दिवाकरांच्या नाट्यछटा
'तेवढेच ज्ञानप्रकाशात' या मी इथे टंकलेल्या दिवाकरांच्या नाट्यछटेच्या निमित्ताने नाट्यछटा या वाचकांना फारशा परिचित नसलेल्या साहित्यप्रकाराविषयी काही लिहावे असे वाटले म्हणूनः
१९११ ते १९३१ या काळात दिवाकर यांनी एकूण ५१ नाट्यछटा लिहिल्या.इतक्या वर्षांच्या कालौघात त्या आजही टिकून आहेत. त्यानंतर बाकी बावन्नावी टिकून रहाणारी (बावनकशी) नाट्यछटा कुणी लिहिल्याचे ऐकिवात नाही. दिवाकरांना नाट्यछटा हा प्रकार सुचला तो ब्राऊनिंगच्या 'मोनोलॉग' या काव्यप्रकारावरून. ब्राऊनिंगकडून उसने घेतलेले हे बीज त्यांनी अस्सल मराठी बाजाने फुलवले. It does not matter what you borrow, but what you make of your borrowing हे सिद्ध् व्हावे असे. नाट्यछटा म्हणजे नाटकाची संक्षिप्त आवृती नव्हे, स्वगतासारखे एकांगी संभाषणही नव्हे. नाट्यछटा म्हणजे कमीत कमी शब्दांत एखाद्या प्रासंगिक वर्णनातून अधिक व्यापक सूत्र समोर मांडणारा एक स्वतंत्र साहित्यप्रकार. नाट्यछटेत वापरली जाणारी विरामचिन्हे, बोलीभाषेतले शब्द, तात्कालिन संदर्भ, मधूनमधून घेतले पॉजेस यातून एक मोठे चित्र उभे रहाते.
दिवाकरांनी हा प्रकार आपल्या अभिव्यक्तीसाठी का निवडला असावा? मला समजते त्यानुसार दिवाकर हे अत्यंत बुद्धिमान, अभ्यासू आणि कमालीचे संवेदनशील होते. त्या काळातील इतर साहित्यप्रकारांचा विचार केला तर त्यांत त्या वेळी एक साचेबंदपणा, तोचतोचपणा आलेला असावा - अपवाद अर्थात केशवसुतांचा- त्या काळात वर्डस्वर्थ्, शेली, कीट्स् वगैरे कवींच्या वाचनाने दिवाकरांना लिखाणाच्या या नवीन प्रकाराची निर्मिती करण्याची स्फूर्ती मिळाली असावी. त्याआधी त्यांनी शेक्स्पिअरच्या नाटकांवर आधारित काही नाटके लिहिण्याचा प्रयत्नही केला होता. तो मात्र काही सफल झाला नाही. स्वभावाने अबोल आणि भिडस्त असणार्या दिवाकरांना आपले अंतरंग, त्यातली सुखदु:खे - म्हणजे सुखे कमी, दु:खेच जास्त - व्यक्त करण्यासाठी नाट्यछटेचा जिवंतपणा आणि त्यातली किंचित सांकेतिकता अधिक भावली असावी.
