गाथा सप्तशती अल्पपरिचय :(४)
गाथासप्तशती: अल्प परिचय :(४)
.....
या लेखमालेच्या पहिल्या तीन भागांत आठ गाथा लिहिल्या. भाग:३ मधे श्री. लिखाळ यांनी एक शंका उपस्थित केली. तिच्या उत्तरासाठी नववी गाथा लिहिली. ती अशी:
...........................................................................................
श्री. लिखाळ विचारतात :"या सप्तशतीमधील काव्याचा आस्वाद घेण्याचे सोडून त्याचे पाठ का केले जातात? की सप्तशती मध्ये पारायणे करावित असा आध्यात्मिक वगैरे अजून काही मजकूर आहे?''
..............
''सप्तशती पाठ करतात'' असा उल्लेख माझ्या तरी वाचनात नाही. एक हजार गाथा सार्थ वाचल्या. त्यांत किरकोळ ५/७ श्लोक सज्जन स्तुती चे आहेत. देवदेवतां विषयी काही गाथा आहेत. पण त्यांचा स्थायी भाव शृंगारच आहे. उदाहरणार्थः
९.विवरीअ रअम्मि सिरी,बम्हं दट्ठूण णाहिकमलत्थं |
हरिणो दाहिणनअणं, रसाउला झत्ति ढक्केइ |
शब्दार्थः..विअरीअ = विपरीत......रअम्मि= रत करीत असता...सिरी=श्री(लक्ष्मी)
..........णाहिकमलत्थं = नाभिकमलस्थ.....बम्हं =ब्रह्मदेवाला
.........दट्ठूण = पाहून.....हरिणो = हरीचा, ...दाहिणनअणं = दक्षिणनयन
........रसाउला = रसव्याकुला,....झत्ति = झटकन..ढक्केति = झाकते.
अर्थः पुरुषायित करण्याच्या बेतात असताना, विष्णूच्या नाभिकमलात बसलेला ब्रह्मदेव लक्ष्मीला दिसला. तेव्हा रसानंदासाठी उतावीळ झालेल्या लक्ष्मीने त्वरा करून विष्णूचा उजवा डोळा मिटला.
{....विष्णूने उजवा डोळा मिटला की सूर्यास्त होतो असा संकेत आहे. मग कमलदले मिटतील. ब्रह्मदेव झाकला जाईल.....विष्णू शेषशायी. त्याला उठून काही करण्याचा अंमळ कंटाळाच !....}
..तर अशा या देवां संबंधीच्या गाथा!!
*******************************************************************************************
पुढील प्रत्येक गाथेच्या संदर्भात एक प्रश्न विचारला आहे. सदस्यांनी त्याचे उत्तर द्यावे अशी अपेक्षा आहे.(हे कोडे नव्हे! उत्तर व्य. नि. त नको. प्रतिसादात लिहावे.)
१०.पहिउल्लूरणसंका, उलाहि असईहि बहुलतिमिरस्स ।
आइप्पणेण णिहुअं, वडस्य सित्ताईं पत्ताईं ।
संस्कृत छाया: पथिकच्छेदनशंकाकुलाभिर्बहल तिमिरस्य ।
आलेपनेन निभृतं वटस्य सिक्तानि पत्राणि ॥
अर्थ: गर्द छाया असलेल्या वडाची पाने वाटसरू खुडतील या शंकेने व्याकुळ झालेल्या असती स्त्रियांनी (स्वैरिणींनी) त्याच्या पानांवर पिठाचे पाणी शिंपडले.
प्रश्न : कां बरे? त्या पर्यावरणवादी होत्या का?
.............................................................................................................
११.एक्क च्चिअ रूअगुणं, गामिणधूआ समुव्वहइ ।
अणिमिसण अणो सअलो, जीए देवीकओ गामो ॥
संस्कृत छाया : एकैव रूपगुणं ग्रामणिदुहिता समुद्वहति ।
अनिमिषनयन: सकलो यया देवीकृत्तो ग्राम:॥
अर्थ: पाटलाची मुलगी इतकी सुंदर आहे,की ती दृष्टिपथात येताच सारे लोक तिच्याकडे अनिमिष नेत्रांनी पाहातात. खरोखर तिच्या सौंदर्यामुळे सारे गांव देवपण पावले आहे.
प्रश्न: '' सारे गांव देवपण पावले आहे.''असे कां म्हटले आहे?
...............................................................................................................................
( आग्रही मित्रां बरोबर एक सभ्य तरुण गणिकेकडे गेला.तिचा निरोप घेताना त्याने तिला विचारले:
" तुम्ही इतक्या सुंदर आणि गुणी. तुम्ही यामार्गात कशा पडलां? त्यावर तिने दिलेले उत्तर :)
१२. जं तुज्झ सई जाआ, असई ओ जं च सुहअ।
ता किं फ़ुट्टउ ? बीअं, तुज्झ समाणो जुवा णत्थी ॥
अर्थ: हे सुभग, तुझी पत्नी पतिवृता आणि आम्ही या अशा असती (वेश्या) आहो याचे मूलकारण स्पष्ट सांगू? तुझ्या सारखा तरुण तिला प्राप्त झाला व आम्हाला नाही.
प्रश्न: तिच्या या उत्तराचा हेतू काय असावा?
( आता शेवटचा पाचवा लेख राहिला. तेव्हढा लिहून परिचय संपवतो. )
******************************************************************************************
Comments
कल्पनाविलास
'कोडे नाही' वाचल्यावर काहीही कल्पनाविलास करायला हरकत नाही.
