प्रवास तीन चाकींचा

तीन चाकी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती बजाजची ऑटो रिक्षा. हो ना? तसा तीन चाकीचा प्रवास सुरू आहे तो साध्या सायकलच्या प्रेरणेतून बनलेली तीनचाकी सायकल जिथे एक मनुष्य ती सायकल चालवतो आणि मागे आपण बसतो. आज सुद्धा दक्षिण भारतात या सायकल पाहायला मिळतात. या सायंकालांना मानवी शक्तीची मर्यादा होती. एका ढोरा प्रमाणे सायकल चालक बसलेल्या प्रवाशांना ओढत न्यायचा. तंत्रज्ञान नेहमीच बदलते. २ पेक्षा जास्त प्रवासी वाहुन न्यायच्या या वाहन प्रकारात सुद्धा तंत्रज्ञानाने प्रगती केली. मनुष्याच्या शक्ती ऐवजी येथे काही अश्वशक्तींचे इंजिन आले आणि चालक हा स्वतःची शक्ती न खर्च करता फक्त युक्ती खर्च करुन प्रवाशांची ने-आण करू लागला.

आता या तीन चाकिंना आपण ऑटो रिक्षा म्हणतो. आज हा वाहन प्रकार भारतीय वाहन उद्योगाचा आणि अनेक भारतीयांचा एक अविभाज्य भाग आहे. काही लोकांकरिता एक प्रवासाचे साधन म्हणून तर काहींसाठी रोजच्या रोजी रोटीचा एक भाग म्हणून. आजच्या घडीला ३ चाकी वाहने विचारात घेतल्यास नजरे समोर प्रथम येतात ती वाहने म्हणजे बजाजची ऑटो रिक्षा अथवा मिनिडोर. पण या वाहन प्रकारातले पहिले व्यावसायिक वाहन म्हणजे टेम्पो हॅनसीट. आजची फोर्स मोटर्स (पुर्वा श्रमीची टेम्पो इंडिया आणि त्या पूर्वीची बजाज टेम्पो), या कंपनीने अंदाजे चार दशकापूर्वी जर्मनीच्या विडॉल अँड सोह्न टेम्पो वेर्के या कंपनीच्या साहाय्याने भारतात हॅनसीटचे उप्तादन सुरू केले. टु स्ट्रोक इंजिन असलेल्या या वाहनाने भारतीय वाहन उद्योगात तीनचाकी वाहनांचा पाया उभा केला असे म्हणण्यास काही हरकत नसावी. हे वाहन बर्‍यापैकी निर्यात होत होते. तसेच कालानुरूप नामशेष देखील झाले पण सन २००० साला पर्यंत या वाहनाने भारतात आणि भारता बाहेर देखील भरपूर धंदा केला.

या वाहन प्रकारात सर्वाधिक काळ राज्य करणारे वाहन म्हणून आपण ओळखतो ती म्हणजे बजाजची (बजाज ऑटो ही - बजाज ऑटो होण्यापूर्वी म्हणजेच २५ नोव्हेंबर १९४५ पूर्वी ती बचराज ट्रेडिंग कॉर्पोरेशन होती ) ऑटो रिक्षा. आपल्यातल्या अनेकांनी या ऑटो रिक्षांमधले अनेक बदल अनुभवले आहेत. पूर्वी हि रिक्षा एफ इ (म्हणजेच फ्रंट इंजिन) म्हणून ओळखली जायची. नावा प्रमाणेच या रिक्षांमध्ये चालकाच्या आसना खालील जागेत याचे इंजिन होते आणि इंधनाची टाकी देखील पुढेच असायची. कालमाना नुसार रचनेत बदल होत गेले. इंधन टाकी आणि इंजिन मागे आले आणि एफ इ चे आर इ (रिअर इंजिन) झाले. हि रिक्षा पेट्रोल इंधन म्हणून वापरायची आणि आसन क्षमता तीन होती/आहे - ३ प्रवासी.  या रिक्षांनी जनसामान्यांच्या मनात घर केले होते. काहींसाठी ती परवडणारी टॅक्सी होती, काहींसाठी काका/मामाची शाळेतून ने-आण करणारी गाडी होती.

