एक संस्कृत एकांकिका

नमस्कार मंडळी,
मुंबईत ठाणे येथे नवरात्रीनिमित्त शारदोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमात उद्या म्हणजे दिनांक १३ ऑक्टोबर रोजी, शनिवारी रुईया महाविद्यालयातर्फे एक संस्कृत एकांकिका सादर केली जाणार आहे.

या एकांकिकेचे नाव 'अक्ष एव जयते' असे असून ती जुगार या विषयावर आधारलेली आहे. संकलन आणि लेखन केले आहे- रुईया महाविद्यालयातील संस्कृत विभागाच्या प्रमुख डॉ. मंजुषा गोखले यांनी तर दिग्दर्शन केले याच महाविद्यालयाचा एक माजी विद्यार्थी- प्रसाद भिडे याने. तसेच एकांकिकेत काम करणारी मुले- मुली ही याच महाविद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी आहेत.

कार्यक्रमाची वेळ संध्याकाळी ७ ते ९ अशी असून या २ तासांत कधीतरी ही साधारण ३५ मिनिटांची एकांकिका सादर केली जाईल. प्रवेश विनामूल्य आहे. तेव्हा रसिकांचे स्वागत आहे.

कार्यक्रमाचे स्थळ- ब्राह्मण सेवा संघ, ब्राह्मण सोसायटी, नौपाडा, ठाणे

राधिका

लेखनविषय: दुवे:

Comments

मसाला दूध...:)

मुंबईत ठाणे येथे नवरात्रीनिमित्त शारदोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमात उद्या म्हणजे दिनांक १३ ऑक्टोबर रोजी, शनिवारी रुईया महाविद्यालयातर्फे एक संस्कृत एकांकिका सादर केली जाणार आहे.

मला या शारदोत्सवाबदल माहिती आहे. गेली अनेक वर्षे हा शारदोत्सव ठाण्यात साजरा केला जातो. ९ दिवस रोज रात्री विविध कार्यक्रम असतात. त्यातला एक दिवस अभिजात संगीताचा असतो. आणि फक्त याच दिवशी अभिजात संगीत ऐकायला आलेल्या श्रोत्यांना गाणं झाल्यानंतर सेवा संघातर्फे फुकट आणि पिऊ तितकं मसाला दूध दिलं जातं! :)

या शारदात्सोवात जसा एक दिवस अभिजात संगीताचा असतो तसाच एक दिवस संस्कृतचाही असतो. राधिकाने उल्लेख केलेला कार्यक्रम याच संस्कृत दिवसा अंतर्गत आहे/असावा.

कुण्या एका वर्षी (सन आता आठवत नाही,) आम्ही देखील इथे एक लहानसा सांगितिक कार्यक्रम केला होता. मी ऋतुसंहारातल्या काही ओळींना रागदारी संगीतावर आधारीत चाल लावली होती व तो कार्यक्रम आम्ही या शारदात्सोवात सादर केला होता. दूरदर्शनवरील मालिंकामधील एक अभिनेत्री समिरा गुजर हिने माझ्या ऋतुसंहाराच्या कार्यक्रमाचे निवेदन केले होते, तसेच कार्यक्रमाची मूळ संकल्पना राधिकाने उल्लेख केल्याप्रमाणे सौ मंजुषा गोखले यांचीच होती.

राधिकाने उल्लेख केलेल्या संस्कृत नाटकाला माझ्या मनापासून शुभेच्छा! मलाही या कार्यक्रमाला अवश्य जायची इच्छा होती परंतु उद्या शनिवार असल्यामुळे संध्याकाळी मी जरा दुसर्‍याच एका कामाच्या गडबडीत असेन!..:)

तात्या.

(प्रतिसाद संपादित)

दुग्धशर्करा योग

धन्यवाद राधिका ताई व तात्या!

ठाण्याच्या शारदोत्सवा बद्दल रधिकाने व आपण दिलेल्या महितीचा काहीही उपयोग करुन घेता येत नसल्याने व चकटफू मसाला दूध हुकल्याने व्याथित झालो आहे. आमच्या अनुपस्थितीची उणीव भरून काढत शेर-सव्वाशेर दूध आमच्या वाट्याचे समजून फस्त करावे हीच सदिच्छा!

आपला,
(उत्सवप्रेमी) भास्कर

आहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,
महाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥

वाढवा.

उपक्रमासाठी अनेक शुभेच्छा.

हा उपक्रम इतर शहरात घेता येईल का?

पुण्यात घेतला तर माझे पूर्ण सहकार्य असेल.

संस्कृतचा प्रचार आणि प्रसार वाढवा.

होय/ अडचणी

होय. या उपक्रमात भाग घेणार्‍यांचीही याचे अधिकाधिक प्रयोग करण्याची इच्छा आहे. परंतू ते सर्व अजूनही वेगवेगळे अभ्यासक्रम घेऊन वेगवेगळ्या महाविद्यालय/ शहरांत राहून शिकत असल्याने एकत्र येऊन रिहर्सल्स करणे, प्रयोग करणे त्यांच्यासाठी फारसे सोपे नाही. शिवाय सामान्यतः त्यांना यासाठी बिदागी दिली जात नाही. केवळ जाण्यायेण्याचा खर्च आणि तालमीच्यावेळी चहाचा आणि थोडाफार खाण्याचा खर्च देण्यात येतो. (शारदोत्सवाच्या आयोजकांची याबद्दलची भूमिका अजून कळलेली नाही) याशिवाय कोठेही प्रयोग करताना रंगमंच बुक करणे, वेषभूषा, नेपथ्य यांचा खर्च करणे यासाठी आर्थिक सहाय्यही लागते.
राधिका

आणखीन एक

गोष्ट सांगायची राहिली. ती म्हणजे या एकांकिकेने फर्ग्युसन महाविद्यालयातर्फे आयोजित केल्या जाणार्‍या राज्यस्तरीय महाविद्यालयीन संस्कृत एकांकिका स्पर्धेत सर्वोत्कृष्ट एकांकिकेच्या पारितोषिकासहित अन्य ४ पारितोषिके पटकावली आहेत. त्याचप्रमाणे मुंबई विद्यापीठाकडून आयोजित केल्या जाणार्‍या 'युथ फेस्टिव्हल'मध्ये प्रादेशिक भाषांतील एकांकिकांच्या स्पर्धेत या एकांकिकेने दुसरा क्रमांक पटकावला आहे.
राधिका

 
^ वर