१. पानांवरच्या पांढर्या शिंतोड्यांच्या डागांमुळे ही पाने पक्षिविष्ठेने खराब झाली आहेत, किंवा तीर्थाचे डाग पडल्यामुळे हा वृक्ष पूजेचा आहे असे समजून, पाने कोणी तोडणार नाही. यास्तव याची पाने, त्यामुळे झाडाची छाया व स्त्रियांचे मीलनाचे संकेतस्थळ अबाधित राहील.
२. पाटलाच्या मुलीचे स्वर्गीय आणि निरागस सौंदर्य अनिमिष नेत्रांनी पाहणारे पुरुष वैषयिक भावना विसरले आहेत आणि म्हणून स्त्रिया आनंदित. जणू गावालाच देवपण आले आहे.
३. पत्नीशी इमान न राखणारी त्या तरुणासारखी माणसेच ज्यांच्या नशिबात आहेत त्या स्त्रिया असतीच असणार.--वाचक्नवी
आँ?
मला वाटलं की ज्याप्रमाणे स्वर्गीय अप्सरांचे रूप न्याहाळायला देवांना स्वर्गात खुली परवानगी असते, मर्त्य माणसांची नितीमत्ता त्यांना लागू होत नाही त्याप्रमाणे पाटलाच्या मुलीला पाहिल्यावर गावाला "देवपण" मिळाले का काय?
असो, माझे काहीतरी तर्कटच असते. ;-)
दुसरे उत्तर
अनिमिष् (पायमोडका ष्) या पुल्लिंगी नामाचा अर्थ - देव असा होतो. तर अनिमिष किंवा अनिमेष या विशेषणाचा अर्थ सदा उघडा (डोळा), न निजणारे असा होतो. ज्याचे डोळे सदा उघडे असतात व जो निजत नाही तो देव म्हणून अनिमिष नेत्रांनी पाहणार्यांना देवपदच जणू प्राप्त झाले असा काहीसा अर्थ असावा.
राधिका
अनिमिष्
पटले. फारच सोपे होते, उगीच कल्पनाविलास केला.
असती?
अशीच कोटी 'असती'वर असेल? असती(किंवा असन्ती) या विशेषणाचा अर्थ- नसणारी ;आणि नामाचा अर्थ- दुराचारिणी.
अनिमिष नेत्र
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
राधिका लिहितातः"ज्याचे डोळे सदा उघडे असतात व जो निजत नाही तो देव म्हणून अनिमिष नेत्रांनी पाहणार्यांना देवपदच जणू प्राप्त झाले असा काहीसा अर्थ असावा."
हा अर्थ अगदी बरोबर आहे. संपादकांच्या मताशी जुळणारा आहे.
कल्पनाविलास
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. वाचक्नवी यांचे वडाच्या झाडा विषयीचे उत्तर अगदी बरोबर आहे. संपादक जोगळेकर यांनी असेच लिहिले आहे.पांथस्थ पत्रावळीसाठी पाने खुडतात. पत्रावळीवर जेवायचे असते. ती पाने स्वच्छच हवीत.
अन्य दोन उत्तरे संपादकांच्या उत्तरांशी जुळणारी नाहीत.
गाथा आणि सप्तशती या वेगळ्या आहेत.
गाथा सप्तशती आणि फक्त सप्तशती या वेगवेगळ्या आहेत. गाथेमध्ये लोककाव्य आहेत तर सप्तशती ही देवीची अप्रतिम अशी स्तुती आहे.
गाथा सप्तशती आणि दुर्गा सप्तशती
सप्तशती :अल्प परिचय (३) या लेखात दिलेला प्रतिसाद इथे पुन्हा देत आहे.
मार्कंडेय पुराणातील देवीमाहात्म्याला "दुर्गा सप्तशती", बोली भाषेत नुसतेच "सप्तशती" असे म्हटले जाते आणि त्याचे पाठ केले जातात. रुद्रावर्तनाप्रमाणे ठराविक आवर्तनांना नवचंडी, शतचंडी असे म्हणण्याचा प्रघात आहे. संस्कृत डॉक्युमेंट्स या संकेतस्थळावर 'ही' सप्तशती वाचता येईल. http://sanskritdocuments.org/all_pdf/durga700.pdf
याशिवाय विकिपिडिया वरही माहिती आहेच, नेहमीप्रमाणे http://en.wikipedia.org/wiki/Devi_Mahatmya
आपला
(माहितगार) वासुदेव
~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"
सप्तशतीचाही एकदा तरी पाठ करावा.
सप्तशतीचे मराठीत भाषांतर झाले आहे. तोही एकदा पाठ करायला मराठीप्रेमींना हरकत नसावी. देवीचे अनेक अवतार वाचायला फारच बरे वाटते. (बाकी श्रेयसाचा भाग टाळावा)
आभार
यनावाला आणि वासूदेव यांचे शंकानिरसनासाठी आभार. आता खुलासा झाला.
१. वडाची पाने वाटसरु का खुडतात? बहुधा दुखल्या-खुपल्यावर उपचार म्हणून अथवा पत्रावळीसाठी असावेत. पाने खुडल्याने चीक खाली गळणार आणि वडाखालची जागा प्रणयासाठी गैरसोयीची होणार. पिठाचे पाणी का शिंपडावे ते कळाले नाही :) वरच्या प्रतिसादातील पक्ष्यांची विष्ठा वाटावी हा हेतू तर्कसंगत वाटतो.
अवांतर: बाकी विष्णूला उठून काही करावे याचा कंटाळा हे मजेदार वाटले.
--लिखाळ.
तुज्झ समाणो जुवा णत्थी ॥
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
संपादक जोगळेकर लिहितात की गणिका बनेल आहे. ती त्या युवकाला"तुज्झ समाणो जुवा णत्थी ॥" असे म्हणून
हरभर्याच्या झाडावर चढवत आहे. हेतू हा की गिर्हाईकाने परत यावे!