आपल्या मेंदूतील माहितीची गाळणी

अष्टौप्रहर आपल्यावर माहितीचा चहूकडून भडिमार होत असतो. त्यापैकी नेमकी आपल्या कामाची माहिती गाळून घेण्यात काही लोक तरबेज असतात. वैज्ञानिकांच्या चमूने याबाबत अधिक संशोधन करून मेंदूतील एक नवाच भाग शोधून काढला आहे.

इंग्रजी लेखाचा दुवा - http://news.bbc.co.uk/1/hi/health/7132829.stm

या क्षेत्रात काम करणा-या उपक्रमींनी यावर अधिक प्रकाश पाडावा अशी मी त्यांना विनंती करतो.

लेखनविषय: दुवे:

Comments

वर्गीकरण

वर्गीकरण करतांना चुकून चर्चेच्या प्रस्तवाऐवजी लेख हा पर्याय निवडला. त्याबद्दल क्षमस्व.

स्नेहांकित,
शैलेश

सुरुवात

शैलेश,

छानच बातमी आणलीस येथे. गाळणी सापडली असली तरी त्या शास्त्रज्ञांचे म्हणने आहे की ही केवळ या संशोधनातली सुरुवात आहे. तसेच जगातील इतर संशोधकांनी या शोधाला मान्यता दिल्याचा उल्लेख सुद्धा बातमीत नाही. सखोल संशोधन होऊन आपल्याला काही फायदा करुन घेण्याची वेळ येईपर्यंत आपण जीवंत असू का हा प्रश्न आहे. :)

मला सुद्धा अशी काही तरी गाळणी असेल असे वाटत असायचे पण नेमकी भानगड लक्षात येत नव्हती. चला, मनातल्या असंख्या गुंत्यातला एक तरी या शास्त्रज्ञांनी सोडवला! पण अता प्रश्न असा पडला आहे की ही चाचणी घेताना त्यांनी कोणते लोक निवडले असतील, त्यांच्या चाचण्या कधी अन कशा घेतल्या असतील?... असो.

आपला,
(गाळणीवाला) भास्कर
आम्ही येथे वसतो.

असेच काम

तुमचे म्हणणे बरोबर आहे भास्कर, हे सर्व तपासायला हवे. पण असेच काम एमआयटीतही चालले आहे असे समजते.

http://web.mit.edu/~bcs/people/desimone.shtml
उपक्रमावर या विषयात काम करणारे कोणी लोक आहेत किंवा नाही कल्पना नाही.

भीती

या क्षेत्रात काम करणा-या उपक्रमींनी यावर अधिक प्रकाश पाडावा अशी मी त्यांना विनंती करतो.

मला या विनंतीची भीती वाटते. उपक्रमचा " आजचा सुधारक" होईल कि काय? त्यात या विषयावर सातत्याने टी.बी खिलारे, प्रभाकर नानावटी व डॉ.प्रदीप पाटील यांच्या बौद्धिक चर्चा असतात.
भास्कररावांना जो प्रश्न पडला आहे त्या भोवतीच या चर्चा झडत असतात. येथे सुधारकच्या चर्चांची झलक आहे.
( मेंदुला झिणझिण्या आलेला)
प्रकाश घाटपांडे

शैलेश, चर्चा अधिक मूर्त करा

मी तो शोधनिबंध आवर्जून वाचला. त्यावरून असे दिसते ते गाळणे अस्तित्वात असल्याची कल्पना मनोविज्ञानात आधीपासून आहे, या अभ्यासात मेंदूतली त्याची जागा निश्चित केलेली आहे. ("नवाच भाग शोधून काढला आहे" हा शब्दप्रयोग तितकासा आवडला नाही.)

गेल्या दहाएक वर्षांत एफ्-एम्-आर्-आय् या (कार्यरत लक्ष्याचे चुंबकीय-नाद-चित्रण) तंत्रज्ञानाने "अमुक वैचारिक कार्य करताना मेंदूचा अमुक भाग कार्यरत असतो" अशी अनेक निरीक्षणे प्रसिद्ध झाली आहेत. त्यांच्यापैकी हे एक.

त्यामुळे तुम्ही चर्चेला थोडे वळण द्यावे :
१. मेंदूत वेगवेगळी कार्ये करणारी वेवेगळी स्थाने आहेत, हे कुतूहल आहे काय?
२.अ. असे काही गाळणे असते याबद्दल कुतूहल आहे काय?
२.ब. अभ्यासात जी काही वैचारिक कृती करताना लोकांचे मेंदू चित्रित केले, तिने या गाळण्याचा पर्याप्त अभ्यास होतो काय?

या दोन विषयांची चर्चा एकमेकांपासून फारच दूर जाऊ शकेल.

आभार / कुतूहल

सर्वांच्या प्रतिक्रियांसाठी मनःपूर्वक आभार!

