ऊत्तर - विचार करा वेगळ्या द्रुष्टीकोनातून : भाग १ - मद्यालय

व्यनि बरेच आले. पण बरोबर उत्तर फक्त तो यांचे.

प्रा डॉ दिलीप बिरुटे उत्तराच्या अगदी जवळ पोहोचले पण बरोबर उत्तर काही त्यांना देता आले नाही.

उत्तर :
मद्यात घातलेला बर्फ हा विषारी पाण्याने बनविलेला असतो. पिणारे दोन प्रकारचे असतात. एक ग्लास तोंडाला लावला की घटाघट संपवूनच खाली ठेवणारे आणि दुसरे म्हणजे घोटा-घोटाने मद्याचा आस्वाद घेणारे!

कोड्यातील "ब" हा पहिल्या गटातील. ग्लास समोर येताच त्याने तो तोंडाला लावला आणि मद्य संपवूनच खाली ठेवला. अर्थातच बर्फ वितळून त्याचे विषारी पाणी मद्यात मिसळायला वेळच मिळाला नाही.

त्याउलट "अ". घोटाघोटाने आस्वाद घेत पिण्याची त्याची सवयच त्याच्या अंगाशी आली. कारण तोवर बर्फ वितळून त्याचे विषारी पाणी मद्यात पुरते मिसळले होते.

टीप :
एडवर्ड डी बोनो याने Lateral Thinking (पठडी बाहेरचा विचार) ही संकल्पना प्रथम मांडली. या विषयी अधिक माहिती तुम्हाला महाजालावर मिळू शकेल.

लेखनविषय: दुवे:

Comments

लॅटरल थिंकींग

एडवर्ड डी बोनो याने Lateral Thinking (पठडी बाहेरचा विचार) ही संकल्पना प्रथम मांडली.

यावरच त्याचे याच नावाचे पुस्तकही आहे. छान आहे. सुनील यांनी म्हटल्याप्रमाणे आंतरजालावर (की महाजाल?) याबद्दल बरीच माहिती आहे. तसेच बरीच कोडीही आहेत.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

या कोड्यात

हे आहे होय उत्तर.. मग या कोड्यात लॅटरल थिंकींग ते काय?
उत्तर पाहुन हा केवळ कल्पनाविलास वाटतो. लॅटरल थिंकींगची कोडी वेगळी असतात. तर्काला चालना देणारी, कल्पनाशक्तीला नव्हे. या उत्तरापेक्षा सर्कीटरावांनी दिलेलं उत्तर (ब मद्य प्यायलाच नाही) हे जास्त पठडीबाहेरचं वाटलं होतं

(संभ्रमित) ऋषिकेश

तर्क आणि कल्पनाशक्ती..

तर्क आणि कल्पनाशक्ती यांतील सीमारेषा कोणती? कल्पनाशक्तीविना "पढडीबाहेरील विचार" शक्य आहे?

लॅटरल थिंकिंगची कोडी

गंमत वाटली. तरी म्हणतो :

अशी काही कोडी मला कधीकधी "पठडीबाहेरही संकुचित विचारां"बद्दलची वाटतात. लॅटरलचा अर्थ हा आहे, की नाकासमोरच्या सरळ मार्गावेगळी कुठलीही दिशा. मग हे (किंवा कुठलेही) एकच उत्तर बरोबर कसे? कित्येक उत्तरे बरोबर असू शकतील, असे मानण्यातच "पठडीबाहेरची विशाल विचारसरणी" आहे.

वाटल्यास "अगणित बरोबर उत्तरांपैकी मासलेवाईक हे एक घ्या" असे सूतोवाच करून बोनोप्रभृतींनी हे एक उत्तर सुचवावे. "बाकीची उत्तरे चूक" असे म्हणताच बोनो किंवा असे अन्य लेखक आपल्याच पायांवर कुर्‍हाड घालतात.

यापैकी आणखी एक कोडे आठवते (नेमका लेखक कोण माहीत नाही.)

एका उत्तुंग इमारतीते एक सद्गृहस्थ बाविसाव्या मजल्यावर काम करतात. दररोज लिफ्टमध्ये ते बाराव्या मजल्याचे बटण दाबतात, आणि उरलेले मजले पायी चढतात. का?
उत्तर : ते गृहस्थ बुटके आहेत - त्यांचा हात १२व्या बटणाच्या वर पोचत नाही.
लेखक म्हणे की "गृहस्थाची" म्हणून उंची पर्याप्त आहे, असे मानणे योग्य नव्हे, पठडीबद्ध आहे. तर मग लिफ्टची बटणे अमुक उंचीवर, अमुक क्रमाने असतात हे मानणे पठडीबाहेरचे कसे? तिथे काम करूनही त्या गृहस्थाने यावर काही पर्याय शोधला नाही, हे मानणे पठडीबाहेरचे असले तरी ठीक कसे? या लॅटरल थिंकिंगची उत्तरे अशा प्रकारे कित्येक गृहीतके बेमालूम मान्य करतात, जी खरे तर मोकळ्या पठडीबाहेरच्या विचारांना मारक असतात.

