पूल बांधा रे मैत्रीचे

पूल बांधा रे मैत्रीचे...

(डॉ. उल्हास लुकतुके)
जागतिक आरोग्य संघटनेने १० ऑक्‍टोबर २००७ हा जागतिक मानसिक आरोग्यदिन आणि १० ते १७ ऑक्‍टोबर हा आठवडा मानसिक आरोग्य सप्ताह म्हणून जाहीर केला आहे. त्या निमित्ताने...
आपले मन आपल्या जगण्यामध्ये व आपल्या स्वभावामध्ये इतके बेमालूम मिसळलेले असते, की ते आपण गृहीत धरतो. इतके हातचे समजतो, की मनालाही आजार असतात, मनाचेही आरोग्य असते आणि मनाचीही काळजी घेतली पाहिजे, हे आपल्या ध्यानात येत नाही. मनाच्या रोगाबद्दल थोडी आकडेवारी पाहू, म्हणजे विषयाचे महत्त्व लक्षात येईल.

छिन्नमनस्कता- स्किझोफ्रेनिया हा एक गंभीर मानसिक आहे. सर्वसाधारण जनतेमध्ये याचे प्रमाण एक टक्का आहे. दर शंभरांत एक माणूस चक्क "मेंटल' असतो. पुण्याची लोकसंख्या पंचवीस लाख मानली तर अगदी या घटकेला पुण्यात सुमारे पंचवीस हजार लोक गंभीररीत्या आजारी आहेत. कुटुंब पाच माणसांचे धरले तर पंचवीस हजार कुटुंबे म्हणजे सुमारे सव्वा लाख लोक अशा रुग्णामुळे ताणाखाली आहेत. एक ग्रस्त आणि पाच त्रस्त, असा प्रकार आहे. सुमारे सव्वा लाख माणसे त्रासलेली आहेत. काळजी सर्वांनाच कधी ना कधी लागते; पण चिंताग्रस्तता रोगाचा आढळ किती असावा?

खिन्नता या विकाराबद्दल तर खुद्द जागतिक आरोग्य संघटनाच म्हणते, की येत्या दहा वर्षांच्या काळात जगातील पंधरा टक्के जनता औदासीन्य, अवसाद ऊर्फ "डिप्रेशन' या रोगाची बळी असेल. वाढते आयुर्मान, त्यामुळे वाढत चाललेली ज्येष्ठ नागरिकांची संख्या व त्यांचे मानसिक प्रश्‍न वेगळेच. वाढती लोकसंख्या, त्यातून येणारी स्पर्धा व कलह हा आणखी एक भार. गर्दी, प्रदूषण, त्यांचा मनावर होणारा दूरगामी परिणाम, याचा तर काही हिशेबच नाही. सगळ्यात गंभीर प्रश्‍न आहे तो झपाट्याने बदलणाऱ्या मूल्यांचा. आता जुनेपणा हास्यास्पद ठरला आहे आणि टिकाऊपणा मोडीत निघाला आहे. "झट मंगनी पट शादी' हे आजचे सूत्र आहे. थोडक्‍यात म्हणजे, विकासाचे मानसिक आधार कोलमडून पडत आहेत. त्यामुळे मने कोसळत आहेत. मानसिक आरोग्यापुढील सर्वांत गंभीर प्रश्‍न आहे तो या बदलत्या मूल्यांचा. रोगासाठी उपचाराच्या अनेक सोयी उभ्या करता येतील; पण वेगळ्याच तत्त्वांना उरी बाळगून झपाट्याने बदलणारी समाजरचना, वेगाने बदलणारी सामाजिक मानसिकता याला तोंड कसे द्यायचे, हा मानसिक आरोग्यापुढचा सध्याचा यक्षप्रश्‍न आहे. मानसिक आरोग्य राखावे, यासाठी तुम्हा-आम्हाला आपल्या रोजच्या जीवनात काय करता येईल, ते पाहू.


