गाथा सप्तशती: अल्प परिचय (२)
काही गाथा:
हालसातवाहनाने ७०० गाथांचा कोश केला.पुढे जयवल्लभ नावाच्या टीकाकाराने आणखी ३०० गाथा गोळा करून या कोशात भर घातली. या सर्व १००० गाथा स. आ.जोगळेकर संपादित सप्तशतीत आहेत.
बहुतेक गाथा ग्रामीण भागातील असून शृंगार हा त्यांचा मुख्य विषय असला तरी त्या ग्राम्य नाहीत. त्यांचा आस्वाद नागर विदग्धतेनेच घ्यायला हवा. तरच त्यांतील काव्य, अलंकार,प्रतिमा, संकेत इ.चे आकलन होऊ शकेल. "चोलीके पीछे क्या है ।" या प्रकारची ही कल्पनाशून्य छचोर गाणी नव्हेत.
गाथा आर्यावृत्तात आहेत. त्या चालीत म्हणाव्या अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.पण प्राकृत भाषा अपरिचित असल्याने आपल्याला ते जमणे अवघड आहे.
........
१.अमिअं पाउअ कव्वं,पढिउं सोउं अ, जे ण आणंती।
कामस्स तत्ततन्तिं, कुणन्ति ते कहं ण लज्जन्ति ?।
..
संस्कृत छाया: अमॄतं प्राकृत काव्यं,पठितुं श्रोतुं च ये न जानन्ति ।
कामस्य तत्त्वचिन्तां,कुर्वन्ति ते कथं न लज्जन्ति ।
...
अमृतासारखे प्राकृत काव्य वाचणे किंवा ऐकणे ज्यांना माहीत नाही आणि जे कामशास्त्रातील तत्त्वांची (शुष्क) चर्चा मात्र करीत असतात त्या (संस्कृत पंडितांना ) लाज कशी वाटत नाही?
......
२.साळीचे शेत पिकून पांढरे झाले आहे.(ते शेतकरी कापतील व आपले भेटीचे एकान्त स्थळ नष्ट होईल) म्हणून मान खाली घालून का रडतेस? नटीने मुखाला हरितालाचा रंग लावून सज्ज व्हावे त्या प्रमाणे तागाचे शेत (पिवळ्या धमक फ़ुलांनी )नटले आहे, ते पाहा.
...
३. अण्ण महिला पसंगं, दे देव करेसु अम्ह दइअस्स ।
पुरिसा एक्कंतरसा, ण हु दोसगुणे विआणन्ति।
...
अन्य महिलाप्रससंगं, हे देव कुर्व स्माकं दयितस्य।
पुरुषा एकान्तरसा, न खलु दोषगुणौ विजानन्ति।
.....
देवा, माझ्या पतीचा संबंध अन्य स्त्रियांशी येऊं दे.(म्हणजे तरी त्याला माझे गुण समजतील.) एकनिष्ठ पुरुषांना (आपल्या पत्नीचे) गुण समजत नाहीत आणि दोषही उमजत नाहीत.
.......
४.धूम्ररहित अग्निगोलां सारखे लकाकणारे आपल्या नवपरिणित श्यामल पत्नीचे स्तन पाहून शेतकयाने माघमहिन्यात(ऐन हिवाळ्यात) आपली ऊबदार पांघरुणे विकून बैल खरेदी केला. (ऊबेची सोय झाली आहे. शेतीसाठी बैल हवा आहे.शेतकरी गरीब आहे.)
.....
५. जेत्ति अमेत्ता रच्छा, णिअम्ब!कह तेत्तिओ ण जाओसि?
जं छिपाइ गुरुगण लजिओ,सरन्तो वि सो सुहओ ।
...(.एक युवती म्हणते)...नितंबांनो, तुम्ही रस्त्याच्या रुंदीच्या प्रमाणानुसार विस्तृत का झाला नाही?
तसे झालां असतां तर, वडिलांच्या सान्निध्यामुळे संकोच वाटल्याने मुद्दाम दुरून जाणार्या प्रियकराला मला स्पर्श तरी करता आला असता!
Comments
गाथा आवडल्या
महाराष्ट्री प्राकृतातील पूर्वी कधी काही वाचले नव्हते त्यामुळे या भाषेने उत्सुकता वाढवली. ण ने सुरू होणारे शब्द आणि शब्दांतील अंतरात येणारे स्वर वेगळे वाटले.
गाथा सुरेख आहेत.
गाथा २ आणि ४ टंकायच्या राहील्या का?
गाथा
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
प्राकृत भाषा कशी असते याचा नमुना म्हणून काही गाथा टंकित केल्या. तसेच काही गाथांची संस्कृत छाया लिहिली. प्रत्येक गाथा लिहिण्याची आवश्यकता वाटली नाही. तसेच वाचक कंटाळतील असेही वाटले. पुस्तकात प्रत्येक गाथा, तिची संस्कृत छाया, अर्थ आणि विवरण आहे.
