किटाणू, विषाणू. जिवाणू आणि अळ्या

इइइइइइइइइइइइइइइ.......
चर्चेचे शीर्षक वाचून असेच काहीसे वाटले, म्हटले असे अनेकांनी, हो ना? पण आता आपण येथे मराठीचा कट्टर वापर करतो म्हणाल्यावर मला हेच शब्द सुचले. आपल्यातल्या काही सुज्ञांना याचा अर्थ लागला असेलच की मला कशावर चर्चा करायची आहे. खास करून येथे असणार्‍या संगणक आणि जाल तज्ज्ञांना, तसेच आज्ञावलीकारांना याचा अर्थ लागला असेच. आता ज्यांना कळले नाही त्यांच्यासाठी स्पष्टच लिहितो.
आपल्याला चर्चा कराची आहे ती संगणकाला आणि संगणाकाधारीत पायाभूत सुविधांना आजारी पाडणार्‍या व्हायरस/वर्म्स बद्दल. इथल्या एका सदस्यांनी आपण हेरगिरी कशी केली हे सांगताना एक गृहपाठ दिला होता. तो अनेकांनी केला असेलच. हा गृहपाठ करत असतानाच विचार मनात आला की आपल्या घरच्या, कार्यालयीन संगणकांना अशा प्रकारे बाधा सुद्धा केली जाऊ शकते. किंबहुना ती अनेकदा होत असते. एक सर्वसामान्य वापरकर्ता अथवा प्राथमिक संगणक साक्षर असलेल्या लोकांना या बद्दल कसे कळणार बरे? या संबंधी अनेक प्रश्न पडले, ते मी खाली लिहितो आहेच. तुम्ही हि लिहा - त्यांची उत्तरे, अथवा तुमचे प्रश्न अथवा तुमचे सामान्य ज्ञान....

माझे काही प्रश्न
किटाणू, विषाणू. जिवाणू आणि अळ्या कोण आणि कसे तयार करते? धंद्याचा विचार करून अनेक संस्थाच हे काम करत असतील का?
आपल्या संगणकाला प्रादुर्भाव झाला आहे हे कसे ओळखावे?
हा प्रादुर्भाव करण्याचे कोण कोणते राजमार्ग आणि छुपे मार्ग आहेत?
हा प्रादुर्भाव रोखण्याचे कोण कोणते राजमार्ग आणि छुपे मार्ग आहेत?
उपक्रमामुळे प्रादुर्भाव (उपक्रमाचा वापर करून विषाणूंचा हल्ला) करणे शक्य आहे का?
असे हल्ले करण्या मागे काय काय हेतू असू शकतात?
लिनक्स हा हल्ला रोखू शकते का?

तर, हे आहेत माझे प्रश्न. आशा आहे की या चर्चेतून ज्ञान प्रसार, प्रचार आणि ग्रहणाची संधी अनेकांना मिळेल.

Comments

उत्तम

उत्तम विषय आहे. प्रतिसादांबद्दल उत्सुकता आहे. दरम्यान तुमचा संगणक आजारी असल्यास उपचार कुठे उपलब्ध आहेत याची सविस्तर माहिती इथे मिळू शकेल.

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलासुद्धा सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका...विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

माहिती

राजेंद्रजी,
प्रथम प्रतिसाद आणि दुव्याबद्दल धन्यवाद. सविस्तर माहिती अनेक ठिकाणी मिळु शकेल. येथे साध्या-सोप्या मराठीत माहिती मिळवण्यासाठी मुद्दाम होउनच चर्चा सुरु केली. मला सुद्धा प्रतिसादांबद्दल उत्सुकता आहे.

मराठीत लिहा. वापरा.

हेतू

मागे कुठेतरी अँटीव्हायरस बनवणार्‍या काही कंपन्या त्यांचा व्यवसाय वाढण्यासाठी नवीन व्हायरस बनवायलाही मदत करतात असे वाचले होते. (चूभूद्याघ्या)

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलासुद्धा सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका...विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

मीही ऐकले होते..

टायर पंक्चर काढणारा दुकानदार रस्त्यात मुद्दाम खिळे टाकतो त्यातलाच प्रकार झाला हा. स्वतःच समस्या निर्माण करायची आणि मग निवारणासाठी पैसे उकळायचे!

