दोन कोडी

()
...कागदाची लांबी :वृत्तपत्र छपाईचा कागद मोठमोठ्या रिळांच्या स्वरूपात येतो.मधे एक पोकळ दंडगोल असतो.समजा त्या दंडगोलाचा (सिलिंडर) बाहेरचा व्यास सोळा (१६) सेमी. आहे. त्यावर कागद गुंडाळलेला असून कागदाच्या रिळाचा बाहेरचा व्यास नव्वद (९०) सेमी. आहे.
....या कागदाची जाडी (थिकनेस)एक दशांश मिलिमिटर असल्यास अशा एका रिळातील कागदाची एकूण लांबी किती? म्हणजे कागद उलगडत एका सरळ रेषेत चालत गेल्यास एकूण किती अंतर चालावे लागेल? (ही मापे प्रत्यक्ष घेतलेली नाहीत. मानलेली आहेत).
..................................................................................
()
सर्वांहुनी निराळे : श्रीयुत जनोबा रेगे यांचा टुमदार बंगला आहे.मागील दारी बाग आहे.बागेत केळी आणि भाजी पाला आहे. नाना प्रकरची फुलझाडे आहेत.पुष्पलता आहेत. कमळांसाठी एक तळेही आहे. त्यात श्वेत कमले, रक्तकमले आणि नीलोत्पले प्रफुल्लित झालेली असतात.
जनोबांना बागकामाची आवड आहे.ते सकाळी अंड्यांचे आमलेट करून खातात.मग बागकामाला लागतात. हा त्यांचा नित्यक्रम आहे.
....जनोबांनी एकही कोंबडी पाळलेली नाही.ते अंडी विकत आणत नाहीत. फुलांच्या अथवा अन्य कशाच्याही बदल्यात (बार्टर) अंडी घेत नाहीत.फुकट अथवा उसनवार घेत नाहीत. चोरून आणत नाहीत. कोणी त्यांना अंडी आणून देत नाही..कुठली बाहेरची कोंबडी त्यांच्या बंगल्याच्या आवारत येऊन अंडी घालून जाते, आयती अंडी मिळतात असेही नाही.
...तरीसुद्धा श्रीयुत जनोबा रेगे रोज सकाळी ताज्या अंड्यांचे आमलेट करून खातात, हे कसे?
....................................................................................
कृपया उत्तर व्यनि. ने.
........................................................................

लेखनविषय: दुवे:

Comments

उत्तर

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
(२)" सर्वांहुनी निराळे.. " या कोड्याचे अचूक उत्तर सर्वप्रथम श्री. सुनील यांनी पाठविले.

उत्तरे

(ब) सर्वांहुनी निराळे... या कोड्याचे उत्तर मीरा फाटक यांनी बरोबर शोधले आहे.

सर्वांहुनी निराळे .....

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
जनोबा रेगे यांना आमलेटासाठी अंडीं कुठून मिळतात ? याचे रहस्य पुढील सदस्यांनी अचूक उलगडले आहे :
सर्वश्री: सुनील , सहज , धनंजय
.........वाचक्नवी , टग्या, टिऊ
.........आजानुकर्ण, तो, महेश हातोळकर.
तसेच... मीरा फाटक.
..........................................................................
श्री.सुनील यांनी 'लॅटरल थिंकिंग 'वर काही कोडी दिली त्या प्रकारचे हे कोडे आहे.
कोडे तसे सोपेच आहे.श्री.धनंजय यांनी एक साधा फुटकळ विचार व्यक्त केला तेच कोड्याचे उत्तर निघाले. शीर्षकातही सूचकता आहे. "एका तळ्यात होती बदके...." या सुपरिचित गीतातील ते शब्द आहेत. पूर्ण कविता अशी:

एका तळ्यात होती, बदकेपिले सुरेख
होते कुरूप वेडे, पिल्लू तयांत एक
कोणी न घेत त्याला, खेळावयास संगे
सर्वांहुनी निराळे, ते एकले तरंगे
जो तो तयास टोची, दावी उगाच धाक|होते कुरूप वेडे..
एके दिनीं परंतू, पिल्लास त्या कळाले
भय वेड सर्व त्याचे, वार्‍यासवे पळाले
पाण्यात पाहताना, प्रतिबिंब ते क्षणैक
त्याचे तया कळाले, तो राजहंस एक

...............................................................................
कवि ग. दि. मा.

कागदाची लांबी

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. धनंजय यांनी कागदाच्या रिळाकडे बाजूने पाहिले. त्यांना काय दिसले? १६ सेमी. व्यासाचा एक पोकळ दंडगोल.त्यावर ३७ सेमी. जाडीचा कागदाचा वर्तुळाकार थर.ते पाहून त्यानी कागदाची एकूण लांबी बरोबर काढली.
.....................................................................................
(इथे स्पायरलचा विचार अनावश्यक आहे. करण कागदाची जाडी (.०१मिमि.) अन्य मापांच्या तुलनेत) नगण्य आहे.
.................................................................................

