जनुकांचा शोध आणि आर्थिक फायदा

काल (सप्टेंबर २९, २००७ रोजी) अमेरिकेच्या राष्ट्रीय हृदय/फुप्फुस/रक्त आरोग्य संस्थानाच्या निदेशिका डॉ. एलिझाबेथ नेबल यांचे इथे बॉल्टिमोरमध्ये भाषण ऐकले.
थोडी पार्श्वभूमी : अमेरिकेचे केंद्र सरकार अशा संस्थानांच्या मार्फत संशोधनाला पैसे पुरवते. डॉ. नेबेल यांच्या हाताखाली संस्थान वार्षिक ३ अरब (बिलियन) डॉलर पेक्षा अधिक ची व्यवस्था लागते, (साधारण या घरात महाराष्ट्र शासनाचे २००६-२००७ चे 'टोटल प्लॅन एक्स्पेंडिचर' आहे, त्यामुळे ही रक्कम मोठी आहे हे लक्षात यावे.)

गेल्या दोन वर्षांत संस्थान हृद्रोगांशी संबंधित जनुके कुठली असे संशोधन व्हावे, म्हणून मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करत आहे, त्याची तपशीलवार माहिती डॉ. नेबल यांनी दिली. त्यांनी या गोष्टीवर जोर दिला, की ही माहिती (म्हणजे अगदी संशोधनाचा मूळ विदा [डेटाबेस] ही) मुक्त उपलब्ध व्हावी. कारण केवळ जनुकांचा रोगाशी संबंध कळला म्हणून कोणाचे आरोग्य सुधारत नाही. ती माहिती पाया म्हणून वापरून कोणी औषधे, किंवा यंत्रे निर्माण केली, आणि ती वापरून रोगांचा प्रतिबंध झाला, किंवा उपचार झाला, तर कर भरणार्‍या जनतेला संशोधनात केलेल्या प्रचंड गुंतवणुकीचा फायदा मिळेल.

आमच्या येथील मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. वाइसफेल्ड यांनी एक प्रश्न विचारला - ही औषधे किंवा यंत्रे निर्माण करतील त्या बहुतेक खाजगी कंपन्या असतील. त्यांनी केलेल्या निर्मितीचा त्यांना फायदा व्हावा हे रास्तच आहे. पण जनतेने गुंतवलेल्या पैशांचा ते अप्रत्यक्ष लाभ उठवत असणार, कारण मूलभूत संशोधनाचा विदा हाताशी असल्याशिवाय, त्यांना पुढचे पाऊल टाकता आलेच नसते. तरी त्या औषधांची, यंत्रांची पूर्णच्या पूर्ण बौद्धिक मालमत्ता त्या खाजगी कंपनीच्या हातात असणार - कायद्याची वेगळी काही तरतूदच नाही. स्तनाच्या कर्करोगाबाबत, बीआरसीए१ जनुकाचा संबंध सरकारी पैशातून लागला. पण त्या शोधामुळे विकसित केलेल्या औषधाची/टेस्टची किंमत अवाच्यासवा आहे. मग जनतेला गुंतवणुकीचा पर्याप्त फायदा झाला का? जनतेची गुंतवणूक आणि खाजगी गुंतवणूक दोघांनी फायदा जसे योगदान तसे वाटून घेतला पाहिजे. तर याबाबत सरकारचे धोरण काय?

डॉ. नेबल म्हणाल्या, "थोडक्यात - माझ्यापाशी उत्तर नाही!" पण सुरुवातीला, जितके शक्य तितके, मूळ शोधाला कोणाची खाजगी बौद्धिक "मालमत्ता" होऊ देणार नाही अशी कायद्याची तरतूद त्यांनी सांगितली. पण पुढे यातून भर घालून उत्पन्न होणार्‍या खाजगी बौद्धिक मालमत्तेत/आर्थिक फायद्यात जनतेचा कितपत वाटा आहे, याबाबत सरकारात खूप खोलात विचार चालू आहे, पण अजून निष्कर्ष काही नाही.

