वर्तमानपत्रातील माझे आवडते सदर.

आपल्या दिवसाची सुरवात चहा आणि वर्तमानपत्राने(च) होत असते. प्रत्येकाच्या आवडीच्या वर्तमानपत्रा शिवाय आपला दिवस जणू सूरुच होत नाही. हातात वर्तमानपत्र पडल्यावर आपले आवडते सदर वाचल्याशिवाय मनाला चैनच पडत नाही. काही लोकांना मुख्यपानावरील बातम्यात रस असतो तर काही क्रिडाविश्वात रममाण होतात. काही लोक अग्रलेखात काय लिहिले आहे ते आवर्जुन वाचतात तर काहिंना वाचकाच्या पत्रव्यवहारात रस असतो. बाजारभाव आणि छोट्या जाहीराती बघून न बघता वाचणारेही बरेच असतात.

याच बरोबर काही लोकं साप्ताहिक पूरवण्याची आणि त्यातील काही लेखांची वाट पाहत असतात. उदा. मी लोकसत्तेतील पाण्याचे रंगढंग हे सर्वप्रथम वाचत असतो. रोजच्या लोकसत्तेत नवनीत, अग्रलेख वाचण्यासारखा असेल तर आणि एखादा प्रासंगिक लेखही वाचत असतो. आजचे शहरातील कार्यक्रम हा प्रकारही माझ्या आवडीचा आहे.

"सकाळ"ही बर्‍यापैकी वाचनीय असतो. सामना वरवर चाळण्यासाठी बरा वाटतो. म टाचा अग्रलेख पूर्वी वाचण्यासारखा होता.

काही काही वर्तमानपत्रे ही त्या प्रदेशाची प्रतिनीधीच असतात उदा. नाशिक आणि गावकरी, कोल्हापूर आणि पूढारी. लोकमत हे खर्‍याअर्थाने महाराष्ट्राचे लोकमत आहे. ( सर्वाधिक खपाचे म्हणून).

आज माझ्या मनात असा विचार आला की कळत नकळतच आपण एखाद्या वर्तमानपत्राला बांधलो गेलो आहे आणि त्या(च) मूळे आपण अनेक माहितीपूर्ण लेखांना मुकत असतो.

आपण कोणती सदरे वाचतात? कोणती सदरे विशिष्ठ वर्गाने वाचायलाच हवी उदा बालकुंज, व्हिवा, चतुरंग इत्यादी इत्यादी अशी आपण शिफारस कराल.

Comments

लोकसत्तेतील अग्रलेख

आम्ही आधी सकाळमधील ब्रिटीश नंदी यांचे ढिंग टांग हे सदर सर्वप्रथम वाचायचो. आता लोकसत्तेतील अग्रलेख सर्वप्रथम वाचतो. दिवसाची सुरुवात चांगली होते.

- आजानुकर्ण

कमाल आहे!

आता लोकसत्तेतील अग्रलेख सर्वप्रथम वाचतो. दिवसाची सुरुवात चांगली होते.
--कमाल आहे बुवा आपली? बाईंना सोडून बाकी सर्वांना शिव्या देणारे अन चांगले कधिच न पाहता नेहमी वाईटच पाहणारे आणि वाईट नाही दिसले तरी दाखलण्याचा भास करणारे अग्रलेख पाहून आपल्या दिवसाची सुरुवात चांगली होते!

आपला,
(आश्चर्यचकित) भास्कर
आम्ही येथे वसतो.

+१

कमाल आहे बुवा आपली!
यासाठी +१

खरे आहे.

लोकसत्तेचे अग्रलेख बर्‍यापैकी एकांगी असतात. तसे बघितले तर तरुण भारत, सामना इत्यादी कोणाएका विचारसरणीला वाहून घेतलेले वर्तमानपत्र आहेत. त्यात देखील इतका एकांगीपणा नसतो.

खरेतर केतकरांचे काही विचार बरेच अतंर्मुख करणारे असतात पण अग्रलेखावर त्यांना अजूनही छाप सोडता आली नाही असे वाटते.

अर्थातचा पसंद अपणी अपणी खयाल अपणा अपणा ....मराठीत काय बरे या वाक्याचे भाषांतर होईल बरे???

विनोद

आजानुकर्णाने हे नक्कीच उपरोधाने म्हटले असावे. किंवा सकाळीच विनोद वाचल्यावर दिवस चांगला जातो, अशा भुमिकेतून ते असे काहीतरी सकाळी वाचत असावेत!

