बाराक्षार पद्धती

बाराक्षार पद्धती

यांना इंग्रजीत बायोकेमीक रेमीडीज असेही म्हणतात. या चिकित्सा पद्धतीची 'सुरुवात' डॉ. हनेमान यांनी केली. शरीरातल्या काही लवणांमुळे निरनिराळी लक्षणे शरीर दाखवते असे मत त्यांनी मांडले. शरीराच्या लक्षणांनुसार उपचार केले पाहिजेत या विचारावरा आधारीत ही पद्धती आहे. या पद्धातीवर डॉ. स्टाफ यांनीही मते मांडली. पण त्याला मूर्त स्वरूप मात्र डॉ. विलियम सुशलर यांनी दिले.
या पद्धती मध्ये बारा प्रकारचे क्षार शरीरातली निरनिराळी कामे करतात असे मानले जाते. जेंव्हा या क्षारांचे प्रमाण कमी जासत होते तसे शरीराच्या त्या भागाचे काम विस्कळीत होते. तो क्षार शरीराला पुरवला तर परत शरीर योग्य प्रकारे काम करू लागते. अशी साधारणपणे ही पद्धती काम करते.

यामध्ये खालील बारा क्षार आहेत
१. कल्केरिया सल्फ्युरीका
२. फेरम फॉस्फोटीकम
३. कॅलीमूरएटिकम
४. कॅली फॉस्फोरिकम
५. कॅली सल्फ्युरिकम
६. मॅग्नेशिया फॉस्फोरेका
७. नायट्रम म्युरेटिकम
८. नायट्रम फॉस्फोरिकम
९. नायट्रम सल्फ्युरिकम
१०. सायलिशिया
११. कल्केरिया फ्लोरिका
१२. कल्केरिया फॉस्फोरिका

या औषधी वेगवेगळ्या रोगांवर कामी येतात.
या औषधांना क्रमवारीने वेगवेगळ्या ताकदी आहेत जसे ३ एक्स, ६ एक्स ते २०० एक्स.
शारिरीक अवस्था व वेळेनुसार कमी व जास्त ताकदीची औषधे दिली जातात.
ही औषधे प्राण्यांवर व वनस्पतींवरही काम करतात असा दावा केला जातो.

ऍलोपॅथीचे डॉक्टर सर्वसाधारण पणे या चिकित्सेची खिल्ली उडवतात असे दिसते. (पण स्वतःच्या आजारात अनेकदा सगळी कडे ठोकरा खावून हे तर हे असे म्हणून परत येथेच आलेलेही पाहिले आहेत.) शिवाय या चिकित्सेमध्ये शस्त्रक्रिया होत नाहीत. तसेच आपात्कालीन समस्यांवरही उपायही नाहीत अशी टीका होते. मात्र जुनाट रोगांवर ही उपायकारक असतात असे अनेक लोक मानतात.

ऍलोपॅथी चिकित्सा ही दोष जेथे आहे त्या दोषाचे निराकरण करते. तर बायोकेमिक चिकित्सा हा दोष मुळात का उत्पन्न झाला त्या कारणाचे मुळ नष्ट करण्याचा प्रयत्न करते.

आपला
गुंडोपंत

काही नंतर सुचलेले मुद्दे:
१. भारतात होमियोपॅथी सोबत ही चिकित्सा होत असली तरी ती परदेशात कशी होते या विषयी मला माहीती नाही.
२. त्याच प्रमाणे खुद्द जर्मनी मध्यी या चिकित्सेचे आजचे स्वरूप काय आहे या विषयी ही उत्सुकता आहे.
३. अजून कुणी या चिकित्सेवर लेख लिहुन प्रकाश टाकल्यास आवडेल.
४. आपले कडू गोड अनुभव वाचायला आवडतील.

लेखनविषय: दुवे:

Comments

सुशलर

डॉ. सूशलरनाच विचारून
पहा काय प्रयोग केले त्यांनी ते ;)))

आपला
कोणतेही दावे न केलेला
गुंडोपंत

म्हणजे काय बॉ?

ऍव्होगॅड्रो नंबर म्हणजे काय बॉ?

