निधन

आजच्या दोन निधनाच्या बातम्या:

ज्येष्ठ विचारवंत य. दि. फडके यांचे आज सायंकाळी त्यांच्या दादर येथे निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते.
य. दि. फडके हे साहित्यिक , साक्षेपी संशोधक आणि राजकीय इतिहासकार म्हणून प्रसिद्ध होते. २००० साली झालेल्या बेळगाव साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तसेच एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा इतिहास लिहून त्यांनी मराठी माणसाला समृद्ध केले आहे.
३ जानेवारी १९३१ साली त्यांचा जन्म झाला. महाराष्ट्राच्या इतिहासावर त्यांनी मांडलेले संशोधन तसंच राजकीय विचारांवर त्यांनी केलेले भाष्य खूप महत्त्वाचे आहे. त्यांची सत्तरहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसंच र. धों. कर्वे , गोपाळ गणेश आगरकर , सेनापती बापट अशा दिग्गजांची खरी ओळख त्यांनी चरित्र लिहून करून दिली. डॉ. आंबेडकरांवर अरुण शौरी यांनी लिहिलेल्या टीकेला तसेच खणखणीत उत्तर त्यांनी दिले होते.

********************

जगातील सर्वात उत्तुंग माऊंट एवरेस्टच्या शिखरावर पहिले मानवी पाऊल ठेवणारे सर एडमंड हिलरी यांचे आज निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. १९५३ साली हिलरी यांनी शेर्पा तेनसिंग नोर्गे यांच्यासह माऊंट एवरेस्ट सर करण्याचा विक्रम केला होता.

सर हिलरी यांचे निधन झाल्याची माहिती न्यूझीलंडच्या पंतप्रधान हेलन क्लार्क यांनी दिली. त्यांच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून आजारामुळे ते अंथरुणाला खिळले होते. त्यांना न्यूमोनियाचा आजार होता, असे स्थानिक मिडीयाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. हिलरी यांच्या निधनानंतर न्यूझीलंडमध्ये राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला आहे.

लिजेंडरी गिर्यारोहक, साहसवीर असलेले सर एडमंड हिलरी हे न्यूझीलंडचे सर्वोत्तम नागरिक होते. जनमानसात हिरो अशी त्यांची प्रतिमा होती. त्यांनी केवळ एवरेस्टचे शिखर पादाक्रांत केले नाही, तर संपूर्ण आयुष्यच एका ध्येयाने ते जगले, अशा शब्दांत पंतप्रधान क्लार्क यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

न्यूझीलंडचे सुपुत्र असलेले सर हिलरी यांचे छायाचित्र देशाच्या पाच डॉलरच्या नोटेवरही झळकले आहे. एवरेस्ट मोहिमेनंतर त्यांनी दक्षिण ध्रुव आणि हिमालयाच्या पर्वतराजींमध्ये अनेक मोहीमा केल्या. विशेषतः हिमालयाच्या सावलीत राहणा-या नेपाळच्या शेर्पा जमातीच्या कल्याणासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. त्यांचा हिमालय ट्रस्ट दरवर्षी जवळपास अडीच लाख अमेरिकन डॉलर्सचा निधी गोळा करतो. अनेक शाळा, हॉस्पिटल्स्, पूल, जलवाहिन्या आणि अगदी हवाई धावपट्टी उभारण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता

***********

या दोघांना सर्वांतर्फे विनयपूर्वक श्रद्धांजली. या प्रसंगी य.दि. फडके यांचे योगदान व एडमंड हिलरी यांच्या मोहिमांचा परामर्श उपक्रमी घेतील ही अपेक्षा.

Comments

माझीही आदरांजली

-फडक्यांबद्दल ऐकून दु:ख झाले. व्यक्तिगत हानी झाल्यासारखी वाटली. सत्य आणि केवळ सत्याचाच पाठपुरावा केलेला, मोठा माणूस. त्यांची अनेक पुस्तके वाचली आहेत. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक , सामाजिक जडणघडणीबद्दल जी काय किंचित् समज आली त्यात फडक्यांचा वाटा महत्त्वाचा आहे. "शोध बाळगोपाळांचा" हे त्यांचे वाचलेले पहिले पुस्तक मला अजूनही लख्ख आठवते. इतिहासकारांच्या मोठ्या परंपरेतला एक महत्त्वाचा दुवा आज निखळला.

