सध्या काय वाचताय् ?

या व्यासपीठावरील नानाविध व्यक्ति काही ना काही वाचत असतील. हाती असलेल्या/संपविलेल्या पुस्तका/पुस्तकांबद्दलचा सांगोपांग आढावा घेणे वेळ,शक्ति यांच्या अभावामुळे म्हणा , किंवा एकूण प्रवृत्तीमुळे म्हणा दर वेळी शक्य असतेच असे नाही. प्रत्येक नव्या वाचलेल्या पुस्तकाबद्द्ल एक नवा धागा सुरू करणे बर्‍याचदा शक्य होत नाही.

हे सारे लक्षांत घेता, प्रस्तुत धाग्याची कल्पना सुचली. वाचत असलेल्या , संपविलेल्या पुस्तकांबद्दल तुम्हाला काय वाटले , त्याचा कुठला भाग आवडला/नावडला याबाबत येथे लिहिता येईल. इतर वाचकांची मते/ इच्छुकांचे प्रश्न हे सारे इथे येऊ शकेल.

(या धाग्याची कल्पना माझी नव्हे. अन्य काही फोरम्स् वर हे मी पाहिले ; आणि येथे ते चांगल्या रीतीने चालविले जाऊ शकेलसे वाटले ; म्हणून हा प्रपंच.)

मी सध्या वाचतोय एक हिंदी कादंबरी : "नदी के द्वीप" . गेल्या पिढीतील एक दिवंगत हिंदी लेखक "अध्न्येय" यांची ही कादंबरी आहे. अजून ५० पानांच्यापुढे मी गेलेलो नाही. या धाग्याला थोडा प्रतिसाद जरी मिळाला तरी त्याबद्दल मी जरूर लिहीन.

लेखनविषय: दुवे:

Comments

वा ! छान चर्चा विषय

वा ! छान चर्चा विषय.
मला आवडेल वाचायला.
मिलिंद बोकीलांचे शाळा वाचले.
सर्वसाधारण पणे आवडले.
आत्मकथनात्मक असावे असे वाटले :)
पण भाषा आवडली...

आपला
गुंडोपंत

शितू

सध्या गो. नी. दांडेकरांचे शितू वाचतो आहे. अजून पहिली ७०-८० पानेच वाचून झालीत, पण कोकणचे वर्णन वगळता कथा अजूनतरी असामान्य वाटली नाही. कदाचित पुढच्या पानांत चित्र बदलेल.

बाकी हा उपक्रम उत्तम आहे. लायब्ररीथिंग आणि शेल्फारीच्या धर्तीवर मराठीतही असे संकेतस्थळ सुरु व्हावे असे वाटते.

तांत्रिक मदत

बाकी हा उपक्रम उत्तम आहे. लायब्ररीथिंग आणि शेल्फारीच्या धर्तीवर मराठीतही असे संकेतस्थळ सुरु व्हावे असे वाटते.

सहमत आहे. ही संकेतस्थळे ज्या प्रणालींवर आधारित आहेत तशी एखादी मुक्तस्रोत प्रणाली कस्टमायझेशनसाठी उपलब्ध आहे का?


आम्हाला येथे भेट द्या.

नुकताच

हॅरीचा पॉटरचा आठवा भाग संपवला एकदाचा.. :) फार वेगळ्या प्रकारचं लिखाण..मला तरी फार फार फार आवडतं... आता यापुढे हॅरी नाही याची चुटपुट जरूर लागली आहे :-(
बाकी सध्या जी.एं.च "रमलखुणा" आणि लॉरी शिन - डेविड हॉगन यांनी संकलित केलेलं "द सिविल वॉर" नावाचं "अपोसिंग व्ह्यू पॉईंटस् डायजेस्ट" वाचतोय

"अपोसिंग व्ह्यू पॉईंटस् डायजेस्ट" विषयी: फार उत्कृष्ट प्रकार. यात प्रत्येक विषयाच्या निरनिराळ्या प्रश्नांवर दोन निबंध असतात.. जे एकमेकांना पुर्ण छेदतात.. नाण्याच्या दोन्हि बाजू दाखवतात. मिळालं तर जरूर वाचावं असं...
सिविल वॉर खेरिज पुढिल विषयांवरही "अपोसिंग व्ह्यू पॉईंटस् डायजेस्ट" आहेतः
अमेरिकन रिव्होल्युशन
ऍनिमल राईट्स
बिल ऑफ् राईट्स
डेथ पेनाल्टी
ड्रग्स् अँड् स्पोर्टस्
ग्रेट डिप्रेशन ऍन्ड् आफ्टर ईफेक्टस्
टिन व्हयोलन्स्
इत्यादी

एच् पी

"पॉटर"मॅनिया चा स्पर्श मला होऊ शकला नाही. वाचकसंस्कृतिमध्ये एव्हढी मोठी घटना गेल्या १० वर्षांत होऊन गेली ; आणि त्याकडे मी फिरकलोही नाही याची, नाही म्हण्टले तरी खंत वाटते. पण त्याकडे जायला जो वेळ पाहिजे तो मिळत नाही म्हणा किंवा अन्यत्र खर्च होतो म्हणा. तर ज्यांनी हे जे रोलिंगबाईंचे मॅग्नम्-ओपस् वाचले आहे त्यांना विचारावेसे वाटते , की पौगंडावस्थेपलिकडील वाचकांना खेचून घेईल असे काय आहे त्यात ? महान मानल्या जाणार्‍या बृहत्कृतींमधे जसे एक प्रतिविश्व असते, तसे , त्या विश्वाच्या पलिकडे जाऊन टिकून राहतील, चिरंतन ठरतील , अशी मानवी संबंधांची , मानवी अवस्थांबद्द्लची दर्शनेसुद्धा असतात. **"एपिक" कसोटीवर उतरतील अशी काही लक्षणे "पॉटर"मधे दिसतात काय ?

