नववर्षाचा निश्चय (सीरीयसली)

खरे तर "नववर्षाचा निश्चय" हा हसण्यावारी नेण्याचा विषय झाला आहे. या लेखाचा तसा उद्देश नाही.

प्रत्येक माणूसआयुष्यांत स्वतःच्या व्यक्तिमत्वांत सकारात्मक बदल व्हावा या उद्देशाने मधूनमधून त्याच्या दृष्टीने चांगल्या नसलेल्या संवयी घालवण्यासाठी व चांगल्या संवयी अंगी बाणवण्यासाठी निश्चय करीत असतो. तो अमलांत आणण्यासाठी बहुतेकजण १ जानेवारीचा मुहूर्त ठरवतात. हा नववर्षाचा निश्चय. तो केल्यापासून १ जानेवारीपर्यंतचा काळ नवीन निश्चयामुळे आपल्यांत कसा बदल होईल, सगळे आयुष्य कसे आदर्श, आखीव रेखीव होईल व चारचौघांत आपली प्रतिमा कशी उंचावेल याबाबतच्या स्वप्नरंजनांत फार छान जातो.

माणसे आपला निश्चय ताबडतोब अमलांत न आणता नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापर्यंत का थांबतात? बहुधा त्यांना निश्चय अमलांत आणण्यात आपण किती यशस्वी झालो याचे मोजमाप हवे असावे. एक जानेवारीपासून सुरवात केल्यास ते दिवसांच्या संख्येत मोजणे सुलभ होते.

मात्र बहुतेकांच्या बाबतींत एकतर मुहूर्त चुकतो किंवा सुरवातीच्या काळांत खंड पडतो. मग त्या निश्चयाचे काय होते ते सर्वांना ठाऊक आहे. परिणामतः नववर्षाचा निश्चय अमलांत आणणे ही गोष्ट अशक्य कोटींतील वाटू लागते.

पण आपल्याला यांत यशस्वी व्हायचे असेल तर एक गोष्ट लक्षांत घेतली पाहिजे; ती म्हणजे ज्या वागणुकीला सातत्य असते ती बदलणे कठीण असते. त्यांत जाणून बुजून बदल करण्याचा प्रयत्न केल्यास नकळत ती पुन्हा मूळपदावर येते. नवीन संवयीला साहजिकच सातत्याचे पाठबळ नसते. त्यामुळे ती स्थिरावत नाही. मग आपण बदलू शकत नाही अशी भावना निर्माण होते. याचा अर्थ नवीन संवय लावून घेण्यांत सुरवातीला अपयश अपरिहार्य असते. पण अपयशाने निराश न होता पुन्हा पुन्हा प्रयत्न करीत राहिल्यास नवीन दिशेंतील सातत्य निर्माण होते. यासाठी संक्रमणकाळांत यश अपयशाच्या चक्रांतून जावे लागते. संक्रमणासाठी काही कालावधीची तरतूद केल्यास निश्चयाप्रमाणे ठरलेल्या तारखेपासून स्वतःत बदल करणे शक्य होईल.

समजा तुम्ही १ जानेवारीपासून संवय बदलण्याचा निश्चय केला असेल तर त्या अगोदरचा डिसेंबर महिना हा संक्रमणकाल म्हणून राखून ठेवावा. एक डिसेंबर पासून निश्चय अमलांत आणायला सुरवात करावी. त्यांत पुन्हा पुन्हा प्रयत्न करीत राहिल्यास खंड पडण्याचे प्रसंग कमीकमी होत जातील व नवीन संवयीचे सातत्य निर्माण होईल. एक जानेवारीनंतर यशाचे मोजमाप सुरू होईल व आपली इच्छाशक्ति अधिकाधिक अनुभवण्याची इच्छा आपल्याला खंड पडू नये म्हणून जागरुक ठेवील. नवीन संवय स्थिरावल्याचे लक्षण म्हणजे तिच्याप्रमाणे वागण्यांत काही कारणाने खंड पडल्यास आपण पुन्हा स्थिरावलेल्या (नवीन) संवयीप्रमाणेच वागतो.

