किराणा भुसार अमेरिकन ष्टाईल!!

अमेरिकेत आल्यावर इथल्या सोयी सुविधा अंगवळणी पडून त्याचं अप्रूप वाटेनासं झालं की इथल्या असुविधांचा त्रास मात्र चांगलाच सुरू होतो. त्यातलाच एक छळ म्हणजे 'ग्रोसरी शॉपिंग' अर्थातच किराणा भुसार. मस्त पैकी यादी बनवावी आणि दुचाकी वरून उतरण्याचे कष्ट देखिल न घेता फक्त हॉर्न वाजवून कोपऱ्या वरच्या वाण्याकडे सुपूर्त करावी बस्स.. सगळा माल आपसूक घरी पोहोचता केला जातो. इतक्या साध्या सोप्या गोष्टींमध्ये सुद्धा किती 'सुख' आहे ह्याची जाणीव इकडं स्थिर स्थावर झाल्यावरच होते.. बरीचशी कामं स्वतःची स्वतःच करायची असल्यानं ग्रोसरि करणे वगैरे भानगडी कायमस्वरुपी लांबणीवर टाकलेल्या असतात..फ्रीज मधील फळे ज्यूस इतकंच काय भाजी पाला, देखील संपायला आला तरी ग्रोसरी हा प्रकार लांबणीवरच असतो.. 'वरण भात' नावाची सुटसुटीत सोय उपलब्ध असल्यानं त्यावर बराच काळ टिकाव धरला जातो.. शेवटी मात्र दूध आणि दुग्धजन्य पदार्थ डाळ तांदूळ हे देखिल संपायला लागले की 'एकदा ग्रोसरी करून टाकलीच पाहिजे' असा विचार घोळू लागतो. अर्थातच त्यासाठी नुसती यादी करून इथं अजिबात भागत नाही..ती तर फक्त सुरुवात असते..एकदा का यादी केली की १०-१५ मैल गाडी हाकत जवळच्या(!) 'वॉलमार्ट' नावाच्या राक्षसी दुकानात जावे लागते. ह्या वॉलमार्टात, अंडरवेयर बनियन पासून ते वाहनाचे सुटेभाग, टायर तसंच शोभेची झाडे आणि कुंड्यांपर्यंत सगळे एकाच छताखाली मांडून ठेवलेले असते. ह्या सगळ्यामध्ये एका हातात यादी धरून दुसऱ्या हाताने ढकल गाडी ढकलत एक एक वस्तू शोधत सुटायचं.. यादीतल्या बऱ्याच वस्तूंनी (आणि यादीत नसलेल्या पण ऐनवेळी उचलाव्याश्या वाटलेल्या वस्तुंनी) गाडी भरत येईपर्यंत पायाचे चांगलेच तुकडे पडायला आलेले असतात. मग उरल्या सुरल्या वस्तूंना काट मारून, 'झालं झालं बरेचसं सामान मिळालंय. बाकीचं काय इतकं महत्त्वाचं नाही !!'अशी पायांची समजूत काढत चेक आऊट काउंटर च्या रांगेत पैसे भरायला उभं राहायचं.."अजून आपला नंबर का लागत नाही? समोरच्या जाड्यानं हे किती हे सामान घेतलं आहे? इतकी ठासून खरेदी करण्याआधी आपल्या वजनाचा तरी विचार करायचा .. ही चेकआऊट काउंटर वरची बाई किती मंद आहे...कंटाळा आला बुवा आता घरी जाऊन मस्तपैकी चहा घ्यायला पाहिजे" असे विचार मनात चाललेले असताना अचानक आठवतं, अरेच्या चहा करायला घरात दूध कुठं आहे? आणि आपल्या उरलेल्या यादीतल्या सोयोस्कररित्या विसरलेल्या वस्तूंमधील एक म्हणजे 'दूध' ह्याचा साक्षात्कार होतो.. झालं पुन्हा पळत दुधाच्या शोधात. ह्या दुधाच्या बाटल्या कोणत्याही दुकानात बरोबर विरुद्ध बाजूच्या कोपऱ्यात मागच्या भिंतीला लागून असतात.. सगळं दुकान पायाखालून घालत ह्या दुसऱ्याबाजूला पोहोचायचं.. वाटेत आजूबाजूला अजिबात बघायचं नाही.. न जाणो अजून काहीतरी आठवलं तर? शेवटी दुधाच्या विभागा पर्यंत पोहोचलं की तिथही पन्नास प्रकारची दुधं मांडून ठेवलेली असतात.. २% स्निधांश, १% स्निग्धांश, ०% स्निग्धांश असे नाना प्रकार त्यातला कुठलातरी एक उचलून पुन्हा भर भर दुसऱ्या टोकाकडे चेक आऊट करायला धावपळ..

