द बोर्न अल्टीमेटम

माणूस आणि इतर प्राण्यांमधील एक महत्वाचा फरक म्हणजे माणसाला नेहेमी नवीन अनुभवांचे आकर्षण असते. गाई, म्हशी जन्मभर तोच चारा खात (बहुधा) सुखाने जगतात. आपल्या मात्र अन्न, वस्त्र, निवारा ह्या गरजा भागल्या की बाकीचा सर्व वेळ आपण नवनवीन अनुभवांच्या शोधात असतो. इतकेच काय, आता अन्न, वस्त्र वगैरे मिळण्याची शाश्वती आल्यावर आपल्या मूलभूत गरजांमध्येही आपल्याला 'चेंज' हवा असतो. या वृत्तीमधूनच कलांचा जन्म झाला असावा. पंचवीस-तीस हजार वर्षांपूर्वी गुहेतील भिंतींवर चित्रे काढणारा क्रोमॅग्नन आणि आज शहरांमधील भिंती ग्राफितीने रंगवणारा होमो सेपियन सेपियन, या दोन्हींमध्ये नवीन अनुभवांचा ध्यास हे समान सूत्र सापडते.

प्रत्येक अनुभव आधीपेक्षा वेगळा असेल तर जास्त आकर्षक वाटतो. यात अर्थातच चित्रपटही आले. स्पाय थ्रिलर हा हॉलीवूडने चावून चावून चोथा केलेला प्रकार आहे. बोर्न अल्टीमेटम ही या यादीतील आणखी एक भर अशी काहीशी भावना चित्रपटाच्या सुरवातीला होती. याची कथा तशी फारशी नवीन नाही. एका सीआयए एजंटवर वरिष्टांकडून अन्याय होतो. याच्या मुळाशी असते सीआयएचे प्रोजेक्ट ब्लॅकब्रायर. त्याचा शोध घेण्याचा नायकाचा प्रयत्न आणि त्याला अडवणारे सीआयएचे वरिष्ठ. चित्रपट सुरू होतो तोच एका वेगवान पाठलागाने. आणि या पाठलागात आपण नायकाबरोबर मॉस्को, लंडन, तोरिनो, माद्रिद असे मुक्काम वेगाने गाठत युरोपमध्ये प्रवास करतो. अभिनय, दिग्दर्शन आणि एडीटींग यांच्या प्रभावी संगमाने हा वेग चित्रपट भर कायम रहातो. कुठल्याही क्षणी आपल्याला थांबून विचार करण्याची उसंत मिळत नाही आणि हेच चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे. चित्रपटाचा नायक आहे, मॅट डिमन हा गुणी कलाकार. मॅटला गुड विल हंटींग या चित्रपटामध्ये उत्कृष्ट स्क्रीनप्लेबद्दल ऑस्कर आहे यावरून त्याच्या बुद्धीमत्तेची कल्पना यावी. चित्रपटाला तारून नेण्यात त्याचे श्रेय बरेच आहे. शॉन कॉनेरीपासून टॉम क्रूझपर्यंत सर्वांनी गुप्तहेराची भूमिका रंगवल्यावर आता यात करायला वेगळे काय असणार असा प्रश्न पडू शकतो. खरा गुप्तहेर फार थोड्या लोकांनी पाहिला असेल. मॅटने रंगवलेला गुप्तहेर खरा वाटतो याचे कारण कुठलीही स्टाइल न उचलता त्याने केलेली डाउन-टू-अर्थ भूमिका. बाँडप्रमाणे जाहिरात न करता छोट्या-छोट्या प्रसंगांमधून त्याने दाखवलेली चलाखी लक्षवेधक ठरते. गच्चीवरचा पाठलाग चालू असताना कुंपणावरच्या काचा लागू नयेत म्हणून वाळत घातलेले कपडे हाताला गुंडाळणे किंवा हाटेलात गेल्यावर सर्वात आधी तिथली माणसे आणि दरवाजे यांचे निरिक्षण करणे.