नवीन निश्चयासाठी एक जानेवारीचाच मुहूर्त घ्यायला पाहिजे असे नाही. आपण १ एप्रिल, १ जुलै, १ ऑक्टोबर, १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, स्वतःची जन्मतारीख, लग्नाची तारीख यापैकी सुद्धा एखादा मुहूर्त घेऊ शकतो. मात्र त्या अगोदरचा एक महिना संक्रमणकाल म्हणून राखून ठेवायला विसरू नये.

लेखनविषय: दुवे:

Comments

आमचा संकल्प !

आमचा संकल्प अजून ठरलेला नाही ! काय संकल्प करावा याच्यावर चिंतन चालू आहे ! :)

कोर्डे साहेब, गेली दोन दिवस झाले. एकाची हिम्मत होत नाही संकल्प करायची, कमीत कमी लिहायची हिम्मत तरी करायला पाहिजे होती कोणी तरी ! (सिरीयसली म्हटल्यामुळे उपक्रमींची पंचायत झाली असावी ) पण, कोर्डेसाहेब......मनातले सांगतो ! असे सांगून सवरुन संकल्प पुर्ण होत असतील यावर काही आपला विश्वास नाही बॊ !
किंवा उपक्रमींना वाटत असेल केला संकल्प आणि नाही पुर्ण झाला तर ! म्हणून कोणी लिहीत नसावे ! ;) अरे, पण विचारणार आहे का कोणी ? पुढे काय झाले त्या केलेल्या संकल्पाचे ! तो संकल्प आपल्या चांगल्यासाठीच असेल ना ! (संकल्प हे चांगलेच असतात असे आमचे ढोबळ मत आहे )
बाकी आपला चर्चा प्रस्ताव आवडला ! आमचा तात्पुरता संकल्प आहे, तो असा की, प्रवास करतांना मराठी दैनिके विकत घेऊन वाचायचे आणि कोणत्याही सहप्रवाशाला त्यातले एकही पान वाचायला द्यायचे नाही ! आणि आपणही कोणाला एकसुद्धा पान मागायचे नाही !
(कसा वाटला आमचा संकल्प )

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मोडला बघा

२ तारखेच्या ह्या चर्चाप्रस्तावाला कोणीच काही लिहले नाही, जाउ द्या आपण पण नको लिहायला, हा केलेला संकल्प, प्रा. डॉं.चा प्रतिसाद वाचून मोडला बघा!!

कोर्डेसाहेब तुम्ही म्हणता ते खरे आहे पण शेवटी प्रत्येकजण त्याला हवे तेच, हवे तेव्हाच करतो बघा.. :-)

धन्यवाद.

प्रतिसादांबद्दल धन्यवाद. आपला लेख बोजड व कंटाळवाणा होत आहे हे मला जाणवत होते. भावबंधन नाटकांत योगवशिष्ठ ग्रंथाचे वर्णन आहे तसा. त्यांत म्हंटल्याप्रमाणे माझा लेख वाचून दुर्घटना झाल्या नसाव्यात अशी आशा आहे. तशा प्रतिक्रियांसाठी मनाची तयारीही केली होती. तरीही वाचन संख्या शतकाकडे वाटचाल करीत आहे. (हेही नसे थोडके).

साधारणपणे माझ्या लिखाणावर एक दोन दिवस एकही प्रतिसाद आला नाही तर मीच अधिक स्पष्टीकरण देण्याच्या किंवा दुसर्‍या काही मिषाने काहीतरी लिहून प्रतिसादांचा भोपळा फोडतो. पण या वेळेस ठरवले नाही प्रतिसाद आले तरी बेहत्तर पण आपणच पहिल्यांदा काहीही लिहायचे नाही. असला आपला एखादा लेख प्रतिसादाशिवाय म्हणून काय बिघडले?

आपल्या प्रतिसादांमुळे सुदैवाने तशी पाळी आली नाही.

 
^ वर