त्यापेक्षा रोज सकाळी डिलबर्ट बघावा! दिवस उत्तम जातो.

लोकसत्तेचा युनिकोड

लोकसत्तेत चांगले लेख असतात कि ज्यावर आपल्या अड्ड्यात चर्चा व्हावी. लोकसत्तेचे डायनॅमिक फाँट आहेत. त्याचे युनिकोड मला रुपांतर् ने पण जमले नाही. नाहीतर मला लेख स्कॅन करुन टाकावे लागले नसते. परत ए४ साईज चे नसतील तर वांधे होतात. काही लेख हे ए ४ च्या पलीकडे जातात मग डिजीटल कॅमेराने त्याचे फोटो फ्लिकरवर टाकावे लागतात. कोणाला काही सुचतय का बघा.
प्रकाश घाटपांडे

आवड नाही!

मी वर्तमानपत्र फार क्वचितच वाचतो. पूर्वी थोडंफार संगीतविषयक लेखन वगैरे वाचायचो. मुळात मला वर्तमानपत्र वाचनाची आवड नाही. अगदीच काही कुठे विशेष घटना घडल्याचं ऐकिवात असेल तर तेवढी बातमी वाचतो. एरवी, रोजचं वर्तमानपत्र उघडूनदेखील पाहात नाही!

जालावर वावरताना कधी कुठला वर्तमानपत्रीय दुवा वाचनात आला तर तेवढा वाचतो.

तात्या.

--
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

पुर्वी होते..

पुर्वी अशी सदरे होती की जी ठरवून वाचायचो पण आता जालावर वाचत असल्यामुळे पटकन जे वाचावेसे वाटते ते वाचतो.

पुर्वीची सदर/वृत्तपत्रे : म.टा. (गोविंद तळवळकर), लोकसत्ता (माधव गडकरी, अरूण टिकेकर), मुंबई सकाळ (परत माधव गडकरी) - या सर्वांचे अग्रलेख, म.टा. मधील धावते जग, तळवळकर अजून एका नावाने विविध विषयांवरील लेख लिहायचे, माधव गडकरींचे अजून एक सदर असायचे पण नाव आठवत नाही, गडकरींचाच "रविवारचा दृष्टीक्षेप". मुंबई दंगलीच्या वेळचे सर्व लेख कात्रणातून नंतर वाचले... त्याच प्रमाणे ग. वा. बेहर्‍यांचा सोबत...

सध्या : मध्यंतरीच्या काळात म.टा. मधे भारतकुमार राउत यांचा संवाद मधील लेख वाचायचो अजूनही वाचतो. तसेच त्यांचे मला इंटरेस्ट असतील अशा विषयातील अग्रलेखही... लोकसत्ताचा अग्रलेख म्हणजे माफ करा पण "समर्था घरचे ..." वाटावे अशी अवस्था कुमार केतकरांनी केली आहे, तरी देखील त्यांचे काही लेख (ज्यात उगाच चीप वाटणारे राजकारण नसते,) ते वाचायला आवडतात, मुंबईचा असल्यामुळे कदाचीत पण सकाळची (एक गडकरींचा काळ सोडल्यास) वाचायची सवय नव्हती पण आता हे वृत्तपत्र पण आवडते पण अग्रलेख सोडल्यास ठरवून कुठले सदर वाचत नाही पण नजर पडल्यास / संदर्भ सांगीतल्यास नक्कीच वाचतो. सामना अधून मधून वाचतो. अग्रलेख वाचताना करमणूक होते.

भारतातील इंग्रजी वृत्तपत्रे इतकी नेमाने वाचाविशी वाटत नाहीत, पण अधून मधून लेख वाचणे होते. अमेरीकेतील ऑन-ऑफ पद्धतीने न्ञु यॉर्क टाईम्स, वॉशिंग्टन पोस्ट, बॉस्टन ग्लोब नजरेमधे ठेवतो. स्लेट ऑनलाईन मधून कुठल्या पेपर म्धे काय चालले आहे ते चांगले कळते.

अमेरिकेत असाल तर जनरल इन्फो म्हणून एन पी आर वरील मार्केटप्लेस हा कार्यक्रम वाचण्याचा नसला तरी ऐकण्यासाठी आवडतो...