** या कसोटीवर फार मोठ्या प्रमाणावर सच्च्या ठरतील अशा कथा जी एंनी लिहिल्या ; परंतु अर्थातच त्या "बृहत्कृती" नव्हत्या ; म्हणूनच एका समीक्षकाने त्यांचे "महाकाव्याचे सुटे सर्ग" असे फार फार मार्मिकपणें वर्णन केले आहे ...

"अपोसिंग व्ह्यू पॉईंटस् डायजेस्ट"

हा प्रकार आकर्षक वाटतो. तुम्ही हा प्रकार ग्रंथालयात मिळवलात का विकत घेतलात ?

"डायजेस्ट्" वरून येथे एक कबुली (कन्फेशन् ?) द्यावीशी वाटते : अनेक कलाकृती/पुस्तके वाचताना केवळ अशक्य कठीण वाटल्या/वाटतात. परंतु ती "क्लिफर नोट्स्" नावाची पिवळ्या-पिवळ्या रंगाची चोपडी (गुळगुळीत नव्हे ! :-) ) वाचली की बरेचसे संदर्भ ध्यानात यायचे आणि मग पुलंच्या भाषेत म्हण्टल्याप्रमाणे "लखू, फिरून यत्न कर !" असे म्हणावेसे वाटायचे आणि मग मूळ कलाकृतींच्या बालेकिल्ल्यावर टाकायला एक घोरपड मिळाली आहेसे वाटायचे ! आता "विकी" नावाच्या गोष्टीने त्या पिवळ्या चोपड्यांची जागा बहुतांशी घेतली आहे :-)

बरिचशी ग्रंथालयात

बरिचशी ग्रंथालयात मिळाली. त्यातलं ग्रेट डिप्रेशन फारच आवडलं म्हणून विकत घेतलं :)
आणि या डायजेस्ट मधील बरेचसे लेख (काही अपवाद आहेतच) नीट 'डायजेस्ट' होतात. उगाच बाजू उचलुन धरायची आहे म्हणून लिहिलं आहे असं वाटत तरी नाही.

रमलखुणा

आताच वाचून संपवले. जबरदस्त आहे. त्यात 'प्रवासी' व 'इस्किलार' या दोनच कथा आहेत. मला प्रवासी कथा अधिक आवडली. शेवटपर्यंत काही न काही घडत राहते. कथा वाचायला घेतली की खाली ठेवावीशी वाटत नाही.

मलाही

मलाही प्रवासी अधिक आवडली

रमलखुणा मधील दोन्ही कथा

रमलखुणा मधील दोन्ही दीर्घकथा या कथाच आहेत का , आणि असल्यास का ? असा प्रश्न मला अनेक वर्षे पडायचा. या दोन गोष्टी "नॉव्हेलाज्" (लघुकादंबरी ?) का असू नयेत ? तर त्याचे एक संभाव्य उत्तर असे असू शकते की, या दोन्ही ("कथा" या प्रकाराच्या संदर्भात प्रदीर्घ वाटतील अशा )लिखाणांमधील एक समान बाब * म्हणजे, त्यातील स्थल-कालाची एकात्मता. दोन्ही कथांमधे अर्थातच अनेक उपकथानके पात्रांच्या तोंडी "फ्लॅशबॅक्" ** म्हणून किंवा काही घटना-पात्रांचे त्यांच्या पूर्वायुष्याचे संदर्भ म्हणून आलेली आहेत , पण प्रमुख कथानक हे एका दिवसात/रात्रीत घडून जाताना आपल्याला दिसते.

तुम्हाला काय वाटते ? "कथा" या कलाप्रकाराचे हे एक व्यवच्छेदक लक्षण असू शकेल काय ?

* : (सॉरी , येथे "कॉमन फॅक्टर"चा मराठी तर्जुमा पार गंडलेला आहे. योग्य प्रयोग काय ?)
** (मराठी शब्द हवा !)

सध्या

सध्या "लाईफ ऍट ब्लँडिंग्ज " वाचत आहे. पहिले दोन च्याप्टर वाचले पण इतके हसू आले नाही. पण आता रंगत वाढू लागली आहे. वेळ मिळेल तसे शेजवलकरांचे "पानिपत"ही वाचत आहे. पण ते खूपच लक्षपूर्वक वाचावे लागत आहे.


आम्हाला येथे भेट द्या.

लाईफ ऍट ब्लांडिंग्ज

अरे बापरे! जबरदस्त पुस्तक! कधीही मन अस्वस्थ झाले की उघडून कुठूनही सुरुवात करतो. 'मलीनर नाईटस' हेही तसेच.
सन्जोप राव

सुरुवात

सुरुवात संथ होती, विशेषतः वाक्ये खूप लांबलचक. पण इंट्रोनंतर जबरा गोंधळ आहे. ;) अर्ल ऑफ एम्सवर्थ, ऍलन वगैरे वगैरे पात्रे आता सहीच धुमाकूळ घालू लागली आहेत.


आम्हाला येथे भेट द्या.

