ध्रुवीकरण आणि महाराष्ट्र

ध्रुवीकरण हा सध्याच्या समाजात सहजसाध्य होऊ पहाणारा प्रकार होत चालला आहे. मग ते ध्रुवीकरण "सोशल इंजिनियरिंग"च्या नावाखाली होणारे असो, धार्मिक दंगलींच्यावेळी झालेले धर्माधिष्ठित ध्रुवीकरण असो, किंवा संमेलनांच्या निमीत्ताने होणार्‍या वेगवेगळ्या जातींचे/ज्ञातींचे ध्रुवीकरण असो. किंवा कोणा एका गोडबोल्यांच्या मुक्ताफळांने झालेले एन्आर्आय मंडळींचे असो ;) सध्याच्या समाजव्यवस्थेत हे ध्रुवीकरण पाया बनत चाललेले आहे. ज्या कोण्या नवख्याला 'प्रस्थापित' व्हायचं आहे जम बसवायचा आहे त्याने ह्या ध्रुवीकरणाचाच उपयोग करून घेतलेला दिसतो.आणि राज ठाकरे हे ही याला अपवाद नाहित.
एका भाषणातील तीन चार वाक्यांवरून त्यांनी 'रिकाम्या' कार्यकर्त्यांना एक कार्यक्रम तर दिलाच पण आपला मतदार वाढवला यात शंकाच नाहि. या विषयीच्या बातम्यांचा दुवा देत नाहि कारण कोणतेहि वृत्तपत्र उघडा मुख्यपृष्ठावर ही बातमी आहे.
या निमित्ताने काहि प्रश्नांवर तुमची मते जाणून घ्यायला आवडतील:

  • भारतीय समाज इतका संवेदनशील झाला आहे का, की कोणी असे काहि बोलावे आणि काहि वाक्यांमुळे आगडोंब उसळावा?
  • ध्रुवीकरण पटकन होणे हे गोंधळलेल्या समाजाचे लक्षण आहे. उत्तम नेतृत्व नसल्याने भारतीय समाज पुर्णपणे गोंधळलेल्या अवस्थेत आहे असे माझे मत आहे. तुम्हाला काय वाटते?
  • मुंबईत जे काहि चालु आहे ते बघून तुम्हाला वैयक्तिकरित्या काय वाटलं? (हे चूक की बरोबर हा वेगळा मुद्दा होऊ शकेल पण तुम्हाला स्वतःला काय वाटलं?)

Comments

काही अस्फुट विचार

भारतीय समाज इतका संवेदनशील झाला आहे का, की कोणी असे काहि बोलावे आणि काहि वाक्यांमुळे आगडोंब उसळावा?

संवेदनशील म्हणावा की संशयी म्हणावा, कोणास ठाऊक. आपले कोणीतरी सारखे नुकसान करण्यास टपलेले आहे, अशी भावना असावी. कमीतकमी आपला सद्यस्थितीत उत्कर्ष होत नाही आहे, अशी भावना असावी. प्रत्येक माणसाला अनेक अस्मिता असतात - धार्मिक, भाषिक, व्यावसायिक, कौटुंबिक. जर सदानकदा पैकी कुठलीतरी अस्मिता दुखावल्याचा भास होत असेल, तर समाजातील प्रत्येक व्यक्ती "१. आपली प्रगती कोणी आडवून आहे, २. आडवणार्‍याचे कोणी मला नाव द्या" अशा परिस्थितीत आहे असे वाटते. हा प्रकार चिंताजनक आहे.

ध्रुवीकरण पटकन होणे हे गोंधळलेल्या समाजाचे लक्षण आहे. उत्तम नेतृत्व नसल्याने भारतीय समाज पुर्णपणे गोंधळलेल्या अवस्थेत आहे असे माझे मत आहे. तुम्हाला काय वाटते?

शक्य आहे. एकत्रित प्रगती कशी होईल याविषयी बहुसंख्य नागरिकांना पटेल अशी चौकट आपल्या समाजात उत्पन्न झाली नाही आहे. याचे "उत्तम नेतृत्व नाही" असे तुमचे वर्णन ठीक वाटते.

मुंबईत जे काहि चालु आहे ते बघून तुम्हाला वैयक्तिकरित्या काय वाटलं? (हे चूक की बरोबर हा वेगळा मुद्दा होऊ शकेल पण तुम्हाला स्वतःला काय वाटलं?)

"जे काय चालू आहे" म्हणजे खूप काही चांगलेही चालू आहे :-) अनेक लोकांना रोजीरोटी मिळत आहे, ते चांगलेच आहे. पण दुखावलेल्या अस्मितांबाबत जे काय चालू आहे त्याबद्दल वाईट वाटते.
-----
भारताची आर्थिक राजधानी महाराष्ट्रात आहे, यात महाराष्ट्राचा फायदा आहे, असे मला अजून वाटते. पण भारताच्या भल्याच्या दृष्टीने सर्व राजधान्या केंद्रशासित किंवा स्वतंत्र राज्य असाव्यात असा भन्नाट विचार मनात येतो. कोणाच्या प्रादेशिक अस्मितेच्या दुखापतीने देशाच्या कामकाजात व्यत्यय येऊ नये. म्हणजे मुंबई महाराष्ट्रातून जाऊ नये - पण राष्ट्रीय बाजारपेठ उचलून दमण किंवा दादरा इथे न्यावी! (ह.घ्या. हा विचार व्यवहार्य नाही.)

ब्रिटन, जपान, आदि देशांमध्ये राजकीय आणि आर्थिक राजधानी एकच आहे, आणि ती प्रांतिक अस्मितेच्या पलिकडे आहे. अमेरिकेची राजकीय राजधानी (वॉशिंगटन) केंद्रशासित प्रदेश आहे. आर्थिक राजधानी न्यूयॉर्क एका विशिष्ट "न्यूयॉर्क" राज्यात असली, तरी काही भौगोलिक योगायोगामुळे न्यूयॉर्क राज्यापेक्षा कनेटिकट, न्यूजर्सी राज्यांना अधिक जोडलेली आहे. त्यामुळे न्यूयॉर्क राज्यात प्रांतिक अस्मितेचे स्तोम झाले तरी न्यूयॉर्क शहर नेहमीच राष्ट्रीय/जागतिक शहर राहाते. भारताशी समांतर म्हणून चीनबद्दल कुतूहल वाटते. शांगहाय येथील प्रांतिक अस्मितेच्या प्रश्नांमुळे तेथील राष्ट्रीय व्यवहार विस्कळित होतो का?

कॅनडाची राजकीय राजधानी ऑटावा, आणि आर्थिक राजधानी टोरॉन्टो, दोन्हीही सारखीसारखी अस्मिता दुखावल्या जाणार्‍या केबेक राज्याच्या बाहेर आहेत. केबेकमध्ये इंग्रजीविरुद्ध मोठी वैरीभावना आहे. दोन्ही राजधान्या ओन्टारियो राज्यात आहेत. तिथे बहुतेक लोक इंग्रजीभाषक असले तरी सगळीकडे फ्रेंच-इंग्रजी दुहेरी पाट्या बघून तक्रार करत नाहीत. आणि म्हणून ओन्टारियो राज्यातून इंग्रजीचे उच्चाटन मुळीच झालेले नाही. काय मजा आहे.