कागदाची लांबी

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. टग्या यांनी कागदाची एकूण लांबी अचूक काढली आहे. त्यांनी लिहिलेली रीत समजण्यास सोपी असून आलेल्या उत्तरांत सर्वोत्तम आहे.

कागदाची लांबी

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
मीरा फाटक तसेच श्री. तो यांनी या प्रश्नाचे उत्तर पाठविले आहे. दोघांचीही उत्तरे बरोबर आहेत.
..................................................................................
दुसर्‍या कोड्याच्या संदर्भात श्री. तो लिहितात :"जनोबा रेगे (नाव ओळखीचे वाटते) बदकाच्या अंड्याचे ऑम्लेट खात असावेत."
......
हो. पूर्वी ते बटाट्याच्या चाळीत रहात असत.तेव्हा कोंबडीच्या अंड्याचे आमलेट खात. अलिकडेच टुमदार बंगल्यात राहायला आले.तेव्हा पासून बदकाची अंडी वापरतात.
.............................................................................

कागदाची लांबी

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
या कोड्याचे अचूक उत्तर शोधण्यात श्री. वाचक्नवी यशस्वी ठरले आहेत.

"वाचक्नवी"साठी कुठले सर्वनाम वापरावे?

अवांतर शंका :
मागे उपक्रमावरच "वाचक्नवी" या टोपणनावामागे गार्गी या विदुषीचा संदर्भ दिला गेला होता. आता येथील "वाचक्नवी" ही विद्वत्तापूर्ण व्यक्ती पुरुष की स्त्री याविषयी मला काही एक कर्तव्य नाही. पण गार्गीच्या संदर्भ दिल्यामुळे कुठला शब्दप्रयोग शुद्ध मानावा?
"वाचक्नवी यशस्वी ठरले आहेत" की "वाचक्नवी यशस्वी ठरल्या आहेत"?
मराठीत "वाचक्नवी" शब्द संदर्भाने पुल्लिंगी किंवा स्त्रीलंगी कसाही चालू शकतो. संस्कृतात स्त्रीलिंगातच.पुल्लिंगात "वाचक्नवि" (ह्रस्वांत).

अनुल्‍लेखाने मारावे.

पुरुष की स्त्री हे माहीत नसताना एखाद्या व्यक्तीसंबंधी लिहिताना कर्मणी/भावे प्रयोग वापरावा, नाहीतर नुसतेच अनुल्ल्‍लेखाने मारावे.---------वाचक्‍नवी

मराठीत कर्मणी/भावे कधीकधी अशक्य

हे इंग्रजीत चालते.
मराठीत वेगवेगळ्या आख्यातांत फक्त कर्तरीच, किंवा फक्त कर्मणीच, किंवा फक्त भावे प्रयोगच चलतात (हे सकर्मक/अकर्मकवर अवलंबून आहे).

येथे "सुहास" शब्दाचे उदाहरण घेऊ - पुरुष किंवा स्त्री, कोणीही असू शकते, हे स्पष्टच आहे - या प्रकारचे यनांचे एक कोडे होते.

सुहास येतो/येते. "सुहास येणे करीत आहेत" पर्याय आहे म्हणा, तरी हे विचित्र वाटते.
जर सुहास येता/येती... "जर सुहासने येणे केले असते..." ,,(वरची टिप्पणी खाली)''
सुहास आला/आली. "सुहासने येणे केले" ,,(वरची टिप्पणी खाली)''
सुहास यावा/यावी. या ठिकाणी "सुहासने यावे" प्रयोगाने अर्थ बदलतो. पर्याय?
सुहास येवो! इथे ठीक
इ.इ.

सुहास गाणे म्हणतो/म्हणते. "सुहासकडून गाणे म्हटले जाते." पर्याय आहे म्हणा, तरी किती बोजड आहे हा प्रयोग!
इ.इ.

आदर असला, किंवा संदर्भ प्रस्तुत असला, तर अनुल्लेखाने मारणे हे योग्य नाही, किंवा सोयीचे नाही.

त्यामुळे तुमची सुचवणी व्यवहार्य रीतीने लागू करता येईल असे वाटत नाही. (आतापर्यंत माझ्या लेखनात "वाचक्नवी" यांचा उल्लेख करताना तीच रीत लागू आहे असे लक्षात येईल, पण त्यामुळे माझ्या शैलीत आलेला बोजडपणाही डोळ्यात खुपलाही असेल.)

प्रकाटाआ

प्रकाटाआ.

