मराठी लिखाणाची पध्दत

लिखित मराठीसंबंधी मला काही प्रश्न आहेत, खास करून काही जोडाक्षरे कशी लिहावीत याबद्दलः

मराठी व्याकरणाच्या नियमांनुसार जोडाक्षर लिहिताना ज्या अक्षराचा उच्चार आधी होतो ते अक्षर प्रथम, अर्धे लिहायचे असते. मला काही जोडाक्षरांबद्दल शंका आहेत.

  1. द्वः जसे अद्वैत, अद्वाद्वा. या जोडाक्षरात द् चा उच्चार आधी येतो त्यानंतर हे अक्षर येते, तरी लिहिताना द्व असे लिहिले जाते.
  2. ह्यः जसे सह्याद्री. या जोडाक्षरात य् चा उच्चार आधी येतो त्यानंतर हे अक्षर येते, तरी सुध्दा लिहिताना ह्य असे लिहिले जाते.
  3. ध्दः जसे सुध्दा, बुध्द. या जोडाक्षरात द् चा उच्चार आधी येतो त्यानंतर हे अक्षर येते, तरी सुध्दा लिहिताना ध्द असे लिहिले जाते.

काही उच्चार सारखे वाटून सुध्दा तीच जोडाक्षरे असलेले शब्द वेगळ्या प्रकारे लिहिले जातात.

दृष्टी मधील दृ आणी द्रुतगती मधील द्रु या उच्चारात काय फरक आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

माझ्या मते

द्वः जसे अद्वैत, अद्वातद्वा. या जोडाक्षरात द् चा उच्चार आधी येतो त्यानंतर व हे अक्षर येते, तरी लिहिताना द्व असे लिहिले जाते.
-- हि माझ्यामते लिखाणातील सोय अथवा पद्धत आहे. उच्चार मात्र द् + व् + आ असाच होतो

ह्यः जसे सह्याद्री. या जोडाक्षरात य् चा उच्चार आधी येतो त्यानंतर ह हे अक्षर येते, तरी सुध्दा लिहिताना ह्य असे लिहिले जाते.
--हे उदाहरण चुकीचे वाटले. सह्याद्री मधे ह् चा उच्चार आधी होतो

ध्दः जसे सुध्दा, बुध्द. या जोडाक्षरात द् चा उच्चार आधी येतो त्यानंतर ध हे अक्षर येते, तरी सुध्दा लिहिताना ध्द असे लिहिले जाते.
-- बुद्ध अथवा शुद्ध अथवा सुद्धा यात द् चा उच्चारच आधीहोतो आणि तसेच लिहिले जाते. सुध्दा, बुध्द हे चूक आहे आणि तसे कुठे आढळल्यास चुक समजावी

-ऋषिकेश

बहुतेक सहमत

द्व : जसे अद्वैत, अद्वातद्वा. या जोडाक्षरात द् चा उच्चार आधी येतो त्यानंतर व हे अक्षर येते, तरी लिहिताना द्व असे लिहिले जाते.
यात मला काही चूक दिसत नाही. येथे द् च्या खाली व् आहे. अशाच प्रकारे द्न = द् + न ('द'च्या खाली 'न')
माझ्या संगणकावर :
व् + द = व्द
द् + व = द्व
हे स्पष्टपणे वेगळे दिसतात. वेगळे दिसत नसतील तर फाँट बदलून बघावे.

ह्य : जसे सह्याद्री. या जोडाक्षरात य् चा उच्चार आधी येतो त्यानंतर ह हे अक्षर येते, तरी सुध्दा लिहिताना ह्य असे लिहिले जाते.
--हे उदाहरण चुकीचे वाटले. सह्याद्री मधे ह् चा उच्चार आधी होतो
तुमचे म्हणणे वैकल्पिक बरोबर आहे. मराठी बोलीत आज जुना उच्चार ह्+य आणि एक नवा उच्चार य्+ह दोन्ही दिसतात. जुना उच्चार जेव्हा पूर्णपणे कालबाह्य (?कालबाय्ह? :-)?) होईल तोपर्यंत लेखन ह्य असेच ठेवले तर चालेल.