येथे खाजगी उद्यमाची कुचंबणा न होता जनतेला या प्रचंड गुंतवणुकीच्या बदल्यात योग्य प्रमाणात मिळकत (=स्वस्त उपचार) व्हायला पाहिजे. पण "योग्य प्रमाण" म्हणजे काय? तर उपक्रमासाठी चर्चेचा विषय, हा भारतासाठीही लागू व्हावा. सरकारी पैशाने जर ज्ञानाची वाढ झाली, तर त्यातून भर घालून फळणार्‍या खाजगी बौद्धिक मालमत्तेत जनतेचा वाटा किती? हे कसे ठरवावे?

Comments

महत्त्वाचा प्रश्न

धनंजयराव,

तुम्ही महत्त्वाचा प्रश्न उचलला आहे. ज्या संशोधनात शसनाचा पर्यायाने जनतेचा पैसा वापरला गेला आहे त्याचा आयता वापर करून होणारी नफेखोरी चीड आणणारी आहे आणि ती रोखणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. नुसते रोखणेच नाही तर असे कृत्य करणार्‍यांना यथायोग्य शासनही झाले पाहिजे. कायदेशीर दृष्टीने पाहता अश्या 'सार्वजनिक' पैश्यातून झालेल्या संशोधनावर आधारित औषधे, उपचार पद्धती इत्यादींवर बौद्धिक संपदा अधिकाराची मर्यादा राहू नये, असे केल्यास स्पर्धेमुळे किंमती सर्वसामान्य जनतेला परवडण्यासारख्या राखता येतील.

आपला
(कर्तव्यकठोर) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"

नफेखोरी वाईटच पण भागीदारीचा प्रश्न

स्वतः काही न करता दुसर्‍याच्या (सार्वजनिक) पैशाने केलेला शोध विकणे म्हणजे चोरी आहे हे मान्य. त्याला आळा घालायला हल्लीचा पॅटंट कायदा (नीट वापरला तर) पुरेसा असावा.

पण इथे आपण विचार करत आहोत की खाजगी उद्यमाने सार्वजनिक ज्ञानात भर पडते आहे, अशी स्थिती आहे. म्हणजे कोणाचेच कोणावाचून चालत नाही. सार्वजनिक ज्ञान कॅप्सूलमध्ये भरून खाता येत नाही, ज्ञानात तंत्राची भर घालून खाजगी उद्योग ती कॅप्सूल बनवतो. पण मूलभूत ज्ञानाशिवाय कारखान्यातले तंत्रज्ञान विकसित झालेच नसते.

तर इथे भागीदारांमध्ये न्याय्य वाटणीचा प्रश्न आहे - उघड उघड चोरीचा नव्हे.

भागीदारी

धनंजय महोदय,

त्याला आळा घालायला हल्लीचा पॅटंट कायदा (नीट वापरला तर) पुरेसा असावा

डॉ. नेबल म्हणतात तसे हे संशोधन "मुक्त उपलब्ध" केल्यास बौद्धिक संपदा, पेटंट सारखे कायदे कसे लावता येतील बरे?

संशोधन, उत्पादन, जाहिरात, विक्री वगैरे खर्च आणि योग्य प्रमाणात नफा या सूत्रावर जर अश्या कंपन्या व्यवहार करत असतील तर कोणी त्यांना नावे ठेवण्याचा प्रश्नच नाही. इथे महत्त्वाचा मुद्दा असा की "योग्य प्रमाणात" म्हणजे नेमका किती फायदा? मी तर म्हणेन की कमीतकमी शक्य असेल तितका. हे नेमके ठरवणे कठीण असेल तर कंपन्यांना शासकीय संशोधन वापरण्यासाठी काही मूल्य भरावे लागावे आणि शासनाने हा पैसा पुन्हा संशोधनात गुंतवावा असे करता येईल काय?

आपला
(सूचक) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"

मुक्त संपदा आणि पॅटंट

> डॉ. नेबल म्हणतात तसे हे संशोधन "मुक्त उपलब्ध" केल्यास बौद्धिक संपदा,
> पेटंट सारखे कायदे कसे लावता येतील बरे?

