आखूड लोकांचा प्रदेश

'अनुभव' च्या या वर्षीच्या दिवाळी अंकात "आखुड लोकांचा प्रदेश' या नावाचा सुहास पळशीकरांचा एक मस्त लेख आहे. सातत्याने महाराष्ट्र व मराठी भाषा यांवर कसा अन्याय होतो आहे, असे गळे काढणार्‍यांना पळशीकरांनी पुराव्यासह चपराक दिली आहे. 'मुंबईत मराठी माणूस मागे का?', 'उद्योगधंद्यात मराठी माणूस मागे का?' किंवा एकंदरीतच 'मराठी माणूस मागे का?' अशा वांझ चर्चा, परप्रांतियांची घुसखोरी यासारख्या विषयावर एखादा भाकड परिसंवाद आणि आपला जाज्वल्य वगैरे असणारा इतिहास यातच अडकून पडलेल्या मराठी माणसाला वास्तवाची जाण करुन देण्याचे मोठे काम पळशीकरांनी केले आहे. 'आपल्याला तेवढा इतिहास आहे, बाकीच्या प्रांतांना फक्त भूगोल आहे' अशा खुळचट कल्पनांत अडकून राहिल्याने महाराष्ट्राचे, पर्यायाने मराठी जनतेचे कसे नुकसान झाले आहे, यावर पळशीकर मार्मिक
भाष्य करतात.

मुंबई आता मराठी माणसाची राहिली नाही, पुण्यासारख्या अट्टल मराठी शहरातही आता मराठीपेक्षा हिंदीच अधिक ऐकायला मिळते - आणि हिंदीचे आपले चित्रपट आणि मालिका सोडल्या तर फारसे जमत नाही - अशा सगळ्या पारंपारिक आरोपांमागचे तथ्य समजून घेण्याचाही पळशीकर प्रयत्न करतात. मराठी भाषेच्या अध:पतनावर उपाय म्हणून भरवण्यात येणारी जागतिक मराठी परिषद, किंवा मराठी साहित्याला नोबेल पारितोषिक मिळू शकत नाही म्हणून 'प्रतिनोबेल' पारितोषिकाची घोषणा या आहेतच तश्या महाविनोदी गोष्टी. पण त्या
केल्यान मराठी माणसाची पीछेहाट थांबेल आणि मोबाईल कंपन्यांचे प्रतिनिधी मराठीत बोलू लागतील अशा भाबड्या आशावादावर जगणारी मराठी माणसे पाहिली की पळशीकरांचे विचार एकदम पटून जातात.

एकीकडे संपत्ती - समृद्धीचा हव्यास, पण ती मिळवण्यासाठी कष्ट करण्याची तयारी नसणे, स्वत:मध्ये असलेला उद्योशीलतेचा अभाव, धनसंपत्तीची हाव, पण तिच्याबरोबर अपरिहार्यपणे येणारी सांस्कृतिक सरमिसळ स्वीकारण्याला बाकी नाराजी, असे काहीसे चमत्कारिक मराठी मन पळशीकर उघड करतात. 'वैचारिक भोंदूपणा' हा या संदर्भात पळशीकरांनी वापरलेला शब्द थांबून विचार करायला लावतो. अर्थात नव्या गोष्टींचा मोह होणे आणि जुने टाकून द्यायला मनाची काचकूच होणे हे आपल्याला काही नवीन नाही. एकीकडे बिझनेस सूट घालून कार्पोरेट मीटिंग्जना हजेरी लावणे आणि लग्गेच संध्याकाळी नऊवारी, नथबीथ घालून नणंदेच्या मंगळागौरीला फुगडी घालायला जाणार्‍या स्त्रीला तर आपण 'रोल मॉडेल'च करुन टाकले आहे. मॅक्डोनाल्डस मधील पार्टीला जाताना वाटेवरच्या गणपतीचे दर्शन घेऊन पुढे जाणार्‍यांचे तर आपल्याला कित्ती कित्ती कौतुक! 'गाण्यांच्या रेकॉर्डिंगमधून वेळ मिळाला की आशाताई लग्गेच स्वयंपाकघरात बिरड्याची उसळ करायला धाव घेतात' अशी वाक्ये उसासे टाकत वाचणे मराठी माणसाला फार आवडते.

मराठी माणसाचे स्मरणरंजन तर प्रसिद्धच आहे. 'रम्य भूतकाळ' - मग तो तितकासा रम्य नसेना का, ही वृत्ती मराठी माणसाला काही सोडवत नाही. शिवाजी महाराजांचा जितका सस्त्यातला वापर आपण करुन घेतला आणि महाराजांच्या इतिहासाच्या गोडगोड गोष्टी करुन टाकल्या, त्या न्यायाने एक दिवस बाबासाहेब पुरंदर्‍यांच्या फोटोलाच लोक शिवाजी म्हणू लागतील, असे काहीसे विखारी पळशीकर लिहितात.

फुले -आंबेडकर यांच्या विचारांचा पाठपुरावा म्हणजे त्यांची नावे विद्यापीठांना देणे आणि आता ओबीसी मध्ये घुसखोरी करुन झाल्यावर शिवबाच्या जोडीला फुले -आंबेडकरांचाही कॊपीराईट घेऊन ब्राम्हण - ब्राम्हणेतर वाद नव्याने पसरवणे या बहुजनसमाजाच्या समाजघातकी वृत्तीवर पळशीकरांनी केलेले चिंतन वाचनीय आहे. (यावर प्रतिक्रिया म्हणून जागतिक चित्पावन महासंमेलन - त्यावर प्रतिक्रिया म्हणून मराठा सेवा संघाचे अधिवेशन - त्यावर प्रतिक्रिया म्हणून अखिल ब्राम्हण संघटनेचा वर्धापन दिन या न संपणार्‍या मूर्खपणाची आठवण येणे स्वाभाविक आहे. हे म्हणजे भांडारकर इन्स्टिट्यूटवर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याला प्रतिक्रिया म्हणून सिंहगडावर नासधूस करण्याइतपत खुळचटपणाचे झाले!) ब्राम्हणविरोधी भूमिका घेतली की बहुजन समाजाचे नेतृत्व आपसूकच आपल्याकडे चालून येईल या समजुतीने नवब्राम्हणेतरवादाची पताका उचलणार्‍या आणि भ्रमनिरास झालेल्या आ.ह.साळुंखे आणि हरी नरके यांच्यासारख्यांची शिवधर्माची तात्कालिन वावटळ शमल्यानंतरची परिस्थिती परुळेकरांनी नेमक्या शब्दांत सांगितली आहे. ज्या पश्चिम महाराष्ट्रात नवब्राम्हणेतरवादाची धुगधुगी कायम ठेवण्यासाठी या मंडळींची धडपड सुरु आहे, तिथे मराठा काय किंवा ब्राम्हण काय, दोन्ही समाजांचे खरे शत्रू नाकर्तेपणा आणी ऐदीपणा आहेत, हे बाकी मान्य करायला कुणी तयार नाही. संस्थानिक मराठा समाजाने त्यांचे वैभव तांबड्या- पांढया रश्श्यात संपवले तर ब्राम्हणानी एकादष्ण्या आणि लघुरुद्रांत. पण दोन्ही समाजांची गत शेवटी एकच. बूड हालवून घसघसून काम करायला दोन्ही समाज नाखूषच. मग हे वैफल्य लपवण्यासाठी शिवधर्म विरुद्ध सनातन प्रभात ही आपापसातली लढाई चालू ठेवावी लागते. पण एकंदरीतच हे उथळ, खुज्या मराठी मनोप्रवृतीचे लक्षण आहे.

