लोकमित्र मंडळ

श्री. धनंजय यांचा लेख वाचून`प्रकर्षाने वाटले की हा लेख अनेकांच्या वाचनात यायला हवा. तेव्हा एक कल्पना तरळली. आता विचारान्ती ती अव्यवहार्य असावी असे वाटते. पण इथे मांडण्यात प्रत्यवाय नसावा.
गृहीतके :
*विवेकी व्यक्तीला समाजिक बांधिलकीची जाणीव असते.त्यासाठी काही करावेसे वाटते.
*सांघिकपणे अधिक चांगले आणि व्यापक कार्य होते.
*चांगल्या वाचनाने उद्बोधन आणि विचारपरिवर्तन होऊ शकते.
..म्हणून "उपक्रमाच्या" संमतीने आपण :
**एक मंडळ स्थापावे. समजा,लोकमित्र मंडळ.
**मंडळाचे एक अध्यक्ष असावे. समजा ,श्री. प्रकाश घाटपांडे.
** दोन कार्यवाह असावे. समजा, श्री. योगेश (आ'कर्ण), प्रा. डॉ. बिरुटे.
**नाममात्र शुल्क , समजा रु २००/,कार्यवाहांकडे पाठवल्यावर सभासदत्व निश्चित वावे.
कार्यपद्धती:
** महाराष्ट्रातील अग्रगण्य (जिल्हापातळी पर्यंत) नियतकालिकांची नावे, पत्ते,ई-पत्ते, इ माहिती गोळा करावी.
** निवडक नियतकालिकांच्या (दै., सा., मा.) संपादकांना पत्रे पाठवून आपली योजना कळवावी.
** सभासदांच्या वाचनात जे उपयुक्त लेख येतील ते इथे स्थापित करावे.(शब्दमर्यादा हवी.)
* सर्वांनुमते ठरलेले लेख नियतकालिकांकडे पाठवावे.
....प्रसिद्धी निश्चित मिळेल.मूलस्रोताचा ऋणनिर्देश करावा. म्हणजे प्रताधिकाराचा प्रश्न उपस्थित होणार नाही.
** पुढे सुचतील तसे विविध उपक्रम हाती घेता येतील. शैक्षणिक संस्थांशी संपर्क साधता येईल. संगणक (इंटरनेटसह) जिल्हा पातळी पर्यंत पोहोचला आहे. त्याचा उपयोग करून घेता येईल.
......श्री.धनंजय यांच्या लेखाच्या निमित्ताने मनात आलेली कल्पना मांडली एवढेच.

लेखनविषय: दुवे:

Comments

फॅक्टर आणि तळमळ

गुंडोपंतांचे उत्तर एकदम आवडले!

वरील चर्चेसंदर्भात विष्णूशास्त्री चिपळूणकरांचे अजून एक उत्तर आठवले (जे मला वाटते मी आधी पण येथे एका चर्चेसंदर्भात सांगीतले होते):

केसरी चालू करताना (मराठी वर्तमानपत्र, मराठा इंग्रजी होते), जेंव्हा त्यांनी टिळक-आगरकरांना त्याची धुरा वहायला सांगीतले, तेंव्हा तरूण/विद्यार्थीदशेतून नुकत्याच बाहेर आलेल्या पण जाज्वल्य देशभक्ती असलेल्या टिळक आगरकरांची थोडी पंचाईत झाली - दोघे विष्णूपंतांना म्हणाले की आम्हाला मराठीत धड लिहीता येत नाही, विचार सर्व इंग्रजीत केला जातो, तर मराठी वर्तमानपत्र, ते ही लोकांमधे देशभक्ती जागृत करण्यासाठी कसे चालवू शकू? विष्णूशास्त्रींनी विचारले, "हृदयात तळमळ आहे का?", दोघांचे उत्तर आले, "हो!". त्यावर विष्णूशास्त्रींनी शांतपणे उत्तर दिले की, "मग ती तळमळ आपोआप कागदावर उतरेल, तुम्ही फक्त विचार करत बसण्याऐवजी कामाला लागा." पुढे काय झाले हा इतिहास आहे, येथे लिहाण्याची (होपफुली) गरज नाही!

