दिवाळी अंक - काय वाचाल?

२००७ सालचे सगळे दिवाळी अंक आता प्रकाशित झाले आहेत. गेल्या काही वर्षांत दिवाळी अंकांची संख्याच इतकी प्रचंड वाढली आहे, की सामान्य माणसाला सगळे दिवाळी अंक पूर्ण वाचणे -अगदी सवड आणि ऐपत असली तरी - शक्य होत नाही.पण दिवाळी अंकांमधील काही साहित्य 'चुकवू नये असे' असते. आपण वाचलेल्या दिवाळी अंकातील आपल्याला काय आवडले (आणि काय आवडले नाही) हे इतरांना कळावे म्हणून ही चर्चा सुरु करत आहे.
'अंतर्नाद' दिवाळी अंकातील 'गांधी -रिचर्ड ऍटनबरो' यांच्या अजरामर चित्रनिर्मितीविषयी यशवंत रांजणकर यांचा लेख अप्रतिम आहे. याच अंकातील 'कवितेची राजधानी' या केशवसुत स्मारकनिर्मितीविषयीच्या मधु मंगेश कर्णिक यांच्या लेखात बाकी स्वतःभोवती दिवे ओवाळून घेण्यापलीकडे दुसरे काही नाही. 'माझा मौनातील आकांत' हा विलास पाटील यांचा लेख आणि सुभाष भेंडेंचा 'मी आणि माझा नातू' हा लेखही असाच फालतू आहे. याच दिवाळी अंकात रॉय किणीकरांवरचा अनिल किणीकरांचा लेख आहे. जवळजवळ असाच लेख त्यांनी दुसर्‍या एका दिवाळी अंकात (साप्ताहिक सकाळ?) लिहिला आहे. हे दोन्ही लेखही एकसारखे सुमार आहेत. एकंदरीत 'अंतर्नाद' चा दिवाळी अंक मला अपेक्षाभंग करणारा वाटला.

लेखनविषय: दुवे:

Comments

मला बरा वाटला..

'अंतर्नाद' दिवाळी अंकातील 'गांधी -रिचर्ड ऍटनबरो' यांच्या अजरामर चित्रनिर्मितीविषयी यशवंत रांजणकर यांचा लेख अप्रतिम आहे.

सहमत आहे...

याच दिवाळी अंकात रॉय किणीकरांवरचा अनिल किणीकरांचा लेख आहे.

हा लेख मला तरी बरा वाटला..

आपला,
(किणीकरप्रेमी) तात्या.

'चुकवू नये असे'

अर्थात सगळे अंक वाचून झालेले नाहीत. हावरटासारखं थोडं हे, थोडं ते, असं करत करत चाललंय. त्यांपैकी चुकवू नये असं काही -

१) ’अक्षर’मधला सारा केनवरचा लेख (इरावती कर्णिक), बर्गमानवरचा लेख (गणेश मतकरी), आईवरचा लेख (राजू परुळेकर)
२) ’साधने’मधला अतुल कुलकर्णीचा लेख (त्यानं ’शब्द’मधेपण लिहिलंय आणि तेही सुरेख आहे.)
३) ’लोकसत्ते’तली अमृता सुभाषची कथा
४) ’शब्द’मधली किशोर कदमनं घेतली नसीरुद्दीन शाह यांची मुलाखत
५) ’चिन्ह’मधली चित्रकार प्रभाकर कोलते यांची नीलिमा कढेंनी घेतली मुलाखत
६) ’साप्ताहिक सकाळ’मधला नीता गद्रेंचा लेख आणि लीला पाटलांचा लेख. (यातली उत्सुकतेनं वाचलेली दुबेंची मुलाखत माझ्या डोक्यावरून गेली. तसाच अवचटांचा शरीरावरचा लेखपण कंटाळा आल्यामुळे अर्ध्यात टाकून दिला.)
७) ’साधने’तला स्यूडोसायन्सवरचा सुबोध जावडेकरांचा लेख
८) ’मौजे’तला एलकुंचवारांचा लेख. (काहीच्या काहीच वेगळा. जवळ जवळ कविता म्हणावा असा.)