"ध्रुवीकरण" : व्याख्या

माझी प्राथमिक प्रतिक्रिया : सर्वप्रथम , "ध्रुवीकरण"म्हणजे नेमके काय ? त्याच्या व्याख्येबद्दल थोडी चर्चा व्हायला हवी. प्रस्थापित व्यवस्था - मग ती राज्यव्यवस्था असो, की सामाजिक स्थिती असो, जेव्हा एखाद्या समूहाला एका अजेंड्याखाली एकत्र यावेसे वाटते, तेव्हा हळुहळू त्या समूह आपला एक वेगळा गट निर्माण करतो. ऋशिकेष या गोष्टीला ध्रुवीकरण म्हणत असावेत काय ? तसे असल्यास ध्रुवीकरणाची व्याख्या अशा प्रकारच्या घटनाना लागू होत नाही. ध्रुवीकरणामधे (पोलरायझेशन) परस्परविरोधी मतामुळे झालेले विभाजन अभिप्रेत आहे असे मला वाटते.

पोलरायझेशन / ध्रुवीकरण

पोलरायझेशन/ध्रुवीकरण चा शब्दशः अर्थ "the grouping of opinions into two extremes "असा आहे. पण वर मी तरी हा शब्द केवळ मतांच्या (पराकोटीच्या) एकत्रिकरणाला वापरला आहे. मग ते दोन "पोल्स" मधे असो (जसे हिंदू-मुस्लिम), अनेक पोल्समधे असो (जससे की वेगवेगळ्या जातींची संमेलने) अथवा एका मुद्याभोवती झालेले असो (उदा. माहित आहेच ;) )

माझ्यामते

प्रस्थापित व्यवस्था - मग ती राज्यव्यवस्था असो, की सामाजिक स्थिती असो, जेव्हा एखाद्या समूहाला एका अजेंड्याखाली एकत्र यावेसे वाटते, तेव्हा हळुहळू त्या समूह आपला एक वेगळा गट निर्माण करतो

अशा अप्रिस्थितीत पक्ष/संस्था जन्मास येते ती समविचारी लोकांनी बनलेली असते. पण जेव्हा ध्रुवीकरण होते तेव्हा हेच समविचारी (की अविचारी?) मतांचे एकत्रीकरण पराकोटीचे (extreme) होते.

गोंधळलेली अवस्था जास्त...

मला वाटते की आपल्याकडे विचारांचे लोकशाही पद्धतीने ध्रुवीकरण (पोलरायझेशन) होत नाही आहे आणि तेच आपण म्हणता त्या "गोंधळलेल्या" स्थितीचे कारण आहे. थोडक्यात ध्रुवीकरण आणि गोंधळलेली स्थिती यात फरक आहे. कसा तो पहा:

१. धर्म
आपल्याकडे हिंदू-मुसलमान, हिंदू-ख्रिश्चन अशी जरी धर्माधिष्ठीत टोके स्थलपरत्वे (जिथे ज्यांची लोकसंख्या ही एकमेकांना टक्कर देण्यासाठी सबल आहे तिथे) दिसत असली तरी राष्ट्रीय पातळीवर आहे असे वाटत नाही. या उलट राष्ट्रीय पातळीवर हिंदूमध्येच स्वतःला राष्ट्रीय हिंदू म्हणणारे आणि स्वतःला राष्ट्रप्रेमी (नॅशनॅलीस्ट हा शब्द येथे चालत नाही) म्हणणारे सेक्युलर/कम्युनिस्ट पण जन्माने हिंदू असे फारतर ध्रुवीकरण म्हणता येईल ते आहे, जे धर्मांतर्गत धार्मीक कारणावरून आहे.
२. जात
हा प्रकार भारतासाठी "युनिक" आहे! येथे काय दोन टोके? वाट्टेल तितकी होतील, प्रकट अथवा (कायद्याच्या कचाट्यात न सापडता) अप्रकट स्पृश्यास्पृश्य, जातीजातींत, पंथात आणि जात एक असली तरी विभिन्न प्रांतामुळे - थोडक्यात गोंधळ आहे पण ध्रुवीकरण नाही.
३. पैसा
साम्यवादींचा आवडता विषय - आहे रे आणि नाही रे ची दरी/टोके. त्यात पण पहाल तर तीन वर्ग उच्च, मध्यम आणि कनिष्ट असे आहेतच. पण त्यातही परत उच्च उच्च, मध्यम उच्च वगैरे चालतेच! पुलंच एक चांगले वाक्य आहे, "तोंडाळ दारीद्र्य आणि घुमी श्रीमंती यांच्या मधला वर्ग म्हणजे मध्यमवर्ग. " हा मध्यमवर्ग कुंपणावर बसून कुणाच्या अध्यात नाही की मध्यात नाही या अर्थी अध्यात्मीक असतो. (हा विनोद ऐकलेला आहे, माझा नाही!) . बरं कनिष्ठ वर्गाला खायची मारामार असल्याने आणि खर्‍या अर्थी हातात काही नसल्याने (सत्ता, संपत्ती आणि नेतॄत्व उच्च वर्गीयांच्या विरुद्ध आवाज करण्याचा त्यांनी बहुतांशी प्रश्नच येत नाही. काही घटनांमधे तसे दिसले तरी त्याला ध्रुवीकरण म्हणता येणार नाही.

मग राहते काय?
ज्यांना असलेल्या समाजात हवी तशी संधी मिळत नाही आहे त्यांना ती न मिळाल्याचे जे तात्कालीन कारण असेल तेव्हढेच काय ते अयोग्य वाटते. मग मुंबईतल्या मराठी माणसाला बाहेरून आलेल्या पूर्वी दाक्षिणात्य आता भय्ये/बिहारींचा राग येतो, मध्यमवर्गीयांना आरक्षण व्यवस्थेमुळे त्यासंदर्भातील विशिष्ठ वर्गाचा राग येतो, जेंव्हा कधी कधी सामाजीक अन्याय झाला असे वाटते तेंव्हा तसा तो सेक्युलर म्हणत व्होट बँकेचे राजकारण करणार्‍या राजकारण्यांचा राग येतो.

मग एखादा राज ठाकरे, संभाही ब्रिगेड, अबू आझमी इत्यादी असल्या रागाचा फायदा स्वतःच्या पोळ्या भाजायला करतात. इंग्रजीत एक छान वाक्य कधी काळी ऐकले होते, " "Politics is the art of looking for trouble, finding it everywhere, diagnosing it incorrectly and applying the unsuitable remedies." आज मुंबईत आणि इतरत्रही जे चालू आहे ते या वाक्यात सांगीतले आहे आणि ते सर्वच राजकारण्यांना लागू होते.

उत्तम नेतृत्व नसल्याने भारतीय समाज पुर्णपणे गोंधळलेल्या अवस्थेत आहे असे माझे मत आहे. तुम्हाला काय वाटते?

हे खरे असले तरी अर्धसत्य आहे. विचार करा एक शिवाजी होतो "भोसल्यांचे " राज्य न स्थापता "हिंदूपदपादशाही " स्थापतो. पण तो गेल्यावर संभाजीचा थोडा पराक्रम आणि मराठ्यांनी औरंगजेबास नंतर बाहेर जाउन न देता येथेच (महाराष्ट्रात) त्याचीसत्ता खिळखिळी केली हे सोडल्यास परत काहीच नाही. पहीला बाजीराव होतो, माधवराव पेशवे होतात पण नंतर रघुनाथ राव आणि आनंदीबाई येतात आणि परत पालथ्या घड्यावर पाणी... फास्ट फॉरवर्ड करा... भारतीय असंतोषाचे जनक म्हणून लोकमान्य होतात पण त्यांच्याच हयातीत ते तुरूंगात असताना त्यांच्या अनुयायांना निकडीची गरज असलेले नेतृत्व देता येत नाही. सावरकरांच्या बाबतीतही तेच. गांधीजी स्वतः उत्तुंग नेतृत्व देतात पण तसले सामाजीक नेतृत्व घेणारा पुढे कोणीच नाही... तेच आंबेडकरांचे असे किती लिहायचे?