बाकी वेगवेगळ्या दरूचा नक्कीच वेगवेगळा परिणाम होत असावा...
मला तो नेहमीच महिन्याच्या शेवटी खिसा वेगवेगळ्याप्रकारे हलका झाल्यावर जाणवला आहे. ;)))

आपला
(नेहमीप्रमाणेच अज्ञानी)
गुंडोपंत

मग?

कुणाला कसे नि किती विरघळवले ते मला माहीत नाही बॉ!

मागे या औषधांनी मला बरे वाटले होते.
प्लॅसिबो इफेक्ट असला तरी आवडले होते कारण
ऍलोपॅथीच्या साइड एफेक्टस धोका नव्हता.

आपला
आता निरोगी
गुंडोपंत

अरेरे

म्हणजे जास्त खाल्ली साखर!!
आता पेनिसिलिन(च ना?) घेत जा वेळच्यावेळी!

आणी होमियोपॅथी/बायोकेमिकच्या वगैरे नादी लागू नका परत.
ती काय औषधे आहेत का? उगाच आपल्या साबूदाण्याच्य गोळ्या हो!
औषध म्हणजे कसे... एकदम शॉट बसला पायजे!
दोन सुया... आन चार कडू गोळ्या!
मानूस येकदम टकाटक! आन डाक्टर पावरबाज!

मुकाट आपली 'साइड इफेक्टवाली औषधे' घेवून मजेत रहात जा!

शिवाय डॉक्टरकडे खिसा मस्त हलका झाला की बरं पण वाटतं ना...?

आपला
गुंडोपंत

होमिओपॅथी

होमिओपॅथी आणि बारा क्षार पद्धतीत काय साम्य/फरक आहे हे कुणी माहितगार सांगेल काय? कुतूहल आहे.
ही चर्चा पुढे जाऊन बरीच माहिती मिळावी ही आशा.

अनेक व १२

होमिओपॅथी मध्ये अनेक औषधे आहेत मात्र १२ क्षार मध्ये अर्थात १२च.
त्यांची काही काँबीनेशन्सही होतात. मुख्यतः १२ आहेत.

बाकी उपचार पद्धतीत साम्य बरेच आहे असे मला वाटते.
जसे दोन्ही पद्धती लक्षण पाहून दोषाचे मूळ दूर करण्याचा प्रयत्न करतात.

आपला
गुंडोपंत

प्लासिबोच

होमिओपाथीबाबत सर्कीट यांच्याशी सहमत आहे, आमचे मत होमिओपेथी अशास्त्रिय आहे म्हणून काही देशात या उपचार पद्धतीवर बंदी आहे. या बाबत प्लासिबो इफेक्ट मध्ये त्यातील यश लपले आहे. तरी मी स्वतः पाहिलेली व अनुभवलेली निरि़क्षणे मात्र वेगळी आहेत
१) माझे वडील या बाराक्शार चे समर्थक होते. गावाकडे विंचू दंशाच्या केसेसे रात्री अपरात्री येत. ( वडील डॉक्टर नव्हते पारंपारिक शेती व्यवसाय व व्य्क्तीगत माध्यमिक शाळेत मास्तरकी) त्यावर काली मूर नावाचे औषध विंचू दंशाच्य जागेवर पाणी टाकून त्यावर हे काली मूर टाकत. वाळले कि पुन्हा तीच प्रक्रिया. पोटातही ते औषध दिले जाई. मग रोग्याचा विंचू हा उतरत उतरत दंशाच्या ठीकाणी पोहोचे. वडिल् नसले कि मी सुद्धा हा प्रकार रोग्यांच्या बाबत करत असे. बोटाला चावला कि विचू खांद्यापर्यंत चढत असे. औषध व पाण्याचा एक्केक् थेंव अशा प्रक्रियेतून औषध हे विषाला खेचत आहे. आता दंडापर्यंत, कोपरापर्यंत, आता मनगटापर्यंत असे करत तो बोटापर्यंत पोहोचत असे. एक दिड तासात हा विंचू उतरुन जाई. ताप, सर्दी. खोकला आला कि फेरम फॉस, नेट्रम सल्फ. काली मूर हे मिश्रण ३० एक्स आम्हाला ठरलेले. विशिष्ट लिमिट बाहेर आजार गेला कि मगच डोक्टर.
प्लासिबोवर एक लेख वाचा. P1000021वर्तमान पत्राचे नाव व दिनांक मात्र नोंदवायचे राहून गेले.
प्रकाश घाटपांडे

म्हणजे?