मन तंदुरुस्तीसाठी सूचना


प्रथम हे ठरवा, की जीवनात तुम्हाला काय हवे आहे? ब्रिजेस की बॅरिकेड्‌स? तुम्हाला पूल हवे आहेत, की अडथळे? इतरांबरोबर वागताना मतभेद होणारच. ते ओलांडू इच्छिता, की त्याचे अडथळे करू इच्छिता? आपल्याभोवती सगळे अडथळेच पाहायचे, आपल्या अडचणी आपणच निर्माण करायच्या, अशी सवय लागली, तर आपल्याच दगडी तुरुंगात आपणच कैदी होऊ आणि जन्मभर रडत बसावे लागेल. ही स्थिती वर्णिताना शायर "अमीन' मुर्शिदाबादी म्हणतात -

उम्र कटने को कटी
पर क्‍या ही ख्वारी में कटी।
दिन कटा फ़रियाद में
और रात ज़ारी में कटी।

(अर्थ ः ख्वारी = अपमान, दुर्दशा. ज़ारी = विलाप, आक्रोश. जीवन कटायचे म्हणून कटले, पण काय अपमान व दुर्दशेत कटले! दिवस कटला तक्रार करण्यात आणि रात्र कटली आक्रोश करण्यात.) तात्पर्य हे, की आपले अडथळे आपणच निर्माण करतो, आपणच त्यात अडकतो आणि विलाप करतो. त्याऐवजी इतरांशी संबंध जोडावेत, मैत्रीचे पूल बांधावेत, म्हणजे आपल्या अडचणी पार करून इतरांशी हातमिळवणी करता येईल. एकट्याने रडत बसण्याऐवजी दुसऱ्याशी हस्तांदोलन करून खुशीत हसता येईल.

पूल बांधायला शिका. अडथळे घालणे सोडून द्या, हा मुद्दा शिकायचा. दुसरे हे ठरवा, की तुम्हाला काय हवे आहे? संघर्ष की संवाद? कॉन्‌फ्लिक्‍ट की कम्युनिकेशन? संघर्ष निर्माण करणारे आपणच आणि संवाद करणारेही आपणच. संघर्ष केला तर मन त्रासेल. संवाद केला तर मन सुखावेल. त्रासाचा ताप वाढवायचा, की सुखाची शीतलता आणायची, हे आपण ठरवायचे. संवाद करावा. संघर्ष कशाला?

संघर्ष, भांडण, द्वंद्व, विरोध, मतभेद हे सर्व एक-एक छटा वेगळी असणारे, पण असुख दर्शविणारे शब्द आहेत. संघर्ष बाहेरच फक्त घडतो असे नाही, मनातही संघर्ष असू शकतो. भांडण दुसऱ्याशी होते, तसे मनातल्या मनात घडू शकते. बाहेर दोघांत घडले, तर त्याला द्वंद्वयुद्ध म्हणता तरी येते; आतल्या आत होते त्या ओढाताणीचे काय करणार? तेदेखील द्वंद्वच. विरोध, मतभेद हे दृश्‍य असू शकतात, आंतरिकही असू शकतात. द्वंद्व म्हणजे ओढाताण, परस्परविरोधी, लठ्ठालठ्ठी. म्हणजे अस्वास्थ्य.कम्युनिकेशन म्हणजे संवाद. संप्रेषण. एकमेकांशी बोलणे. विचारांची देवाणघेवाण. एकमेकांना समजून घेणे. जिथे संवाद आहे, तिथे शांती आहे. शांती आहे तिथे स्वास्थ्य आहे. विसंवाद नको. कर्कशपणा नको. बेताल नको. मधुरता हवी. ताळ राखावा. लय सांभाळावी म्हणजे मन सुखात राहते. आरोग्यात राहते. पूल बांधावेत; अडथळे निर्माण करू नयेत. संवाद राखावा, संघर्ष टाळावा. मनाचे आरोग्य राखण्यासाठीची ही दोन सूत्रे प्रत्येकाला सहजपणे आचारणात आणता येतील.
=================================================
हा दै.सकाळ बुधवार १० ऑक्टोबर २००७ मधील ज्येष्ठ मनोविकार तज्ञ डॉ उल्हास लुकतुके यांच्या लेखावर आपल्याला काय वाटते? जाणीव नेणीवेच्या पातळीवर, उणीव-खुणिव पातळीवर आणि तमो, राजस, सात्विक पातळीवर?

लेखनविषय: दुवे:

Comments

खरे आहे

पटले..

मोठा गंभीर विषय व हा आजचा ज्वलंत प्रश्र आहे.

