गाथासप्तशती: अल्प परिचय :(१)

गाथा सप्तशती:अल्प परिचय
...
"प्रसाद प्रकाशन, पुणे" यांनी १९५६ साली प्रसिद्ध केलेला 'गाथासप्तशती' हा (४४०+६८०=)११२० पृष्ठांचा ग्रंथ आहे.त्याचे संपादन स.आ. जोगळेकर यांनी केले असून त्यांनी ४४० पृष्ठांची विस्तृत आणि अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिली आहे. उर्वरित ६८० पृष्ठांत एक हजार (७००+३००) गाथा आहेत.प्रत्येक गाथेची संस्कृत छाया आहे.मराठी अर्थ आणि विवरण संपादकांनी मोठ्या रसिकतेने लिहिले आहे.
दोन हजार वर्षांपूर्वी रचलेल्या या गाथा महाराष्ट्री प्राकृत भाषेत आहेत. गाथांविषयी जयवल्लभ नावाचा टीकाकार लिहितो: "ओठातल्या ओठात लाडिकपणे घोळलेले अर्धस्फुट बोल,विलासोन्मुख मुग्धेचे स्मित आणि अपांगावलोकन यांचे स्वारस्य प्राकृत गाथांच्या परिशीलनानेच प्रत्ययास येते. गाथांचे स्वरूप प्रेयसी सारखे आहे.सालंकृत,सुलक्षणीआणि सौरभपूर्ण...गाथांचे अंतर्याम आणि युवतींचे मन यांचे मर्म रसिकांनाच उमजते......ललित आणि मधुर, शृंगारिक आणि युवतिजनप्रिय अशा गाथा उपलब्ध असताना संस्कृत काव्ये कोण वाचणार?"
आणखी एक टीकाकर म्हणतो: "संस्कृत शब्दांना प्राकृत रूप मिळते तेव्हा त्यांना मार्दव आणि माधुर्य प्राप्त होते. या लाडिकपणामुळे संस्कृत पंडितही प्राकृत भाषेवर लुब्ध झाल्याचे दिसते....संस्कृत कठोर तर प्राकृत सुकुमार.राकट पुरुष आणि नाजुक स्त्री यांमधे आहे तेव्हढे अंतर संस्कृत आणि प्राकृतात आहे."
प्रत्येक गाथा दोन ओळींची असून ती आर्या अथवा गीती वृत्तात आहे.या गाथा ग्रामीण तसेच नागरी भागांतील कवींनी२००० वर्षांपूर्वी रचल्या.रचनाकारांची नांवे अज्ञात आहेत.
हाल सातवाहन (इ.स.१ ले शतक,पूर्वार्ध) या राजाला प्राकृत भाषा प्रिय होत्या.तो प्राकृत कवींचा आश्रयदाता होता.राजसभेतील कवींच्या सहकार्याने हालाने या लोकगाथा गोळा केल्या आणि त्यांचा कोश केला. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्री प्राकृतात सिद्ध झालेला हा आद्य ग्रंथ होय.
संपादक जोगळेकर लिहितात: ''संस्कृत ही अल्पसंख्य आर्यांची भाषा.ती बहुजन समाजाची भाषा कधीच नव्हती.धार्मिक कृत्यांसाठी संस्कृतचा वापर करणार्‍या आर्यांची घरगुती व्यावहारिक भाषा प्राकृतच होती. तसे नसते तर 'यज्ञदीक्षा पुरी होईपर्यंत प्राकृतात बोलूं नये' असा दण्डक सूत्रकारांनी घातला नसता."
*********************************************************
संपादकांची प्रस्तावना:
अभ्यासपूर्ण आणि विसृत अशी ही ४४० पानांची प्रस्तावना म्हणजे एक स्वतंत्र ग्रंथच म्हणायचा.दोन हजार वर्षांपूर्वींच्या आपल्या पूर्वजांची राहाणी,रीतिरिवाज,आर्थिकस्थिती,उद्योगधंदे,नैतिक कल्पना, कामजीवन अशा सर्वांगांचे गाथांच्या माध्यमातून संशोधन करूनही प्रस्तावना लिहिली आहे.
त्या काळी नैतिक बंधने शिथिल होती.तरुण तरुणींच्या विवाह्पूर्व संकेत भेटी होत.भेटीचे निरोप पोचविण्यासाठी दूती असे.आई, आत्या, यांची या प्रकाराला मूक संमती असे.बालविवाहाची पद्धती नव्हती.सुनेच्या छळाचा उल्लेख एकाही गाथेत नाही.मुलगा प्रवासाला गेल्यावर एका आईच्या तोंडी गाथा अहे,: "आता या सुनेची मला काळजी घ्यायला हवी. कारण माझ्या मुलाची ही जीवन संजीवनी आहे."
अशाच एका सासूला वाकून नमस्कार करताना सुनेच्या हातातील दोन कंकणे गळून पडली. तेव्हा सासूचे डोळे पाणावले.(पतिविरहामुळे सून कृश झाली होती.)
******************************************************************************
काही गाथा:

लेखनविषय: दुवे:

Comments

वा !

