली? नेमके काय सांगितलेत? त्यांना कशामुळे या प्रकल्पात रूची वाटली तेही सांगाल का?

अवांतरः पुढील आठवड्यात गाडगीळ आमच्या इथे येत आहेत. काही सांगण्यासारखं, विचारण्यासारखं असल्यास प्रत्यक्ष विचारताही येईल.

वाचकशरणता

गाडगीळ-वैद्य भेट फोनद्वारे झाली. पुढच्या कार्यक्रमाआधी त्यांचा ३-४ दिवस सॅन डिएगोत मुक्काम असल्याची संधी साधून, मी त्यांना थोडीफार लोकमित्रची कल्पना दिली आणि धनंजयांशी फोनवर चर्चा करण्याची विनंती केली.

त्यांच्या बोलण्यातून कळलेला महत्त्वाचा मुद्दा (जो धनंजयांनी वर मांडला आहेच) की वाचकांना कशात रस आहे, त्याला कधी नव्हते एवढे महत्त्व आले आहे. आणि त्यामुळे छोटेखानी, सध्या घडत असणार्‍या गोष्टींशी संबंधित लेख स्वीकारले जाण्याची शक्यता अधिक आहे. थोडीफार वाचकशरणता आहे, पण त्याला इलाज नाही. इतर विषयांवरील लेखांसाठी पुरवण्या, नियतकालिके असे लक्ष्य ठेवावे लागेल.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

असहमत..

लेख ताज्या घडामोडींशी निगडित असावा.

बराचसा सहमत आहे. परंतु एखाद्या कलेविषयी (उदा हिंदुस्थानी अभिजात संगीत) माहिती देणारा लेख हा ताज्या घडामोडींबद्दल कसा काय निगडीत असणार हे कृपया गाडगीळांना विचारावे.

(अ.) सुरुवातीच्या लेखांबद्दल संपादकीय टीका करणे.

असहमत! एखाद्या लेखावर संपादकीय टीका करण्यापूर्वी संबंधित विषयातील ज्ञान संपादकाला असेलच हे कशावरून? आणि ज्ञान नसेल तर संपादक टीका तरी कशी काय करू शकणार?

कसोशीने आपल्या लेखकांनी प्रयत्न करावा.

असहमत आहे. लेखकांवर असे शब्दांचे बंधन आणू नये असे वाटते! संबंधित विषयतील लेखक मंडळी ही म्हणजे 'खालील पैकी कोणत्याही विषयावर ५०० शब्दात निबंध लिहा' असं सांगून लिहिणारी एखाद्या शालेय वर्गातील कुणी विद्यार्थी/विद्यार्थिनी असतीलच असं नव्हे!

आपल्याला हव्या त्या माहितीचा ४०० शब्दांचा गाभा लिहावा. त्याला वेगवेगळी ५०-शब्दी प्रास्ताविके आणि ५०-शब्दी समारोप जोडणे शक्य असले पाहिजे.

हे थोडे हास्यास्पद वाटते. लेखकांनी लेख लिहायचा की प्रस्तावनेचे, मूळ लेखाचे वगैरे शब्द मोजत बसायचे?

एखादा गवई २० मिनिटांच्या थाळीत एखादा राग गातो परंतु प्रत्यक्ष मैफलीत अर्ध्यापाऊण तासाच्या जरा निवांततेने तो अधिक छान व मनमोकळा रागविस्तार करतो ही वस्तुस्थिती आहे. कारण रेकॉर्डिंग स्टुडियोप्रमाणे तिथे त्याला २० मिनिटांच्या ठराविक वेळेचे बंधन नसते. त्याचप्रमाणे लेखकाला जर शब्दांचे बंधन घातले नाही तर तो लेखक संबंधित विषय अधिक चांगल्या तर्‍हेने व विस्तारपूर्ण समजावून देऊ शकेल असे निश्चितच वाटते! अर्थात, शब्दांचे बंधन नाही म्हणून कुणी सूज्ञ लेखक मुद्दाम पानंच्या पानं खरडत बसेल असं वाटत नाही आणि बसलाच तर त्याचा लेख नाकारण्याचा अधिकार मंडळाने राखून ठेवावाच की! परंतु मुळातच शब्दांचे वगैरे बंधन घालू नये आणि ज्याला जसा लेख लिहायचा आहे तसा मनापासून लिहू द्यावा असे वाटते!