- मेघना भुस्कुटे

बर्गमन

कोण बर्गमन? दिग्दर्शक इंगमार बर्गमन आजोबा की अभिनेत्री इन्ग्रिड बर्गमन?


आम्हाला येथे भेट द्या.

दिग्दर्शक

दिग्दर्शक बर्गमान.

- मेघना भुस्कुटे

वा!

हा वाचायला हवा.
अवांतर : वाचनाबाबत माझ्याही वृत्तीला 'हावरट' हे एकच विशेषण लागू पडते ;)

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

अवचटांचा भिकार लेख

अनिल अवचट हे माझ्या अत्यंत आवडत्या लेखकांपैकी एक. कोणत्याही अंकात त्यांचा लेख् असला की आधी तो वाचतो. सा.स.मधला त्यांचा लेख अतिभिकार आहे. त्यापेक्षा ग्रेची ऍनॉटोमी वाचावी. अवचटांचे अधूनमधून वाचकांना 'बॉस' वगैरे म्हणणे ...
असोच.
सन्जोप राव

अवचट

अनिल अवचट हे माझ्या अत्यंत आवडत्या लेखकांपैकी एक.
माझ्याही...
पण मला त्यांच्या नाकर्ते पणाचा अतिशय राग येतो!
आयुष्याच्या खडतर दिवसात पैसे नसतांना बायको इतके काही कष्ट करत असतांना अवचटांनी काहीच करू नये नि समाजसेवा करत 'बसावे'?
ते खुप चांगल्या प्रामाणिक भाषेत लिहिल्याने आधी जाणवले नव्हते पण नंतर खुप टोचले...
मग हा माणूस मला माणूस म्हणून अगदीच नाकर्ताचा आळशी वाटायला लागला.

पण लेखक म्हणून मात्र अजूनही आवडतो.

असो इतक्या मोठ्या लेखकावर भाष्य करणारा मी कोण लागून गेलोय...
ज्याला जसं आवडतं, पटतं तसा तो राहतो... नाही का?

आपला
गुंडोपंत

अवचट

अवचटांचा लेख मी वाचलेला नाही त्यामुळे त्यावर काही प्रतिक्रिया व्यक्त करू शकत नाही. त्यांची पुस्तके वाचून, भेटून त्यांच्याबद्दल प्रामाणिकपणे असे वाटते की अगदी निरागस, लहान मुलाप्रमाणे सर्व काही स्वतःहून अनुभवण्याची इच्छा असलेले हे एक व्यक्तिमत्त्व आहे. "प्रोफेशनल" प्रकारचे म्हणावे तसे त्यांचे लेखन कधीच नसते. ते स्वत:लाही "लेखक" असे म्हणवून घेत नाहीत.
अवचटांनी स्वतःही अनेक पुस्तकांमध्ये ते स्वतः उगाच नसत्या मृगजळामागे पळून दमछाक करून घेणारे नाहीत हे मान्य केले आहे.

माणसे, गर्द, कार्यरत, धार्मिक, कोंडमारा सारखी त्या क्षेत्रात स्वतः जाऊन अभ्यास करून लिहिलेली पुस्तके, सुनंदा अवचट गेल्यानंतर मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे कार्य हा सर्व नाकर्तेपणा मात्र अगदी डोळ्यावर येतो!

मस्त पैकी डॉक्टरकीची प्रॅक्टिस करून पैसा कमवणे आणि नंतर घरी पाय वर करून आपल्या तथाकथित कर्तृत्वाचा रवंथ करत बसणे हे सोडून निपाणी, दापोली, बीड अशा प्रदेशांमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये, वेश्यावस्तींमध्ये उनाडपणा करत रस्त्याने फिरल्याने त्यांना काय मिळाले कोणास ठाऊक.

आणि हो, बायको नोकरी करत असताना बसून खाणे यावर जर बायकोचा आक्षेप नसेल तर तिसर्‍या काजीला आक्षेप असण्याचे काय कारण.


आम्हाला येथे भेट द्या.

