लैंगिक छळणुकीला समाजाचे प्रोत्साहन
स्त्रियांच्या लैंगिक छळणुकीसाठी बहुधा पुरुषांच्या मानसिकतेला जबाबदार धरले जाते. पण तशी मानसिकता निर्माण व्हायला सामाजिक वातावरण बर्याच अंशी कारणीभूत असते हे सहसा कोणाच्या लक्षांत येत नाही.
बहुतेक माणसांची मानसिकता समाजांतून वेळोवेळी मिळणार्या संदेशांतून निर्माण होत असते. त्यांना त्यापलीकडे जाऊन स्वतंत्र बुद्धीने आचरण करणे जमत नाही. आपला समाजही मोठा विचित्र आहे. त्यांत एकीकडे सामाजिक स्थैर्यासाठी पुरुषांनी अत्यंत नैसर्गिक असलेली कामेच्छा नियंत्रणांत ठेवावी अशी (रास्त) अपेक्षा असते तर दुसरीकडे हे नियंत्रण झुगारून द्यायला प्रवृत्त करणारे प्रभावी संदेशही कळत नकळत प्रसृत होत असतात. झगमगाटी दुनियेंत वावरणार्या स्त्री-पुरुषांच्या 'सेक्सी'पणाचे जाहीर कौतुक होत असते व त्यांच्या लैंगिक स्वैराचाराच्या कौतुकमिश्रित चर्चा चविष्टपणे होत असतात. फॅशन व कलेच्या नावाखाली अंगप्रदर्शन करणार्या, पुरुषांचे लक्ष वेधून घेणार्या व त्यांना उद्दीपित करणार्या वेषभूषेला मान्यता मिळते. निर्माण होणार्या बहुतेक चित्रपटांत छेडछाडीच्या स्वरुपांतील पुरुषी आक्रमकपणा स्त्रियांवर छाप पाडण्यांत यशस्वी झाल्याचे दाखवलेले असते. त्याचा महिला प्रेक्षकांकडूनही कधी निषेध होत नाही. वागणुकींतील साधेपणाचा व सभ्यपणाचा उपहास होतो. त्यांत भर म्हणून व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचाराचे समर्थन काही एकांगी बुद्धिवंतांकडून केले जाते. यांतून स्वतःला सिद्ध करू पाहणारे काहीजण प्रेरणा घेतात. त्यांत स्त्रियांची लैंगिक छळणूक होते.
काय, पटतंय का?
Comments
उदाहरणांची आवश्यकता.
काही उदाहरणे दिली असती तर विषय समजला असता. कारण मी तरी असे काही होते हे ऐकले नाही.
उदाहरणे
ऑफिसमध्ये काम करणार्या बर्याच पुरुषांमध्ये काही करून स्त्री सहकार्यांना स्पर्श करण्याची प्रवृत्ति दिसून येते. अशाच एका प्रकरणांत एका मुलीने तक्रार केल्यावरून मी हस्तक्षेप करून एकाची रोमियोगिरी थांबवली होती. (त्यासाठी मला फील्डिंग लावावी लागली होती).
मी सरकारी नोकरींत असतांना एकदा माझ्या ऑफिसच्या टायपिस्ट्च्या टेबलाच्या खणांत "तू ही मेरी जिंदगी" असे लिहिलेली चिठ्ठी सापडली. चौकशी केल्यावर ती एका शिपायाने ठेवल्याचे आढळून आले. (नंतर त्याबद्दल त्याने माफी मागितली).
आजूबाजूला नजर टाकली तर प्रत्येकाला अशी अनेक उदाहरणे सापडतील. आजकाल कॉलेजमध्ये शिकणार्या मुलांमध्ये आपल्या गटांतील मुलींच्या अंगचटीला जाण्याचा "चान्समारूपणा" वाढला आहे. (चित्रपटांत दाखवलेली छेडछाड अशाच प्रकारची असते)
इतका कोरडेपणा शक्य नाही.