..इतकं सगळं करून काम संपलं नाही.. वॉलमार्ट मध्ये असंख्य वस्तू मांडून ठेवलेल्या असल्या तरी, तुरीची मुगाची अश्या डाळी, गरम मसाला, पापड लोणची असे पदार्थ अर्थातच नसतात त्यासाठी पुन्हा 'इंडियन ग्रोसरी स्टोअर' नावाच्या प्रकाराकडं धाव घ्यावी लागते.. इंडियन ग्रोसरी स्टोअर ही एक वेगळीच दुनिया असते. बाकीच्या दुकानात उगीचच कृत्रिम हसून 'हाव या डुइंग? असं विचारणारे कर्मचारी इथं दिसणार नाहीत. इथं असतो तो अस्सल पुणेरी प्रकार .."ये लोणचेकी बाटली पे एक्सपायरी डेट २००४ की है"..असं त्याच्या नजरेस आणून दिल्यावर तोंडावरची माशी देखिल हालणार नाही अश्या चेहऱ्याने 'ये तो एकदम फ्रेस स्टाक है. इसके पहिले २००२ की भी बेची है.. कुछ नही होता है बिनधास्त ले जाव!' असे उत्तर. अर्थातच बाकीच्या दुकानात आपणही उगीचच हसून वगैरे बोलतो पण इथं मात्र तो ताप नाही..ह्यामध्ये हमखास गंडतो भरतातून नवीनंच आणि त्यामुळं उत्साह ओसंडून वाहणारा एखादा सॉफ्टवेअर वाला.. टी-शर्ट- हाफ चड्डी असा वेष आणि गुडघ्यापर्यंत ओढलेले मोजे बघितले की लगेच कळतं स्वारी नुकतीच मायदेशातून आलेली आहे! तो इथंही उगीचच सगळ्यांना बघून हाय हॅलो वगैरे करून हसत असतो आणि ऍक्सेंटची प्रॅक्टिस करत 'फ्रोजन चपातिज्' शोधत असतो .. असो.. तर हे इंडियन स्टोअर म्हणजे, डाळी, तांदूळ, पापड लोणची, झालंच तर फरसाण, साबुदाणा, अनेक मसाले असल्या भारतीय वस्तूंनी गच्च भरलेलं असतं इथं तुम्हाला मसाला पान, गुटखा, चारमिनार असल्या गोष्टींची सोय देखिल आढळेल.. अश्याच एका दुकानात एकदा मला 'लाइफबॉय' साबण बघून गहिवरून आलं होतं.. १०,००० हजार मैलांवरती 'लाइफबॉय' साबण मिस करणारा कोणी असामी दिसतो का? ह्याची मी बराच वेळ वाट पाहत होतो. हा माणूस हातात बादली घेऊन आणि खांद्यावर टॉवेल टाकून बाथटब मध्ये अंघोळीला जात असेल असे माझ्या मनात मी चित्रही रंगवले होते...