हे

पुर्वीची सदर/वृत्तपत्रे : म.टा. (गोविंद तळवळकर),
लोकसत्ता (माधव गडकरी, अरूण टिकेकर),
मुंबई सकाळ (परत माधव गडकरी) - या सर्वांचे अग्रलेख,

म.टा. मधील धावते जग,
तळवळकर अजून एका नावाने विविध विषयांवरील लेख लिहायचे,
माधव गडकरींचे अजून एक सदर असायचे पण नाव आठवत नाही, गडकरींचाच "रविवारचा दृष्टीक्षेप".
मुंबई दंगलीच्या वेळचे सर्व लेख कात्रणातून नंतर वाचले... त्याच प्रमाणे ग. वा. बेहर्‍यांचा सोबत...

मी ही हेच म्हणतो...

मटाचे इंग्रजी ग्रंथ जगत शिवाय पुस्तक परिक्षणं. पुस्तक परिक्षणं वाचून(ही!) 'हे पुस्तक याच असे अनेक मनसुबे रचत असतो'

(खरं परिक्षणांचा आणि पुस्तकांचा काही संबंध नसतो असा अनुभव आहे. परिक्षकांना आवडण्यापेक्षा ज्याला जे पुस्तक आवडतं, पटतं, जमून येतं तेच सर्वोत्कृष्ठ पुस्तक असतं तरीही ;) )

शब्द कोडी कधी झेपली नाहीत.
नाटकांच्या जाहिरातीही वाचायला आवडतात.

शिवाय कधी कधी 'माझ्या खुर्चीची उंची कमी जास्त करण्यासाठी' खुर्चीच्या उशीवर लोकसत्ताचे केतकारांचे अग्रलेखाचे पानही ठेवत असतो.

आपला
गुंडोपंत

पत्रव्यवहार..

कोणत्याही वृत्तपत्रातील मी सर्वप्रथम वाचीत असलेला भाग म्हणजे वाचकांचा पत्रव्यवहार. केवळ मजकूरच नव्हे तर पत्रलेखकाचे नाव आणि गाव यातूनही त्या वर्तमानपत्राविषयीचे चांगले उद्बोधन होते.

मटा ची बहुतांची अंतरे (नव्या स्वरूपातील मटात ती दिसत नाहीत. कोणी सांगेल कशी पहायची ते?) आणि लोकसत्ताचे लोकमानस हे मी प्रथम वाचतो. नंतर अग्रलेख आणि नंतर इतर लेख. बातम्या मी बहुधा रेडिफवरच वाचतो (वर्तमानपत्रातून बातम्या वाचीत वेळ काढत नाही).

कारगील प्रकरणानंतर मी पाकीस्तानी वृत्तपत्रेदेखील वाचण्यास सुरुवात केली. दोन्ही बाजू समजण्यास येतात. त्यांची काही वृत्तपत्रे खरोखरीच समतोल म्हणावी अशी आहेत. उदा. डॉन आणि फ्रायडे टाईम्स (हा आता मुक्त राहीला नसल्यामुळे वाचला जात नाही).

अगदी

कोणत्याही वृत्तपत्रातील मी सर्वप्रथम वाचीत असलेला भाग म्हणजे वाचकांचा पत्रव्यवहार. केवळ मजकूरच नव्हे तर पत्रलेखकाचे नाव आणि गाव यातूनही त्या वर्तमानपत्राविषयीचे चांगले उद्बोधन होते.

वर्तमानपत्रातील महत्त्वाचे आणि सनसनाटी लेख कोणते येऊन गेले याचीही माहिती येथूनच मिळते. मीही पूर्वी हेच आधी वाचत असे. आता वर्तमानपत्रे वाचणे सोडून दिले आहे. (त्यापेक्षा खरडवह्या वाचून अधिक उद्बोधन होते असे जाणवले आहे. - सर्वांनी ह. घ्या.)

माझे सुद्धा

अगदी असेच आहे... वा!

वर्तमानपत्रांचा राजकारणावरील प्रभाव

असे म्ह्ण्टले जाते की वृत्तपत्रातील लिखाणाचा एक प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम म्हणजे सत्ताधार्‍याना त्यांच्याबद्दल वाटणारी जरब, प्रसंगी त्यात छापून आलेल्या लिखाणामुळे सत्तेमधे बदलही घडवून आणण्याची क्षमता. या संदर्भात मराठी आणि इतर भाषातील अशा "प्रभावशाली" स्तंभलेखकांची/अग्रलेखकांची आठवण येते. मला माहित असलेली/आठवणारी काही उदाहरणे :