त्यांनीच साप्ताहिक सकाळच्या

त्यांची पुस्तके वाचून, भेटून त्यांच्याबद्दल प्रामाणिकपणे असे वाटते की अगदी निरागस, लहान मुलाप्रमाणे सर्व काही स्वतःहून अनुभवण्याची इच्छा असलेले हे एक व्यक्तिमत्त्व आहे. "प्रोफेशनल" प्रकारचे म्हणावे तसे त्यांचे लेखन कधीच नसते. ते स्वत:लाही "लेखक" असे म्हणवून घेत नाहीत.

मान्य आहे... मलाही तसेच वाटते!

माणसे, गर्द, कार्यरत, धार्मिक, कोंडमारा सारखी त्या क्षेत्रात स्वतः जाऊन अभ्यास करून लिहिलेली पुस्तके, सुनंदा अवचट गेल्यानंतर मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे कार्य हा सर्व नाकर्तेपणा मात्र अगदी डोळ्यावर येतो!
अजून कुणाच्या येत असेल बॉ! मी तर काही यावर भाष्य केलेले नाहीये! मला करणेही शक्य नाही.

मस्त पैकी डॉक्टरकीची प्रॅक्टिस करून पैसा कमवणे आणि नंतर घरी पाय वर करून आपल्या तथाकथित कर्तृत्वाचा रवंथ करत बसणे हे सोडून निपाणी, दापोली, बीड अशा प्रदेशांमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये, वेश्यावस्तींमध्ये उनाडपणा करत रस्त्याने फिरल्याने त्यांना काय मिळाले कोणास ठाऊक.
यात त्यांना काय मिळाले हे त्यांनी वेळोवेळी लिखित स्वरूपात मांडले आहेच. हे वेगळेपण त्यांचे होते/आहे. याचे गुंडोपंतांना अतिशय कौतुक आहे.

आणि हो, बायको नोकरी करत असताना बसून खाणे यावर जर बायकोचा आक्षेप नसेल तर तिसर्‍या काजीला आक्षेप असण्याचे काय कारण.

आता हा खरा मुद्दा होता. असो,
मला त्यांच्यावर टीका करायची नव्हती/नाही. मी फक्त मला काय वाटते इतकेच लिहिले आहे.
याशिवाय - त्यांनीच साप्ताहिक सकाळच्या दिवाळी अंकातल्या एका लेखात लिहिले आहे की, लग्नानंतर पैश्या अभावी त्यांची अतिशय कुतरओढ होत होती. सुनंदा ताईंच्या पगाराचे चेक्स वेळेवर येत नसत. अगदी पैसे संपले आहेत, अशा वेळी त्यांना सुनंदा ताईंच्या भावाला तार करावी लागे व तो त्यांना त्वरीत स्वतःरु.५०० ची मनिऑर्डर करत असे. मग परत् घर चालत असे.
माझे वाक्य फक्त या काळातल्या त्यांच्या वागण्या विषयी होते/आहे. (इतर वेळेच्या नाही!!!) मी हा भाग द्यायला हवा होता असे आता जाणवले.

आपल्या इतर कार्यासोबत त्याकाळात पैसे मिळवण्यासाठीही काही तरी केले असते तर कदाचित त्यांचे सगळ्यांचेच दिवस बरे गेले असते. असे (मला) वाटते.
याशिवायही जगण्याचे ज्याचे त्याचे मार्ग आहेतच याची मला कल्पना आहे व ते स्वतंत्र्य गुंडोपंत मान्य करतात...(असेही ते कोण लागून गेले मान्य करणारे म्हणा?)

पैसे मिळवणे हाच एक उद्देश आयुष्यात असतो असे नाही(च). पण आपल्याच घरात परिस्थिती गंभीर असतांना बाहेर समाजसेवा करत बसणे (मला) योग्य वाटत नाही. पॅशन, समाजासाठी काहीतरी करण्याची ओढ असणे व ते घडवून आणणे हे दुर्मीळ लक्षण येथे दिसतेच. (पण घर सांभाळून ती काहीतरी करण्याची पॅशन जोपासता येतेच हे सुनंदाताई त्याच वेळी त्यांच्या वागण्यातून दाखवून देत आहेत असे वाटते. [येथे कर्तव्यपूर्तीही आहे का?])