ज्योतिषात पण हेच

ज्योतिषात पण हेच होते, जातकाला आपणच शनी, मंगळ,साडेसाती, मृत्युषडाष्टक असे शब्द वापरुन घाबरावायचे आणी नारायण नागबली, त्रिपिंडी श्राद्ध , नक्षत्र शांती वगैरे परिहार करुन आपणच दिलासा द्यायचा . यात पण "कट प्रॅक्टिस " असते बरंका? म्हणुनच आम्हाला "ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी..... प्रश्नोत्तरातून सुसंवाद " लिहावे लागले.
स्वप्न दाखवणे, भिती घालणे यावर अनेक व्यवसाय चालतात. आपण सर्व जण त्याचे वाहक ही असतो व शोषित/ शोषक ही असतो.
प्रकाश घाटपांडे

धन्यवाद

प्रतिसादा बद्दल धन्यवाद. यावर एखादा लेख लिहिणे आपल्याला अवघड नाही असे वाटते :)

मराठीत लिहा. वापरा.

काही उत्तरे

किटाणू, विषाणू. जिवाणू आणि अळ्या कोण आणि कसे तयार करते? धंद्याचा विचार करून अनेक संस्थाच हे काम करत असतील का?

अतिशय प्राथमिक स्तरावर विषाणू म्हणजे संगणकाच्या नेहमीच्या कामात अडथळे आणणार्‍या किंवा संगणकाला नेहमीप्रमाणे काम करू न देणार्‍या इ. आज्ञावल्याच असल्याने संगणकाचे आणि आज्ञावली लिहिण्याचे विशेष ज्ञान असणार्‍या लोकांनाच यांची निर्मिती करणे शक्य आहे. सर्किट यांनी म्हटल्याप्रमाणे असे करण्यात विषाणूरोधक प्रणाल्या बनवणार्‍या संस्थांचा सहभाग असण्याची शक्यता कमीच.

आपल्या संगणकाला प्रादुर्भाव झाला आहे हे कसे ओळखावे?

संगणक नेहमी प्रमाणे न चालणे, काही फाईल्स डिरेक्टरीज़ दिसेनाश्या होणे अशी काही लक्षणे आहेत पण खात्री करण्यासाठी (आणि तातडीने योग्य तो उपाय करण्यासाठी) कोणतेही चांगले विषाणूरोधक संगणकावर असणे आवश्यक आहे.

हा प्रादुर्भाव करण्याचे कोण कोणते राजमार्ग आणि छुपे मार्ग आहेत?

घरगुती संगणकांच्या दृष्टीने पाहता विरोपांतून आलेल्या अटॅचमेंट्स, विषाणूबाधित संगणकाला जोडलेले रिमुव्हेबल स्टोरेज (यूएसबी डिस्क इ.) आपल्या संगणकाला जोडणे ही काही प्रमुख कारणे आहेत. बाकी "हजारो पानांचे पुस्तक भरेल इतके .. " मार्ग आहेत हेही खरेच.

हा प्रादुर्भाव रोखण्याचे कोण कोणते राजमार्ग आणि छुपे मार्ग आहेत?

कोणतेही चांगले विषाणूरोधक संगणकावर असावे आणि ते अद्ययावत असावे.

लिनक्स हा हल्ला रोखू शकते का?

लिनक्स ची सुरक्षेला अनुकूल संरचना, आणि आज्ञावल्या ('कोड' ला चपखल पर्यायी शब्द काय?) सर्वांना पाहता येणे शक्य असल्याने त्रुटींचे कमी प्रमाण (विषाणू किंवा कृमी त्रुटींचा फायदा घेऊनच उपद्रव करतात हे लक्षात घेता या मुद्द्याचे महत्त्व कळेल.) इ. प्रमुख कारणांमुळे लिनक्स वर धोक्याचे प्रमाण कमी आहे. म्हणूनच कदाचित ही यादी अतिशय लहान आहे.

चांगले..

चाणक्यराव,

हे सदर सुरू करून उत्तम केलेत. जाता जाता आम्हीही एक प्रश्न विचारू इच्छितो. येथील कुणी त्याबद्दल माहिती दिल्यास आणि इलाज सुचवल्यास आम्ही आभारी राहू..

गेले बरेच दिवस आमच्या संगणकातील डी ड्राईव्ह हा खूप कटकट करतो आहे. त्यातील कोणत्याही फाईल्स् उडवता येत नाहीत आणि त्या ड्राईव्ह मध्ये नव्याने कोणत्याही फाईल्स् वाचवता (सेव्ह करता) येत नाहीत. काय इलाज करावा बरं? आम्ही तर अगदी हैराण होऊन गेलो आहोत! असो..

अवांतर - चाणक्यराव, आपल्या नावाशी निगडीत, नुकतीच इथे एक लेखमाला सुरू झालेली आहे!

असो..

तात्या.

--
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

यु एस बी आणि फायफॉक्स

काहि दिवसांपुर्वी घरच्या संगणकावर फायरफॉक्स एक छोटी खिडकी उघडायची त्यात लिहिलेले असायचे, मी फायरफॉक्सचा द्वेष करत नाही, पण मला फायरफॉक्स आवडत नाही. इंटरनेट एक्सप्लोरर न्याहाळक वापरा. मग फायरफॉक्स न्याहाळकाची खिडकी बंद व्हायची. तपासाअंती कळले कि हा विषाणू यु एस बी मधुन येतो.

