मदत हवी आहे

नमस्कार

मला मुम्बई चे सूरुवातीचे नाव काय होते हे कुनी सागेल का ?मला असे समझले आहे मुम्बई हे मुम्बई चे मुळ नाव नाही आहे. क्रुपया मदत करा

लेखनविषय: दुवे:

Comments

साष्टी

म्हणायचे आहे का तुम्हाला?

अधिक माहिती येथे मिळेल.

साष्टी = ६६ गावे

साष्टी! म्हणजे ६६ गावांची सासष्टी. गंमत म्हणजे गोव्यात सासष्टी (६६-ई) नावाचा एक तालुका आहे, त्या शब्दाचाही उच्चार "साष्टी" असाच होतो. गोव्यात (कदाचित पूर्ण कोकणात) भूभागांना आकडेवारी नावे द्यायची फारच आवड दिसते. गोव्यातच सासष्टीच्या व्यतिरिक्त बारदेश (१२-देश), तिसवाडी (३०-वाडी) आणि सत्तरी (७०-ई) हे तालुके देखील आहेत.

मुंबईची बेटे

मुंबईची बेटे, गावेही अनेक वर्षे पोर्तुगिजांच्या ताब्यातच होती. तेव्हा साष्टी = सासष्टी हे त्यांच्या मार्फतच तर आलेले नव्हे? म्हणजे गावांना आकड्यांची नावे देणे पोर्तुगीज पद्धत तर नव्हे?

विकीप्रमाणे

ही गौड सारस्वत वसाहतींची आकडेवारी आहे. कमीतकमी बारदेश आणि तिसवाडी बद्दल असे लिहिलेले आहे. सासष्टी ६६ गावांची, पण ते नाव कोणी दिले ते विकीवर सांगितले नाही.
ती पाने फारच त्रोटक आहेत, म्हणून विकीपेक्षा ठोस संदर्भ हवा.

गावांची नावे : अवांतर

गोव्यात आणि कोकणात (विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात) अनेक गावांची नावे एक सारखी आहेत. उदा. शिरोडा, फोंडा इ. याचे कारण काय असावे?

२४ परगणा

हम्म.
२४ परगणा एकमेव आहे अशा भ्रमात तो होता. (दक्षिण व उत्तर हे दोनच 'जिल्हे' असे असावेत असे अजूनही वाटते.)

ऐक मुंबई तुझी कहाणी

'ऐक मुंबई तुझी कहाणी' हे पुस्तक बर्‍याच वर्षांपूर्वी वाचले होते. त्यात 'मुंबई' नावाचे बेट ७ बेटांपैकी एक होते असा उल्लेख आहे.
-ऋषिकेश

अवांतरः मला आत्ता या पुस्तकाच्या लेखिका (बहुतेक लेखिकाच आहेत.) लक्षात येत नाहि आहेत. कोणी वाचलय का हे पुस्तक?

मुंबादेवी..

सात बेटांपैकी ज्या एका बेटावर मुंबादेवीचे देऊळ होते त्याचे नाव पुढे पडले मुंबई (त्यानंतर हे नाव त्या सात बेटांच्या समुहालाच पडले), असा इतिहास सांगितला जातो.

अन्य बेटे - कुलाबा, भायखळा, परळ, माटुंगा, माहिम, वरळी.

वरील माहिती ऐकीव आहे. जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा!

(जन्माने) सुनील मुंबईकर

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मुंबई-मुंबादेवी

सात बेटांपैकी ज्या एका बेटावर मुंबादेवीचे देऊळ होते त्याचे नाव पुढे पडले मुंबई (त्यानंतर हे नाव त्या सात बेटांच्या समुहालाच पडले), असा इतिहास सांगितला जातो.

हेच मलापण माहीत आहे. काही काही भागांच्या नावांचा संदर्भ त्यात लागतो (ऐकीव माहीतीवर) आत्ता २ आठवतात ती:

पायधुणी - मुंबादेवीच्या मंदीरात जाण्या आधी जिथे पाय धुवायची व्यवस्था होती त्या ठिकाणालाच नंतर त्या जागेचे "पायधुणी" असे नाव पडले.