दिवाकरांच्या नाट्यछटा समजून घ्यायच्या म्हणजे त्या काळातली स्थिती समजून घ्यायला हवी. एका बाजूला परकीय साम्राज्यामुळे समजलेले इंग्रजी लेखकांचे विचार आणि त्यामुळे आपल्या समाजातील न्यूनांची होत असलेली जाणीव असावी. दुसरीकडे जानवी, सोवळी, एकादष्ण्या आणि श्रावण्या यात करकचून बांधलेला समाज असावा. एकीकडे बालविवाह आणि बालविधवा, केशवपन आणि विधवांचे सर्व प्रकारांने शोषण हे राजरोसपणे चाललेले असावे, तर दुसरीकडे बाळंतरोगाने तान्ह्याला जन्म देऊन मरणारी तरुण आई आणि इन्फ्लुएंझा ते प्लेगाने पटापट मरणारी माणसे असावीत, असे हे कोणत्याही संवेदनशील माणसाला कमालीचे अस्वस्थ करणारे विसंवादी सामाजिक वातावरण असावे. या सगळ्यातून दिवाकर तरले ते केवळ वाचनामुळे. या अफाट वाचनातूनच त्यांना लेखनाची स्फूर्ती मिळाली असावी. नाट्यसंवाद हा नाट्यप्रसंगांसारखा प्रकार त्यांनी हाताळल्याचे दिसते. 'कारकून' हे नाटक आणि 'सगळेच आपण ह्यः ह्यः', 'ऐट करू नकोस!' या नाटिका त्यांनी लिहिल्याची माहिती आहे. मेटरलिंकच्या ' द साइटलेस' या नाट्यकृतीचे त्यांनी भाषांतर केल्याचीही माहिती आहे,आज हे सगळे कुठे आहे कोण जाणे!
दिवाकर हे इंग्रजीचे उत्तम शिक्षक होते. शिक्षक म्हटल्यावर त्याचा व्यासंग असलाच पाहिजे अशा जुन्या विचारसरणीचे हे लोक. ऑस्कर वाइल्ड, पुशकिन, पिनिअरो, गॉर्की वगैरे लेखकांचे साहित्यही दिवाकरांनी वाचल्याचे उल्लेख आहेत. रविकिरण मंडळाचेहही ते सदस्य होते. दिवाकरांच्या नाट्यछटा 'उद्यान' मासिकात आणि 'ज्ञानप्रकाशा'त छटेमागे एक रुपया या मानधनाने प्रसिद्ध झाल्या. शेवटी दिवाकरांनी काही भावकथाही लिहिल्या. वयाच्या अवघ्या बेचाळीसाव्या वर्षी इन्फ्लुएंझाने दिवाकर मरण पावले.
आता थोडेसे 'तेवढेच ज्ञानप्रकाशात' या नाट्यछटेविषयी. या कथेला संदर्भ आहे तो पंडीता रमाबाई रानडे यांच्या मृत्यूचा. पण तोही केवळ संदर्भ म्हणून. या छटेच्या निमित्ताने दिवाकर माणसाच्या दुटप्पी स्वभावावर, दिखाऊपणावर नेमके बोट ठेवतात."चला! मोठी एक कर्तीसवरती बाई गेली!" असे म्हणून रमाबाईंच्या मोठेपणाचे गळे काढणारे हे प्राध्यापकमहोदय त्यांच्या अंत्यदर्शनाला जायचा विषय काढतात, पण त्यातला त्यांचा हेतू वेगळाच आहे. मृतांच्या अंत्यदर्शनाला आलेल्या तथाकथित प्रतिष्ठित माणसांची - बव्हंशी प्राध्यापकांची - यादी 'ज्ञानप्रकाशा'त प्रसिद्ध् होत असे. या निमित्ताने का होईना, आपले नाव या वर्तमानपत्रात छापून यावे अशी ती प्रसिद्धीची लालसा आहे. 'पेज थ्री' या सिनेमात सोनी राजदानने आत्महत्या केल्याचा निरोप येतो तेंव्हा डॉली ठाकूर कपड्यांची खरेदी करत असते. आता अंत्यदर्शनाला जावे लागणार, मग तिथे नवे कपडे नकोत का असा तात्काळ थेट रोख विचार करून ती त्या विक्रेत्याला 'शो मी समथिंग इन व्हाईट' असे निर्विकारपणे सांगते - तेच हे माणसात लपलेले गिधाड! "मला तरी कुठे येवढे जावेसे वाटते म्हणा!" यात त्याचा हिडीस चेहरा दिसतो, पण पुढे "कारण आता गेले काय अन् न गेले काय सारखेच!" अशी फिलॉसॉफिकल सारवासारव केल्याने तो अधिकच बेगडी आणि भेसूर दिसू लागतो! 'प्यासा' मध्ये जिवंत असताना ज्या भावाला हिडीसफिडीस केली त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कवितेच्या रॉयल्टीच्या रकमेवर घासाघीस करणारे त्याचे भाऊ याच वैश्विक कुटुंबातले!