शक्यतो माणसाने win-win सुत्र जिथे जिथे शक्य आहे तिथे अवलंबले पाहीजे. किंवा मग निदान कुठलीही गोष्ट स्वतःचे मानसीक आरोग्य ढळू न देता रेटायची हे समजून घेतले पाहीजे.

चांगला विषय

भारतात अजूनही मानसिक रोगांकडे महारोगांपेक्षाही वाईट नजरेने पाहिले जाते आणि लपवून ठेवण्यासाठी धडपड केली जाते. आयुष्याच्या गरजा इतक्या वाढल्या आहेत की त्यातून हे जे विषचक्र (vicious cycle) सुरु होते ते केवळ प्लॅनिंग करून थांबवणे माणसांच्या हातात राहिलेले नाही.

संघर्ष, भांडण, द्वंद्व, विरोध, मतभेद हे सर्व एक-एक छटा वेगळी असणारे, पण असुख दर्शविणारे शब्द आहेत.

सहमत!

संवाद करावा. संघर्ष कशाला

यालाही सहमत. सर्वांनी पाळावे असे विधान. उपक्रमावरील चर्चांत हा संवाद दिसून येतो त्याचे नेहमीच बरे वाटते.

लेख आवडला. यावर होणारी चर्चाही आवडेल.

अवांतरः

स्किझोफ्रेनिया हा एक गंभीर मानसिक आहे. सर्वसाधारण जनतेमध्ये याचे प्रमाण एक टक्का आहे.

मराठी संकेतस्थळांवर हे प्रमाण फारच जास्त असावे असे दिसते. लोक एकापेक्षा जास्त आयड्या घेऊन लिहिताना दिसतात की. ;-) (कृपया ह. घेणे)

अतिअवांतर

>मराठी संकेतस्थळांवर हे प्रमाण फारच जास्त असावे असे दिसते. लोक एकापेक्षा जास्त आयड्या घेऊन लिहिताना दिसतात की. ;-)

मलातरी हा स्किझोफ्रेनियापेक्षा मल्टिपल परसनॅलिटी डिसऑर्डरचा प्रकार वाटतो ;) (हघ्याहेसांनको)
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

छान

चांगल्या विषयावरील लेख आपण दिला आहे.
यावर लोकप्रबोधनाची फार गरज आहे हे नक्कीच.

मनोरुग्णांशी कसे वागावे या विषयी सुद्धा लोकशिक्षणाची गरज आहे. आपल्याकडे या बाबत फार उदासिनता दिसते. अश्या लोकांना घरात ठेवता येत नसेल तर त्यांना इतरत्र कोठे ठेवण्यात सुद्धा अनेक अडचणी आहेत.

बाकी संवाद-संघर्ष याबाबतचे विचार सुद्धा चांगले.
--लिखाळ.

योगासने, विपश्यना आणि आर्ट ऑफ लिव्हिंग.

जो पर्यंत आपले स्वास्थ चांगले आहे तो पर्यंतच योगासनाचा वर्ग लावला पाहिजे अथवा विपश्यना / AOL चे शिबीर मध्ये गेले पाहिजे.

आजच्या धकाधकीच्या काळात यापेक्षा चांगला मार्ग असावा असे वाटत नाही.

छान लेख ! यावर विचार झालाच पाहिजे.

घाटपांडे साहेब,

जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून चांगला लेख टाकला. मानसिक आजार म्हणजे केवळ वेड लागणे असा आपला एक समज आहे. पण कितीतरी मानसिक आजार आपल्यासोबत प्रवास करत असतात. दुस-याचे भले झालेले पाहून जळणे, त्या टेन्शन मधे वावरणे, संशय घेणे, चुकीच्या विचारांनी पछाडलेले राहणे, बदला घेण्याची वृत्ती, सतत काहीतरी भास होत राहणे, चीडचीड करणे, बेचैनी, हात पाय गळून जाणे, काय काय सांगू !

दररोजच्या काही अंतरावरच्या प्रवासात आम्ही अनेक माणसे असे पाहतो, जे प्रवास चालू असतांना स्वतःशीच बडबडतात, हसतात आणि भानावर आल्यावर ओशाळतात. खरे तर मानसिक समाधानाने या सर्व विकारांवर मात करता येणे शक्य वाटते, पण आम्हाला लिहायला हे फार सोपे आहे, हो !