स्पर्श करणे ही नैसर्गिक भावना आहे. एखाद्या गोलमटोल मुलीला पाहुन आपल्यालाही स्पर्श करण्याची इच्छा होऊ शकते. एखाद्याच्या ईच्छेविरुद्ध स्पर्श, बोलणे, हावभाव करणे, धक्का इत्यादी छळवणुक समजली जावी.
कामभावना ही नैसर्गिक प्रेरणा असल्यामुळे तीचे संयमन जवळजवळ अशक्यच आहे.
अवांतर : एका वर्तमानपत्रात सासुसुनेच्या भांडणात सुनेला असा सल्ला दिल्याचा आठवतो कि अधुनमधुन सासुला स्पर्श करत जा, त्यामुळे मनाचा विरोध मावळत जाईल.
मान्य आहे
स्पर्शा-स्पर्शातला फरक बाईला नेमका कळतो. उदा.सह सांगायचे तर माझ्या एका बॉसला बोलताना हाताला स्पर्श करायची सवय होती पण ती कधी कोणाला गैर किंवा आक्षेपार्ह वाटली नाही कारण केवळ टच अँड गो असा प्रकार असे पण इतर स्पर्श असे असतात असे नाही.
ऑफिसात हे प्रकार पाहिलेले/ अनुभवलेले आहेत. परंतु एक आवर्जून सांगावेसे वाटते की तरूण मंडळी चिठ्ठ्या ठेवणे, मित्रमंडळात बढाया मारणे एवढेच प्रकार करतात पण हा जो स्पर्श प्रकार आहे तो ४०+ मंडळींना करताना पाहिलेले आहे. हा माझा व्यक्तिगत अनुभव झाला.
स्पर्श
स्पर्श होता तुझा विसरलो भान मी या प्रथम तुज पाहता ....गाण्यातील गीतकाराला अभिप्रेत असलेला स्पर्श .......
स्पर्श ही अनुभूती आहे. इथे आठवणीतील गाणीत अनेक स्पर्श आहेत.
स्पर्श ही अनुभूती आहे. तिथे काय बोलणार?
बरच काही बोलण्यासारख आहे. इथे थोडे लैंगिक छळवणुकीचा उल्लेख आहे. तो बहुतेकांनी वाचलाच असेल.
प्रकाश घाटपांडे
अचुक निदान.
तरुणमुलांचे आकर्षण हे शरीराच्या गरजेप्रमाणे असल्याकारणे विनाकरण स्पर्श टाळणे त्यांना शक्य होत असावे. ( बुद्धाला घराचा त्याग करणे तरुण असल्यामुळेच शक्य झाले असावे.).
४० वर्षांनंतर मात्र आपली मनोवृती बदलत असावी आणि विरोधी लिंगाप्रती स्पर्शाची आवश्यकता जास्त प्रमाणात भासत असावी.
एकदा डॉक्टर्स लोकांच्या परिसंवादात भाग घेण्याचा योग आला. तेथे एका भगिनीने (तक्रार) केली की सध्या यजमानाच्या वागणुकित लक्षणीय बदल झाला आहे तेंव्हा हे समजले.
मला मात्र हे गृहीतक मान्य नाही की स्पर्शाची आवश्यकता फक्त पुरुषातच असते.
पटले नाही ...
बुद्धाला घराचा त्याग करणे तरुण असल्यामुळेच शक्य झाले असावे.
त्यागाचा आणि वयाचा संबंध लावणे पटले नाही. असे असेल तर गांधीजींनी तारुण्यातच पंचा का जवळ नाही केला? कपड्यांचा त्याग भारतात आल्यावर कशाला? सांगायचा मुद्दा असा कि गरज, त्याग भावना यांचा वया सोबत संबंध लावणे पटले नाही. (गांधींचे नाव उदाहरणा दाखल दिले आहे. तर कोणताही हेतु (खास करुन विषयांतर) नाही.)
तसेच ज्यांनी तक्रार केली त्या कोणाच्या भगिनी वा यजमान कोणाचे हे समजण्यात जरा गोंधळ होतो आहे. स्पष्टच सांगायच झालं तर स्त्रीचा संबंध एकतर माता, भगिनी अथवा अर्धांगिनी एवढाच लावणे यात सुद्धा अश्या समस्यांचे मुळ आहे.
