भ्रष्टाचार - खाजगी क्षेत्रांतील

भ्रष्टाचार म्हंटल्याबरोबर बहुतेकांच्या डोळ्यासमोर सरकारी कर्मचारी व राजकारणी लोक येतात. खाजगी क्षेत्रांतही भ्रष्टाचार असेल असे त्यांच्या मनांतही येत नाही. जणू काही भ्रष्टाचार ही सरकारी क्षेत्राची मक्तेदारी आहे.

माझ्या महाराष्ट्र वीज मंडळाच्या मालतपासणी विभागांतील (१९८० च्या दशकांतील) सहा वर्षांच्या कारकीर्दींत ज्या गोष्टी माझ्या समोर आल्या त्यापैकी काही वानगीदाखल खाली देत आहे.

१) बडोद्याच्या एका बहुराष्ट्रीय कंपनीने तयार केलेल्या कंट्रोल पॅनेल्स चे काम अतिशय सुबक होते हे मी माझ्या बरोबर असलेल्या कंपनीच्या सेल्स इंजीनियरला सागितले. त्यावर आम्ही त्याला दरही तसाच देतो असे तो म्हणाला. तो सर्वसाधारण दरापेक्षा जवळ जवळ २० टक्के ज्यास्त होता. त्याने पुढे त्यांत खरेदी विभागाच्या मॅनेजरचाही हिस्सा असल्याचे व कंपनींत सर्वांना ते ठाऊक असल्याचेही सांगितले. (त्यांत एम्.डी. पर्यंत सर्वांचे वाटे असल्याची शक्यता नाकारता येत नाही).

२) कलकत्त्याच्या आसपास इन्शुलेटर बनवणारी एक 'क्ष' कंपनी होती. उच्चदाबाच्या खांबांवरून जाणार्‍या विद्युतवाहिन्यांवर बसवता येणारे स्विचेस बनवायला त्यांची गरज लागते. हे स्विचेस कलकत्त्यांतील लघु उद्योजक तयार करीत व इन्शुलेटर्ससाठी त्यांना 'क्ष'वर अवलंबून रहावे लागे. वीजमंडळाच्या हजारो स्विचेसची ऑर्डर हावर्‍यांतील २०-२५ लघु उद्योजकांना असे. त्यांच्यावर 'क्ष'ची खूप दादागिरी चाले. इन्शुलेटर्सच्या पुरवठ्यासाठी लघु उद्योजकांना त्यांची किंमत आगाऊ भरावी लागे. पुरवठा केव्हा होईल याबाबत 'क्ष' कसलीही हमी देत नसे. पुरवठा होईपर्यंत किंमती वाढल्यास माल उचलतांना वाढीव किंमत द्यावी लागे. स्विचेसचा पुरवठा वेळेवर न झाल्यास दिरंगाईबद्दल वीज मंडळाकडून बिलांतून दंडाची रक्कम कापून घेतली जाण्याची टांगती तलवार लघु उद्योजकांच्या डोक्यावर असे. 'क्ष'चा वीजमंडळाशी थेट संबंध नसल्यामुळे तिला दिरंगाईची पर्वा नसे. त्यामुळे वेळेवर पुरवठा हवा असल्यास लघु उद्योजकांना प्रत्येक इन्शुलेटर मागे ५ रुपये (१९८० च्या दशकांत) 'क्ष'च्या भांडार अधिकार्‍याला द्यावे लागत. सर्व काम बिनबोभाट चाले कारण रोख मिळणार्‍या पैशांत वरपर्यंत सर्वांचे वाटे असत.