(बर्फाचे हे उत्तर सुचण्यासाठी, तडकाफडकी मारणारी खरीखरची खाद्यपेय विषे फारच अपवादात्मक असतात, या तथ्याबद्दल अज्ञान असणेही फार जरुरीचे आहे. बाहेरच्या जगात नाही तरी रहस्यकथांमध्ये सापडणार्‍या "साहित्यिक सायानाईड"ने लोक तडक मृत्यू पावतात. तरी ही रहस्यकथा म्हणून लिहायची असल्यास आणि "साहित्यिक सायानाईड" हे विष वापरायचे असल्यास, मित्र 'आमरेत्तो' नावाचे मद्य पीत असल्याचा कथाप्रसंग घालावा. कारण "साहित्यिक सायानाईड"लाही खर्‍या सायानाईड क्षारांसारखा कडू बदामांचा वास असतो, तो आमारेत्तोने झाकला जाईल.)

"लॅटरल"साठी "पठडीबाहेरचा" शब्द आवडला!

+१

कित्येक उत्तरे बरोबर असू शकतील, असे मानण्यातच "पठडीबाहेरची विशाल विचारसरणी" आहे.

+१
(पठडीबाहेरची विशाल विचारसरणीवाला) ऋषिकेश

छान विषय..

डी बोनोच्या लॅटरल आणि पॅरलल थिंकिंगला छेद देणारे विचार आपण मांडलेत. अशी एक नवी चर्चा येथे सुरू झाली तर बरेच होईल.

अर्थात मीही काही त्याचा आंधळा भक्त नाही. (आणि मला ते संपूर्णतया कळले आहे असेही नाही). अन्यथा मी हे कोडे "विरंगुळा" या सदरात घालण्याचे कारण नव्हते!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

हा हा हा

भाग २ आला की आता वेगळा विचार करावा लागेल.

कदाचित तुम्ही पण विचार करायला लागला असाल, वेगळ्या द्रुष्टीकोनातून :-)

खरे सायनाइड

खर्‍या सायनाइड क्षारांचा वास कडू बदामासारखा असतो ते आत्ता कळले, पण चव गोड असते अशी माहिती होती. दोन शास्त्रज्ञांनी चव घेऊन एकाने एस्‌ आणि एकाने डब्ल्यू लिहून प्राण सोडले होते असे लहानपणी वाचले होते. --वाचक्‍नवी

उत्तम

बोनोच्या पुस्तकांत
'विचार चमत्कृतीपुर्ण रितीने प्रेझेंट करण्या शिवाय' काहीही नाही... तीच ती दारू वेगवेगळ्या बाटल्यांत भरून दर वेळेला,
"आता रंग पहा वेगळा, आता चव पाहा वेगळी" वगैरे मुद्दे लावून एकच दारू वेगवेगळ्या पुस्तकातून विकत असतो.

त्यामुळे धनंजयचे विचार पटले.
'पठडीबाहेरील विचारांवर विचार' अशी चर्चा ही करायला आवडेल.
पण 'पठडीबाहेरील विचार' ही एक विचार धारा घेतल्यावर पठडीतील विचार म्हणजे काय हा विचारही केला पाहिजे. (शिवाय पठडी बाहेरील विचार ही पण शेवटी एक पठडीच झाली. ...नाही का?)

मात्र वेगळा विचार करता येणे ही एक 'दैवी देणगी' असते असे मी मानतो. (पठडीबद्ध विचार! :)) काही प्रमाणात 'विचार कसे येतात' हे समजून घेतल्यावर काहीसे हे तंत्र जमू शकते. तरी दरवेळेले जमतेच आसे नाही. काही लोक मात्र अतिशय 'कायमच' सहजतेने असे करू शकतात असेही पहिले आहे.

चांगले मानसोपचार तज्ञ (सायकॉलॉजीस्ट) आपल्या पेशंट्सना प्राप्त परिस्थितीत योग्य मार्ग सुचवण्यासाठी याचा अनेकदा उपयोग करतांना दिसतात. काही वेळा असा मार्ग दाखवणारे प्रश्न विचारूनही भागू शकते.
असो.

आवांतर,
चांगला सायकॉलॉजीस्ट होण्यासाठी, दशमाचा चंद्राशी संबंध असणे महत्वाचे आहे. सोबत गुरुही (दशमात चंद्र व चतुर्थात गुरु हे तर 'एन जी ओ' चे काँबिनेशन आहे - आयुष्य लोकार्पित!) असल्यास लोकांचे भले व्हावे या उद्देशाने काम घडून येते. किंबहुना त्यातच जातकाला आनंद मिळतो.

आपला
कुडमुड्या ज्योतिषी
गुंडोपंत बोनो

मद्यप्राशन

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
कोड्यात दिलेल्या माहितीशी सुसंगत अशी अनेक उत्तरे असल्यास ती सर्व ग्राह्य मानायला हवीत.या कोड्याचे श्री. सर्किट यांनी सुचविलेले (आणि श्री ऋषीकेश यांनी दुजोरा दिलेले) उत्तर: "माझा एक गेस (प्रतिशब्द?) - ब ने मद्य प्राशन केलेलेच नाही, कारण तसा कोड्यात उल्लेखच नाही.)" अधिक तर्कसंगत आहे.
...तशी अनेक उत्त्त्तरे संभवनीय आहेत. जसे:
"प्रत्येकाची प्रकृती भिन्न असते. 'ब' ला ते दूषित मद्य मानवले. 'अ'ला मानवले नाही."
"असे होते कधी कधी. अ ची घटका भरली होती. ब ची नव्हती."
"अधाशीपणे गिळताना अ च्या श्वासनलिकेत मद्य गेले."
"बर्फाचा खडा अ च्या घशात अडकून श्वास कोंडला" इ.

 
^ वर