मलीनर नाईट्स

सुचवल्याप्रमाणे आवर्जून मलीनर नाईट्स मिळवले मात्र त्यामध्ये तितकीशी मजा आली नाही. गॅली अंकल वगैरेंना मिस् केले. :)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

"पानिपत"

शेजवलकर म्हणजे ते गेल्या शतकातले इतिहासकार काय ? आणि हे पुस्तक म्हणजे बखरवजा दस्तावेज आहेत काय ?

इतिहासकार

"पानिपत" ला बखरवजा दस्तावेज म्हणणे म्हणजे फारच अंडरएस्टिमेटिंग आहे. मराठ्यांच्या इतिहासाबाबत इतके प्रभावी पुस्तक पाहण्यात आलेले नाही. शेजवलकरांना सर्वोत्तम इतिहासकार म्हणावे काय?


आम्हाला येथे भेट द्या.

धन्यवाद आणि विनंती

जर का हे पुस्तक इतके महत्त्वाचे असेल, आणि जर शेजवलकरांबद्दल त्यामुळे असे वाटत असेल तर त्याबद्दल सविस्तरपणे लिहाच ! आणि हो, जर का त्या पुस्तकावर बरेच लिहीण्यासारखे असेल , तर मग या फुटकळ धाग्यापेक्षा स्वतंत्र लेख योग्य होईल. अर्थात्, वेळ नसला तर हा धागा आहेच ! मात्र लिहा जरूर.

पानिपत

शेजवलकरांचे पानिपत म्हणजे एक अस्सल वस्तू आहे. प्रत्येक पानापानाला आपल्या पूर्वग्रहाचे बुरुज ढासळू लागतात आणि आपल्या इतिहासाकडे पाहण्याची स्वच्छ दृष्टी मिळते. दुर्दैवाने शिवरायांचा इतिहास लिहिण्याआधीच त्यांचे देहावसान झाले हे आपले दुर्भाग्य.


आम्हाला येथे भेट द्या.

धरिले पंढरीचे चोर

ज्ञानेश महारावांचे आचारक्रांतीमालाचे जे भाग आहेत त्यातील.......... हिंदू-हिंदुत्व-हिंदुस्थानी, लोकशक्ती,धर्माचा विचार.....विचाराचा धर्म, आणि आता धरीले पंढरीचे चोर वाचत आहे, 'देवावर आमचाच हक्क आहे, तो आम्ही सोडणार नाही, इथपर्यंत आलोय ! (पृ. क्र.३५)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ज्ञानेश महाराव

यांच्या एकूण लिखाणाबद्दल , वैचरिक भूमिकेबद्दल थोडा प्रकाश टाकता आला तर बरे.

ज्ञानेश महाराव म्हणजे चित्रलेखा वाले का? (प्रतिसाद समाप्त)


आम्हाला येथे भेट द्या.

चित्रलेखावालेच ! ज्ञानेश महाराव.

आम्ही त्यांच्या विचारावर काय लिहिणार ! माणसाचे लेखन आवडले बॉ आपल्याला आणि सर्वांनी वाचावे असे पुस्तके आहेत ती !
आपल्याला त्यांच्या विचारांचा अंदाज यावा यासाठी 'धरीले पंढरीचे चोर' या पुस्तकातील मलपृष्ठावर ( शेवटच्या कव्हरवर) जे लिहिलेले आहे, ते शब्द जशाच तसे इथे देतो !

भक्तीला अहंकाराचा, स्वार्थाचा सर्प डसला की,
भक्तीचाही मायाबाजार व्हायला वेळ लागत नाही.
त्यात आपल्या इथल्या भक्तीक्षेत्रातही स्वार्थी सर्पांचा
आणि भक्तांमधल्या अहंकाराचा फणा खडा करणा-या
पुंगीवाल्यांचा सुळसुळाट आहे.
समतेची पताका सातशे वर्ष फडफडती ठेवण्याचा बाता
मारणारा वारकरी संप्रदाय आणि त्याची श्रध्दास्थाने,
भक्तीला भ्रष्ट करणा-या व्यव्हरापासून दूर नाहीत.
पंढरपूरच्या विठोबाला जातीचा वंशाचा अधिकार
सांगत बडव्यांनी धरुन ठेवलेला आहे. या बडव्यांपैकी
एकजण विठ्ठल मंदिरातील तीर्थकुंडातच मुतला.
बडव्यांनी मस्ती कोणत्या बळावर दाखवली ?
या प्रकरणात बडव्यांच्या साथीला
भटरक्षक संघटनाच का आल्या ?

वरील विचारावरुन लक्षात येईल की, या पुस्तकात काय असावे !
(कृपया-या प्रतिसादाखाली लगेच तिरकस प्रतिसाद देऊ नये ! वरील विचारातून वाद झाल्यास प्रकाटा ची सोय होईल ! )

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सध्या

अमर्त्य सेनांचे 'आर्ग्यूमेंटेटिव्ह इंडियन' वाचायला घेतले आहे. तो सध्या फक्त प्रत्येक वाक्य ४ ओळींचे असण्याच्या निष्कर्षाप्रत आला आहे.

~~ 'तो ' सवडीत 'हे' वाचतो! ~~

सलाम

आतापर्यंत वाचलेल्या "त्या"च्या ऑनलाईन लिखाणाकडे पाहून मी "त्या"ला सलाम करतो.