भास्कर यांच्याप्रमाणेच, या चाचण्या कशा प्रकारे घेतल्या असतील याबद्दल, मलाही कुतूहल आहे.

स्नेहांकित,
शैलेश

कोणी भाग घेतला, चाचणी काय होती

भाग घेणारे कोण होते?
उत्तरः (लेखातून भाषांतर)
२५ निरोगी उजवखुरे (डावखुरे च्या उलट!) लोक. वय वर्षे १९-३३. पैकी १३ स्त्रिया होत्या.

(स्वानुभवावरून सांगतो.) साधारणपणे अशा प्रयोगांसाठी जाहिरातपत्र लावतात. आकडा (२५ लोक) हा खूप लहान असल्यामुळे हे जाहिरातपत्र केवळ त्या कॅरोलिन्स्का हॉस्पिटलातच वेगवेगळ्या ठिकाणी लावले असण्याची शक्यता आहे. "निरोगी लोकांना आमंत्रण" असे म्हटले की साधारणपणे हॉस्पिटलातले कर्मचारी उत्तरे देतात, किंवा कधीकधी पेशंटलास् भेटायला आलेले नातेवाईक वगैरे (हे कमीच).

प्रयोग दुखरा नसेल (जसे हे मेंदूचे चित्रण), आणि चिरिमिरी "बक्षीस" असेल, तर विद्यार्थी डॉक्टर किंवा परिचारिका हौशीने येतात.

या प्रयोगातील कृतिक्रम.

एक व्हिडियो गेम.
पटलावर एका मोठ्या वर्तुळात १५ मोकळी ठिकाणे आहेत. (म्हणजे घड्याळात १२ आकड्यांऐवजी ठिपके असतात, त्याऐवजी १५ ठिपक्यांसाठी जागा.)
त्या १५ रिकाम्या जागांत तीन किंवा पाच ठिपके (पिवळे किंवा लाल) दिसतात. ते कुठे आहेत ते नोंदवायचे. असे अनेकवेळा. जितक्या बरोबर नोंदी तितका खेळ फत्ते.
या खेळाच्या दोन प्रकारच्या खेळी प्रत्येक खेळाडूला आलटूनपालटून अनेक वेळा दिल्यात.
प्रकार १ (लक्ष विचलित न करणारी खेळी) : या प्रकारची खेळी खेळण्यापूर्वी पटलावर मध्यभागी एक त्रिकोण दिसतो. या प्रकारात दृश्य होणारे ठिपके पिवळे किंवा लाल ते महत्त्वाचे नाही. कुठलाही ठिपका कुठल्या जागेवर होता ते लक्षात ठेवून नोंदवायचे.
प्रकार २ (लक्ष विचलित करणारी खेळी) : या प्रकारची खेळी खेळण्यापूर्वी पटलावर मध्यभागी एक चौकोन दिसतो. या प्रकारात फक्त लाल ठिपक्यांच्या जागा लक्षात ठेवाव्या लागतात. पिवळे ठिपकेही दिसतात, पण त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करावे लागते, कारण त्यांच्या जागा नोंदवल्यात तर खेळीत गुण मिळत नाहीत. पिवळे ठिपके केवळ लक्ष विचलित करतात, त्यांना स्मृतीतून गाळणे इष्ट.

प्रकार दोन ची खेळी खेळताना लक्ष द्यायचे, पण "गाळणे वापरून" (पिवळे ठिपके स्मृतीतून गाळायचे). बाकी मेंदूच्या सर्व कृती प्रकार एक च्या खेळीसारख्याच.

हा खेळ खेळताना मेंदूचे चित्रण होत होते. मेंदूचे अनेक भाग कार्यरत होत असताना दिसले. पण एक विशिष्ट भाग प्रकार २ च्या खेळीत कार्यरत होत होता, पण प्रकार १च्या खेळीत तो मेंदूचा एक भाग कार्यरत होत नव्हता. त्यावरून गाळण्याच्या क्रियेत तो भाग कार्यशील असल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढला.

हे वर्णन त्रोटक आहे. अर्थात यापेक्षा प्रयोग काळजीपूर्वक केला गेला.

धनंजय

व्वा!

प्रयोग कसा गेला हे कळल्यामुळे रोचकता वाढली हे नि:संशय!!! धन्यवाद!

"निरोगी लोकांना आमंत्रण" अश्या जाहिराती मी अनेकदा वृत्तपत्रात पाहिल्या आहेत. त्या लोकांना असे खेळ खेळावे लागतात तर :)

-ऋषिकेश

चिरिमिरी

प्रयोग दुखरा नसेल (जसे हे मेंदूचे चित्रण), आणि चिरिमिरी "बक्षीस" असेल, तर विद्यार्थी डॉक्टर किंवा परिचारिका हौशीने येतात

.
असे असेल तर पोलिस पण नक्की येतील. परंतु पोलिस खात्यात मेंदू हा गुडघ्यात असतो.

प्रकाश घाटपांडे

 
^ वर