संवादकला २ - शब्दसामर्थ्य आणि वाचन

भाषा कोणतीही असो, तिच्यातील प्रकटन प्रभावी व्हायचे असेल तर आपला शब्दसंग्रह मोठा असला पाहिजे. असे म्हणतात, की वयाच्या पंचविसाव्या वर्षापर्यंत तुमचा शब्दसंग्रह नव्वद टक्के संपृक्त / समृद्ध झालेला असतो. म्हणजे मग 'कॅच देम यंग' या न्यायाने शब्दसंग्रह वाढवण्याच्या दृष्टीने अगदी लहान वयापासून प्रशिक्षण देणे / घेणे आवश्यक आहे. नियमित वाचनाची सवय / आवड हे अर्थातच शब्दसंग्रह वाढवण्याचे सर्वात प्रभावी साधन आहे. घरातील लहान मुले ही घरातल्या प्रौढांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे घरात वाचनसंस्कृती असेल तर मुलांना आपोआप वाचनाची गोडी लागते. आपले आई-वडील रोज काहीतरी नवे वाचतात हे निरीक्षण मुलांना वाचनाची प्रेरणा देण्यास पुरेसे ठरते. मग वाचन हा त्या संपूर्ण कुटुंबाचा एक दैनंदिन व्यवहारातील घटक बनून जातो.

अगदी अपवादात्मक व्यक्ती सोडल्या तर जे लोक हा लेख वाचू शकतील त्यांना आपल्या मिळकतीमधील एक छोटा हिस्सा पुस्तके विकत घेण्यावर खर्च करणे कठीण असणार नाही. पुस्तकांच्या वाढत्या किमती वगैरेबाबत तक्रार करत न बसता जेवढी जमतील तेवढी पुस्तके विकत घेण्याची सवय आपण लावून घेतली पाहिजे. एकदा का खिशाला भोक पाडून पुस्तक विकत घेतले की मग ते आपोआपच काळजीपूर्वक वाचले / सांभाळले जाते. वैयक्तिक जीवनात अतिशय साधेपणाने राहिलेल्या पु. ल. आणि सुनीताबाईंनी 'आम्ही अजिबात हात आखडता न घेता खरेदी करतो ती फक्त पुस्तकांची' असे या जोडप्याविषयी आधीच असलेला डोंगराइतका आदर वाढवणारे वाक्य लिहिले आहे. जी. ए. कुलकर्णी यांच्याकडे त्यांनी स्वतः विकत घेतलेल्या साडेचार -पाच हजार (इंग्रजी) पुस्तकांची लायब्ररी होती, आणि नाईलाजांने धारवाड सोडून त्यांना पुण्यात यावे लागले त्या वेळी त्यांना ती पुस्तके (विनामूल्य!)स्वीकारणारे लोक मिळेनात, अशी एक दुर्दैवी कहाणी आहे. तर ते असो, पण पुस्तके वाचणे, शक्यतोवर विकत घेऊन वाचणे, हे सुजाण मराठी माणसाने आपल्या भाषेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करावे असे कर्तव्यच आहे, असे मला वाटते.

ज्या घरांत वाचनसंस्कृती नाही, आणि ज्यांना नवीन वाचायला सुरुवात करायची आहे, असे उत्साही लोक 'आम्ही आता काय वाचू?' असा काहीसा भाबडा प्रश्न घेऊन येतात. खरे सांगायचे तर अशा लोकांना 'तुम्ही ज्यात भेळ बांधून आणता त्या कागदापासून सुरुवात करा' असे सांगण्याचा मोह मला होतो. हे अगदी शब्दशः नसले तरी खरेच आहे. मराठी वाचनात इसाप -पंचतंत्रातून एकदा का माणूस सुटला, की मग तो आपापल्या वाचनवाटेने जायला मोकळा होतो. मग कुणी व. पु., पु. ल., दळवी या धोपटमार्गाने जातो, कुणी बाबुराव अर्नाळकर, एस. एम. काशीकर, गुरुनाथ नाईक (आणि क्वचित नजर चुकवून चंद्रकांत काकोडकरही), असा गुप्तहेरी पवित्रा घेतो, कुणी योगिनी जोगळेकर, गिरिजा कीर, सुमती क्षेत्रमाडे असा 'वामकुक्षीवाचक' होतो , कुणी सुहास शिरवळकर, बाबा कदम असा तद्दन जनता क्लास धरतो तर कुणी खानोलकर, माडखोलकर, माडगूळकर अशी अनवट वाट पकडतो. यात बरोबर-चूक असे काही नसते. काहीही वाचा, पण त्यातून तुम्ही थोडेसे तरी वाढत गेला पाहिजे, अशी चांगल्या वाचनाची एक ढोबळ व्याख्या करता येईल.