मराठी साहित्य हा तर आपल्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. पण मराठी जनसामान्यांची झेप - खरे तर सरडाउडीच- पु. लं. -व. पु.- दळवी आणि मर्ढेकर-माडगूळकर - कुसुमाग्रज येथे येऊन थांबते. मराठी पुस्तकांचा वाढता खप आणि त्यानिमित्तानं पुन्हा रुजु घातलेली वाचनसंस्कृती आणि नव्याने वाचनाकडे वळणारी तरुण पिढी इथवर घाईघाईने पोचलेल्या निष्कर्षांमागे तथ्य किती आणि भाबडेपणा किती असा प्रश्न पळशीकर विचारतात.(अर्थात भाबडेपणा हे एकंदरीतच मराठी मनाचे व्यवच्छेदक वगैरे लक्षण आहे म्हणा!) पुस्तकांच्या
प्रदर्शनात दिसणारी उदंड गर्दी ही बहुदा 'पुस्तके पहाणार्‍यांची' असते, हे त्यांचे मत चिंतनीय वाटते. एवढे सगळे करुन शेवटी प्रदर्शनांत 'बेस्ट सेलर्स' ठरतात ती फाडफाड कोकाटे, शिव खेरा, बालाजी तांबे (आणि आता ह. वि.सरदेसाईसुद्धा!) आणि शिवराज गोर्ले! याशिवाय घरात काही पुस्तके असणे हे 'पोलिटिकली करेक्ट' असते, म्हणून ती चकचकीत, गुळगुळीत, रंगीत 'कॊफी टेबल बुक्स' (यांनी घडवलं सहस्त्रक!) या संदर्भात अशोक केळकरांनी मराठी भाषाव्यवहाराच्या संदर्भात वापरलेला 'लुळीपांगळी गरीबी' - म्हणजे आशयपूर्ण पण साधी धट्टीकट्टी गरीबीही नाही आणि शब्दांच्या धबधब्यांसारखी लुळीपांगळी श्रीमंतीही नाही - हा शब्द पटणारा वाटतो. जी गत वैचारिक साहित्याची, तीच विनोदी साहित्याची. अत्र्यांचे अर्वाच्य विनोद आणि पु.लं. चे भावव्याकुळ विनोद यापलीकडील विनोदाच्या कल्पना मराठी माणसाला झेपत नाहीत असे धाडसी विधान पळशीकर करतात. (तरी बरे, त्यांनी बुवा, गाडगीळ, खाडीलकर यांची नावे घेतली नाहीत!) साहित्यीकांचे जे तथाकथित वैचारिक वगैरे वाद होतात, त्यांना विद्याधर पुंडलिकांनी वापरलेल्या ''मुटका' पद्धतीचे वाद' या शब्दप्रयोगाची आठवण पळशीकर करुन देतात. म्हणजे वादात अशी उडी मारायची, की आजूबाजूला भरपूर पाणी उडेल! (काही संकेतस्थळांवरचे वाद, चर्चा पहाता हे वर्णन किती यथार्थ आहे, हे ध्यानात येते!) जोडीला 'गुटका' प्रतिक्रिया - म्हणजे मुखरस सांभाळून वा, छान, सहमत आहे (हेच म्हणतो!)- असतातच! फडके -खांडेकरांचे इयत्ता नववी, तुकडी ब दर्जाचे बाळबोध वाद, अत्र्यांचे अश्लील आणि अर्वाच्य वाद आणि यात स्वत:ची बहुमोल भर घालून बाळासाहेब ठाकरेंनी चालवलेले अगदी शारीरिक व्यंगे, भानगडी असे मुद्दे करुन चालवलेले वाद (सोनिया गांधींची नक्कल वगैरे) - हे सगळेच एकंदरीत वैचारिक दिवाळखोरपणाचे लक्षण आहे, असे परुळेकर लिहितात.

सामान्य मराठी माणसाच्या दैनंदिन उथळपणा विषयी तर बोलायलाच नको. इंग्रजी भाषेचा दुरावा आणि त्यापोटी आणला गेलेला मराठीचा खोटा कळवळा हे एका बाजूला असले तरी 'हॆलो', 'व्हिवा','टुडे' नावाच्या वृत्तपत्रीय पुरवण्या, मध्ये मध्ये नाममात्र मराठी शब्द घालून लिहिलेले मराठी मालिकांचे संवाद आणि 'हॆप्पी बर्थ्डे पिंकी' फ़्रॊम पप्पा, मम्मी आणि चिंटू हे उबगवाणे चित्र दिसते. अर्थात हे काही फक्त मराठी माणसाच्या बाबतीतच खरे आहे, असे नाही .

निव्वळ शब्दांच्या बुडबुड्यांना आणि भाषणबाजीला भाबडेपणानं शरण जाणं, किंबहुना त्याच्या प्रेमातच पडणं या मराठी मनोवृत्तीचं पळशीकरांनी फार छान विश्लेषण केलं आहे. शब्दांच्या कोलांट्या उड्या मारुन तात्काळ हशा आणि टाळ्या मिळवणारे शिवाजीराव भोसले आणि पाठीच्या कण्यात पोलाद भरण्याचे घाऊक कंत्राट घेतलेले सारखे 'माजी सनदी अधिकारी' अविनाश धर्माधिकारी यांचे बोलघेवडे 'थैलर्य' पळशीकर उघडपणे मांडतात. २००० साल हे आधारभूत मानून त्याच्या अवतीभवतीच्या शंभर कर्त्या मराठी व्यक्तींची यादी करायची झाली तर त्यात निव्वळ मौखिक परंपरावाले - भाषणबाज - अनेक लोक येतील आणि त्यांना वगळायचे ठरवले, तर ही यादी शंभरपर्यंत पोचवायची कशी हा प्रश्न पडेल, हा पळशीकरांचा अंदाज अस्वस्थ करुन जातो.

प्रत्येक मराठी माणसाने वाचलाच पाहिजे - आणि नुसते वाचून उपयोगी नाही- त्यावर विचार केला पाहिजे असा हा लेख आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

सहमत

लेखात मांडलेल्या मतांशी बर्‍याच अंशी सहमत आहे. सेनापती बापटांविषयी मनात आदर असला तरी त्यांचे 'मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले' म्हणणे अतिशयोक्त वाटते. एकंदरीतच भाषक समाज म्हणून जेव्हा मराठी समाजाचं मूल्यमापन करणारे लेख लिहिले जातात, ते एकतर अभिजित देसाईछाप फीलगुड तरी असतात. (जगातल्या सर्वात मोठ्या बँकेची धुरा आज एक मराठी माणूस सांभाळतो आहे, क्रिकेट संघात सचिन, चित्रपट क्षेत्रात ऊर्मिला, महेश मांजरेकर; राजकीय क्षेत्रात राष्ट्रपतींपासून पवार, ठाकरे आज मराठी माणसाचा दबदबा टिकवून आहेत...छापाची वाक्ये) किंवा अगदीच गळाकाढू, निराशावादी तरी असतात. खरी सद्यस्थिती बहुधा या दोन टोकांत असते. पळशीकरांचा हा लेख सुदैवाने अधिक वास्तववादी असावा (सरसकट आखूड लोकांचा प्रदेश म्हणणे पटत नसले तरी), असे तुमच्या लेखावरून वाटले.

