लोकमित्र मंडळ

श्री. धनंजय यांचा लेख वाचून`प्रकर्षाने वाटले की हा लेख अनेकांच्या वाचनात यायला हवा. तेव्हा एक कल्पना तरळली. आता विचारान्ती ती अव्यवहार्य असावी असे वाटते. पण इथे मांडण्यात प्रत्यवाय नसावा.
गृहीतके :
*विवेकी व्यक्तीला समाजिक बांधिलकीची जाणीव असते.त्यासाठी काही करावेसे वाटते.
*सांघिकपणे अधिक चांगले आणि व्यापक कार्य होते.
*चांगल्या वाचनाने उद्बोधन आणि विचारपरिवर्तन होऊ शकते.
..म्हणून "उपक्रमाच्या" संमतीने आपण :
**एक मंडळ स्थापावे. समजा,लोकमित्र मंडळ.
**मंडळाचे एक अध्यक्ष असावे. समजा ,श्री. प्रकाश घाटपांडे.
** दोन कार्यवाह असावे. समजा, श्री. योगेश (आ'कर्ण), प्रा. डॉ. बिरुटे.
**नाममात्र शुल्क , समजा रु २००/,कार्यवाहांकडे पाठवल्यावर सभासदत्व निश्चित वावे.
कार्यपद्धती:
** महाराष्ट्रातील अग्रगण्य (जिल्हापातळी पर्यंत) नियतकालिकांची नावे, पत्ते,ई-पत्ते, इ माहिती गोळा करावी.
** निवडक नियतकालिकांच्या (दै., सा., मा.) संपादकांना पत्रे पाठवून आपली योजना कळवावी.
** सभासदांच्या वाचनात जे उपयुक्त लेख येतील ते इथे स्थापित करावे.(शब्दमर्यादा हवी.)
* सर्वांनुमते ठरलेले लेख नियतकालिकांकडे पाठवावे.
....प्रसिद्धी निश्चित मिळेल.मूलस्रोताचा ऋणनिर्देश करावा. म्हणजे प्रताधिकाराचा प्रश्न उपस्थित होणार नाही.
** पुढे सुचतील तसे विविध उपक्रम हाती घेता येतील. शैक्षणिक संस्थांशी संपर्क साधता येईल. संगणक (इंटरनेटसह) जिल्हा पातळी पर्यंत पोहोचला आहे. त्याचा उपयोग करून घेता येईल.
......श्री.धनंजय यांच्या लेखाच्या निमित्ताने मनात आलेली कल्पना मांडली एवढेच.

लेखनविषय: दुवे:

Comments

चांगली

अतिशय उत्तम कल्पना. नियतकालिके व ऑनलाईन मराठी लेखन यांनी एकत्र काम केले तर ते दोघांच्याही फायद्याचे होईल. नियतकालिकांचा व मराठी संकेतस्थळांचा वाचकवर्ग वाढेल.

-- आजानुकर्ण

आवडली

कल्पना नक्कीच चांगली आहे आणि आवडली. त्याचे सर्व "लॉजिस्टीक्स" पहावे लागेल इतकेच सांगावेसे वाटले.

शाळा

उत्तम कल्पना आहे,
मी सामील व्हायला लगेच तयार आहे.

याशिवाय जितक्या मराठी शाळा उपक्रमात येतील तितकेही चांगलेच.
त्यांना युसेबल वाटेल असे आपण काय देवू शकतो असाही विचार यात यावा.

आपला
गुंडोपंत

कल्पना मस्तच

कल्पना मस्तच.. पण उपलब्ध "रिसोर्सेस्" आणि तिसर्‍यापक्षावरील (म्हणजे नियतकालिके वगैरे) अवलंबित्व यामुळे अंबलबजावणी कितपत जमेल याबाबत साशंकता आहे. तरिही असा उपक्रम सुरु झाल्यास अथवा सुरु करायचा ठरल्यास माझा सक्रिय सहभाग गृहित धरावा कारण कल्पना फारच आवडली आहे

(साशंक तरीही उत्सुक)ऋषिकेश

लेखांचे विषय

लेख विचारप्रवर्तक हवेत. त्यांचे विषय काळजीपूर्वक निवडायला पाहिजेत. फॅशन, शृंगार, चालू खेळ-क्रीडा, गुन्हेगारी , गलिच्छ राजकारण, निवडणुका वगैरे तत्कालीन महत्त्व असलेले विषय नकोत. ज्यांची वाचननीयता कालान्तरानेही टिकून राहील असेच लेख पाहिजेत.
विषयवार अनुक्रमणिका पाहिजे. एखादा लेख दोन तीन विषयांना स्पर्श करीत असेल तर त्याचे नाव तितक्या याद्यांत येणे श्रेयस्कर. --वाचक्‍नवी

वाचननीयता की वाचनीयता

एक शंका वाटली म्हणून. सहसा तुमच्याकडून चुका होत नाहीत. हा वेगळा शब्द आहे का?

यासोबतचः विश्रब्ध आणि विदग्ध यांचे अर्थ काय हे सांगू शकाल का? काही जणांशी झालेल्या संवादातून माझा थोडा गोंधळ झाला आहे. विशेष म्हणजे दोन्ही लोक अतिशय विद्वान आहेत पण त्यांनी या शब्दांचे सांगितलेले अर्थ वेगवेगळे आहेत.

यातला शृंगार...