साधी मोबाईलची रींग वाजली तर, च्यायला कोणाचा फोन असेल, साहेबांचा तर नसेल, बायकोचा तर नसेल, सासू तर नसेल आली महिनाभर राहण्यासाठी, कशाकशाने माणसाची छाती धडधड करेल, बेचैनी वाढेल सांगताच येत नाही.

मानसिक समाधानाने हे सर्व प्रश्न सुटतील पण कधी कधी वाटते निसर्ग माणसाची परीक्षा घेतो, जो सतत हसमुख राहतो, जो विनाटेन्शन जगतो, आलेल्या संकटातून मार्ग काढतो जो सहज वाटचाल करतो तो यशस्वी, ( आणि त्यालाच -हदयविकाराचा झटका ) असेच ना घाटपांडे साहेब

अवांतर ;) संकेतस्थळावरील सदस्यांचे मानसिक संतुलन एक चिकित्सक अभ्यास असा चर्चा प्रस्ताव टाका राव कोणीतरी :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सांभाळा!

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
साधी मोबाईलची रींग वाजली तर, च्यायला कोणाचा फोन असेल, साहेबांचा तर नसेल, बायकोचा तर नसेल, सासू तर नसेल आली महिनाभर राहण्यासाठी, कशाकशाने माणसाची छाती धडधड करेल, बेचैनी वाढेल सांगताच येत नाही.

डॉक्टरसाहेब सांभाळा बरं का! तिकडच्या स्वारीला हे कळले तर!!!!!!!
मलाच टेन्शन आलंय! देव तुमचे रक्षण करो!

देव

डॉक्टरसाहेब सांभाळा बरं का! तिकडच्या स्वारीला हे कळले तर!!!!!!!
मलाच टेन्शन आलंय! देव तुमचे रक्षण करो!
---हा हा हा... एकदम शॉलेट!

आपला,
() भास्कर

आहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,
महाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥

उत्तम

विषय रोचक आणि महत्वाचा आहे. वर म्हटल्याप्रमाणे मानसोपचार म्हटले की हिंदी चित्रपटातील फिल्मी हिस्टेरिकल वेडे आणि शॉक ट्रीटमेंट डॊळ्यासमोर येते. (हिंदी चित्रपटात कुठल्याही मानसिक रोगावर शॉक ट्रीटमेंट हा एक आणि एकच उपाय असतो.) प्रत्यक्षात परिस्थिती याहून खूप वेगळी असते. कल्पना करा, लहानपणापासून आपल्या शरीराला किती विविध प्रकारचे आजार, अपघात झाले आहेत आणि आपल्याला शरीराची किती विविध प्रकारांनी काळजी घ्यावी लागते. असे असताना शरीर आणि मन हे आपल्या व्यक्तिमत्वाचे दोन भाग मानले, तर मनाला उपचारांची, निगुतीची गरज पडणारच नाही, हे कसे शक्य आहे? असे असतानाही बहुसंख्य माणसे परिस्थिती कितीही कठीण झाली तरीही मानसोपचार एक उपाय म्हणून जमेला धरतच नाहीत. याचे एक कारण म्हणजे सर्दी, ताप, खोकला आल्यावर डॉक्टरकडे जायचे हे माहीत असते, पण कुठली लक्षणे दिसू लागल्यावर मानसोपचार घ्यायचे याचा बरेचदा पत्ता नसतो. यावर माझ्या एका मावशींनी एक उपाय सांगितला होता, आपल्या कुठल्याही वागणूकीमुळे, स्वभावातील एखाद्या कंगोर्‍यामुळे जर आपल्याला किंवा सभोवतालच्यांना नॉर्मल जगण्यात अडथळा होत असेल, तर मानसोपचाराची मदत घेतलेली बरी. यातही शरीरासारखेच आहे. डोके दुखत असले तर ऍस्पिरीन घेऊन विश्रांती घेतली तर चालू शकते. मायग्रेन असेल तर तपासणी केलेली बरी.