("ब्रह्म/ब्राह्मण" शब्दांचा उच्चार लक्ष नसते तेव्हा सुशिक्षित लोकही "ब्रम्ह/ब्राम्हण" असा करतात. "सिंह" शब्दाचा आता "सिम्व्ह" हाच उच्चार सार्वत्रिक झाला आहे. तरी लेखन बदलायची काही तातडी नाही, असे मला वाटते. बदलले तरी चालेल, म्हणा. [ह्मणा नव्हे!!!])

ध्द/द्ध
(ऋषिकेश यांच्या म्हणण्याशी पूर्ण सहमत.)

सह्याद्रि

ह्यः जसे सह्याद्री. या जोडाक्षरात य् चा उच्चार आधी येतो त्यानंतर ह हे अक्षर येते, तरी सुध्दा लिहिताना ह्य असे लिहिले जाते.
--हे उदाहरण चुकीचे वाटले. सह्याद्री मधे ह् चा उच्चार आधी होतो

"सह्याद्री" हा जीभेवर व्यायामासाठी घेउन बघितला. पण काय जमल नाही बुवा. कवा 'य' येतो आन कवा 'ह' येतो . दोन्ही बी बरुबर वाटतय.
(आमच्या शेतातल्या टेकडीला 'सह्याद्रीचे पिल्लू म्हणणारा)
प्रकाश घाटपांडे

द्ध वगैरे

द्ध लिहिताना अगोदर द लिहून त्याच्या पोटात अर्धा ध लिहितात, तसे लिहीत नसाल तर ती आपली लिहिण्याची पद्धत चुकीची आहे असे समजावे. त्यामुळे अर्थात द चा उच्चार आधी आणि ध चा नंतर. ध्द हे अक्षर मराठीत नाही आणि हिंदीत, संस्कृतमध्ये किंबहुना कुठल्याही भारतीय भाषेत नसावे. याचा उच्चार द + ह+ द = द + ह्द असा होईल. असा उच्चार करणे भारतीयांच्या जिभेला सहसा जमणारे नाही..
(गुजराथीत शुध्ध असे लिहितात, उच्चार कसा करतात-माहीत नाही!) ह ला फक्त य, र, ल, व, आणि ण, न, म जोडता येतात, त्यामुळे ह ला द जोडता येत नाही. विठ्ठल चा उच्चार आपण विट्‌‌ठल असा करतो त्यामुळे लिखाणही विट्ठल असे करावे असे काही जणांचे म्हणणे आहे. (पहा यास्मिन शेख यांची शुद्धलेखन कोश). तसेच मठ्ठ, पठ्ठा, लख्ख, जथ्था वगैरे.
मराठीत ह ला जोडलेले अक्षर आधी उच्चारायची प्रथा आहे. त्यामुळे संस्कृतमधले ब्राह्मण, ह्रास, कह्लार(पांढरे कमळ), गृह्णाति, जाह्नवी, जिह्वा हे शब्द आपण मराठी अनुक्रमे ब्राम्हण, र्‍हास, कल्हार, गृण्हाति, जान्हवी, जिव्हा असे लिहितो आणि तसेच उच्चारतो. कालबाह्य चे बहुधा असेच कालबाय्ह्य होत असावे. असेच 'वाह्यात' च्या उच्चाराचे होते, त्याचा उच्चार आपण वाय्ह्यात असा करतो. इथे य चा उच्चार दोनदा होतो. संय्यम, सिंव्ह, संव्‍रक्षण किंवा सौंरक्षण, संव्वेग, सौंशय़ हे मूळच्या संस्कृत शब्दांचे मराठी उच्चार आहेत.
दृ चा उच्चार द्रि आणि द्रु यांच्या मधला आहे. हिंदी भाषक तो द्रि च्या जवळपासचा करतात तर आपण द्रु च्या जवळपासचा करतो. ऋ चा खरा उच्चार करणे फारसे अवघड नाही. --वाचक्‍नवी

गुजराथीत

गुजराथीत शुध्ध असे लिहितात, उच्चार कसा करतात-माहीत नाही

ध्धचा उच्चार माहित नाही पण 'शु'चा गुजराथी उच्चार माहित आहे तेव्हा सुध्ध/ सुद्/ सुद्द/ सुद्ध/ सुध्द असं म्हणत असावेत.

