अमेरिकेतील जॉब थ्रेट, भारतातील संधी ग्रेट
अमेरिकेतील एनआरआयना जॉब थ्रेट ही मटामधील बातमी अगदी 'मटाछाप' असली तरी त्यात (चक्क!) थोडे तथ्यही आहे हे खरे. त्यातील हे काही परिच्छेद,
अमेरिकी मंदीच्या पार्श्वभूमीवर, तेथील काही मराठीजनांच्या मनाचा कानोसा 'महाराष्ट्र टाइम्स'ने घेतला. अमेरिकेतील मंदीमागे गृहकर्ज क्षेत्रातील समस्या मुख्यत्वे कारणीभूत आहेत. त्याशिवाय, बुश सरकारचे आथिर्क धोरण, आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या भडकलेल्या किमती, इराक-अफगाणिस्तानातील अमेरिकन सैन्यावरील अवाढव्य खर्च आणि अध्यक्षपदाची निवडणूक आदी बाबींमुळे मंदीची तीव्रता वाढल्याचे निरीक्षण न्यू जर्सी येथील 'रिसोर्समाइन कॉर्पोरेशन'मधील टेक्नॉलॉजी कन्सल्टंट अमोल जोशी यांनी नोंदवले. मंदीचा फटका सर्वात प्रथम 'ब्लू कॉलर' कर्मचाऱ्यांना बसल्याचे त्यांनी सांगितले. जीई इलेक्ट्रॉनिक्स, आयबीएम, फोर्डसारख्या दिग्गज कंपन्यांसह आयटी कंपन्यांनीही कर्मचारी कपात सुरू केली आहे. त्याची झळ मूळ अमेरिकन कर्मचाऱ्यांसोबत एनआरआयना बसत असल्याचेही ते म्हणाले. अमेरिकेतील नोकऱ्यांत भारतातील आयटी प्रोफेशनल्स तसेच इंजिनीअरांना मुबलक संधी होती. परंतु आता हे चित्र बदलत असल्याचा आपला अनुभव आहे, असे प्लेसमेंट सव्हिर्स देणाऱ्या एडिसन सिटीतील 'लेखा कॉपोर्रेशन'मधील प्रोग्राम ऍनालिस्ट सोनाली कुलकर्णी यांनी सांगितले. मंदीमुळे भारतातून अमेरिकेत नोकरीसाठी येणाऱ्या प्रोफेशनल्समध्ये घट झाल्याचे त्या म्हणाल्या.
बोस्टनच्या 'डेन्टाक्वेस्ट कॉपोर्रेशन'मध्ये प्रोग्राम ऍनलिस्ट असलेले संतोष दाभोळकर यांनीही मंदीमुळे एनआरआयना जॉब थ्रेट असल्याचे मान्य केले. तेथील जॉब कन्सल्टंटस सामान्य परिस्थितीत एका उमेदवाराला महिनाभरात किमान तीन जॉब ऑफर करत होते; मंदीमुळे हे प्रमाण 'महिनाभरात एक जॉब' असे झाले आहे. नवीन कर्मचाऱ्यावर जास्त खर्च करण्यास कंपन्या तयार नाहीत, असे दाभोळकर यांनी सांगितले.
मंदीमुळे कंपन्या प्रकल्प अर्ध्यावर सोडत असल्याने 'ले ऑफ'ची संख्या वाढत असून एनआरआयच्या नोकऱ्यांवर अनिश्चिततेची छाया पडल्याचे कन्सास प्रांतातील जीसीआय कंपनीतील टेक्निकल टीम लीडर हृषिकेश भिडे म्हणाले. भारतातील कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एनआरआयच्या व्हिसाची मुदत संपल्यास ती वाढवणे संबंधित कंपन्यांना कठीण जाते. त्यामुळे एनआरआयना भारतात परतावे लागत असल्याचे भिडे यांनी सांगितले.
अमेरिकेत येऊ घातलेली (काही वित्तीय संस्थांच्या मते आलेली) मंदी आणि डॉलरचे घसरते दर या कारणांमुळे एकूणच संधी कमी झालेल्या आहेत. अमेरिकेत नोकरीत स्थिरावलेल्या लोकांना तातडीने काही धोका आहे असे वाटत नाही पण तळ्यात-मळ्यात असलेल्या लोकांना याचा फटका बसू शकतो. याउलट भारतात आयटी वगळता इतर क्षेत्रात अनेक संधी निर्माण झाल्यात आणि त्यांची संख्या आणि 'पे पॅकेज' दिवसेंदिवस वाढते आहे.
तर या विषयावर देशा-परदेशात (अमेरिकेत आणि इतरत्र) असलेल्यांनी आपले अनुभव, पर्स्पेक्टिव (दृष्टिकोन?) आणि पुढे काय होऊ शकते याविषयी मते या चर्चेत सांगावे अशी विनंती.
Comments
छोटीशी दुरुस्ती
कृपया या वाक्यात "देशात (भारतात) आणि परदेशात (अमेरिकेत आणि इतरत्र) ...." असा बदल करून वाचावे. मूळच्या वाक्यावरून फक्त अमेरिकेत आणि इतरत्र असलेल्यांसाठीच चर्चा आहे असा संदेश जाऊ शकतो असे वाटले. कृपया गैरसमज नसावा. मी स्वतः देशातच आहे ;)
एन् वाय् टाइम्स मधील लेख
एन् वाय् टाइम्स मध्ये पॉल क्रुगमन यांनी लिहिलेला The face-slap theory हा लेख १ किंवा २ इथे वाचता येईल. अमेरिकेतील आर्थिक मंदीचे गांभीर्य स्पष्ट करणारा लेख आहे. हा लेख वाचल्यावर 'वर्स्ट इज येट टू कम' असे वाटले.