म्हणजे हा प्रश्न फक्त एक नेतृत्व येउन सुटणारा नाही आहे. आपल्याला सवयच लागलेली आहे की भगवान म्हणाले, "गळूनी जात असे धर्म ज्या ज्या वेळेस अर्जुना, अधर्म उठतो भारी तेंव्हा मी जन्म घेतसे || राखावया जगी संता दुष्टा दूर करावया, स्थापावया पुन्हा धर्म, जन्मतो मी युगे युगे||

थोडक्यात आपण अवतारांच्या अवस्थेस पोहचलेल्या आणि तसे नसले तरी उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या आरत्या ओवाळायला, त्यांच्या नावाने अस्मिता तयार करायला, त्यांचे फोटो लावयाला, पुतळे उभे करायला तयार, पण त्यांच्यातील - मग जे कोणी आवडत असतील - गांधी तर गांधी, सावरकर तर सावरकर - त्यांचे विचार / आचार हे सध्यस्थितीस अनुकूल करून वागण्याची साधी जबाबदारी पण घेणार नाही. गांधी ग्रेट म्हणणार पण त्यांचे नक्की व्यक्तिगत जीवनात काय पाळताहात? आपण किती आपल्या व्यक्तीगत जीवनात खरे बोलतो? गांधीगिरी करणे किती जणांना जमले आहे? सावरकरांच्याबाबतीत तर अजून एक मजा - जोरात नाव घेऊन सांगणार - अरे सावरकर म्हणायचे की, "गाय हा उपयुक्त पशू आहे" - म्हणून बिफ खाल्ले तर काहि बिघडत नाही. आता हसावे का रडावे हे कळत नाही. जणू काही तेव्हढेच ते म्हणाले आणि तेव्ह्ढेच काय ते आत्ताच्या काळात पाळता येईल :)

लोकमान्य म्हणाले होते की महाराष्ट्र थंड गोळ्या सारखा पडलेला असताना त्याला हलकेच उब देउन जागृत करायचे काम न्यायमुर्ती रानड्यांनी केले. आज महाराष्ट्र / भारत थंड गोळा आहे का ते माहीत नाही पण स्वतःच्या बाहेर जाऊन काहीतरी बघण्याची सवय गेलेला नक्की आहे.

धनंजय यांनी म्हणल्याप्रमाणे आज आपण जास्त संवेदनाशील झालोत म्हणण्याऐवजी संशयी झालेलो आहोत. जिथे विश्वासाने आणि आत्मविश्वासाने एकत्र येण्याची गरज आहे ती जागा संशयाने घेतली आहे. आणि आपल्याला"संशयात्मा विनश्यते" हे माहीती असेलच. (नसे ज्ञान नसे श्रद्धा, संशयी नासला पूरा, न हा लोक, न तो लोक, न पावे सुख संशयी||)

पुरोगामी?

वरील यादीमधे 'पुरोगामी' या नव्या समूहाचाही उल्लेख करावा. स्वतःला पुरोगामी म्हणवणारे आजकाल बरेच बोकाळले आहेत.

मुंबईच्या पैशावर डोळा असलेले पद्धतशीरपणे आपली व्होटबँक निर्माण करण्याकरिता गर्दी वाढवत आहेत. यांना विरोध हा कोणीतरी करायलाच हवा अन्यथा १०५ हूतात्मे देऊन ज्या मुंबईवर मराठी माणसाने हक्क सांगीतला ती सहजा सहजी हातून निसटणार.

अ'राज'क

तीन अग्रलेखांचे दुवे:

लोकसत्ता (जाता जाता उगाच अमेरिकेतील मराठी मंडळ आणि गणेशोत्सवावर राग...)

महाराष्ट्र टाइम्स

सकाळ

तीनही लेख त्या त्या संपादकांचे दृष्टीकोन आहेत बर्‍याच अंशी चांगले वाटले. फक्त त्यासंदर्भात दोन मुद्दे:

  1. मराठी माणूस परप्रातांत जरी मंडळे आणि सण साजरे करत असला तरी तेथील मातीशी विश्वासघात करत नाही अथवा तेथील लोकांशी फटकून वागत नाही. (आम्हाला फक्त आमच्याच लोकांशी फटकून वागता येते!)
  2. परदेशात भारतीय माणूस जेंव्हा मोठा होतो तेंव्हा तो तेथील संस्कृती स्विकारूनच हे विसरता कामा नये.

वा!

तीनहि अग्रलेखांचे दुवे दिलाबद्दल आभार

तीनही लेख त्या त्या संपादकांचे दृष्टीकोन आहेत बर्‍याच अंशी चांगले वाटले

सहमत! मुख्य म्हणजे तीनहि वृत्तपत्रांनी कौतुकास्पदरित्या एकांगी भुमिका टाळली आहे.

लोकमतचा अग्रलेखही राज विरोधातील बाजू स्पष्टपणे घेतो तरिहि बर्‍याच गोष्टींचा उहापोह करतो.

मराठी वृत्तपत्रांनी दाखवलेली संयत पत्रकारीता बघून बरं वाटलं!

गंमत म्हणजे (खरंतर अपेक्षितरित्या) सामना मौन बाळगुन आहे.

अवांतरः
ही बातमी वाचा. अजून प्रस्ताव आहे पण असे झाल्यास फायदा आहे असे वाटते.

-ऋषिकेश

हं

भारतीय समाज इतका संवेदनशील झाला आहे का, की कोणी असे काहि बोलावे आणि काहि वाक्यांमुळे आगडोंब उसळावा?

मला असे वाटत नाही की "महाराष्ट्रातील एकंदर समाजाचा" ह्या प्रकारात खूप वाटा आहे निदान ह्या राज-बीगबी इ. प्रकारात. मनसेच्या काही लोकांचे व सपच्या काही लोकांचे बळचकर"अबे, क्याबे" झाले. सामान्य माणसाला त्याचे काही घेणेदेणे नाही. मेडियामुळे नको तेवढी प्रसिद्धी, नको त्या घटनेला मिळते व उगाच मोठा प्रश्र आहे व सामाजिक उलथापालथ इ. दाखवले जाते त्यामुळे वाटत रहाते. मुख्य म्हणजे राजकिय पक्ष कारवाईच्या वेळेस एकमेकांना सांभाळुन घेतात. आता प्रसिद्धीमाध्यमांना देखील काहीतरी सतत चघळत बसायचे असते, अमिताभच्या घरावर खरोखर "हल्ला" झाला का? पण बातमी कशी दिली गेली.

ध्रुवीकरण पटकन होणे हे गोंधळलेल्या समाजाचे लक्षण आहे. उत्तम नेतृत्व नसल्याने भारतीय समाज पुर्णपणे गोंधळलेल्या अवस्थेत आहे असे माझे मत आहे. तुम्हाला काय वाटते?

एकदम मान्य दिशाहीन राजकीय नेतृत्व, बेजबाबदार "लोकशाहीचा चौथा स्तंभ" असल्यावर काय होणार. सामान्य लोकांना आयुष्य अजुन अवघड करून घेण्यापेक्षा सोपा मार्ग व स्वार्थ बघणे पटकन जमते. त्याचा फायदा परत राजकीय पक्ष व मेडिया घेतात व सांगतात/पटवतात की अराजक, गोंधळ आहे व मग वेगवेगळी लोक, नेहमीचीच कारणे वेगवेगळी फोडणी देऊन ऐकवतात.

मुंबईत जे काहि चालु आहे ते बघून तुम्हाला वैयक्तिकरित्या काय वाटलं?