जी कथा मराठी वाचनाची, तीच इंग्रजीचीही. 'रीडर्स डायजेस्ट आणि होम्सकथा या तर चिरतरुण आहेतच, पण अमेरिकन बेस्टसेलर्सही त्यांना टीकाकारांनी कितीही दर्जाहीन म्हटले तरी अत्यंत चुरचुरीत आणि कमालीची मनोरंजक आहेत. जेफ्री आर्चरही तसाच. तिथून पुढे कुणी दोस्तोव्हस्कीच्या मार्गे जाईल, तर कुणी वुडहाऊसच्या. त्यातही गंमत बघा, 'वुडहाऊसची पुस्तके म्हातारी व्हायलाच तयार नाहीत' असे पु. ल. म्हणतात, तर 'वुडहाऊसचे एक पुस्तक वाचले की मला किमान सहा महिने त्याचे दुसरे पुस्तक हातातही धरवत नाही' असे जी. ए. म्हणून यात 'व्यासंग वाढवणे' वगैरे गटणेध्येय डोळ्यासमोर न ठेवता गवतात तोंड घालून चरत जाणार्‍या उंडग्या जनावराप्रमाणे वाचत जावे. प्रत्येकाला शेवटी आपापली वाट सापडतेच.

'इंग्रजी वाचताना शब्द समजत नाहीत, त्यामुळे वाचलेले कळत नाही' अशी एक सामान्य तक्रार असते. शेजारी शब्दकोष घेऊन अडलेले शब्द त्यात बघून, अर्थ टिपून वगैरे ठेवणारे नवशिके वाचक बघितले की मंत्रांचे अर्थ समजून घेऊन त्याप्रमाणे लग्नाचे विधी करणार्‍या ज्ञानप्रबोधिनी पद्धतीची आठवण येते. दोन्हीही तितकेच विनोदी प्रकार. जगात जशी दारुबंदी कुठेही, कधीही शंभर टक्के यशस्वी झालेली नाही, तशी ही शब्दसंग्रह वावण्याची पद्धतही. मला पटलेली पद्धत म्हणजे समजो वा न समजो, मुसंडी मारुन वाचत रहाणे. कधी ना कधी प्रकाश हा पडतोच.