मुक्त उपलब्ध ज्ञानावर कोणी व्यक्ती पॅटंट काढू शकत नाही, असा कायदा. उत्पादन सुरू करण्यापूर्वी उद्योजक बहुधा पॅटंट काढतात, नाही काढला तर दुसरा कोणी उद्योजक तीच वस्तू उत्पादन करून विकू लागेल. एखादा लबाड उद्योजक मुक्त ज्ञान "आपले नवीन ज्ञान" आहे असे भासवून पॅटंट काढू शकतो. पण कायद्याची योग्य अंमलबजावणी झाली तर असे पॅटंट खारीज होतील. असे माझे म्हणणे होते.
कायदेशीर वागणुकीच्या उद्योजकाने नवीन तंत्रज्ञान विकसित केले तर त्याचे पॅटंट उद्योजकाला मिळते - ते नवीन ज्ञान आहे हे मान्य पण ते सार्वजनिक ज्ञानावर चढलेले व्याज आहे असे कुठेच नमूद होत नाही. मग पॅटंट कायदा इथे जनतेचे कर्ज फेडायला उपयोगी पडत नाही.

> हे नेमके ठरवणे कठीण असेल तर कंपन्यांना शासकीय संशोधन वापरण्यासाठी
> काही मूल्य भरावे लागावे आणि शासनाने हा पैसा पुन्हा संशोधनात गुंतवावा
> असे करता येईल काय?
असा काहीतरी विचार केला जाऊ शकतो, असे वाटते. पण तपशिलांत तक्षकदंश! (डेव्हिल इन् डीटेल्सचा अनुवाद!) मूलभूत ज्ञानाची किंमत काय? त्याचा नेमका किती अंश वापरला आणि उद्योजकाने आपले हुन्नर किती वापरले? असे प्रश्न सोडवावे लागतील.

पण ते सोडा - मुद्द्याचे उत्तर तुम्ही विचार करता तसेच कुठले असू शकेल, वाटते.

स्मॉल बिजनेस

ते नवीन ज्ञान आहे हे मान्य पण ते सार्वजनिक ज्ञानावर चढलेले व्याज आहे असे कुठेच नमूद होत नाही. मग पॅटंट कायदा इथे जनतेचे कर्ज फेडायला उपयोगी पडत नाही.

तुमचे मुद्दे खूपच विचार करायला लावणारे आहेत.

स्मॉल बिजनेस इन्नोवेशन रीसर्च SBIR किंवा STTR माहिती असेलच. तेही काहीसे असेच. शेवटी हा पैसा जनतेकडून येतो. त्याचा फायदा कुणाला कसा होतो हे कसे मोजत असतील कोण जाणे.. पण असे म्हणायचे की मुले शिकतात, युनिवर्सिटीज मोठ्या होतात, त्यांचे व्यावसायिक क्षेत्राशी आदानप्रदान वाढते आणि त्यांच्याकडचे उच्च तंत्रज्ञान हे लोकांपर्यंत पोचायला मदत होते.

छान कल्पना

तर कंपन्यांना शासकीय संशोधन वापरण्यासाठी काही मूल्य भरावे लागावे आणि शासनाने हा पैसा पुन्हा संशोधनात गुंतवावा असे करता येईल काय?

मस्त कल्पना आहे. आपल्याला लइ आवडली
जसं दारू बंद होऊच शकत नाही मग ती कायदेशीर करून सरकारने उत्पन्न का वाढवू नये?

ठीकच तर आहे!

तर कंपन्यांना शासकीय संशोधन वापरण्यासाठी काही मूल्य भरावे लागावे आणि शासनाने हा पैसा पुन्हा संशोधनात गुंतवावा असे करता येईल काय?
हा मार्ग ठीकच वाटतो आहे मला तरी.
पण यासाठी त्या मुल्याचा थेट संबंध कंपनीच्या नफ्याशी असावा.
यात पुढे विवीध पळवाटा येतीलच! :)
पण मारग योग्य वाटतो आहे.