वा
३. आणखी एक गोष्ट लक्षात आली ती अशी, की एखाद्या शब्दाच्या संस्कृत आणि प्राकृत रूपांची तुलना केल्यास प्राकृत रूपामध्ये संस्कृत रूपातील बरीचशी व्यंजने फेकून देऊन अधिकतर केवळ स्वर टिकवून ठेवण्याकडे कल दिसतो.
आपले नीरिक्षण फारच सूक्ष्म आहे. यावर तज्ञ काय म्हणतात हे ऐकण्यास उत्सूक आहे. सध्या भाषेतल्या ध्वनींच्या प्रवाहावर एक पुस्तक वाचत आहे. त्यामुळे हे नीरिक्षण एकदम नजरेत भरले.
--लिखाळ.
सुरेख आणि सहमत
प्राकृताचे विश्लेषण आवडले.
खरे आहे आणि त्या निमित्ताने या भाषेतील खाचाखोचा अधिक कळल्या असत्या. एखाद्या भाषेकडे किंवा तिच्या विशेषाकडे पाहायचे झाले तर त्यातील जास्तीत जास्त उदाहरणे समोर हवीत असे वाटते.
प्राकृत
प्राकृतबद्दलचे विवेचन आवडले.
अवांतर - वरील गाथांमधील "स" चे उच्चार गुजराती किंवा राजस्थानी बोलीभाषेजवळचे वाटतात का?
प्रतिसाद/लेख
प्रतिसाद आवडला.
मूळ लेख माहितीपूर्ण आहे. मला आधी गाथा गद्यस्वरूपात आहेत असे वाटत होते. तो गैरसमज या निमित्ताने दूर झाला.
राधिका
चौथा मुद्दा
तुमच्या चौथ्या मुद्द्यातला प्रश्न आधी वाचला, तेव्हा आपल्याला नेमके काय म्हणायचे आहे, ते ध्यानात आले नव्हते. आता परत एकदा वाचल्यावर साधारण कल्पना आली. माझ्या तर्काप्रमाणे मी आपल्याला उत्तर देते.
स्वर जरी सारखे असले, तरी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे व्यंजने बदललेली दिसतात. पण कुठल्याही व्यंजनाच्या जागी इतर कुठलेही व्यंजन ऍट रँडम वापरायचे, असे नाही. काही विशिष्ट व्यंजनांच्या जागी काही विशिष्ट व्यंजने वापरायची. जसे तुम्ही वरच्या एका मुद्द्यात म्हटले आहे, की श आणि ष चा स होतो. म्हणजे जिथे जिथे स येईल तिथे तिथे आपण श किंवा ष घालून बघू. प घालून बघणार नाही. जसे पहिल्या गाथेत ठ चा ढ झालेला दिसतो आहे. म्हणजे ट-वर्गातल्या दुसर्या व्यंजनाच्या जागी चौथे व्यंजन वापरण्याची पद्धत दिसते असे म्हणता येईल. (अर्थात त्यासाठी एकच उदाहरण पुरेसे नाही.) हे सर्व वर्गांच्या बाबतीत म्हणजे क-वर्ग, च-वर्ग वगैरे, दिसते का ते तपासायचे. याचाच अर्थ कुठल्या व्यंजनाच्या जागी कुठलं व्यंजन येणार हे कळलं की, अर्थातली संदिग्धता बर्याच अंशी निघून जाईल.
राधिका
अच्छा
आता आपला मुद्दा कळला. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. मला वाटते, या व्यंजन काढून टाकणे आणि व्यंजन बदलणे प्रकारांत काहीतरी रेग्युलॅरिटी निश्चितच असणार. ती शोधून काढावी लागेल. मला आधी वाटले होते, की क,च,ट,त,प वर्गांतील केवळ तिसरी व चौथी व्यंजनेच वापरली जातात की काय, प्रथम २ व्यंजने वापरली जातच नाहीत की काय! परंतू प आणि क वापरले जात असल्याचे दिसत आहे. तसेच काही अनुनासिके वापरली जात असून इतर गायब आहेत. गायब अनुनासिके सर्वच ठिकाणी गायब असतात की जोडाक्षरात आली तरच गायब होतात, तसेच प, क हे फक्त जोडाक्षरातच वापरले जातात का वगैरे वगैरे बघावे लागेल. त्यासाठी अधिक प्राकृत वाक्ये व त्यांच्या संस्कृत छाया मिळाल्या तर उत्तम.