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

काहीसे पटले तरी

तात्यांचे म्हणणे काहीसे बरोबर वाटले तरी एक गोष्ट असते, की आपण जेव्हा स्वान्तसुखाय लिहीत असलो तर हवे तितके लिहीता येते. जर एका स्तंभात लिहायचे तर कमीत कमी शब्दात मजकूर बसवता आला पाहिजे. त्यामुळे काही एक शब्दमर्यादा असणे हे योग्य आहे ( ५०० शब्द म्हणजे कदाचित फार कमी होतात, बर्‍याचदा ऍब्स्ट्रॅक्ट २०० शब्दांपर्यंतचे असतात (किंवा १ पानाच्या आतलाच मजकूर). ५०० शब्द म्हणजे साधारण दोन ते अडीच पाने? वर्तमानपत्रातील स्तंभलेखनाच्या दृष्टीने हे योग्यच आहे. पण लेख केवळ वर्तमानपत्रांसाठी पाठवायचे नसल्यास ही मर्यादा वाढवायला हरकत नसावी.

गाडगिळांचा दुसरा मुद्दा विचार दोन्ही बाजूंनी विचार करण्यासारखा आहे - वाचकांच्या पसंतीला पहिला मान. ते तर कुठच्याही व्यवसायात पाहिजेच. तसेच प्रस्तुत लिखाण हे लोकमित्र मंडळाने पुढे आणण्यासारखे आहे किंवा नाही, किंवा ध्येयधोरणात बसते आहे किंवा नाही हे त्यांच्या कार्यकारिणीने ठरवावे असे वाटते.
उदाहरणादाखल मटाचे "आयफेल टॉवर" हे गेली कित्येक वर्षे प्रसिद्ध होणारे, विदेशांतल्या बातम्या देणारे सदर आहे. यातील बातम्या या गाडगिळांच्या उदाहरणांप्रमाणेच कशा पद्धतीचे लेखन असू शकते यासाठी उद्बोधक म्हणून बघाव्यात. http://maharashtratimes.indiatimes.com/articlelist/2578599.cms

माझे व्यक्तीशः म्हणणे असे आहे, की याबाबतीत तुम्ही आपण होऊन गाडगिळांचा सल्ला घेतला हे अतिशय उत्तम झाले. अजूनही काही अनुभवी लोकांचे सल्ले जरूर घ्यावेत. त्याने वेगळेवेगळे विचार कळतात, विचारातला एककल्लीपणा कमी होतो. पण चाणक्य म्हणतात तेही योग्य आहे की ऐकावे जनाचे, करावे मनाचे असे सांगितलेले आहे, ते योग्य वेळेस वापरावे :-)

योग्य मार्गदर्शन

तात्यांचे मार्गदर्शन अनुभवाचे असते.

हा चर्चेचा विषय लिहिला तेव्हा फारच थोडक्यात लिहिला.

गाडगीळ यांचा सल्ला म्हणजे आपल्या मंडळासाठी कायदा नव्हे. त्यांच्या अनुभवाच्या बोलांचा आपण योग्य तसा वापर करावा.

लेख ताज्या घडामोडींशी निगडित असावा.
बराचसा सहमत आहे. परंतु एखाद्या कलेविषयी (उदा हिंदुस्थानी अभिजात संगीत) माहिती देणारा लेख हा ताज्या घडामोडींबद्दल कसा काय निगडीत असणार हे कृपया गाडगीळांना विचारावे.

याबद्दल मला वाटते त्यांनी उदाहरण अनायासे दिले होते. सवाई गंधर्व उत्सवाच्या वेळी हे विचार वाचकांच्या मनात ताजे असतात. त्याचे निमित्त करून या विषयाला हात घालता येईल, अशी माझी त्यांच्या मताला पुरवणी.

