सैन्यातून आलेले नागरिक

आजतगायत मी अशा दोन सहका-यांसोबत काम केले आहे ज्यांना सैन्यात लढाईतला अनुभव आहे. माझा जीईतला अमेरिकन साहेब कोरियन युद्धात लढलेला. त्याने जीवनात बरेच उपद्व्याप केलेले व अजूनही करतच असतो. युद्दावरुन परत येऊन सैन्यदल सोडल्यावर या महाशयाने प्रोग्रामिंगचा अभ्यास केला. त्यात पारंगत झाल्यावर एक पुस्तकही लिहिले. पुढे जीईत आल्यावर संगणक क्षेत्रात काम केले आणि अजून तेथेच आहे. आमच्या चमूतल्या architect ला मुलगा झाला तेव्हा गंमत म्हणून डाटा मोडेलचे प्लॊटरवर प्रिंट काढून बाळाला भेट म्हणून घेऊन गेला. म्हणाला बापाने ज्या चुका केल्यात त्या तू करत जाऊ नको. एरव्ही कामात अगदी prodessional. वैयक्तिक असे एक वाक्य बोलणार नाही. सगळे त्याचा खूप आदर करत. असेच एका रात्री जेवणाला सोबत गेलो होतो तेव्हा मात्र मनातले बरेच काही सांगून गेला. त्याच्या पोराला राष्ट्राभिमान नाही, समाजाची चाड नाही, अशा गोष्टींची सल त्याच्या मनाला होती. एवढ्या मोठ्या पहाडी व्यक्तिमत्वाला सुद्धा आत ओलावा असलेले हृदय आहे हे त्याच्याशी गप्पा मारताना जाणवले.

दुसरा सहकारी बॉब (Robert McLaughlin). वय झाले आहे तरी कामातला उत्साह एखाद्य तरुणाला लाजवेल असा. नकळत मानेला बाक आला आहे तरी चालण्यातला रुबाब मात्र कामय. १९७० ला व्हियतनाम मध्ये संगणक प्रोग्रामर म्हणून होता. गुप्त माहितीची देवाण-घेवाण करणारे संगणक हाताळायचे काम याच्याकडे होते. त्याच्या दोन्ही बाजूला भाल्या मोठ्या बंदुका घेऊन चोवीस तास सैनिकांचा पहारा असे. एकदा चिवट व्हियतनामी लढवैयांनी यांच्यावर हल्ला केला तेव्हा सरळ संरक्षण मत्रालयाचा आदेश आला होता की वेळ पडली तर संगणके फोडून टाका. तो अणुभव सांगताना बॉब हळवा होतो. पण व्हियतनामी जनते बद्दल याला प्रचंड आदर आहे.

या दोन्ही सहका-यांसोबत काम करताना जाणवले की भारतात सैन्यातून आलेले लोक अशा नोक-या करताना मला का कधि दिसले नाही? भारतात तसेही एक-दोन वर्षांसाठी सैन्यात जाणारे तरुण नसतातच. जे जातात ते दहा-पंधरा वर्षे तेथेच राहतात. कारण नोकरी सोडल्यावर पुढे काय असा एक प्रश्न त्यांच्यासमोर असावा.

मला वाटतं सैनिकांना नंतर वेगवेगळ्या क्षेत्रात काम करायला संधी दिल्या पाहिजेत. त्यांच्या शिस्तबद्ध कामांमुळे इंतर क्षेत्रात त्यांच्या सहका-यांना त्यांच्याकडून शिकण्यासारखे बरेच काही असते. यावर भारत सरकार काही विचार का करत नाही? आपल्याकडे एन.सी.सी. च्या पुढे जाऊन प्रत्येक तरुणाला/तरुणीला एक-दोने वर्षे सैन्याचा अनुभव घेण्याचा पर्याय का नसतो?जर मोठ्या प्रमाणावर तरुण सैन्यातला अनुभव घेऊन मग समाजात परतू लागले तर समाज शिस्तबद्ध व्हायला मदत नाही का होणार? तशी गरज आपल्या समाजाला खूप जास्त आहे असे नाही का वाटत आपल्याला?