यनावालाजी,
या उपक्रमाचे स्वागत करतो. पुढील लेखांची उत्कंठेने वाट पहात आहे.

- दिगम्भा

स्वागत.

आपल्या या उपक्रमाचे मनापासून स्वागत.

जवळजवळ १५/२० वर्षापूर्वी मी ही प्रत विकत घेतली होती. ( प्रसाद प्रकाशनाची होती अथवा नव्हती हे आता आठवत नाही). त्यावर एका युवतीचे कलात्मक असे छायाचित्र होते.

त्या काळी नैतिक बंधने शिथिल होती.तरुण तरुणींच्या विवाह्पूर्व संकेत भेटी होत.भेटीचे निरोप पोचविण्यासाठी दूती असे.आई, आत्या, यांची या प्रकाराला मूक संमती असे.

काळाचे एक चक्र पूर्ण झाले की काय?

आजही विवाहपूर्ण गाठीभेटी होतच असतात बरे!

बाकी या पुस्तकाचे आपल्याकडून रसग्रहण ऐकायला नक्कीच आवडेल.

छान

पुढील लेखाची उत्सुकता आहे.

-- आजानुकर्ण

सहमत

पुढील लेखाची उत्सुकता वाटते तेव्हा लवकर लेख टाकावा.

अप्रतिम

यनावालाजी,
अप्रतिम लेख. लेख वाचून या ग्रंथाबद्दल उत्सुकता आहे. पुढील भागांच्या प्रतिक्षेत.

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

अपांगावलोकन

म्हणजे काय?
-- आजानुकर्ण

हेच

विचारायचे होते. आपने मेरे मुंह की बात छीन ली. :-) (या वाक्याचा मराठी अनुवाद जमला नाही त्यामुळे हिंदीत लिहीले आहे त्याबद्दल क्षमस्व.)

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

तोंडचा घास

तोंडचा घास पळवला ;)
असे चालेल का?

-- आजानुकर्ण

घास

;) जर मिळणारा फायदा हिरावून घेतला असे म्हणायचे असेल तर चालू शकेल. अर्थात इथे तसे नाही. :-)

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

सहमत/अपांग

वरील प्रतिक्रियांशी सहमत, पुढील भागांची वाट पाहतो आहे.

मोल्सवर्थ गुरुजींच्या मते अपांग = outer corner of the eye. तेव्हा अपांगावलोकन म्हणजे, नजर न भिडवता पेरिफेरल (परिमितीय/परीघीय?) दृष्टीतून सलज्ज इ. प्रकारे पाहणे असावे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

सहमत/ डोळे मोडीत

वरील सर्वांशी सहमत. 'गाथासत्तसई' बद्दल वाचायची उत्सुकता पूर्वीपासून आहे.
पुढचे भाग लवकर यावेत.

अपांगावलोकन म्हणजे 'डोळे मोडीत राधा चाले'तल्या 'राधेचे डोळे मोडणे 'असे आहे तर... नवा शब्द!
(खरे म्हणजे जुनाच. पण मला नवा :))

अपांगावलोकन

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
**********************************
श्री. नंदन आणि श्री. विसूनाना यांनी दिलेले अर्थ योग्य आहेत.
'अपांगावलोकन ' म्हणजे नजरेच्या कोपर्‍यातून टाकलेला तिरपा नेत्रकटाक्ष.

वा

माहितीपूर्ण लेख! पुढील लेख वाचण्याची उत्सुकता आहे.

राधिका

+१

उत्कंठावर्धक ओळख. लवकरच निवडक गाथा (त्यांच्या अर्थ आणि रूपनिरूपणासकट ) द्या. वाट पहात आहोत !

वा !! येऊ द्या

यनासर, गाथा सप्तशती च्या ग्रंथाची, कथानकांची आम्हालाही उत्कंठा आहे.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+१

पुढील भागाच्या प्रतिक्षेत !!!

अरे वा

फारच रोचक. पुढील भाग वाचण्यास उत्सूक !
--लिखाळ.

रोचक

फारच रोचक. पुढील भाग वाचण्यास उत्सूक !

असेच म्हणते.

 
^ वर