>> बोटाला चावला कि विचू खांद्यापर्यंत चढत असे
म्हणजे????.. आम्हा आजन्म शहरात राहीलेल्या आणि गावात फक्त सुट्टीपुरते 'फिरून' येणार्‍यांना विंचु चढतो म्हणजे काय्? बोटाचा खांद्यापर्यंत कसा जातो? वगैरे मुलभुत प्रश्न आहेत.
हे वाचून आमची स्थिति गावातल्या मुलाला लोकल-धावपळ वगैरे सांगून व्हावी ना तशी झाली आहे :))
पण् खरच्.. हा विंचु चढतो म्हणजे काय होतं बॉ?

आपला
(पढतमुर्ख) ऋषिकेश

दारु आणि विष

दारु जशी चढ्ते तस इच्चू बी चढतो. तरी वी एक गंमत सांगतो . आमचा एक पोलिस कॊन्स्टेबल नियमित दारु पित असे. तो गमतीने म्हणे मला इच्चू चावला तर इच्चुच झिंगत पडन. आन आपन मेल्याव लाकड लई लागनारच न्हाईत. निस्ति काडी लावून दिली कि भुरुभुरु जळून जाईल बॊडी
प्रकाश घाटपांडे

गंमत छान पण..

गंमत छान :) पण..
मला खरच नाही माहीत विंचु चढतो म्हणजे नक्की काय होतं :(.. फोड येतात?.. अंग लाल् होत? भाग बधीर होतो? त्वचेचा रंग बदलतो? नक्की काय होतं?

-ऋषिकेश

महत्वाचा विषय

माझ्या माहितीप्रमाणे विंचवाच्या विषावर जगात औषधे उपलब्ध नाहीत.
फक्त कोकणातल्या एका अतिशय छोट्यागावातल्या डॉक्टरने (नाव लक्षात नाही) त्यावर संशोधन केले आहे.
हे संशोधन आंतरराष्ट्रीय मान्यता पावले आहे.

अशा वातावरणात आपल्या वडिलांनी शोधलेली विंचु उपचार पद्धती जर रुग्णांना दिलासा देत असेल, तर त्यावर एखादा प्रयोगासहीत असलेला लेख नक्की लिहा.
हा शोध क्रांतीकारी आहे. याची व्हॅल्यु खूप आहे. नक्की विचार करा!

आपला
गुंडोपंत

वृश्चिकदंशावर औषधे

उपलब्ध आहेत.
बहुतेक वृश्चिकदंश घातक नसतात, त्यांना थोडा काळ आणि चिंता शांत करणे, काही विशेष लक्ष, एवढे पुरते. त्यामुळे एखाद्या इस्पितळात वृश्चिकदंशाची विवक्षित औषधे नसली तरी बरे होईपर्यंत उपचार होऊ शकतो.
वेगवेगळ्या देशातले विंचू वेगवेगळे आहेत (आणि प्रत्येक देशात अनेक प्रकारचे सापडतात). त्यामुळे विवक्षित औषधे एका देशातली दुसर्‍या देशात मान्यता प्राप्त करण्याची शक्यता फार कमी.
पण कोकणातल्या त्या डॉक्टरांचे अर्थातच अभिनंदन.

मग

कदाचित भारतात तसे औषधाचे प्रयत्न नसावेत... मला नक्क्की कल्पना नाहीये.
मी मागे साधारण दहा वर्षांपुर्वी हे विंचु प्रकरण मटा मध्ये वाचले होते.

पण विंचवाच्या विषावर उतारे आहेत का?
माझ्या अल्प ज्ञाना नुसार असे उतारे ज्ञात नाहीयेत्.
असल्यास त्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचले नाहीयेत/नसावेत!

यावर आपण अजून प्रकाश टाकल्यास आवडेल..