अर्थात, ही गोंधळाची मनस्थिती थोड्या-अधिक फरकाने भारतातील सार्‍याच भाषकांची असावी असे वाटते. उदाहरणच द्यायचे झाले तर कर्नाटकात, कन्नडा रक्षण वेदिके आणि इ-कवि [एल्ला(अखिल) कन्नडा अभिमानिगळा वेदिके(व्यासपीठ) इंटरनॅशनल] या संघटनांचे वाढते प्राबल्य.

या गोंधळामागचे किंवा न्यूनगंडामागचे कारण जागतिकीकरण असू शकेल. मुंबईत/महाराष्ट्रात हे प्रथम झाले (देशाच्या कानाकोपर्‍यातून लोक येऊन स्थायिक होणे आणि त्यांनी स्थानिकांना मागे टाकणे हे एका मर्यादित अर्थाने स्थानिक पातळीवरील जागतिकीकरण म्हणता येईल.) तेच आता थोड्याफार फरकाने हैदराबाद, बंगळूर, नोईडा इथे होत असल्याने तेथेही ह्या स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

याच संदर्भात, राजदीप सरदेसाईचा हा लेख वाचण्याजोगा आहे. प्रतिभाताई पवार राष्ट्रपतीपदासाठी निवडल्या गेल्यानंतर जी 'तीनसे वर्षांनंतर मराठ्यांनी दिल्लीचे तख्त पुन्हा काबीज केले, अशी प्रतिक्रिया उमटली' त्यासंबंधी लिहिलेला.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
(http://marathisahitya.blogspot.com)

माझे मत

मी पळशीकरांचा लेख वाचला नाही. पण त्यांच्या लेखावरचा लेख वाचुन त्या विषयावरचे माझे मत मी लिहितो आहे. वादंग होतील अथवा न होतील. पण बघु येथे किती पचनी पडतात.

  1. मराठी माणसाचा स्वभाव, इतिहास, आवड, इत्यादी हे प्रत्येक मराठी माणसाला माहित आहेच. आता ते कसे वाईट हे सांगण्याचा हा आणि ते वाईट म्हणजे आपण पुरोगामी हे बिंबवण्याचा पळशीकरांचा केवीलवाणा प्रयत्न आहे. असे माझे स्पष्ट वैयक्तिक मत आहे.
  2. जगातल्या प्रत्येक समाजाचा काही ना काही स्वभाव आहे. मुळातच मराठी माणुस उद्योग धंदा करण्यात मागास आहे हे आजच्या पैश्यावर चालणार्‍या जगात प्रत्येक मराठी माणसाला बोचते. मग आपल्या एकट्याची बोचणी बोथट करण्यासाठी सर्वांना एकाच माळेत घातले की झाले. स्वतःची बोचणी कमी झाली.
  3. जागतिकीकरणाच्या रेट्यात फक्त मराठी माणुसच आपला झेंडा फडकवत रहावा अशी अपेक्षा कोण्याही मराठी माणसाने करावी हे मुर्खपणाचे लक्षण आहे. भारताच्या अफाट लोकसंख्येत प्रत्येकाला क्षणोक्षणी आपल्या अस्तित्वाचा प्रश्न भेडसावत असतो. त्यासाठी लढा देण्यासाठीची प्रत्येकाची लढाई हि न्याय आहे. मग त्यासाठी मुंबईत या अथवा तुम्ही बेंगलोरात जा. मराठी बद्दल उगाचच गळे काढणे आणि त्या विरोधात विखारी शब्दात लिहिणे हे दोन्ही ही मनाला पटत नाही.
  4. यशस्वी मराठी माणसांची यादी मनापासुन शोधली तर खुप मोठी होईल. आता यश कशाला म्हणायचे याची व्याख्या एकच माणुस करणार असेल आणि त्या यशाच्या पट्टीने मोजुन इतरांना खुजे ठरवणार असेल तर मराठी असो वा, गुजराती, वा पंजाबी वा इतर कोणताही भारतीय, तो स्वतः थोडा खुजा आहे असे मी म्हणेन.
  5. महाराष्ट्रात ब्राम्हण समाज अल्पसंख्य आहे. हे आधी खुल्यादिलाने मान्य करा. मग पुढे बोला. इथे जात डोक्यातुन जात नाही म्हणुन मी धर्म बदलला म्हणणारे माने आहेत. पण असे म्हणताना धर्म बदलल्यावर सुद्धा त्यांच्या डोक्यातुन जात गेलेली नाही हे ते विसरतात.
  6. एकुण लेख लिहिताना शास्त्रीय/अभिजात संगीताचा उल्लेख झालेला दिसत नाही. नाहितर काहि नेहमीची नावे सुद्धा दिसली असती. ते कसे बरे सुटले त्या तडाख्यातुन? गजानन महाराज, साईबाबा वगैरे सुद्ध सुटले आहेत. मला वाटत की ही प्रस्थे सुद्धा मराठी माणसांतच जास्त आहेत आणि आता इतर प्रदेशीय लोकं सुद्धा त्या प्रस्थांना डोक्यावर घेत आहेत. हे सगळे कसे सुटले? शेवटी हि देवस्थाने महाराष्ट्रात आहेत आणि त्यानुषंगाने येणारा पैसा सुद्धा इथलाच. मग तो सांभाळणारे मराठी लोक कसे सुटले?
  7. मराठी माणुस नोकरीला प्राधान्य देतो. आता हा प्राधान्य देणारा माणुस मध्यमवर्गीय आहे हे सांगणे न लगे. हल्ली मध्यमवर्ग पुर्णपणे स्वतःचा विचार करु लागला आहे आणि हेच इतर वर्गांच्या पचनी पडेना झाले आहे. मध्यमवर्गाला स्वतःच्या काही मर्यादा असतात आपला आनंद अथवा दु:ख व्यक्त करताना तो समाजाला काय वाटेल याचा जास्त विचार करतो. मग त्यातुन होते ती निरुपद्रवी विचारांची निर्मीती ज्याला पळशीकरांनी खुज्या मनोवृत्तीची उपमा दिलेली दिसते.
  8. प्रतेक सामान्य माणसाचे विचार असामान्य असावे अशी अपेक्षा ते ठेवतातच कशी? असो, आता तर लेख प्रत्यक्ष वाचलाच पाहिजे. न वाचता एवढे विचार आले तर वाचुन बरेच येतील हे नक्की.
हिंदुंच्या नेत्यांना येथे , नाझीचे वंशज मानतात !!
कॉंग्रेसच्या शासनात मात्र , मुसोलीनीचे वंशज चालतात!!

सुंदर परिक्षण...