बाकी गुंडोपंतांनी सांगीतलेल्या सर्व चपखल उदाहरणात अजून काही फॅक्टर १ आठवले:

अर्थातच टिळक - तसा साधा माणूस, काकांच्या घरी राहीलेला - तमाम भारताचा राजकीय नेता झाला - चिरोलने त्यांना असंतोषाचे जनक म्हणले, पण ती शिवी होण्या ऐवजी ओवी झाली!

संपूर्ण भारतात ज्या एका संघटनेबद्दल "लव्ह-हेट" रिलेशन पहायला मिळेल (म्हणजे काहींचे लव्ह, इतरांचे हेट!) त्या रा.स्व. संघाची सुरवात करणारे डॉ. हेडगेवार - भारताला स्वातंत्र्य काही दशकात मिळेल, पण ते जर टिकवायचे असेल आणि सहस्त्रकाची परकीय अमलाची शृंखला तोडायची असेल तर समाज संघटन होणे महत्वाचे समजले. अर्थात महत्व दिले ते फक्त हिंदू संघटनाला आणि सर्व हिंदू समाज एक करण्याला (येथे बरोबर-चूक वगैरे बोलत नाही फक्त जिद्द सांगतोय). आज इतके ७८ वर्षांनीपण तो (संघ) आवडणार्‍यांना आवडतो आणि नावडणार्‍यांना तितकाच नावडतो, पण एका माणसाची जिद्द काय करू शकते ते समजते.

बाबा आमटे - पुढे जास्त सांगण्याची गरज नाही...

अभय-राणी बंग

माळरानात किर्लोस्करवाडी उभे करणारे लक्ष्मणराव किर्लोस्कर

वगैरे

त्याच संदर्भात सत्यघटना असलेला (फॅक्टर १) चित्रपट आठवला: डेन्झल वॉशिंग्टनचा "हरीकेन". - हरीकेन हा अमेरिकेतील प्रसिद्ध काळा बॉक्सर असतो. त्यावर एक खोटा खुनाचा (रेशियल कारणाने) आरोप होतो ज्यातून तो सुटू शकत नाही आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा होते. तेथे तो स्वतःचे आत्मचरीत्र लिहीतो, जे नंतर रद्दीत जाते आणि ती रद्दी कॅनडात जाते. तेथे ते पुस्तक एका अनाथ काळ्या मुलाला (जो ३-४ गोर्‍या लोकांच्या मदतीने शिकत असतो) मिळते. तो ते वाचतो, भारावतो आणि म्हणतो की मी त्याला सोडवणार. त्याचे गोरे पालक आधी समजावून सांगतात पण तो ऐकत नाही. शेवटी ते त्याला मदत करायला लागतात. तो खटला "रीओपन" होतो आणि "हरीकेनचे" निर्दोषत्व सिद्ध होते. आजही हा हरीकेन कॅनडात राहतोय. तो ऑस्करच्या वेळेस तेंव्हा आला होता.

प्रतिसाद आवडला.

प्रतिसाद आवडला, गुंडोपंत.

वेळात वेळ

वेळात वेळ काढून कळवल्या बद्दल धन्यु!
:))

आपण या चर्चेचा भाग २ सुरु कराल का?
आता प्रतिसाद वाचणे शक्य होत नाही.

आपला
गुंडोपंत

आपणच करावा.

इतका चांगला प्रतिसाद तुम्ही दिलात. चर्चेचा २ रा भाग तुम्हीच सुरू करावा.

माझ्याकडून अनेक शुभेच्छा! चर्चा काळ्या-पांढर्‍यात न राहता मूर्त स्वरूपात येऊ दे.

हेच!

चर्चा काळ्या-पांढर्‍यात न राहता मूर्त स्वरूपात येऊ दे.

हा हा हा! हेच म्हणतो! :)))

अवांतर - मिपावर लवकरच 'लोकमित्र मंडळ' नावाचा एखादा खुमासदार लेख लिहीन म्हणतो! :)

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!!