आपला
गुंडोपंत

महाड येथील डॉ. बावसकर दंपती

भारतात कोकणातला लाल विंचू (लाल इंगळी ? चूक असल्यास जाणकाराने सुधारावी) हा त्यातल्या त्यात खतरनाक. बाकी विंचवांच्या दंशाने बहुधा मरण येत नाही. लाल विंचवाचे लॅटिन नाव Mesobuthus tamulus.
याच्या विषावर विवक्षित उतारा (अँटी-सिरम) हे मुंबईच्या हॅफकिन इन्स्टिट्यूट कडे मिळते.
ते नसले तरी योग्य उपचाराने उपाय होऊ शकतो. महाड येथील डॉ. बावसकरांनी या बाबतीत अभ्यास केला आहे. (हिंमतराव आणि प्रमोदिनी बावसकर दंपती, यांचे महाड येथे इस्पितळ आहे.)

विंचवाच्या विषातील रासायनिक तत्त्वाने एका विशिष्ट प्रकारचे मज्जातंतू उद्दीपित होऊन त्या अतिरेकाचा दुष्परिणाम होतो. या प्रकारच्या "ऑटोनोमिक" मज्जातंतूंच्या अतिरेकामुळे मुळे काय दुष्परिणाम होऊ शकतात ते दंशातून शरिरात किती विष टोचले गेले आहे त्यावर अवलंबून आहे. कमी प्रमाणात टोचले गेले असले, तर दंशाच्या ठिकाणी दुखते, वाढत्या प्रमाणात दंशापासून दूर दूर परिणाम होतो. अर्थात विषाचा प्रभाव (आपोआप) उतरताना दुरून जवळपर्यंत दुखणे नाहिसे होते. त्याहून जास्त प्रमाणात विष टोचले जाता शरीरभर "ऑटोनोमिक" मज्जातंतूंचे अतिरेकी उद्दीपन होते. याला "ऑटोनोमिक वादळ" म्हणतात.

"ऑटोनोमिक" मज्जातंतूंचे दोन प्रकार असतात - सिंपथेटिक आणि पॅरासिंपथेटिक. दोन्ही प्रकारच्या तंतूचे उद्दीपन होत असले तरी सिंपथेटिक अतिरेकाचा प्रभाव (या ठिकाणी) जास्त घातक असतो. सिंपथेटिक प्रणालीचे योग्य उद्दीपन "लढा किंवा पळा" परिस्थितीत होते. हृदयाची धडधड वाढणे, रक्तदाब वाढणे, श्वासोच्छ्वासाची गती वाढते. त्यामुळे विंचू चढणे हे त्वेष चढणे किंवा भयभीत होण्याची लक्षणे दाखवते. याचा अतिरेक झाला की हृदय/रक्तपुरवठा हवे तसे काम देत नाही. शिवाय फुप्फुसात लस (रक्तातला पाण्याचा अंश) स्रवून फुप्फुसे आपल्या नियतकार्यासाठी फुगू शकत नाही. अशा परिस्थितीत मृत्यू येऊ शकतो ("वादळ" उठलेल्यांपैकी, उपचार केला नसल्यास २५-३०%). मृत्यू न आल्यास विष हळूहळू आपोआप नष्ट होते आणि शरीर पूर्ववत होते ("वादळ" उठलेल्यांपैकी, ७०-७५%). "वादळ" उठण्याइतपत विषाची मात्रा टोचली गेली नसल्यास, अर्थात विष आपोआप १००% उतरते.

(पुढील दुवा कदाचित चालणार नाही, आमच्या विद्यापीठाची या मासिकाची ऑन्लाइन वर्गणी आहे.) बावसकरांच्या उपचार-प्रणाली (ऍल्गोरिदम)ने २५-३०% ऐवजी २-३% "वादळी" रुग्ण दगावतात, आणि तेही इस्पितळात येण्यास उशीर झाला म्हणून, असे बावसकर म्हणतात. ज्या रुग्णास "वादळ" उठले नाही, त्याला ऍस्पिरिन (किंवा तत्सम) वेदनाशामक आणि काम्पोझ (किंवा तत्सम) काळजीशामक द्यावे. विष आपोआप उतरते.
ज्यास "वादळ" उठले आहे, त्यास सिंपथेटिक मज्जातंतूंचे एका विशिष्ट प्रकारे दमन करणारे "प्राझोसिन" हे औषध द्यावे, पाणी प्यावयास द्यावे, आणि आमायनोफायलीन हे फुप्फुसांचा निचरा करण्यास मदत करणारे औषध द्यावे. बावसकरांच्या अनुभवात सुरू झालेले वादळ शमवण्यास अँटी-सिरम उपयोगी पडत नाही. (हा दुवा मोफत आहे, असे वाटते.) त्या प्रणालीने उपचार केल्याने अन्य डॉक्टरांनाही विंचू चावल्याचे मृत्यू टाळण्यात यश आले आहे, असे डॉ. बावसकर सांगतात.