आपला
गुंडोपंत

संमांतर

धनंजयराव,

आपले मुद्दे/चर्चा विषय फारच चांगले असतात. हा विषय सुद्धा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा आहे. यालाच संमांतर एका विषयावर भारतातही सध्या खल चालू आहे. तो म्हणजे सरकारी पैशांनी शिकून परदेशात जाऊन केवळ स्वत।साठी पैसे कमावणार्‍यांचा. बर्‍याच प्रगत देशांत सरकारे केवळ प्राथमिक (जास्तीत जास्त माध्यमिक) शिक्षणासाठी जनतेचा पैसा वापरतात. आपल्याकडे मात्र स्वातंत्र्यापासून सरकारने उच्चशिक्षणासाठी मोठी गुंतवणुक करून अद्यायावत सुविधा उपलब्ध करून देण्यापेक्षा जवळपास फुकटात शिक्षण दिले. मात्र हे फुकटात शिक्षण घेणारे परदेशांत निघून गेल्याने सरकारला अपेक्षित असणारे तांत्रिक (टेक्नोक्रॅट) नेतृत्व देशाला फारसे लाभले नाही. असे जनतेच्या पैशाने फुकटात शिक्षण देणे सरकारने बंद करावे असा एक सूर निघत आहे. तसेच हे शिक्षण बंद केल्याने काही प्रश्न सुद्धा निर्माण होणारे आहेत. आपली चर्चा सुद्धा याच दिशेने जात आहे म्हणून हा विषय येथे काढला.

आपला,
(सामान्य-जन) भास्कर

आहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,
महाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥

समांतर तरी तो विषय फार मोठा आहे

मति-निर्गती (ब्रेन-ड्रेन) हा समांतर विषय आहे, हे पटले. पण त्या विषयाचे विश्लेषण बहुधा वेगळ्या अंगाने होईल.

इथे केवळ बौद्धिक मालमत्ता, गुंतवणूक, वगैरे व्यापारी नैतिक तत्त्वे वापरली तर काम भागू शकेल. तिथे व्यक्तिस्वातंत्र्य हा मुद्दाही गंभीरपणे विचारात घ्यावा लागेल.

माझे (सैन्याने चालवलेले) कॉलेज प्रवेश देताना विद्यार्थ्याकडून बंधनपत्र (बाँड) लिहून घेत असे, की सैन्यात भरती होणार नाही तर दिवसाला इतका (कमाल मर्यादेपर्यंत) दंड/शुल्क भरेन. हा दंड/शुल्क सगळा मिळून सामान्य कॅपिटेशन कॉलेजइतका होता. अशा प्रकारे सरकारची गुंतवणूक वसूल करणे माझ्या मते न्याय्य होते. अशा प्रकारे सरकारची गुंतवणूक आर्थिक देवाणघेवाणीच्या नैतिकतेत बद्ध होते, आणि व्यक्तिस्वातंत्र्याचे उल्लंघन होण्याचा प्रश्न राहात नाही.

या बंधनपत्राचाच सौम्य प्रकार (दोन वर्षे सरकारी ग्रामीण दवाखान्यात सेवा, असे बंधन) महाराष्ट्र सरकारने सरकारी मेडिकल कॉलेजांसाठी लागू केला होता. पण कित्येक वर्षे त्याची अंमलबजावणी केली नाही (म्हणजे कर्मचार्‍याला लाच चारली की पुरायचे म्हणे). पुढे १९९५च्या आसपासची काही वर्षे थोरामोठ्यांची औलाद सोडली तर कडक अंमलबजावणी होऊ लागली (ही -०- च्या पुढे अचाट प्रगतीच!) आणि मुंबई-पुण्यातले तरुण डॉक्टर खेड्यापाड्यांत सरकारी नोकरीवर दोन-दोन वर्षांसाठी दिसू लागले. पण थोड्याच वर्षांत हे बंद पडले - कारण हे बंधनपत्र अमुक इतक्या विद्यार्थ्यांनी दिलेले असून एवढ्या सगळ्या डॉक्टरांना पगार देण्यासाठी सरकारने अंदाजपत्रकांत तरतूदच केली नव्हती म्हणे!