१. टिळकांचे अग्रलेख. अतिशय रोखठोक विचार , आणि अगदी जहाल भाषा. "सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय" या सारख्या मथळ्यातूनच त्यातील अंगार जाणवतो.
२. तळवलकरांचे अग्रलेख : शरद पवारांच्या बैठकीतील व्यक्ति अशी प्रतिमा असूनही नव्वदच्या दशकात त्यानी पवारांवर , पप्पू कलानी आणि भाई ठाकूर् संदर्भात जे लिहिले ते कॉंग्रेसच्या पराभावाच्या संदर्भात महत्त्वाचे ठरले हा इतिहास आहे.
३. "वॉटरगेट"चे उदाहरण परदेशी आहे पण या संदर्भात त्याची आठवण आल्याखेरीज राहात नाही. सत्ताबदलाच्या दृष्टीने इतके "पावर्फुल्" उदाहरण माझ्या ऐकीवात दुसरे नाही.
४. निळू दामले यांच्या जे.जे. मधील औषधांच्या गैरव्यवहाराबद्द्लच्या आणि त्यातून घडलेल्या म्रुत्यूंबद्दलच्या लिखाणामुळे कॉंग्रेसश्रेष्ठीना तत्कालीन मुख्यमंत्र्याना (निलंगेकर ? विसरलो !) जावे लागले होते असे अंधुकसे आठवते.
५. अगदी अलिकडचे उदाहरण म्हणजे "टेहेलका" चे ! तरुण तेजपाल या माणसाला मी कुर्निसात करतो. पत्रकारितेच्या शक्तीचे नवे युग त्यामुळे अवतरले . "स्टींग" हा शब्द प्रसिद्ध झाला.

कुणाला अन्य काही उदाहरणे आठवत असतील तर जरूर लिहा.

क्षमा करा,

असे म्ह्ण्टले जाते की वृत्तपत्रातील लिखाणाचा एक प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम म्हणजे सत्ताधार्‍याना त्यांच्याबद्दल वाटणारी जरब, प्रसंगी त्यात छापून आलेल्या लिखाणामुळे सत्तेमधे बदलही घडवून आणण्याची क्षमता.

मुक्तसुनीतराव, क्षमा करा परंतु आपण वर म्हटल्याप्रमाणे जर असतं तर वृत्तपत्रांची मारे इतक्या वर्षांची परंपरा वगैरे असूनही त्याचा सत्ताधार्‍यांवर काहीही परिणाम झालेला दिसत नाही! उलट, वृत्तपत्रकारितेला सुरवात होऊन जितकी वर्ष झाली तितक्या वर्षात मला तर बुवा अधिकाधिक गलिच्छ आणि लाचखोरीयुक्त राजकारण आणि राजकारणी बघायला मिळत आहेत!

आजही वृत्तपत्रांमधून मारे सरकारवर टीका वगैरे करणारे अग्रलेख, बातम्या छापून येतात तरीही त्याची सरकारवर काही जरब बसली असून सरकारच्या वर्तनात, लाचखोरीत काही सुधारणा झाली आहे असे म्हणणे माझ्या मते भाबडेपणाचे आहे! अहो मला सांगा, तुमचे ते अग्रलेख वगैरे किती टक्के लोक वाचतात? तर तुमच्यासारखी चार बुकं शिकलेली माणसं! अहो पण सरकारला तुमच्या मतांची मुळीच गरज नाहीये!

सरकारं निवडून येतात ती पैसे वाटून! तुम्ही मारे कितीही अग्रलेख वगैरे लिहा, निवडणूकीच्या अगदी आदल्या रात्रीपर्यंत जो उमेदवार अक्षरशः लाख्खो रुपये वाटतो, साड्याचोळ्या वाटतो, तोच निवडून येतो! मग भले त्याआधी त्याच्याविरूद्ध वर्तमानपत्रात मारे कितीही अग्रलेख येवोत, त्या अग्रलेखाला काळा कुत्राही विचारत नाही ही वस्तुस्थिती पाहायला मिळते!

(राजकारणाच्या बाबतीत 'पैसा फेको, दुनिया झुकती है' यावरच ठाम विश्वास असणारा!) तात्या.