बावसकरांनी ही प्रणाली प्रसिद्ध केली त्या काळात मी विद्यार्थी होतो, आणि ही प्रणाली अभ्यासक्रमात आली नव्हती. वरची सर्व माहिती आताच या विषयावरचे काही लेख वाचून जमवली आहे. तसे करण्यास गुंडोपंतांनी उद्युक्त केले, म्हणून त्यांना धन्यवाद.
(बहुतेक जातीच्या विंचवांचा दंश घातक नसतो, आणि लाल विंचवाचा दंश टोचलेल्या विषाच्या मात्रेवर अवलंबून घात करतो, हे पुन्हा सांगणे नलगे.)

अप्रतिम - स्वतंत्र लेख करा

धनंजया,
सुरेख नि अभ्यासपूर्ण छान लेख लिहिलास. शिवाय दुवे!
आवडले. असेच लेखन येथे यावे.

मी संपादकांना विनंती करतो की ह्या
लेखा चे स्वतंत्र लेख असे रुपांतर कराल का?

धनंजय,
विकिपिडियावर जावी अशी ही माहीती आहे असेही वाटते आहे.
तेंव्हा मनावर घेवून हा लेख विकिवरही उपलब्ध करून देशील का?

लेखाचे शीर्षक मात्र काय असावे या विषयी साशंक आहे. :))

आपला
गुंडोपंत

माझे मत

हा विषय बराच वादग्रस्त आहे. माझा स्वतःचा होमिओपथीबाबतचा अनुभव अत्यंत चांगला आहे. दुसर्‍या बाजूला होमिओपथीचे कार्य कसे होते याबाबत आपल्याला काहीच माहिती नाही. इथे माझ्यासमोरचा प्रश्न असा की यातून मी काय निष्कर्ष काढू? होमिओपथीसाठी सर्वात लोकप्रिय स्पष्टीकरण म्हणजे प्लासिबो एफेक्ट. इथे गंमत अशी आहे की मुळात प्लासिबो इफेक्टची व्याख्याच गुळमुळीत आहे. असे म्हटल्यानंतर आपण फक्त होमिओपथी म्हणजे नेमके काय हे समजावण्याची जबाबदारी प्लासिबो इफेक्टवर ढकलत असतो. प्लासिबो इफेक्टची सर्वात लोकप्रिय व्याख्या म्हणजे औषधाचा आणि बरे होण्याचा काहीही संबंध नसतो. रुग्ण बरा होतो तो केवळ त्याच्या 'विश्वासामुळे'. असे जर असले तर खरेच बरे आहे. माझ्या बाबतीत ज्या विविध गोष्टींवर मला होमिओपथी उपयोगी पडली ते सर्व जर माझ्या श्रद्धेमुळे झाले असेल तर श्रद्धा काहीही करू शकते असा निष्कर्ष काढायला हवा.

उत्तर मला माहित नाही. पण मला नवल वाटते ते याबद्दल असलेल्या आपल्या पूर्वग्रहांचे. एखादी गोष्ट आपल्याला अतर्क्य वाटते म्हणून ती होउच शकत नाही हा माझ्या मते शास्त्रीय दृष्टीकोन नाही. असे असेल तर त्याबाबत अधिक माहिती मिळवायला हवी. आणि इथेही दोन मुद्दे आहेत. पहिला, हे घडते आहे का आणि दुसरा याचे स्पष्टीकरण काय? दुसर्‍या प्रश्नाचे उत्तर माहित नसेल तर पहिल्याचेही उत्तर नाही असे मानणे योग्य नाही.