Comments

भारतातही

भारतातही हा विचार रुजतोय .. नुकतीच एक इंडियन आर्मीची जाहिरात पाहिली होती. लोणावळा इथे जे अभियांत्रिकी कॉलेज आहे तेथुन डिगरी घेतल्यावर केवळ ३ वर्षे सैन्यात नोकरी (इथे नोकरी म्हणजे लढणे नव्हे, काम अभियांत्रिकीचेच असणार केवळ सैन्यासाठी.. अतिशय प्रगत तांत्रिक गोष्टी इथुन हाताळायला मिळतात म्हणून माझा एक मित्र खुप प्रयत्न करतोय इथे घुसण्याचा ) करणे बंधनकारक आहे. पुढे तुम्ही ज्या अभियांत्रिकीत डिगरी घेतली आहे त्यचंबधीच्या कंपन्या कँपस इंटरव्युला येतात (आणि अजुनपर्यंत १००% प्लेसमेंट आहे.. हे स्वाभाविक आहे)

अरे वा!

हे वाचून भारी आनंद झाला बघ.

आपला,
(आनंदी) भास्कर
आम्ही येथे वसतो.

सुरक्षा अधिकारी..

बहुसंख्य आस्थापनांतील सुरक्षा अधिकारी हे सैन्यातून आलेले मी पाहिले आहे. अर्थात हे एक क्षेत्र सोडले तर अन्य क्षेत्रात सैन्यातून आलेल्या व्यक्ती फारशा दिसत नाहीत हे मात्र खरे.

व्हिएटनाम वगैरे

व्हिएटनाम व्हेटरन्स बरोबर मी पण काम केले आहे. दोघे जण सिव्हील इंजिनियरींग क्षेत्रातील होते - कन्स्ट्रक्षन मॅनेजर म्हणून होते. त्यातील एकजण व्हिएटनामला तरूणपणी गेला होता. त्याच्यासमोर त्याचे सहकारी मेले होते, झाडावर रडत वेळ घालवत बसायची वेळ आली होती. एकीकडे स्वतःचा टफनेस दाखवणारा वास्तवीक मानसीक संतुलन घालवून बसला होता, हे त्याच्या बोलण्या वागण्यातून समजे...

व्हिएटनाम मधे गेलेले सैनीक हे काही सर्वजण मनापासून गेले नव्हते तर ड्राफ्टमुळे गेले होते. परीणामी त्यांना तेथे कायम नोकरीत रहावे लागले नाही.

माझ्यासाठी काम करणारा आणि अतशय मैत्रीपूर्ण असलेला एक माणूस ९/११ नंतर चिडून सैन्यात गेला - तेंव्हा त्याचे वय ४०च्या जवळ होते (३८-३९). तरीपण जिद्दीने शिकून देशासाठी सैनीक म्हणून वेळ दिला वयाच्या अटीमुळे तो २-३ वर्षेच काम करू शकला त्यात तो मला आठवते त्या प्रमाणे दोनदा इराकला जाउन आला होता.

दुसरा मेंटेनन्सची कामं करणारा - सैन्यात पण तेच ऑन कॉल काम होते. त्याला पण इराकला जावे लागले होते (सुखरूप परत आला). त्याला सेंडऑफ पार्टी दिली तेंव्हा सर्व हसतमुख होते पण त्याच्या आणि त्याच्या बायकोच्या चेहेर्‍यावरची काळजी लपलेली नव्हती.

अजून एक सैनीक - पण इंजिनियर असल्याने युद्धातील इंटेलीजिन्स साठी म्हणून युरोपात (कोसोव्हो दर्म्यान) आणि नंतर इराकमधे होता.

एकंदरीत एका उदाहरणाव्यतिरीक्त बाकी सर्व परत मूळप्रवाहात मिसळून गेलेले पाहीले...

टॅक्सी ड्राईव्हर/शॉसक

भारतीय सैन्यात शॉर्ट सर्विस कमिशन हा पर्याय उपलब्ध होता/आहेच.