एकीकडे संपत्ती - समृद्धीचा हव्यास, पण ती मिळवण्यासाठी कष्ट करण्याची तयारी नसणे, स्वत:मध्ये असलेला उद्योशीलतेचा अभाव, धनसंपत्तीची हाव, पण तिच्याबरोबर अपरिहार्यपणे येणारी सांस्कृतिक सरमिसळ स्वीकारण्याला बाकी नाराजी, असे काहीसे चमत्कारिक मराठी मन पळशीकर उघड करतात.

हम्म्! खरं आहे...!

प्रत्येक मराठी माणसाने वाचलाच पाहिजे - आणि नुसते वाचून उपयोगी नाही- त्यावर विचार केला पाहिजे असा हा लेख आहे.

नाही, लेख निश्चितच वाचला पाहिजे, कारण आपण फार छान ओळख करून दिली आहे. परंतु त्यावर विचार काय करायचा हा खरा तर प्रश्नच आहे! :)

माझ्या मते जे काही चाललं आहे ते असंच सुरू राहणार!

असो,

बाकी 'वा', 'सहमत आहे', 'हेच म्हणतो' यासारख्या प्रतिक्रियांना 'गुटखा प्रतिक्रिया' हा शब्दप्रयोग आवडला! :)

आपला,
(काही मराठी संस्थळांवरील वादात धापकन उडी मारून चहुबाजुला पाणी उडवण्याची सवय असलेला!) तात्या.

:)

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

ईअनुभव

हा बघा सुहास पळशीकरांचा लेख. सेव्ह करा. नंतर या लिंकवरील पाने बदलतात.
सुहास पळशीकर व प्रा. यशवंत सुमंत हे दोघेही राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत. पण दोघांच्या लेखनात बराच फरक जाणवतो.
जातीव्यवस्था निर्मूलनाच्या दिशेने जाताना या डॉ.यशवंत सुमंत यांच्या २८ एप्रिल २००७ च्या अंकात इथे पूर्वार्ध ९ नं पानावर वाचा व उत्तरार्ध १२ मे २००७ च्या अंकात इथे पान नं ५ वर वाचा. १२ मेच्याच अंकात हरी नरके यांचा "ओबीसी खतरे में" हा लेख पान नं ११ वर वाचा
प्रकाश घाटपांडे

विचारप्रवर्तक

विचारप्रवर्तक लेख. याची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. लेखातील बर्‍याच मुद्यांशी सहमत आहे. यामध्ये आपली खास मराठी वैशिष्ट्ये कोणती आणि राष्ट्रीय पातळीवरचे गुण कोणते हे बघणे मनोरंजक ठरावे. स्मरणरंजन, गळे काढणे वगैरे खास मराठी गुणांचा उल्लेख आला आहेच. साहित्याच्या बाबतीत सरडाउडीचे उदाहरण चपखल आहे. इथे नंदनच्या अनुदिनीतील विंदा करंदीकरांची मुलाखत आठवते.
सगळ्यात प्रकर्षाने जाणवलेला मुद्दा म्हणजे आपण नेमका कशाचा वारसा बाळगतो आहोत हे विसरून गेलो आहोत. सध्या शिवाजी महाराजांच्या नावाखाली जे चालते ते त्यांनी बघितले असते तर काय केले असते कुणास ठाउक? भांडारकरमधील ग्रंथसंपदा नष्ट करण्याने काय साध्य होणार आहे? याच्या जोडीला बस जाळणे, व्हॅलेंटाइन डेला दुकाने फोडणे आहेच. आपली बौद्धिक पातळी इतकी खाली आहे का की यामध्ये काहीही संबंध नाही हे समजणे आपल्या आवाक्याबाहेरचे आहे?
याच्या जोडीला आहे, मराठी संकेतस्थळांवरचा एक आवडता विषय परप्रांतीय. मागे एका चर्चेत इडली, डोसा दाक्षिणात्य आहेत म्हणून मराठी माणसांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला पाहिजे असा मुद्दा आला होता. (प्राण गेला तरी बेहत्तर, पण हे होणे नाही. :) ) अशा वेळी देशाची एकता वगैरे मुद्दे सोइस्करपणे विसरले जातात. मिले सुर मेरा तुम्हारा ऐकायला बरे वाटते, प्रत्यक्षात परिस्थिती दुसर्‍या टोकाला आहे.

लेखातील शेवटचे दोन परिच्छेद विशेष उल्लेखनीय आहेत.

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

आवाका


आपली बौद्धिक पातळी इतकी खाली आहे का की यामध्ये काहीही संबंध नाही हे समजणे आपल्या आवाक्याबाहेरचे आहे?


समजणे आपल्या आवाक्याबाहेरचे नसावे. पण ईलाज मात्र आवाक्याबाहेरचा आहे. कृतीशील विचारवंतात कार्यकर्ता दडलेला असतो. पण बर्‍याच वेळा विचारवंत आणि कार्यकर्ता यांच्यात कोणीतरी दुवा लागतो. Acadmic व Activist यांच्यात सर्व चळवळींमध्ये आंतरिक संघर्ष दिसून येतो. विचारवंत आपल्याच विद्वत्तेच्या नशेत असतात आणि कार्यकर्ते म्हणतात कि हस्तिदंती मनो-यात बसून यांना समाजाचे काय आकलन होणार? आम्हाला इथे तळागाळात काम करावे लागते.
भांडारकर संस्थेवरील हल्ल्यात तर भाडोत्री गुंड होते. खर तर बेरोजगार युवकांच्या झुंडी हे काम विनासायास करतात. एक क्वार्टर व वडापाव येवढ्या भांडवलावर सुद्धा. राजकीय सभांना ट्र्क भरुन येणारी माणसे याच भांडवलावर येतात. विनिमयाचे "चलन" फारतर वेगळे असू शकते. निवडणुकांच्या काळात यांचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. आताच्या काळात राजकारणात केवळ 'गुंड ' पाळून उपयोग नाही 'विचारवंत' ही पाळावे लागतात. सामान्य जनता मात्र यात 'पोळून' निघते
प्रकाश घाटपांडे

हम्म

काही अंशी सहमत आहे. पण जाळपोळ केल्याने कुणाचे नुकसान होते हे कळायला किती विद्वत्ता लागते. मला वाटते यामध्ये नेत्यांचा वाटा जास्त आहे. व्हॅलेंटाइन डे ला एकाही दुकानाला हात लावलात तर खबरदार असा आदेश नेते लोक का देत नाहीत? (कदाचित खाजगीत याच्या उलट आदेश दिला जात असेल.) असो. कुणाचे चुकते आहे आणि कुणी सुधारायचे हा मला वाटते एक न सुटणारा प्रश्न आहे.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

वैचारिक उथळपणा

पळशीकरांची मते चूक नसतील पण ती धरून मराठी माणसांना धोपटणे हास्यास्पद आहे. मराठी माणसांत हे होते, ते होते आणि इतरजन त्यापैकी नसावेतच असा सूर दिसत नसला तरी दाखवण्याचा फुटकळ प्रयत्न पाहून पळशीकरांना इतर राज्यांत आणि इतर देशांत थोडे अभ्यास करून येण्यास वाव आहे असे वाटते.