४० वर्षांनी मनोवृत्ती बदलते कि नाही माहित नाही. व्यक्तिशः आम्ही ते ४० नंतरच बोलु शकतो, पण ४० कडे झुकलेले अथवा ४० नंतरचे काही लग्न झालेले तसेच लग्न न झालेले कंडनायक आम्ही पाहिले आहेत. या सर्व प्रकाराला मी वयाचे परिमाण न लावता वृत्ती तसेच विकृतीचे परिमाण लावेन. मग व्यक्ति ४० च्या आतली असो वा बाहेरची. विकृती ती विकृतीच.
गांधीजींनी यावर काही प्रयोग केले होते असे ऐकुन आहे. त्यावर काहि भाष्य/लेखन करता येइल का?
मराठीत लिहा. वापरा.
अंशतः सहमत
त्याची व्याख्या कशी स्पष्ट करणार? ती संकल्पनाच आहे. जी प्रकृती समाजाला मान्य नाही ती विकृती म्हणुन समजण्यात सुद्धा आता "वेगळेपण" गणण्यात आले आहे. आपल्या हस्तमैथुन हे विकृतीतच गणले होते ना? त्याची प्रेरणा नैसर्गीक असल्याने त्याला आता लैंगिक प्रकृती म्हणुन वैद्यकीय जगतात मान्यता आहे. म्हणुन तर भोंदु वैद्यांचे फावते ना? आज देखील भारतात "पलंगतोड" "शिलाजित" औषध हे वैद्य सर्रास विकतात. यांचा ग्राहक वर्ग ४०+ हाच आहे. शाकाहारी मित्राच्या "शि-यात हळूच अंड टाकुन बघाव म्हणुन मी केलेला उद्योग हा माझ्या दृष्टीने जरि प्रयोग होता तरी ते समजल्यावर त्याला ती माझी विकृतीच वाटली . निदान त्यावेळी तरी.
त्यांचे ते "सत्याचे प्रयोग" या नावाने प्रसिद्ध आहेत. अधिक माहीती विकास देउ शकतील असे वाटते. पण हे सत्याचे प्रयोग त्यांच्या पेक्षा इतरांना उदा. वल्लभभाई पटेल यांना अडचणीत आणत. त्यांनी लिहिलेले ती दैनंदिनि नंतर प्रकाशात आली होती असे ऐकले होते. पण गांधीजी मात्र प्रयोगाशी प्रामाणिक होते.
मला भुभु चे गारगार नाक व त्याने कानाला चाटताना झालेला मिशांचा व जिभेचा स्पर्श मला आनंददायक वाटतो. माझे अंग शहारुन जाते. पण हीच गोष्ट काहींना मात्र "किळसवाणी" वाटते.
http://www.orkut.com/Album.aspx?uid=4023171411045231898 इथे ऑर्कुटवर बघा.
भुभार्डा
प्रकाश घाटपांडे
४०+
एकुणच ४०+ हा मुद्दा वेगळ्या चर्चेचा आहे. त्यावर जास्त लिहुन विषयांतर करत नाही. पण..
१. ४०+ लोकांच्या मानसिक समस्या ह्या लैंगिकतेकडे झुकलेल्या असतात असा आमचा एकुण प्रतिसाद वाचुन ग्रह झाला आहे.
२. संकेतस्थळांवर ४०+ लोक कसे आणि का वावरतात हा सुद्धा एक मुद्दा आहे. कदाचित तज्ञांकडे याचा विदा उपलब्ध असेलच.
बाकि सापेक्ष गोष्टी या नेहमीच वादग्रस्त ठरतात. जर एखाद्या ठिकाणी ४ टवाळखोर येउन स्त्रीयांची खोड काढु लागले अथवा आजच्या जगात समलैंगिक छेडछाड करु लागले आणि या लोकांची संख्या जास्त झाली तर त्यांच्यासाठी हि सर्वमान्य कृतीच झाली ना? ते याला विकृती म्हणतील का? हे तर फारच लांबच झालं. जर एखादा संकेतस्थळावर अनेक टवाळ एकत्र येउन टवाळक्या करु लागले आणि ते बहुसंख्य झाले तर ती त्या संकेतस्थळावरची सर्वमान्य प्रकृतीच ठरेल ना?