समस्त गुजराथी बांधवांची माफी मागतो पण शॅलो हॅल या चित्रपटाचा उच्चार ते सेलो हेल असा करतात हो.

श-स-ह

अनेक गुजराथी लोक श चा उच्चार विकल्पाने स, आणि स चा विकल्पाने ह करतात. सासू हा शब्द चार वाक्यात पाठोपाठ आला तर आपल्याला तो सासू, साहू, हासू आणि हाहू असा ऐकायला मिळू शकतो असा माझा सौराष्ट्रातला अनुभव आहे. ही त्यांची बोलीभाषा आहे; लिहिताना ते अचूक लिहितात(मराठीसारखे नाही!)--वाचक्‍नवी

स आणि श

आमच्या गुज्जु साहेबांना सुहास आणि शिरीष हा उच्चार कधीच जमला नाही, ते सुहाश आणि सिरीस असे करायचे.

क्षितीज हा उच्चार ते नेहमीच टाळायचे.

श, ष, स, च, छ आणि भारतीय बोलभाषा...

गुजराथी-बंगाली शषस चे काय करतात ते वर आलेच आहे. आता आसामी पहा. ते श, ष, स ही तिन्ही अक्षरे चक्क घशातून काढलेल्या नुक्ताधारी ख़ सारखी उच्चारतात. उडिया त्यांचा उच्चार बंगाल्यांप्रमाणे 'श' न करतां 'स' करतात. आसामीभाषक च, छ चा उच्चार निरपवादपणे स करतात(चमचा नव्हे, तर समसा), तर उडिया 'छ' चा सरसकट 'स' आणि, 'च' चा कधीकधी 'स' करतात.
या सर्व पूर्वेकडील बोलीभाषा 'य' आणि'ज'ची सतत सरमिसळ करतात.
बंगाली अंकलिपीत ब हे अक्षर एकदा प-वर्गात येते तर एकदा यरल नंतर येते. दोन्ही अक्षरे सारखीच दिसतात आणि दोघांचा उच्चार 'ब'.
आसामी व, ब वेगळे लिहितात, पण एकसारखेच उच्चारतात.
मराठी ळ, च़ आणि झ़ चा उच्चार हिन्दी भाषकांना जमत नाही. किशोरकुमारला गाण्यासाठी एक मराठी गीत ळ-च़-झ़ बदलून द्यावे लागले होते.
तमिऴ, मल्याळम् मधला ऴ(=ळ्ह) इतर भाषकांना जमत नाही, तर कन्‍नड -तेलुगू मधल्या दीर्घ एकार- ओकारांसाठी उत्तरी भाषांच्या लिपींत स्वरचिन्हे नाहीत.
हिंदीत क़, ख़, ग़, ज़, ड़, ढ़, फ़ ही नुक्ताधारी अक्षरे तर बंगालीत तशीच ड़(डोईशून्य ड), ढ़ आणि ऱ ही जास्तीची अक्षरे. अर्धनासिक उच्चारासाठी हिंदीप्रमाणे बंगालीतही अक्षरावर चन्द्रबिन्दू काढतात. ऍ आणि ऑ हे स्वर मराठीप्रमाणे मल्याळम मध्ये पण आहेत. अगदी अक्षरावर चंद्र काढून!
पंजाब्यांना 'इ'लावल्याखेरीज स्त आणि स्ट बोलता येत नाही तर बहुतेक उत्तरी आणि दक्षिणी भारतीयांना आ जोडल्याखेरीज मुळाक्षरे उच्चारता येत नाहीत. बंगाल्यांना शब्दात येणार्‍या पहिल्या किंवा दुसर्‍या अकाराला ओकार करावे लागते, पण एका शब्दात फक्त एकदाच!
अतिपूर्वेकडील प्रांतांत ङ हे अक्षर शब्दाच्या आरंभी येऊ शकते, शब्दाच्या शेवटी तर असतेच असते.
अशा अनेक गमतीजमती.--वाचक्‍नवी

व्वा !!