(अ.) सुरुवातीच्या लेखांबद्दल संपादकीय टीका करणे.
असहमत! एखाद्या लेखावर संपादकीय टीका करण्यापूर्वी संबंधित विषयातील ज्ञान संपादकाला असेलच हे कशावरून?

शब्दयोजनेत माझी चूक झाली. क्षमस्व. संपादकीय म्हणजे "अमुक प्रकार छापण्यास संपादक सहज होकार देतील काय?" अशा प्रकारची टीका-टिप्पणी. वर्तमानपत्राचे संपादक मूळ विषयाचे तज्ज्ञ नसतात. येथे गाडगीळ हे "अशा संपादकाच्या मनाचा वेध" या विषयात आपला अनुभवी सल्ला देतील. त्यांना आपले सर्व लेख पाठवायचा माझा मुळीच विचार नाही. त्यांचे सौहार्द्याचा मान म्हणून काही लेख (त्यांच्या सल्ल्याशी जे सुसंगत आहेत, असे) त्यांना पाठवेन.

कसोशीने आपल्या लेखकांनी प्रयत्न करावा.
असहमत आहे. लेखकांवर असे शब्दांचे बंधन आणू नये असे वाटते!

मुक्त भाषणस्वातंत्र्याच्या दृष्टीने तुमचे म्हणणे तंतोतंत बरोबर आहे. त्याच प्रमाणे, विषयाचे विवेचन खोलवर करायचे असेल, तर जोपर्यंत सर्व तपशील दिले जात नाहीत, तोवर लिहिणे आवश्यकच असते. मान्य. महाभारत १ लाख श्लोकांचे आहे, कारण त्याला १ लाख श्लोकांची गरज आहे. वेगवेगळ्या आकारमानाच्या लेखनप्रकाराला वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकबांधणी लागते. लहान लेख रोजच्या वर्तमानपत्रात, मध्यम-लघु लेख साप्ताहिक पुरवण्यांत, मध्यम लेख साप्ताहिक/मासिकांत, दीर्घ लेख दिवाळी अंकांत, अतिदीर्घ लेख स्वतंत्र पुस्तकांत लिहावेत. लेखकांनी हे सर्व प्रकार जरूर लिहावेत. पण मंडळ या सुरुवातीच्या काळात वर्तमानपत्रे आणि पुरवण्या यांच्या छापखान्यांचा/वितरणसंस्थेचा फायदा घेऊ इच्छिते. त्यामुळे त्या माध्यमांत साधारण ज्या लांबीचे लेख छापले जातात, ती मर्यादा आपण पाळावी. पुढे मंडळ स्थिरस्थावर झाले, त्याला मनुष्यबळ मिळाले, की दीर्घ लेख छापणार्‍या प्रकाशकांकडे जाऊ म्हणजे जाऊच. (स्वतंत्र पुस्तके छापण्याचे काम मंडळ बहुधा अंगावर नजिकच्या भविष्यात घेणार नाही.) त्यामुळे लेखकांनी वाटेल तसे लिहावे. मंडळ मात्र आपल्याला जमेल तसे (सेतुबंधनात खारीने छोटे खडे नेलेत तसे) लेख प्रकाशित करायचा प्रयत्न करेल. सुरुवातीला मंडळ लहान लेखांच्या बाजारात शिरायचा प्रयत्न करेल. बळ वाढेल तशा मोठमोठ्या शिला नेऊ.

आपल्याला हव्या त्या माहितीचा ४०० शब्दांचा गाभा लिहावा. त्याला वेगवेगळी ५०-शब्दी प्रास्ताविके आणि ५०-शब्दी समारोप जोडणे शक्य असले पाहिजे.
हे थोडे हास्यास्पद वाटते. लेखकांनी लेख लिहायचा की प्रस्तावनेचे, मूळ लेखाचे वगैरे शब्द मोजत बसायचे?