एकदा शब्दांची बर्‍यापैकी ओळख झाली, की मग त्यांतली गंमत कळायला लागते. विविध भाषांमधले शब्द, त्यांतले साधर्म्य, विविध भाषांमधल्या लेखक - कवींनी एकमेकांपासून स्फूर्ती घेऊन एकाच किंवा एकसारख्या विचारांची वेगवेगळ्या भाषांमध्ये केलेली मांडणी अशा गमतीजमती दिसायला लागतात. आता हेच बघा: 'क्रोकोडॉइल टिअर्स' हा इंग्रजी, 'मगरमछके आंसू' हा हिंदी, 'नक्राश्रू' हा संस्कृत आणि 'मोसळेकण्णिरु' हा कानडी हे सगळे वाक्प्रचार / शब्द एकाच अर्थाचे आहेत. 'कॅट ऍंड माऊस प्ले', 'मांजराचा होतो खेळ आणि उंदराचा जातो जीव' आणि 'बेक्केग आटा इलिग प्राणसंकटा' हेही तसेच एक उदाहरण. एवढेच काय, पण अर्थाअर्थी संबंध नसलेल्या अरेबिक आणि गुजराथी भाषेतले नमस्कार-चमत्कार ('सलाम-वालेखुम - वालेखुम सलाम' आणि 'केम छे -शांति छे') साधारण एकाच अर्थाचे आहेत. एका कवीने दुसर्‍या भाषेतील कवीपासून एखादी कल्पना उसनी - चोरुन नव्हे- घेऊन त्यावर स्वतंत्र बांधकाम केल्याची उदाहरणेही वाचतांना गंमत वाटते. "टू अ स्कायलार्क' या कवितेतले उदाहरण मी यापूर्वी दिले होते. शेलीच्या या कल्पनेचा शांताबाईनी मराठीत आणि शैलेंद्रने हिंदीत काय सुरेख विस्तार केला आहे! ( 'शेली -शांताबाई - शैलेंद्र' हा अनुप्रासही गमतीदार!) रॉबर्ट फ्रॉस्टच्या 'दी रोड नॉट टेकन' मधली 'टू रोडस डायव्हर्जड इन अ वुड ऍंड आय, आय टुक दी वन लेस ट्रॅव्हल्ड बाय, ऍंड दॅट हॅज मेड ऑल दी डिफरन्स' ही कल्पना आणि हरिवंशराय बच्चन यांची ' जीवन की आपाधापी में , कब वक्त मिला, कुछ देर, कहीं पर बैठ, कभी यह सोच सकूं, जो किया, कहा, माना, उसमें क्या बुरा भला' यातले साधर्म्य असेच गमतीदार, आणि दोघांविषयीचा आदर वाढवणारे. 'दिल ढूंढता है फिर वही फुर्सत के रात दिन' यातला गालिबचा अस्सल जोरदार मुखडा आणि त्यावर गुलजार यांनी विणलेले तितकेच काव्यमय अंतरे अशी गंमत कळायला लागते. शब्दसंग्रह वाढवायचा म्हणून वाचन अशी ती सर्कस न रहाता, वाचायला आवडते म्हणून वाचन, त्यातून शब्दसंग्रह वाढतो, हा त्यावर मिळालेला बोनस असे सगळे आनंदीआनंद होऊन जाते!

लेखनविषय: दुवे:

Comments

अभिजात संगीत...

काहीही वाचा, पण त्यातून तुम्ही थोडेसे तरी वाढत गेला पाहिजे, अशी चांगल्या वाचनाची एक ढोबळ व्याख्या करता येईल.

सहमत आहे...

रावसाहेब, लेख चांगला झाला आहे.

एकदा शब्दांची बर्‍यापैकी ओळख झाली, की मग त्यांतली गंमत कळायला लागते. विविध भाषांमधले शब्द, त्यांतले साधर्म्य, विविध भाषांमधल्या लेखक - कवींनी एकमेकांपासून स्फूर्ती घेऊन एकाच किंवा एकसारख्या विचारांची वेगवेगळ्या भाषांमध्ये केलेली मांडणी अशा गमतीजमती दिसायला लागतात.

अभिजात संगीतालाही नेमके हेच विचार लागू होतात. ते खालीलप्रमाणे --

एकदा स्वरांशी बर्‍यापैकी ओळख झाली, की मग त्यांतली गंमत कळायला लागते. विविध रागांमधले स्वर, त्यांचे स्वभाव, त्यातले साधर्म्य, विविध घराण्यांमधल्या गायकांनी एकमेकांचं ऐकून, एकमेकांकडून शिकून एकाच किंवा एकसारख्या विचारांची वेगवेगळ्या स्वरांमध्ये, रागांमध्ये केलेली मांडणी अशा गमतीजमती दिसायला लागतात.