बॉस, सेन यांच्या पुस्तकाबद्द्ल (आणि एकूणच तुम्ही जे लिहिता त्यात) आमची एका वाक्यात, किंवा थोडक्यात अशी बोळवण करू नका. आम्हालासुद्धा चार कण मिळू देत तुमच्याकडून.

झाकली मूठ/संकल्पना

झाकली मूठ सव्वा लाखाची :)

पुस्तकात (जे वाचायला नुकतेच सुरू केले आहे) सेनांच्या वेगवेगळ्या निबंधाची साठवण आहे. स्वतःच्याच पण वेगवेगळ्या संदर्भात पूर्वप्रकाशित झालेल्या लेखांमधून भारतीय विवाद परंपरा अधोरेखित करण्याचा प्रयत्न यात केल्याचा दिसतो.

मूळ गाभा, प्राचीन काळापासून भारतात वेगवेगळे (प्रसंगी एकमेका विरुद्ध) अस्तित्वात आलेले विचारप्रवाह, त्यांचे साहचर्य, त्यावरील चर्चा/विवाद, याचा भारतीय लोकशाही, धर्मनिरपेक्षतेवर इत्यादींवर झालेला परिणाम (यांचे इतर देशांतील याच संकल्पनाहून असलेले वेगळेपण) वगैरे चा उहापोह हा आहे.

सेनांची वाक्यरचना अर्थातच गुंतागुंतीची (पण अपेक्षेप्रमाणेच सावध), व त्यामुळेच वाचन वेगाला मर्यादा आणणारी आहे.

सलाम कसला त्याच्या करिता, येथे वाचा तेथे छापा ;)

~~ 'तो ' सवडीत 'हे' वाचतो! ~~

आवडलेले पुस्तक

हे पुस्तक मलाही माहितीपूर्ण वाटले.माझ्या भावाचे शैलीबद्दल असे मत झाले, की सेन जरा स्वतःच्या चौफेर ज्ञानाची "बेमालूम जाहिरात" करतात, आणि त्यामुळे मूळ मुद्द्यात एका प्रकारचे "बेमालूम विषयांतर" होते. मला ही टीका थोडीशीच योग्य वाटली. तरी पुस्तक तरीही आवडले, ज्ञानात भर घालणारे वाटले.

नॉट् विदाऊट् माय डॉटर

नुकतेच मी बेटी महमूदी यांच्या वरील नावाच्या पुस्तकाचे त्याच नावाचे मराठी भाषांतर वाचले. भाषांतर लीना सोहोनी यांनी केलेले आहे. भाषांतर हे भाषांतर वाटणारच नाही इतके चांगले केले आहे.
पुस्तक वाचायला घेतले आणि खाली ठेवावेसे वाटलेच नाही! पण म्हणून हे पुस्तक वाचताना मजा आली असे मात्र मी म्हणणार नाही. नायिकेचा मानसिक आणि शारीरिक छळ पाहून आपण फार 'इन्सुलेटेड्' आयुष्य जगतो आहोत असं वाटलं.

नॉट विदाऊट चित्रपट

चांगला उपक्रम, आवडला.

मी या कादंबरीचे भाषांतर आणि मूळ कादंबरीही वाचली आहे. दोन्ही उत्तम. याच नावाचा सॅली फिल्ड आणि आल्फ्रेड मोलिना अभिनीत चित्रपट या कादंबरीवर निघाला होता. तोही पाहण्यासारखा आहे. तुम्हाला शक्य झाले तर जरूर पाहा.

मीराताई आणि चित्राताई यांच्या स्ट्रॉंग रेकमेन्डेशनवरून डॅफ्ने ड्यू मॉरिएची रिबेक्का ही कादंबरी हल्लीच वाचून पूर्ण केली. ताकदीने उभे केलेले कथानक आणि साध्या गोष्टींचेही खुबीने वर्णन करण्याची हतोटी लेखिकेला आहे. कादंबरी अतिशय बंदिस्त आणि ओघवती आहे.

सध्या, याच लेखिकेचे माय कझिन रेचल वाचते आहे.

शक्ती - द पॉवर

शक्ती द पॉवर या सुमार चित्रपटाची कथाही नॉट विदाऊट सारखीच आहे.

नॉट विदाऊट माय डॉटर पुस्तक मस्त आहे. शेवटपर्यंत सोडावेसे वाटत नाही. कथानायिकेची सासू तर जबराच भयंकर.


आम्हाला येथे भेट द्या.

धडकी

एकदा दाग - द फायर नावाचा लई डेडली सिनेमा पाहिला होता. त्यानंतर कुठलाही हिंदी-इंग्रजी नावाचा सिनेमा पहायचे धाडस झाले नाही. :)

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

हा हा हा हा हा

पण सर्वोत्तम हिंदी इंग्रजी नाव म्हणजे संजूबाबा-माधुरीचा "महानता- द फिल्म"
आणि रौप्यपदक नवीन रिलीज झालेल्या "जब वी मेट" ला द्यावे.


आम्हाला येथे भेट द्या.

केवळ

केवळ जबरदस्त पुस्तक आणि त्याचा तितक्याच ताकदिने केलेला अनुवाद

बियाँड लव्ह

छान उपक्रम आहे. मी नुकतेच डॉमिनिक लापिएरचे बियाँड लव्ह वाचायला घेतले आहे.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

लापिए

लापिएचे "फ्रीडम ऍट् मिड् नाईट्" वाचले आहे. "बियाँड लव्ह" कादंबरी आहे काय ? (ती अमेझॉनची लिंक नीट चाळायला पाहिजे ...)