असो,
आता या सर्वांवर बोलणारा मी काजी कोण? हे तर मी माझ्या प्रतिसादाच्या शेवटी म्हंटलेच आहे... अजून काय म्हणणार...?

माझ्या या प्रतिसाद देण्यामूळे तुमच्या मनातल्या 'खास प्रतिमेला तडा गेला असेल' किंवा माझ्या मताने तुमची मने दुखावले असल्यास क्षमा मागतो. (पण म्हणून ते बदलत नाही हे ही खरेच आहे...)
तरीही त्यांच्या अनेक मतांनी मी प्रभावित झालो आहे. त्यांची सहज कथनाची शैली अप्रतिम आहे. माझी अनेक मते त्यांच्या पुस्तकांमुळे बदलली गेली आहेत हे मी सांगतोच. पण तरीही माझे हे वरील मत मात्र बदललेले नाही!
अजून काय म्हणू?

आपला
(अवचटांची सगळी पुस्तके व जमवू शकलेले सर्व मासिकातले लेख/कात्रणे संग्रही असणारा)
गुंडोपंत

धन्यवाद

अजून आमचा दिवाळी अंकांचा "बेगिंग बाऊल" रिकामा तो रिकामाच आहे. त्यात जोवर काही पडत नाही तोवर तुमच्या सारख्या मित्रमंडळींवर आमची भिस्त आहे. आणि संजोपरावांनी म्हण्टल्याप्रमाणे , एक माणूस काय काय आणि किती किती वाचणार ? (म्हणून तर "उपक्रम"वर यायचे .. :-) ) तेव्हा येऊद्यात. मेघनाबाई, तुम्ही इतके वाचलेत , परंतु लिहिलेत त्रोटक... (हे म्हणजे एखाद्या भिकार्‍याने म्हण्टल्यासारखे आहे ..."इतकेच काय घालता ? आज माझा हॅपी बर्थ्-डे आहे ! " पण असो. ) ...

धन्यवाद

मनोगत वगळता अजून एकही दिवाळी अंक विकत घेतलेला अथवा वाचलेला नाही. मायबोली दिवाळी अंक वरवर चाळला आहे.

छापील दिवाळी अंकांबाबत कोणते अंक अजिबात न घेतलेले बरे याविषयी आणखी काही माहिती मिळाली तर बरे होईल. म्हणजे उगाच पैसे व वेळ वाया जायला नको व संताप व्हायला नको.

म्हणजे राऊंड ऑफ एलिमिनेशनने काही निवडक दिवाळी अंक संग्रही ठेवण्यासाठी घेता येतील.


आम्हाला येथे भेट द्या.

अज्याबात घेऊ नये

’महाराष्ट्र टाईम्स’ अज्याबात घेऊ नये.

- मेघना भुस्कुटे

सहमत

’महाराष्ट्र टाईम्स’ अज्याबात घेऊ नये.
अगदी सहमत!!

हे जास्त मह्त्वाचे


छापील दिवाळी अंकांबाबत कोणते अंक अजिबात न घेतलेले बरे याविषयी आणखी काही माहिती मिळाली तर बरे होईल. म्हणजे उगाच पैसे व वेळ वाया जायला नको व संताप व्हायला नको.

हे लई बेष्ट! या छुप्या मुल्या कडे दुर्लक्ष व्हायला नको.
प्रकाश घाटपांडे

असेच

असेच म्हणतो. परवाच माझ्या बहिणीला फोनवर अंतर्नाद घ्यायला सांगितला. त्यात गांधींचा लेख आहे हे कळाल्यावर निवड चांगली होती याचा आनंद झाला*. उपक्रमी वाचकांनी त्यांच्या त्यांना आवडलेले अंक सांगितले तर आमच्यासारख्या 'गावाबाहेरच्या आश्रितांची' सोय होइल :)