यातला 'शृंगार' हा विभाग मात्र घ्यावा.
याचे महत्व काही फक्त तत्कालीन वाटत नाही.
हा फार महत्वाचा विषय आहे.
विट्ठल कामत त्यांच्या 'निरामय कामजीवन' या पुस्तकातही हेच प्रतिपादन करतात की, लैंगिक शिक्षणात कामक्रिया सांगितली जाते हो पण त्या आधी च्या शृंगाराचे काय? त्याविषयी कुणीच काही बोलत नाही... हा विषय दडपून टाकला जातो.
जगातल्या बहुतेक महत्वाच्या घडामोडीं मागचे रहस्य खुले झाले तर हेच कारण सापडेल असे वाटते. तेंव्हा या विषयाला चिरंतन महत्व आहे.
मग त्याच्या जोडीनेच फॅशनही येणारच, नाही का?
आज जर फॅशन या विषयाला घेवून मला पदवी शिक्षण घेणे शक्य आहे तर मग तो विषय येथेही का नको?

इतरांनीही आपापल्या विषयावर बोला...
हा माझा आवडता विषय जिव्हाळ्याचा असल्याने मी यावर बोललो!

आपला
गुंडोपंत शृंगारपुरे

कामत नव्हे प्रभू!

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
"विट्ठल कामत त्यांच्या 'निरामय कामजीवन' या पुस्तकातही हेच प्रतिपादन करतात"

विठ्ठल कामत नव्हे ! डॉ.विठ्ठल प्रभू म्हणा!
कामत हॉटेलवाले---ऑर्किड आणि इडलीचे लेखक.
डॉ. विठठल प्रभू हे "निरामय कामजीवन" चे लेखक आहेत.

शृंगार

श्रूंगार हा शब्द मी साजशृंगार या अर्थी वापरला होता. दिवाळीच्या किंवा नाताळच्या वेळी घर कसे शृंगारावे, इथपर्यंत शृंगार ठीक आहे,
पण चेहर्‍याची रंगरंगोटी कशी करावी, कुठला शाम्पू वापरावा, ओष्टशलाकेचा रंग कसा निवडावा वगैरे वगैरे ज्या शारीरिक चोचल्यांच्या सविस्तर वर्णनांसाठी आज वर्तमानपत्रातली अनेक पाने खर्ची पडतात, तसल्या क्षणभंगुर विषयावरचे लिखाण इथे यायला नको एवढाच माझा मुद्दा होता.
पुत्र व्हावा ऐसा 'गुंडा' ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. अशा 'गुंडो'पंतांना अभिप्रेत असलेल्या शृंगाराला विरोध करायची कुणाची शामत आहे? --वाचक्‍नवी

न मी विश्रब्ध न विदग्ध.

खालच्या मजल्यावरून आग लागल्यासारख्या हाका ऐकू आल्या म्हणून दरवाजा उघडायला खाली जाणे भाग पडल्याने घाईघाईने प्रतिसाद पाठवला. परिणामी टंकन दोष घडला. अर्थात इतर कारणानेही होऊ शकतो. आत्तापुरती ही सबब! वाचनीयता हा शब्द दहावेळा टंकून डोळ्यात ठसवला. यापुढे निदान हा शब्द टंकताना चूक होणार नाही अशी अपेक्षा आहे.
विदग्ध म्हणजे विद्वान हे नक्की. विश्रब्ध मधला मूळ धातू विश्रम्भ्‌(१ आत्मने). अर्थ विश्वास टाकणे, आत्मविश्वास असणे. विश्रम्भ हे नाम
देखील आहे. अर्थ विश्वास, खात्री, विश्रांती. विश्रब्ध चे शब्दकोशातील अर्थ: विश्वासणारा; विश्वासू; निश्चिंत, निर्भय; धमक असलेला, जोमदार; शांत, निश्चल; नम्र वगैरे.
विश्रब्धशारदा असे एका संस्कृत नियतकालिकाचे नाव होते. तिथे कुठला अर्थ अभिप्रेत होता ते अजूनही माहीत नाही. विद्वान शारदा असाच अर्थ असावा असे धरून सर्वजण चालत असावेत. आता वाटतंय की ती शारदा नम्र आणि विश्वासू (फेथफुल ऍन्ड मोस्ट ओबिडियन्ट) असावी.
तुमच्या विद्वान मित्रांचे काय म्हणणे होते?--वाचक्‍नवी

विश्रब्ध व विदग्ध

विदग्ध चा अर्थ एका व्यक्तीने विद्वान असा सांगितला तर दुसर्‍या व्यक्तीने ज्याला आपण "क्लासिकल" वगैरे म्हणू (अभिजात??) तसा
विश्रब्ध चा अर्थ विश्रांती घेणारा असा एकाने सांगितला तर दुसर्‍याने शांत (मौनधारक वगैरे) असा सांगितला.

विश्रब्ध, विदग्ध

या शब्दांचे श्री. वाचक्नवी यांनी दिलेले अर्थ, माझ्यामते अगदी अचूक आहेत.
"विश्रब्ध शारदा "( ले. ह. वि मोटे ) या द्विखंडी ग्रंथात विविध क्षेत्रांतील प्रसिद्ध व्यक्तींचा वैयक्तिक पत्रव्यवहार छापला आहे.हे सर्व विश्वासार्ह आहे हे सुचविण्यासाठी विश्रब्ध शारदा असे शीर्षक आहे.दोन्ही खंड वाचनीय आहेत.टिळक- आगरकर वादाचे मूळ कारण त्यांच्या पत्रांतून कळू शकते.