एकीकडे बिझनेस सूट घालून कार्पोरेट मीटिंग्जना हजेरी लावणे आणि लग्गेच संध्याकाळी नऊवारी, नथबीथ घालून नणंदेच्या मंगळागौरीला फुगडी घालायला जाणार्‍या स्त्रीला तर आपण 'रोल मॉडेल'च करुन टाकले आहे.

हे कोणत्या संस्कृतीत, कोणत्या देशांत, कोणत्या राज्यात नाही ते तरी दाखवा. बेनझीर भुत्तोंपासून हिलरी क्लिंटन ते राणी एलिझाबेथकडून प्रत्येक माणसाची हीच अपेक्षा असते.

शिवाजी महाराजांचा जितका सस्त्यातला वापर आपण करुन घेतला आणि महाराजांच्या इतिहासाच्या गोडगोड गोष्टी करुन टाकल्या, त्या न्यायाने एक दिवस बाबासाहेब पुरंदर्‍यांच्या फोटोलाच लोक शिवाजी म्हणू लागतील, असे काहीसे विखारी पळशीकर लिहितात.

गांधींचेही असेच केले का? रस्त्याला, गल्लीला, नाक्याला गांधींचे नाव देणारे कोण बॉ? मराठी की इतर भारतीयही?

मराठी साहित्य हा तर आपल्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. पण मराठी जनसामान्यांची झेप - खरे तर सरडाउडीच- पु. लं. -व. पु.- दळवी आणि मर्ढेकर-माडगूळकर - कुसुमाग्रज येथे येऊन थांबते.

चला तर व.पुंच्यासह आता इतर लेखकांचीही वर्णी लागली तर!

फुले -आंबेडकर यांच्या विचारांचा पाठपुरावा म्हणजे त्यांची नावे विद्यापीठांना देणे आणि आता ओबीसी मध्ये घुसखोरी करुन झाल्यावर शिवबाच्या जोडीला फुले -आंबेडकरांचाही कॊपीराईट घेऊन ब्राम्हण - ब्राम्हणेतर वाद नव्याने पसरवणे या बहुजनसमाजाच्या समाजघातकी वृत्तीवर पळशीकरांनी केलेले चिंतन वाचनीय आहे.

हे आणि खालचा परिच्छेद मात्र पटले पण इतरत्र अशीच परिस्थिती नाही हे कशावरून? आणि असल्यास उंच माणसांचा प्रदेश नेमका कुठे आहे?

मराठी माणसा तू चढव वर स्वतःला, तुला खेचायला मी आहेच! खेचलं नाही तरी धोपटेन हां!

एक राहिलंच की --

मराठी माणसाचे स्मरणरंजन तर प्रसिद्धच आहे. 'रम्य भूतकाळ' - मग तो तितकासा रम्य नसेना का, ही वृत्ती मराठी माणसाला काही सोडवत नाही.

कोणत्या जातीचे, प्रजातीचे, धर्माचे, देशाचे स्मरणरंजन प्रसिद्ध नाही ते जरा ससंदर्भ सांगाल का?

- राजीव.

मराठी

पळशीकराचा लेख, आणि तुम्ही करून दिलेला परिचय यात मला तरी परिचय अधिक आवडला. :-)
लेख वाचल्यावर मात्र "मराठी माणसा तू चढव वर स्वतःला, तुला खेचायला मी आहेच! खेचलं नाही तरी धोपटेन हां!" म्हणणार्‍या मराठी समाजातील पळशीकर हे नक्की मराठीच आहेत याची खात्री पटली :)

लेखातील काहि मुद्दे निश्चितपणे चिंतनीय आहेत. पण मराठी माणसाला सरसकट खुजं करताना त्यांच्या मते उंच कोण आहे हे कळेल का? जर लेखकाच्या मते कोणीच उंच नसेल तर मात्र हा लेख केवळ न्युनगंडाने ग्रासलेल्या लेखकाचं चिंतन समजावं लागेल

-(मराठी)ऋषिकेश

सुंदर लेख

पळशीकरांचा लेख अतिशय विचारप्रवर्तक आहे. सुमार केतकरांनी लोकसत्तेची वाट लावण्यापूर्वी अरूण टिकेकर संपादक असताना "तारतम्य" नावाच्या साप्ताहिक सदरात मराठी माणसांना ते "घेत" असत ते आठवले. विशेष म्हणजे नंदनच्या प्रतिसादात त्याने दिलेले कर्नाटकाचे उदाहरण टिकेकरांनी त्यावेळी वेगळ्या दृष्टीकोणातून वापरले होते. प्रकाश पदुकोणांनी इंडियन बॅडमिंटन अकादमी की काहीसे स्थापन करून सरकारी संस्थेला आव्हान दिले होते या घटनेचा तत्कालीन संदर्भ घेऊन टिकेकरांनी कर्नाटक व महाराष्ट्र यांची तुलना केली होती. यात अर्थातच सुनील गावस्कर व इतरांनी "महाराष्ट्रासाठी" काय केले? पदुकोणांना कर्नाटकाचे काही करण्याचे काय पडले होते वगैरे मुद्दे होते.

मात्र टिकेकरांचा मुख्य रोख साहित्यिकांवर होता. कर्नाटकातील साहित्यिक हे मनाने अधिक पुरोगामी वृत्तीचे, समजूतदार आणि व्यापक अनुभवविश्व असणारे आहेत. शिवराम कारंथांसारखे बुजुर्ग साहित्यिक आयुष्यभर कर्नाटकी संस्कृती, भाषा, यक्षगानासारखे नृत्यप्रकार यांच्या उत्थापनासाठी प्रयत्न करत राहिले. वयाच्या ८०व्या वर्षीदेखील पर्यावरण चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला. या तुलनेत महाराष्ट्रातील साहित्यिक हे कोणत्या पातळीवर होते हे पाहणे उद्बोधक ठरेल. महाराष्ट्रातील दुर्गा भागवतांसारखा अगदी एखादाच साहित्यिक सोडला तर इतर साहित्यिकांनी काय केले? सर्व वयोगटातील लोकप्रियतेच्या बाबतीत कारंथांशी तुलना होणारे महाराष्ट्रातील एकमेव लेखक म्हणजे पुलं. पण समाजाचे सांस्कृतिक नेतृत्त्व करण्याची क्षमता व त्यांचा शब्द झेलू शकणारे लोक असूनही पुलंचे कर्तृत्त्व कारंथांसमोर फार कमी वाटावे. असा एकंदर टिकेकरांच्या लेखाचा आशय होता.

सुंदर लेखाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. आ.ह.साळुंखे व हरी नरके वगळता बहुतेक सर्व मुद्द्यांशी सहमती आहे. नरके साहेबांची काही व्याख्याने व काही लेख वाचले आहेत. आक्रस्ताळेपणा हा एकच शब्द तिथे योग्य ठरेल.