लेखकांनी जरूर आपल्या मनास पटेल तसे, आपल्या खास लेखनशैलीने लिहावे. हा प्रयोग करून बघायचे माझे काही लेखकांना आह्वान होते (सर्व प्रकारचे लेख लिहिण्याचे आवाहन होते). लिहिल्यानंतर शब्द मोजण्यावाचून मात्र पर्याय नाही. माझ्या कामाच्या निमित्ताने अनेक अभ्यासपत्रिकांत लेख लिहिण्याचा प्रसंग येतो. लेखांना शब्दमर्यादा आणि तक्त्यांच्या मर्यादा असतात. (म्हणजे कोणी त्याहून मोठे लेख लिहायची मनाई करत नाहीत, केवळ छापायला नकार देतात.) या मर्यादा वेगवेगळ्या लेखांसाठी वेगवेगळ्या असतात. काही प्रकारच्या लेखांसाठी १००० शब्द (तक्ता नाही), अन्य ठिकाणी ५००० शब्द (+५ तक्ते)! आपले लेखन शक्यतोवर ज्या पत्रिकेच्या वाचकांपर्यंत पोचवायचे असते ते माहीत असले, तर मी अंथरूण पाहूनच पाय पसरतो. आणि लांबच लेख लिहायचा असला, तर वेगळ्या मासिकाला पाठवतो.

एखादा गवई २० मिनिटांच्या थाळीत एखादा राग गातो परंतु प्रत्यक्ष मैफलीत अर्ध्यापाऊण तासाच्या जरा निवांततेने तो अधिक छान व मनमोकळा रागविस्तार करतो ही वस्तुस्थिती आहे.

सुंदर. वर्तमानपत्रातील लेख आणि उत्तम पुस्तक यांतील फरक सांगणारी ही चपखल उपमा तुमच्यासारख्या दर्दी कलाकारालाच सुचू शकेल. या वेळेला कमी मनुष्यबळ असल्यामुळे आपले मंडळ एक विना-नफा रेकॉर्डिंग-स्टूडियो आहे. वेळ, पैसा, मनुष्यबळ मिळाल्यावर तबकडीची मर्यादा नसलेल्या मैफिली जरूर भरवू.

धन्यवाद,

या वेळेला कमी मनुष्यबळ असल्यामुळे आपले मंडळ एक विना-नफा रेकॉर्डिंग-स्टूडियो आहे. वेळ, पैसा, मनुष्यबळ मिळाल्यावर तबकडीची मर्यादा नसलेल्या मैफिली जरूर भरवू.

धन्यवाद! मनुष्यबळ, वेळ आणि पैसा या तीनही गोष्टींपैकी मी त्यातल्या त्यात 'पैसा' ही गोष्ट माझ्या ऐपतीप्रमाणे, कुवतीप्रमाणे, यथाशक्ति, यथामति देऊ इच्छितो व त्याबाबत संबंधितांनी माझ्याशी व्य नि द्वारे संपर्क साधावा असे येथे विनम्र निवेदन करतो...

मंडळाच्या कार्यास पुनश्च एकदा शुभेच्छा...

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

तात्यांकडून आकडेवारी

तात्या हे उत्तम संगीत-शिक्षणात्मक लेख लिहितात. त्यांच्या लेखांमधील शब्दसंख्येची आकडेवारी बघूया. अनेक भाग असलेली त्यांची "बसंतचे लग्न" ही लेखमाला मी निवडली. शब्दसंख्या येणेप्रमाणे :

भाग १: २४५
भाग २: २७२
भाग ३: ५५५
भाग ४: ६०३
भाग ५: ५६१
भाग ६: ६८१
भाग ७: ८८४
भाग ८: ६५५
भाग ९: ५२७
भाग १०: ६३३
भाग ११: ९९४
भाग १२: ९६३

ही लेखमाला कुठल्याही संस्कृती-कला पुरवणीला शोभली असती (आणि कोणास ठाऊक, तात्यांनी मनात आणले, तर भविष्यात शोभेल!)

तात्यांना उपजतच नजर आहे, त्यांचे बहुतेक लेख ५००-१००० शब्दांत येतात. एखाद्या अघळपघळ लेखकाला भरभरून लिहिताना संक्षेप करण्याची उपजत जाणीव नसेल. तशा लेखकासाठी शब्दमर्यादा आधी ठाऊक असली तर बरे असते.

