'लोकसत्ता' मध्ये उचलेगिरी
१० नव्हेंबर रोजी, 'लोकसत्ता'च्या मुंबई वृत्तान्त या पुरवणीत छापून आलेला डॊ. राजीव भोसेकर यांचा "कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन" हा किशोर कुमारवरील लेख बराचसा श्री. शिरीष कणेकर यांच्या "यादों की बारात" या संग्रहातील "हम है राही प्यार के" या किशोर कुमारवरील लेखातून सरळ-सरळ आणि कणेकरांचा नामोल्लेख न करता उचललेला आहे. वाक्यंच्या वाक्यं, काही तशीच्या तशी व काही किरकोळ फेरफार करून भोसेकरांनी बिनदिक्कत वापरलेली आहेत. खाली उदाहरणं देत आहे.
कणेकर :'आंदोलन' ते 'शाब्बास डॆडी' या ७४ चित्रपटांत भूमिका, अनेक नशीली, रसीली, फडकती गाणी, मोजकं पण नावीन्यपूर्ण संगीत, चार विवाह, चिकटपणाच्या व तऱ्हेवाईकपणाच्या सुरस कथा व घमेलंभर बदनामी ही किशोरकुमार गांगुली या अष्टपैलू हिऱ्याची गेल्या तीस वर्षातली हिंदी चित्रसृष्टीतली कमाई आहे.
भोसेकर : 'आंदोलन' ते 'शाब्बास डॆडी' या ७४ चित्रपटांत भूमिका, अनेक नशिली, रसिली फडकती गाणी. मोजकं पण नावीन्यपूर्ण संगीत. चार विवाह, तऱ्हेवाईकपणाच्या सुरस कथा ही किशोरकुमारची गेल्या तीस वर्षांमधील हिंदी चित्रपटसृष्टीतील कमाई आहे.
कणेकर : या सोनपुतळ्याला फिल्मवाल्यांनी फारसं सीरियली घेतलंच नाही. कारण मुळात त्यानंच स्वत:ला सीरियली घेतलं नाही. उछलकूद करण्याची उपजत आवड होती.ती नैसर्गिकरित्या कॅमेऱ्यापुढे केली. प्रेक्षकांना ती रुचली म्हणून हा गात राहिला.देवानं गाता गळा दिला होता. सहज गाऊन गेला. ऐकणारे खूष होत राहिले म्हणून हा गात राहिला.
भोसेकर : तसे या अष्टपैलू हिर्यासारख्या अष्टपैलू कलाकाराला फिल्मवाल्यांनी कधीही गंभीरपणे घेतलंच नाही. कारण मुळात तो स्वत: गंभीर नव्हता. मौजमस्ती करण्याची त्याला नैसर्गिक आवड होती, ती त्याने नैसर्गिकरित्या कॅमेऱ्यापुढे आणली. प्रेक्षकांना ती रुचली. गाता गळा होता, प्रतिभा होती, प्रत्येक गाणे सहज गाण्याची क्षमता होती. प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळत गेल्यामुळे तो गात गेला.
कणेकर : खेमचंद प्रकाशकडे 'जगमग जगमग करता निकला' सैगल ढंगात गायला. तृप्त खेमचंदनं आशीर्वाद दिला, - 'दुसरा सैगल होशील.'
भोसेकर : एकदा खेमचंद प्रकाशकडे 'जगमग जगमग करता निकला' हे गाणे त्याने सैगलच्या ढंगात गायले. तृप्त झालेल्या खेमचंदने त्याला आशीर्वाद दिला.
कणेकर : किशोरकुमारनं पडदाप्रवेश केला तेव्हा दादामुनी, दिलीप, राज व देव यांनी अवघा प्रेक्षकवर्ग आपसात वाटून घेतला होता....आपला प्रेक्षकवर्ग त्यानं (किशोर कमारनं) हिसकावून तयार केला. पण तो टिकवण्यासाठी त्यानं कसलेच प्रयास केले नाहीत. कारकीर्द नीट 'प्लॆन' करायची असते हे त्याच्या गावी नव्हतं.
भोसेकर : किशोरकुमारने जेव्हा चित्रपटसृष्टीत प्रवेश केला तेव्हा अशोककुमार, दिलीपकुमार, राज कपूर, देव आनंद इत्यादी प्रतिभासंपन्न कलाकारांची धूम होती. अशा परिस्थितीतही किशोरकुमारने आपला स्वतंत्र प्रेक्षकवर्ग तयार केला. परंतु कारकीर्द नीट प्लॆन करायची असते हे त्याच्या गावी नव्हतं.