सहमत

सर्व मुद्यांवर सहमत आहे. आणि क्रमांक तीन विशेष उल्लेखनीय आहे. दोन नवशिके पत्रकार एका साध्याश्या वाटणार्‍या प्रकरणाचा पाठपुरावा करतात. प्रकरणात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसकट सर्व गुप्तहेर यंत्रणा, न्यायविभाग यातली बडी धेंड गुंतलेली असतात. आणि शेवटी या सर्वांना शिक्षा होउन राष्ट्राध्यक्षांना राजीनामा द्यावा लागतो. लेखणी तलवारीपेक्षा प्रभावी असते याचे याहून चांगले उदाहरण काय असणार?
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

सध्या

सध्या बातम्या आंतरजालावरूनच मिळतात. पण रोज सकाळी न चुकता डिलबर्टरावांना भेट देतो.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

आकर्षक मथळे

मुक्तसुनीत यांच्या वरील प्रतिसादावरून आकर्षक मथळे आठवले: (थोडे अवांतर आहे - क्षमस्व!)

टिळकः (ऐतिहासीक)
सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?
पुनश्च हरि ओम्
टिळक सुटले पुढे काय?
हे कसले आमचे गुरू?
पिर्न्सिपॉल, पशूपाल की शिशूपाल?

आचार्य अत्रे (राजकीय/सामाजीक आत्ता पटकन दोनच आठवत आहेत)
स्वातंत्र्यवीर की रिक्रूटवीर (सावरकरांना स्वातंत्र्यवीर ही पदवी अत्र्यांनीच दिली आणि अत्र्यांना आचार्य ही पदवी सावरकरांनी, पण दुसर्‍या महायुद्धच्या वेळेस सैन्यात भरती होण्याचे तरूणांना केलेले आवाहन ऐकून त्यातली गोम न कळल्याने अत्रे त्यांना रिक्रूटवीर म्हणाले)

कन्नमवार झाडू मार!
कन्नमवार की कंडमवार? (हे दोन्ही लेख तत्कालीन मुख्यमंत्री कन्नमवारांबद्दल होते, जहाल टिकेच्या या लेखांनंतर कदाचीत मनस्ताप होवून त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. कधीतरी वाचलेलेल् आठवते, त्याप्र्माणे त्यावेळीस मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान "सह्याद्री" होते. नंतर त्यांच्या भूताची भिती तयार झाली - आणि मुख्यमंत्रीनिवास हे "वर्षा" झाले आणि "सह्याद्री" हे प्रमुख अतिथी गृह!)

आम्ही चुकलो! (का असेच काहीसा... अत्र्यांनी गाडगेमहाराजांबद्दल नुसते ऐकले आणि स्वतःच्या स्वभावाप्रमाणे त्यात काहीतरी वेडेपणा वाटला, आणि वेड्यासारखा अग्रलेख लिहीला. पण नंतर त्यांची आणि गाडगेमहाराजांची भेट झाली आणि ती व्यक्ती काय आहे हे समजले आणि ताबडतोब स्वतःची चूक मान्य करताना लिहीलेला हा अग्रलेख)

माधव गडकरींचे आणि तळवळकरांचे पण काही चांगले मथळे होते, पण लक्षात नाहीत. गडकरींचा एक आठवणारा मथळा म्हणजे "अंतुल्यांच्या साडूच्या तावडीतून मुक्त होण्यासाठी, सिद्धीविनायका आता तूच सिद्ध हो!" - यावर त्यांच्या विरुद्ध हक्कभंग ठराव आणला पण नंतर अंतुल्यांनाच मुख्यमंत्रीपद सोडावे लागले!

अजूनही कदाचीत आठवतील किंंवा आपल्याकडून माहीती करून घेयला आवडतील!

अवांतरः गाडगेबाबा

मूळ विषयाशी काहीएक संबंध नाही पण आजच्या लोकसत्तात गाडगेबाबांचा आंबेडकरांसोबत असणारा फोटो पाहिला तो इथे चिकटवायचा मोह झाला.

कर्मवीर भाऊराव पाटील, गाडगेबाबा आणि बाबासाहेब आंबेडकर

रावबहादूर पटवर्धन

जिन्ना? :))))))))

हे कोणी रावबहादूर पटवर्धन आहेत. म्हणजे कोण ते माझ्या "रत्ती"भर राजकारणी ज्ञानातून माहित नाही. :(

भाग्यश्री पटवर्धनचे नातेवाईक बहुधा आजोबा असण्याचे चान्सेस आहेत. ;-)

डावीकडले..

आणि डावीकडील काळी टोपी घातलेले कोण आहेत?

कर्मवीर दादासाहेब गायकवाड

डावीकडील कर्मवीर दादासाहेब गायकवाड.