दरम्यान, माझ्या बाबतीत होमिओपथी गुणकारी ठरली आहे. त्यामुळे लोक काही म्हणले तरी कुठल्याही साइड इफेक्टविना, नुसत्या 'साखरेच्या गोळ्या' खाउन जर मला गुण येत असेल, तर त्याला माझी हरकत नाही. :)

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

पटले

राजेंद्र यांचे स्पष्टिकरण पटले.

अजुन एक मुद्दा असा की "प्लासिबो एफेक्ट" हा मोठ्या लोकांच्या टेस्टच्या संदर्भात म्हणले आहे ना? म्हणजे रुग्ण वयाने मोठा आहे व त्याला बरे नाही आहे व हे औषध घेतले की आपल्याला बरे वाटेल हे कळते.

आता लहान मुल ज्यांना फक्त रडणे, खेळणे इतकेच माहीत त्यांना होमिओपथीने चांगला गुण आलेला पाहीला आहे. शिवाय कडवट ऍलोपाथीच्या औषधांपेक्षा जे काही वेळा मुले ओकुन टाकतात, ती होमिओपथीच्या "साखरेच्या गोळ्या" एकदम आनंदाने घेतात. हा माझा अनुभव आहे. तसेच एका ओळखीच्या मोठ्या व्यक्तिला देखील स्कीन रिलेटेड प्रॉब्लेम मधे ऍलोपाथीच्या उपचारापेक्षा होमिओपथीच्या "साखरेच्या गोळ्या"मुळे पटकन गुण आलेला पाहीला आहे.

टोन्सिल

माझे टोन्सील हे होमिओपथीने लहनपणी बरे झाले. शहरातल्या डॉक्टरने आप्रेशन सांगितले होते. शहरातल्या इतर मुलांना असे ऑप्रेशन झाले कि लगेच आईस्क्रीम खायला भेटते हे मला माहित होते त्यामुळे आपलेही असे आप्रेशन व्हावे असे मनातुन वाटे. पण होमिओपाथि शिवाय सुटका नाही हे माहीत असल्याने त्या आप्रेशनच्या नादाला गेलो नाही. अन टॉन्सील ही बरे झाले.
तसेच शहरातल्या हुशार मुलांना चष्मा लागतो हे मी बघितले होते. त्यामुळे अशा मुलांना चषमा लागण्यासाठी काय काय करावे लागते हे मी विचारुन घेतले होते. तसे डोके व डोळे दुखणे मी स्वतःवर ओढवून घेतले होते. पण गावातल्या जोशी डॉक्टरांनी फळा वाचायला दिल्यावर मी तो बिनचूक वाचून दाखवला आणी माझे बिंग उघडे पडले.
प्रकाश घाटपांडे

च्यामारी

च्यामारी

तुमचे आमचे लहानपण सारखेच गेले की राव?
आमचेही वडील असेच हो!!

ते आईस्क्रीम काही मिळाले नाही आम्हाला! :(((

आणी चस्मा आता नको आहे तर लागला! :)))
आपला
गुंडोपंत

आधुनिक वैद्यकाबाबत गैरसमज

इथे ऍलोपथी म्हणजे काय ते मला माहीत नाही. पण आधुनिक वैद्यक हे पूर्णपणे कामचलाऊ (प्रॅग्मॅटिक - चांगला अर्थ) असे आहे.

एखादी गोष्ट आपल्याला अतर्क्य वाटते म्हणून ती होउच शकत नाही हा माझ्या मते शास्त्रीय दृष्टीकोन नाही. असे असेल तर त्याबाबत अधिक माहिती मिळवायला हवी. आणि इथेही दोन मुद्दे आहेत. पहिला, हे घडते आहे का आणि दुसरा याचे स्पष्टीकरण काय? दुसर्‍या प्रश्नाचे उत्तर माहित नसेल तर पहिल्याचेही उत्तर नाही असे मानणे योग्य नाही.