शिवराळसेनेने तर मराठी माणसाचे जितके नुकसान केले आहे ते कमीच आहे की काय म्हणून आता मनसे आणि आमच्या साहेबांचा राष्ट्रवादी पक्षही त्यात उतरला आहे. :((

आजानुकर्ण

हरि नरके


नरके साहेबांची काही व्याख्याने व काही लेख वाचले आहेत. आक्रस्ताळेपणा हा एकच शब्द तिथे योग्य ठरेल

.
सहमत आहे.
हरि नरकेंना सुरुवातीला टेल्को कंपनीने मोठे केले. मी वर दिलेला साधना अंकातील हरि नरकेंच्या लेखातील दुवा काय दर्शवतो. नरके बदलत गेले. सुररुवातीला त्यांचे लेख तसे नव्हते. मी त्यांचे एन् एस् एस् च्या मुलांना प्रबोधनाचे दिलेले यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील व्याखान तीन वर्षांपुर्वी ऐकले अन जाती अंतासाठी लढा ऐवजी ते जातीतील दरी वाढवतात् असेच वाटले. त्यापाठीमागे विद्रोहाचे मोठे बौद्धिक राजकारण आहे. पुर्वी फुले - आंबेडकर हा डॅश मधे नव्हता. स्वतंत्र व्यक्ती म्हणुन ऐतिहासिक महत्व होते. त्यानंतर शाहू- फुले-आंबेडकर असे वाक्यप्रचार आले. ते रुजवले गेले. हे सर्व आपोआप घडले का? यासाठी बुद्धिवंताना कष्ट घ्यावे लागतात. राजकीय आशिर्वाद लागतात. दृष्टांत, दाखले चपखल बसतील असे तयार करावे लागतात. बौद्धिक दांडगाई करताना देखील साम दाम दंड भेद या नीती वापराव्या लागतात. त्यालाच प्रबोधन हे नाव द्यायचे. सदानंद मोरे आता भटाळले अशी टीका व्हायला लागते तेव्हा मोरे दुर्लक्ष करतात. आपले काम चालू ठेवतात.
प्रकाश घाटपांडे

माझे मत

मात्र टिकेकरांचा मुख्य रोख साहित्यिकांवर होता. कर्नाटकातील साहित्यिक हे मनाने अधिक पुरोगामी वृत्तीचे, समजूतदार आणि व्यापक अनुभवविश्व असणारे आहेत. शिवराम कारंथांसारखे बुजुर्ग साहित्यिक आयुष्यभर कर्नाटकी संस्कृती, भाषा, यक्षगानासारखे नृत्यप्रकार यांच्या उत्थापनासाठी प्रयत्न करत राहिले. वयाच्या ८०व्या वर्षीदेखील पर्यावरण चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला. या तुलनेत महाराष्ट्रातील साहित्यिक हे कोणत्या पातळीवर होते हे पाहणे उद्बोधक ठरेल. महाराष्ट्रातील दुर्गा भागवतांसारखा अगदी एखादाच साहित्यिक सोडला तर इतर साहित्यिकांनी काय केले? सर्व वयोगटातील लोकप्रियतेच्या बाबतीत कारंथांशी तुलना होणारे महाराष्ट्रातील एकमेव लेखक म्हणजे पुलं. पण समाजाचे सांस्कृतिक नेतृत्त्व करण्याची क्षमता व त्यांचा शब्द झेलू शकणारे लोक असूनही पुलंचे कर्तृत्त्व कारंथांसमोर फार कमी वाटावे. असा एकंदर टिकेकरांच्या लेखाचा आशय होता.

टिकेकरांच्या लेखातील ह्या आशयाशी सहमत व्हावेसे वाटणे तसे सोपे आहे. एका हाताच्या बोटांवर मोजण्याएवढे अपवाद सोडल्यास महाराष्ट्रातील तथाकथित पुरोगामी, सुखासीन, साहित्यिकांनी आणिबाणी, सीमावाद, नामांतर, मुंबईतील जातीय दंगली-बाँबस्फोट आणि ह्यासारख्यामराठी माणसासाठी महत्त्वाच्या असलेल्या प्रश्नांबाबत, वादांबाबत स्वतःहून कधी, किती, कुठे आणि केवढे तोंड उघडले आहे हा संशोधनाचा विषय आहे. असो. ही तथाकथित मराठी साहित्यिक नावाची जमात फारच पुचाट आणि शेपटीघालू आहे, असे काहींना वाटते. पण सामाजिक बांधिलकी-बिंधिलकीपेक्षा आपल्या स्टडीमधे बसून सौंदर्याचे सृजन करणे हे अधिक महत्त्वाचे नाही काय?

बाकी आ. ह. साळुखे हे मराठी सेवा संघाचे 'कॅप्टिव' विचारवंत आहेत की काय असे कधीकधी त्यांचे लेखन अनेकांना उगीच वाटते. हा देखील शेवटी जातीयवादच! असो. तूर्तास एवढेच.


१. कॅप्टिव जलाशय किंवा पावरप्लांट मधला कॅप्टिव बरं का!

तारतम्य

अरूण टिकेकर संपादक असताना "तारतम्य" नावाच्या साप्ताहिक सदरात मराठी माणसांना ते "घेत" असत ते आठवले.

"घेत" असत म्हणजे त्या सदरात समाविष्ट करीत असत अशाच अर्थाने ना? त्यांच्या लेखनात मला खरोखरीच तारतम्य जाणवले. त्यांच्या एका भाषणात वृत्तपत्रिय लेखनात, संपादकीय विभागात असलेले "ब्राह्मणी" वर्चस्व सांगताना आपापसातील संभाषणात "अरे ' टिकेकर' म्हणजे आपल्यातले नाहीत बर का?" हा मुद्दा मिष्किलीने सांगितला होता. त्यात कुठलाही विखार नव्हता. विद्रोह तर नाहीच. त्यांच्यात ती प्रवृत्ती असती तर ते "तारतम्य" लिहू शकले नसते.
प्रकाश घाटपांडे

माझी प्रतिक्रिया

माझ्या प्रतिक्रिया विस्कळीत स्वरूपातल्या आहेत. लेखाचा उद्देश बहुदा कठोर आत्मपरीक्षण करायला लावण्याचा असावा. तसे असल्यास तो स्तुत्य मानावा लागेल. इतक्या धाडसी लेखावर प्रतिक्रिया येणारच. माझ्या मनातील काही नोंदी :

भल्याभल्या नावांच्या निर्‍यांना हात घालणे याला एक प्रकारचे धैर्य लागते. पळशीकरांच्या बाबतीत हा उल्लेख करावा लागेल. रावसाहेब कसबे , सदानंद मोरे , तळवलकर, मे पुं रेगे या सार्‍याना "आखूडा"मधे सामावून घेणे या गोष्टीला अपार धैर्य लागते - एका सुसाईड बॉंबरला लागते त्या धर्तीचे. मी हे कौतुकाने म्हणत नाही . फारसे तपशीलात न जाता त्यानी उपरोल्लेखित विद्वानाना झोडपले आहे. यापैकी प्रत्येकाचे संशोधनकार्य समजावून त्यातील आखूडपणा दाखवून द्यायला एकेक (प्रदीर्घ !) लेख लागेल. नाहीतर मग केवळ ठणाणा होतो.