सर्वांना याची गरज पडतेच असे नाही. पण मानसिक आरोग्याविषय़ी जागरूकतेची नितांत आवश्यकता आहे. आपला स्वभाव कसा आहे, कुठल्या गोष्टींमुळे/परिस्थितींमुळे आपला स्वत:वरचा ताबा सुटतो, मग आपले ऑटोमॅटिक वर्तन कसे असते हे सर्व आपले आपल्याला महित असलेले केव्हाही चांगले. अर्थात हे सोपे नाही. काही वेळा याला आपल्याच खांद्यावर आपणच उभे राहून पहाण्याची उपमा देतात. कारण इथे कर्म करणारा आणि बघणारा दोन्ही एकच असतात, पण तरीही सरावाने हे शक्य होते. (इथे गीता आठवते)

लेखात म्हटल्याप्रमाणे खिन्नता हा एक अत्यंत गंभीर आजार आहे. सुदैवाने यावर बरीच माहिती उपलब्ध आहे, पुस्तके आणि आंतरजाल या दोन्ही स्वरूपात.
विषय मोठा आहे. पण या निमित्ताने यावर चर्चा झाली तरी उत्तम. खाली काही दुवे दिले आहेत. यापैकी फिलींग गुड हे मानसोपचारतज्ञ डेव्हीड बर्न्स यांनी खिन्नतेवर लिहीलेले पुस्तक आहे. सर्वांनी वाचण्यासारखे पुस्तक आहे. (भारतातही सहज उपलब्ध आहे.)

यावरचे काही दुवे
बर्नस डिप्रेशन चेकलिस्ट
फिलींग गुड

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

मनोकायिक आजार

राजेंद्र यांचा प्रतिसाद बरीच माहिती देउन जातो. प्रतिसाद आवडला.

मानसिक आजारांमध्ये आजार्‍याला आपण आजारी आहोत हे समजणे कठिण असते. परिवारातील-मित्रांतील योग्य व्यक्ती योग्य तर्‍हेने हे लक्षांत आणून देउ शकते.

मनोकायिक आजार हे त्याचेच दर्शनीय उप-अंग आहे. मनाच्या चलबिचलेचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. वर बिरुटे साहेबांनी हात-पाय गळणे इ. लक्षणे सांगीतलीच आहेत. अजून काही लक्षणे म्हणजे, पाठित दुखणे, सर्दी, खोकला, पित्त, झोप उडणे - अती झोप येणे, थकवा आणि व्यक्तीसपेक्ष असे अजून कितीतरी. त्यात व्यसधानिता हा सुद्धा फार समाजाला ग्रासून राहिलेला प्रकार मोडतो. यावर समुपदेशन आणि औषधे तसेच आसपासच्या माणसांची योग्य वागणूक सुखकारक बदल घडवू शकतात हे आपण जाणतोच.

--(प्रसन्नचित्त) लिखाळ.

आमचे भाकित

भविष्यातले बाबा/बुवा हे समुपदेशक/मनोविकार तज्ञ असतील. शरणागतता ही भारतिय मानसिकता आहे. काही सन्मानिय अपवाद वगळता अनेक लोक त्याचा गैरफायदा घेतील.
प्रकाश घाटपांडे

पटले.

आपले म्हणणे.
--लिखाळ.

लेख आवडला

पहिले म्हणजे लेख आवडला, सात्विक प्रवृत्तींकडे झुकणारा वाटला.

पूल बांधायला शिका. अडथळे घालणे सोडून द्या, हा मुद्दा शिकायचा.

हे आवडले. काहींना हे आपोआप जमते काहींना ते "शिकावे" लागते. गरज आहे किंवा जाणीव झाली की काहीतरी चुकतंय, आपण अडथळे तयार करतोय तर दुरूस्त करता येते. जर चूक झाल्याचीच जाणीव होत नसली तर ते दुरूस्त कसे करणार?

उणीव खुणीव -तमो, राजस, सात्विक पातळीवर?"
म्हणजे समजा,एखादे माणूस जर आपल्याशी गर्वाने वागत असले (याला मिसळपाववरच्या या चर्चेचा संदर्भ आहे) तर काय करायचे? त्याला समजून घ्यायचे, आपण होऊन सुधारायला वेळ द्यायचा, स्वतःच सुधारायचे का स्वतःला सुधारायचे? काय पर्याय निवडणार हे आपल्या त्या त्या वेळच्या तमो, रजो आणि सात्विक गुणांच्या काँबिनेशनवर अवलंबून आहे.