आपल्याला असेच काही विषाणू माहित आहेत का?

अवांतरः यु एस बी ला मराठी शब्द काय?

मराठीत लिहा. वापरा.

एव्हीजीची लस

संगणकावरच्या विषाणूंसाठी एव्हीजी हे तीव्र गुणकारी औषध आहे. वैयक्तिक वापरासाठी ते निःशुल्क आहे.

दुवा - http://free.grisoft.com/

स्नेहांकित,
शैलेश

प्रश्न सुटला! :)

आदरणीय खांडेकर गुरुजी,

संगणकावरच्या विषाणूंसाठी एव्हीजी हे तीव्र गुणकारी औषध आहे. वैयक्तिक वापरासाठी ते निःशुल्क आहे.

आपण दिलेल्या दुव्यावर जाऊन आम्ही एव्हीजी हे तीव्र गुणकारी औषध फुकटात पदरात पाडून घेतले व त्याची फवारणी (स्कॅन? ;) आमच्या संगणकावर केली. फवारणी पूर्ण झाल्यावर एव्हीजी ने आम्हाला संगणक बंद करून पुन्हा सुरू करण्याबद्दल (रीस्टार्ट) सांगितले.

आम्ही तसे केले आणि पाहतो तर काय, गेले बरेच दिवस जवळजवळ् बंदच असलेला आमच्या संगणकाचा डी कप्पा पुन्हा व्यवस्थित सुरू झाला! आता त्यातील फाईल्स् (मराठी शब्द?) उडवताही येत आहेत आणि त्यात नव्याने काही फाईल्स् वाचवताही येत आहेत!

संगणकाचा वेगही पूर्वीपेक्षा थोडा वाढल्याचे जाणवते आहे!

असो,

आपण एव्हीजी हे तीव्र गुणकारी औषध इथे सुचवलेत आणि त्यामुळेच आम्हाला त्याचा लाभ घेता आला, त्याबद्दल आपले अनेक आभार.

पर्यायाने, हे सदर इथे सुरू केल्याबद्दल आम्ही चाणक्यगुरुजींचेही आभार मानू इच्छितो! :)

आपला,
(औषध खाऊन बरा झालेला!) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!!

आभार / एव्हीजीचे वैशिष्ट्य

तात्या,

आपल्याला एव्हीजीचा उपयोग झाला हे वाचून आनंद झाला. खरोखरच, ह्या सदरासाठी आर्य चाणक्य यांचे मीसुद्धा आभार मानतो.

एव्हीजीचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे "विषाणू-लस" या सतत चालणा-या शिवाशिवीच्या खेळासाठी त्यांनी योग्य उपाय योजलेला आहे. दररोज नवीन विषाणू निर्माण होतात. त्यावर संशोधन करून साधारणपणे रोजच त्यावरील लसी एव्हीजीच्या संस्थळावर उपलब्ध असते. आपल्या संगणकावर एव्हीजीची स्थापना केल्यानंतर एक नवीन उपक्रम सुरू होतो. रोज केव्हाही आपण मायाजाळाला जोडणी केली तर त्या संस्थळावरून नवीन लसी चटकन आणि आपसूकच आपल्या संगणकावर उतरवल्या जातात. दैनंदिन फवारणीत त्या नवीन लसीचाही प्रयोग केल्या जातो. यामुळे संगणक विषाणूंपासून अधिक सुरक्षित राहण्यास मदत होते.

स्नेहांकित,
शैलेश

म्हणजे काय ?

अँटी व्हायरस म्हणजे नक्कि काय आणि अँटी स्पाय म्हणजे काय? आता म्हणाल तुला एवढंपण ज्ञान नाही का? पण हे खर आहे कि स्पायवेअर म्हणजे नक्कि काय असत हे आम्हाला माहित नाही.
बाजारात अनेक विषाणुरोधक प्रणाल्या असतात तसेच फुकट सुद्धा? मग चांगले कोणते?

मराठीत लिहा. वापरा.

स्पायवेअर

व्हायरस हा निव्वळ उपद्रव ह्या उद्देशाने बनवलेला असतो. स्पायवेअरचा प्राथमीक उद्देश हा उपद्रव नसून ते तुमच्यावर (जाहिरातींचा योग्य भडीमार करण्यासाठी) नजर ठेवण्याच्या उद्देशाने बनवलेले असते. एव्हीजी जे हे मोफत अँटीव्हायरस आहे तर 'विंडोज डिफेंडर' हे मायक्रोसॉफ्टने तयार केलेले मोफत अँटीस्पायवेअर आहे.

 
^ वर