व्वा. आपला सोदाहरण प्रतिसाद खूपच माहितीपूर्ण आणि रोचक!

आणखी पंजाबी गंमत

> पंजाब्यांना 'इ'लावल्याखेरीज स्त आणि स्ट बोलता येत नाही
यात किंचित सुधारणा हवी. एकंदरीत उत्तर भारतीयांना 'स्'ने सुरू होणारी जोडाक्षरे 'आधाराशिवाय' नीट म्हणता येत नाहीत. मात्र या 'आधारा'चे प्रकार वेगवेगळे आहेत.

यात आणखी एक गंमत/सुधारणा. पंजाबीत अंगच्या उच्चारनियमांनी 'स्'ने शब्द सुरू होऊ शकतात, ते पंजाबी लोकांना अर्थातच जमतात.

पंजाबी बोलण्यात काही विशिष्ट परिस्थितीत "स"ने सुरू होणार्‍या शब्दांचा प्रथम 'अ' लोप पावतो. उदा :
सरदारजी = (बोलण्यात) स्दार्-जी

त्यामुळे इंग्रजी sport, support, हे शब्द बोलताना पंजाबी लोकांची गंमत होते.
वर टग्या यांनी सांगितलेल्या कारणाने sportचा उच्चार सपोऽर्ट् असा करतात.
पण अंगच्या उच्चार नियमानुसार supportचा उच्चार स्पोर्ट् असा करतात.

पण मराठीतही इंग्रजी, संस्कृत, अन्यभाषक उच्चारांची खांडोळी केली जात असल्यामुळे पंजाब्यांसह आपण सहानुभूतीने हसावे, त्यांची टिंगल करण्याचा वेडगळपणा करू नये.
(मराठी माणसाने vane, wane शब्दांचा उच्चार व्हेन, वेन असा केला, तर ज्यांना योग्य उच्चार कळतो, त्यांना अशीच गंमत वाटते. माझे अनेक [मराठीभाषक] नातेवाईक pen, pain, pane शब्दांचा उच्चार एकसारखा "पेन" असा करतात, वगैरे वगैरे. संस्कृतातले ज्ञ, ञ मराठीभाषकांना सहसा उच्चारता येत नाहीत, द्न्य आणि यँ असा उच्चार केला जातो. हिंदीतल्या ऐ चा उच्चार मराठीभाषकांचा बहुतेक वेळा चुकतो. थोडेच मराठी लोक है=हइ असा अतिरेकी उच्चार करतात, पण बहुतेक मराठी लोक हिंदीतही "फैलाव"चा उच्चार "फइलाव" असा चुकीचाच करतात.)

एक शंका : मूळ हिंदी/संस्कृत तत्सम शब्द चुकीचे बोललेले माझ्या आठवणीत नाहीत.
उदा : "स्वतंत्रता"ऐवजी कोणी "इस्वतंत्रता" म्हटल्याचे आठवत नाही. "स्याही" ऐवजी "इस्याही" ऐकलेले नाही.
कपड्यांची "इस्त्री" आणि कळे-नकळे (इ) असलेली बाई="(इ)स्त्री" वेगळी उच्चारली जाते, हे कोणीही हिंदी शिकलेला/बोलणारा/ऐकणारा ओळखू शकतो.

त्यामुळे खरे संधिनियम वर वाचक्नवी/टग्या/मी सांगितलेल्यापेक्षा पुष्कळ गुंतागुंतीचे असावेत.