३) उत्तरेकडील एका राज्यांत लोखंडी तारांचे दोरखंड (वायर रोप) बनवणारी एक कंपनी होती. तिच्याकडे सुमारे ४० लाख रुपयांचा माल तयार होता. मी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यांत कामांची यादी व वेळापत्रक घेऊन कलकत्त्यांत पोचलो. ऑफिसने दिलेल्या प्राधान्यक्रमाप्रमाणे वायर रोपचे इन्स्पेक्शन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यांत होते. कंपनीचा सेल्स इंजीनियर डिसेंबर संपतासंपता माझ्याकडे आला आणि आपल्या मालाचे ताबडतोब इन्स्पेक्शन करून पाठवण्यास योग्य असल्याचे प्रमाणपत्र द्यावे असा आग्रह त्याने धरला. त्यामुळे कंपनीला ३१ डिसेंबरपूर्वी माल पाठवल्याचे दाखवता आले असते. कंपनीच्या माणसाने मला सकाळच्या विमानाने नेऊन संध्याकाळच्या विमानाने कलकत्त्याला परत आणून सोडतो असे आश्वासनही दिले.मला ते शक्य नव्हते म्हणून मी नाही म्हंटले. पुढे ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणे मी जानेवारींत त्या कंपनींत गेलो तर त्यांनी ३१ डिसेंबरला तपासणी प्रमाणपत्राशिवाय माल पाठवूनही दिला होता. असे का केले म्हणून विचारता सांगण्यांत आले की तो (४० लाखांचा) माल ३१ डिसेंबरपूर्वी पाठवल्याने त्या विभागांतील कर्मचार्‍यांना उद्दिष्टापेक्षा अधिक माल पाठवण्याबद्दल इन्सेंटिव्ह् बोनस मिळणार होता. त्यावर ऑर्डरच्या अटींप्रमाणे इन्स्पेक्शनच्या प्रमाणपत्राशिवाय मालाचे पैसे मिळणार नाहीत हे त्यांच्या नजरेला आणून दिले व मी निघालो. ती अट त्यांनाही ठाऊक होती कारण कंपनी काही पहिल्यांदाच आम्हाला पुरवठा करीत नव्हती. पुढे सर्व काही नियमित करायला व पैसे मिळायला त्या कंपनीला सहा महिने लागले असे कळले. मधल्या काळांत त्या विभागांतील कर्मचार्‍यांनी आपला बोनस काढून घेतला होता. यांत नुकसान झाले ते कंपनीचे व पर्यायाने शेअर होल्डर्सचे.

वरील उदाहरणांना अपवादात्मक म्हणावे की हिमनगाचे टोक म्हणावे?

सरकारमधील भ्रष्टाचाराची बातमी होते, चर्चा होते. कर्मचारी निलंबित होतात. कधीकधी विधानभवनांत चर्चाही होते. खाजगींत सर्वच काही गुपचूप.

सरकारी क्षेत्र असो वा खाजगी, भ्रष्टाचार (अपवाद वगळता) सर्व भारतीयांच्या रक्तांत असावा असे वाटते.

आपणांस काय वाटते?

लेखनविषय: दुवे:

Comments

सिद्धांत आणि व्यवहार

सैद्धांतिक दृष्टीने तुम्ही म्हणता त्याला भ्रष्टाचार म्हणण्याची गरज नाही, पण व्यावहारिक स्तराने त्याला भ्रष्टाचार म्हणावे लागेल यात मुळीच शंका नाही.

मुक्त बाजारपेठेत नोकर आपली सेवा व्यापारी संस्थेला (कंपनीला) विकत असतो, आणि व्यापारी संस्था माल/सेवा एकमेकांना, शेवटी ग्राहकांना विकत असतात. व्यवहारी व्यापारी संस्था अशा प्रकारचे खर्च अंदाजपत्रकांत गृहीत धरून आपल्या विकलेल्या मालाची/सेवेची किंमत सांगतात.

उदाहरणार्थ : (१) कंट्रोल पॅनल २०% अधिक किंमत मोजून म.रा.वि.म. ला पुढील फायदे मिळू शकतील. (अ) पगार न वाढवता सुखी कर्मचारी (आ) सुबक पॅनल. कर्मचार्‍यांना ते अधिक वेतन द्यायचे नसेल तर म.रा.वि.मं.ने खुशाल वेगळे कर्मचारी नेमावेत. नपेक्षा म.रा.वि.मं. विजेची किंमत तितकी अधिक लावेल. कर्मचार्‍यांच्या या तर्‍हेवाईक "पगारवृद्धीचा" खर्च ग्राहक देतील. त्यांना ती किंमत आवडत नसेल तर त्यांनी खुशाल दुसर्‍या कुठल्या कंपनीकडून वीज खरेदी करावी. (ही सैद्धांतिक पातळी. व्यवहाराच्या पातळीवर ग्राहकांना तसे करण्याचे स्वातंत्र्य नसते. नसल्यास हा म.रा.वि.मं.चा एकाधिकार होतो. गरजेच्या मालाचा एकाधिकार = एका प्रकारचे शासनच.)

(२) क्ष कंपनी मालासाठी एक किंमत सांगते, व वेळेवर माल पुरवण्यासाठी वेगळी किंमत आकारते. ही दुसरी किंमत क्ष कंपनी प्रसिद्ध करत नाही, ही थोडी गडबड असली, तरी बाजारात काही दिवस राहिलेल्या छोट्या उद्योजकांना ती किंमत ठाऊक असते. तरी हा खर्च हे छोटे उद्योजक स्विचची किंमत वाढवून म.रा.वि.मं.->वीज ग्राहकाकडून वसूल करतात. ग्राहकांना ती किंमत आवडत नसेल तर त्यांनी खुशाल दुसर्‍या कुठल्या कंपनीकडून वीज खरेदी करावी. मराविमं ला ती किंमत आवडत नसेल तर इ.इ.. (ही सैद्धांतिक पातळी. व्यवहाराच्या पातळीवर... इ.इ.)