राधिका
एक प्रश्न
मला एक प्रश्न असा पडतो, की प्राकृत गाथा आणि संस्कृत नाटकांमधील प्राकृत संवाद, यांची नेहमीच संस्कृत छाया दिली जाते. त्यांची तुलना करून पाहिल्यास, वरकरणी तरी केवळ उच्चारांतलेच फरक दिसून येतात. याचा अर्थ त्यांचे व्याकरण साधारण सारखी आहे का? (साधारण सारखे यासाठी, की प्राकृतात कोणती व्यंजने/स्वर वापरले जातात, त्यानुसार प्रत्ययांचे रूप बदलत जाणार. त्यामुळे त्याअर्थी संस्कृतभाषेतील प्रत्यय आणि प्राकृतभाषेतील प्रत्यय यांच्यात फरक करता येईल. परंतू जर हे प्रत्यय वापरण्यासाठीचे निकष अगदी सारखेच असतील, तर मग त्यांना दोन वेगळे प्रत्यय म्हणणं कितपत योग्य ठरेल?)
राधिका
असहमत बाबत असहमत, तरी कौतूक
हे अवांतर आहे याबाबत मी सहमत आहे. मूळ साहित्यिक विषयाचा आस्वाद एक मोठी चर्चा आहे. अपभ्रंशांवरील विवेचन हाही मोठा विषय आहे, आणि सहित्यिक चर्चा भरकटण्यास मीही येथे जबाबदार आहे.
टग्या हे अत्यंत वैज्ञानिक दृष्टीने विचार करत आहेत.
हे अर्थातच अशक्य आहे. प्राकृत भाषा या "अपभ्रंश" म्हणून संस्कृतच्छाया काही प्रकारे "मूळपाठ्य" अशा वाचू नयेत. आपण मराठीही तशी वाचत नाही. त्या बोलीभाषा होत्या, आणि त्यांच्यात असंदिग्धता (भाषांना जितपत असते तितकी) स्वयंभू होती.
आता मराठीतही "थान" हा शब्द दोन प्रकारे येऊन संदिग्धता असल्यचे वाटू शकते - स्थल->थळ तसे स्थान->थान (हे चूक आहे आपल्याला माहीत आहे)
किंवा स्तर->थर सारखे स्तन->स्तान->थान
म्हणजे थान (मराठी)ची संस्कृतच्छाया काय असावी? स्थान की स्तन? ही संदिग्धता कोण्या अमराठी संस्कृत जाणणार्याला वाटू शकेल.
मराठी माणसाला (तसेच महाराष्ट्री प्राकृत बोलणार्याला) संकृतच्छायेशी काही सोयरसुतक नसते. त्याच्या दृष्टीने हा असंदिग्ध शब्द आहे.
जर मराठी माहीत नसेल तर अशा संदिग्ध परिस्थितीत संदर्भावरून शब्दाची संस्कृतच्छाया ठरवता येते. एखादा संदर्भ संदिग्ध असेल, पण भाषेचे साहित्य विस्तृत असेल, तर दुसरा, असंदिग्ध वापर सापडतो.
त्या प्राकृत भाषा लुप्त झाल्या, त्यांच्या थोड्याफार जवळची (मराठीच्या मानाने जवळची) संस्कृत भाषा अजून शिकली जाते म्हणून संस्कृतच्छायेचा आपल्याला फार उपयोग होतो. त्या मर्यादित दृष्टीने संस्कृतच्छाया वापरावी.
मग प्रसिद्ध व्याकरणग्रंथ (मोग्गलान, कच्छायन, प्राकृतप्रकाश वगैरे) अपभ्रंशाचे नियम सांगून प्राकृत भाषांचे व्याकरण का करतात? उदा मोग्गलानचा पालीसाठी नियम :
व-नंतर आलेला किंवा शब्दाच्या सुरुवातीचा ऋ=>उ. उदाहरण
वृषभ=>उसभ
(जसे स्तन->थान हा नियम मराठी भाषकांसाठी अप्रस्तुत आहे. थान शब्द आहे तसा शब्दकोशात सापडावा, किंवा घरात/गल्लीत शिकावा. त्याच प्रमाणे पाली-भाषकाला उसभ शब्द घरी/गल्लीत/शाळेत आपोआप कळेल.) काही जैन आणि बौद्ध धर्मग्रंथ प्राकृत भाषांमध्ये लिहिले गेले आहेत. पुढे त्या प्रचलित बोली राहिलेल्या नव्हत्या, पण संस्कृत प्रचलित सुशिक्षित भाषा राहिलेली होती. त्यामुळे मुळातच पालीचे वगैरे व्याकरण लिहिण्यापेक्षा अपभ्रंशाचे नियम लिहिणे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी झाले असेल. पण त्या भाषांच्या पुरते बघता अपभ्रंशाचे नियम पूर्णपणे अप्रस्तुत ठरावेत.
हे नियम ज्ञात नसते, तर टग्या करतात तसेच संदिग्धातून असंदिग्धाकडे प्रवास करत अर्थ लावावे लागले असते. त्यामुळे हे नियम शोधणार्या त्यांच्या विचाराच्या झेपेचे कौतुक करावे तितके थोडके. पण हे नियम खूप आहेत, आणि आपल्या हातात कोडे सोडवण्यासाठी साहित्याचे नमुने फार थोडे आहेत.