सामान्य लोकांना / समाजाला "ह्या प्रकरणाची" गरज नव्हती पण बहूतेक राजकीय लोकांनाच हवी होती. मनसेला जरा टेस्ट घ्यावीशी वाटली असेल की ह्या मुद्यावर साथ मिळते का बघुया. पण तसेही, नाही म्हणले तरी काही सामान्य लोकांसाठी देखील परप्रांतीय व मुंबई(महाराष्ट्रात) मराठी भाषा व माणसाची दुर्दशा हा जिव्हाळ्याचा विषय आहे. आता भारतीय घटनेने सर्वांना कुठेही (काश्मीर, अंदमान मधील काही भाग इ.) जाण्याचा, रोजीरोटी कमावण्याचा हक्क दिला असताना इथे यायचेच नाही व आलात तर मराठीतच बोला,वागा असे करणे शक्य नाही, योग्य नाही. त्यामुळे सरसकट परप्रांतीय व स्थानिक हा वाद व्हायचे कारण नाही. आता त्यातल्या त्यात स्थानिकांवर अन्याय होऊ नये ही रास्त अपेक्षा पण त्यासाठी दंगेधोपे अनावश्यक. "आम्ही म्हणतो तसेच, आम्ही म्हणू तेच" करत बसलात तर काहीच होणार नाही व बहुदा राजकीय लोकांना तेच हवे आहे की हा प्रश्र असाच रहावा व श्रेय आपल्याला मिळावे. जसे हाडाच्या सावकाराला वाटते की कर्जदाराने कर्ज फेडू नये व दरमहा सतत व्याज देत रहावे.

सामान्य माणसालाही गरज आहे ?

सामान्य माणसाला त्याचे काही घेणेदेणे नाही.आणि
मुंबईत जे काहि चालु आहे ते बघून तुम्हाला वैयक्तिकरित्या काय वाटलं?
सामान्य माणसाला आणि विशेषतः मराठी माणसाला जेव्हा आपल्या रोजीरोटीवर हल्ला होत आहे, असे वाटू लागल्यावर सामान्य माणसाच्या मनात विरोध निर्माण होणे साहजिक आहे, असे आमचे मत आहे आणि या अवस्थेचा फायदा राजकीय पक्ष न घेतील तर नवल वाटण्याचे कारण नाही.
आम्हाला एक कळत नाही की या उत्तरी लोकांना विरोध करतांना आपण जे व्यावसायिक आहेत त्यांनाच टार्गेट करत आहोत. खरे तर आय ए एस् , आय पी एस अधिकारी आपल्याला चालतात त्यांना आपण महाराष्ट्रात महत्त्वाच्या पदावर बसवायचे आणि हाच मराठी माणूस इतर राज्यात जेव्हा अधिकारी म्हणुन जातो त्याला दुय्यम दर्जाच्या ठीकाणी नेमणूक केली जाते. तेव्हा कुठे जातात हे अस्मितेवाले. खरे तर याची सुरुवात फार पुर्वीच झाली होती, कधीतरी परप्रांतियांचे लोंढे आपण रोखूही शकलो असतो, तात्पुर्ते व्यवसायाचे परवाने देता येऊ शकत होते, तसेच निवासाच्या बाबतीतही हे होऊ शकले असते. खरे तर याला आम्ही सांस्कृतिक आक्रमणे असे म्हणतो आणि असे लोंढे थांबविणे आता तरी अशक्य आहे, कारण प्रसिद्धिमाध्यमे आणि राजकीय पक्ष यांना अस्तित्वासाठी आजीवन जगवणारा या पेक्षा दुसरा कोणता विषय असूच शकत नाही !
!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चर्चा आवडली

चालू द्या. वरील सदस्यांचे गंभीरपणे चर्चा पुढे नेल्याबद्दल आभार.

अभिजित...

उपाय

सर्व दूरदर्शन वाहिन्या आणि वृत्तपत्रांवर आठवडाभरासाठी बंदी आणा. सगळे आंदोलन थांबेल. अमिताभ बच्चन यांच्या घरावर जमावाचा हल्ला इथपर्यंत बातम्या दाखवल्या गेल्या. नंतर कळले की बंगल्याच्या भिंतीवर कुत्र्यानेसुद्धा तंगडे वर केलेले नाही.

बहुसंख्य माध्यमे आता पत्रकाराची भूमिका बजावण्याऐवजी न्यायमूर्तीची भूमिका बजावण्यासाठी उत्सुक झाली आहेत. त्यामुळे हा प्रश्न चिघळत चालला आहे.

सर्व प्रकरणात दोषी कोण हे माध्यमांना आधीच माहिती आहे आता फक्त हवे ते पुरावे गोळा करून दाखवत आहेत. एसमेस मतदानाच्या आधारे आवश्यक तो पाठिंबा त्यांना मिळाला आहे असेही ते सिद्ध करत आहेत.

जागतिकीकरण, भारतीय एकता व अखंडता या गप्पा मारण्यासाठी योग्य गोष्टी आहेत. वातानुकूलित कार्यालयात बसून पत्रकारिता करणार्‍यांना अशा गप्पा मारणे सोयीचे आहे. पण केवळ मुंबईच नव्हे तर पुणे, बेंगळूर, अशा सर्वच शहरांच्या एकूण राहणीमानाचा, जीवनाचा घटलेला दर्जा (क्वालिटी ऑफ लाईफ), पुण्यामुंबईत एकमेकांच्या पायावरही उभे रहायला जागा नसणे हे पाहिले तर नक्कीच कुठेतरी चुकत आहे.

-- आजानुकर्ण

अकौंटिबिलिटी

>> सर्व दूरदर्शन वाहिन्या आणि वृत्तपत्रांवर आठवडाभरासाठी बंदी आणा.

वाहिन्यांवर, विशेषतः हिंदी वृत्तवाहिन्यांवर, बंदी आणता आली असती तर चांगलेच होते ;) पण ते शक्य नसले तरी त्यांच्या स्वैराचाराला आळा घालणे आवश्यक झाले आहे. गेल्या काही दिवसात हिंदी वृत्तवाहिन्यांनी राईचा पर्वत केल्याचे स्पष्ट झाले आहे, त्याबद्दल त्यांच्यावर कारवाई व्हायला नको? 'अकौंटिबिलिटी'ची जाणीव त्यांना स्वतःहून होत नसेल तर करून द्यायला हवी. त्यांनी दाखवलेल्या/बनवलेल्या बातम्या अवास्तव असतील तर त्यांच्यावर कारवाई करणारी एखादी नियंत्रक संस्था असावी असे वाटू लागले आहे. ट्राय टेलिकॉम सेक्टर मध्ये जे काम करते तसे करणारी एखादी शासकीय संस्था असावी. वृत्तवाहिन्यांचा व्यापक स्तरावर होणारा परिणाम पाहता असे करणे आवश्यक झाले आहे.

सहमत आहे.

मराठी वाहिन्यांच्या मते हे आंदोलन सुरुवातीला शांततेत सुरु होते पण "नीम का पत्ता कडवा है, राज ठाकरे भडवा है" अशा पद्धतीच्या घोषणा यूएनपीए च्या सभेसाठी आलेल्या सपच्या कार्यकर्त्यांनी कृष्णकुंज परिसरात दिल्याने ते भडकले.

मराठी माणसांविरोधात जिहाद पुकारण्याची घोषणा करणारे, गरज असल्यास एका दिवसात मेरठ, मुझफ्फरपूर येथून २० हजार लोक आणून हा प्रश्न आणि मराठी माणूस ताबडतोब संपवून टाकू अशी घोषणा करणारे अबू आझमी कोणत्याच हिंदी वृत्तवाहिनीला दिसले नाहीत याचेही आश्चर्य वाटले. निखिल वागळे वगळता कोणत्याही अमराठी वाहिनीवरील पत्रकाराने समाजवादी पार्टी वा अबू आझमी यांचा उल्लेखही केलेला नाही हेही आश्चर्यजनक आहे.