तुम्ही म्हणता तो विषय महत्त्वाचा आहे. पण त्याच्यासाठी वेगळे चर्चासत्र आखूया असे म्हणतो.

असे

दोन खात्यांचा एकमेकांशी संबंधच नसणे असे भारतात घडतेच.
त्यात काही विषेश नाही, हे तर आम्ही पावलो-पावलीच पाहतो.
जोवर संगणकाचा वापर योग्यप्रकारे होत नाहीये तोवर हे घडतच राहील हे ही खरे.

पण वर उल्लेखलेली प्रक्रिया अमेरिकेतली आहे, तेंव्हा तुम्ही एखादे विकसित राष्ट्रातले उदाहरण द्या ना!
आपला
गुंडोपंत

अवघड

प्रश्न महत्वाचा आणि अवघड आहे. वर सुचवल्याप्रमणे जर कंपन्यांनी या माहितीचा उपयोग औषधे बनवण्यासाठी केला तर त्यांच्याकडून काही ठराविक मूल्य घेता येईल. (अर्थात यातील बारकावे ठरवावे लागतील.) हा पैसा परत या संशोधनात गुंतवून वापरता येईल. मानवी जनुकाचा नकाशा बनवताना हा सर्वांसाठी खुला असावा की नाही यावर वाद झाले होते. आत्ता याची परिस्थिती काय आहे कल्पना नाही.
या बाबतीत जीएनयूच्या जनरल पब्लिक लायसेन्स ची कल्पना आठवते. अर्थात या बाबतीत असे काही करणे अवघड आहे कारण औषध तयार करण्यात कंपन्यांना बरेच पैसे, यंत्रणा आणि सामग्री यांची आवश्यकता असते.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

इन्फ्रास्ट्रक्चर - कुठे किती सरकारी पैसे वापरावे म्हणून हिशोब

सरकारला अनेक ठिकाणी पायाभूत सुविधा वाढवता येतात, आणि कितीही नासाडी करणारे विधिमंडळ असले तरी अंदाजपत्रक शेवटी मर्यादितच असते.

रस्ते बांधणी, अवकाशयाने, सैन्य, वैद्यकीय संशोधन..., इ.इ. सर्वांना त्या मर्यादेत एकमेकांना सावरून (किंवा स्पर्धा करून) पैसे पुरवून घ्यावे लागतात. त्यात कुठेतरी करदाता विचारू शकतो (म्हणजे त्याने विचारावे, नाहीतर वायफळ खर्च वाढतील) की अमुक ठिकाणून पैसे कमी करून तमुक ठिकाणी वाढवावे का? म्हणून करदात्याच्या फायद्याचा प्रश्न उभा होतो.

"जनतेचा फायदा" हा विचार इन्फ्रास्ट्रक्चरबाबत पुष्कळदा केला जातो. अलास्कामध्ये एक "ब्रिज टु नोव्हेअर" नावाचा प्रकल्प आहे. हा पूल बांधला तर फार कमी लोकांची रहदारी सुलभ=स्वस्त होईल. म्हणून बाकीच्या करदात्यांना हा प्रकल्प आवडत नाही.

इन्फ्रास्ट्रक्चर पुलाचे वेगवेगळ्या लोकांकडून वेगवेगळे शुल्क अमेरिकेत घेतात, याचेही उदाहरण घ्या. शिवाय अनेक राज्यात राज्याच्या रहिवाशांसाठी (म्हणजे करदात्यांसाठी) विद्यापीठात फी कमी घेतात.