या वाहन प्रकारात बजाज ऑटोची रिक्षा राज्य करत असताना जोरदार आगमन केले ते म्हणजे ग्रीव्हज गरुडा या डिझेल रिक्षाने आणि बजाजच्या साम्राज्याला बर्‍याच प्रमाणात आव्हान दिले. रिक्षा चालकांना/मालकांना डिझेलावर चालणार्‍या रिक्षांचा पर्याय उपलब्ध झाल्याने फायद्यात वाढ झाली. तसेच टप्पा वाहतुकीला मान्यता मिळाल्याने ग्राहकांना सुद्धा स्वस्त पर्याय उपलब्ध झाला आणि उपनगरी आणि शहरी भागात या रिक्षांचा सुळसुळाट झाला. या उपलब्ध झालेल्या पर्यायाने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला एक पर्याय तयार झाला. डिझेल इंजिनाची कंपने हा अवगुण होता. पण छोट्या अंतराची वाहतूक करणार्‍या सर्वसामान्य प्रवाशाला त्याच्याशी काहीच देणे घेणे नव्हते.

याच काळात अल्पावधीतच ग्रीव्हज गरूडाला एक जबरदस्त पर्याय आला, तो म्हणजे डिझेल इंजिनावरच पळणार्‍या परंतु आसन क्षमता ६ असणार्‍या टेम्पो मिनीडोरचा. या प्रकारात टेम्पो आपले वर्चस्व सिद्ध केले. भारत २ हे प्रदूषणाचे निकष पूर्णं करणारे इंजिन आणि ६ अधिकृत प्रवासी या दोन मोठ्या गुणांवर टेम्पोने बाजी जिंकली होती. या वाहनाने आजवर एकूण दीड लाखाच्या आसपास व्यावसायिक तयार केले आहेत. या वाहनाने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला एक पर्याय उभा केला अन शहरांतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडून पडू लागली. मिनीडोर प्रदूषण करते असे जनमत होवू लागले. पण शक्ती आणि इंधन क्षमता वाढवण्यासाठी चालकांनी अवैधरीत्या केलेले काही बदल प्रदूषणास कारणीभूत ठरते होते. तीन आसनी आणि सहा आसनी रिक्षा चालक/मालकांच्या संघर्षातून या रिक्षांना शहराच्या हद्दी बाहेर चालवण्याचे आदेश मिळाले.

याच दरम्यान पियाज्जिओ या इटालियन कंपनीने आपे ही तीन आसनी डिझेल रिक्षा आणली. आता एवढे सगळे सुरू असताना आपले बजाज शांत कसे बसेल? बजाजाने मधल्या काळात फोरस्ट्रोक इंजिनवाली पेट्रोल रिक्षा आणली. पण वाहन चालकांच्या तक्रारींपुढे त्यांना नमते घ्यावे लागले. आजच्या घडीला बजाज ऑटोने पेट्रोल-डिझेल-एलपीजी-सीएनजी या पर्यायांमध्ये टु स्ट्रोक आणि फोर स्ट्रोक रिक्षा बाजारात आणल्या आहेत. मधल्या काळात विक्रम या कंपनीने सुद्धा ६ आसनी रिक्षा बाजारात आणली होती. पण त्यांना म्हणावे तितके यश मिळाले नाही. सर्वात मजेशीर गोष्ट म्हणजे अधिकृतरीत्या ३ ते ६ प्रवासी वाहतूक करणार्‍या या सर्व वाहनांनी शक्ती ही ७ ते ९ अश्वशक्तीपेक्षा कमी म्हणजेच बाजारातल्या अनेक दुचाक्यांपेक्षा कमी असते. तसेच या वाहनांचा सर्वाधिक वेग तासाला ४५-६० किलोमीटर पेक्षा जास्त नसतो.

तीन चाकी वाहनांच्या या प्रवासात काही मुद्दे पुढे आले.

सकारात्मक मुद्दे :

  1. ज्याची स्वतःची चार चाकी घेण्याची क्षमता नाही अन दुचाकी चालवायची इच्छा नाही अशांसाठी एक चांगला पर्याय मिळाला.
  2. कमी वारंवारता असलेल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला पर्याय मिळाला.
  3. शा़लेय विद्यार्थ्याची वाहतूक करणे सोयीचे झाले.