कोडे स्वतःहून सोडवणे अशक्य झाल्यास हेमचंद्र, वररुची, चंड, वगैरेंनी यांनी पूर्वीच्या काळात शोधलेले, लिहिलेले अपभ्रंशाचे नियम उपयोगी ठरावेत.
(माझ्यापाशी पैकी कुठल्याच प्राकृत व्याकरणाच्या ग्रंथांच्या प्रती नाहीत. पण त्यांचे उल्लेख असलेले ग्रंथ आहेत :-)
प्रतिक्रिया/प्रश्न
>>> गाथा आर्यावृत्तात आहेत. त्या चालीत म्हणाव्या अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.पण प्राकृत भाषा अपरिचित असल्याने आपल्याला ते जमणे अवघड आहे.
म्हणून पाहिल्या. आर्येत म्हणता येत आहेत - थोडा मात्रांचा गोंधळ कधीकधी होतो आहे. याचा अर्थ जी अक्षरे एरवी "लघु" वजनाची आहेत त्यापैकी काही "गुरु" वजनाने म्हणायची असणार. पण भाषेचा संदर्भ नसल्याने अदमासाने म्हणताना अदमासाने वजन टाकावे लागते.
आता मुख्य विषय - गाथा यांविषयी. २००० वर्षांपूर्वीच्या संस्कृतीचा एक दस्तावेज म्हणून हे सारे काम महत्त्वाचे आहेच. पण "चोली के पीछे" हा प्रकार या गाथांच्या संदर्भात कल्पनाशून्य आणि छचोर का ठरावा ते समजले नाही. स्तनानितंबादि अवयवांच्या (यात पुढे पुरुषांच्या इंद्रियांचे इतके स्वैर् उल्लेख आहेत का ते माहीत नाही. म्हणजे मग हे "रेटेड् आर्" आहे का "नॉट् रेटेड्" आहे ते कळेल) मुबलक उल्लेखांवरून असे दिसते की अलिकडील काळात लावणी या साहित्य-प्रकाराचे ग्रामीण जनमानसात जे स्थान आहे ते या "गाथां"चे त्या काळात असावे काय ? (मी साहित्यप्रकार या अर्थाने असे विचारत आहे. लावणीप्रमाणे गाथा कुणी नृत्यसंगीताबरोबर म्हणून दाखवत असतील असे म्हणायचे नाही.) स्तोत्रे, श्लोक, ऋचा या प्रकारांमधे ज्याप्रमाणे वर्ण्यविषय परमेश्वर/निसर्ग असतो आणि त्यांचे स्वरूप ज्याप्रमाणे आराधना/स्तुती/तत्वविवेचन असे असते तसे याठिकाणी दिसत नाही.
आर्या आणि गीती.
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. मुक्तसुनीत यांचा प्रतिसाद अभ्यासपूर्ण आहे. गाथा चालीत म्हणता येतात हे खरे. पण भाषा अपरिचित असल्याने शब्द चटकन वाचता येत नाहीत. माराठीत आपण एकदम शब्द वाचतो,एक एक अक्षर वाचत नाही.त्यामुळे प्राकृत वाचताना अडखळल्या सारखे होते. अस्खलित वाचता येत नाही.(मला तरी).
२/ "चोलीके पीछे...'' हे गाणे मला कल्पनाशून्य वाटते. त्यात कोणखी काव्यगुण नाही. सूचकता नाही.अलंकार नाही. कविसंकेत नाही. मात्र त्याला छचोर म्हटले हे माझे चुकले. खरे तर तो शब्द उगीच वापरला. मला धड अर्थही माहीत नाही. ३/ मुक्तसुनीत यांनी गाथा आर्यावृत्तात गाऊन पाहिली याचा मला मनापासून आनंद झाला.मी सुद्धा तो प्रयोग प्रयत्नपूर्वक केला आहे.
हे तर
हे तर आपल्या दादांच्याही वरताणच आहे.
...नितंबांनो, तुम्ही रस्त्याच्या रुंदीच्या प्रमाणानुसार विस्तृत का झाला नाही?
बाबो!!!
काही खरं नाही.
सौंदर्याचे नक्की काय 'माप' दंड होते त्याकाळी
यावर पण काही प्रकाश कुणी टाकावा...
आपल्या तुफान आवडलंय!
अजून येवू द्या
आपला
गुंडोपंत
रस्त्याची रुंदी
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
दोन हजार वर्षांपूर्वी खेडेगावातील रस्त्याची रुंदी किती असेल याची कल्पना करावी. वाहने नव्हतीच. रस्ता म्हणजे पायवाटच असावी.