कणेकर : पण अमीर आणि फकीर दोघांच्याही काळजाला भिडेल अशी काही तरी विलक्षण गोष्ट किशोरच्या साध्यासुध्या वाटणार्या आवाजात आहे.
भोसेकर : "अमीर" आणि "फकीर" दोघांच्याही काळजाला भिडेल अशी काहीतरी विलक्षण गोष्ट किशोरच्या साध्यासुध्या वाटणार्या आवाजात आहे.
कणेकर : परंतु 'सार्वभौम' रफीला किशोरनं मोडीत काढावं ही गोष्ट माझ्या आकलनापलीकडची आहे....'आराधना'च संगीत मस्त होतं व किशोर गायलाही झकास.पण एका 'आराधना'च्या जोरावर किशोरनं रफीची जागा घ्यावी?
भोसेकर : सार्वभौम गणल्या जाणार्या रफीला किशोरनं आव्हान दिलं, आराधनाच्या द्वारे, 'आराधना'च्या जोरावर किशोरनं रफीची जागा घेतली.'आराधना'चं संगीत मस्त होतं व किशोर त्यात गायलाही झकास.
कणेकर : काय असेल ते असो, त्यानंतर कुठल्याही नायकानं गाण्यासाठी म्हणून आ वासला की आतून किशोरचा आवाज उमटू लागला. एकाही संगीतकाराचं त्याच्यावाचून गाणं वाजेना.
भोसेकर : प्रत्येक नायकाच्या तोंडातून किशोरकुमारचा आवाज उमटू लागला. एकाही संगीतकाराचं त्याच्या वाचून गाणं वाजेना.
चुका मात्र डॊक्टर मजकुरांनी स्वयंप्रद्न्येने केल्या आहेत आणि त्याचं श्रेय त्यांना द्यायलाच हवं. डॊक्टर भोसेकर म्हणतात, "हृषिकेश मुखर्जींनी 'आनंद' साठी किशोरलाच नजरेसमोर ठेवला होता. किशोर हा 'आनंद' साकार करणार्या राजेश खन्नाचा जणू आवाजच बनला होता." 'आनंद' चित्रपटातील राजेश खन्नावर चित्रित "ज़िंदगी कैसी है पहेली", "कहीं दूर जब दिन ढल जाये" व "मैने तेरे लियेही सात रंगके सपने चुने" ही गाणी अनुक्रमे मन्ना डे, मुकेश व मुकेश यांनी गायलेली आहेत ! आराधना (१९६९) नंतर किशोर कुमार हा राजेश खन्नासाठी पार्श्वगायक म्हणून ठरून गेल्यासारखा असतानाही 'आनंद' (१९७१) मध्ये संगीतकार सलिल चौधरी व दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांनी मन्ना डे व मुकेश यांचा यशस्वीपणे वापर केला हे विशेष.
ज्या दैनिक 'लोकसत्ता'मध्ये कणेकरांनी अनेक वर्षं नोकरी केली, स्तंभलेखन केलं त्याच 'लोकसत्ता'त त्यांचे लिखाण दुसऱ्याच्या नावावर छापून यावं हे त्यांचं दुर्दैव. आपल्या सुमार संपादकीयांतून जगाला रोज नैतिकतेचे डोस पाजणाऱ्यांना आपल्या पायाखाली काय जळतय याची कल्पना नाही ? की हा विषय गांधी घराण्याशी संबंधित नसल्यामुळे परवा नाही ?
Comments
गुन्हा
भारतातील प्रताधिकार कायदा नक्की काय म्हणतो याची कल्पना नाही पण हा दखलपात्र गुन्हा होऊ शकेल असे वाटते. अर्थात आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीकडे पाहिल्यास या गोष्टी किती गंभीरपणे घेतल्या जातात हे सांगणे नलगे. मुळात हा सर्व प्रकारच अगम्य आहे. जर एखादा लेखही स्वतःच्या वाक्यांमधून लिहीता येत नसेल, तर असे लोक दैनिकामध्ये कसे लिहू शकतात असा प्रश्न पडतो.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
हा हा :)
मस्त!
एकंदरीत मुंबईची दोन्ही मराठी वर्तमानपत्रे रसातळाला चालली आहेत हे दिसते. महाराष्ट्र टाईम्सने तर त्यांची सगळी वेबसाईटच पेज-३ प्रकारची करून टाकली आहे. आता लोकसत्ता पण चोर्यामार्या करणार्यांचे लेख छापू लागले आहेत.
छान.