नकारात्मक मुद्दे:

  1. राजकारण्यांच्या आणि प्रशासनाच्या दूरदृष्टीच्या अभावाने या वाहनांचा प्रचंड सुळसुळाट होवून आजच्या घडीला सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पार कोलमडून पडली आहे. ती पुन्हा नव्याने उभारण्याच्या नावाखाली असणारी महामंडळे म्हणजे भ्रष्टाचार्‍यांसाठीचे कुरण झाले आहे.
  2. वाहनांमध्ये अवैधरीत्या केलेल्या बदलांमुळे प्रदूषणाचा मोठा प्रश्न उभा झाला आहे.
  3. आसन क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक प्रवासी भरून वाहतूक केल्याने सुरक्षिततेचा मोठा प्रश्न.
  4. रिक्षा चालक हि जणू नवी जमात बनली आहे. प्रवाशांची पिळवणूक करणे हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क समजू लागले आहेत. संघटना करुन कधी सर्व सामान्य नागरिकांची गैरसोय करणे. राजकारणी आणि पोलिस यांच्याशी संगनमत करुन सर्वसामान्य नागरिकाची लुबाडणूक करणे. मग ती प्रत्यक्ष असो वा अप्रत्यक्ष हे रिक्षा चालकांचे नित्यकर्म झाले आहे.

तीन चाकींच्या या प्रवासाचा पुढचा टप्पा म्हणजे या रिक्षा आता आणखी नव्या तंत्रज्ञानासह म्हणजेच कमीत कमी प्रदूषण, कमी कंपने इत्यादीसह येतील. जवळपास सर्वच कंपन्या या प्रकारच्या तंत्रज्ञानासह आपापली वाहने रस्त्यावर आणायच्या प्रयत्नात आहेत. पण आजवरच्या प्रवासात तीन चाकी रिक्षांनी अनेक रस्ते अस्ताव्यस्तपणे व्यापून, वाहतुकीच्या नियमांना धाब्यावर बसवून रस्त्यांबद्दल, सुरक्षितते बद्दल, वाहतुकीच्या वेगांबद्दल अनेक प्रश्न उभे करून एक सामाजिक समस्या उभी केली आहे हे एक कटू सत्य आहे आणि या समस्येवर आपल्याला तोडगा हवा आहे.




Comments

वा

वा उत्तम रित्या मांडला हा विषय.
शेवटास असलेले चांगले व वाईट हा भाग योग्यच वाटला.
लेख आवडला. (चित्रे दिसली नाहीत!)
'बचराज' हे नाव होते हे वाचून मजा वाटली...

रिक्षा हे भारतातच नाही तर सगळ्या पुर्व आशियाचेच सारवजनिक वाहन आहे. व सगळीकडे वाहतूकीची तीच परिस्थितीही आहे!

जुन्या एफ इ रिक्षा वेगळ्या असत. त्यांत उन्हाळ्यात चांगलेच गरम होत असे. पण याचे पेट्रोल ला एव्हरेज चांगले असे.
शिवाय त्याकाळी रिक्षावाला हा काहीसा आधारच असे... आज सारखी परिस्थिती नव्हती!
असो, काळ बदलणारच.

मात्र 'रिक्षाला दार असणे' कायद्याने आवश्यक केले जावे असे वाटते.
तसेच अनेक (बजाज) रिक्षावाले सायलेंसर ची आवाज कमी करणारी जाळी काढून टाकतात. त्यामुळे अतिशय ध्वनि प्रदुषण होते. शिवाय एव्ह्रेजवरही विपरीत परिणाम होत असावा. या क्षेत्रात कुणीतरी व्यापक जाणिव निर्माण करण्याची आवश्यकता आहे.

बाकी डिझेलवाल्यांची बातच वेगळी आहे. त्यांचा माजोरडेपणा मी काय वर्णावा इथे आहेत किस्से सांगणारे बरेच! पण तुम्ही तुमची कोल्हापुरी हातात घेवून अंगावर धावलात तर बरेच प्रश्न चटकन सुटतात अस अनुभव आहे. शिवाय दोन् तिनदा धरूनठोकले , राडा केला की बाकीचे जातभाईही तुम्हाला ओळखायला लागतात व उत्तम सेवा मिळू लागते. बाकी पोलिस यात काही करत नाहीत हा तर आता वेगळा सांगायचाही मुद्दा उरलेला नाही असे वाटते.
या नंतर अनेक जण आपले मित्र होवून विवीध प्रकारची सेवा सहजतेने मिळू लागते. माझा(?) रिक्षावाला घरी येवून घेवून जातो मला. (मी त्याला नेहमी खुप घासाघीस करतो पण ठरल्यापेक्षा ५ रुपये जास्तच देतो हे ही कारण असावे.)

काही प्रश्न
आता नवीन तंत्रज्ञान काय येते आहे?
शिवाय सुरक्षेच्या सोई काय असणार आहेत?
नविन रिक्षा कश्या असणार आहेत? नवीन रूप असे असणार आहे?
चालकांसाठी काय सुवीधा असायला हव्या आहेत?
सरकारचे काय धोरण आहे या संदर्भात?