रोचक
गाथा रोचक आहेत. यावरून एक मुद्दा मनात आला. ह्या गाथा दोन हजार वर्षांपूर्वीच्या. कामसूत्र इ. स. दोनशे मधले. खजुराहो इ. स. ९५० ते इ. स. १०५० मधले. म्हणजे अकराव्या शतकापर्यंततरी भारतीय संस्कृतीमध्ये आत्ताच्या पाश्चात्य जगतात आहे तितकी (किंवा अधिक?) लैंगिक मोकळीकता होती असे मानायला हरकत नाही. आणि हा प्रवास असाच चालू राहिला असता तर आत्ताच्या भारतीय समाजाचे चित्र बरेच वेगळे दिसले असते. प्रश्न असा की नंतरच्या हजारेक वर्षांमध्ये असे काय झाले की आपण लैंगिकतेच्या बाबतीत घूमजाव करून अगदी प्रागैतिहासिक काळात गेलो?
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.
बुद्ध!
बुद्ध!
बुद्धाने ही भयाण शांतता निर्माण केली!!!!
सगळे नियम परत लिहिले गेले...
आणि भारताची वाट लागली....
आपला
गुंडोपंत
रोचक
रोचक मुद्दा आहे. याचा संदर्भ मिळू शकेल का? गौतम बुद्धाचा काळ इसपू ५६३ ते ४८३ असा होता. त्याचा परिणाम दीड हजार वर्षांनंतर कसा झाला हे नीट कळले नाही.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.
मुसलमानी आक्रमण
माझ्यामते बुद्धामुळे भारतीय संस्कृतीवर फरक पडला हे सत्य आहे पण राजेंद्रचा प्रश्नाचे उत्तर मुसलमान संस्कृतीमुळे असे वाटते.
विस्तार नंतर.
एकदम बरोबर
हेच लिहावे म्हणून बोटे सरसावली होती. तेव्हड्यात हा प्रतिसाद दिसला. त्यामुळे सहमत असे लिहितो.
डोक्यावर पदर घेणे, सायंकाळनंतर घराबाहेर न पडणे या सारखी अनेक बंधने याच काळात आली असणार. अभ्यासक यावर योग्य तो प्रकाश टाकतील असा विश्वास आहे.
--लिखाळ.
सहमत
बरोबर.. मुसलमानांनी आपल्या (हिंदू) संस्कृतीतले गुण उचलले नाहीत उलट (हिंदुत्ववादी) हिंदूंनी मात्र इस्लाम मधील अवगुण बरोबर उचलले.
कामसुत्र आणि खजुराहो ज्या संस्कृतीत घडले तिथे आता व्हॅलेंटाईन डे ला दुकाने फोडली जातात हे त्याचेच द्योतक! आणि आयरनी म्हणजे हे लोकंही स्वतःला 'संस्कृती रक्षक' म्हणवतात!!
बौद्ध
रोचक मुद्दा आहे. याचा संदर्भ मिळू शकेल का? गौतम बुद्धाचा काळ इसपू ५६३ ते ४८३ असा होता. त्याचा परिणाम दीड हजार वर्षांनंतर कसा झाला हे नीट कळले नाही.
प्रियालींनी मांडलेल्या मुद्यांमधे थोडीशी खालील भरः
गुंडोपंत म्हणतात त्याप्रमाणे झालेला परीणाम (भयाण शांतता वगैरे...) ह्याला कारण बुद्धापेक्षा, बौद्ध धर्म होता. प्रेषितांचे धर्म हे त्यांचे अनुयायी तयार करतात स्वतः प्रेषित नाही. हेच हिंदू धर्मांतर्गत थोडेफार काही पंथांसंबधी बोलता येईल. हे अनुयायी नंतर नंतर अतिरेक तयार करतात. अतिरेक अथवा अतिरेकी विचार म्हणजे केवळ भौतिक अथवा वैचारीक हिंसा असते अशातला भाग नाही तर कुठलेही टोक असू शकते. सम्राट अशोकाने केलेल्या कलींगच्या युद्धानंतर ज्या स्मशानशांततेचा त्याला अनुभव आला, त्याच्या मुळे आलेल्या मानसीक अवस्थेला तोंड देण्यासाठी आणि मनःशांती मिळवण्यासाठी बौद्ध धर्म स्विकारला आणि त्याचा प्रचार चालू केला. हा प्रकार जरी ख्रिस्तपूर्व २३० मधला असला तरी त्याचा हळू हळू परीणाम वाढत गेला. बरं, स्वतः गौतम बुद्धाने ज्ञानप्राप्तिसाठी संसार आणि राज्यावर पाणि सोडले आणि नंतर भिक्षू होऊन मठात राहीला. पण अशोकाने मात्र कितीही चांगले राज्य केले असले तरी बौद्ध धर्म स्विकारताना स्वतःचे सम्राट पद सोडले नाही आणि बळजबरीने बौद्ध धर्म स्विकारायला लावला. भारतीय इतिहासात तो एकच कालखंड असा आहे की जेंव्हा भारतात "रिलीजन स्टेट" आले. नाहीतर राष्ट्राला कधी रिलीजन या अर्थी आधिही धर्म नव्हता आणि नंतरही. अर्थात याचा अर्थ धार्मिक स्वातंत्र्य होते. नंतरचा काही काळ तर असा होता की जो पर्यंत एकीकडे राज्य करायचे आणि दुसरीकडे अहिंसा असे चालू शकत नाही. तो क्षात्र धर्म होऊ शकत नाही. परीणामी गाडा गडगडायला लागला. पुढे अनेक शतकात अनेक घटना घडत गेल्या, पुष्यमित्रशृंगाने ग्रिकांची परत झालेली आक्रमणे आणि नंतर विक्रमादित्याने शक-कुशाणांची आक्रमणे हटवली. पण "स्टेट स्पोन्सर्ड - बौद्ध धर्म" हा वेगवेगळ्या रुपाने राहीला. आणि समाजात विघटन करण्यास (त्यातील तत्वांमुळे नाही तर ती चुकीच्या अर्थाने अहंकाराने वापरणार्या त्यातील अनुयायांमुळे ) कारणीभूत झाला....