स्वराज्यतोरण चढे, गर्जती तोफांचे चौघडे, मराठी पाऊल पडते पुढे!
आम्हाला येथे भेट द्या.
निशिद्ध प्रकार
केवळ निशिद्धच नाही तर न्यायप्रविष्ठ गोष्ट आहे ही. अश्या उचलेगिरी विरुद्ध निदन ई-चळवळ उभी राहीली पाहीजे
आपल्या सुमार संपादकीयांतून जगाला रोज नैतिकतेचे डोस पाजणाऱ्यांना आपल्या पायाखाली काय जळतय याची कल्पना नाही ? की हा विषय गांधी घराण्याशी संबंधित नसल्यामुळे परवा नाही ?
हे खासच!
अगदी हेच
म्हणतो.
आपला,
(सहमत) भास्कर
उचलेगिरी वाईट !!! पण...
आता हे लोकसत्तेचे प्रकरण उघड झाले आहे, असे करणे वाईट. पण, मिलिंदराव... दैनिकात काम करणा-या कार्यकारी संपादकांकडे,तर अनेक पुस्तकातील उतारे आणि लेख संग्रही असतात. जेव्हा प्रासंगिक वगैरे कोणत्या तरी निमित्ताने लेखनाची गरज असते तेव्हा ते कोणताही विचार न करता, थोडेफार फेरफार करुन ते दैनिकात छापून टाकतात, त्यामुळे अशा बातम्या फारश्या धक्कादायक नसतात. पण, या संस्थळावर लोकसत्तेच आणि केतकरांचे कौतुक करणारी मित्र मंडळी आहे . त्यांच्यासाठी नसेल पण आमच्यासाठी ही बातमी धक्कादायकच आहे.
एक उपमा
अत्यंत लोकप्रिय लेखकाचे अत्यंत लोकप्रिय लिखाण "कॉपी" करणार्या नगांची तुलना करायची तर परवा कुठेतरी ऐकलेल्या "द बिगेस्ट् नकल्-हेड्" या सदरात ऐकलेल्या एका बातमीची आठवण झाली : या चोराने कुठल्याशा इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या कंपनीमधे बडा डल्ला मारला. पण हे "भोसेकर" सुद्धा अगदी लगेच पकडले गेले - काय करणार् ? चोरसाहेबांनी "लांबवलेल्या" हजारो उपकरणांमधे काही "लाइव्ह् जी पी एस् डीव्हाईसेस्" होती .... :-)
दया!
कीव करावी अशी ही परिस्थिती आहे.
हेच पत्र कृपया लोकसत्तालाही पाठवा!
आपला
गुंडोपंत
आधीच पाठवले
ज्या दिवशी तो लेख प्रकाशित झाला त्याच दिवशी लोकसत्ताला विपत्र पाठवले होते. पाहू काय होतं ते.
लेखक........................
त्यासाठी दै.लोकसत्तेवर टिका न करता लेखकावर करावी.
lokmanas@expressindia.com हा लोकसत्ताचा ई-पत्ता.
आपला
कॉ.विकि
कसे काय?
दैनिकात प्रसिद्ध झालेल्या मतांशी संपादक/मालक/मुद्रक/प्रकाशक सहमत असेलच असे नाही हे डिस्क्लेमर गृहीत धरले तरी कणेकरांच्या तव्यावर स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी आवश्यक तो इंधन पुरवठा केल्याबद्दल वृत्तपत्र जबाबदार नाही का?
कोणीही लेख पाठवला की त्याची शाहनिशा न करता तसाच छापायचा असेल तर मग संपादकांची जागा अनावश्यक नाही का?
आम्हाला येथे भेट द्या.
टर्न इट इन
लोकसत्तातल्या सारखी उचलेगीरी होवू नये.
यासाठी
टर्न इट इन www.turnitin.com अशी एक सुवीधा इंग्रजी मधे आहे.
या मध्ये उचलेले साहित्य जालावरून कुठुन उचलले आहे याचा पत्ता लागतो.
शिवाय किती उचललेले आहे हे ही कळते.
मात्र यासाठी पैसे मोजले जात असावेत.
पण मी म्हणेन इतकेच नको तर
इतकेच नाही तर कुठुन भाषांतरीत केले आहे याचाही पत्ता लागला पहिजे!
अशी सुवीधा मराठीतही पुढे लागणारच आहे यात शंका नाही.
राज/सर्किट वाचतो आहेस ना हे?
आपला
गुंडोपंत
लोकसत्तामसधील पत्र
याचा शेवटी वाचकांच्या पत्रव्यवहारात उल्लेख केला आहे. :)