आसाममध्ये याच आठवड्यात झालेल्या ४ हिंदी भाषकांच्या हत्या हा मोठा हिंसाचार की की मुंबईत दोन टॅक्स्या फोडणे हा मोठा हिंसाचार?

अमिताभ बच्चन या (संधिसाधू व नालायक) व्यक्तिविशेषासंदर्भात राज ठाकरेंचे वक्तव्य पुरेशा मर्यादा पाळून केलेले होते. जर अमिताभला उप्रचा इतका कळवळा आहे तर मला महाराष्ट्राबाबत असे का वाटू नये इतक्याच वाक्याचा पुढे अभिव्यक्तिस्वातंत्र्यापर्यंत आणि राष्ट्रीयत्वापर्यंत फुगवलेला फुगा पाहून खरोखरच काळजी वाटते.

मला तर सर्वच हिंदी मराठी इंग्रजी वाहिन्यांवर बंदी आणणे आवश्यक आहे असे वाटते.

-- आजानुकर्ण

सहमत

गेल्या काही दिवसात हिंदी वृत्तवाहिन्यांनी राईचा पर्वत केल्याचे स्पष्ट झाले आहे, त्याबद्दल त्यांच्यावर कारवाई व्हायला नको? 'अकौंटिबिलिटी'ची जाणीव त्यांना स्वतःहून होत नसेल तर करून द्यायला हवी

सहमत आहे. जेथे लोकशाहिचा चौथा स्तंभ केवळ नफेखोर व्यवसाय होतो तेथे हे प्रश्न उत्पन्न व्हायचेच

-ऋषिकेश

मराठी विरुद्ध मराठी!

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
आधी सगळ्या मराठी माणसांना महाराष्ट्राच्या हिताच्या बाबतीत वैचारिक दृष्ट्या एकत्र करा आणि मगच इतर भाषिकांचा समाचार घ्या. खरे तर आपण मराठी माणसे पक्षभेद विसरून ’निदान’ मराठी अस्मितेबाबत जोवर एकत्र होत नाही तोवर त्याचा फायदा अन्यभाषिक घेतच राहणार. उदा. बेळगाव-कारवारचा प्रश्न घ्या. ह्या प्रश्नावर समस्त कानडी राजकीय पक्ष आपापसातले पक्षभेद विसरून त्याबाबतीत एकच भूमिका घेतात. वेळप्रसंगी त्यासाठी सत्तास्थानाचा उपयोग अथवा त्याग करायलाही मागेपुढे बघत नाहीत. त्याविरुद्ध आपले मराठी राजकारणी बघा. नुसते श्रेय लाटायला जो तो पुढे सरसावतो आहे. आणि इथेच आपण मार खातो.
आज केंद्रामध्ये कृषीमंत्री,गृहमंत्री,विद्युत-पुरवठामंत्री वगैरे महत्वाच्या ठिकाणी मराठी माणसेच आहेत. पण महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतकर्‍यांच्या आत्महत्त्या, सामजिक असुरक्षितता,वीजेचा खेळखंडोबा चालूच आहे. आता ह्या मंत्र्यांना मराठी म्हणून महाराष्ट्रासाठी काही करावेसे का वाटू नये? कुणी त्यांचे हातपाय बांधले आहेत काय?

असो. हा विषय ताणावा तितका ताणता येईल. पण त्यात मजा नाही. एक गोष्ट मात्र नक्की की आधी आपण शहाणे होऊ या मग इतरांना आपोआप अक्कल येईल. ती शिकवायची गरजच पडणार नाही.

'सकाळ'मधील बातमी

वृत्तवाहिन्यांनी केला राईचा पर्वत!

मुंबई - आज दिवसभरात दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील बातम्या पाहिल्यानंतर कोणालाही वाटेल, की मुंबईत आता जणू गुंडा"राज'च अवतरले आहे!

मुंबईतील मराठी माणसे घराघरात घुसून उत्तर भारतीयांना ठेचत आहेत आणि सरकार हात बांधून बसले आहे. परिस्थिती खरे तर याहून खूप वेगळी आहे!

मुंबईतल्या दादर भागात शिवाजी पार्कनजीक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान आहे. हा भाग पहिल्यापासून शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या भागातील काही शिवसैनिक मनसेमध्ये सामील झाल्यानंतर तेथे आपसूकच मसनेचेही प्रभावक्षेत्र निर्माण झाले. रविवारी समाजवादी पार्टीने आयोजित केलेल्या मेळाव्यास जात असलेल्या उत्तर भारतीयांना मारहाण झाली ती याच भागात. त्याचे पडसाद ठाणे, नाशिकसारख्या शहरांत उमटले असले, तरी त्यांचे स्वरूप किरकोळच होते. दादरमध्येही काही रणभूमी अवतरली नव्हती. परंतु दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून त्याच त्या घटनांचे चित्रिकरण वारंवार दाखविले गेले. त्यामुळे वातावरण खूपच चिघळले असल्याचा प्रेक्षकांचा समज होत होता.

वास्तविक दादरमध्ये रविवारी मनसे कार्यकर्ते आणि उत्तर भारतीय यांच्यात झाली ती "मारामारी'. मारामारीमध्ये मार दिला-खाल्ला जातो तो दोन्ही बाजूंनी. पण दूरचित्रवाणीच्या पडद्यावरून हे वास्तव समोर आलेच नाही. सोमवारीही असाच प्रकार घडला. दादर रेल्वेस्थानकात काही उत्तर भारतीयांना मारहाण करण्यात आली. मात्र सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी दादरसारख्या स्थानकात टीव्हीचे कॅमेरामन असणे, चेहऱ्यावर रूमाल बांधून तथाकथित आंदोलकांनी येणे हे पाहता मारहाणीचा तो प्रकार "मॅनेज' असल्याचे मत माध्यमक्षेत्रातील माहितगार व्यक्त करीत आहेत. वृत्तवाहिन्यांवरून ही घटनाही वारंवार दाखविण्यात येत होती.

एकंदरच या संपूर्ण प्रकरणात वृत्तवाहिन्यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल सर्वसामान्य नागरिकांत मोठी नाराजी दिसून आली. अमिताभ बच्चन यांच्या घरावर दोन समाजकंटकांनी रात्रीच्या अंधारात मद्याच्या बाटल्या फेकल्याच्या घटनेला सोमवारी दिवसभरात मोठी प्रसिद्धी देण्यात आली. "सकाळ' प्रतिनिधीने अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यावर चौकशी केली असता समजले की असा काही प्रकार घडलाच नाही. परंतु वृत्तवाहिन्यांनी मोठ्या कौशल्याने त्या अफवेचे रूपांतर "हार्ड न्यूज' मध्ये केले. एका इंग्रजी वाहिनीने तर यावरही कडी केली. "अमिताभ यांच्या घरावर जमावाचा हल्ला' अशी बातमी ती वाहिनी सोमवारी दिवसभर दाखवित होती. वृत्तवाहिन्यांच्या अशा प्रकारच्या विपर्यस्त वृत्तांकनांमुळे मुंबईमध्ये दिवसभर विविध प्रकारच्या अफवा उठत होत्या, विरत होत्या. आणि त्या सर्व अफवांच्या, बातम्यांच्या पलीकडे जाऊन मुंबई मात्र आपल्याच वेगाने पळत होती.