विश्रब्ध शारदा

मी विश्रब्ध शारदा या संस्कृत नियतकालिकासंबंधी लिहिले होते. यनावाला ज्या द्विखंडी ग्रंथाबद्दल लिहिताहेत त्या ग्रंथाच्या नावात विश्रब्ध शब्द वेगळ्या अर्थाने वापरला असावा असे मला पहिल्यापासून वाटत आले आहे. वि+श्रंभ्‌ या धातूपासून विश्रंभ: असे एक नाम होते. त्याचा अर्थ गुप्त गोष्ट, रहस्य किंवा प्रेमकलह असाही आहे. या मोटे संपादित ग्रंथात साहित्यिकांची (गुप्त)प्रेमपत्रे आणि त्यांच्या खासगी आयुष्यातील प्रेमकलहासंबंधी लिखाण आहे. त्यावरून विश्रब्ध शारदा याचा शारदासेवकांची रहस्ये/प्रेमकलहे असा असला पाहिजे अशी माझी त्या काळी कल्पना होती. कदाचित चुकीची असेल.
काही झाले तरी विश्रब्ध म्हणजे विद्वान नाही हे नक्की.--वाचक्‍नवी

विश्रब्ध शारदा

माझ्या प्रतिसादात मी विश्रब्ध शारदा या संस्कृत नियतकालिकाचा उल्लेख केला होता. श्री. यनावाला लिहीत आहेत ते मोटे-संपादित विश्रब्ध शारदा या द्विखंडी ग्रंथाबद्दल. या ग्रंथनामातील विश्रब्ध ह्या शब्दाचा वेगळाच अर्थ आजवर माझ्या मनात होता. ज्या वि+श्रंभ्‌
धातूपासून हा शब्द बनला त्याच धातूपासून विश्रंभ: हे नाम बनते. त्याच्या अनेक अर्थांपैकी गुपित, रहस्य, प्रेमकलह हेही अर्थ आहेत. हे अर्थ विश्रब्ध या विशेषणामध्येही असावेत. त्यामुळे, शारदासेवकांची गुपिते आणि त्यांचे प्रेमकलह या ग्रंथात चर्चिले गेले आहेत म्हणून तो 'विश्रब्ध शारदा', अशी माझी त्याकाळी कल्पना होती. अर्थात,कल्पना चुकीची असू शकते.
पण विश्रब्ध म्हणजे 'विद्वान' नाही हे नक्की!--वाचक्‍नवी

विदग्ध

म्हणजे जे जाळता येत नाही (नष्ट होत नाही) ते, (अभंगाच्या धर्तीवर) असेच ना?

उलटसुलट अर्थ!

'विदग्ध' चे कै वि. वा भिडे(जन्म १८६०, मृत्यू १९३६)-लिखित १९३० साली प्रकाशित झालेल्या 'सरस्वती शब्दकोशा'तील अर्थ:(विशेषण) १. चतुर. २. कारस्थानी; मुत्सद्देगिरीचा. ३. सभ्य चालीरीतीचा. ४. सुंदर. ५. वरच्या दर्जाचे आणि सभ्य आणि करमणूक करणारे (वाङ्‌मय ). ६. शिजवलेले. ७. जळून खाक झालेला (पदार्थ,-भात, भाकरी, औषध, इ.). ८. कोठ्यात पूर्णपणे न पचलेले (अन्‍न). ९. अर्धवट शिजलेले. १०. यथायोग्य प्रकारे शिजवलेले. ११. (नाम पुल्लिंगी) विद्वान; पंडित.
अभिजात(वि) म्हणजे मूळचा; सभ्य; सुंदर; कुलीन; न्याय्य, योग्य; विद्वान; (नाम)उच्चकुळात जन्म; जन्म, उत्पती. वगैरे वगैरे. यातले सभ्य आणि सुंदर हे दोनच अर्थ विदग्धशी जुळतात. एकाचा अर्थ विद्वान हे विशेषण आहे तर दुसर्‍याचा विद्वान हे नाम.
अनेक वर्षांच्या कालावधीनंतर या शब्दांचे व्यवहारातील अर्थ बदलले असावेत. --वाचक्‍नवी

मनःपूर्वक पाठिंबा

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"लोकमित्र मंडळ " या कल्पनेला सर्वश्री. आ'कर्ण,विकास, गुंडोपंत,ऋषीकेश,सर्किट,आणि वाचक्नवी यांनी पाठिंबा दर्शविला आहे तो नि:संशय मनःपूर्वक आहे. या संदर्भात काही करणे शक्य असल्यास ते आपण सर्वांनुमते करायचे आहे. प्रथम कार्यकारी मंडळ ठरायला हवे.

पूर्ण पाठिंबा

त्यात माझेही नाव जोडा. कार्यकारी मंडळ शक्यतोवर भारतात असावे, त्यांना आपल्या खर्‍या नावांसकट/कागदी पत्रांच्या पत्त्यासकट पत्रव्यवहार करता यावा.

सर्वानुमत सुरुवातीला महत्त्वाचे. ते तसेच योग्य आहे. (सर्वानुमत = प्रत्येक सदस्यापाशी नकाराधिकार.)

मंडळ लहान असेपर्यंत सदस्य नकाराधिकाराचा वापर काळजीपूर्वक करतील अशी परस्पर-सुहृद म्हणून अपेक्षा करता येते. मंडळ १० सदस्यांपेक्षा मोठे झाले, की नकाराधिकाराने कामकाज थिजू शकेल.

धनंजय

उत्तम कल्पना..

कल्पना फारच छान आहे. माझे सभासदस्यत्व निश्चित! किंबहुना "खारीचा वाटा" उचलण्यासही उत्सुक.

(खारूदादा) सुनील

कल्पना उत्तम आहे

कल्पना उत्तम आहे. कार्यकारी मंडळ भारतातील असावे या धनंजयांच्या म्हणण्याशी सहमत.

सर्वांना शुभेच्छा!

असेच

म्हणतो. प्रतिसादांशी सहमत आहे. पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलासुद्धा सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका...विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

आमचाही सहभाग !!

कल्पना आवडली.
आम्हालाही या उपक्रमात सहभागी करुन घेत असाल तर ,आम्हीही आनंदाने सहभागी होऊ.
काही तरी मदत करु !!!