वाचन जसं माणसाला बहुश्रुत बनवतं तसंच अभिजात संगीताचं श्रवणही माणसाला बहुश्रुत बनवतं असं मला वाटतं. फक्त त्याकरता कुणाही लहान-मोठ्या गवयाचं ख्यालगायन मन लावून ऐकलं पाहिजे, कानात साठवलं पाहिजे!

असो, रावसाहेबांच्या संवादकला या सदरात 'शब्देविण संवादु' असणार्‍या आमच्या अभिजात संगीताबद्दलचे हे आपले माझे विचार....

तात्या.

लेख आवडला !

रावसाहेब,
लेख आवडला. वाचन संस्कृतीच राहिली नाही असे म्हणनारे जागोजागी भेटतात. पण काय वाचले पाहिजे, सुरुवात कोठून करायची, शब्दसामर्थ्य , पुस्तके खरेदी करुन वाचनाचा आनंद काय आहे, असे सांगणारे रावसाहेब मात्र अपवादानेच भेटतात.
सुंदर लेख !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडला लेख

लेख आवडला. मनोरंजनाची इतर साधने आल्यामूळे आता पुस्तक वाचन जरा कमी झाले आहे असा एक विचारप्रवाह आहे तरी जगभर पुस्तक विक्री ही वाढलीच आहे हे वेगवेगळ्या पब्लीकेशन्सच्या वाढत्या उलाढालीमुळे कळते.

असो मला तरी आंतरजालामुळे बर्‍याच गोष्टी वाचायला मिळाल्या आहेत ज्या सर्वांचे पुस्तक मला मिळाले/परवडले असतेच असे नाही. तर या पुढे आंतरजाल हा सर्वात मोठा (कदाचित एकमेव :-)) वाचन/लेखन कॅनव्हास होईल.

>>म्हणजे मग 'कॅच देम यंग' या न्यायाने शब्दसंग्रह वाढवण्याच्या दृष्टीने अगदी लहान वयापासून प्रशिक्षण देणे / घेणे आवश्यक आहे.

शालेय शिक्षणात असा उपक्रम हवाच की एका वर्षात (एक आकडा, १०० पुस्तके) ही विद्यार्थ्याने वाचलीच पाहीजेत व प्रत्येक पुस्तक वाचून त्यापुस्तकाबद्दल किमान १० ओळी लिहल्या पाहीजेत. त्याची परिक्षा वगैरे घेतलीच पाहीजे असे नाही, एक गोडी लागावी, शब्दसंग्रह वाढावा, माहिती मिळावी हा उद्देश. काही शाळात हा उपक्रम असेलच म्हणा. सर्वच शाळात असेल तर उत्तमच.

लेख आवडला

सहजराव म्हणतात तसे कदाचित आंतर्जालावर आता वाचन अधिक होऊ लागेल.

त्यामुळे काही शब्दज्ञान वाढवण्याच्या सवयी बदलत आहेत हे मला जाणवते आहे. बांधणीतले छापील पुस्तक वाचताना अनोळखी शब्द सापडला तर ९९% मी "मुसंडी" पद्धतीने पुढे वाचत राहातो. चांगला लेखक असला तर शब्दरचना नेमकी असते. लवकरच संदर्भामुळे शब्दाचा छटांसह अर्थ इतका उत्तम लागतो, की तसा शब्दकोशात बघून लागला नसता. (धोक्याची सूचना : कधीकधी चुकीचा किंवा शब्दाच्या एकाच छटेचा अर्थ मी लक्षात ठेवला आहे, आणि पुढे कधी त्या अनोळखी शब्दावर वेगळ्या संदर्भात अडखळायला होते.)

आंतर्जालावर एक-दोन टिचक्यांवर शब्दकोश असतो, त्यामुळे मी "मुसंडी" पद्धत केवळ ७५%च वापरतो, आणि पुष्कळदा शब्दकोशात अर्थ बघतो.

असेच अनेक बेमालूम आणि महत्त्वाचे फरक माझ्या वाचण्याच्या पद्धतीत निर्माण झाले आहेत.

असेच

लेख आवडला. माझीही मुसंडी मारण्याची पद्धत अशीच आहे.