-- आजानुकर्ण

चॅनेल्सवर बंदी? पोलिस आयुक्तांचा इशारा

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2756867.cms
मुंबई,
मटा ऑनलाइन वृत्त
सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील प्रतिक्षा बंगल्यावर हल्ला झालाच नसल्याचे स्पष्टीकरण पोलिसांनी केले आहे. दोघा मोटारसायकलस्वारांनी पहाटे बंगल्यात बाटल्या फेकल्याची बातमी हा वृत्तवाहिन्यांचा अतिरंजितपणा असल्याचे सांगून अशा चॅनेल्सचे प्रसारण रोखण्याचा इशारा सह पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) के. एल. प्रसाद यांनी दिला आहे.
अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यावरील हल्ल्याची बातमी आज दिवसभरातील "टॉप स्टोरी" बनली होती. मनसेच्या कार्यकर्त्यांनी अमिताभच्या बंगल्यावर हल्ला केल्याचा खुद्द राज ठाकरे यांनीच सायंकाळी इन्कार केला होता. तर या प्रकरणातील विडिओ क्लिंपीग्स् पाहून संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सांगितले. मात्र हा सगळा प्रकार अफवा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
अमिताभच्या बंगल्यावर हल्ला झाल्याची कोणतीही घटना घडलेली नाही. अशा बातम्या दाखवून दंगल भडकणार नाही याचे भान मिडियाने ठेवायला हवे. एकच घटना वारंवार दाखविल्याने भीतीचे वातावरण निर्माण होते. हे प्रकार थांबविले नाहीत , तर मुंबई पोलिस ऍक्‍ट ६८ व ६९ अन्वये वेळप्रसंगी चॅनेलचे प्रसारण बंद करू , असा इशारा प्रसाद यांनी आज दिला.

बातमी आणि छायाचित्रं

लोकसत्तातील ही बातमी देखील वाचण्यासारखी आहे.

टाइम्स मधील खालील चित्र पहा:

RJD party workers exercise Gandhigiri, by giving red roses to passengers of Patna-Lokmanya Tilak Terminal express, at Patna railway junction. (PTI Photo)

आणि आता ही एक "फोटॉ ऑप..."!

फाड ग घुमा - सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचे पोस्टर फाडून टाकण्यासाठी मनसेच्या महिला कार्यकर्त्या अशा सरसावल्या.

कसली आलीय गांधीगिरी

असली पोकळ गांधीगीरी काय कामाची? महाराष्ट्रातील रेल्वे भरतीच्या जाहिराती बिहारमधे दिल्या जातात त्याबद्दल कुणीही काही बोलत नाही.
रेल्वे खात्यात मराठी लोकाना काम का मिळत नाही? हे जरा तुमच्या गांधीगीरी करणार्‍या लालूला कोणी विचारेल काय?
ज्यांना स्वतःच्या भूमीपुत्रांना रोजगार देता येत नाही त्यांनी असला पोकळ स्वाभीमान दाखवू नये. यांनी स्वतःच्या राज्यात रोजगार निर्माण केला असता तर मुंबईत आजची परीस्थीती ओढवली नसती. ऑपरेशन गंगाजल करणार्‍यांनी गांधींचे अहिंसावादी पेटंट घेतल्याचा आव आणू नये.
हिंदी प्रसारमाध्यमे नेहमी राज यांनाच का टारगेट करत आहेत्, अबू आझमी आणि लालू यांची चापलूसी यांच्याबद्दल कुणीही बोलत नाही.आधी बिहारचे प्रश्न सोडवा आणि मग मुंबईत लक्ष घाला म्हणावं.

कुठंवर चालणार

आधी सगळ्या चित्पावन ब्राम्हणांना ब्राम्हणांच्या हिताच्या बाबतीत वैचारिक दृष्ट्या एकत्र करा आणि मगच इतर जातींचा समाचार घ्या.
आधी सगळ्या मराठी माणसांना महाराष्ट्राच्या हिताच्या बाबतीत वैचारिक दृष्ट्या एकत्र करा आणि मगच इतर भाषिकांचा समाचार घ्या.
आधी सगळ्या दक्षिणेच्या माणसांना दक्षिणेच्या हिताच्या बाबतीत वैचारिक दृष्ट्या एकत्र करा आणि मगच उत्तरेच्या लोकांचा समाचार घ्या.
आधी सगळ्या भारतीय माणसांना भारताच्या हिताच्या बाबतीत वैचारिक दृष्ट्या एकत्र करा आणि मगच इतर देशांचा समाचार घ्या.
आधी सगळ्या जगातील माणसांना जगाच्या हिताच्या बाबतीत वैचारिक दृष्ट्या एकत्र करा आणि मगच इतर आकाशगंगांचा समाचार घ्या.

फॉर व्हाइट्स आय एम ब्लॅक फॉर इंडिअनस् आय अम फ्रॉम साउथ. अशा साधारण अर्थाची एक इंग्रजी कविता दहावी की बारावीला होती. त्याची आठवण झाली.

चाललं आहे हे वाईट आहे पण कलियुग यालाच म्हणत असावेत. तेव्हा आलेल्या प्रसंगाला आपापल्या अस्मितेनुरुप सामोरे जायचे हा एकच उपाय आहे. माझं हिंदू असणं, मराठी असणं, भारतीय असणं हा एक योगायोग आहे आणि या योगायोगाने मला बहाल झालेल्या अस्मितांचे पालन करण्याची पडलेली जबाबदारी पार पाडतो आहे.

धनंजय यांनी म्हटल्याप्रमाणे छटपूजेस आमचा विरोध नाही पण त्या आडून शक्तीप्रदर्शनाचा प्रयत्न कोणी करू पहात असेल तर नाठाळाच्या माथी काठी हाणायला कमी करणार नाही. आम्ही तुमच्या वाटेला जात नाही आणि जाणारही नाही (मुळात मराठी माणसाने उत्तर प्रदेशात रिक्षा चालवायला जाण्याइतकी वाईट परिस्थिती इकडे नाही)पण आमच्या वाटेत आडवे याल तर खबरदार..

जय शिवाजी ! जय भवानी!!

अभिजित...

सहमत

"धनंजय यांनी म्हटल्याप्रमाणे छटपूजेस आमचा विरोध नाही पण त्या आडून शक्तीप्रदर्शनाचा प्रयत्न कोणी करू पहात असेल तर नाठाळाच्या माथी काठी हाणायला कमी करणार नाही. आम्ही तुमच्या वाटेला जात नाही आणि जाणारही नाही (मुळात मराठी माणसाने उत्तर प्रदेशात रिक्षा चालवायला जाण्याइतकी वाईट परिस्थिती इकडे नाही)पण आमच्या वाटेत आडवे याल तर खबरदार.."

अगदी सहमत.

जय शिवाजी! जय भवानी!! जय शंभूराजे!!!