अवांतर :) आम्हाला वाटले यनांचे नवीन कोडे आले की काय, म्हणून आम्ही केवळ शिर्षकच वाचत होतो इतक्या दिवस.
पण, प्रतिसाद वाढलेले पाहून वाटले सोपे कोडे असावे म्हणुन पेज उघडले तर, आज ह्या उपक्रमाची बातमी वाचली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मलाही

मलाही तसेच वाटले हो!
मी पण कोडी सोडवण्या इतकी बुद्धी नसल्याने फक्त वाचत असतो.
त्यात चक्क मला काही करण्यासारखे दिसल्याने आनंद झाला...
आपला
गुंडोपंत

धनंजय

श्री धनंजय यांचा " विज्ञानाबाबत माझी पुर्वपिठिका " हा लेख "आजचा सुधारक" या विवेकवादी व चिंतनशील मासिकात डिसेंबर २००७ पान नं ४०८ वर छापून आला आहे.
http://misalpav.com/tracker/27 येथे सुधारक ची काय गोची झाली आहे ते बघा.
अवांतर- श्री धनंजय यांचा लेख "सुधारक" साठी पर्वणीच आहे असे भाकीत आम्ही मागेच केल्याचे स्मरत असेल.

प्रकाश घाटपांडे

कल्पना आवडली

आधी बिरूटे सर आणि गुंडोपंत यांप्रमाणे कोडे वाटले होते!
असो. कल्पना आवडली. फक्त असे वाटते की कार्यवाहांना जे काही थोडेफार काम पडेल त्यासाठी सुरूवातीला काही एक ठराविक मानधन मिळावे. उपक्रम, मिपा इत्यादी संकेतस्थळे हे काम सध्या तरी विनामूल्य करीत आहेत, पण एकदुकट्या व्यक्तींकडून अशी अपेक्षा करता येईल असे वाटत नाही. मानधन अगदी कमी असले तरी चालेल, पण प्रकल्प अनेक वर्षे चालावा असे असल्यास थोडे का होईना मानधन द्यावे असे माझे मत आहे.

बाकी भारतातून हे व्हावे याला अनुमोदन, सभासदत्व घेईन आणि थोडेफार आर्थिक सहाय्यही करू शकेन.

लोकमित्र मंडळ

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
***********************************
आपण सर्व सदस्य इथे येतो. वाचतो. लिहितो. प्रतिसाद देतो. आपल्याला नवी माहिती, ज्ञान मिळते. आनंद होतो. वेळ चांगला जातो. उपक्रमाचे अनेक ज्ञानसमृद्ध , गुणसमृद्ध ,सदस्य आहेत.म्हणून याही पेक्षा अधिक काही व्हावे असे वाटले यास्तव श्री. धनंजय यांच्या लेखाच्या निमित्ताने ही कल्पना मांडली. (व्यवहार्यतेविषयी मी अजूनही साशंक आहे. पण प्रायोगिक तत्त्वावर काही करून बघता येईल असे वाटते.)
.. या ई-मंडळाचे कार्यवाहपद श्री.योगेश आणि प्रा. डॉ.दिलीप बिरुटे हे स्वीकारतील (किंबहुना स्वीकारले आहे) असे आपण गृहीत धरूया. श्री. प्रकाश घाटपांडे यांनी अध्यक्षपदी यावे अशी आपण त्यांना विनंती करूया.(व्यनि.पाठवून आपणा सर्वांतर्फे मी विनंती केलीच आहे.) याविषयी आणखी काही सूचना सदस्यांनी अवश्य कराव्या.
प्रथम "उपक्रम"कर्त्यांची संमती घेणे आवश्यक आहे.

उपक्रमाची संमती

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
आपण हे सर्व उपक्रमाच्या माध्यमातून करीत आहोत, करणार आहोत. त्यामुळे त्यांची संमती लागेल असे मला वाटले.

उपक्रम

या आणि अश्या इतर उपक्रमांसाठी या संकेतस्थळाचा माध्यम म्हणून वापर होणे ही आनंदाची गोष्ट आहे. अश्या उपक्रमांसाठी, प्रकल्पांसाठी उपक्रम व्यवस्थापनाचे अनुमोदन आणि आवश्यक ते तांत्रिक सहकार्य गृहीत धरण्यास हरकत नाही.

सदस्यांची कागदोपत्री "खरी" नावे असल्यास बरे

श्री. घाटपांडे यांचे नाव फार चांगले असल्याचे हेही कारण आहे, की या सर्व संकेतस्थळांवर त्यांची जी ओळख आहे, पत्ता आहे, दूरध्वनी आहे, ती सर्व ओळख अन्य प्रसिद्धी माध्यमांतून पडताळण्यासारखी आहे.

उपक्रमावर पूर्ण नाव/पत्ता न देता वावर करणे सोयीचेच नाही, तर सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यामुळे अनेक लोक अशा प्रकारे येथे वावरत असतील.

मंडळ मात्र स्थिर प्रसिद्धीमाध्यमांशी संपर्क साधेल. शक्यतोवर त्याचे सदस्य "मनुष्यव्यक्ती" आहेत, अशी नोंद कोणाकडेतरी असावी. सदस्यांनी अध्यक्षांकडे "बाहेरील विरोपाने" संपर्क साधून सदस्यत्व हवे असल्याचे सांगावे. सदस्यत्व मिळताना पैसे पाठवायचे आहेत, ते पाठवताना (धनादेशाने किंवा अन्य पद्धतीने) कार्यवाहाला पैसे पाठवणार्‍याची खरी ओळख कळणारच आहे. (कार्यवाहा-अध्यक्षा-व्यतिरिक्त सदस्याला निनावी राहायची मुभा असावी - पण अशा गुप्त सदस्याला नकाराधिकार वगैरे नसावा...)