लोकशाहीत आपल्या सरकारने पुरा केलेला प्रकल्प खर्चाच्या मानाने लायकीचा होता की नाही त्याचा जाब हिशोबासकट करदात्याने विचारलाच पाहिजे - नाहीतर सरकार वाटेल त्या खिसेभरू प्रकल्पांवर राष्ट्राचे धन वाया घालवेल. अतिरेकी उदाहरण असे : सरकारने पायाभूत सुविधा म्हणून एक बँक उभारावी. मी उद्योजक म्हणून त्या बँकेच्या किल्लीचा शोध लावावा, आणि आतील धन माझे एकट्याचे म्हणावे. या इन्फ्रास्ट्रक्चरमुळे बहुतेक जनतेचा फायदा होत नाही, म्हणून अशा प्रकारची बँक उभारू नये, असे माझे मत आहे.

वाटल्यास तुम्ही माझा प्रश्न असा वाचून उत्तर द्या. करदात्याने (त्याच्या विधायकाकरवी) डॉ. नेबल यांना प्रश्न विचारला की "तुमच्या तीन बिलियन डॉलर पैकी तुमच्या हृदय संस्थानाऐवजी एक बिलियन कॅन्सर संस्थानाला (किंवा रस्ता बांधणीला) का देऊ नये? आर्थिक हिशोब मांडा!" त्याला डॉ. नेबल यांनी कुठल्या प्रकारे उत्तर द्यावे?

जाब विचारणारे सरकारच असते!

या वर्षी अमुक इतके पैसे या किंवा त्या संस्थानाला अंदाजपत्रकात देताना त्या त्या संस्थानाच्या प्रमुखांना विधिमंडळापुढे (काँग्रेसपुढे) निवेदन द्यावे लागते. त्या निवेदनावरून (शिवाय बाहेरच्यांच्या लॉबी केल्यामुळे) वार्षिक अंदाजपत्रकात तरतूद होते.

त्यामुळे त्या सिनेटरला किंवा खासदाराला "तुम्ही जाब दुसर्‍या कोणाला विचारा" म्हणायची सोयच नसते! कारण सरकारचा प्रश्न हा असतो की या ठिकाणी आम्ही संस्थानात पैसे का गुंतवावे. लोकशाहीत सरकारचा म्हणजे पर्यायाने आपलाच (लोकांचा किंवा करदात्याचाच) प्रश्न असतो.

हा महत्त्वाचा मुद्दा सोडा, पण लोकशाहीत हिशोब मागणार्‍या लोकांना "सरकारला विचारा" असा निर्देश करणे राजकीय दृष्टीने धोकादायक असते, आणि तात्त्विक दृष्टीने चुकीचेही असते. कारण सरकार=प्रातिनिधिकरूपाने लोक हे तात्त्विक समीकरण मान्य करावे तरच ठीक.

संस्थान म्हणजे सरकारी विभाग

आरोग्य आणि मानव्य सेवा विभाग (हेल्थ अँड ह्यूमन सर्विसेस् डेपार्टमेंट) च्या खाली राष्ट्रीय आरोग्य संस्थाने (नॅशनल इन्स्टिट्यूट्स् ऑफ हेल्थ) येतात. पैकी एक आहे राष्ट्रीय हृदय/फुप्फुस/रक्त संस्थान (हार्ट लंग अँड ब्लड इन्स्टिट्यूट) हा एक सरकारी विभाग आहे.
या सरकारी विभागाकडे माझ्यासारखे वैज्ञानिक अर्ज करतात, आणि त्यावर विचारविनिमय होऊन अर्ज स्वीकार किंवा अस्वीकार केला जातो.