राज - कारण

सगळं कस जरा बर्‍यापैकी चालु होतं अलिकडे. शिवसेनेला उद्धवाचा चेहरा मिळाल्याने ती खचेल की काय असे चित्र होते. राज आणि राणे हे शिवसेनेला बसलेले मोठे धक्के होते. काही प्रमाणात अपेक्षीत असतील सुद्धा शिवसेनेला. दोन खंबीर नेते सेना सोडुन गेले म्हणजे सेनेत नक्कीच काहीतरी गडबड आहे. राणेंसारखा धडाडीचा नेता आणि बिच्चारा राज बळी ठरले असे वाटत होते. पण अलिकडचे शिवसेनेचे थोडेफार यश. काही प्रमाणात शिवसेनेला शिस्त लावण्याचे यशस्वी प्रयत्न, महाराष्ट्राच्या विकासाची ब्लु प्रिंटची भाषा करुन अजुन सुद्धा ट्रेसिंग बनव न शकल्याने अपयशी आणि एकाकी राज, आणि मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी दिल्ली दरबारी आपली जीभ बाहेर काढुन आणि सोनियाप्रती आपली शेपटी हलवणारे राणे हे सगळे चित्र पाहुन कुठे तरी शिवसेनेने मराठी माणसाच्या मनावर आणि शेतकर्‍यांसाठी आंदोलन करुन महाराष्ट्राच्या मोठ्या भागावर आपला प्रभाव बर्‍यापैकी पाडायला सुरूवात केली होती. याचा वाईट प्रभाव कॉंग्रेस, काँग्रेसमधुन फुटलेली शिवसेना कॅटेगिरीची - राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि राज-सेना या सगळ्यांनाच भारी पडत आहे असे चित्र दिसत होते.
ज्याची पकड मुंबईवर, त्याची भारतातल्या आर्थिक राजधानीवर आणि मराठीमनावर हे एक लहान मुलांना सुद्धा समजणारे समीकरण आहे. तसेच अमिताभ बच्चन आणि आता त्यांची सुन ऐश्वर्या हि दोन नावे अशी आहेत की कोट्याधीशा पासुन झोपडपट्टीला सुद्धा माहित आहेत. कदाचित देशातली दोन प्रभावी नावे. मोहनदास हे नाव कोणाचे हे विचारले तर अनेक भारतीयांना सांगता येणार नाही. पण अमिताभ आणि ऐश्वर्या म्हटले तर फोटो काढुन दाखवला जाईल. सांगायचा मुद्दा एवढाच की हे दोन एक्के पकडणे म्हणजे हमखास प्रसिद्धी. भारतातले राजकारणी असे मुद्दे सोडुन देतील? असो. हे झाले काही मुद्दे जे लोकप्रियता मिळवण्यासाठी प्रत्येकजण वापरतो आहे. वापरणार आहे.
आता समाजवादी पार्टी - उत्तर प्रदेश सोडता यांचा प्रभाव कुठे आहे? काही मुस्लीम प्रभावीत क्षेत्रात. मुंबईचा काही भाग त्यातलाच. अबु आझमी हा त्यांचा नेता. मुबई, हिंदुत्व हे त्याला हवे असणारे मुद्दे. तो कोणालाच दिसत नाही. कारण सरळ आहे. येथे समाजवादी पार्टी कधीच जगणार नाही. पण त्याच्या भुंकण्याचा फायदा मात्र काँग्रेसला होणार आहे. मतपेटीची समीकरणे जुळवण्यासाठी सगळेच पुढे आहेत. प्रश्न आहे तो माणसे जी मुंबई मध्ये राहतात त्यांचा.
राज ठाकरेंचा मुद्दा चुकीचा नव्हता. येथे आहात तर इथल्या गोष्टी पाळा. आमच्याच घरात घुसुन आम्हाला हुसकायला आलात तर याद राखा... मग जर कोणी लाठीची भाषा केली तर मग त्यांना समजणारी भाषाच बोलायला हवी ना? त्यांनी फार काही चुक नाही केले. पण अमिताभ यांना गुंतवुन प्रसिद्धीचा डाव मात्र खेळला. अमिताभ म्हणले की दोन जयांचा (जया बच्चन - जया प्रदा) तारणहार असलेले मुलायम आणि अमर धावुन येणार त्यात काही नवल नाही. तसा ही हल्ली त्यांना काहीच उद्योग नाही. मग रिकमा न्हावी .... एवढे सगळे घडवुन आणण्यापेक्षा अबु आझमीला जाउन चांगला चोप दिला असता तर राज ठाकरेंना जास्त प्रसिद्धी मिळाली असती.

बाकी ध्रुवीकरणाबद्दल म्हणाल तर वर अनेक योग्य मुद्दे मांडले आहेतच. भरमसाठ लोकसंख्या, जीवघेणी स्पर्धा, अपयशाचे दडपण आणि बेफिकीर वृत्ती. या मराठीच नाही तर सर्व भारतीयांच्या समस्या आहेत. त्या कोण्या राज-कारण्याला सोडवायची अजिबात इच्छा नाही. खरतर असे नेतृत्व देखील आपल्याकडे नाही. ज्यांच्याकडे असे गुण आहेत ते सर्वांना मान्य नाहीत. अमान्य असायला हे आत्ता लिहिलेले मुद्दे आहेतच. थोडक्यात ते एक दुष्टचक्र आहे. त्यातुन येणारी असुरक्षीतपणाची भावना आपल्यासारख्यांचे ध्रुवीकरण करायची भावना जागवते. जेवढे मिळते आहे तेवढे तरी पदरात पाडुन घ्या ही वृत्ती वाढत आहे. सर्वांचा विचार मी कशाला करु? हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. प्रत्येकाचा प्रश्न आहे तो स्वतःचे सुख मिळवण्याचा आणि त्यासाठी पैसा हवा, काही ठिकाणी पैसा मिळवण्यासाठी प्रसिद्धी हवी. मग हे असले सगळे प्रकार घडत राहणारच.
भारताला गरज आहे ती जागे होण्याची. भारताला काय हवे हा विचार करण्याची. जर मी हा विचार नाही केला तर काय होइल हा विचार करण्याची. पण येथे विचार करायची इच्छाच मरत चालली आहे. मला हवं आहे सुख. त्यासाठी हवा तो मार्ग मी तुडवायला तयार आहे. मग तो गावा कडुन शहराकडे असो, शहरातून मुंबईला अथवा भारता बाहेर. प्रत्येकाला आपला मार्गच योग्य वाटतो. अयोग्य आहे असे दाखवल्यास त्यातले योग्य दाखवले जाते. किंवा मग तुम्ही कसे अयोग्य आहे ते सिद्ध केले जाते. मग कसले प्रश्नच उरत नाहीत. असे काही से आजचे चित्र आहे.





बरोबर

"राज ठाकरेंचा मुद्दा चुकीचा नव्हता. येथे आहात तर इथल्या गोष्टी पाळा. आमच्याच घरात घुसुन आम्हाला हुसकायला आलात तर याद राखा... मग जर कोणी लाठीची भाषा केली तर मग त्यांना समजणारी भाषाच बोलायला हवी ना? त्यांनी फार काही चुक नाही केले."

प्रसिद्धी माध्यमं नेमकं हेच पुढे येऊ देत नाहीत.
चर्चा झडतात त्या सुद्धा फक्त पोकळ तत्वद्न्यानावर पण हा विचार दुर्लक्षिला जातो. हा विचार गांधीगिरी करून् लोकांच्या गळी उतरवायला गेलो तर आमची अ़ख्खी हयात यात जाईल. आणि पदरी काहीच् पडणार् नाही.

ध्रुवीकरणाबद्दल

ध्रुवीकरण हे आपल्या रक्तातच असावे. एखाद्या चांगल्या कामासाठी एकत्र येणे किंवा 'समानशीले व्यसनेषु...' मंडळींनी एकत्र येणे ही त्याची चांगली बाजू झाली. पुलंनी एका लेखात म्हटल्याप्रमाणे, दुर्दैवाने प्रेमापेक्षा द्वेषाच्या झेंड्याखाली माणसे पटकन जमतात. याला अगदी जात, धर्म, भाषा, राष्ट्र अशा मोठ्या वर्गवार्‍या हव्यात असेही नाही. आपल्या रोजच्या व्यवहारातसुद्धा, दहा माणसांत नऊ जणांचे दहाव्याविषयी काही कारणाने प्रतिकूल मत झाले तर ते 'काही प्रमाणात' एकत्र येतातच. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र हे याच तर्कशृंखलेत (लॉजिकल एक्स्टेंशन) मोडत असावे.