आम्हाला येथे भेट द्या.

शब्दसामर्थ्य

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. सन्जोपराव यांचा उत्कृष्ट लेख दोनदा वाचला. वाचनाविषयी त्यांनी मांडलेले विचार मननीय आहेत.स्वतः सन्जोप यांचे वाचन किती चौफेर आहे याची कल्पना त्यांनी दिलेल्या विविध उदाहरणांवरून येते.'मोसळेकण्णिरू ' हा कन्नड वाक्प्रचार दोनदाच वाचला आणि अर्थासह लक्षात राहिला.(बहुधा कायमचाच.) वाचताना शब्द अडला तर मी सुद्धा त्वरित कोश पहात नाही. कारण वाचनात व्यत्यय येतो. मात्र शब्दाखाली पेन्सिलने खुण करतो. यथावकाश अर्थ पहातो. वाचता वाचता संदर्भाने अर्थ लागतो. इथे "मुसंडी मारून जाणे " हा श्री. राव यांनी योजलेला वाक्प्रचार अर्थपूर्ण आहे.

लेख आवडला

लेखातले विचार पटले.

मोह

खरे सांगायचे तर अशा लोकांना 'तुम्ही ज्यात भेळ बांधून आणता त्या कागदापासून सुरुवात करा' असे सांगण्याचा मोह मला होतो.

या मोहाला बळी पडा.
प्रकाश घाटपांडे

ऑफ दॅट लॅमेंटेबल कंपनी

वाचनासंबंधी मांडलेले विचार आवडले, पटले. सॉमरसेट मॉमचे याबाबतीतले अतिशय आवडते वाक्य देण्याचा मोह आवरत नाही --
"सम पीपल रीड फॉर इन्स्ट्रक्शन व्हिच इज प्रेजवर्दी, अँड सम फॉर प्लेजर व्हिच इज इनोसंट; बट नॉट अ फ्यू रीड फ्रॉम हॅबिट अँड आय सपोज दॅट दिस इज नायदर इनोसंट नॉर प्रेजवर्दी. ऑफ दॅट लॅमेंटेबल कंपनी ऍम आय."

मुसंडी मारण्यासंबंधी धनंजय यांनी मांडलेल्या मताशी सहमत आहे.

उपदेशात्मक

रावसाहेब,

आजच अपर्णा वेलणकरांचे "फॉर हिअर, ऑर टू गो?" हे पुस्तक खिशातल्या भोकाचा वापर करुन घेतले असल्याने आपला लेख उजळ माथ्याने वाचला. आपण उपदेशात्मक सुद्धा छानच लिहिता रावसाहेब!

खरे सांगायचे तर अशा लोकांना 'तुम्ही ज्यात भेळ बांधून आणता त्या कागदापासून सुरुवात करा' असे सांगण्याचा मोह मला होतो.
--कधि-कधि भेळेपेक्षा हे कागदच पैसे वसूल करतात... अनुभव हाय आपला, शप्पथ!

शेजारी शब्दकोष घेऊन अडलेले शब्द त्यात बघून, अर्थ टिपून वगैरे ठेवणारे नवशिके वाचक बघितले की मंत्रांचे अर्थ समजून घेऊन त्याप्रमाणे लग्नाचे विधी करणार्‍या ज्ञानप्रबोधिनी पद्धतीची आठवण येते.
-- कधी फारच घोडे अडले तर आपण आपली डिक्शनरी डॉट कॉम उघडतो... ठेऊ बापुडे नावे कोणी.

शब्दसंग्रह वाढवायचा म्हणून वाचन अशी ती सर्कस न रहाता, वाचायला आवडते म्हणून वाचन, त्यातून शब्दसंग्रह वाढतो, हा त्यावर मिळालेला बोनस असे सगळे आनंदीआनंद होऊन जाते!
--आगदी शॉलेट बोललात साहेबराव!

आपला,
(भेळखाऊ) भास्कर

आहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,
महाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥

असेच..