>एकंदरीत एका उदाहरणाव्यतिरीक्त बाकी सर्व परत मूळप्रवाहात मिसळून गेलेले पाहीले...

लेखाचे नाव वाचताच अल पचिनोचा टॅक्सी ड्राईवर व सैन्यातून परतलेल्या नायकाची घुसमट आठवली.

टॅ.ड्रा.

>>>लेखाचे नाव वाचताच अल पचिनोचा टॅक्सी ड्राईवर व सैन्यातून परतलेल्या नायकाची घुसमट आठवली.

डी निरोचा :-)

सरकारी आस्थापनात..

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
बरेच माजी सैनिक आहेत. तिन्ही सेनादलातील सिग्नल्स,इंजिनियरींग आणि मेडिकल क्षेत्रातील कितीतरी लोकांना मी पाहिलेले आहे.
मी ज्या सरकारी आस्थापनात काम करत होतो तिथेही भारताच्या तिन्ही सेनादलातील तंत्रज्ञ भरपूर प्रमाणात आहेत. अगदी छोट्या तंत्रज्ञापासून तो एखाद्या शाखेचा,प्रभागाचा(झोन) प्रमुख अशा वरिष्ठ पातळीवर काम करणारे भरपुर माजी सैनिक आज भारत सरकारच्या विविध खात्यात काम करताहेत. ह्या लोकांबरोबर काम करताना येणारे अनुभव मात्र संमिश्र असे आहेत.

सेनादलात काम केल्यामुळे अंगात आलेली शिस्त आणि करडेपणा जसा जाणवतो तसेच नागरी आयुष्यातील मौजमजा आणि स्वातंत्र्य अनुभवायला मिळत असल्यामुळे वागण्यात आलेली एक प्रकारची ढिलाई देखिल जाणवते. मद्यप्राशनाचा अतिरेक तर बहुतेकांच्या बाबतीत विशेष करून जाणवतो.

नागरी आयुष्याबद्दल आकर्षण वाटूनही नियमित नागरी सहकार्‍यांशी वागताना मात्र बोलण्याता अहंमन्यता जाणवते. अर्थात दीर्घ सहवासाने त्याची धार हळूहळू कमी होते. आजही माझे कितीतरी माजी सैनिक(नोकरीतले सहकारी) खूप चांगले मित्र आहेत. ह्या लोकांच्या गमती जमती पुन्हा कधी तरी सांगेन.

सैन्यातील वायरलेस ऒपरेटर

सैन्यातील वायरलेस ऒपरेटर हे १५ वर्षांची शॊर्ट सर्व्हीस करुन पेन्शन घेत. त्यानंतर ते पोलिस बिनतारी विभागत नोकरीस येत. येथे आल्यावर त्यांना पोलीस खाते सुरवातीस बेशीस्त वाटे. इकडची नोकरी आणि तिकडची पेन्शन असा दुहेरी फायदा त्यांना मिळत असे. सैन्यात देखील भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात चालतॊ. परंतु सैन्य म्हणजे देशभक्ती, देशसेवा ही लेबले इतकी फिट्ट बसली आहेत कि थोडा वेगळा विचार मांडला कि तो जणु देशद्रोही आहे असे मानले जाते.
(सैन्यातील स्वत:च्या भरतीवेळी भ्रष्टाचाराचा स्वानुभव घेतलेला)
प्रकाश घाटपांडे

मान्य...अवांतर

परंतु सैन्य म्हणजे देशभक्ती, देशसेवा ही लेबले इतकी फिट्ट बसली आहेत कि थोडा वेगळा विचार मांडला कि तो जणु देशद्रोही आहे असे मानले जाते.

जम्मू-काश्मिरातील नागरीकांच्या भारताशी झालेल्या alienation ला आपल्या लश्कराने केलेले अत्याचार अधिक कारणीभूत आहेत असे मी मित्रमंडळीत म्हटले की "हा बघा पाकी" अश्या नजरेने माझ्याकडे पाहिले जाते.

 
^ वर