हा आधुनिक वैद्यकाच्या उपयोगाचा (प्रॅक्टिस चा) पाया आहे. एखादा उपाय का काम करतो ते स्पष्टीकरण मिळाले तर त्यात बदल करून तो आणखीन प्रभावी करणे, कोणास तो उपाय विशेष कारणासाठी लागू नाही, वगैरे ज्ञान सोपे जाते, इतकेच.

अमुक औषध वापरायचा प्रसंग काय ते ठरवता आले, तर कधी तेच औषध वापरून आणि कधी औषध न वापरून (किंवा वेगळे 'हल्लीचे' औषध वापरून) बघता येते. ज्या प्रकारे अधिक प्रमाणात गुण येतो तो उपाय वापरावा.

या बाबतीत होमियोपथीबद्दल डॉ. दफ्तरींचे उत्तम पुस्तक वाचले. डॉ दफ्तरी हे नागपूर येथे सेंट्रल प्रॉव्हिंसेस राज्यात होमियोपथी महाविद्यालयांचे प्रशासक होते, असे अंधुक आठवते. हे पुस्तक साधारण १९५५ साली प्रकाशित झाले. त्यात त्यांनी १८८५-१९०० काळातली न्यू यॉर्क आणि फिलाडेल्फिया येथील इस्पितळांची आकडेवारी दिली आहे. असे दिसते की होमियोपथी वापरणार्‍या इस्पितळांत मृत्यूचे प्रमाण कमी होते. (त्या काळात ऍलोपॅथीमध्ये 'नसेतून भांडेभरून रक्त काढा', वगैरे उपाय होते.) गेल्या शतकात हॉस्पिटलमधील मृत्यूंचे प्रमाण खूप कमी झाले असल्याकारणाने, आणि शिवाय होमियोपॅथी मानणारे ज्या उपचाराला "ऍलोपॅथी" म्हणतात ती गोष्ट सारखी बदलत असल्याने, दफ्तरी यांनी दिलेली आकडेवारी आता लागू नाही.

इथे गंमत अशी आहे की मुळात प्लासिबो इफेक्टची व्याख्याच गुळमुळीत आहे. असे म्हटल्यानंतर आपण फक्त होमिओपथी म्हणजे नेमके काय हे समजावण्याची जबाबदारी प्लासिबो इफेक्टवर ढकलत असतो. प्लासिबो इफेक्टची सर्वात लोकप्रिय व्याख्या म्हणजे औषधाचा आणि बरे होण्याचा काहीही संबंध नसतो. रुग्ण बरा होतो तो केवळ त्याच्या 'विश्वासामुळे'.

हे कदाचित लोकप्रवादात शक्य आहे, पण क्लिनिकल ट्रायलमध्ये प्लासिबो ची व्याख्या सुटसुटीत आणि रोखठोक आहे. औषधाचे जे काय प्रभावी आहे (म्हणजे ते रसायन अशी बहुधा परिस्थिती असते) ते सोडून डॉक्टराने सर्व औषध देण्याचे सोपस्कार एकसारखे करणे. ते रसायन प्रभावी आहे असे मत असल्यास, त्या औषधाच्या गोळीऐवजी त्याच आकाराची, रंगाची, शक्यतोवर चवीची गोळी द्यावी. (रसायन खूपच वेगळ्या चवीचे किंवा वासाचे असल्यास गोळ्या पोटात विरघळणार्‍या खाद्य वेष्टनात घालून देता येतात.)

असो. माझे असे मत आहे की ज्याचा गुण येतो ते वापरावे. आणि जर होमियोपॅथीच्या विशिष्ट औषधांनी उपाय होत असतील, तर ते विकून, बाजार काबीज करून श्रीमंत होणारे उद्योजक या मुक्त बाजारपेठेत जरूर निघतील.

नवीन माहीती

हा लेख आवडला. होमीओपथीबद्दल कधी वाचले नव्हते. कधीतरी लहानपणी टोन्सील्स साठी गोळ्या घेतल्याचे पुसटसे आठवते. बाकी धनंजय यांनी लिहीलेल्या विचाराशी सहमत की, माझे असे मत आहे की ज्याचा गुण येतो ते वापरावे.

याच प्रकारे आयुर्वेदावरील माहीती आणि एकंदरीत काय वाटते ते वाचायला आवडेल.