त्यामुळे सापेक्षते बद्दलच बोलायच झालं तर ज्या कृतीला बहुजन समाज मान्यता देतो ती त्या समाजाची प्रकृती म्हणता येइल. पण एखादी विकृती सर्वमान्य बनवण्यासाठीचे कोणतेही प्रयत्न हे विकृतच म्हणता येइल. मग त्याला तुम्ही अंड्याचा प्रयोग म्हणा अथवा इतर काही.
अवांतरः भुभुच्या नाक, मिशा आणि त्याचा जिभेचा तुमच्या कानाल स्पर्श इथवरच थांबलात ते बरे झाले. :)
मराठीत लिहा. वापरा.
गांधीजींचे प्रयोग
अत्र्यांच्या "कशी आहे गंमत" या पुस्तकात "महात्माजी आणि ब्रह्मचर्य" हा लेख वाचायला मिळेल. त्यात विस्ताराने लिहिले आहे.
मला स्वतःला त्या लेखातील अत्र्यांची बरीच मते एकांगी वाटली. पण एक माहिती म्हणून वाचायला हरकत नाही.
- आजानुकर्ण
गांधी आणि ब्रह्मचर्य.
विचार आणि आचार असा निकष लावला तर गांधींचे स्त्री-पुरुष संबंधातील विचार हे निरागस अथवा १२ /१३ वर्षाच्या मुलाच्या वयाच्या तोडीचे असावेत. उदा. कामभावनाबद्दल त्यांनी असे लिहिले आहे की स्वभावत: स्त्रीया कामभावनाचे नियमन चांगले करु शकतात. कारण या कामभावनेतुन अपत्यप्राप्ती होत असते आणि त्यातील कष्ट जाणवुन त्यांच्यावर कामभावनेचा पगडा कमी असतो. गांधींच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी त्यावर ब्रह्मचर्य पालन हा उपाय शोधला. कदचित अहिंसा याच्या प्रयोगाचाही यावर प्रभाव असावा.
इतरत्र लिहिल्याप्रमाणे मात्र ते प्रामाणिक असल्यामुळे त्यांच्या प्रयोगावर मात्र भाष्य करण्यासाठी मी स्वताला पात्र समजत नाही.
एकंदरीतच गांधींच्या विचाराचा आणि प्रयोगाचा कामेच्छाचे स्वरुप समजण्यासाठी उपयोग होणार नाही.
दुसरे म्हणजे हा विषय समजण्यासाठी आपण एका अभ्यासूची भुमिका स्विकारायला हवी. म्हणजेच कोणतेही पूर्वग्रह नसताना यावर विचार करायला हवा.
सर्वप्रथम कामभावना या प्रेरणा आहेत हे स्विकारायला हवे. या प्रेरणेचा उपयोग जीवसृष्टिचे सातत्य ठेवण्यात आहे याचा स्विकार डोळस पणे करायला हवा. दुसरे म्हणजे स्त्री आणि पुरुष हे यात प्रेरक आणि पुरक आहेत हे मान्य करायला हवेत. तिसरे म्हणजे यात निसर्गाच्या उर्जाचक्राचा विचार आहे.
हो सगळ्यात महत्वाचे, आपण एका प्राण्याच्या रुपात आहोत आणि संस्कृतीच्या चौकटीत याचा विचार केला तर दिशाभुल होण्याचीच शक्यता आहे.
तुर्त इतकेच...
बाकी सगळं ठिक
बाकी सगळं ठिक हो पण
"हो सगळ्यात महत्वाचे, आपण एका प्राण्याच्या रुपात आहोत आणि संस्कृतीच्या चौकटीत याचा विचार केला तर दिशाभुल होण्याचीच शक्यता आहे."?????
बापरे.. मग म्हणजे हे चालणारं पशुवत आचरण योग्य म्हणताय की राव तुम्ही. संस्कृती आहे म्हणून आचरणाला नियम आहेत.संस्कृतींच्या चौकटीतच याचा विचार केला पाहिजे
ऋषिकेश
चौकटीच्या मर्यादा.