फ्रीडम ऍट मिडनाईट

पं. नेहरू आणि वल्लभभाईंना मस्त झोडले आहे एका च्याप्टरमध्ये.


आम्हाला येथे भेट द्या.

फ्रीडम ऍट मिडनाइट

बियांड लव्ह हे नॉन-फिक्शन प्रकारात मोडते. एडसचे जगभरातील रुग्ण आणि त्यावर काम करणारे डॉक्टर आणि संशोधक यांचे अनुभव असा काहिसा विषय आहे. वाचून झाल्यावर याविषयी अजून सांगता येईल. फ्रीडम ऍट मिडनाइट वाचल्यानंतर स्वातंत्र्याच्या काळात नेमके काय झाले याविषयीच्या बर्‍याच कल्पना आणि सत्यपरिस्थिती यामध्ये बरीच तफावत असल्याचे जाणवले. वाचनीय पुस्तक आहे.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

फ्रीडम ऍट मिडनाइट

उत्सुकता वाटली.. एन्.वाय.पी.एल्. मधे लगेच बुक केले आहे. मिळाल्यावर वाचीनच.. हा छान उपक्रम आहे! नवी माहीत नसलेली पुस्तके कळतात :)

फ्रीडम ....

माझी अशी कल्पना आहे की आधुनिक भारताच्या इतिहासाच्या, राज्यशास्त्राच्या अभ्यासकांसाठी हे पुस्तक एक् बेसिक् टेक्स्ट्-बुकवजा आहे असे मानले जाते. या चर्चेनन्तर अनेक वर्षांनी ते पुन्हा वाचावेसे मलाही वाटायला लागले आहे :-)

खेद आणि संतापजनक

हे अतिशय खेदजनक आहे.. आणि सावरकरांसारख्या कृतिशील विचारवंताचा असा अपप्रचार होणं अतिशय संतापजनक. याचा भारत सरकारने लेखककडे निदान निषेध नोंदवला आहे का? (कारण आपण केवळ निषेध खलिते पाठवण्यात वाकबगार आहोत.. तेव्हा निदान तेव्हढं तरी)
मी अजून हे पुस्तक वाचलेलं नाही, त्यामूळे अधिक बोलणं टाळतो आहे. पण जर हे असं असेल तर लेखकावर सावरकरंच्या वतीने सरकारने न्यायालयात अब्रुनुकसानिचा दावा का करू नये (ज्या देशाचा हा लेखक नागरीक असेल त्या देशात).

सहमत

टग्या यांच्या प्रतिसादातील भुमिकेशी पुर्णपणे सहमत. समाजमनाचे मानसशास्त्रीय विश्लेषण खूपच कमी होते. त्यामुळे अस्मिता दुखावण्याचे प्रकार होतात. कुणालाही "आयडॊल" बनवण्यात तो मानव आहे. त्यालाही भावभावना आहेत हे विसरले जाते. मी जवळ जवळ फक्त मराठीच वाचतो. त्यामुळे अनुवादित भाग असेल तरच माझ्या वाटेला येतो. मी तो अनुवाद वाचला आहे.
प्रकाश घाटपांडे

सिटी ऑफ जॉय

फ्रीडम ऍट मिडनाइट मी काही वाचलेले नाही माहीत असले तरी. पण संदर्भहीन पुस्तक हे फारतर कादंबरी म्हणून ठिक होऊ शकेल. बाकी टग्यांनी सांगीतलेले वाचल्यावर तर सखेद आश्चर्य वाटले.. याच लेखकाचे "सिटी ऑफ जॉय" हे कलकत्यावरील पुस्तक पण प्रसिद्ध झाले होते. वाचायला घेतले पण कंटाळा आला आणि सोडून दिले. त्यावर नंतर पॅट्रीक श्वाझी असलेला चित्रपटही आला होता. आणि तमाम कलकत्ताकर खवळले होते कारण कलकत्ता चांगले दाखवले नव्हते म्हणून...पण संदर्भहीन अपप्रचार सावरकर प्रभृतींवर केल्याबद्दल (टग्यांचा प्रतिसाद सोडल्यास) कोणी बोलल्याचे ऐकलेले तरी नव्हते.

क्षमस्व

हे पुस्तक बरेच वर्षांपूर्वी वाचल्याने यात असा उल्लेख आहे हे विसरले होते. सावरकरांबद्दल मला आत्यंतिक आदर आहे आणि असा उल्लेख निश्चितच अयोग्य आहे. यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास क्षमस्व.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

मी सुद्धा

राजेंद्रप्रमाणेच म्हणतो ... कुठल्याही परिस्थितीत असले उल्लेख निषेधार्ह आहेत. इतक्या वर्षांच्या ग्यापमुळे मी हे विसरलो आहे...क्षमस्व.

याच विषयाच्या अनुषंगाने असे अंधुक आठवते की , सेन यांच्या पुस्तकातसुद्धा सावरकरांचा उल्लेख (इतका निषेधार्ह नाही , तरी) सुद्धा बर्‍यापैकी नकारात्मक आहे आणि अगदी मामुली आहे असे अंधुक आठवते. "तो" किंवा धनंजय यावर प्रकाश टाकू शकतील...