गुंडोपंतांचा उत्साह

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
मंडळाची कल्पना श्री.गुंडोपंत पुढे नेत आहेत हे पाहून मनोमनी आनंद झाला.त्यांची 'आशा' ही कविता मिसळपाव वर वाचली तेव्हा या गृहस्थाच्या संवेदना किती तीव्र आहेत याची जाणीव झाली. आपल्या हातून अपेक्षित काम होत नाही याची खंत त्यांनी कवितेत व्यक्त केली आहे.ते नुसतेच शब्द नसून त्या त्यांच्या भावना आहेत हे प्रतीत होते.
ते आशावादी आहेत.उत्साही आहेत. एडिसनच्या हजार प्रयोगांचे समर्पक उदाहरण त्यांनी दिले आहे. अनेक प्रयोग अयशस्वी झाल्यावर एडिसनला त्याचे मित्र म्हणाले ,"तुझे एवढे प्रयोग वाया गेले." त्यावर तो म्हणाला, "वाया गेले नाहीत. प्रत्येक वेळी माझे काय चुकले ते मला समजले.तीच चूक मी पुन्हा करीत नाही." शेवटी तो यशस्वी झालाच.
मंडळाच्या कल्पनेला श्री. गुंडोपंत मूर्तस्वरूप देऊ शकतील यात शंका नाही.आम्हा सर्व सदस्यांचे सक्रिय सहकार्य आहेच.

घेता किती घेशील दो करांनी.

गुंडोपंत, विकास आणि इतर अनेकांचे प्रतिसाद वाचून-- (कल्पना) घेता किती घेशील दो करांनी अशी स्थिती झाली आहे. हा उपक्रम नक्की यशस्वी होणार. --वाचक्‍नवी

मंडळ/प्रतिष्ठान

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
मी केवळ एक विचार मांडला. माझ्या मर्यादांची मला जाणीव आहे. हे काम त्या मर्यादांच्या पलीकडचे आहे.ते माझ्याने होणे नाही. श्री.धनंजय लिहितात की कुणीतरी ठोस कृती केल्याशिवाय ही नुसती चर्चाच राहील. (चर्चा केवळ काळ्या-पांढर्‍यात न राहाता मूर्तस्वरूप येऊ दे असे मत प्रियाली यांनीही प्रतिसादात मांडले आहे.) आता श्री. धनंजय स्वतःच पुढाकार घेत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे.
...मूळ कल्पना अगदी मर्यादित स्वरूपाची होती. धनंजय यांची झेप मोठी आहे. सभासद शुल्कातूनच काय तो खर्च भागवायचा.( प्रारंभी लेटरहेड ,शिक्के इ. पुढे पत्रव्यवहारासाठी टपाल खर्च).देणगी गोळा करण्याची कल्पना नव्हती.
त्यांनी मांडलेले उद्दिष्ट :"व्हर्न्याक्युलर भाषेतील लोकशिक्षणात्मक लेखांच्या विनिमयाचे एक आगार स्थापन करणे, आणि अशा लेखांचे नियतकालिकांत प्रकाशन होण्याचा पुरस्कार करणे. या लेखांचे संभाव्य विषय विज्ञान, कला, अर्थशास्त्र, तंत्रज्ञान, आरोग्य, हे असू शकतील, पण याच विषयांपुरते क्षेत्र मर्यादित नाही. या लेखांत निव्वळ कल्पित साहित्याचा किंवा व्यापारी मालाच्या जाहिरातीचे साहित्याचा, की ज्याच्यात लोकशिक्षणाचा हेतू नाही, अशा साहित्याचा अंतर्भाव होऊ नये."
हे मात्र माझ्या मनातलेच आहे.

माझाही मनातले!

"ज्याच्यात लोकशिक्षणाचा हेतू नाही, अशा निव्वळ कल्पित साहित्याचा किंवा व्यापारी मालाच्या जाहिरातीच्या साहित्याचा, या लेखांत अंतर्भाव होऊ नये." हे महत्त्वाचे!--वाचक्‍नवी

 
^ वर