(३) दोरखंड कंपनी माल विकते तो कधीकधी परीक्षण न करता विकते. डिसेंबर ३१च्या आत माल उठवण्यामुळे त्यांना या वर्षी अधिक फायदा मिळतो, त्यामुळे समभागांची किंमत वाढते. समभागांच्या किंमत वाढीच्या बदल्यात ते त्या कर्मचार्‍याला बक्षीसी वेतन देतात. हे दोरखंड कमकुवत असू शकतील. अमुक एक वर्षांसाठी कंपनी दोरखंडांची हमी देते, त्याच्या आधी काही दोरखंड झिजून तुटतील, ते बदलून देण्यासाठी जो खर्च येईल त्यासाठी दोरखंड कंपनीने विमा काढलेला असतो. त्या विम्याची किंमत (प्रिमियम) दोरखंडाच्या किंमतीत गृहीत असते. ती म.रा.वि.मं.->वीज ग्राहकाकडून वसूल करतात. ग्राहकांना ती किंमत आवडत नसेल तर इ.इ. (ही सैद्धांतिक पातळी. व्यवहाराच्या पातळीवर ... स्वातंत्र्य नसते इ.इ.)

शाळेत खाजगी उद्योग हे "बाजाराच्या गुप्त हातामुळे" सर्वात कमी किमतीत (=सर्वात कार्यक्षम पद्धतीने) ग्राहकापर्यंत माल पोचवतात असे शिकवले जाते. त्यामुळे जी असते ती किंमत वाजवी असते. हा सिद्धांत लागू होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात उद्योजक एकामेकांशी चढाओढ करणे अनिवार्य असते. ज्या मालाच्या बाबतीत हे सत्य असते, त्या बाबतीत तुमची उदाहरणे "भ्रष्टाचार" नाहीत, "बाजारभाव" आहेत. काही विशिष्ट प्रकारच्या मालाच्या बाबतीत हे शक्य होत नाही. "बाजारपेठेत अपयश येण्याची परिस्थिती" (मार्केट फेल्युअर) याबाबत अर्थशास्त्रात बराच अभ्यास झालेला आहे. परंतु "एकाधिकाराचे तोटे" या शब्दांखाली तो सर्व प्रकार ढकलून अर्थशास्त्रातला तो अभ्यास शालेय आणि सुरुवातीच्या कॉलेज वर्षांत टाळला जातो. मग खाजगी क्षेत्रातल्या मालाची किंमत "अवाजवी" वाढली (="भ्रष्टाचार") की लोकांना आश्चर्य वाटते. ते तसे वाटू नये.

ज्या ज्या ठिकाणी एकाधिकार आहे, त्या त्या ठिकाणी ग्राहकाला किंमत निश्चित करण्यात हस्तक्षेप करता यावा, हे नैतिक मूल्य आहे, अर्थशास्त्रीय सिद्धांत नव्हे. ऍडम स्मिथ, कौटिल्य, यांनी राजेशाहीत चालणार्‍या अर्थशास्त्राचे जे वर्णन केले आहे, ते शास्त्रीय दृष्टीने ठीकच आहे.

लोकशाही याच "नैतिक" कारणासाठी लागते, कारण जीवनाच्या त्या क्षेत्रांत (पोलीस, सैन्य, करभरणा...) शासनाचा एकाधिकार असतो. मला हवे म्हणून शासकीय सेवा दुसर्‍या कुठल्या शासनाकडून विकत घेण्याची सोय बहुधा मला नसते (फक्त स्थलांतराने शक्य.) खाजगी क्षेत्रात काही बाबतीत एकाधिकार उद्भवू शकतो. किंवा अन्य कारणासाठी अवाजवी किंमत आकारली जाऊ शकते. त्यातही ग्राहकाला हस्तक्षेप करता यावा की नाही हे नैतिक मूल्य आहे, अर्थशास्त्रीय सिद्धांत नाही. पण तसा एकाधिकार उद्भवण्याची स्थिती कधी येते, हा अर्थशास्त्रीय अभ्यास जरूर आहे.

खाजगीकरण होताना (किंवा राष्ट्रीयीकरण होताना) हे विश्लेषण मतदारांनी (=लोकशाहीच्या मालकांनी) विचारपूर्वक केल्याचे बहुधा दिसून येत नाही.

असो. तुम्ही पाहिलेले प्रकार वाचून एक ग्राहक म्हणून मला वाईट वाटते. हे चूक आहे असे मला वाटते. ते बदलण्याची जबाबदारी भारतीय कायद्याची (=लोकशाहीची) आहे असे मला वाटते. व्यक्तींना दोष देऊन काय हशील? लोक आणि कंपन्या आपल्या "कुवतीनुसार" (=जमेल तितका) वैयक्तिक/कंपनीसाठी फायदा करून घेतील असे गृहीतक मानण्यात सुज्ञपणा आहे.