..इथली खरेदी झाली की ग्रोसरी हा प्रकार माझ्यासाठीतरी संपतो परंतु हे 'किराणा-पुराण' सॅम्स क्लब च्या उल्लेखा शिवाय संपू शकत नाही.सॅम्स क्लब हा वॉलमार्टचाच भाऊ असून बऱ्याचदा वॉलमार्टलाच लागूनच उभा असतो. इथं आत शिरण्यासाठी देखिल त्यांची वार्षिक वर्गणी भरून सभासद बनावं लागतं. सॅम्स क्लब म्हणजे इथला घाऊक बाजार. प्रत्येक गोष्ट घाऊक प्रमाणावर खरेदी करा आणि पैसे वाचवा हा इथला मंत्र. स्वस्त पडतात म्हणून साबणाच्या एकाच वेळीस १२ वड्या खरेदी करून नंतर वर्षभर एकच सुवास! काही महिन्यांनी तर हा वास येईनासाच होतो. इथं येण्याचा आणखी एक त्रास म्हणजे तुम्ही 'सॅम्स क्लब' ला जाणार आहात ही बातमी सगळ्यांना माहीत असते आणि त्यातूनच 'अरे सॅम्स क्लब जा रहा है क्या? मेरे लीये जरा दूध लेके आना यार' असे फोन येतात..त्यावर आपण हो म्हणून टाकताना 'जरा दूध' मध्ये सांगणाऱ्याला ७ गॅलन दूध अपेक्षीत आहे ह्याची आपल्याला सुतरामही कल्पना नसते. 'अरे इतना दूध लेके काय करेगा?' असे विचारले तर 'वहा एक गॅलन २० सेंट से सस्ता आता है' हे उत्तर निमुट ऐकावं लागतं. ह्या प्रकारामुळे 'सॅम्स क्लब' ह्या भानगडीत न पडलेलेच बरं अश्या मताचा मी बनलो आहे.

तर शेवटी अख्खा दिवस खर्च करून हुश्श करून घरी आलं की गाडीतून हा सगळा बाजार काढून घरी नेऊन फ्रीज मध्ये ठेवायला जीवावर येतं ..इतकं करूनही 'कोथिंबीर' राहूनच गेली अश्या गोष्टी मनात येत असतातच..आणि भातात एखादा खडा लागला तरी चालेल पण सामान कोपऱ्यावच्या वाण्याकडून येण्यात काय सुख आहे हे मात्र सतत जाणवत असतं.

-वरूण

हा लेख उपक्रमाच्या धोरणानुसार त्यांच्या उद्दिष्टांमध्ये बसत नसल्याने ह्यावर व्यवस्थापनाचा बाल्यावस्थेतील नांगर फिरल्यास वाचण्यासाठी इथं देखिल उपलब्ध आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

लेख आवडला

हाय वरुण, तुझा लेख आवडला. छान लिहलस. असेच लिहीत रहा. आम्ही असेच वाचत राहु. गणेश

खास

वरूण,
असाच अनुभव ईंग्लंडच्या ऍस्डा, सेन्सबरी, सॉमरफिल्ड अशा दुकानामध्ये येतो. सॉमरफिल्डला चेक आऊट लवकर होतं.... बाकी ठिकाणी कुठे काउंटर रिकामं होतय का याची वाट पहा, कोणत्या काउंटरवर सामान कमी आहे का ते पहा आणि अगदीच वेळ वाचवण्याची गरज पडली की वर्किंग डे ला जाऊन या अशी कसरत् करायची!!! पण झकास मजा येते.

पल्लवी

प्रतिसाद

बरे झाले सान्गितलेत ते.आता अमेरिकेत जाणारच नाहि मी शॉपिन्गसाठी(कधी अमेरिकेते गेलो तर!!!)

मस्त !

वाचून मजा आली.
कमी-अधीक फरकाने माझी खरेदी सुद्धा अशीच असते. फक्त कार नसून सायकल/बस ने असते :)सध्या दुपारच्या वेळेला जावून खरेदी करण्याचा एक प्रयोग करुन पाहत आहे. वेळ वाचतो असे वाटते.

आमच्या येथे एक बर्‍यापैकी (म्हणजे त्यातल्या त्यात हो !) 'एशियन शॉप' आहे. इकडील देशात 'एशियन शॉप' असे संबोधतात :) त्यात ओरिएंटल देश, ब्राझील, इत्यादी ठिकाणचे धान्य आणि इतर खाद्यपदार्थ, वस्तू असतात.

लेख छान आहे.
--लिखाळ.

 
^ वर