बाकी इस्लामचे आक्रमण हे बाहेरील प्रथमच सांस्कृतिक आक्रमण होते ज्याचे परीणाम प्रियालींनी थोडक्यात सांगितल्याप्रमाणे झाले...
वा
माहितीपूर्ण प्रतिसाद !
--लिखाळ.
अशोक आणि पुश्यमित्र
पुश्यमित्र शुङ्ग (हे नाव असे लिहायचे का?) आणि शुङ्ग घराण्याबद्दल विश्वासार्ह वाचनीय फारसे न मिळाल्याने माझ्याकडील माहिती थोडी अपुरी आहे. परंतु,
बौद्ध धर्म स्वीकारला म्हणजे संन्यास स्वीकारावा असे नसावे. भारतासह अनेक पौर्वात्य राष्ट्रेही बौद्ध धर्म स्वीकारत गेली परंतु त्यांनी युद्धे केली, हिंसा केली. त्यामुळे बौद्ध धर्मातील नेमके काय तिथे प्रसारित झाले असा प्रश्न मला पडतो.
गौतम बुद्धाने संन्यास स्वतःच्या मर्जीने स्वीकारला पण आपल्या सर्वच अनुययांनी संन्यास स्वीकारावा असे त्याने सांगितले असावे असे वाटत नाही. (संन्यास स्वीकारला तर नैसर्गिक रित्या धर्म वाढायचा कसा? ;-))
परंतु,
याचा अधिक विस्तार करता येईल का? कारण अशोकाने श्रीलंका, द.पूर्व आशिया, यवनी प्रांत (सेल्यूकस निकेटरचे राज्य), नेपाळ, उर्वरीत भारत (महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र) इ. भागांत आपले प्रतिनिधी (मिशनरी) पाठवले पण त्यांनी बळजबरीने धर्मप्रसार केल्याचे ऐकीवात नाही. सेल्यूकसच्या राज्यात आणि अशोकाच्या राज्यात घरोबा असल्याने (बहुधा सेल्यूकसच्या मुलीशी चंद्रगुप्ताने लग्न केले होते आणि या दोन्ही राज्यांतील संबंध चांगले होते.) बौद्ध धर्माला तेथे आश्रय मिळाला. अफगाणिस्तानातील बौद्ध धर्म यामुळेच विकसित झाला. याच बरोबर, पुश्यमित्राने फिका पडणार्या हिंदू धर्माच्या पुनरुत्थानासाठी बौद्ध भिक्षूंची निर्घृण हत्या केल्याचे संदर्भ वाचायला मिळतात.*
खरंतर, कलिंगच्या लढाईने व्यथित होऊन अशोकाने धर्म का बदलावा याचे सयुक्तिक कारण मला मिळालेले नाही. बौद्ध धर्म आणि जैन धर्म मौर्य राज्याला नवा नव्हता.
त्यामुळे बौद्ध धर्माचा स्वीकार म्हणजे संन्यास असे नसावे, अशोकानेही ते तसे पाळले नसावे. हर्षवर्धनानंतर आलेल्या शासकांनीही बौद्ध धर्मीयांवर अत्याचार केल्याचे संदर्भ वाचायला मिळतात. परंतु त्यानंतर येणार्या अनेक राजघराण्यांनी (पाल, राष्ट्रकूट इ.) हिंदू धर्मासोबत बौद्ध आणि जैन धर्म/पंथांना राज्याश्रय दिला. आदि शंकराचार्यांमुळे हिंदू धर्माला पुन्हा सोन्याचे दिवस आले असे वाटते. १० व्या शतकानंतर मात्र मुसलमान राज्यकर्त्यांमुळे भारतीय संस्कृतीत बराच बदल झाला.
अशोकाने बौद्ध धर्म कशा रितीने (कोणत्या टर्म्स आणि कंडिशन्स लक्षात घेऊन) स्वीकारला यावर कोणी प्रकाश पाडावा. मला फारशी कल्पना नाही.