आपण आचरण योग्य अथवा अयोग्य असा विचार केला तर या भावनेचा मागोवा घेता अशक्यच आहे. म्हणून या भावनेचे स्वरुप समजून घेण्यासाठी आपणही प्राणी आहोत हे मनाला पटले पाहिजे, तरच आपण याबद्दल काही समजावून घेऊ शकू.
प्राणी आणि पशूयात काही भेद आहे हे आपण मान्य करालच.
शेवटी एक छोटासा प्रश्न, या कामभावनेला नेमके समाजावून कश्यासाठी घ्यायचे आहे?
लैंगिक छळणूक
ज्यांना करायची असते त्यांना कोणत्याना कोणत्या कारणांची गरज असते. विशेषत: आपल्या दुष्कृत्यांचे खापर दुसर्याच्या माथी फोडण्याचे.
एखाद्याने खड्ड्यात उडी मारायला सांगितलें तर चूक आणि मूर्खपणा उडी मारणार्याचा असतो. मारायला सांगणार्याचा नाही. उदाहरणे मलाही वाचायला आवडली असती.
- राजीव.
स्पष्टीकरण
एखाद्याने खड्ड्यात उडी मारायला सांगितलें तर चूक आणि मूर्खपणा उडी मारणार्याचा असतो. मारायला सांगणार्याचा नाही.
हे जितके खरे आहे तितकेच समाजाकडून मिळणार्या संदेशांचा बहुतेक माणसांच्या मनावर परिणाम होत असतो हेही खरे आहे. त्याप्रमाणे वागतांना आपल्या वागणुकीच्या परिणामाची जबाबदारी आपल्यावरच येणार आहे याचे भान सर्वसामान्यांना रहात नाही.
लैंगिक छळवणुक
लैंगिक छळवणुक कशाला म्हणायचे ? यावरच वाद होतील. कायदेशीर दृष्ट्या बोलायचे झाले तर प्रत्येकाने हा गुन्हा आयुष्यात केलेला आहे. तो नोंदला गेला नसेल एवढेच. लैंगिकता ही मानसिकता असल्याने मानसशास्त्रिय दृष्ट्या ही छळवणुक व्यक्तिसापेक्ष बनते. इतकी की एकाच्या दृष्टीने असलेली छळवणुक दुसर्याच्या दृष्टीने आनंद असतो. मनोविकार तज्ञ यावर अधिक प्रकाश टाकू शकतील. परंतु ते बोलत नाहीत. कारण समाजाला ते पचेलच असे नाही उगा रिस्क कशाला घ्या?
(गुन्हेगार)
प्रकाश घाटपांडे
अमेरिकन कायदा
याबाबत "डिसक्लोजर" या सिनेमातील (लेखक मायकेल क्रिच्टन - कोमा, जुरॅसिक पार्क वगैरे) एक अमेरिकन कायद्यासंदर्भात एका वकील स्त्रीचे वाक्य आहे: "sexual harassment is not about sex, it is about power" . या वाक्यात वास्तवीक सर्व काही समजू शकते आणि कोठेही लागू होऊ शकते.
हो
एकीकडे सामाजिक स्थैर्यासाठी पुरुषांनी अत्यंत नैसर्गिक असलेली कामेच्छा नियंत्रणांत ठेवावी अशी (रास्त) अपेक्षा असते तर दुसरीकडे हे नियंत्रण झुगारून द्यायला प्रवृत्त करणारे प्रभावी संदेशही कळत नकळत प्रसृत होत असतात.
हो! आपले मुद्दे बरोबरच वाटले...