उर्दूत लिहावे

उर्दू शायरीत कर्ता/कर्त्याचे लिंग संदिग्ध ठेवण्याची परंपरा आहे व ते शोभूनही दिसते, तेव्हा उर्दूत लिहिण्याचाही पर्याय आहे.
शिवाय उर्दू देचनागरीत लिहिले तर कळेलही व येथे कोणी आक्षेप घेईल असे वाटत नाही.

कागदाची लांबी

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. अमित कुलकर्णी यांनी या प्रश्नाचे उत्तर पाठविले आहे. त्यांनी अगदी मूलभूत पद्धतीने अंकगणिती श्रेढी (ए.पी.) लिहून सर्व पदांची बेरीज सूत्र वापरून केली.याप्रमाणे अचूक उत्तर काढण्यात त्यांना यश मिळाले.

कागदाची लांबी

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
या प्रश्नाचे श्री.टग्या यांनी पाठविलेले उत्तर असे:
....." कागदाची लांबी:
रिळाचा बाहेरचा व्यास = ९० सेमी = ०.९ मीटर
दंडगोलाचा बाहेरचा व्यास = १६ सेमी = ०.१६ मीटर
तेव्हा कागदाच्या एका आवर्तनाचा सरासरी व्यास = (०.९ + ०.१६) / २ = १.०६ / २ = ०.५३ मीटर.

भेंडोळ्याची जाडी = (०.९ - ०.१६) / २ = ०.७४ / २ = ०.३७ मीटर.
कागदाची जाडी = ०.१ मिमी = ०.०००१ मीटर.
तेव्हा भेंडोळ्यातील कागदाची आवर्तने = ०.३७ / ०.०००१ = ०.३७ x १०,००० = ३७००.

यावरून कागदाची लांबी = एका आवर्तनाचा सरासरी परीघ x आवर्तनांची संख्या
= पाय x एका आवर्तनाचा सरासरी व्यास x आवर्तनांची संख्या
= पाय x ०.५३ मीटर x ३७००
= (पाय x ०.५३ x ३७००) मीटर
= (पाय x ५३ x ३७) मीटर
= (पाय x १९६१) मीटर
= (३.१४ *१९६१) मीटर अंदाजे
= ६१५७.५४ मीटर अंदाजे.

**************************************************

आकडेमोड

हीच आकडेमोड [एकूण क्षेत्रफळ/ कागदाची जाडी = (पाय / ४ (०.९०^२-०.१६^२)) / ०.०००१ =६१६०.६६३] अशी देखील करता येईल.

टोपणनाव आणि शब्द

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
टोपणनाव (आय.डी) म्हणजे अक्षरमालिका.(कधी अंकांचाही अंतर्भाव असतो).ही अक्षरमालिका म्हणजे शब्द असला पाहिजे असे नव्हे. शब्दामुळे एखादी वस्तू अथवा कल्पना व्यक्त होणे आवश्यक असते.टोपणनावाचा अर्थ म्हणजे ज्या व्यक्तीने ते नाव धारण केले आहे ती नखशिखान्त व्यक्ती...उदा. यनावाला. हे टोपणनाव आहे. हा शब्द नव्हे. टोपणनाव हा भाषेतील शब्द नसल्याने त्याच्या व्याकरणशुद्धतेची चिकित्सा संभवत नाही. गीतेत श्रीकृष्णाचे नाव हृषीकेश असे आहे. म्हणून ऋषिकेश टोपणनाव चुकीचे म्हणता येत नाही. मात्र श्री.तो यांच्या संबंधाने "..त्याने/त्यांनी लिहिले आहे.." असे म्हणणे चुकीचे आहे. कारण इथे 'तो' हे सर्वनाम नसून विशेषनाम आहे म्हणून "...श्री. तो यांनी म्ह्टले आहे...." असे लिहिणेच योग्य.

वाचक्नवी

या टोपणनावाची चिकित्सा संभवत नाही.( तरी श्री. धनंजय यांच्या शंकेचे निरसन होत नाही. )
आता 'वाचक्नवी' या शब्दा विषयी :
पूर्वी 'वचक्नु' नावाचे ऋषी होऊन गेले. त्यांची कन्या 'गार्गी.' "तस्य अपत्यम् "नियमाप्रमाणे:
वचक्नुपुत्री---> वाचक्नवी. तसेचः
वचक्नुपुत्र----> वाचक्नव. जसे:मनुपुत्र-->मानव, शंतनुपुत्र--> शांतनव (भीष्म)
'वाचक्नवी' शब्दाचा आणखी एक अर्थ संभवतो.
'वाचक्नवी" म्हणजे 'वाचक्नवनिर्मित' "वाचक्नवाचे". जसे: मानवनिर्मित--> मानवी, हेमाडपंत निर्मित--> हेमाडपंती., सावरकरांचे सावरकरी इ.

?

मौनं‌ सर्वार्थसाधनम्‌!--वाचक्‍नवी

 
^ वर