शीव (सायन): सायन कसे ते माहीत नाही. पण मुळ मुंबापुरीचीजी वेस म्हणजे "शीव" होती, त्या भागाला नंतर शीव असे नाव पडले.

सायन हा अप-अप-भ्रंश

दुहेरी म्हणजे मराठी->पोर्तुगीज-> इंग्रजी

शींव ("ई"वर टिंब) म्हणजे सीमा असे विकास यांनी वर सांगितलेच आहे. हा मराठी शब्द असल्यामुळे, संस्कृत->मराठी याला मी अपभ्रंश म्हणात नाही!

त्या ठिकाणी पोर्तुगीजांनी किल्ला बांधला (ब्रिटिश काळातला, आजचा किल्ला तो हाच की वेगळा?). सिओं हा त्याचा पोर्तुगीज उच्चारभ्रंश, किंवा जवळात-जवळचे स्पेलिंगीकरण. (पोर्तुगिजात सहसा w वापरत नाहीत.) आपल्या ओळखीचेच स्पेलिंग असले (sion) तरी पोर्तुगिजात स्पेलिंगच्या उच्चाराचे नियम इंग्रजीपेक्षा वेगळे आहेत. "शींव" आणि "सिओं" भराभर म्हटले तर त्या दोन शब्दांचा उच्चार कमालीचा जवळ येतो. त्यामुळे उच्चारभ्रंश वाटतो तितका भ्रष्ट नाही.
इंग्रजांनी स्पेलिंग तेच ठेवले, पण उच्चार इंग्रजी नियमांप्रमाणे "सायन" असा केला. हा मात्र मोठाच उच्चारभ्रंश झाला.
(युरोपियन लोकांपूर्वी त्या भागाचे नाव "निरयन" होते असे कोणी म्हटले नाही, म्हणजे मिळवली.)

उपप्रश्न

>>(युरोपियन लोकांपूर्वी त्या भागाचे नाव "निरयन" होते असे कोणी म्हटले नाही, म्हणजे मिळवली.)

Good one! ही कल्पना आवडली. मध्य रेल्वेच्या बाजूने असलेली सीमा - सायन आणि पश्चिम रेल्वेच्या (बांद्र्याच्या) बाजुने असलेली सीमा म्हणजे निरयन असा आपणच "क्लेम" करूया :-)

पण मूळ प्रश्नासंदर्भात मला कायम पडलेले उपप्रश्न : उपनगरांची नावे कशी तयार झाली? विशेष करून काही नावे एकदमच वेगळी वाटतात, म्हणजे अपभ्रंश नसलेली: मुलूंड, भांडूप, विक्रोळी, घाटकोपर, इत्यादी...

दहिसर

या उपनगरांबद्दल माहित नाहि. पण मला माझ्या दहिसरबद्दल माहित आहे :)
नावाप्रमाणे (आणि बर्‍याच जणांच्या समजाप्रमाणे) याचा दह्याशी किंवा दहिविक्रेत्यांशी काहिही संबंध नाहि. या ठिकाणी दहा वस्त्यांचे (गावठण, कांदरपाडा, नवागाव, ओवरीपाडा, घरटनपाडा, केतकीपाडा, रावळपाडा, दहिवली, बाभळीपाडा, भागलीपाडा)मिळून होणारे ते दहिसर.
यातील भागलीपाडा मला माहित नाहि अजून आहे का. बाकीच्या भागांचे अजूनही हेच नाव आहे

मुंबईतील किल्ले

मी जितकी माहिती जमवू शकलो त्यावरून मुंबईच्या सगळ्या बेटांवर मिळून पुढील किल्ले होते:

१) फोर्टः सध्या दक्षिण मुंबईतील फोर्ट विभाग म्हणजे जूना फोर्ट. इथे खरोखरचा किल्ला होता. सतराव्या शतकात जंजिर्‍याच्या सिद्धीपासून वाचण्यासाठी हा बांधला होता. औरंगजेबाच्या मदतीने हा किल्ला बर्‍यापैकी वाचवलाही होता. या किल्ल्याला तीन द्वारे (गेट) होते. चर्चद्वार (चर्चगेट), अपोलो द्वार (अपोलो गेट), बाजार द्वार (बझार गेट). एकोणीसाव्या शतकाच्या मध्याला गव्हरनर्सना याच्या डागडूजीचा खर्च परवडेना त्यामुळे हे स्थापत्य त्यांनी तोडून इमारतींसाठी जागा उभी केली.