उपक्रमावर मंडळाच्या बातम्या चर्चाव्यात हे चांगलेच. पण गूगलवर, किंवा याहूवर सदस्यांचा "बंद" ग्रूप असावा. असे कंपू "फक्त सदस्यांसाठी" असल्याकारणाने बर्‍यापैकी सुरक्षित असू शकतात. याबाबत सर्किट हो/नाही सांगू शकतील.

तूर्तास इतकेच सैरभैर विचार...

विदा सुरक्षित असण्याबाबत

ओळखीसाठी नवीन सदस्य पैसे भरतो, त्या पद्धतीचा फायदा घ्यावा - चेक-धनादेश, किंवा क्रेडिट कार्ड (पतपत्ती). पतपत्ती वापरण्यासाठी पतपेढीशी करार करावा लागेल, तो इतक्या लहान मंडळासाठी फार प्रयासाचा होऊ शकेल. धनादेशच बरा.

विदा सुरक्षित असण्यासाठी बंद कंपूची विचारणा करत होतो. कार्यवाह कंपूचा (मॉडरेटर) संचालक राहाणार. संस्था मालक असेल, मालकीची कर्तव्ये अध्यक्ष पार पाडणार. या लोकांनी सामान्य काळजी घेतली, सदस्यांतील पत्रव्यवहार फक्त अक्षरबद्ध (टेक्स्ट-ओन्ली, युनिकोड) असला, तर कंपूचा विदा फुटण्याची सहजशक्यता आहे का? ("सहज" कारण प्रयत्नाने कोणीही काहीही फोडू शकतो.) हा प्रश्न होता.

स्थानिक

स्थानिक वृत्तपत्रांविषयी माहीती मिळवण्या संदर्भात,
आपल्या पैकी 'जयेश ' हे सदस्य जाहिरात क्षेत्रात असल्याने ए बी सीची नक्कीच माहिती देवू शकतील.
या साठी ए बी सी (ऑडीट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन) चा वार्षीक अहवाल चांगला कामास येईल.

मात्र अशी वृत्तपत्रे निवडतांना ती 'चांगली' आहेत हे पाहून घेणे उत्तम राहील.
तसेच लोकमत सारखी वृत्तपत्रे अनेकदा दिशाभूल करणारी आंकडेवारी प्रसिद्ध करीत असतात, हे ही ध्यानात ठेवणे आवश्यक राहील.
जसे नाशकात त्यांनी खुप जाहिरात केली की त्यांनी एक लाखाच्या पुढे आकडा गाठला. व ते आता नं एक चे दैनिक झाले आहेत.
पण तो आकडा सर्क्युलेशन चा नसून प्रिंट ऑर्डरचा होता!!
पहिला क्रमांक दैनिक गावकरीचा होता नि आहे.

आपला
गुंडोपंत

+१

वा! कार्यकारी मंडळ वाचून आनंद झाला. पैसे कसे पाठवू ते कळवावे :)
बाकी धनंजय यांनी सुचविल्या प्रमाणे एक वेगळा बंद चमु याहु किंवा गुगलवर असावा यास +१
तसच खरे नाव कृपया अध्यक्ष व कार्यकारी मंडळाकडे तरी असावे यांसही +१

(आनंदी) ऋषिकेश

नियतकालिकात लेखन

येथे नियतकालिकांमध्ये लेखन करणारे कोणी आहे का? तिथे लेखन पाठवण्याची काय पद्धत असते? प्रकाश घाटपांडेंना थोडी माहिती असावी असे वाटते.

मनोगत्

इथे आहे की नाही याबद्दल कल्पना नाही. पण मनोगतावर 'आपले लेखन नियतकालिकात यावे असे वाटत असल्यास संपर्क साधा' अश्या आशयाचा मथळा वाचल्याचे स्मरते. लेखकाचे नाव निशब्द, माझी कविता, कि असेच काही होते.

नियतकालिकातील लेखन

१) त्या नियतकालिकाची प्रकृती. इतिहास, वाचकवर्ग विचारात घ्यावा लागतो
२) लेख/कथा/ स्तंभ यांच्या शब्द मर्यादा ते साप्ताहिक, मासिक कि दैनिक व पृष्ठ संख्या यावर ठरतो.
३) संपादकीय धोरण हे परिस्थिती नुसार /मंडळातील सदस्यांनुसार बदलत राहते.
४) कमी शब्दात आशयपुर्ण लिहिणे हे खरच अवघड असते. कधी कधी ख्यालगायकाला तीन मिनिटात गा असे म्हटल्या सारखे होते
५) मान्यवर लेखकांना / वशिला असलेल्यांना प्राधान्य मिळणे स्वाभाविक असते. अशावेळी विषय तसाच ठेवावा,कालांतराने तो प्रसिद्धियोग्य होउ शकतो. ती संधी लेखकाला साधता आली पाहिजे
६) नाकारले गेलेले लेखन म्हणजे "सुमार" दर्जाचे लेखन असतेच असे नाही. एखाद्या नियतकालिकात असलेला कचरा हा दुसर्‍या नियतकालिकासाठी संपत्ति असू शकतो.
७) स्वतःची टिमकी वाजवायला शिकले पाहिजे . ( ही मिडियातील मित्रांची टीप आहे)
अवांतर- मनोगत दिवाळी अंकात आलेला " माधव रिसबूड एक् कठोर फल ज्योतिष चिकित्सक " हा लेख मी व्यक्तिचित्रातून फलज्योतिष चिकित्सा या दृष्टीने " अंधश्रद्धा निर्मुलन वार्तापत्रासाठी " लिहिला होता. पण त्यांनी तो व्यक्तिमहात्म्य असल्याने तत्वच्चुतीचा प्रश्न करुन नाकारला. पण व्यक्ति चित्र याच कारणासाठी मनोगत तो स्विकारला. आता अंनिसचे संपादक मंडळ हे आमचेच् मित्र होते.
प्रकाश घाटपांडे

वालावलकरशेठ,

आपण मांडलेली कल्पना उत्तम आहे. मी काही मदत करू शकतो का? काही असेल तर अवश्य सांगा, मीही यथाशक्ति मदत करेन. मला ते आवडेल...

