महापालिका कर्मचार्‍यांना बोनस

मध्यंतरी म.टा. ने ठाणे महापालिकेच्या कर्मचार्‍यांना बोनस देण्याच्या प्रश्नावर वाचकांची मते मागवली होती. त्यांत दिलेल्या माहितीनुसार युनियनच्या मागणीप्रमाणे बोनस दिल्यास महापालिकेचे २० कोटी रुपये खर्च होणार आहेत. म्हणजे ठाण्यांतील नागरिकांच्या खिशांतून दरडोई १०० ते १२५ रुपये बोनससाठी जाणार आहेत. त्यावर मी पाठवलेली प्रतिक्रिया खालीलप्रमाणे होती.

"बोनसची मूळ कल्पना उद्योगधंद्यांतील नफ्याचा काही अंश कर्मचार्‍यांमध्ये बक्षीस म्हणून वाटणे जेणेकरून त्यांना कंपनीच्या प्रगतीसाठी काम करायला प्रोत्साहन मिळेल ही आहे. त्यानंतर काही काळाने त्याकडे वेतनांतील अपुरेपणाची भरपाई करण्याचा एक मार्ग (deferred wages) म्हणून पाहिले जाऊ लागले. त्यामुळे उद्योग तोट्यांत असला तरी किमान बोनस दिलाच पाहिजे अशी मागणी केली जाऊ लागली. पालिका कर्मचारी हे सरकारी कर्मचारी आहेत. पालिकेचा कारभार 'ना नफा ना तोटा' तत्वावर चालणे अपेक्षित आहे. त्यामुळे नफ्यांतील अंश बोनस म्हणून देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. उलट खर्चापेक्षा उत्पन्न ज्यास्त आढळून आल्यास सेवेचे दर व जनतेवरील कर कमी करायला हवेत.

"त्याशिवाय अलीकडच्या काळांत सरकारी कर्मचार्‍यांचे वेतनमान व त्यांना मिळणार्‍या इतर सोयी सुविधा समाधानकारक असल्यामुळे त्यांत पालिका कर्मचार्‍यांना बोनसच्या नावाखाली भरपाई देण्याची गरज आहे असे वाटत नाही.

"प्रश्न बोनससाठी जनतेच्या करांतून दरडोई किती पैसे खर्च होणार आहेत हा नाही. पण वर दिलेल्या कारणांमुळे नैतिक दृष्ट्या पालिका कर्मचारी बोनससाठी पात्र नाहीत. कायदा काहीही असो".

(टीप : ही प्रतिक्रिया छापून आली नाही. पण ५ नोव्हेंबरच्या अंकांत ज्या प्रतिक्रिया छापून आल्या त्यांचा सूर असाच काहीसा होता.)

तुम्हाला काय वाटतं?

Comments

असहमत.

सरकारी आणि बिनसरकारी असा भेदभाव करणे योग्य नाही. वर्षातुन एकदा खरेदी करायवयाची असल्याकारणे सानुग्रह अनुदान देण्यास हरकत नसावी.

माझ्या माहितीप्रमाणे कारखाने, उद्योगव्यवसाय अंदाजपत्रक बनवत असतात, तसेच पालिकाही करत असावी.

दिवाळीच्या आनंदोत्सवात असे वाद अप्रस्तुत वाटतात.

कॉमन सेन्स

शरदराव,

तुमचे विचार कॉमन सेन्स या प्रकारात मोडणारे आहेत. पण आपल्याकडे भावनाप्रधान निर्णय घेण्याची पद्धत फाळणी पासून सुरु आहे. व्यवसाय, उदोगधंदे, शेती, नोकरभरत्या तसेच बोनस अशा विषयांवरचे निर्णय व्यावहारीक तसेच सदसदविवेकबुद्धिला पटतील अशा विचारांतून कमी व भावनेच्या विचारातून जास्त प्रमाणात घेतले जातात. तुमच्या प्रतिक्रियेने लोकांच्या भावना दुखावण्याची शक्यता असल्याने म. टा. ने सुद्धा तुमच्या प्रतिक्रियेला केराची टोपली दाखवली असल्यास आश्चर्य नको.

पण हे लक्षात असू द्या की आपल्या सारख्या सुजान व जागरुक नागरीकांची आपल्या समाजाला गरज आहे. तेव्हा वृत्तपत्रांना आपल्या प्रतिक्रिया जरुर पाठवत चला.

आपला,
(विवेकी) भास्कर

आहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,
महाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥

बोनस

'बोनस म्हणजे अतिरिक्त नफ्यातून कर्मचार्‍यांना वाटण्यात येणारा नफ्याचा हिस्सा' ही मूळची व्याख्या. मुंबईच्या बस वाहक-चालकांना अपेक्षेपेक्षा जास्त प्रवासी वाहून नेले तर कौतुकभत्ता मिळत असे त्याला इन्सेन्टिव्ह बोनस म्हणत. त्यानंतर सरकारने बोनस कायदा पास केला. त्यात बोनसची व्याख्या 'सानुग्रह अनुदान' अशी केली आणि कमीतकमी ८.३३ टक्के बोनस दिलाच पाहिजे अशी कायद्यात सोय करून ठेवली. तेव्हापासून हे बोनसचे रॅकेट सुरू झाले आणि आता असंघटित जनतेच्या पैशावर अव्याहत चालू राहणार आहे. आता झाडूवाल्या बायांना २२००० रुपये बोनस मिळाल्यावर त्या कशाला कामे करताहेत? त्या हाताखाली इतर गरीब मजूर ठेवून त्यांच्याकडून कामे करवून घेतात आणि स्वत: सावकारी करतात. --वाचक्‍नवी

बोनस म्हणजे हक्क नव्हे

आता झाडूवाल्या बायांना २२००० रुपये बोनस मिळाल्यावर त्या कशाला कामे करताहेत? त्या हाताखाली इतर गरीब मजूर ठेवून त्यांच्याकडून कामे करवून घेतात आणि स्वत: सावकारी करतात.

येवढा बोनस भेटतोय का? बाकी भांडवलदारीतील सबकॉन्ट्रॅक्ट इथे पण बघायला मिळते. शिक्षणसम्राटांच्या राज्यात २५०००/- वर सही घेउन ९-१० हजार घेणारे पगार घेणारे अध्यापक पण इथेच बघायला मिळतात.

'बोनस म्हणजे अतिरिक्त नफ्यातून कर्मचार्‍यांना वाटण्यात येणारा नफ्याचा हिस्सा' ही मूळची व्याख्या

अतिरिक्त ठरवण्याचे अधिकार कोणाचे ? जोपर्यंत त्यात हक्काची भावना नव्हती तोपर्यंत मालक कामगार संबंध सुरळीत होते. बोनस मालक स्वतः हून देत असत. पुढे कामगार धोरणे बदलली. कामगारांची मानसिकता पण बदलली आणि मालकांची ही
प्रकाश घाटपांडे

 
^ वर