हाहा

>> १९९०च्या दशकात रीडिफमधले वर्षा भोसलेचे सदर, ही बाई मूर्खासारखे आणि भडक लिहिते हे समजत असूनही (किंबहुना म्हणूनच) आवडायचे.

अशा लिखाणाच्या बाबतीत एक वेगळा थ्रेड् होऊ शकतो . अशा लिखाणात जे वाचतो ते इतके अतिरंजित किंवा माथेफिरू किंवा आत्मप्रशंसक असते कि ...इट् इज् सो बॅड , दॅट् इट्स् गुड !

मराठिमधले आवडते उदाहरण म्हणजे जयश्री गडकर सारख्या नट्यांची आत्मचरित्रे.

वर्षा भोसले

जे काही लिहायची त्याबद्दल आपले अगदी विरुद्ध मत असू शकते. पण ती 'मूर्खासारखी' लिहीत असे, हे मलातरी सर्वस्वी चुकिचे विधान वाटते. तिचे लेख उत्तमपैकी अभ्यास केलेले (well researched) असायचे. ज्या विषयावर लिहायचे आहे, त्याचा पूर्ण धांडोळा तिने घेतलेला असायचा. मात्र तिची भाषा मलाही खटकायची. कारण ती खूपच भडक असे. जर तिने तिचे मुद्दे शांतपणे मांडले असते,तर ते जास्त परिणामकारक झाले असते.

+१ वर्षा भोसले

जे काही लिहायची त्याबद्दल आपले अगदी विरुद्ध मत असू शकते. पण ती 'मूर्खासारखी' लिहीत असे, हे मलातरी सर्वस्वी चुकिचे विधान वाटते. तिचे लेख उत्तमपैकी अभ्यास केलेले (well researched) असायचे. ज्या विषयावर लिहायचे आहे, त्याचा पूर्ण धांडोळा तिने घेतलेला असायचा. मात्र तिची भाषा मलाही खटकायची. कारण ती खूपच भडक असे. जर तिने तिचे मुद्दे शांतपणे मांडले असते,तर ते जास्त परिणामकारक झाले असते.

अगदी अचूक.

वर्षा भोसलेचे सर्व लेखन हे कधी कधी आततायी भाषेत लिहीलेले वाटले तरी कायम पुराव्यानिशी असायचे. केवळ हिंदूत्ववादास जवळ म्हणुन (भाजपला नाही, कारण तिने त्यांना पण शिव्या दिल्या आहेत, बजरंगदलास तर तालीबनायझेशन म्हणली होती,) आणि नंतर डाव्या विचारांच्या माध्यमांना तो पर्यंत जी त्यांचे प्रभावक्षेत्रे(म्हणजे वृत्तपत्रातील कॉलमस) वाटायची , त्यातील तिची वाचकप्रियता अस्वस्थ करू लागली. म्हणूनच जसे बरेच आधी संडे ऑबझर्व्हरने तिला काढून टाकले तसेच तिच्यामुळे स्वतःच्या हिट्स वाढल्यानंतर रीडीफने तेच राजकारण केले (जरी त्यांना नंतर वाचकांच्या दबावामुळे तिला परत एकदा आणून वाचकांना सांगावे लागले की "तसे काही नाही!").

काय म्हणतात?

काय म्हणतात? -- आर के लक्ष्मण (आता हेच लक्ष्मणरेखा झालय), मटातील हे सदर शक्यतो चुकवत नाही आणि माझे सगळ्यात आवडते सदर!

कसं बोललात् !

असे त्या व्यंगचित्राचे नाव नव्हते का ? ( You said it ! चे भाषांतर )

हो की!