आपलाच,
तात्या.

--
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

लोकमित्र मडळ

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
*आपले नियोजित अध्यक्ष श्री. प्रकाश घाटपांडे यांनी अद्यापि होकार कळविलेला नाही.
*श्री.योगेश यांनी बँकेत खाते उघडावे ते मंडळाच्या नावे की वैयक्तिक? मंडळाच्या नावे असेल तर बँकेला ठराव लागेल. मंडळाचे नावही निश्चित करावे लागेल. सध्याचे नाव मी " आपले समजा" म्हणून सुचविले आहे.
*मंडळाचे मुद्रापत्र (लेटर हेड) छापून घ्यावे लागेल.त्याचे स्वरूप (नावे लिहिणे इ. ठरवावे लागेल.
* मंडळाची सभा सध्या पंधरा दिवसांतून एकदा व्हावी. दिवस आणि वेळ अध्यक्षांनी ठरवावे. त्यावेळी शक्य होईल तेवढ्या सभासदांनी लॉग इन व्हावे.

खाते

मंडळाच्या नावे खाते उघडण्याची काय पद्धत असते? कोणाही एका सदस्याच्या नावे खाते उघडणे नको. त्या गोष्टीचा "बस फॅक्टर" १ होईल. ;)

खाते उघडणे

या साठी ....
*मुद्रापत्रावर (लेटरहेड) लिहिलेला तसा ठराव.(रेझोल्यूशन).
*अध्यक्ष, कार्यवाह आणि लेखापाल (ऑडिटर) यांच्या सह्या.(यांपैकी कोणाही दोघांच्या सहीने खाते चालविता येते. म्ह्.पैसे काढणे, चेक देणे इ.म्हणून कार्यवाहांनी सोईच्या व्यक्तीला ऑडिटर म्हणून नामनिर्देशित (नॉमिनेट) करून घ्यावे.)
*सह्यांखाली त्या त्या पदाचा रबरी शिक्का.
.....खाते उघडण्यासाठी मंडळ नोंदणीकृत असणे आवश्यक नाही. बँक व्यवस्थापकाकडून हे माहिती मिळू शकेल.
*श्री. तात्यांनी लिहिलेल्या अन्य अटी नफा कमावणार्‍या संस्थांना लागू आहेत.
*मंडळाच्या एखाद्या सभासद व्यक्तीने सहकार खात्याकडे लेखी तक्रार केली तरच ते खाते मंडळाची चौकशी करते. अन्यथा अशा मंडळांच्या कारभारात सहकार खाते कधीही हस्तक्षेप करीत नाही.

प्रत्यक्ष भेटणे आवश्यक.

श्री.योगेश यांनी बँकेत खाते उघडावे ते मंडळाच्या नावे की वैयक्तिक?

योगेश यांच्यावर माझा स्वत:पेक्षाही जास्त विश्वास आहे, परंतु मुद्दा तो नाही. कोणत्याही सार्वजनिक स्वरुपाचे हिशेब हे कधीही व्यक्तिगत स्वरुपाचे असू नयेत असे मला वाटते!

मला वाटतं या कामासाठी इच्छुक मंडळींनी प्रत्यक्ष भेटून एक सभा घेणे आवश्यक आहे. माझ्या मते ऑनलाईन चर्चा करून होणारी ही कामे नव्हेत!

मंडळाच्या नावाने बँकेत खाते उघडायचे असेल तर मंडळ नोंदणीकृत हवे. मंडळ नोंदणीकृत करायचे असल्यास त्याचा प्रकार ठरवावा लागेल. म्हणजेच आपले मंडळ हे सार्वजनिक न्यास आहे की खाजगी न्यास आहे (पब्लिक किंवा प्रायव्हेट ट्रस्ट) हे आधी ठरवावे लागेल आणि त्याप्रमाणे अर्ज व मंडळाची घटना धर्मादाय आयुक्तांकडे सुपूर्द करावी लागेल. त्यानंतरच नोंदणीची कारवाई पूर्ण होऊ शकेल.

एकदा नोंदणी झाली की अध्यक्ष, कोषाध्यक्ष, सचिव वगैरे पदाधिकारी ठरवावे लागतील व ह्या मंडळींच्या सहीनेच बँकेत खाते उघडता येईल. बरं, एकदा मंडळ स्थापन झाले की मंडळाच्या सभा, मिनिटस् बुक, हिशेब व वार्षिक ताळेबंद इत्यादी गोष्टी मंडळाच्या पदाधिकार्‍यांना धर्मादाय आयुक्तांकडे दाखल कराव्या लागतील. शिवाय मंडळाचा ज्युरिस्डिक्शनही ठरवावा लागेल!!

असो! तर सांगायचा मुद्दा हा की अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या इच्छुक व्यक्तिंनी प्रत्यक्ष भेटल्याशिवाय ठरवता येणार नाहीत असे माझा अनुभव सांगतो!

आपला,
(सार्वजनिक न्यासांच्या कामकाजाची पद्धत कोळून प्यायलेला) तात्या अभ्यंकर.