सावरकरांबाबत उल्लेख

अमर्त्य सेन यांच्या "आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन" यातील सावरकरांविषयी उल्लेख

एक परिच्छेद आणि दोन तळटिपा :
"इंडिया : लार्ज अँड स्मॉल" या लेखात
येणेप्रमाणे मुक्त अनुवाद :
(आदल्या परिच्छेदाचा संदर्भ हा की फाळणीच्या शोकांतिकेनंतर काही काळ एका विशाल अस्मितेबद्दल भारतात अभिमान होता. )
ही विशाल आणि मिळवून घेणारी अस्मिता हल्लीची काही दशके दाव्यावर लावली गेली आहे. किंचित अतिसुलभीकरणाचा धोका पत्करून म्हणता येईल की ही धारा हिंदुत्वाला (शाब्दिक अर्थ 'द क्वालिटी ऑफ हिंदुइझम'ला) 'भारतीय'त्वाचे अनिवार्य मार्गदर्शक तत्त्व मानते. जरी या कल्पनेला स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळात लोकांत फारच थोडा पाठिंबा होता, तरी एक तत्त्वप्रणाली म्हणून 'हिंदुत्व' ही कल्पना त्या आधी दोन दशके उगम पावली होती. तथ्य हे की हिंदुत्व ही कल्पना, त्याच नावाने १९२३ मध्ये प्रकाशित झालेल्या एका पुस्तकात विशद केली गेली होती. या पुस्तकाचे लेखक विनायक दामोदर सावरकर, ज्यांचा बहुतेकवेळा उल्लेख 'वीर' (इंग्रजी अर्थ व्हॅलियंट) सावरकर असा केला जातो, हे विलक्षण जोमाचे हिंदू-दुरभिमानी (शॉव्हिनिस्ट) नेते होते. (तळटीप १). असे पुष्कळदा मानले जाते, की फाळणीपूर्व हिंदुस्थानात हिंदू व मुसलमान हे एका राष्ट्राचे दोन भाग नसून 'दोन विभिन्न राष्ट्रे' आहेत हा दावा मुहम्मद अली जिन्ना यांनी (धर्माच्या अनुसार देशाची फाळणी व्हावी या मुद्द्याच्या समर्थनाच्या संदर्भात) मांडला होता. तथ्य हे आहे, की जिन्नांनी या कल्पनेचे पाचारण करायच्या पुष्कळ आधी - सुमारे पंधरा वर्षे आधी - या कल्पनेचे सावरकर यांनी सूतोवाच केले होते. महात्मा गांधींनी त्या काळच्या हिंदू राजकारणाच्या मागण्या मान्य न केल्यामुळे त्यांचा खून ज्यांनी केला होता, ते नथुराम गोडसे सावरकरांचे शिष्य होते. (तळटीप २)
(येथपासून पुढचा परिच्छेद)

तळटीप १ : हे पुस्तक मुळात "मराठा" या टोपणनावाखाली प्रसिद्ध केले गेले. (हिंदुत्व, नागपूर, व्ही व्ही केळकर, १९२३.) पुढे सावरकरांच्या नावाखाली त्याचे अनेकदा नव्या आवृत्त्या प्रकाशित झाल्या. पैकी हिंदुत्व (मुंबई, वीर सावरकर प्रकाशन, ६वी आवृत्ती, १९८९)

तळटीप २ : खुद्द सावरकरांवर गांधींच्या खुनात गोवले असल्याच्या आरोपासाठी खटला भरला होता - काहीशा तांत्रिक कारणांवर त्यांची मुक्ती झाली होती. या इतिहासाचे ए जी नूरानी यांनी तपशीलवार विवेचन केले आहे, सावरकर अँड हिंदुत्व (दिल्ली, लेफ्टवर्ड बुक्स, २००२.) काळ किती बदलला त्याचा हा संकेत की २००४ मध्ये वीर सावरकरांच्या पोर्ट्रेटचे संसदेच्या मध्यवर्ती दालनात अनावरण करण्यात आले. जरी या समारंभावर अनेक खासदारांनी बहिष्कार टाकला होता, तरी या अनावरणातत नवी दिल्लीत त्या वेळेला (भाजप च्या नेतृत्वाखाली) सत्ताधारी असलेल्या आघाडी सरकारचा पुढाकार होता.

धन्यवाद आणि प्रश्न

माझ्या माफक समजुतीप्रमाणे मला जे समजले ते असे की, "जिन्ना यांच्या पाकीस्तानच्या कल्पनेआधी सुमारे १५ वर्षे सावरकरांनी द्विराष्ट्रवादाची संकल्पना मांडली होती ?" असे सेन यानी म्हण्टले आहे ? तसे असेल तर सेन यांचे हे मत बर्‍यापैकी ऍबसर्ड् आहे , नाही का ? (आणि सेन यांच्या म्हणण्याचा अर्थ तसा नसेल , तर ...तर काही नाही. अस्मादिकांची अक्कलच तेव्हढी ! :-) )

संदर्भ वाचावा लागेल

सेन यांनी त्यांचा संदर्भ दिला आहे :
हिंदुत्व (मुंबई, वीर सावरकर प्रकाशन, ६वी आवृत्ती, १९८९)

हे पुस्तक मी वाचलेले नाही. कोणीतरी ते वाचून पडताळावे लागेल. मी सावरकरांचे १८५७च्या स्वातंत्र्यसमरावरचे पुस्तक वाचले आहे. त्यात हिंदू-मुसलमान भाईचारा आणि बहादुरशहा जफरची पातशाही मान्य करणे कसे योग्य होते, वगैरे कल्पनांचा पुरस्कार केलेला होता. ही पुस्तके त्यांनी तुरुंगात जाण्यापूर्वी लिहिली होती.