कसं बोललात् ! बरोबर

हलकीफुलकी वाह्यात सिनेमाविषयक सदरं

इथल्या बहुसंख्य लोकांसारखं काही अभ्यासपूर्ण नाही आवडत मला वृत्तपत्रातलं. हलकीफुलकी वाह्यात सिनेमाविषयक सदरं माझ्या आवडीची.
लोकसत्तेत बर्याच (हा 'र् + य' रफार न देता कसा लिहायचा बरं? त्यानं जाम डोकं खाल्लंय.) वर्षांपूर्वी 'रंगतरंग' नामक पुरवणी येत असे. त्यातली बरीच सदरं नीट लक्षात राहून गेली. विशेष करून सिनेमातल्या जोरकस स्त्री भूमिकांबद्दलचं रेखा देशपांडेंबद्दलचं सदर मस्तच होतं. त्याचं नाव आठवत नाही. (बहुतेक 'भूमिका'?)
तेव्हा (या शब्दावर वाद संभवू शकतो, याची मला जाणीव आहे!) हिंदी सिनेमात दुर्मीळ झालेल्या मेलडियस पण नव्या गाण्यांबद्दलचं एक सदर. त्यात त्या गाण्याचे बोल असत, आणि सूर-शब्द-दृश्य यांच्या मेळाबद्दल लहानसं टिपण असे. त्याचंही नाव नाही आठवत.
'दुर्रीवर तिर्री' हे त्यातलं असंच एक धमाल सदर. नट-नट्यांची आचरट मुक्ताफळं आणि त्यावर केलेली काहीतरी अफलातून उद्धट, विलक्षण परिणामकारक आणि मुख्य म्हणजे मिताक्षरी शेरेबाजी असे. नंतर हा प्रकार बराच कॉमन झाला. पण तेव्हा त्यातला पंच प्रचंड आवडे.
बरंच नंतर म.टा.मधे 'मुंबई टाईम्स ऑन सॅटर्डे' सुरू झाली तेव्हा अशीच अनेक मस्त सदरं वाचायला मिळाली.
नाट्यविषयक टिपणं असलेलं राजीव नाईकांच सदर, एखाद्या जुन्या अभिनेत्याचं शब्दचित्र अक्षरशः काही शब्दांत काढणारं (बहुधा 'पोर्ट्रेट' नावाचं?) एक सदर, पहिल्या पानावरची अद्भुत ले-आउट आणि मोठ्ठ्ठा फोटो असणारी (आणि तितकासा बरा कण्टेण्ट नसणारी :( ) मुलाखत, 'मानाचं पान' नावाचं कलावंतांच्या खवय्येगिरीची रसिक दखल घेणारं सुधीर गाडगीळासं सदर...
म.टा.च्या 'संवाद'मधलं 'घरच्या घरी' नावाचं एक पानपूरकही मला आवडत असे. रविवारी घरबसल्या कुठले सिनेमे पाहाल, इतकाच तात्कालिक आणि म्हटलं तर फुटकळ विषय. पण तो इतका मस्त मनापासून लिहिलेला असे, की बस्स! अगदी रामूच्या घसरणीपासून ते हॉलिवुडच्या एखाद्या क्लासिकपर्यंत सगळ्याची मोजक्या शब्दांत दखल घेतलेली असे त्यात.
टिकेकरांच्या लोकसत्तेच्या काळात 'लोकरंग'मधे सदरांची नुसती दिवाळी होती. अशोक राणेंचं 'सख्खे सोबती', मंगला गोडबोलेंचं 'अशी घरं अशी माणसं...', प्रभावळकरांचं 'अनुदिनी'... आणि 'चतुरंग'मधे - राणी दुर्वेंचं 'शेजार'.
साप्ताहिक सकाळमधेही काही सुरेख सदरं होती / आहेत.
गणेश मतकरीचं 'हॉलिवुड-बॉलिवुड' हे त्यांपैकी एक. आख्ख्या अंकाचे पैसे एका सदरात वसूल! हॉलिवुड आणि बॉलिवुडचेही अनवट सिनेमे, उचलेगिरी- ती करताना वापरलेली आणि न वापरलेली अक्कल, कलेचं माध्यम म्हणून सिनेमातले नवे प्रयोग, त्यातनं दिसणारं सामाजिक भान... आणि हे सगळं कसलाही शहाणपणाचा समीक्षकी आव न आणता. पर्सनल पर्स्पेक्टिव्हमधून (मराठी शब्द आठवण्याचा निव्वळ आळस! माफी असावी!) लिहिलेलं. निव्वळ सुरेख.
तसंच प्रकाश बाळांचं 'आरसा' आणि एन्. डी. आपटेंचं 'इंग्रजी' हे सदर...
हम्म्म्म्... वृत्तपत्र ही प्रामुख्यानं सिनेमाच्या जाहिराती आणि सदरं याच दोन कारणांसाठी महत्त्वाची असतात तर... (ह. घ्या.)
- मेघना भुस्कुटे