बौद्ध धर्माच्या प्रसारामुळे भारतातील राज्यांना मरगळ आली असे एक विधान केले जाते. त्यातही फारसे तथ्य वाटत नाही. शूर बौद्ध राजे आणि अनेक धर्मांना आश्रय देणारे हिंदू राजे यांची उदाहरणे प्रतिसादात दिली आहेत, अधिकही देता येतील. माझ्यामते झाले असे की सुपीक जमीन, चांगले हवामान आणि कमी नैसर्गिक आपत्ती यामुळे भारतीय "देतोय हरी खाटल्यावरी..." या मोड मध्ये गेले. म्हणजे राज्यविस्तार करणार कुठे? अफगाणिस्तानातल्या वाळवंटात? ईशान्येतल्या घनदाट जंगलांत का हिमालयातल्या बर्फाळ वाळवंटात? आणि तसे करून नुकसान कोणाचे आपलेच कारण सैन्याचा खर्च, लढाईचा खर्च भागवून नेणे आणि नंतर अशा ओसाड प्रदेशांवर राज्य करणे म्हणजे नुकसानच नुकसान. त्यामुळे आपापसांतील लुटुपुटूंच्या लढायांत भारतीय खुश राहिले.
परंतु, बौद्ध आणि हिंदू धर्माने मात्र आपापसांत कुरघोडी करण्यासाठी साहित्यातून एकमेकांवर अनन्वित अत्याचार केले आहेत असे ऐकून आहे. (चू. भू. दे. घे.)
* याचे विश्वासार्ह संदर्भही मिळालेले नाहीत. बौद्ध साहित्यात तसे उल्लेख येतात परंतु विश्वासार्हता तपासलेली नाही.
पुष्यमित्र शुंग
पुष्यमित्र शुंग-मुद्दाम शुङ्ग लिहायची गरज नाही. ष्य मात्र हवा, श्य चालणार नाही.
चन्द्रगुप्ताच्यानंतर त्याचा पुत्र बिंदुसार याने हिंदुस्थानचे साम्राज्य टिकवून ठेवले. त्यानंतर आलेल्या अशोकाने शस्त्रबळाच्या जोरावर अहिंसा, भूतदया, वैराग्य, संन्यास, शून्यवाद यांनी संपन्न अशा धर्माचा प्रसार केला; आणि चंद्रगुप्ताने निर्मिलेली अत्यंत कार्यक्षम, समर्थ आणि परक्यांवर सहज विजय मिळवू शकणारी राज्ययंत्रणा ढिली केली.. त्यामुळे शंभर-सव्वाशे वर्षे बंद पडलेली यावनी आक्रमणे परत सुरू झाली. डेमिट्रियस, मिनेंडर हे ग्रीक राजे भारतात सहजपणे अयोध्येपर्यंत घुसले. पूर्वी अलेक्झॅन्डरला इंचइंच भूमी लढून मिळवावी लागली होती. आता तसे झाले नाही. अशोकाने देशाची प्रतिकारशक्ती नष्ट केली होती.
मगध सम्राट बृहद्रथ हा धर्मराज्याच्या वृत्तीने हे शांतपणे पाहात बसला होता. त्यावेळी बृहद्रथाचा सेनापती पुष्यमित्राचा उदय झाला. त्याने सर्व सूत्रे हाती घेतली, सम्राटाचा वध केला आणि यावनी आक्रमकांना सीमेबाहेर हाकलून दिले. पुष्यमित्राने रणविद्या, प्रतिकारशक्ती, क्षात्रतेज यांचेच केवळ पुनरुज्जीवन केले नाही तर वैदिक संस्कृतीचेही केले. त्याचे प्रतीक म्हणून त्याने अश्वमेध यज्ञदेखील केला होता.
पुष्यमित्राच्या शुंगवंशाने ११२ वर्षे(इ.स.पू. १८४ ते ७२) मगधाचे राज्य केले. त्यामुळे पुष्यमित्र शुंगाने देशहितासाठी काही बौद्धधर्मीयांचा छळ केला असेल तर ते समजण्यासारखे आहे. --वाचक्नवी
आवडल्या गाथा
यनासर,
सातवाहन कुळातील कोण्या 'हाल' राजाने त्याच्या रचनेबरोबर इतरांच्याही रचनेचे संकलन केलेले आहे,असे म्हणतात. या ग्रंथाचे कर्त्यात ५० पुरुष व ७ स्रिया होत्या (पाहा:-मराठी वाड;मयाचा इतिहास- ल. रा. पांगारकर- प्रस्तावना,डॉ. वि.स.वाळिंबे. पृष्ठ २४४) तर स्त्रियांच्या रचना कोणत्या आणि पुरुषांच्या रचना कोणत्या असे काही उल्लेख आहेत का ?
बाकी गाथांचीही उत्सुकतेने वाट पाहत आहे, धन्यवाद यना सर.......!!!
हेच
दिलीपरावांशी सहमत आहे.
-- आजानुकर्ण
आपला हा उपक्रम आणि त्यावरील सर्वांचे प्रतिसाद
आपला हा उपक्रम आणि त्यावरील सर्वांचे प्रतिसाद फारच सुंदर आहेत. पुढे वाचत रहायला आवडेल.