त्यामुळे 'आपण' आणि 'ते' अशी वर्गवारी होणे अनैसर्गिक नाही - तो एकंदरीतच आपल्या प्रकृतीचा भाग असावा (राजेंद्रचे हे प्रकटन पहा), परंतु अर्थातच आपल्या संस्कृतीचा असता कामा नये. सध्या हे होऊ घातलं आहे, यामागे जागतिकीकरणातून येणारी असुरक्षिततेची भावना हे मूळ कारण असावं. मुंबईचं जागतिकीकरण [भारतीय संदर्भात - भारतीयीकरण/मिनी इंडिया] सर्वात जास्त प्रमाणात झालं. त्यामुळे ठिणगी प्रथम तिकडे पडणं साहजिक आहे. पण वरील काही प्रतिसादांत म्हटल्याप्रमाणे इतर शहरेही याच वाटेने चालताना दिसत आहेत. वानगीदाखल हिंदूमधली ही बातमी पहा. राज ठाकरेंच्या कल्याण स्थानकावरील आंदोलनाची बातमी आणि या बातमीतील फरक शोधून दाखवा अशी स्पर्धा ठेवावी, इतक्या दोन्ही सारख्या आहेत.

कोळीणींनी भय्यांविरूद्ध आंदोलन करणे, भारतीय उद्योजकांनी स्वस्त चिनी मालावर कर लादावेत अशी मागणी करणे आणि कुणा अमेरिकनाने सन मायक्रोसिस्टम्सला कोर्टात खेचणे या एकाच असुरक्षिततेच्या चढत्या श्रेणीतील घटना म्हणता येतील.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
(http://marathisahitya.blogspot.com)

उपाय?

कोळीणींनी भय्यांविरूद्ध आंदोलन करणे, भारतीय उद्योजकांनी स्वस्त चिनी मालावर कर लादावेत अशी मागणी करणे आणि कुणा अमेरिकनाने सन मायक्रोसिस्टम्सला कोर्टात खेचणे या एकाच असुरक्षिततेच्या चढत्या श्रेणीतील घटना म्हणता येतील.

हं! अश्यावेळी जागतीकीकरणामुळे हे असंच घडणार म्हणून बघत रहावं लागणार की असं होऊ नये म्हणून जागतिकीकरण होत असतानाहि काहि उपाय करता येतील? 'स्वयंपूर्ण खेडी' हा पर्याय असला तरी सध्याच्या जागतिकीकरणाच्या रेट्यापुढे हतो यशस्वी होण्याची शक्यता कमीच. तेव्हा "कालाय तस्मै नमः" म्हणून नुसतं बघत रहायचं का? यावर काहितरी उपाय असेलच ना?

(प्रश्नग्रस्त)ऋषिकेश

हे देखील ध्रुवीकरण का?

भारतीय समाज इतका संवेदनशील झाला आहे का, की कोणी असे काहि बोलावे आणि काहि वाक्यांमुळे आगडोंब उसळावा?

भारतीय समाजच का? एन-आर-आय समाजही त्याबाबतीत पूर्ण भारतीय आहे याची जाणीवही झाली. कोणा गोडबोल्यांनी गोड बोलणे सोडून कडवट बोलणे सुरू केल्यावर इतका ताप डोक्याला करून मोठमोठे प्रतिसाद देऊन वेळ वाया का घालवतात लोक हा प्रश्न मला पडला. माफ करा पण ते प्रतिसाद वाचण्याचाही मला वेळ होत नाही. लोकांना लिहिण्याएवढा वेळ कसा असतो हे कळत नाही. असो, तो त्यांचा प्रश्न, परंतु आज गोडबोल्यांनी लिहिले, उद्या कोडगुले लिहितील, परवा कांबळे लिहितील, तेरवा देसाई लिहितील.... पण त्यांना प्रत्युत्तर म्हणून आपल्याच गोतावळ्यात खर्डेगिरी करत राहणार्‍यांचेही ध्रुवीकरण होत आहे काय?

कुछ तो लोग कहेंगे| लोगोंका काम है कहना|
छोडो बेकार की बातोंमें कही बीत ना जाये रैना||

ही संतवाणी कोणीतरी भल्याभल्यांना समजावून सांगण्याची गरज आहे.

- राजीव.

आजच्या टाइम्स ऑफ इंडियातील लेख

आजच्या टाईम्स ऑफ इंडीयातील लेख वाचा. लेखकाने ७०च्या दशकातील बाळ ठाकरे यांच्या आंदोलनाशी राज यांच्या आंदोलनाची तुलना केली आहे. ७०च्या दशकाच्या मानाने आज मराठी (मध्यम आणि उच्च-मध्यम वर्ग) माणुस मुंबईत बर्‍याच अभिमानाने राहतो तेव्हा राज यांच्या आंदोलनाला तसा अर्थ नाही असे प्रतिपादन लेखकाने केलेले आढळते. यात कितपत तथ्य आहे असे तुम्हाला वाटते?

मला वाटते, ७०च्या दशकातील सुशिक्षित दक्षिणींचे आर्थिक (विशेषतः नोकरींविषयी) अतिक्रमण आणि सध्याचे अल्पशिक्षित उत्तर भारतीयांचे सांख्यिक अतिक्रमण यांचीच तुलना होऊ शकत नाही.

अर्थात हे काही राज यांच्या आंदोलनाचे समर्थन नव्हे. पण हा उद्रेक कोणत्या ना कोणत्या स्वरूपात कधितरी होणारच होता, असे माझे मत आहे.

http://timesofindia.indiatimes.com/Opinion/LEADER_ARTICLE_Headed_The_Wro...

टाईम्स

लेख वाचला पण टाईम्सवाले पैसे देतील त्यांच्यासाठी काहीही लिहीतील. उद्या नावही बदलू शकतात ते. टाईम्स ऑफ विजय मल्या वगैरे.

त्यामुळे टाईम्सला भाव देण्याचे आपण सोडून दिले आहे. तसंच पेपर् किंवा न्युज चॅनल बघताना एवढं लक्षात ठेवावं की ते नाण्याची एकच सोयीची बाजू दाखवत आहेत्.

अभिजित...
कोंबडी पळाली गाण्यावर नाचलं की भरपूर व्यायाम होतो.

आधीच उल्हास...

दिल्ली राज्याचे नायब राज्यपाल तेजींदर खन्ना म्हणाले की उत्तर भारतीयांना कायदे न पाळण्यात आणि बेशिस्त राहण्यात अभिमान वाटतो!"

दुवा

भाबडी जनता?

असे प्रकार आधी अगणित वेळा झाले आहेत. गेल्या पन्नास वर्षांमध्ये राजकारणी खुर्चीसाठी काय काय करू शकतात याचा नको इतका अनुभव गाठीशी असतानाही अजूनही लोक यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतात याचे आश्चर्य वाटते.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

त्रागा

गेल्या पन्नास वर्षांमध्ये राजकारणी खुर्चीसाठी काय काय करू शकतात याचा नको इतका अनुभव गाठीशी असतानाही अजूनही लोक यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतात याचे आश्चर्य वाटते.

राजकारण्यांचा संबंध नाही आहे तर दरोजच्या जिवनातील सामान्यांना जे झगडावे लागत आहे त्या त्राग्याशी याचा संबंध आहे. त्या रागाला असल्याप्रकारामुळे वाट मिळते (आणि राजकारण्यांची चलती होते). साधे बघाना जेंव्हा एखादा पाकीटमार मिळतो तेंव्हा त्याला फलाटावर खेचून ज्याचे पाकीट मारले तो आणि त्या डब्यातलेच मारत नाहीत तर बाजूने जाणारा नपेक्षा साधा दिसणारा माणूस पण उगाच जाता जाता त्याच्या पेकाटात ठेवून पुढे जातो - कारण त्रागा काढायला त्या पाकीटमाराने त्याला वाट दिलेली असते इतकेच.

आजचा मटामधील राजचा लेख

आजच्या मटातील राजचा तीन पानी लेख इथे वाचा.--वाचक्‍नवी

 
^ वर