यात विशेष सांगावे की तात्यांनी यमन/यमनकल्याणासारख्या आवडत्या रागाची ओळख भाग २ मध्ये २७२ शब्दांत करून दिली आहे. म्हणजे ५०० शब्दांपेक्षा कमी! पण दमदार शब्द. यामुळे दुसर्‍या एखाद्या लेखकाला ४००-५०० शब्दांत असेच काही सुंदर शब्दांकन करण्यास स्फूर्ती येऊ शकेल.

तात्यांसारख्या कुशल लेखकांनी शब्दमर्यादेकडे दुर्लक्ष करून लेखन करावे - कारण त्यांचे लेखन आपोआप शब्दमर्यादेत येते. मर्यादा आहेत बाकी आम्हा पामरांसाठी.

(हा प्रतिसाद व्यक्तिगत रोखाचा नसून विदा-विश्लेषणाचा आहे. सदस्याचे लिखाण उपक्रमींच्या वाचनातले, विषय आवडीचा, असे आहे म्हणून उदाहरणार्थ त्यांचा विदा वापरला आहे. संपादक मंडळाने नोंद घ्यावी, आणि प्रतिसाद उडवू नये.)
टीप : शब्द मोजण्यासाठी मायक्रोसॉफ्ट वर्ड प्रणाली

धन्याशेठ,

धन्याशेठ,

तुम्ही आमच्या लेखमालेचे उदाहरण दिलेत खरे, परंतु अहो पण आमची गोष्ट वेगळी! वेगळी इन् द सेन्स, आम्ही काही ग्रेट वगैरे नाही परंतु मनोगत, उपक्रम, मिसळपाव यांसारख्या चार संस्थळांवर हिंडून, टक्केटोणपे खाऊन हळूहळू लिहायला शिकलो आहोत, :)

परंतु उद्या जर एखाद्या नवख्या परंतु गुणी लेखकाला काही लिहावेसे वाटले तर त्याला ते आधी लिहू द्यावे. शब्दमर्यादेच्या वगैरे अटी त्याला घालू नयेत एवढेच माझे म्हणणे होते. काय सांगावं, कदाचित तो लेखकही मंडळाला अपेक्षित असणार्‍या शब्दमर्यादेत लेख लिहील! :)

आणि त्याने अपेक्षित शद्बमर्यादेत जर लेखन नाही केले तर मग काय करायचं ते बघता येईल! परंतु आधीपासूनच एखाद्याला शब्दमर्यादेची वगैरे भिती का घाला? एवढाच माझा मुद्दा होता..

असो, अर्थात ही माझी वैयक्तिक मतं झाली!

ही लेखमाला कुठल्याही संस्कृती-कला पुरवणीला शोभली असती

धन्याशेठ, आपण माझ्या बसंतचे लग्न या मालिकेबद्दल कौतुकपर दोन शब्द लिहिलेत त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो..

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

सहमत !!!

एखाद्या नवख्या परंतु गुणी लेखकाला काही लिहावेसे वाटले तर त्याला ते आधी लिहू द्यावे. शब्दमर्यादेच्या वगैरे अटी त्याला घालू नयेत एवढेच माझे म्हणणे होते. काय सांगावं, कदाचित तो लेखकही मंडळाला अपेक्षित असणार्‍या शब्दमर्यादेत लेख लिहील! :)

१००% सहमत.