माझं वाचन

मागील दोन वर्षांपासून सक्काळी सर्वात आधी 'एग्रो वन' वाचतो. शेतकर्‍यांच्या आत्महत्या सोडल्यास नकारात्मक बातम्या नसतात. बाकी लोकसत्ता संपूर्ण वाचल्याशिवाय घर सोडवत नाही. अरुण टिकेकरांचं स्थल काल खूप सुंदर सदर होतं. अच्युत गोडबोलेंची सर्वच सदरं वाचनीय असतात (होती). पैकी बोर्डरुम लाजवाब! 'एग्रो वन' मध्ये 'नव साक्षरांसाठी' या नावाने एक छान सदर आहे. तरुण भारत (बेळगाव) मध्ये 'खजिना' माहितीपूर्ण असते. नव्या स्वरुपातील एच टी बिझनेस पुरवणी आकर्षक व माहितीपूर्ण वाटते. मिंट मधील जवळपास सर्वच सदरं वाचनीय आहेत.
जयेश

गेले ते दिन...

सध्या आजानुकर्णाने म्हटल्याप्रमाणे लोकसत्तेचा अग्रलेख (अजि सोनियाचा दिनु...छाप असेल तर अधिक उत्तम :)) वाचतो. मुंबई वृत्तांत, लोकरंगमधलं मुक्तपीठ, पुस्तकांचे पान; मटाच्या संवादमधील काही सदरे एवढंच. क्वचित लोकप्रभेतलं मेतकूट. करमणूक म्हणून पूर्वी ऑनलाईन मिड-डे वाचायचो. सध्या टाईम्सने त्याला मागे टाकलंय. डॉनमधले कावसजी , टगेरावांनी म्हटल्याप्रमाणे अयाझ अमीर आणि इरफान हुसैन यांची सदरेही वाचतो.

[एकेकाळी लोकसत्तेत तेंडुलकरांचं रामप्रहर, अशोक राणेंचं सिनेमाविषयक लेखन, रविवारच्या पुरवणीत दुसर्‍या पानावर येणारी सदरं - दिलीप प्रभावळकरांची अनुदिनी (श्रीयुत गंगाधर टिपरे ज्या पुस्तकावर आधारित आहे ते), द्वारकानाथ संझगिरींचा किंवा शिरीष कणेकरांचा एखादा क्रिकेट/सिनेमा विषयक लेख, अनुराधा गानूंचं मोरपिसं, मला वाटतं व. पुं.चं ही एक सदर असा अतिशय वाचनीय मजकूर येत असे. मटामध्येही अशोक जैन, सुनीती अशोक देशपांडेंचे रशियन कथांचे अनुवाद, माझी वाचनाची सवय/आवड स्वरुपाचं (चांगलं अर्धा पानभर) आणि अगदी आपल्या आवडत्या खायच्या पदार्थांविषयी (लहानपणी आई/आजी बनवायच्या त्या, किंवा इतर उल्लेखनीय) नामवंतांनी लिहिलेलं सदर येत असे. सध्या तरी कुठेच असं नाव घेण्याजोगं, आवर्जून वाचण्याजोगं मराठी वृत्तपत्रांत आढळत नाही. -- विषयांतराबद्दल क्षमस्व]

बरेच काही

आमच्याकडे आठवड्याच्या कामाच्या दिवशी ४ आणि रविवारी ९ वर्तमानपत्रे (इंग्रजी धरून) यायची. आणि घरी वाचायला माणसे अनेक, त्यामुळे जे काही पहिल्यांदा हाताला लागेल ते सगळे वाचायचे! पण आठवतात आणि आवडायचे ते म्हणजे मटाच्या पुरवण्या, अग्रलेख/ लेख. एक मधला काळ असा होता की कोडी सोडवायला खूप आवडायची.

आताही बरीच ई-वर्तमानपत्रे वाचते - लोकसत्तेच्या पुरवण्या, मटाचे अग्रलेख आणि इ सकाळमधील जागर.. आणि राजकिय हेडलाईन्स.. एखादी हेडलाईन विशेष महत्त्वाची वाटली तर नीट वाचते.

राशीभविष्य - बहुतेकांचे आवडते सदर

राशी भविष्य हे सर्व वर्तमान पत्रातील वाचकांचे आवडते सदर. माझा एक गुजराथी रुम पार्टनर रविवार सकाळ तेवढ्यासाठी विकत घेई. त्याच्या मते रा.का.बर्वे यांचे हे सदर इतर वर्तमान पत्रांपेक्षा सकाळचे भविष्य बरोबर असते.
यावर येथे वर्तमान पत्रातील राशीभविष्य बाबत प्रश्न क्र. ५२ मध्ये लिहिले आहेच
प्रकाश घाटपांडे

 
^ वर