कॉर्टिकोस्टेरॉइड्स पासून सावधान

कॉर्टिकोस्टेरॉइड्स् या जातीची औषधे अनेक जुनाट रोगांवर बर्‍यापैकी लवकर जाणवणारा परिणाम देतात. याचे कारण की शरिराची रोगप्रतिबंधक प्रक्रिया दाबून टाकण्याचा या रसायनांचा गुण असतो. आणि बहुतेक वेळी "दुखणे" हे कार्यरत नैसर्गिक रोगप्रतिबंधामुळे होत असते.
(कॉर्टिकोस्टेरॉइड्स् वेगळी आणि क्रीडापटू घेतात ती स्नायू वाढवणारी स्टेरॉइड्स् वेगळी.)
हे अर्थातच लांब पल्ल्यासाठी धोकादायक असते. कारण रोगप्रतिबंधक शक्ती ही कुचकामी असण्याने अन्य विकार "न दुखता" होतात. शिवाय या औषधांची शरिराला सवय होऊ शकते.
माझ्या नात्यातील एका बाईंचा जुनाट आस्थ्मा एका "ऑल्टर्नेटिव्ह" डॉक्टराने दिलेल्या पांढर्‍या गोळ्यांनी "बरा झाला". तो भामटा स्वतःला होमियोपॅथिक म्हणवून घेत होता, ते खोटे असेल. त्या उपचाराने पुढे तोटा झाला.
आजकाल प्राणायाम वगैरे करून त्या काकूंना दिलासा मिळतो.

वर मी म्हटले आहे की ज्याचा गुण येईल ते वापरावे. पण सुजाण गिर्‍हाइकाप्रमाणे विचार करावा. बाजारपेठेत भामटेही असतात आणि सावही असतात.

(फायदे-तोटे तोलून वापरलीत तर कॉर्टिकोस्टेरॉइड्स् ही फार उपयोगी औषधे आहेत. त्यामुळे 'ती वापरू नयेत' असे माझे मुळीच मत नाही. पण ती वापरत असताना अखंड सावधान असावे लागते हे डॉक्टराने आणि रुग्णाने जाणले तर अनर्थ टळू शकतो.)

ऍस्पिरिन आणि सांख्यिकी

ऍस्पिरिनचा रेणू शरिरातील सायक्लो-ऑक्सिजनेझ नावाच्या एन्झाइमची क्रिया कमी करतो. त्यातून त्याचे शरिरावर परिणाम होतात.

पण हे औषध अमुक विशिष्ट परिस्थितीत देऊन गुण येतो की नाही, हे सांख्यिकीनेच ठरवावे लागते, हे खरे आहे.

अशा प्रकारचे काही प्रयोग होमियोपॅथीच्या बाबतीत झाले आहेत. पबमेड विदा शोधता (होमियोपथी आणि क्लिनिकल ट्रायल अशा शब्दांची पृच्छा केली) मला १००-२०० निबंध सापडले. (हा आकडा फार लहान आहे, हे सांगणे आले.) पैकी बहुतेक "पायलट प्रोजेक्ट" आहेत, त्यामुळे त्यांतून ठाम उत्तर निघत नाही.

त्यात एकच मला गैर वाटला : नवी दिल्ली, जनकपुरी, येथे Central Council for Research in Homoeopathy, JNBCHA नामक संस्थेतील डी.पी.रस्तोगी यांचा १९९९ मधला लेख वैद्यकीय संशोधनाच्या नैतिकतेच्या दृष्टीने थोडा डळमळीत वाटला. तिथे त्यांनी काही एड्सरुग्णांना होमियोपॅथिक औषधे दिलीत, आणि काही रुग्णांना प्लॅसिबो दिले. (निकाल होमियोपॅथी च्या बाजूने.) १९९९ मध्ये या रुग्णांकरिता बर्‍यापैकी प्रभावी औषधे उपलब्ध होती, किंवा माहिती होती. अशा परिस्थितीत कोणासही प्लॅसिबो देणे चूक आहे. पण त्या वर्षी दिल्लीत ती औषधे उपलब्ध होती का? हा प्रश्न विचारला पाहिजे - नसल्यास नैतिकतेच्या दृष्टीने काठावर पास.

 
^ वर