-हिलरी यांचे निधन एक बातमी म्हणून मनात नोंदले गेले. नील आर्मस्ट्रॉंग, एडमंड हिलरी या सगळ्यांबद्दल आदर (ज्याला इंग्रजीमधे "ऑ" असा सुन्दर शब्द आहे. ) वाटतो. त्यांचे कर्तृत्व पाहून छाती दडपते. माणसाला माणूसपणाचा अभिमान वाटायला लावणार्‍या या व्यक्ती. हिलरी याना माझी श्रद्धांजली.

दोन मोठ्या व्यक्तींच्या जाण्याने नोंदल्या गेलेल्या स्वतःच्याच दोन वेगवेगळ्या स्वरूपाच्या प्रतिक्रिया पाहताना स्वतःबद्द्लही थोडेसे नवीन ज्ञान झाले...

य.दिं. विषयी

य.दींचे लेख वाचले आहेत पण त्यांची पुस्तके वाचलेली नाहीत. पण अशा व्यक्तींचे निधन म्हणजे एखादी चालतीबोलती संस्था संपावी अशातला भाग असतो. म्हणून नक्की वाईट वाटते. आत्ताच्या घडीस भारतीय/मराठी इतिहासात तज्ञ असलेला/ली पुढे कोण आहे कोण जाणे.

वर्तमानाचा थोर इतिहासकार!
12 Jan 2008, 0258 hrs IST

SMS NEWS to 58888 for latest updates
- सारंग दर्शने

महाराष्ट्रात जन्माला आलेल्या वि. का. राजवाडे, त्र्यं. शं. शेजवलकर, न. र. फाटक यांच्यासारख्या उत्तुंग, निष्पक्ष इतिहासकारांच्या पंगतीत ज्यांचे आसन सन्मानाने मांडावे, असे डॉ. यशवंत दिनकर फडके होते. य. दि. फडके यांनी महाराष्ट्राच्या इतिहासाला केवळ शिवकाल व पेशवाईत अडकवून न ठेवता त्याला एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात आणले. इतिहास म्हणजे बुजून गेलेल्या काळाचे उत्खनन असते तो आपल्या सोबत धावणा-या काळाचा अभ्यासपट असतो, वर्तमानाचेही विशेषण असतो याची जाणीव फडके यांनी आपल्या प्रदीर्घ व्यासंग, लेखनाने रुजवली, फुलवली. त्यामुळेच त्यांना गुरुस्थानी मानणा-या आधुनिक इतिहासाच्या अभ्यासकांची फळीच महाराष्ट्रात निर्माण झाली.

सोलापुरात ३ जानेवारी १९३१ रोजी जन्मलेल्या यदिंचे वडील कट्टर सावरकरवादी होते. ते स्वातंत्र्यचळवळीत होते. पुढे महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेले आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक डॉ. भालचंद्र फडके हे यदिंचे मोठे बंधू. घरात असे संस्कार मिळालेल्या यदिंनी सोलापुरातल्या हरिभाई देवकरण शाळेत शिकत असतानाच लेखनाला सुरुवात केली. त्या वयातच त्यांचे ललित लेखन प्रकाशितही झाले. या लेखनातून मिळणारे पैसे त्यांना हवेसे वाटत कारण त्यातून मग सिनेमे पाहता येत. दर्जेदार चित्रपट, अभिजात संगीत आणि क्रिकेट यांची आवड यदिंनी आजन्म जोपासली. त्यामुळेच महात्मा फुले यांची सत्यशोधक चळवळ, गाजलेले हॉलिवूडपट, किशोरी आमोणकरांचे गाणे आणि सचिन तेंडुलकरची बॅटिंग अशा विस्तृत रेंजच्या विषयांवर यदि अभ्यासपूर्ण व तितकेच रसरशीत बोलत.