'इंग्रजी वाचताना शब्द समजत नाहीत, त्यामुळे वाचलेले कळत नाही' अशी एक सामान्य तक्रार असते. शेजारी शब्दकोष घेऊन अडलेले शब्द त्यात बघून, अर्थ टिपून वगैरे ठेवणारे नवशिके वाचक बघितले की मंत्रांचे अर्थ समजून घेऊन त्याप्रमाणे लग्नाचे विधी करणार्‍या ज्ञानप्रबोधिनी पद्धतीची आठवण येते. दोन्हीही तितकेच विनोदी प्रकार. जगात जशी दारुबंदी कुठेही, कधीही शंभर टक्के यशस्वी झालेली नाही, तशी ही शब्दसंग्रह वावण्याची पद्धतही. मला पटलेली पद्धत म्हणजे समजो वा न समजो, मुसंडी मारुन वाचत रहाणे. कधी ना कधी प्रकाश हा पडतोच. '
हे फार खरं आहे! मी अशाच मुसंडी पद्धतीचा अवलंब करते, थोडाफार फायदा नक्कीच झाला.
बाकी लेख फारच छान !!

लेख आवडला.

सन्जोप राव,

लेखातील मुद्दे नवशिक्या तसेच अनेकांना वाचना विषयी योग्य दिशा देणारे वाटले. खरे तर वाचनाचे संस्कार हे लहान वयापासूनच व्ह्ययला हवेत. शाळेत असताना कोणीही पुस्तकांची वा ग्रंथालयाबद्दलची जाणीवपुर्वक खरी ओळख करुन दिली नाही, परीणामी वाचनाला सुरुवातही उशीराच झाली. वाढत्या कामामुळे आता पहिल्यासारखं वाचन होत नाही, असा नेहमीचा सूर दिसून येतो. पण त्यातील सुख आणि समाधान काही औरच.

आनंद माणून घेण्याच्या काही गोष्टी विधात्याने आपल्याच हाती ठेवल्या आहेत, त्यापैकी एक म्हणजे वाचन अन दुसरं संगीत.

लेखात शामची आई आणि साने गुरूजींना मिस करत होतो.

वाचनिय आणि मननिय

फारच छान! वाचन करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी सन्जोप रावांचा मोलाचा सल्ला "आजच चालू करा" :)

अनुकरणीयही

ऋषिकेषमहोदय म्हणतात तसे हा लेख वाचनीय, मननीय आहेच पण अनुकरणीयही आहे. ज्या घरांमध्ये, मित्रमंडळांमध्ये वाचनसंस्कृती बहरते आहे त्यांना उत्साह देणारा आणि वाचनसंस्कृती रूजावी असे ज्यांना वाटते त्यांना प्रेरणा देणारा असा हा लेख आहे. आपल्या लेखमालेतील पुढील लेखांची प्रतीक्षा आहे.
आपला
(वाचनोत्सुक) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"

अभिनंदन.

रावसाहेब,

हा लेख वाचून तुम्हाला अक्षरशः मिठी मारावी अशी इच्छा झाली. अतिशय सुंदर लेख लिहला आहे. मनपुर्वक अभिनंदन.

भेळीच्या कागदावरुन, मी २२/२३ वर्षाचा असेल. काहीश्या नैराश्याने मला गाठले होते. तेंव्हा घरात आणलेल्या काही वस्तुचे कागद सोडवत असताना मला नेस्ट्रोडोमसचा लेख मिळाला. त्यात भारतीयाचे उज्ज्वल भवितव्य रेखाटले होते. तो लेख मला प्रेरणा देऊन गेला आणि कमीत कमी २/३ वर्ष तरी मी तसे घडणारच आहे अश्या विचाराने पछाडालेलो होतो असे मला आठवते. कदाचित अश्या पुडक्यामधील कागदावर बरीच मुल्यवान माहिती मिळत असते / असावी.

काश रिलायन्स फ्रेश मध्ये सुध्दा अशीच कागदं मिळावी....

 
^ वर