*त्यातील इतर लेख सुमार आहेत हे संजोप रावांचे मत वाचूनही असे म्हणतो कारण एकच : गांधीबद्दल काहीही वाचायची उत्सुकता प्रचंड आहे.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

हे राहिलंच -

हे राहिलंच -

१) रत्नाकर मतकरींचा रोआल्ड डालची ओळख करून देणारा लेख. ध - मा - ल.
२) गेम्बा कैझनवरचा ’मौजे’तला लेख (प्रभाकर पेंढारकर). निरनिराळ्या मोठमोठ्या कंपन्यांचे गेम्बा कैझन हे सल्लागार. त्यांनी हॉटेलिंग इंडस्ट्रीला दिलेल्या अनोख्या सल्ल्यांवरचा हा लेख. मस्त आहे.
३) ’मौजे’तला सानियाचा तिच्या वडिलांवरचा लेख

हे फारसं नाही आवडलं -

१) ’रारंगढांग’वरचा प्रभाकर पेंढारकरांचा लेख (लोकसत्त)
२) ’महाराष्ट्र टाईमस’मधला माचकरांचा लेख. त्यांच्या नावाला शोभेसा स्टायलिश आणि सखोल दोन्ही नाहीय.
३) लोकसत्ते’मधला पद्मजा फाटकांचा लेख. अर्ध्यात सोडून दिल्यासारखा वाटतो.

’मिळून सार्‌याजणी’चा अंक पाहिला नाही. त्यात काय विशेष?

- मेघना भुस्कुटे

रॉऍल्ड डाल

रत्नाकर मतकरींचा रोआल्ड डालची ओळख करून देणारा लेख. ध - मा - ल.

हा लेख कोणत्या अंकात आहे?


आम्हाला येथे भेट द्या.

ते राहिलंच!

लोकसत्ता

- मेघना भुस्कुटे

धन्यवाद

रत्नाकर मतकरींचा रोआल्ड डालची ओळख करून देणारा लेख. ध - मा - ल.

हा ही लेख इंटरेस्टींग वाटतो आहे. सुचवणीबद्दल धन्यवाद.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

रोऍल्ड डाल

शाळा संपून कॉलेजचे दिवस सुरु झाले त्या काळात लोकसत्तेच्या लोकरंग मध्ये "माय अंकल ओसवाल्ड"ची ओळख आली होती. तेव्हापासून मिळेल तिथे त्याच्याबद्दल वाचत आहे.

हा लेखही चांगला असावा असे वाटते. :)


आम्हाला येथे भेट द्या.

पूल

काही मित्रांबरोबर दिवाळीअंक-पूल (कारपूलच्या चालीवर) करून १५ अंक विकत घेतलेत.
१. त्यातील एक विपुलश्री वाचला - यथातथाच आहे.

२. दुसरा महा अनुभव - तसा बरा आहे - आपण म्हंणता तो रॉय किणीकरांवरचा अनिल किणीकरांचा लेख ह्यातही आहे (अरे बापरे, म्हणजे आणखी किती ठिकाणी आहे?) - आवडला नाही.
तशाच टाईपचा - स्वतःभोवती दिवे ओवाळून घेण्याच्या प्रकारचा अजून एक लेख यात आहे - आयडियाचे संजय जोशी यांचा.
शेती पहावी करून हा श्रीनिवास पंडित यांचा लेख मात्र आवडला, पटला. कोकणात जमीन घेऊन शेती करू पहाणार्‍या टिपीकल शहरी हौसेबद्दलचं अनुभव कथन आहे.
मराठी असाल तर डिप्रेशन येण्याची पण एक गोळी ह्यात आहे - सुहास पळशीकर यांचा "आखूड लोकांचा प्रदेश"
गुलजार ह्यांच्या दोन कथांचा उज्जवला केळकर ह्यांनी केलेला अनुवाद आहे - त्याबद्दल बोलण्यासारखं काही नाही.

.... बाकीचे वाचत जाईन तसतसे लिहिन

जत्रा नि आवाज!

आता अंतर्नाद सोडा -
जत्रा नि आवाज बघा म्हणजे 'गार' व्हाल! ;)))

आपला
गुंडोपंत

सहमत

हलके फुलके आणी कुरकुरीत

अभिजित...