"आपल्या वारशाबद्दल मराठी समाजात गोंधळ आहे खरा वारसा न समजल्यामुळे ..." अशा अर्थाचे एक महत्त्वाचे वाक्य लेखात आहे. हा "अस्सल" वारसा नेमका कोणता बरे ? भल्याभल्याना जो समजला नाही , सर्वाना ज्याचा विसर पडला आहे किंवा त्याबद्दल गोंधळ वाटतो असे हे "नेति नेति शब्द न ये अनुमाना" तेव्हढे सांगितले असते तर बरे झाले असते.

कोण हे सुहास पळशीकर?

मी आधीच कबूल करतो की मी एक् अत्यंत खुजा, अडाणी असा मराठी माणूस आहे . हे सुहास पळशीकर कोण? त्यांचं वैयक्तिक कर्तुत्त्व काय? मला यांच्या विद्वत्तेविषयी काहिच माहिती नाही.
माझ्या सारख्या अतिसामान्य माणसाला पु. ल. किंवा शिवाजी राजे माहिती आहेत पण हे पळशीकर नाव प्रथमच ऐकतो आहे.
या पळशीकरांबद्द्ल काही माहिती मिळाली तर् प्रतिक्रियेचा विचार करता येईल नाहीतर रात्रीबेरात्री भुंकणारी कुत्री अनेक असतात त्यातलंच हे एक म्हणून सोडून देवू.

या माणसाला एक सल्ला मात्र देणार...बाबारे, रात्री इसबगोल किंवा त्रिफळाचूर्ण घेत जा. पोटातली मळमळ अशी कागदावर करण्यापेक्षा योग्य ठिकाणी तिचा निचरा होईल.

मुद्द्याचे बोलूया

पळशीकर कुणी असोत किंवा नसोतही. त्यानी काही मुद्दे मांडले आहेत. आणि त्यातील काही मुद्द्यांवर चर्चा नक्की होऊ शकेल इतपत ते मुद्दे महत्त्वाचे आहेत. बाकी त्यांच्या कर्तृत्वाचे आपणा सर्वाना काय होय ?

हा हा हा! :)

भटकेरावांचा प्रतिसाद आवडला! :))

असो,

माझ्या माहितीप्रमाणे सुहास हा मराठी नाट्य, मालिका, चित्रपट तसेच काही हिंदी चित्रपटात छोटीमोठी कामे करणारा एक नट आहे. छान काम करतो. नानाच्या 'अंकुश' मध्ये त्याने काम केल्याचे मला आठवते. तसेच 'चांदनी बार' चित्रपटात तब्बूच्या मामाचे कामही त्यानेच केले आहे असे वाटते!

चूभूद्याघ्या...

आपला,
(तब्बूप्रेमी) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

सुहास पळशीकर

या नावाचे एक 'विचारवंत' राज्यशास्त्र विभाग, पुणे विद्यापीठ येथे कार्यरत आहेत असे सा. साधनेच्या एका लेखावरून दिसले.
हे सुहास पळशीकर आणि नट सुहास पळशीकर एकच काय? आणि त्यातल्या कोणत्या पळशीकरांनी हा लेख लिहिला आहे? हे संशोधनाचे विषय आहेत.

बाकी परीक्षण उत्तम. मूळ लेखकाच्या फक्त मराठी माणसाला झोडपण्याच्या धोरणाला विरोध आहे.

उपयुक्त डिवचणी

पण लेख तिडकेने लिहिला असल्या कारणाने तितका मुद्देसूद वाटला नाही. पण तिडकेने लिहिले नसते तर डिवचणीही वाटली नसती.

परीक्षण आवडले.

काही मुद्दे पटले पण...

ह्या सगळ्यात हे ' फक्त मराठी माणसालाच ' लागू पडते असे नाही तर ह्याचे 'सार्वत्रिकिकरण' अगदी सहज शक्य आहे आणि इतर भाषांमधले विचारवंत ते करतही असतील.
ह्यातले 'फक्त मराठी माणसालाच ' लागू पडणारे मुद्दे वेगळे काढणे शक्य आहे का ? तर त्यांच्यावर निश्चितच विचार करता येइल.

एकंदर

सुहास पळशीकरांचे बरेचसे विचार म्हणजे झाडलेली वाक्ये (स्वीपिंग स्टेटमेंट्स किंवा जनरलायजेशन्स) वाटतात. कुठल्याही भाषेत शिवराज गोर्ले किंवा कोकाटे सारख्या लेखकांची 'हाउ टू'छाप पुस्तके धडाधड खपतात, ही वस्तुस्थिती आहे.

अनेकांच्या मते मुद्दा असा आहे की मराठी माणसाला आवडणार्‍या गोष्टीच वाचायला, ऐकायला बहुधा इतर भाषकांपेक्षा जास्तच आवडतात. तो आपला 'कंफर्ट झोन' सोडायला तयार नसतो.
[विद्यागौरी टिळकांनी ह्यावर एक छान छोटा लेख मराठी अभ्यास परिषदेच्या 'भाषा आणि जीवन' ह्या त्रैमासिकामध्ये कधी काळी लिहिला होता, त्यात त्यांनी वरील मुद्दा अगदी ठासून मांडला होता. त्याच अंकात डॉ. अशोक केळकर ह्यांनी वेगळी वाट चोखाळणारे चांगले साहित्य वाचकांपुढे यावे किंवा लेखकांने ते लिहावे म्हणून संपादकांची भूमिका कशी महत्त्वाची आहे आणि कशी असायला हवी, ह्यावर लिहिलेला संपादकीय वाचल्याचे आठवते.]

हे "आखुड्य" घालवायचं कसं ...

... याबद्दल पळशीकरांच्या काय सुचवण्या आहेत? की त्यासाठी पुढच्या दिवाळी अंकापर्यंत थांबायचं :) ? ठरवून कडू केलेला लेख वाटला.

याची उत्तरे

हा लेख पळशीकरांचा असल्याने यावरील प्रश्नांची उत्तरेही त्यांनीच द्यावीत असे वाटते. मी कालच हे प्रश्न त्यांच्या कानावर घातले आहेत. आता ते स्वतः यावर काय म्हणतात, ते पाहू.
अवांतरः या लेखाचे लेखक पळशीकर पुणे विद्यापीठात राज्यशास्त्राचे प्राध्यापक असावेत. नट सुहास पळशीकर हे वेगळे असावेत, असे वाटते.
सन्जोप राव

सुंदर लेख

प्रा. पळशीकरांच्या लेखाकडे लक्ष वेधल्याबद्दल सन्जोप रावांचे तसेच ह्या लेखाचा दुवा दिल्याबद्दल प्रकाश घाटपांडे ह्या दोघांचे मनःपूर्वक आभार.