बोली

त्यामुळे खरे संधिनियम वर वाचक्नवी/टग्या/मी सांगितलेल्यापेक्षा पुष्कळ गुंतागुंतीचे असावेत
मला असे नियम असण्याबद्दलच शंका आहेत. हे शब्द लिहिले बरोबर जातात फक्त बोलताना फरक होतो. उद्या मालवणी कसे बोलावे हे नियमांत सांगणे कठीण आहे. ती भाषा त्यातील शब्द, व्याकरण हे नियमांत बसवता येईल पण तो हेल कधीद्यावा हे नाहि सांगता येणार. कोसांवर बदलणर्‍या बोली या नियमांपेक्षा अनूकरणावर ठरतात असे वाटते :)
-ऋषिकेश

किंचित असहमत

थोड्या प्रयत्नांनी मालवणीचेही व्याकरण लिहिणे शक्य आहे. हेल कधी द्यावा हा (बहुतेक) व्याकरणाचा भाग नसावाच. प्रमाणित मराठीलाही एक हेल आहे. खासकरून सराव नसताना जर एखाद्या मराठी भाषकाने हिंदी/गुजराती/इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न केला तर तो जाणवतोच. (अगदीच ढोबळ उदाहरण म्हणजे दॅट चे द्याऽट)

त्यामुळे अशा उच्चारांविषयी नियम (किंवा किमानपक्षी रूढ वा लोकमान्य पद्धत) अस्तित्वात असतील; फक्त मागे एकदा एका प्रतिक्रियेत धनंजयांनी म्हटल्याप्रमाणे, त्या त्या भाषकांना त्या नियमांची बोलताना आवश्यकताच भासत नसल्याने व/वा नियमांतील गुंतागुंती आणि अपवाद यामुळे नियम नाहीत असे वाटत असावे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
(http://marathisahitya.blogspot.com)

अ चा लोप

पंजाबी बोलण्यात काही विशिष्ट परिस्थितीत "स"ने सुरू होणार्‍या शब्दांचा प्रथम 'अ' लोप पावतो. उदा :
सरदारजी = (बोलण्यात) स्दार्-जी

अ चा लोप करण्यासाठी 'स'ची आवश्यकता नाही. सरदारजी, "अकेले अकेले केले क्यों खा रहे हो" हे वाक्य 'केले केले केले क्यों खा रहे हो?' असे म्हणतात. 'इकठ्ठे' ला 'कठ्ठे' म्हणणे, सामान ला स्माऽन. सॅलडला स्लाऽड, मालाडला म्‍लाऽड इ.इ. --वाचक्‍नवी

गीत

एक कुतूहल: कोणते हो हे गीत?
- अश्विनी, ये ना. चित्रपट - गंमत जंमत (सचिनच्या दूरदर्शनवरील मुलाखतीत त्याने हे सांगितल्याचे आठवते.)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
(http://marathisahitya.blogspot.com)

च़-छ़-झ़-ऴ गाळलेले गीत

हे गाणे सुदेश भोसलेने एकदा दूरदर्शनवर म्हटले होते, तेव्हा त्याने हा किस्सा सांगितला होता. किशोरकुमारने मुळातले गाणे म्हणायला साफ नकार दिला होता. मला किस्सा आठवत होता, गाणे मात्र नव्हते. श्री. नंदन यांना बरे माहीत होते! --वाचक्‍नवी