या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य जे विवादास्पद ठरले, ते म्हणजे यात शेकी कॅमेरा हालचाली वापरल्या आहेत. हॉलीवूडमध्ये प्रत्येक शॉटचा कॅमेरा अँगल मोजून मापून घेण्याची पद्धत असताना चक्क कॅमेरा हातात धरून शूटींग करणे म्हणजे धाडसच. त्यातही बरेचदा अर्धाच चेहेरा किंवा हाताची फक्त बोटेच असेही शॉट आहेत. आणि याबद्दल चित्रपटाचे दिग्दर्शक पॉल ग्रीनग्रास यांच्यावर बरीच टीकाही झाली. (काही लोकांनी यामुळे मळमळ वाटते अशाही तक्रारी केल्या.) माझ्या मते चित्रपटाची उत्कंठा वाढवण्यात या कॅमेरा पद्धतीचा बराच वाटा आहे. समजा खर्‍या आयुष्यात आपण एखाद्या प्रसंगातून गेलो आणि नंतर ते दृश्य डोळ्यासमोर आणायचा प्रयत्न केला, तर काय होते? आपल्याला आठवतात ते प्रसंगांचे तुकडे, एखाद्या चेहेर्‍यावरचा एखादा क्षण, एखादी हालचाल, एखादा शब्द. आणि आपले डोळे म्हणजे कॅमेरा अशी कल्पना केली तर एखादा प्रसंग आपण आपल्या डोळ्यांनी कसा चित्रित करू शकतो? याचे उत्तर आहे या चित्रपटाचे चित्रीकरण. अर्थात याबद्दल नक्कीच दुमत होउ शकेल.

कथा प्रसिद्ध लेखक रॉबर्ट लुडलमच्या याच कादंबरीवरून घेतलेली आहे. बोर्न आयडेंटीटी आणि बोर्न सुप्रीमसी या दोन भागांनंतर या ट्रिलॉजीचा हा तिसरा भाग. या भागातील कथा आधीच्या दोन भागांचा आधार घेते. आधीच्या भागांमध्ये बोर्न सुपृमसी बोर्न आयडेंटीटीपेक्षा प्रभावी वाअटला. मिशन इम्पॉसिबल १ शी काही साम्ये जाणवतात. गमतीची गोष्ट म्हणजे मि.इ. १ मध्ये मध्यंतरानंतरचा आख्खा चित्रपट सीआयएमध्ये कसे घुसायचे याची योजना बनवण्यात जातो. इथे मात्र मॅट दहा मिनिटात ते काम करतो. (खरी सीआयए इथे मरायला कुणी पाहिली आहे? त्यामुळे आम्हाला दोन्ही चालून जाते. :) )

नेहेमीच्या साचेबद्ध पद्धतींना काहीसा न जुमानणारा हा चित्रपट सर्वांना आवडेलच असे नाही. पण दोन तास मनोरंजन करणारा एक वेगळा प्रयत्न म्हणून याकडे नक्कीच बघता येईल.

Comments

छान

निव्वळ मॅट डिमन साठीच आयडेंटीटी की सुप्रिमसी ह्यातला एक कोणता तरी पाहिला होता पण तो इतका टुकार होता की अल्टीमेटम् च्यावेळेला तिकडे फिरकलोही नाही. पण आता 'अगदीच बोअर झाले असेल तर बघायला हरकत नाही' ह्या स्टाटस मध्ये तुमच्या परिक्षणाने आला आहे. विशेषतः नविन कॅमेरा टेक्निक बघण्यासाठी.

स्टेडी कॅम पेक्षा हा वेगळा प्रकार दिसतो आहे. गुडफेलास ह्या चित्रपटात स्कोरसेसीने ह्या तंत्राचा अप्रतिम वापर केलेला आहे.
-कोलबेर

गुडफेलाज

गुडफेलाज बघायचा आहे, बरेच ऐकून आहे या चित्रपटाबद्दल. तसेच स्कोरसेसीचा द डिपार्टेड ही यादीत आहे.
अल्टीमेटम डोक्याला जास्त ताण न देता दोन तास मनोरंजन पण वेगळ्या प्रकारे या अर्थाने बघायला हरकत नाही. नवीन तंत्राबद्दल फार अपेक्षा न ठेवल्यास चांगले कारण बर्‍याच लोकांना हे तंत्र आवडलेले नाही.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

सुप्रीमसी खास वाटला नाही

आयडेन्टिटी आवडला. मात्र बर्‍याच चित्रपटांप्रमाणे यातही चित्रपटापेक्षा मूळ पुस्तक, त्यातील कथानक अधिक रंजक वाटले. दा विन्ची कोड च्या बाबतीतही माझी अशीच प्रतिक्रिया होती. सुप्रीमसी इतका खास वाटला नाही; पदरी निराशा आली. अल्टिमेटम उत्तम जमला आहे, असे ऐकून आहे; मात्र अद्याप चित्रपट पाहण्याचा योग आलेला नाही.