लोकमित्र मंडळ: लेखांचे विषय

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
लेखविषयांसंबंधी मला वाटते की किशोरवयीन तसेच विशीतील तरुण व्यक्तींना मार्गदर्शपर ठरेल,त्यांचा उत्साह दुणावेल, त्यांना स्फ़ूर्ती आणि प्रोत्साहन लाभेल, आत्मविश्वास वाढेल असेही लेख असावे.मागे श्री.प्रमोद देव यांनी डॉ. तात्याराव लहाने यांची एक मुलाखत दिली होती. खेडेगावात गुरे राखणारा एक मुलगा पुढे मोठा डॉक्टर झाला हे वाचून गरीब पण बुद्धिमान विद्यार्थ्याच्या आत्मविश्वासाचे सबलीकरण होऊ शकते.तरुणांना नवनवीन माहिती द्यायला हवी हे खरे पण त्यांच्यात सद्विचार,वैज्ञानिकेदृष्टी,स्वयंविकासासाठी कार्यप्रवणता या गोष्टींचे रोपण झाल्यास ते अधिक उपयुक्त ठरावे.
......................................................................................................

एक अनुभव

तात्याने मांडलेले मुद्दे विचार करण्यासारखे आहेत . त्यावरुन एक आठवले. युनिक फिचर्स ने मला ज्योतिषावर एक लेख लिहायला दिला. मी शब्द मर्यादा न जुमानता तो भृगुसंहितेवर लिहिला. त्यात तदानुषंगिक असलेला भाग नाडीग्रंथ पण टाकला. स्टेशनरी -कटलरी, किराणा-भुसार , एस्टीडी झेरॉक्स सारखा. फोटो दिला नाही. आता वृत्तपत्रिय चौकटीत तो बसेना; मासिकाच्या चौकटीत बसेना; दिवाळि अंकाच्या भाउगर्दीत कोण पहाणार? नेमके "आजचा चार्वाक' नावाचे एका मासिकाला तो विषय दिवाळी अंकाला क्लिक झाला. फक्त फोटो नंतर दिला.
हा कधी कधी रेडीमेड कपडे व टेलर मेड कपडे असा भाग बनतो. एखादा रेडीमेड कपडा एखाद्याला परफेक्ट बसतो.
खालील गोष्टी महत्वाच्या
१) वाचकवर्ग प्रामुख्याने नेमका कोण आहे?
२) नियतकालिक मासिक/पाक्षिक/दैनिक/अनियतकालिक / दिवाळी अंक/वार्षिक यानुसार फरक पडेल्
३) नियतकालिकाची प्रकृती
ज्या वाचकांसाठी लिहायचे आहे त्यांचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे. समजा ज्यांना गाण्यातले काही कळत नाही (माझ्यासारखा) त्यांच्या समुहासमोर ख्याल गायक आणला तर ?तेच दहा मिनिटांचा संगित सरिता सारखा कार्यक्रम सादर केला तर् ज्ञानात ही भर व मनोरंजन सुद्धा. ख्याल गायकाला तीन मिनिटात गा असे सांगितल्यावर त्याची होणारी कुचंबणा एचएमवी च्या सुरुवातीच्या काळात त्रासदायक ठरली. मग बुंदीपाडू गायक बाजी मारुन गेले. (पारंपारिक गायकांच्या मतानुसार)
तरी देखील कालानुरुप बदलायला हवे. कमी शब्दात आशयपुर्ण मांडणी करणे खरच अवघड काम आहे. माझी बायको मंजिरी असे शब्दमर्यादांचे लेखन लीलया करत असे. तिचे लेखन इंन्स्टंट , मसाला घातलेले असते फीचर्स वाल्यांना ते फार आवडते. युनिक फिचार्स मध्ये तिचा रतीब होताच. (आता मी त्याला बुंदीपाडू म्हणतो , कारण मला ते कष्टप्रद वाटते) इथे बघा नमुना. यनावाला मात्र त्याला बिंदुगामी म्हणतात. To make the things simple is most difficult thing. अस कुनी म्हन्लय हो!
प्रकाश घाटपांडे