रिक्षावाला 'असा च का वागतो/ वागत असावा' याचा विचार कोण करतो आहे?

आपला
गुंडोपंत

नवे तंत्रज्ञान

पंत, प्रथम प्रतिसादा बद्दल धन्यवाद. तुम्ही मांडलेले प्रश्न योग्य आहेत. मी माझ्या परिने उत्तरे द्यायचा प्रयत्न करतो.

नवे तंत्रज्ञान:
खास करुन हवेचे आणि ध्वनी प्रदूषण कमीत कमी करण्याचे प्रयत्न असतात. त्यासाठी मग विद्युतसंचावर चालणार्‍या रिक्षा बनवायचे प्रयत्न आहेत. पण विद्युतसंचाचे वजन, त्यांचे चार्जिंग (मराठी शब्द?), त्याची किंमत, चार्जिंग स्टेशन्स, अन संच निरुपयोगी झाल्यावर त्यांची विल्हेवाट असे अनेक प्रश्न आहेत.

सुरक्षेच्या सोई, सरकारची धोरणे इत्यादी:
हा वाहन प्रकार शक्तिने कमी आणि वेगाने सुद्धा कमी असल्याने कागदोपत्री हि वाहने धोकादायक नाहितच. तसेच सरकारी धोरणांमधल्या पळवाटा शोधुनच हा प्रकार बनवला जातो आहे.
या गाड्यांचा ग्राहक हा आपल्या सारखा प्रवासी नाही तर चालक/मालक ज्यांना कमीत कमी भांडवलात जास्तीत जास्त फायद्याचा धंदा करायचा आहे असे आहेत. आपला आवाज एक ग्राहक म्हणुन खुपच क्षीण आहे. तसेच आपण या वाहनांचा वापर फारच कमी काळ/अंतरासाठी करतो आणि आपण हे वाहन बाळगत देखील नाही. या सगळ्या मुद्यांमुळे सोयीसुविधा हा प्रश्न गौण बनुन जातो.

चित्रे: चित्रे मला दिसत आहेत. इतरांना न दिसण्याचे कारण शोधण्यासाठी उपक्रमपंतांकडे धाव घ्यावी लागेल. जर पिकासाला प्रतिबंध असेल तर चित्रे दिसणे थोडे अवघड आहे असे वाटते.





तिचाकींचा गोषवारा!

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
आवडला. ऑटो रिक्षाला लहानपणी आम्ही 'छोटू' म्हणत असू. आणि त्याचे पहिले दर्शन मला पुण्यातच झालेले होते.
मलाही चित्रे दिसत नाहीयेत.

चित्रे

चित्रे न दिसण्यामागे न्याहळकाच्या काही सुविधांचा प्राथमिक अडथळा दिसतो आहे.





सुंदर लेख

छान लेख लिहला आहेस. मागे आयआयटी, मुंबई मध्ये गेलो होतो तेंव्हा तेथे अंतर्गत वाहतुकीसाठी पांढर्‍या रंगाच्या आकर्षक ऑटो होत्या. माझ्या माहितीनुसार त्या बॅटरीवर चालणार्‍या होत्या. (अजुनही चालू असाव्यात)
जयेश

छान लेख

छान लेख! तुम्ही हा मिसळपाव.कॉमवर पण का टाकत नाही?
-मिसळपाव

ह्म्म

धन्यवाद.
तुम्ही म्हणता तिथे कशासाठी टाकायचा?





हम्म

तुम्ही हाच लेख मनोगतावर टाकलेला पण पाहिला म्हणून् विचारले मिसळपाव वर पण का टाकत नाहीत?

खरी ओळख

तुम्ही तुमची खरी ओळख सांगा मग सविस्तर सांगतो.





खुलासा..

सदर इसमाने मिसळपाव हे नांव धारण केले आहे. आम्ही इथे उपक्रमावर कार्यरत असताना काही काळाकरता आम्हीही मिसळपाव हे नांव धारण केले होते, परंतु आता हे नांव आमच्याकडे नाही.

चाणक्यरावांनी त्यांचे लेख कुठे टाकावेत आणि कुठे नाही, हा पूर्णपणे त्यांचा प्रश्न आहे. सदर मिसळपाव नांवाची व्यक्ति मिसळपाव डॉट कॉम या संस्थळाची एजंट नाही असे आम्ही जाहीर करतो व 'चाणक्यराव त्यांचा लेख मिसळपावर का टाकत नाहीत' या त्यांनी विचारलेल्या प्रश्नाशी मिसळपाव प्रशासनाचा जराही संबंध नाही असेही आम्ही जाहीर करतो!