राज्यशास्त्रात बीए व एमए केल्यानंतर यदिंनी अध्यापन सुरू केले. मुंबई विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, मुंबईची प्रतिष्ठित टाटा समाजविज्ञान संस्था (टीआयएसएस) अशा संस्थांमध्ये शिकवतानाच संशोधन व लेखन चालूच होते. त्यांच्या डॉक्टरेटचा विषयच 'संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि काँग्रेस पक्ष' असा होता. पीएच.डी.चा अभ्यास करताना यदि चिंतामणराव देशमुखांपासून सेनापती बापटांपर्यंत आणि प्रबोधनकार ठाकरेंपासून एसेम जोशींपर्यंत शेकडो नेते, कार्यर्कत्यांना भेटले. या सर्वांच्या भेटींच्या आठवणी व या नेत्यांचे प्रतिपादन या सा-यांचा अमूल्य साठा यदिंकडे होता. प्रबंध लिहिताना त्यांनी याचा उपयोग केलाच पण इतरत्रही त्याविषयी विपुल लिहिले. त्यांच्या या प्रबंधावर आधारित असा 'विसाव्या शतकातील महाराष्ट्र' या गंथमालेतला खंड काही महिन्यांपूर्वीच प्रकाशित झाला. या ग्रंथमालेचे आजवर एकूण आठ खंड प्रकाशित झाले आहेत.

यदिंनी जवळपास ७० पुस्तके लिहिली. त्यातली नऊ इंग्रजीत आहेत. आयुष्यभर पुरोगामी विचारांची पाठराखण करणारे यदि कधी कोणत्या पदाच्या स्पर्धेत उतरले नाहीत. साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्षपद त्यांच्याकडे चालून आले. ते त्यांनी तत्त्वाचा प्रश्न येताच सोडले. बेळगावात २००० साली झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांना बिनविरोध मिळाले. त्यावेळी अध्यक्षपदावरून त्यांनी सीमा प्रश्नातील महाराष्ट्राच्या भूमिकेचा जोमदार पुनरुच्चार केला. त्यानंतरच महाराष्ट्र सरकारने या प्रकरणी सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला. विचारवेध संमेलनाचे अध्यक्षपद, महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार असे सन्मान त्यांच्याकडे चालत आले.

अभ्यास अखेरच्या क्षणापर्यंत

एमएमआरडीएच्या प्रकल्पांची माहिती आपल्याला हवी आहे, अशी विनंती य. दि. फडके यांनी काही दिवसांपूर्वी सहआयुक्त मिलिंद म्हैसकर यांना केली. य. दि. फडके आणि म्हैसकर हे दोघेही सोलापूरच्या हरिभाई देवकरण शाळेचे विद्यार्थी. हर्षद पाटील यांनी फोन करून ही माहिती मागण्याचे कारण विचारले. य. दि. म्हणाले, 'अनेकांशी चर्चा करताना सध्या एमएमआरडीए आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प यांचा विषय हमखास येतो. पण मला त्यांची फारशी माहिती नाही.' मग पाटील यांनी ही माहिती गोळाही केली. ते शनिवारीच ती त्यांना पाठवणार होते...

हीच आदरांजली

य. दि. म्हणाले, 'अनेकांशी चर्चा करताना सध्या एमएमआरडीए आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प यांचा विषय हमखास येतो. पण मला त्यांची फारशी माहिती नाही.' मग पाटील यांनी ही माहिती गोळाही केली. ते शनिवारीच ती त्यांना पाठवणार होते...

ही माहिती जनतेला सहज उपल्ब्ध द्यावी तीच य दिं ना खरी आदरांजली ठरेल.
प्रकाश घाटपांडे

भावपुर्ण आदरांजली.

महाराष्ट्राचे थोर राजकीय इतिहासकार य.दि. फडके यांना भावपुर्ण आदरांजली.
आपला
कॉ.विकि

उत्तुंग

सर एडमंड हिलरींविषयी फारच कमी माहिती होती. कालच वर्तमानपत्रात वाचली. बापरे, एवरेस्ट, दक्षिण ध्रुव, उत्तर ध्रुव तीनही ठिकाणी हा माणूस जाऊन आला होता. गंगेचे मुख ते गंगेचा उगम असा उलटा प्रवास केला होता. गंगेच्या उगमाजवळच्या १९००० फूटी शिखरावर चढून त्यांचा प्रवास संपवला. म्हणजे गंगा जमीनीवर अवतरते तिथपर्यंत सर जाऊन आले होते.

भारतात न्यूझीलंड्चे राजदूत म्हणून राजीव गांधींच्या काळात पदभार सांकार्य, 'हिमालय ट्रस्ट' चे कार्य हे सर्व वाचल्यावर हे व्यक्तिमत्व उत्तुंग नव्हे सर्व दिशा व्यापणारे होते असे जाणवते.

सर एडमंड हिलरींना आदरांजली !

 
^ वर