अडीचएकशे शब्दांच्या दिवाकरांच्या या नाट्यछटेत हे इतके सगळे लपलेले आहे. संभाषण सुरु आहे असे वाटावे अशी भाषा हे तर नाट्यछटेचे वैशिष्ट्यच असते. "...हो, बरोबर...." अशी सुरुवात, "-केंव्हा? आता मगाशी सहाच्या सुमारास?" असा प्रश्न. "....बाकी बर्याच थकल्या होत्या म्हणा!" अशी वाक्ये, यांनी या छटेला एक 'परफॉर्मिंग क्वालिटी आली आहे. असे वाटते, की हा माणूस समोर आहे, बोलतो आहे!
नुसत्या संवादांतून स्वभाव आणि प्रसंग रेखाटन हे चांगल्या नाट्यछटेचे गमक आहे. दिवाकरांना ते इथे उत्तम रीत्या साधले आहे 'तेवढेच 'ज्ञानप्रकाशा' त!' मला दिवाकरांच्या सर्वोत्तम छटांपैकी एक वाटते ती त्यामुळेच.
Comments
वा
रावसाहेब,
आपल्या व्यासंगाला प्रणाम. तसेच अशी गाळीव रत्ने आम्हा समोर ठेवण्यासाठी धन्यवाद.
आपण अजून काही नाट्यछटा येथे लिहिणार असाल तर वाचण्यास उत्सुक आहे.
(त्या सोबत थोडे संदर्भ दिलेत तर माझ्या सारख्याला ते समजावयास अजून सोपे पडेल. ती नट्यछटा उत्तमच होती पण् 'ज्ञानप्रकाश' हा प्रकार माहितच नसल्याने थोडी गडबड झाली :)
शिक्षक म्हटल्यावर त्याचा व्यासंग असलाच पाहिजे अशा जुन्या विचारसरणीचे हे लोक. उम्म्ह !!!!
--लिखाळ.
मस्त!
रावसाहेब आपण अतिशय रसाळपणे केलेले दिवाकरांच्या नाट्यछटांबद्दलचे रसग्रहण मनापासून आवडले.
मी शाळेत असतांना आम्हाला त्यांची 'पंत मेले राव चढले' ह्या नावाची नाट्यछटा अभ्यासक्रमात असल्याचे आठवते आहे. अतिशय कमीत कमी शब्दात माणसांच्या वागण्यातील बेगडीपणाचे प्रदर्शन करण्यात दिवाकर ह्यांचा हातखंडा होता. त्यांच्यानंतर मात्र कुणीही नाट्यछटा ह्या प्रकाराकडे इतक्या गंभीरपणे आणि सशक्तपणे पाहिल्याचे आठवत नाही.
आपणास शक्य असेल तर अशाच त्यांच्या इतरही काही नाट्यछटांचे पुनर्लेखन करावे ही विनंती.
किंचित गल्लत
रावसाहेब,
दिवाकरांसारख्या महान लेखकाची आठवण जागी केल्याबद्दल धन्यवाद. विवरणदेखील उत्तमच केले आहे.
पण किंचित गल्लत झालेली दिसते ती दुरुस्त करू इच्छितो (तुमच्या ताजमहालाला माझी वीट).
पंडिता रमाबाई वेगळ्या व न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी रमाबाई वेगळ्या. (पंडिता रमाबाईं एरवी कितीही थोर असल्या तरी त्यांच्या निधनावेळी अशी व इतकी गर्दी जमण्याची शक्यता जरा कमीच वाटते. त्यांच्या ख्रिश्चनधर्मप्रसाराच्या कार्यामुळे त्या प्रसिद्ध असण्यापेक्षा कुप्रसिद्ध जास्त असाव्यात.)