त्याच्या हल्लीच्या प्रमुख = निदेशक (डायरेक्टर) म्हणजे डॉ. नेबल. या सरकारी नोकर आहेत. या बाबतीत सरकारने त्यांना तांत्रिक मुख्य म्हणून नेमले आहे. साधारण खासदार सर्व तांत्रिक बाबतीत ज्ञानी असतील अशी आपेक्षा करणे चूक आहे. पण खासदार प्रायॉरिटीज् ठरवणार ते तांत्रिक विशिषज्ञांच्या मदतीने, अशी अपेक्षा आहे. डॉ. नेबल हृद्रोगाच्या संशोधनाची कितपत मागणी/गरज आहे अशा प्रकारचा विशेषज्ञ सल्ला खासदारांना देतात, आणि अर्थात आपल्या बाजूने मागणी करतात (अशाच प्रकारे सगळे विभागप्रमुख करतात). त्यांच्या विभागाची हल्लीची मागणी साधारणपणे तीन बिलयनच्या घरात आहे. पण तांत्रिक सल्ला देताना जर त्यांनी खासदारांना जनतेला होणार्‍या नफ्यातोट्याची माहिती दिली तर प्राथमिकता (प्रायॉरिटीज्) ठरवायला खासदारांना सोयीचे जावे. यांनी एका मापदंडाची आकडेवारी न देता म्हणावे "हृद्रोग महत्त्वाचा आहे" दुसर्‍या विभागप्रमुखाने म्हणावे "कर्करोग महत्त्वाचा आहे" आणि तिसर्‍याने म्हणावे की "रस्ता बांधणे महत्त्वाचे आहे" तर तंत्रज्ञ नसलेल्या खासदाराला प्राथमिकतेची क्रमवार यादी लावण्यास काहीच सोय होत नाही. त्यामुळे तो क्रम लावण्यास (आपल्या विभागापुरतातरी) उपयोगी सल्ला देणे हे डॉ. नेबलचे कर्तव्य (जॉब डिस्क्रिप्शन) आहे. डॉ. नेबल या त्या विभागात टेक्नोक्रॅट पॉलिसी मेकर आहेत (असेच सर्व विभागांचे तांत्रिक विभागप्रमुख त्यांच्यात्यांच्या विभागात). अंदाजपत्रकात दिलेल्या रकमेतून संशोधनाची त्याची एकूण दिशा त्या ठरवू शकतात (म्हणजे "जनुके या विषयावर संशोधन व्हावे असे अर्ज जाहिरात करून मागवू, वगैरे") पण नेमके कुठले प्रकल्प निवडले जातील ते वैज्ञानिकांनी भविष्यात केलेल्या अर्जांवर अवलंबून आहे.
अर्थात् मागच्या वर्षी संस्थानाकरवी मान्य झालेल्या प्रकल्पांची यादी समोर असते, त्यावरून विभागप्रमुख या वर्षीची मागणी करतात. गेल्या काही वर्षांत विभागाकडून मान्य झालेल्या प्रकल्पातून जनतेला काही फायदा झाला असे पटवता आले, तर तशा प्रकारचे प्रकल्प पुढच्या वर्षी सरकारने त्यांच्या विभागास मान्य करण्याइतपत (किंवा अधिक) रक्कम द्यावी असा तांत्रिक सल्ला त्या खासदारांना सप्रमाण देऊ शकतात.
तुमच्या तीन बिलियनपैकी एक कॅन्सर विभागाला द्या असे कोणी डॉ. नेबल यांना सांगत नाहीत. पण मागच्या वर्षी तुम्हाला तीन बिलियन दिले त्याचा फायदा-तोटा नीट सांगितला नाही, आणि कॅन्सर विभागाने उत्तम सांगितला, तर पुढच्या वर्षी हृद्रोगसंशोधनासाठी कमी बजेट करू आणि कॅन्सरसाठी जास्त बजेट करू असा विचार खासदारांपुढे असणार. याचे उत्तर या सर्व तंत्रज्ञ विभागप्रमुखांनी द्यायचे असते, जेणेकरून तंत्रज्ञ नसलेला खासदार प्राथमिकतेची क्रमवार यादी लावू शकतो. त्यामुळे खासदार तांत्रिक दृष्टीचे जबाब डॉ. नेबल यांना विचारतात. डॉ. नेबल खासदारांना नव्हे.

गोंधळ दूर झाला की नाही ते सांगा. नाहीतर हे सांगा, की तुमच्या विषयात खासदार प्रायोरिटीज ठरवण्यासाठी काय निकष लावतात? तांत्रिक ज्ञान कसे मिळवतात? आणि मग त्याच्या समांतर मी स्पष्टीकरण देईन.

 
^ वर