१अ) डोंगरी: मस्जिद स्तेशनहून अजूनही इथे जाता येते. (सावधानः स्त्रीयाच काय पण पुरुषांनीही इथे एकटे बिनधास्त जायचा प्रयत्न करू नये. जायचेच असेल तर पाकिट जवळ बाळगा व त्यात ५० रु. च ठेवा :) ) हा किला केवळ टेहाळणी साठी वापरला जायचा कारण हा फोर्टचाच भाग होता.

२) सायनचा किल्ला : हा किला दोन भागात उरला आहे. वर धनंजय यांनी उल्लेख केलेला हा किल्ला. हा सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात बांधला गेला.
२अ) काळा किल्ला: (याला रेवाचा डोंगरही म्हणतात) सायनचा किला याचाच भाग होता का वेगळा किला होता कल्पना नाही.

३) साष्टीचा किल्ला / फोर्ट ऑफ वॉटर पॉईंट / कॅसल-ड्-अग्वाडा(Castella de Aguada):
हा साष्टीबेटावरचा सध्या जिथे लँड्स् एंड भाग आहे तिथे होता. हा पोर्तूगिजांनी बांधला. पुढे हा इंग्रजांच्या सौन्यावर नजर ठेवण्यासाठी फार महत्वाचा गणला जाऊ लागला. पुढे अठराव्या शतकात हा मराठ्यांनी जिंकला. पुढे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात अनेक स्थळांप्रमाणे इथुनही इंग्रज मराठ्यांना हुसकवण्यात यशस्वी ठरले.

४) मुंबई किल्ला: ही बहुतेक मुंबईभोवतीची सर्वात जूनी तटबंदी. याची वेस सध्या सायन-कुर्ला ज्या भागात आहे तेथर्यंत होती. याच्या काहि भिंती "कुर्ला स्टोन" नावाच्या निळसर दगडांनी बनवलेल्या होत्या. अजून याचे अवषेश आय.एन्.एस्. आंग्रे जिथे आहे त्याच्या जवळ आहेत.

४अ) माहिम: हा मुंबई किल्ल्याचा भाग. हा मुंबईच्या पहिल्या गव्हर्नरने मागाहून बांधून घेतला. साष्टी बेटावरील हालचाली टिपायला याचा उपयोग होत असे. (सध्याच्या बांद्रावरळी पूला मुळे याला धोका मिर्माण झाला आहे)

५) मढः हा किल्ला फार प्रसिद्ध आहे त्याची माहिती अनेक ठिकाणी मिळेल व तो अजूनही सस्थितित असल्याने इथे जास्त माहिती देत नाही.

६) शेवरी: हा किल्ला ब्रिटीशांनी बांधला आणि पुढे जंजिर्‍याच्या यदी राजाने (?) हा बळकावला. हा अजूनहि आहे.
७) माझगावः हा किल्ला ब्रिटीशांनी बांधला आणि पुढे जंजिर्‍याच्या यदी राजाने (हा जंजिर्‍याचा यदी कोण?) हा बळकावला. पुढे फोर्ट आणि वरळीचा किला आल्यावर याचे महत्व उरले नाही.

८) वरळी किल्ला: याबद्दलही बरीच माहिती लोकांकडे आहेच. (आणि जालावरही उपलब्ध आहे. ) तेव्हा अधिक सांगणे नलगे.

९) बेलापुरचा किल्ला: जंजिर्‍याच्या सिद्धींनी बांधला. याबद्दलची चिमाजी अप्पाची गोष्ट तर प्रसिद्धच आहे. त्यानखा किल्ला जिंकल्यावर तेथील भरपूर वेलांवरून (काहि अख्यायिकांच्या मते बेलाच्या झाडांवरुन ) याचे नाव बेलापूर किल्ला ठेवले.

१०) वसई: बर्‍याच जणांची सहल शाळेत असताना इथे गेली असेलच :)

 
^ वर