आपला
गुंडोपंत
प्रत्येक पिढीत
हे वाक्य मात्र प्रत्येक पिढीत स़ंक्रमणित होत गेले आहे. त्यावर उतारा म्हणुन " स्वातंत्र्य व स्वैराचार यातील सीमारेषा पुसट आहे" हे वाक्य पण तसेच संक्रमणित होत गेले आहे. प्रत्येक पिढित हे असेच होत रहाणार हेच आमचे भाकित
अवांतर- असली भाकिते सांगायला ज्योतिषी कशाला हवेत हा विचार काहींच्या मनात येउन गेला हे आम्ही जाणतो
(मनकवडा ज्योतिषी)
प्रकाश घाटपांडे
अवघड
यामागची प्रेरणा काय याचे एका वाक्यात उत्तर देणे अवघड आहे कारण हा वेगवेगळ्या प्रेरणांचा एकत्रित परिणाम आहे. लहानपणापासून आपल्याकडे सेक्स म्हणजे काहीतरी घाणेरडे असा समज पसरवला जातो. याबाबत खुली चर्चाही अशक्य. अशा परिस्थितीमध्ये मुलांच्या नैसर्गिक प्रेरणेला नेहेमी दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. मग अशा घटनांमधून ही प्रेरणा बाहेर येते. याचा अर्थ परदेशात असे प्रकार होत नाहीत असा नाही. पण आपल्याकडे असे प्रकार होण्यामागे याचा सहभाग आहे असे मला वाटते.
यात संस्कृतीचाही भाग आहे. आपल्याकडे स्त्री-पुरूष स्पर्श जवळजवळ निषिद्ध समजला जातो. परदेशात याच्या उलट प्रकार आहे. आपल्याकडे जसे मित्र मित्र हातात हात घालून किंवा गळ्यात हात घालून फिरतात, तसे परदेशात दिसले (दिसत नाहीतच) तर त्यांचे १००% समलिंगी संबंध आहेत असे गृहीत धरले जाते. हा त्यांच्या संस्कृतीचा दोष आहे.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
प्रेरणा की ओढ.
कोर्डे साहेब,
कामेच्छा नियंत्रणांत ठेवणे कठीण काम आहे. वरवर दिसणारे नियंत्रण वेगळे आणि मनात चाललेली खळबळ वेगळी असावी.
आपल्या संस्कृतीत स्त्री-पुरुष असा भेद असल्यामुळे स्त्री- विषयक आसक्ती सतत कुठून तरी डोकावत असते.
द्वारकानाथ म्हणतात तसे-
स्पर्श करणे ही नैसर्गिक भावना आहे. एखाद्या गोलमटोल मुलीला पाहुन आपल्यालाही स्पर्श करण्याची इच्छा होऊ शकते. एखाद्याच्या ईच्छेविरुद्ध स्पर्श, बोलणे, हावभाव करणे, धक्का इत्यादी छळवणुक समजली जावी.
या मुद्याशी सहमत आहे. त्याचबरोबर राजेंद्र म्हणतात तसे आपल्याकडे स्त्री-पुरूष स्पर्श जवळजवळ निषिद्ध समजला जातो. परदेशात याच्या उलट प्रकार आहे. अशा अभावामुळेच आपल्याकडे स्त्रीचा लै. छळ होत असावा किंवा आडमार्गे स्वैराचाराचा प्रयत्न होत असावा, असे आमचेही मत आहे.
पटले नाही
व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचाराचे समर्थन काही एकांगी बुद्धिवंतांकडून केले जाते. यांतून स्वतःला सिद्ध करू पाहणारे काहीजण प्रेरणा घेतात. त्यांत स्त्रियांची लैंगिक छळणूक होते.
हे पटले नाही. लैंगिक छळवणूक वरील गोष्टींमुळे होते असे वाटत नाही , त्याची कारणे सुप्त महत्त्वाकांक्षा/इच्छा असावी. उलट स्वैराचार हा ज्याला/जिला (स्वतःच्या इच्छेने) करायचा असतो ते या समाजात वरिष्ठ भूमिका असलेल्या लोकांनी केलेल्या कदाचित काहीश्या स्वैर आचरणाचा स्वतःची कृती योग्य आहे हे ठरवायला वापर करत असतील असे वाटते. हेही खरे आहे की समाजमान्यता कशाला आहे ते काळाप्रमाणे पालटते आहे. पण आपल्या स्वैर वागण्यामुळे आपले किंवा इतरांचे नक्की काय आणि कितपत नुकसान होणार याचा विचार आल्यास बरेच लोक मागे फिरतील.