हम्म

माझे थोडे उलटे झाले. मला सुप्रीमसी सरस वाटला. ही तिन्ही पुस्तके वाचलेली नसल्याने किती बदल झाला आहे माहित नाही. पण चित्रपटापेक्षा पुस्तक चांगले असा अनुभव बरेचदा आला आहे. पॅपिलॉन चित्रपट पाहून अशीच निराशा झाली होती. याला अर्थातच अपवाद आहे - गॉडफादर. पुस्तक सरस की चित्रपट हे याबाबतीत सांगणे कठीण आहे.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

पुस्तक

बोर्न सिरीजमधील चित्रपटापेक्षा मूळ पुस्तक चांगलेच असते असा माझाही अनुभव आहे. रॉबर्ट लुडलमची बंदुकींची, गाड्यांची मनोरंजक वर्णने, पात्रांची कार्लोस रॅमिरेझ सँचेझ वगैरे सुंदर नावे सहीसही चित्रपटात कुठे उतरणार. ;)

पण मॅट डिमन आवडत असल्यामुळे हे चित्रपटही कंटाळवाणे वाटले नाहीत. फ्रँका पोटेन्टे(! नाव टाईपण्यात गोंधळ झाला असल्यास क्षमस्व) ही अभिनेत्रीही आवडते. त्यामुळे सुप्रीमसी अर्थातच आवडला होता. ;)

पण लुडलमची इतर पुस्तके फार बोरिंग वाटली बॉ. जेसन डिरेक्टिव्ह बरे होते पण द हादेस (की हेडस?) फॅक्टर फारच कंटाळवाणे. शेवट काय आहे ते जाणण्यापुरते वाचून कसेबसे संपवले.

याच्याशी सहमत

बोर्न सिरीजमधील चित्रपटापेक्षा मूळ पुस्तक चांगलेच असते असा माझाही अनुभव आहे.

बोर्न आयडेन्टीटी हा या शृंखलेतील सर्वात आवडता चित्रपट आणि मॅट डिमन हा आवडता अभिनेता.

मला या लेखाला पहिला प्रतिसाद द्यायचा होता पण देताच येत नव्हता. का कोणजाणे?

"इन्फर्नल् अफेयर्स्"

"द डिपार्टेड्" ज्या चीनी चित्रपटावरून घेतला तो हा चित्रपट सध्या घरी पडून आहे. मुले झोपलेली असतानाच बघायची परवानगी असल्याने अजून पाहिला नाही. :-)

नवीन

डिपार्टेडची प्रेरणा चिनी चित्रपट आहे हे माहित नव्हते. एकूणात कुरोसावाच्या सेवन सामुराईवरून द मॅग्निफिसंट सेवन आणि त्यावरून आपला शोले ही परंपरा अजून चालू आहे हे कळाल्यावर छान वाटले. :)
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

डिपार्टेड

डिपार्टेड हा स्कोरसेसीचा सर्वात सुमार चित्रपट आहे असे बर्‍याच ठिकाणी वाचले होते. कुणी जाणकार अधिक माहिती देऊ शकेल का या चित्रपटाबद्दल. ब्रॅड पिट अत्यंत आवडत नसल्याने आणि ब्रॅड पिटचा माझ्यावरचा इफेक्ट नलिफाय करण्याइतके मॅट डेमन आणि जॅक नाहीत असे वाटल्याने हा चित्रपट पैसे देऊन थेटरात पाहून विकतची डोकेदुखी घेण्याचे टाळले होते. जॅकने कसे काम केले आहे जरा सांगा हो!

डिपार्टेड

यात जॅकचे सर्वोत्तम काम नक्कीच नाहि. पण हा चित्रपट पहा. चांगला आहे. सुमार वगैरे तर नक्किच नाहि. आणि ब्रॅड पिट हा अगदिच त्रासदायक नाहि :)

ब्रॅड पिट??