मुद्दे

मुद्यांवर सहमत होणे वा न होणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. हे मंडळ एका हेतुने काम करणार आहे. मंडळाच्या सदस्यांनी काही विचार केला आहे आणि काही अनुभवी लोकांकडून सल्ला घेतला आहे.
येथे तर टिका करण्यावरून टिका केली आहे. मग संपादकांनी टिका का करू नये? सुमार केतकर नाही का लोकसत्तेत अक्कल पाझळत प्रत्येक विषयावर? आम्ही सदस्य नाही का प्रतिसाद देत अनेक विषयांवर?
गाभा, प्रास्ताविक, समारोपा बद्दल काही मार्गदर्शक लिहिले आहे असे वाटते. काही जण लिहायला लागले कि काहीही शब्दबंबाळपणे लिहितात. अथवा लिखाणात मुद्दे कमीच असतात आणि लेख मात्र लांबलेला. त्यापेक्षा जे नवे लेखक आहेत, असतील, त्यांना मार्गदर्शन केल्यास काही वावगे आहे असे वाटत नाही. तसेच गरज म्हणून प्रतिथयश लोकांना अपेक्षांची कल्पना दिल्यास काही चुकीचे वाटत नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर झाकीर हुसेन तबल्याचा उस्ताद असला आणि तबल्यात किती ही महान कलाकार असला तरी "वाह ताज" म्हणताना त्याला २ तास तबला वाजवलेला दाखवत नाहीत. तिथे काही सेकंदच. कारण तिथे बंधन आहे. तो नाही म्हणतं मी २ तास तबला बडवेन तुम्ही संपादन करा आणि घ्या त्यातले ५ सेकंद.
असो, शेवटी, "ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे" हि म्हण आपल्याला माहित आहेच. त्यामुळे सल्ले तर शक्य त्या सर्वांचे घ्यावेत आणि ध्येयाशी सुसंगत अशी कृती मंडळाने करावी.

ॐ सह नाववतु

मला हेन्री फोर्डचे प्रसिद्ध वाक्य येथे उर्धृत करावेसे वाटते आहे:

एकत्र येणे ही सुरवात आहे, एकत्र राहणे ही प्रगती आहे आणि एकत्र काम करणे हे यश आहे.
Coming together is a beginning. Keeping together is progress. Working together is success.

"ॐ सह नाववतु । सह नौ भुनक्तु । सह वीर्यं करवावहै । तेजस्विनावधीतमस्तु । मा विद्‌विषावहै ॥" (एकत्र काम करूया, संरक्षण करूया, एकमेकांचा द्वेष न करता एकत्रीत यशस्वी होऊया) अशी प्रार्थना म्हणूनच आपण करतो.

बाजारात तुरी करण्याऐवजी, आधी काम चालू करूया. काही गोष्टी चुकल्या तर समजतील आणि बदलता येतील, नंतर नवीन कल्पना (या प्रकल्पास योग्य) असल्यास त्यात घालता येतील पण ते सर्व काम चालू झाल्यावर - त्याला सातत्याने प्रगती (कन्टिन्यूअस इंपृव्हमेंट) म्हणता येईल...

एका वाक्यात "चुकीचा मराठी बाणा" बाजूला ठेवावा अशी विनंती कराविशी वाटते.

सहमत.

काम चालू ठेवा, सूधारणेवर लक्ष ठेवा आणि अकारणच सल्ले मागु नका हे सूत्र सोपे आहे. यावरुन एक गोष्ट आठवली, बाप, लेक आणि गाढव गावाला चालले होते, अगोदर मुलगा गाढवावर बसला -> लोकांची टिका की बाप पायीपायी चालला -> मग बाप गाढवावर बसला -> लोकांची टिका असा कसा बाप? -> मग दोघे गाढवावर बसले -> परत टिका की दोघे कसे बसले? -> मग दोघांनी गाढवाला काठीला बांधून स्वःता उचलले -> इत्यादी इत्यादी.

शेवटी ऐकावे जनाचे हेच खरे.

+१

सुरु तर करुया मग बघु!!.. बाकी तात्या म्हणतात ते बरेचसे मुद्दे पटले.