सकाळ

सकाळमधला वसंतराव पटवर्धनांचा 'दिवाळीच्या मुहूर्तावर कोणते शेअर घ्याल' हा लेख वाचनीय.

त्यात १०० शेअरची लिस्ट दिली आहे आणि काही शेअर्सना * दिला आहे. लिस्ट थोडी लहान करता आली असती. पण त्याहीपेक्षा शेअरमार्केट मध्ये पुढे कोणत्या क्षेत्राला महत्त्व राहणार आहे वगैरे विवेचन चांगले आहे.

बाकी अंक अजून बघितले नाहीत.

अभिजित...

गावचे एक , गांवढ्याचे एक

आम्ही अंतर्नादचा दिवाळी अंक वाचला नाही. आयुष्य फोल आहे. हाहाहाहा ...

म्हणजे काय?

म्हणजे काय?

- मेघना भुस्कुटे

प्रतिसादातील

प्रतिसादातील कंटेंट पांढर्‍या रंगाचे आहे. माऊसचे डावे बटण दाबून ठळक करून पहा. मुक्तसुनीतांनी "अंतर्नाद" टिप्पणी केली आहे.


आम्हाला येथे भेट द्या.

मी सांगतो...

प्रश्न मुक्तसुनीतांना आहे, पण मी उत्तर दिले तर गैर ठरु नये. रुचिभिन्नता दाखवण्यासाठी जी. ए. हा वाक्प्रचार वापरत असत. (त्यांच्या पत्रातला मूळ शब्दप्रयोग 'गावाचे एक तर गावड्याचे एक' असा आहे.) कुणाला काय आवडते तर कुणाला काय, यावर मुक्तसुनीतांची ही टिप्पणी असावी...
सन्जोप राव

आजानुकर्ण आणि सन्जोपराव

दोघांनाही धन्यवाद!
- मेघना भुस्कुटे

अंतर्नाद

http://www.flickr.com/photos/praghat/ येथे अंतर्नाद मधील गांधी हा लेख स्कॅन करुन टाकला आहे. टॅग Antarnad पहाणे. स्कॅनिंगची अकुशलता क्षम्य मानावी.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

प्रकाश घाटपांडे

धन्यवाद,

घाटपांडेसाहेब! तो लेख खरंच खूप छान आहे!

तात्या.

--
आम्हाला येथे भेट द्या!

धन्यवाद

धन्यवाद! अतिशय सुंदर लेख उपलब्ध करून दिल्याबद्दल!!

-(आभारी) ऋषिकेश

आभारी आहे

घाटपांडे साहेब,
लेख इथे दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार. लहानपणी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये या चित्रपटाचे चित्रिकरण पाहिले होते (गांधींना भेटायला अँन्ड्र्युज येतो तो प्रसंग). तेव्हापासूनचे लागेबांधे आहेत. नंतर बेन किंग्जलीची मुलाखत बघितली. आधी गांधींच्या अंतयात्रेसाठी मेणाचा पुतळा वापरायचे ठरले होते. नंतर अचानक बेनला तो प्रसंग करावा लागला. त्याच्या म्हणण्यानुसार चित्रीकरणासाठी ९०,००० लोकांची गर्दी जमली होती, पण चित्रीकरण सुरू होउन संपेपर्यंत सुन्न शांतता होती. ९०,००० लोकांचा जमाव मूकपणे या प्रसंगात सहभागी झाला होता.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

सन्जोप राव

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
काय वाचावे, कसे वाचावे, कुठे वाचावे काय वाचू नये असे वाचनासंबंधीचे श्री. सन्जोप राव यांचे मार्गदर्शन बहुमूल्य आणि उपयुक्त असते. त्यांचे स्वतःचे वाचन दांडगे आहेच. असे मार्गदर्शक लाभले हे आम्हा उपक्रमींचे भाग्यच होय.

कथाप्रेमींसाठी

सालाबाद प्रमाणे याही वेळेस धनंजय-चंद्रकांतचे अंक छान आहेत.

 
^ वर