खाजगी कम्पन्यांमधे भ्रष्टाचार

आपण शंका व्यक्त केलीच आहे, मला तरी वाटते कि हे अपवादात्मकच असावे... कारण खाजगी कम्पनी मधे पण आपापसात एवढी "काम्पीटिशन" असते कि जर त्याच्या "कलीग" ला कळले तरी त्याचा हल्ला व्हायला वेळ लागणार नाही... दुसरे म्हणजे आपण वरील अधिकार्यास् तक्रार केली असती तर कार्रवाई होण्याची शक्यता असते... पण हाच प्रकार सरकारी खात्यात झाला असता तर "सर्वांनी" मिळून "खेळीमेळी" नी सगळे पैसे खाल्ले असते, आणि ग्राहक काही तक्रार घेवून गेलाच तर त्याचा काही फायदा होणार नाही... हे मुख्य अन्तर आहेत...

http://sureshchiplunkar.blogspot.com

मला वाटतं थोडा फरक आहे.

एक सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास, खाजगी कंपन्यामधे होणार्‍या गैरव्यवहारांमुळे किंवा तथाकथित भ्रष्टाचारामुळे माझं वैयक्तिक नुकसान होत नाही.
तसच कोणाएकाने पंतप्रधानाला १ कोटी लाच दिली तर नैतिक दृष्ट्या कितीही वाईट असलं तरी त्यात माझं वैयक्तिक नुकसान होत नाही.
उ.दा. वर क्रमांक १ मधे उल्लेखिलेल्या भ्रष्टाचारामुळे आपल्याला असं किती नुकसान झालं?

पण समजा सरकारी कचेरीत मी काही कामासाठी गेलो आणि माझी कितीही कागदपत्र बरोबर असली तरी तिथल्या अनेक लोकांची मनधरणी करावी लागते, पैसे चारावे लागतात. (इतकं करूनही काम वेळेवर होईल याची गॅरेंटी नाहीच) हे नुकसान किंवा होणारा अपमान याची बोच मला जास्त लागते. खाजगी कंपन्यापेक्षा सरकारी कचेर्‍यांची लोकाभिमुखता जास्त आहे. अनेक लोकं या सरकारी कचेर्‍यांवर अवलंबून असतात. म्हणून् सरकारी लोकांच्या भ्रष्टाचाराचा जास्त बभ्रा होतो. खरं बघायला गेलं तर सरकारी लोकांना इतरांची अशी अडवणूक करण्याचा अधिकारच काय? असा भ्रष्टाचार करून ते सरकारचा काही फायदा करून् देत असतात का?
त्यानी केलेला भ्रष्टाचार हा अक्ष्म्यच आहे. उगाच "खाजगी क्षेत्रात करतात मग आम्ही केला तर शिक्षा का?" असा कांगावा करण्यात अर्थ नाही. जनतेना दिलेला सत्त्ता करण्याचा अधिकार जसा स्विकारलात तसं जनतेला सेवा पुरवण्याचं कर्तव्यपण केलं पाहिजे.

आणि जेव्हा खाजगी क्षेत्रातला भ्रष्टाचार लोकसंख्येच्या एका मोठ्या गटावर परिणाम करतो तेव्हा त्यांच्यावर कारवाई होतेच. उ.दा. एन्रॉन दिवाळखोरी, मायक्रोसॉफ्टची एकाधिकारशाही.

खाकी

एक किस्सा विनोद म्हणुन सांगितला जातो.
एक पोलिस वरिष्ठांच्याकडे मिळणार्‍या पगारात खर्च भागणे कसे अवघड आहे असे पटवण्यासाठी अंदाजपत्रक तयार करुन देतो. वरिष्ठ त्याला विचारतात तुझ्या वर्दीचा रंग कुठला ? तो म्हणतो "खाकी" मग वरिष्ठ म्हणतात " मग खा कि!"
(वर्दीचा रंग शरीराला न चिकटलेला, आणि आतातर वर्दी मुख्यालयाच्या भांडारात जमा केलेला)
प्रकाश घाटपांडे

अशी कित्येक उदाहरणे आहेत.

लेखांत मोजकीच उदाहरणे दिलेली आहेत. आणखी लहान लहान कित्येक उदाहरणे माझ्याकडे आहेत.

सदर माहिती रूढ कल्पना, पूर्वग्रह, (उदा. सरकारी ते सर्व वाईट म्हणून खाजगी ते सर्व चांगले) यांना धक्का देणारी आहे. त्यामुळे ‍या लेखाकडे फारसे लक्ष दिले जात नसावे.

 
^ वर