माझ्या ओळखीच्या एकांच्या तोंडून ऐकले आहे की त्याच्या पुढे त्यांचे विचार बदललेत. यास प्रमुख कारणे की (१) प्रथम महायुद्धाच्या काळात तुर्की खलीफत (खिलाफत?) कायम ठेवण्यासाठी मुसलमानांच्या चळवळीत गांधींकडून देऊ केलेले साहाय्य सावरकरांना चुकीचे वाटले, आणि (२) तुरुंगात डांबलेल्या खुद्द मुसलमान कैद्यांकडून/शिपायांकडून त्यांची मुसलमान अस्मिता वेगळी असल्याचे ठाम प्रतिपादन/प्रदर्शन. ही दरी पूल बांधण्यासारखी नाही असे सावरकरांच्या म्हणे लक्षात आले होते, आणि त्यांचे पूर्वीचे हिंदू-मुसलमान ऐक्याचे स्वप्न भंग पावले. त्यातून मुसलमान अस्मिता ही हिंदू अस्मितेपेक्षा खरोखरच वेगळी आहे, आणि समसमान म्हणून सहजीवन शक्य नाही असे त्यांचे मत झाले, आणि ते त्यांनी हिंदुत्व पुस्तकात, आणि पुढील लेखांत मांडले.

(हे सर्व या ओळखीच्या बहुश्रुत गृहस्थांकडून ऐकले, माझे स्वतःचे या बाबतीत प्रत्यक्ष ज्ञान नाही. हिंदुत्व हे पुस्तक मी खुद्द वाचलेले नाही, त्यामुळे दुसर्‍या कोणी माझ्या या ऐकीव माहितीचे समर्थन किंवा खंडन करावे.)

"द्विराष्ट्रवाद" = "द्विराज्यवाद" नव्हे, हे लक्षात असू द्यावे. जिन्नांना वेगळे हक्क असणारी, एकाच भूप्रदेशात वावरणारी दोन राष्ट्रे=जमाती=अस्मिता आहेत असे म्हणायचे होते. शिमला करारापर्यंत राज्य=राज्यकारभार एकच राहावा असे त्यांचे प्रयत्न होते. याबाबत मिनार-ए-पाकिस्तान येथील लाहोर रेझोल्यूशन शिलालेखाबाबत एका पाकिस्तानी मित्राकडून ही माहिती ऐकली, की त्यात पाकिस्तान असे वेगळे राज्य असावे असा कुठेच असा पुरस्कार केला नव्हता. मुसलमान बाहुल्य असणारी प्रादेशिक राज्ये (अनेक!) सार्वभौम असावीत वगैरे पाठ्य आहे. हे वाचून तो मित्र अवाक झाला, कारण त्याच्या शाळेत शिकवलेला इतिहास (प्रचारात्मक प्रोपागँडा) असा होता की जिन्नांनी दुष्ट काँग्रेसवाल्यांचा एक राज्य असण्याचा कट शिताफीने हाणून पाडला, वगैरे.

अवांतर : गांधींनी खलीफतीचे (खिलाफतीचे?) रक्षण करण्याच्या चळवळीत प्रतिगामी मुसलमानांचे अनुमोदन केले, ते पुरोगामी पण फुटीरवादी मुसलमान नेत्यांचा पायबंद करण्यासाठी, आणि हा डावपेच राजकारणाच्या दृष्टीने इष्ट होता असे सविस्तर विवेचन नरहर कुरुंदकरांनी मांडले आहे. ("जागर" लेखसंचात.)

खिलाफत च्

खिलाफत (अर्थ विरोध)

~~ 'तो ' सवडीत 'हे' वाचतो! ~~

सावरकरांचे संसदेतील तैलचित्र

या विषयावर नंतर संदर्भ देऊन लिहीन. येथे फक्त तळटिप २ संदर्भात एक वास्तव लिहीत आहे:

काळ किती बदलला त्याचा हा संकेत की २००४ मध्ये वीर सावरकरांच्या पोर्ट्रेटचे संसदेच्या मध्यवर्ती दालनात अनावरण करण्यात आले. जरी या समारंभावर अनेक खासदारांनी बहिष्कार टाकला होता, तरी या अनावरणात नवी दिल्लीत त्या वेळेला (भाजप च्या नेतृत्वाखाली) सत्ताधारी असलेल्या आघाडी सरकारचा पुढाकार होता.

अमर्त्य सेनांना विचारायला हवे की आघाडी सरकारचा पुढाकार असणार यात आश्चर्य ते काय? पण मला वाटते त्यात सर्वात जास्त पुढाकार हा तत्कालीन लोकसभाध्यक्ष मनोहर जोशी यांचा होता. त्यांनी या संदर्भात एक समिती स्थापली होती. या समितीचे अध्यक्षपद हे "सोमनाथ चटर्जीं"कडे होते तर समितीत प्रणवकुमार मुखर्जी, इंदरकुमार गुजराल आणि शिवराज पाटील होते. (आठवणीवर लिहीत असल्याने एखादे नाव चुकल्यास क्षमस्व, पण बाकी वृत्तांत चूक नाही) समितीने एकमुखाने निर्णय घेऊन हे तैलचित्र लावायचे ठरवले. नंतर जेंव्हा कम्युनिस्टांनी बहीष्कार घालायचे ठरवले तेंव्हा सोमनाथदांनी (जे स्वतः एकेकाळी त्यांच्या वडीलांप्रमाणे हिंदूमहासभेत होते), सांगीतले की मला त्या चित्राला मध्यावर्ती दालनात लावणार याची कल्पना नव्हती नाहीतर मी देखील विरोध केला असता ;)

आश्चर्याचा मुद्दा

> अमर्त्य सेनांना विचारायला हवे की आघाडी सरकारचा पुढाकार असणार यात आश्चर्य ते काय?
येथे सेन यांना आश्चर्याचा मुद्दा काळ किती बदलला आहे असा आहे असे वाटते.