अवांतर - हा लेख जसाच्या तसा कालच्या टाइम्स ऑफ इंडिया मध्ये प्रकाशित झाला होता, नाही तर मी कुठे जातोय एन् वाय् टाइम्स वाचायला? ;)
धन्यवाद
लेखाच्या दुव्याबद्दल धन्यवाद. खरोखरच पुढचे १-२ आठवडे अगदी मोक्याचे असणार आहेत. हा प्रश्न नुस्ता मूलभूत अर्थशास्त्राचा नसून तितकाच लोकांच्या मन:स्थितिचा आहे, आणि सध्यातरी कोणी अमेरिकेच्या बाजूनी ठाम कौल देईल असं वाटत नाहिये. जर चीन आणि आखाती देशांनी अमेरिकेची कर्जपत्र परत केली, तर प्रश्न अधिक गंभीर होऊ पाहतो...
कर्जपत्र?
कर्जपत्र म्हणजे काय हो?
इतरही बाबी.
अमेरिकेत मंदी आली असताना युध्दाचा बागलबुवा किंवा युद्ध निर्माण करण्यात येते.
काल परवा वर्तमानपत्राच्या एका सदरात वाचले होते की अमेरिकेतील कृषीवाढीचा दर सरासरी पेक्षा चांगला आहे तरीही मंदीची आशंका का?
भारतीय लोकांनी तेथील पगाराची रक्कम तेथेच बचत केली तर? कारण मी असे ऐकले आहे की प्रत्येक अभियंता जवळजवळ १०/१५ लाख रुपये भारतात पाठवत असतो. ( अदांजे १लाख तज्ज्ञ गुणिले १५ लाख = १५० अब्ज).
असो या पेक्षा जास्त मुक्ताफळे शक्य नाही.
(अर्थतज्ज्ञ)
युद्ध? नको रे बाबा!
> अमेरिकेत मंदी आली असताना युध्दाचा बागलबुवा किंवा युद्ध निर्माण करण्यात येते.
आता आणखी एक युद्ध झाले की तेलाचे भाव वाढून इतरही अनेक देश मंदीच्या खाईत जातील! तसेही अमेरिकेत आता निवडणुकांचे वारे वाहत आहेत त्यामुळे इतक्यात कोणतेही युद्ध सुरू होणार नाही असे वाटतेय ;)
मंदी
अमेरिकेतील कृषीवाढीचा दर सरासरी पेक्षा चांगला आहे तरीही मंदीची आशंका का?
अमेरिका कृषिप्रधान नसल्याने.
'धाडसी' कर्जे अंगाशी आल्याने वित्तीय संस्था अडचणीत आहेत. ताकही फुंकून प्यावे लागणार असल्याने त्यांनी कर्जे देणारे हात अखुडते घेणे सहाजिक आहे. कर्जांच्या अनुपलब्धतेचा एकूण व्यवसायांवर परिणाम या मंदीला कारणीभूत ठरणार आहे.
अमेरिकेतील कृषी व्यवसाय
मी असे ऐकले आहे की अमेरीकेतील शेतकर्याला भरपूर सवलती मिळतात. त्यात थोडाही ढवळाढवळ करण्याचा विचारही बर्याच उलथापालथी घडवुन आणतो.
अमेरीकेची अर्थव्यवस्था नेमकी कश्यावर आधारित आहे?
सेवा
अमेरिकेच्या एकूण जीडीपी मध्ये (सकल घरेलू उत्पाद) शेतीचा वाटा मात्र ०.९ % आहे. ७८.५% वाटा सेवा (सर्विसेस) चा तर २०.६% वाटा उद्यमांचा (इंडस्ट्रीज) आहे. हीच टक्केवारी भारतासाठी (२०,६०,२० अशी आहे.)
अमेरिकेतील थेट शेतीशी संबंधित लोकसंख्येचे प्रमाण देखील १% (जे भारतासाठी ६०% हून अधिक आहे.) कमी आहे. असे असूनही तो देश अन्नधान्याबाबत स्वावलंबी असून शिवाय धान्ये निर्यात करतो.
अवांतर - म्हणजे अमेरिकेची अर्थव्यवस्था 'तेला'वर आधारित नाही?
'तेला'वर आधारित अर्थव्यवस्था
>>> म्हणजे अमेरिकेची अर्थव्यवस्था 'तेला'वर आधारित नाही?
प्रश्न मला नीट समजला नाही..
ज्या न्यायाने ओपेक् देशांची अर्थव्यवस्था तेलाच्या उत्पादनावर आधारित आहे त्या अर्थाने अमेरिकेची अर्थातच नाही. पण अमेरिकेतील उद्योग, दळणवळण, घरगुती वापर या सगळ्यांमधे तेलाचा वापर प्रचंड आहे ; तेल (गॅसोलीन) वरच हा देश चालतो असे म्हण्टले जाते ते या अर्थाने.