तात्याशी पुर्णपणे सहमत

१) अशा प्रकारच्या संकल्पनातून॑च " युनिक फिचर्स" ही पुण्यातील संस्था तयार झाली आहे, १९८९ मध्ये. "अनुभव "हे त्यांचे मासिक व समकालीन प्रकाशन हे त्याचे भावंड शिवाय मिडिया हा वेगळा विभाग त्यांचा आहेच. श्री सुहास कुलकर्णी आता डॉ. यांचा तेव्हापासून परिचय आहे तसेच ती यशस्वी वाटचाल मी बघत आलो आहे.
२) http://mr.upakram.org/node/741 या ठीकाणी सर्किट यांनी मांडलेली अशीच कल्पना अधिक चर्चा न होता का थांबली हे मला समजले नाही. ती पुढे चालू ठेवावी
३) तात्यांनी मांडलेले मुद्दे मला अधिक व्यवहार्य वाटतात. कारण अशा प्रकारच्या मिटींगा मी केलेल्या आहेत. त्याचे नव्याचे नउ दिवस असे होते. धर्मादाय आयुक्तांकडे अशा अनेक नोंदण्या पडून आहेत.
४) याच प्रकारे "गुढचिकित्सा मंडळ" चे १९३५ चे स्कॅन् पुढच्या पोस्टिंग मध्ये टाकतो.
५) मला विवेकवादी म्हणवून घ्यायची भीती वाटते . का? पहा माझे ऑर्कूट प्रोफाईल http://www.orkut.com/Profile.aspx?uid=4023171411045231898

प्रकाश घाटपांडे

मटाच्या संकेतस्थळाविषयी!

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
ज्या लेखकांना आपले लेखन मटाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करायचे असेल त्यांनी हे वाचावे. अशा ठिकाणी लेख प्रसिद्ध केल्यास तो बर्‍याच वाचकांपर्यंत पोचेल असे वाटते. ह्यात एका पैशाचीही गुंतवणूक नाहीये हे विशेष!

आभार

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
" लोकमित्र मंडळ " या कल्पनेला अनेक सदस्यांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला. त्या सर्वांना धन्यवाद.
'उपक्रम'कारांनी मनःपूर्वक मान्यता दिली. त्यांचेही आभार." जरी उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा | तरी व्यर्थ भार विद्येचा||" हे उपक्रमाचे, म्हणून पर्यायाने प्रत्येक उपक्रमसदस्याचे ब्रीदवाक्य आहे, असे मी मानतो.

गड्या आपुला खेळ बरा |

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"लोकमित्र मंडळ "या कल्पनेच्या समूर्तते विषयी प्रारंभापसूनच साशंकता होती. परंतू अनेकांचे सकारात्मक प्रतिसाद वाचून अडचणींतून मार्ग निघेल असे वाटले.
अनेक अडचणींना तोंड देत विष्णुशास्त्री चिपळूणकर (१८५०-१८८२) यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. चित्रशाळा प्रेस, आर्यभूषण छापखाना,नवीन किताबखाना यांची मुहूर्तमेढ रोवली. निबंधमाला लिहिली.'केसरी' आणि 'मराठा' ही वृत्तपत्रे काढून जनजागृती केली. आणि वयाच्या बत्तीसाव्या वर्षी ते निवर्तले.
आपल्याला काहीच करता येऊ नये? असो. आपण चर्चाप्रस्ताव टाकू.माहितीपर लेख लिहू. प्रतिसाद देऊ. कोडीं घालू. व्यनि. पाठवू.व्याकरणाचा कीस काढू.मधून मधून लुटुपुटूची भांडणे करू. कशाला हवेत दुसरे नसते उद्योग? गड्या आपुला खेळ बरा !

मोठी माणसं!

अनेक अडचणींना तोंड देत विष्णुशास्त्री चिपळूणकर (१८५०-१८८२) यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. चित्रशाळा प्रेस, आर्यभूषण छापखाना,नवीन किताबखाना यांची मुहूर्तमेढ रोवली. निबंधमाला लिहिली.'केसरी' आणि 'मराठा' ही वृत्तपत्रे काढून जनजागृती केली. आणि वयाच्या बत्तीसाव्या वर्षी ते निवर्तले.

अहो, चिपळूणकर, टिळक, आगरकर ही मोठी माणसं होती, आपण सामान्य आहोत! :)

असो. आपण चर्चाप्रस्ताव टाकू.माहितीपर लेख लिहू. प्रतिसाद देऊ. कोडीं घालू. व्यनि. पाठवू.व्याकरणाचा कीस काढू.मधून मधून लुटुपुटूची भांडणे करू. कशाला हवेत दुसरे नसते उद्योग? गड्या आपुला खेळ बरा !

हे बाकी खरं बोललात बघा वालावलकरशेठ! :)

आपला,
(देवगडात बसून नुसत्या फुक्कटच्या गजाली करणारा!) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!!

व्यंजना-शक्ती

शब्दांना अर्थ धारण करणा वेगवेगळ्या प्रकारची शक्ती असते. पैकी "व्यंजना". यात शब्दांचा अर्थ नेहमीपेक्षा उलट असतो.

"कशाला हवेत दुसरे नसते उद्योग? गड्या आपुला खेळ बरा !"
इथे व्यंजना शक्ती लागू आहे.

मंडळ स्थापायला हे चारपाच सोपस्कार करावे लागतात, हे तर खरेच. गल्लीगल्लीचे गणेशचतुर्थी मंडळ असते. हे काम "चित्रशाळा प्रेस, आर्यभूषण छापखाना,नवीन किताबखाना, 'केसरी' आणि 'मराठा', वगैरे,वय वर्षे ३२पूर्वी स्थापणे" यांच्यापेक्षा सोपे असावे. असा काही वरील संदेशाचा रोख वाटतो.