--लिखाळ.
वा!
वा.. वेगळा विषय.. अभ्यासपूर्ण विवेचन आणि टग्या रावांच्या तितक्याच उत्साहात केलेले प्राकृताचे विश्लेषण आवडले. टग्यारावांच्या विष्लेशणानंतर त्या प्राकृत रचना परत बघितल्या आणि काहितरी परिचित असल्याचे जाणवले. एकूणच हा प्रकार भन्नाट आहे. पुढील भागांच्या प्रतिक्षेत आहे. (विनंती आहे की पुढील भागात सगळ्या गाथा प्राकृतातही द्याव्यात)
-ऋषिकेश
समज/गैरसमज
प्राकृत हे भाषेचे नाव आहे का? माझा आतापर्यंत असा समज होता की प्राकृत हे काही भाषांच्या - जसे पाली, अर्धमागधी* - एका गटाचे / प्रकाराचे नाव आहे.
असो. गैरसमज दूर केल्याबद्दल धन्यवाद.
(* या दोन शिवाय आणखी नावे मला माहीत नाहीत!)
महाराष्ट्री
येथे लिहिलेली प्राकृत भाषा महाराष्ट्री आहे याचा उल्लेख पहिल्या भागात आला आहे.
धन्यवाद
धन्यवाद प्रियाली.
मी पहिला भाग वाचला नव्हता आणि ह्या भागात बहुतेक सर्वच जण नुसतेच प्राकृत असे म्हणत होते /आहेत. म्हणून माझा थोडा गोंधळ झाला.
उत्तम लेखमाला
'गाथासप्तशती' उपक्रम सुरू करण्यासाठी श्री. य.ना. वालावलकरांचे हार्दिक अभिनंदन आणि आभार.
हालाच्या 'गाथासत्तसई'च्या निमित्ताने प्राकृत भाषेबद्दल खूपच माहिती मिळाली.
मूळ गाथेबदल -
येथे सर्व गाथा अर्थासह देणे हा फारच कष्टाचा उपक्रम आहे याची जाणीव होते. शक्य असेल तर उत्तमच! पण नसेल तर विषयवार विभागणी करून त्या काळातल्या लोकजीवनाची वाचकांना संपूर्ण माहिती होईल अशा महत्वाच्या गाथा देता आल्या तर बरे होईल. (उदा. राहणी, पोषाख, व्यापारउदीम, दळणवळण, राजकारण, घरे, वातावरण इ.)
येथे दिलेल्या गाथा वाचता त्याकाळातील स्त्रीपुरुष संबंधांबाबत काहीसा उदार (आजच्या तुलनेने) दृष्टीकोन दिसतो. परंतु एक अज्ञ शंका अशीही आली की हे काव्य त्या काळातील 'ग्राम्य' काव्य तर नव्हते? (वात्स्यायनाची कामसूत्रे संस्कृत भाषेतील अभिजात साहित्यकृती म्हणता येईल का?) याबात तज्ञांची मते जाणून घ्यायची आहे.
असे 'लैगिक' साहित्य (विशेषत: चित्रफीती) आर्वाचिन भाषांमध्येही प्रसिद्ध होते. ते वेगळ्या दृष्टीने प्रसिद्धी पावते. परंतु कालांतराने ते कोणा संशोधकाला सापडले तर त्यावरून भविष्याच्या पूर्वीच्या काळातले (वर्तमानकाळातले) स्त्रीपुरुष संबंध सैल होते असा निष्कर्ष निघेल का?
अपभ्रंश -
संस्कृत आणि प्राकृत भाषेतील साम्यस्थळे, शब्दांची अपभ्रष्ट रूपे आणि अपभ्रंशाचे नियम याबद्दल लक्ष्मीधरकृत 'षड्भाषाचंद्रिका' हे पुस्तक मायक्रोसॉफ्ट आणि मिलियन बुक्स प्रोजेक्टच्या कृपेने -
येथे मिळाले.
तेथे त्रिविक्रमाचे 'प्राकृत व्याकरण' ही उपलब्ध आहे असे दिसते.
षड्भाषाचंद्रिकेप्रमाणे अपभ्रष्ट भाषांमध्ये - महाराष्ट्री, प्राच्य, शौरसेनी, मागधी, (अर्धमागधी, ),अवंती,(बहालिकी),शाकारी, चांडाळी,शाबरी,(अभिरी, औधुरी),टक्की, नागर, उपनागर, पैशाची इ. अनेक भाषांचा समावेश होतो.
अभ्यासकांसाठी ही सहज मिळू शकणारी दोन्ही पुस्तके मुळातूनच वाचण्याजोगी आहेत.
धन्यवाद
या निमित्ताने ओपन लायब्ररी या एका चांगल्या संकेतस्थळाचे नाव समजले. --वाचक्नवी
+१
धन्यवाद.