-ऋषिकेश

मार्गदर्शक

हा लेख व गाडगिळांचे मुद्दे मार्गदर्शक वाटले.
मला असे वाटले:
मुद्दा १. वर्तमानपत्राची धोरणे, अमुक एक विषयासाठी ठरवलेली जागा, मूळ वर्तमानपत्रात छापायचे की पुरवणीत यावर शब्दसंख्या ५०० अथवा हजार हे ठरवले जावे. स्वानुभव असा आहे कि शब्दसंख्येपेक्षा ओळसंख्या मर्यादा म्हणून सांगितल्यास लेख लिहिताना मनाची आणि हातांची पावले त्या दिशेने अधिक चांगली पडतात. (अर्थात '१०० ओळींचा निबंध लिहा' म्हटल्यावर प्रत्येक ओळीत एक शब्द लिहून १०० ओळी भरणारे महाभागही लहानपणी पाहिले आहेत. सुवर्णमध्य म्हणजे 'अमुक शब्दसंख्या/अमुक ओळसंख्या' असे दोन्ही पर्याय देणे.)
मुद्दा २. हा मुद्दा वृत्तपत्राच्या खपाच्या दृष्टीने पटला. पण नव्याने लेखन करताना ताज्या घडामोडींशी संबंधित लेख लिहू असे म्हणून तो खूप उत्तम लिहीला जात नाही. त्यातली उस्फूर्तता हरवते. लेखनाचा बराच सराव झाल्यावर सवयीने हव्या त्या विषयावर हव्या त्याच वेळेत विचार करुन चांगला लेख लिहिणे जमत असावे. याला स्वतःचा एक उपाय म्हणून नव्या लेखकांनी सुचेल त्या विषयावर उस्फूर्त लेख सुचतील तेव्हा आणि विषय डोक्यात घोळत असतानाच लिहून स्वतःकडे साठवण ठेवावी आणि ते समयोचित वाटतील अशा प्रसंगी एक एक सादर करत जावे.
मुद्दा ३. थोडा पटला. पण क्लिष्ट माहितीपूर्ण किंवा समस्याप्रधान विषयांवर लिहिताना हा चटपटीतपणा नेहमी राखता येईलच असे नाही. लेख एकदा वाचून बर्‍यापैकी कळेल अशी सरळ भाषा, समजतील अशी उदाहरणे यासह लिखाण नेहमी अगदी चटपटीत आणि खुसखुशीत झाले नाही तरी वाचनीय व्हावे असा मार्ग काढता येईल.
मुद्दा ४. वाचून बरे वाटले. थोड्याफार मार्गदर्शनाची गरज निदान सुरुवातीला तरी नक्कीच आहे.

(घाईत असल्याने शुद्धलेखनाला धोबीपछाड दिलेली आहे. कृपया समजून घ्यावे.)

ग्रंथ परिचय

ग्रंथपरिचय हा प्रकार देखील समाविष्ट होउ शकतो. प्रासंगिक बाबी नुसार तो प्रकाशित करता येतो. लेखन शिळे होत नसते. मूळ ग्रंथपरिचयात समयोचित बदल करुन त्यात ताजेपणा आणता येईल. हा बदल वाचकाभिमुख असल्याने तो ताजा वाटेल. उपक्रम, मिसळपाव यावर प्रकाशित झालेल्या लेखनाचेच अनेक उपयुक्त लेख होउ शकतात, प्रतिसादाच्या संकलनातुन लेख तयार होउ शकतात. सर्किट यांच्या कल्पनेतील बालसाहित्य तर यात आवश्यकच आहे. आजानुकर्णाचा चांदोबा, ऋषिकेश च्या आजी आजोबांच्या वस्तु, धनंजयाचे गोष्टीरुप विज्ञान अशी अनेक उदाहरणे आहेत. थोडक्यात उपक्रम हा लोकमित्र मंडळाचा मोठा स्त्रोत आहे.
प्रकाश घाटपांडे

ॐ सहवीर्यं करवावहै |

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. विकास लिहितातः "एकत्र येणे ही सुरवात आहे, एकत्र राहणे ही प्रगती आहे आणि एकत्र काम करणे हे यश आहे."
एकदम सहमत. हे सर्वांनाच पटण्यासारखे आहे.
"एका वाक्यात "चुकीचा मराठी बाणा" बाजूला ठेवावा अशी विनंती कराविशी वाटते.
वा! छानच. अगदी सूचक. सर्वोत्कृष्ट प्रतिसाद.

 
^ वर