असो, मिसळपाव डॉट कॉम या संस्थळाचा येथे उल्लेख आला म्हणून मिसळपाव डॉट कॉमचे सर्वेसर्वा या नात्याने आम्हाला हा खुलासा येथे देणे भाग पडत आहे!

वास्तविक, चाणक्यरावांनी त्यांचे लेख कुठे द्यावेत अथवा कुठे देऊ नयेत या विषयी मिसळपाव या व्यक्तिने चाणक्यरावांशी व्य नि तून अथवा खरडवहीतून संपर्क साधायला हवा होता. सदर 'प्रवास तीन चाकींचा' या लेखात मिसळपाव ही व्यक्ति हे विषयांतर करत आहे असे वाटते.

मिसळपाव यांचे मिसळपाव डॉट कॉम संदर्भातील येथील सर्व प्रतिसाद उपक्रम प्रशासनाने उडवून लावावेत अशी विनंती!

कळावे.

आपला,
तात्या अभ्यंकर.
मिसळपाव डॉट कॉम.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

हॅनसीट व इतर

हॅनसीट आता पूर्णपणे बंदच झाली का?
मध्य प्रदेशात नि उत्तर प्रदेशात दिसते अजूनही...

ही पण फ्रंट्व्हील ड्राइव्ह होती. शिवाय पेट्रोल व डिझेल या दोन्ही प्रकारच्या इंधनावर चालणार्‍या (वेगवेगळ्या) असत. डिझेल ईम्जिन चे नाव आता लक्षात नाही पण फेमस होते. (भाऊच्या धक्क्यावरच्या बोटींनाही तेच इंजिन असते.)

मला मिनिडोर व हॅनसिट मध्ये तसा काही फरक वाटत नाही. दोन्ही इ.स. १९५० मधल्याच आहेत!

साध्या बजाजच्या रिक्षाचे इंजिन १७५ सिसि अर्थात पावणेदोन हॉर्सपॉवरचे असते. त्यामुळे क्षमतेवर मर्यादा आहेतच.
वजनामुळे तसेच वळवायला शक्ति लागते. चालवून पहा कधी मिळाली तर इतकेही सोपे नसते. खांदे भरून येतात.

शिवाय ब्रेकच्य चमत्कारिक सेटींग /ठेवणी मुळे पाय दुखुन येतो ते वेगळेच!

कोण तो बिनडोक इंजिनियर डिझायनर होत देवाला माहीत.

आपला
गुंडोपंत

हॅनसीट

माझ्या माहितीप्रमाणे हॅनसीटचे उत्पादन बंद झाले आहे. भारतीय बाजारात ती आता अजिबात विकली जात नाही. कधी कोण्या फिरंग्याने हौसेखातर बनवुन मागितली तर बनवली जाते.
मिनीडोर हि मेटाडोरच्या प्रेरणेतुन बनली आहे असे ऐकुन आहे. मला गंमत वाटते म्हणजे शक्ति कमी असुन देखील त्यांची वजन वाहण्याची क्षमता कौतुकास्पद असते.
पुर्णपणे भारतीयांना डिझाइन केलेली वाहने अलिकडेच बनु लागली आहेत. त्यामुळे सारासार विचार केल्यास असे दिसुन येते की पुर्वीची सगळी डिझाइन्स हि जास्त करुन अभारतीयांनी प्रथम डोके चालवुन आणि मग त्यात भारतीयांनी फेरफार करुन बनलेली आहेत. त्यामुळे बिनडोकपणाची जबाबदारी कोणावर टाकायची हा एक मजेशीर प्रश्न आहे.





विक्रम

आपण रिक्षा किंवा टॅक्सीला मॉडेलच्या नावाने ओळखत नव्हतो. हल्लीहल्ली "आम्ही लग्नाला जाण्यासाठी 'सुमो' किंवा 'क्वालिस" केली होती" असे ऐकू येते. पण या विक्रम टेम्पोजना मध्य प्रदेशात विक्रम किंवा सुवर टेम्पो म्हणतात. त्यांचा पुढील भाग डुकराच्या तोंडाप्रमाणे दिसतो म्हणून. भोपाळ शहरामध्ये ह्या डुक्कर टेम्पोतून एकावेळी दहा-पंधरा हिंदु-मुसलमान स्त्री-पुरुष सुखेनैव प्रवास करतात. ---------वाचक्‍नवी

 
^ वर