पळशीकरांनी त्यांच्या लेखात घेतलेली मराठी मानसिकतेची झाडाझडती (स्मरणरंजक भावुकता, ठोक भाषणबाज तत्त्वज्ञ व त्यांचे मानडोलवू श्रोते, मोडकळीस आलेल्या सामाजिक व सांस्कृतिक संस्था, रद्दड वर्तमानपत्रे, शोभेचा ग्रंथव्यवहार, अत्यंत मर्यादित व्याप्ती असलेले व वैयक्तिक पातळीवर लढवले जाणारे जाहीर वाद, दलित चळवळींच्या शोकांतिका) बऱ्याच अंशी चोख व म्हणून सहज पटण्यासारखी आहे. काही ठिकाणी मात्र त्यांच्या विचारांशी मी असहमत आहे, तेव्हढे इथे नोंदवतोः

१) 'शहरे वाढतात तशी .... त्यांच्या सीमा आणि संस्कृती ह्यांची फेरआखणी होते. संमिश्रभाषक संस्कृती ही शहरांची खासियत बनते' असे ते सांगतात. हे थोडेफार खरे असले, तरी ज्या मुंबईच्या संदर्भात ते हे सुनावतात, त्या मुंबईतच हे बरेच वर्षे, खरे तर सुमारे एक शतकभर तरी लागू नव्हते. विसाव्या शतकाच्या सुरूवातीपासून ते अगदी सुमारे १९८५ सालापर्यंत मुंबईत अनेक भाषिक राहत होते, आणि ह्या महानगरीच्या आर्थिक नाड्या पहिल्यापासूनच इतर भाषिकांच्याच हातात होत्या (मारवाडी, पारसी व गुजराथी). पण इतक्या दीर्घ कालखंडात तेथील मराठीचा गाभा नासला नाही. मुंबईच्या मराठीमध्ये फारतर एखाददुसरा गुजराती शब्द आला असावा. पण भाषेचा गाभाच नासून जावा हे '८० च्या दशकापासून चालू झाले.

'महानगरांच्या आर्थिक झगमाटात कोणतीही एकभाषक संस्कृती सोवळेपणाने शिल्लक राहत नाही, हा जगभरचा अनुभव आहे' असे पळशीकर आपल्याला पुढे सुनावतात. हे म्हणतांना त्यांनी कुठले संदर्भ पडताळून पाहिले, हे माहिती नाही. अनेक आक्रमणे झालेल्या चिनचा असा अनुभव नाही. आपल्या एव्हढाच काळ पारतंत्र्यात घालवलेल्या हॉंगकॉंगला हे अजिबात लागू होत नाही. अमेरिकेत गेली अनेक मेक्सिकन जनता मोठ्या प्रमाणात येत आहे. त्यांचा तेथील इंग्रजी भाषेवर काही परिणाम झाला असल्याचे ऐकिवात नाही. लंडनमध्ये तर गेल्या कित्येक दशकात लाखो परकिय आले, पण तेथील इंग्रजीवर मूलभूत परिणाम झाला आहे काय, ह्याचे उत्तर नाही असेच आहे. ['मूलभूत परिणाम' म्हणजे असा की माणसे इंग्रजीत बोलताहेत का उर्दूत, असा प्रश्न ऐकणाऱ्या त्रयस्थाला पडावा; तेथील वर्तमानपत्रे तरूणांना आकर्षित करण्यासाठी उर्दूमिश्रीत इंग्लिशमध्ये लिहू लागावीत! चार इथले- तिथले शब्द अंगिकारण्याची उदाहरणे इथे अभिप्रेत नाहीत].

माझ्या मते ह्या ऱ्हासाचे कारण मराठी जनतेत आत्मसन्मानाचा पूर्ण अभाव आहे, हे आहे.

२) पळशीकरांच्या मते '[भावगीतांएव्हढा].. तोकडा भावाविष्कार हा ज्या समाजाचा भावनिक खुराक असेल, त्याला पुढे चारोळ्या म्हणजेच कविता वाटून समाधानाचे ढेकर येऊ लागले, यात काय विशेष?' भावगीते जर 'तोकडा भावाविष्कार' आहे, तर तो 'परिपूर्ण आविष्कार' कोणता? आणि जगातल्या कुठल्या समाजाने तसा तो अंगिकारला आहे? इंग्लंडमधील समाज एक आदर्श व्यक्तिमत्व असलेला असे आज जर म्हटले, तर ते वावगे ठरू नये. तो काय वीरश्रीयुक्त कवितांवर अथवा गाण्यांवर पोषला गेला आहे काय?

३) गिरण्यांचा संप झाला (१९८२), तेव्हा (उठसूठ ज्याला आता सहजपणे झोडपता येते त्या) 'हिंदूत्ववादा'चा उदय झालेला नव्हता-- तो सुमारे १९८९ च्या दरम्यान झाला.

पण वरील २ व ३ हे तसे एकंदरीत लेखाच्या आवाक्याच्या संदर्भात गौण आहेत.

सन्जोप रावांनी चर्चाप्रस्तावात 'गाण्यांच्या रेकॉर्डिंगमधून वेळ मिळाला की आशाताई लग्गेच स्वयंपाकघरात बिरड्याची उसळ करायला धाव घेतात' अशी वाक्ये उसासे टाकत वाचणे मराठी माणसाला फार आवडते.' असे म्हटले आहे. ह्यात गैर काय आहे, तसेच त्यात 'उसासे' टाकण्यासारखे काय आहे, हे मला कळले नाही. त्यांच्या पाश्वगायनाच्या अत्यंत व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून आशाबाई स्वयंपाक करण्यात आनंद मानतात, हा त्यांचा एक विरंगूळा त्या जमेल तसा जोपासतात, इतकेच मलातरी असल्या वाक्यातून प्रतित होते. 'Gerrard spends time making a good steak for himself and his children in the midst of his busy schedule of matches' हे चालते ना? का तेही खटकते, उसासे टाकले म्हणून? पण परत, हा एक छोटासा मतभेदाचा मुद्दा. एकंदरीत लेखाच्या मतितार्थाशी मी सहमत आहे.

बाहेरील शब्दांचा अतिरेक नको पण

लंडनमध्ये तर गेल्या कित्येक दशकात लाखो परकिय आले, पण तेथील इंग्रजीवर मूलभूत परिणाम झाला आहे काय, ह्याचे उत्तर नाही असेच आहे.

गेल्या दशकातले माहिती नाही. पण भाषा जेव्हा वाढत असते तेव्हा बाहेरचे शब्द येत असावेत.

मलाही हल्लीच नेटवर एक बीबीसीचा दुवा मिळाला. इ. स. १०००- पासून पुढे कसे बदल इंग्रजी भाषेत होत गेले ते ऐकायला मिळते. जुनी इंग्रजी भाषा समजतही नाही.

language_timeline

याचा अर्थ वाटेल ते शब्द चालवून घ्यावेत असा नाही.

प्रतिसाद आवडला

प्रतिसाद आवडला.

माझ्या मते ह्या ऱ्हासाचे कारण मराठी जनतेत आत्मसन्मानाचा पूर्ण अभाव आहे, हे आहे.

हा मुद्दा थोडा वादग्रस्त आहे. आत्मसन्मानाचा पूर्ण अभाव ऐवजी आत्मसन्मानाच्या चुकीच्या कल्पना असाव्यात असे वाटते.

-- आजानुकर्ण

विचार करण्यायोग्य

आत्मसन्मानाच्या चुकीच्या कल्पना असाव्यात असे वाटते.

हा मुद्दा विचार करण्यायोग्य आहे. मात्र कोणत्या कल्पना बरोबर हे ही तपासून बघायला हवे असेही वाटून गेले.
सगळेच 'रिलेटिव्ह' असते असे वाटते.

 
^ वर