संसदेच्या दालनात अर्थातच सरकारच्या मर्जीविरुद्ध सजावट होण्याची शक्यता फार कमी - तो सेन यांचा मुद्दा नसावा असे वाटते. पण पूर्वी एका सरकारने सावरकरांवर खटला चालवला, आणि आता एका सरकारने त्यांचा सत्कार केला, असा काळ बदलला. यात दोन काळांत सरकारातील पक्ष बदलले होते हा मुद्दा असंबद्ध वाटत नाही.

सोमनाथ चतर्जींचे वर्तन गमतीदार असले तरी, मला वाटते की सेन यांच्या तळटिपेला तार्किकदृष्ट्या बाधक नाही.

दिशाभूल

सेन यांचे लेखन आणि बोलणे पण मला कधी कधी दिशाभूल करणारे वाटत (येन केन प्रकारेण...). अजून विषयांतर टाळण्यासाठी, त्यातील बोलण्याबद्दल आत्ता लिहीत नाही पण अनुभव आहे म्हणून असे लिहीले... पण तुम्ही दिलेल्या उतार्‍यातील संदर्भ देऊन खाली लिहीत आहे:

यात दोन काळांत सरकारातील पक्ष बदलले होते हा मुद्दा असंबद्ध वाटत नाही.

सावरकरांना ज्या ब्रिटीशांनी तुरूंगात टाकले त्याच ब्रिटीशांनी लंडनम्धे राहीलेल्या "ग्रेट फिगर्स" मधे सावरकरांचे नाव घालून इंडीया हाऊस च्या बाहेर तशी ब्लू प्लेक लावली. नोबेल मिळवण्यापुरत हार्वडचा जॉब सोडून केंब्रिजचे (युके)े ट्रीनिटी कॉलेज जॉईन करणार्‍या सेनांना हा संदर्भ आश्चर्य करायला मिळाला नाही याचे आश्चर्य वाटले...

खुद्द सावरकरांवर गांधींच्या खुनात गोवले असल्याच्या आरोपासाठी खटला भरला होता - काहीशा तांत्रिक कारणांवर त्यांची मुक्ती झाली होती.
एखाद्याच्या विरुद्ध कुठलाच पुरावा मिळाला नसताना त्याला कटात सामील आहे म्हणून शिक्षा करणे कसे शक्य होते? शिवाय एकदा एखादा गुन्हेगारम्हणून "आरोपी" असलेली व्यक्ती जर निर्दोष कोर्टात ठरली तरी त्या व्यक्तीस पन्नास वर्षांनंतर लोकांच्या नजरेत गुन्हेगार म्हणून दाखवणे हे स्वतःस तत्वज्ञ म्हणणार्‍या अर्थशास्त्रातील प्राचार्याला शोभत नाही..

महात्मा गांधींनी त्या काळच्या हिंदू राजकारणाच्या मागण्या मान्य न केल्यामुळे त्यांचा खून ज्यांनी केला होता, ते नथुराम गोडसे सावरकरांचे शिष्य होते.

नथूराम हा हिंदू महासभेत होता याचा अर्थ तो काही सावरकरांचा शिष्य होता असे म्हणणे हे दिशाभूल करणारेच आहे. तो काही शिष्य असल्याचा कुठलाच पुरावा नाही. त्या अर्थाने आधी म्हणल्याप्रमाणे सोमनाथ चॅटर्जी आणि त्यांचे वडील देखील सावरकरांचे शिष्य होतात. "Guilt by association" हा अशा लोकांचा लाडका प्रकार आहे फक्त तो सोयीने वापरतात इतकेच...

वैचारीक विरोध असणे हे मला मान्य आहे. पण त्यात आपणच बरोबर हे दाखवण्याची धडपड करताना स्वतःच्या इतर क्षेत्रात मिळालेल्या नावाचा गैर्वापर दुसर्‍याच क्षेरात करून लोकांची दिशाभूल करणे हे धादांत चूक वाटते. (या संदर्भात मधे एका भारतातील कम्यूनिस्ट असलेल्या पण पर्यावरणावर समाजकार्य करणार्‍या माणसाशी भेट झाली होती. त्यांचे काम बरेच वर्षाचे आणि चांगले वाटले. भेटीत नद्या जोडण्याच्या प्रकल्पाचा विषय निघाला. आमचा दोघांचाही त्यास विरोध होता हे समजले आणि बरे वाटले. पण तत्कालीन राष्ट्रपती अब्दूल कलाम यांचा मात्र त्याला जोरदार पाठींबा होता. त्यावर हे गृहस्थ अगदी साध्य शब्दात बोलले: "जर आम्ही रॉकेट सायन्सबद्दल बोललो तर कलामांना चालेल का? तर मग हे कशाला आमच्या क्षेत्रात बोलतात आणि स्वतःचे वैज्ञानीक श्रेष्ठत्व चुकीच्या ठिकाणी वापरतात?" मला हाच प्रश्न सेन यांच्या बद्दल पडतो...)

 
^ वर