अरे हजार कल्पना तर लढवून पाहू...

आधी करून तर पाहू... किमान एका माणसाला (हो बस फॅक्टर १!!)
"काही घडवावेसे" वाटले ना की झाले.
जगातली बहुतेक सगळी उदाहरणे ही बस फॅक्टर १ वरच उभी राहीली आहेत. (नंतर जग आलं असेल त्यात, पण सुरुवात फक्त १ ने झाली आहे!)
अहिंसावादी चळवळ (बस फॅक्टर १ फक्त गांधीजी!)
बांगला देश चे स्वातंत्र्य (बस फॅक्टर १ फक्त इंदिरा गांधी)
भारतात संगणकाला आणणे व पाठपुरावा (बस फॅक्टर १ राजीव गांधी!)
संस्थाने भारतात विलिनिकरण मोहीम (बस फॅक्टर १ फक्त सरदार वल्लभ भाई पटेल)
पाकिस्तानचा जन्म (बस फॅक्टर १ फक्त जीना!)
राजकपूरचे चित्रपट (बस फॅक्टर १ फक्त राज कपूर - संस्था चालू पण तो करिष्मा नाही!)
दादा कोंडके (बस फॅक्टर १ फक्त दादा!)

ममा टीना व्हियेतनाम मधील कार्य (बस फॅक्टर १ फक्त ममा टीना!)
१९००व्या शतकात शिक्षण (बस फॅक्टर १ फक्त ज्योतिबा फुले!)
गावोगाव स्वच्छतेचे महत्व पटवणे (बस फॅक्टर १ फक्त गाडगे महाराज!)

उपक्रम (बस फॅक्टर १ फक्त शशांक जोशी)
मिसळपाव (बस फॅक्टर १ फक्त तात्या)
माझेशब्द (बस फॅक्टर १ फक्त राज जैन)

पब्लीकला येड्यात काढणे (बस फॅक्टर १ फक्त अनिरुद्ध बापु!)
पब्लीकला 'आपले भक्त' करणे (बस फॅक्टर १ फक्त नरेंद्र महाराज!)
पब्लीकला नादी लावणे (बस फॅक्टर १ फक्त सत्यसाईबाबा!)

तुफान मोठा रिलायंसचा व्यवसाय उभा करणे (बस फॅक्टर १ फक्त धीरुभाई)
संगित क्षेत्रात नव्या लोकांना संधी देणारे दालन उघडणे (बस फॅक्टर १ फक्त गुलशन कुमार)

आता असं म्हणू नका की तो १ बस फॅक्टर गेला नि त्या संस्थाही गेल्या!
जास्त बस फॅक्टर वाल्या संस्था डब्यात गेल्या नाहीत का?
अगदी आमच्या प्रकाशरावांनी दिलेले गुढ चिकित्सा मंडळही गेलेच ना?

उलट एकटा माणूस पेटून जे काही करू शकतो ते खासच असते. फक्त ते 'पेटणे' आवश्यक आहे.
पॅशन महत्वाची... ती असेल तर जग इकडचे तिकडे करणे अशक्य नाही... पण ते स्फुल्लींग जोवर चेतवले जात नाही... तोवर कोळसाही इतर कोळश्यासारखा तसाच काळाच दिसतो. पण पेटला की इतरांनाही पेटवतो, असे नाही का वाटत?
वेगळ विचार हवा... राजे हो हा वेगळा विचार महत्वाचा आहे!
दर वेळेला त्या वेगळ्या विचारातून काही येईलच असे नाही... पण म्हणून 'वेगळा विचारच नको' असे आजिबात नको इतकेच!
आणि च्यामारी नाहीच जमले, तर नाही जमले. पुढे कसे जमेल हे तरी पाहता येईल!

एडिसननी नाही का हजार बल्ब बनवून पाहिले? आपणही ऑनलाईन संस्था उभारूनच पाहू.
कुणीकुणाचे तोंड पाहिले नाही म्हणून काय झाले? विचार नि तत्वे एक आहेत हे तर पाहिले ना? बास तर मग!
आपण हजार प्रकारे प्रयत्न करून पाहू... अरे हजार कल्पना तर लढवून पाहू...
एक तर उपयोगी कामाची असेलच ना?

आपला
(१ पॉझिटीव्ह बस फॅक्टर)
गुंडोपंत

आवडले

पब्लीकला येड्यात काढणे (बस फॅक्टर १ फक्त अनिरुद्ध बापु!)
पब्लीकला 'आपले भक्त' करणे (बस फॅक्टर १ फक्त नरेंद्र महाराज!)
पब्लीकला नादी लावणे (बस फॅक्टर १ फक्त सत्यसाईबाबा!)

हा हा हा.. मस्त!

(बाबा-बापुंच्या 'बस' में ना आनेवाला)
ऋषिकेश

होशील होशील

(बाबा-बापुंच्या 'बस' में ना आनेवाला)
ऋषिकेश

माझा एक भाऊ... "लग्नापुर्वी" असाच होत रे. कोणत्याच बस मध्ये न जाणारा...
एकदम डेंजर नि बिंधास, कुठेपण घुसणारा...

मग त्याचे लग्न झाले!!!
पाच वर्षात हा डेंजर पोरगा निट त्या कलावती आई नि कोणत्या तरी बुवांच्या त्रिपद्यांचे कार्यक्रम करत फिरायला लागला! पाहा बस फॅक्टरची पावर !!! पोरगा 'बसलाच' की!
आताही आहे म्हणे एक कार्यक्रम...

आपला
गुंडोपंत

:)

:)))

(लग्न न झाल्याने सध्या डेंजर नि बिंधास्त) ऋषिकेश

 
^ वर