बंगाली य/ज

'ऱ'बद्दल साशंक आहे. बंगालीत असे अक्षर पाहण्यात नाही
अगदी बरोबर. बंगाली र् ला मुळातच नुक्ता असल्याने आणखी नुक्ता देण्याची गरज नाही. नुक्ता आहे तो य् ला, किंवा श्री. टग्या लिहितात त्याप्रमाणे 'ज' उच्चार असलेल्या 'य'ला. (माझ्या प्रतिसादात य ऐवजी चुकून र लिहिला गेला होता.)
पण मराठीतही इंग्रजी, संस्कृत, अन्यभाषक उच्चारांची खांडोळी केली जात असल्यामुळे पंजाब्यांसह आपण सहानुभूतीने हसावे, त्यांची टिंगल करण्याचा वेडगळपणा करू नये.
सहमत. फादर चा उच्चार चादरसारखा करणे हे अस्सल मराठीकरांचे लक्षण. पण तुलनात्मक दृष्टीने पाहिले तर मराठीभाषकांनी संस्कृत उच्चार बर्‍यापैकी टिकून ठेवले आहेत. उदाहरणार्थ निदान ष चा. अर्थात संस्कृत उच्चार मुळात काय होते कुणास ठाऊक? अ+अ= आ.
किंवा आ हे अ चे दीर्घ रूप. कसे शक्य आहे? कदाचित अ चा मूळ संस्कृत उच्चार उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील भारतीय सध्या करतात तसा अ आंणि आ च्या मधला असावा.
आणखी एक गंमत. मराठी हंस(हौंस) हिंदीत हंस(हन्स) होतो. 'डान्स' चे लिखाण डांस होते. सन्मानचे सम्मान. संहार(सौंहार)चा उच्चार हिंदीभाषक सङ्‌हार असा अचूक करतात. ब्राह्मणचा 'ब्राम्हण' करीत नाहीत. त्यामुळे ती ती बोली शिकताना हे उच्चारातले फरक जाणून घेऊन अगदी तस्से उच्चारण केले तरच आपण ती भाषा बर्‍यापैकी बोलू शकतो असा दावा करावा.--वाचक्‍नवी

वा!

मस्तच वाटले वरचे सगळे वाचून!
खुप दिवसांनी काहीतरी वेगळे नि माहीतीपूर्ण!

आपला
गुंडोपंत

खछठथफ आणि घझढधभ.

या व्यंजनांचा उच्चार करताना 'ह' हा उच्चार ऐकू येतो. म्हणजे ख=क्‍ह वगैरे. त्यामुळे हे वर्ण म्हणजे जोडाक्षरे आहेत असे काही व्याकरणकार मानतात. इंग्रजीतही यांचे स्पेलिंग के‍एच्‌ असे 'एच्‌' वापरून केले जाते. मग संस्कृतमध्ये यांना जोडाक्षरे न म्हणतां मूलवर्ण का म्हटले असावे? कारण असे:- संस्कृत जोडाक्षर उच्चारताना त्यातल्या पहिल्या वर्णावर आघात होतो. उदा. काव्य-उच्चार काव्व्य. विक्रम=विक्‍क‌-रम‌ वगैरे. परंतु खछठथफ किंवा घझढधभ हे वर्ण उच्चारताना असे काहीच होत नाही. पहा-प्रखर, 'क'वर जोर येत नाही. म्हणून संस्कृतमध्ये या व्यंजनाना मूलवर्ण मानले आहे.
शिवाय क्‌+ह=ख नाही तर ग्घ(वाक्‌+हरि=वाग्घरि). सत्‌+हेतु=सथेतु नाही तर सद्धेतु.(त्‌+ह=द्ध).
आता आणखी गंमत अशी आहे की, खछठथफ मधला 'ह'चा उच्चार घझढधभ मधल्या 'ह'पेक्षा वेगळा आहे. पहिल्यांतला 'ह' अघोष' तर दुसर्‍यांतला सघोष 'ह'. तोंडासमोर तळहाताचा पंजा धरून उच्चार करून पाहिले तर समजेल की अघोष 'ह'च्या उच्चारणातून सघोषपेक्षा कमी हवा सोडली जाते.
त्यामुळेच लख्ख, मठ्ठ, जथ्था, लफ्फा हे उच्चार करता येतात, परंतु बघ्घा, मझ्झा, शुध्ध हे उचार करायचा प्रयत्‍न केलाच तर बग्घा, मज्झा, शुद्ध असे ऐकू येते. म्हणून 'शुध्द' लिहिणे अशुद्ध!--वाचक्‍नवी

 
^ वर