अर्थात् प्रस्तुत प्रसंग रमाबाई रानड्यांच्याच संदर्भात असणार हे खरेच.
या निमित्ताने दिवाकरांच्या सर्वच नाट्यछटा येथे दिल्यात तर फारच छान होईल.
- दिगम्भा
संदर्भ
या लेखात उल्लेख केलेले संदर्भ 'दिवाकरांच्या नाट्यछटा' - कॉन्टिनेन्टल प्रकाशन या पुस्तकाच्या रा. कृ. लागू यांच्या प्रस्तावनेतून घेतले आहेत. दिवाकरांच्या लेखनप्रेरणेचे विष्लेषण आणि छटेचे रसग्रहण बाकी माझे आहे. (माझ्या ज्ञानाविषयी गैरसमज नको, म्हणून हा खुलासा!)
सन्जोप राव
शल्य नको...
"आमचे मराठी शिक्षक असे व्यासंगी असते, तर आम्हीही संजोपराव होऊ शकलो असतो."
सन्जोप राव होता आले नाही याचे शल्य वाटण्याऐवजी सन्जोप राव व्हावे लागले नाही याचा आनंद वाटावा अशी परिस्थिती आहे. 'उसके दुष्मन है बहोत, आदमी अच्छा होगा' असे म्हणत असाल तर गोष्ट वेगळी, पण अन्यथा इरावती कर्व्यांनी महर्षी कर्व्यांबद्दल म्हटल्याप्रमाणे ( तपशीलाविषयी साशंक आहे) 'माझे भाग्य की मी त्यांची सून झाले, पण् माझे त्याहूनही मोठे भाग्य की मी त्यांची बायको झाले नाही!'. तेंव्हा वैद्यबुवा, हलवायाशी मैत्री पुरेशी आहे, मिठाईच्या दुकानाचा खटाटोप कशाला?
सन्जोप राव
सुरेख!
छान आणि माहितीपूर्ण लेख. शेवटच्या परिच्छेदात तुम्ही दिलेले रसग्रहण फारच आवडले.
नाट्यछटांची आणि त्याकाळच्या सामाजिक वास्तवाची पार्श्वभूमी सांगितल्यामुळे आम्हा वाचकांना नाट्यछटांचा अधिक चांगल्या प्रकारे आस्वाद घेता येईल असे वाटते आहे. प्रत्येक नाट्यछटेच्या बरोबर (किंवा नंतर) तुमच्या दृष्टीने केलेले रसग्रहण द्याल तर अधिकच चांगले. पुढील नाट्यछटा आणि रसग्रहणांच्या प्रतीक्षेत.
छान लेख
रावसाहेब लेख छानच आहे.. नाट्यछटा ह्या प्रकाराची पुन्हा एकदा ओळख करुन दिल्या बद्दल आभार!
सदर लेख 'म***' येथे दिसला नाही आपल्याला पण 'म' स्वर वर्ज्य झाला आहे की काय? (स.ह.घ्या.)
वा वा
लेख चर्चा, सगळे छान आहे. आज सगळे हे सन्जोप रावांमुळे उपक्रमावर आहे असे म्हणायचे दिवस येवोत :)
दूरध्वनी
नाट्यछटेवरील चर्चा वाचताना एका ठिकाणी कृत्रिमतेचा उल्लेख वाचल्यावर थोडे आश्चर्य वाटले. ते यासाठी की मला यात कृत्रिमपणा जाणवला नाही. नंतर विचार करताना लक्षात आले की या नाट्यछटा वाचताना माझ्या मनातील चित्र मी कुणाचे तरी एका बाजूचे दूरध्वनीवरील संभाषण ऐकतो आहे असे होते.