आरोपीच्या पिंजर्‍यांत डॉक्टर

अलीकडे ग्राहक संरक्षण कायद्याखाली डॉक्टरांना न्यायालयांत खेचल्याच्या बर्‍याच बातम्या येतात. त्यांत बहुधा डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे पेशंट दगावल्याच्या किंवा त्याचे शारीरिक नुकसान झाल्याच्या तक्रारी असतात. (डॉक्टरने फी ज्यास्त घेतली म्हणून त्याच्यावर खटला भरल्याचे ऐकिवांत नाही).

मी स्वतः डॉक्टर नाही. पण डॉक्टरना ग्राहक संरक्षण कायदा सरसकट लागू करण्यापूर्वी वैद्यकीय सेवा व इतर सेवा यांतील फरक लक्षांत घेणे जरुरीचे आहे असे मला वाटते.

पहिली गोष्ट म्हणजे डॉक्टरकडे उपचारासाठी येणारा पेशंट हा बिघडलेल्या यंत्रासारखा निर्जीव नसतो. तर तो काही मानसिक बैठक असलेला जिवंत मनुष्य असतो. बाह्य जगांतून त्याच्यावर होणारे आघात (यांत वैद्यकीय उपचारही येतात) व त्यावर त्याचा प्रतिसाद/ प्रतिक्रिया यांचा मेळ वस्तुनिष्ठ नियम लावून बसत नाही. मानसशास्त्रज्ञांच्या मते पुष्कळशा रोगांचे मूळ रोग्याच्या मानसिकतेंत असते.

दुसरे असे की रोगापासून मुक्त व्हावे की नाही याचाही निर्णय रोगी स्वतःच घेत असतो. सकृत्दर्शनी हे विधान चमत्कारिक वाटेल. पण आयुष्यांतील सुरवातीच्या काही वर्षांत माणसाच्या मनांत कायमस्वरूपी नोंदल्या गेलेल्या सूचनांचा त्याच्या पुढील आयुष्यांतील निर्णयांवर बराच प्रभाव असतो. यालाच मानसतज्ञ एरिक् बर्न् विधिलिखित (स्क्रिप्ट्) म्हणतो.

मुद्दा हा की वैद्यकीय उपचारांच्या यशापयशांत डॉक्टर इतकाच रोग्याचाही सहभाग असतो; आणि म्हणून डॉक्टरला दोषी ठरवण्यापूर्वी रोग्याच्या मनोव्यापारांची छाननी होणे आवश्यक आहे.

अर्थात् यावरून आणखी एक गोष्टही दिसून येते, ती म्हणजे डॉक्टर केवळ वैद्यकशास्त्रांत पारंगत असून चालणार नाही तर उपचारासाठी आलेल्या रोग्याचे अंतर्बाह्य सहकार्य मिळवण्याची कला त्याला अवगत असायला हवी. साधारणपणे कुठलीही कला पिढीजात असते. कारण कौटुंबिक वातावरणांत कलेचे बाळकडू मिळते. पण मग याचा अर्थ डॉक्टरी पेशांत घराणेशाही आवश्यक आहे असा होत नाही का?

आपणांस काय वाटते?

लेखनविषय: दुवे:

Comments

सहमत

दुसरे असे की रोगापासून मुक्त व्हावे की नाही याचाही निर्णय रोगी स्वतःच घेत असतो.
बर्‍याच अंशी सहमत आहे. किंबहुना यावर बर्नचे पुस्तकच आधारलेले आहे.
बाय द वे, आपल्या शेवटच्या परिच्छेदात डॉक्टरांच्या घराणेशाहीचा उल्लेख आला आहे. ती सुद्धा स्क्रिप्टच आहे. मला वाटते बर्नने डॉक्टरांच्या स्क्रिप्टचा प्रवास कसा होतो याचे उदाहरणही दिले आहे.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

असहमत

दुसरे असे की रोगापासून मुक्त व्हावे की नाही याचाही निर्णय रोगी स्वतःच घेत असतो.

स्वेच्छा मरणाच्या बाबत हे लागू नाही http://mr.upakram.org/node/828 येथे आपण वाचले असेलच.

प्रकाश घाटपांडे

बरोबर

आपले म्हणणे बरोबर आहे. इच्छामरण यात बसेल असे वाटत नाही. पण मला वाटते इच्छामरण हा वेगळा विषय आहे आणि त्याच्या सर्व बाबी अजून स्पष्ट झालेल्या नाहीत. इथे शरदरावांचा दृष्टीकोन वेगळा आहे असे वाटते. उदा. बर्‍याच अल्कोहोलीक माणसांना हे कळत असते की आपण असे करायला नको. तरीही निर्णायक क्षणी ते स्वतःला रोखू शकत नाहीत. याचे कारण त्यांची स्क्रिप्ट अल्कोहोलिक असते. याच तर्‍हेने आजारी रहाण्यात जे 'फायदे' असतात, त्यामुळे कधीकधी रुग्ण बरे होणे पसंत करत नाही.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

बेअर फूट डॉक्टर

भारतातल्या अनेक दुर्गम ठीकाणी तर सोडाच पण पुण्यासारख्या शहरातील झोपडपट्टीत, वा २५ किमि च्या परिघात अनेक Quacks आढळतात. १५-२० वर्षे प्रॆक्टीस केल्यावर कधीतरी काही कारणाने सापडले जातात. A B C D तील अक्षरे वापरुन स्वयंघोषीत डॊक्टर्स ची संख्या India मधील भारतात खूप आहे. मूळात अशी परिस्थिती का आहे ? त्यांनाच काही प्रशिक्षण देउन दुर्गम भागात बेअर फूट डॊक्टर्स म्हणून वापरता येईल. असे डॊ. अभय बंग यांनी एका भाषणात सांगितले आहे. त्यांनी स्वत: डो. राणी बंग यांच्या समवेत आदिवासी समाजातल्या काही दाया असे प्रशिक्षण देउन बालमृत्युच प्रमाण गडचिरोली जिल्ह्यात घटवले आहे. याची जागतिक आरोग्य परिषदेने द्खल ही घेतली आहे.
या विषयाचा अनेक पदर आहेत. ठाण्यातील आनंद दिघे मृत्यु प्रकरणी सिंघानी इस्पितळाची नासधुस शिवसेनेने केली होती.
घराणे शाही बद्दल म्हणायचे तर आधुनिक पद्धतीने डॊक्टर, वकील. इंजिनिअर, लेखक. अशा जाती व्यवसायातील घराणेशाहीतून नवनिर्मित होतील. ब्राह्मणाचा मुलगा ब्राह्मण, मुसलमानाचा मुलगा मुसलमान, चांभाराचा मुलगा चांभार, महाराचा मुलगा महार. पुढा-याचा मुलगा पुढारी..........
ग्राहक संरक्षण कायद्या खाली प्रत्यक्ष शिक्षा झालेल्या डॊक्टरांची संख्या एकूण डॊक्टरांच्या संखेच्या मानाने किती? (भारतात)
डॊक्टरांना देवदूत मानणारा आपला समाज हा डॊक्टरांवर हल्ला का करु लागला?
आजही अनेक सेवाभावी डॊक्टर्से आहेत तसे शोषण करणारे पण डॊक्टर्स आहेत. ती प्रवृत्ती आहे.

अवांतर - या विषयावर डॊ अमोल अन्नदाते यांचे वैद्यकीय बोधकथा हे मनोविकास प्रकाशीत पुस्तक वाचनीय आहे. लोकसत्तेत त्याची लेखमालिका येत होती.
प्रकाश घाटपांडे

 
^ वर