डीपार्टेड मध्ये ब्रॅड पिट नाही. तुम्हाला लिओनार्डो डी कॅप्रिओ म्हणायचे आहे का?
डीपार्टेड हा स्कोरसेसीचा मलातरी सर्वात जास्त आवडलेला चित्रपट आहे.
(जाणकार नसलो तरी )जरा निवांत वेळ मिळाला की ह्यावर एक लेख टाकतो.
-कोलबेर

हम्म

अरे हो. सॉरी. मी इतके दिवस डिपार्टेड मध्ये ब्रॅड पिट आहे असेच समजत होतो. डिपार्टेड बघायला काही हरकत नाही ;०

-- आजानुकर्ण

डिपार्टेड

डिपार्टेड अगदीच टाकाऊ नाही. पण थोडा बॉलिवूड धाटणीचा वाटतो. शिवटी चित्रपट वेगवान होत जाऊन सुसह्य होतो असे आठवते.

डिपार्टेड

ब्रॅड पिट या चित्रपटाचा सहनिर्माता आहे असे कळाले. काल बघण्याचा योग आला. चित्रपट प्रभावी आहे. जॅक निकल्सन, मार्टिन शीन, मॅट आणि लिओनार्दो यांची कामे छान झाली आहेत. पटत नाही ते यातील मानसोपचार तज्ञाचे पात्र. ती स्वतःच इतकी शेकी वाटते की तिलाच काउन्सेलिंगची गरज आहे असे वाटायला लागते.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

मॅट् डिमन्

...याच्यावर खरे तर नवा थ्रेड् सुरू करायला हवा. मला तो अतिशय आवडतो. "गुड विल् हंटींग्" , "राउंडर्स्" , "दि टॅलेंटेड् मि. रिप्ली" , "बोर्न्"चा पहिला भाग, आणि हो ! "ओशन्स् इलेव्हन" चा पहिला भाग सुद्धा ! मला डिमन् नवीन (आता तोही तसा जुना होत चालला म्हणा! ) लोकांपैकी सगळ्यात आवडतो.
"डीपर्टॅड्"मधे डीकॅप्रीओला जरी ऑस्कर मिळाले असले तरी माझ्या मते डीमन् चे काम उत्कृष्ट झाले होते ...

कराच!

गुड विल हंटींगची कथा/पटकथा डिमन् आणि बेन ऍफ्लेकने कॉलेजात असताना लिहिलेही आहे हे इथल्या एका कार्यक्रमात ऐकून मी चकितच झालो होतो. डिमन् आणि ऍप्फ्लेक शाळासोबती त्यामुळे माझ्यामते आपल्या मित्राला थोडेसे क्रेडीट देण्यासाठी त्याचे नाव डिमनने पटकथेला जोडले असावे अन्यथा बेन ऍफ्लेक काही लिहू शकतो वगैरेवर विश्वास बसणे कठीण आहे :)
बाकी राउंडर्स् तर अफलातुनच आहे!!

-कोलबेर

खरे आहे

चेहर्‍यावर जन्मजात उद्धटपणा खूप कमी लोकांना शोभतो. ब्रँडो, पचिनो हे मोजकेच असले लोक. मात्र असे भाव घेतलेला ब्रॅड पिट मात्र विनाकारण भाव खातो असे वाटते.

मॅट डिमन मात्र लक्षात राहतो ते त्याच्या निरागस चेहर्‍यामुळे. नेहमी शिकायला उत्सुकसा आणि नम्र वाटतो. या गुणी अभिनेत्याला त्याच्या दर्जाच्या मानाने चांगले काम खूप कमी मिळाले आहे असे वाटून जाते.

आजानुकर्ण

सहमत

मी मॅट डीमनचा फ्यान आहे. तो इतका टॅलेंटेड असूनही त्याचे पाय जमिनीवर आहेत असे जाणवते.
डिपार्टॅड मधे दि काप्रिओ आहे म्हटल्यावर थोडी निराशा झाली. मला न आवडणार्‍या नटांपैकी तो एक आहे. त्या टायटॅनिकला पोतभर ऑस्कर का मिळाली हा एक न सुटणारा प्रश्न आहे.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

कशी नशिबानं थट्टा आज मांडली :)

माझ्याच लेखाला मलाच आभाराचा प्रतिसाद देता येत नाही. काय हा दैवदुर्विलास. इ. इ. असो. प्रतिसादाला प्रतिसाद देउन बघतो.

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार. या निमित्ताने काही चित्रपट, कलाकार यावरही चर्चा झाली.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

 
^ वर