खरं आहे! पण...

उत्तम लेख! आवडला.
प्रकाशरावांचा या विषयातही व्यासंग उत्तम आहे यात शंका नाही.

या विषयाला हात घालत आहात तर् या वर एक चांगली लेख-माला होवू देत.
मी खुप काळापासून
राजेंद्रांपासून प्रकाशरावांपर्यंत सगळ्यांना मागणी करतो आहे की,
मानसोपचारांवर मराठीत जालावर लिहिणे आवश्यक आहे.

आता वरच्या लेखात मुद्दा आला आहे.
'काय करायला हवे' हे पण आले आहे पण "कसे" करायचे हे आता यायला हवे आहे.
कुणी यावर "स्टेप बाय स्टेप मनोरचना विकसीत करू शकेल असा लेख" लिहु शकेल का?

(म्हणजे भारतीय लोकशाही सबल व्हावी हे म्हणणे ठीकच आहे. पण कशी करायची ते सांगा ना राव!)

आपला
गुंडोपंत

इथेच तर गोची


'काय करायला हवे' हे पण आले आहे पण "कसे" करायचे हे आता यायला हवे आहे.
कुणी यावर "स्टेप बाय स्टेप मनोरचना विकसीत करू शकेल असा लेख" लिहु शकेल का?

(म्हणजे भारतीय लोकशाही सबल व्हावी हे म्हणणे ठीकच आहे. पण कशी करायची ते सांगा ना राव!)


इथेच तर गोची आहे. याला सार्वत्रिक उतारा नाही. एकनाथांच्या भारुडातला तमोगुण मागे सारा हा उतारा पचवायला अवघड आहे.

मन वढाय वढाय
उभ्या पीकातलं ढोर!
किती हाकला हाकला
फिरी येतं पिकांवर!!

मन मोकाट मोकाट
त्याले ठायी ठायी वाटा!
जशा वाऱ्यानं चालल्या
पान्यावरल्या रे लाटा!!

मन लहरी लहरी
त्याले हाती धरे कोन?
उंडारलं उंडारलं
जसं वारा वाहादनं!!

मन पाखरू पाखरू
त्याची काय सांगू मात?
आता व्हतं भुईवर
गेलं गेलं आभायात!!

मन जह्यरी जह्यरी
याचं न्यारं रे तंतर!
आरे, इचू, साप बरा
त्याले उतारे मंतर!!

मन चपय चपय
त्याले नही जरा धीर!
तठे व्हयीसनी ईज
आलं आलं धर्तीवर!!

मन एवढं एवढं
जसा खाकसंचा दाना!
मन केवढं केवढं?
आभायात बी मायेना!!

देवा, कसं देलं मन
आसं नही दुनियात!
आसा कसा रे तू योगी
काय तुझी करामत!!

देवा, आसं कसं मन?
आसं कसं रे घडलं!
कुठे जागेपनी तूले
असं सपनं पडलं!!!

बहिणाबाई चौधरींची ही कविता किती भावस्पर्शी आहे.
प्रकाश घाटपांडे

वा !

बहिणाबाईंचे मन मोहून टाकणारे साधे शब्द!

एखाद विचार कितीही मनातनं काढू म्हंटलं तरी होत नाही.
कितीही हाकला ते जातच नाही हो!

"मन वढाय वढाय
उभ्या पीकातलं ढोर!
किती हाकला हाकला
फिरी येतं पिकांवर!! "

तसंच,

"मन पाखरू पाखरू
त्याची काय सांगू मात?
आता व्हतं भुईवर
गेलं गेलं आभायात!! "

ध्यानाला बसावं...
अरे! २ मिनिटात कुठच्या कुठे फुरून येतं मन.
परत त्याला जरा 'धरलं असं वाटतं' की तोवर कुठे तरी दूर पळतं! :)

वा ही कविता देवून तुम्ही मनाला एका छान स्तरावर नेलं! धन्यवाद!!

आपला
गुंडोपंत

अध्यात्म/प्रवचने

घाटपांडे साहेब,

नेहमी प्रमाणेच समाजोपयोगी लेख. तसेच राजेंद्र यांचा प्रतिसाद सुद्धा महितीपूर्ण.

स्किझोफ्रेनिया हा एक गंभीर मानसिक आहे. सर्वसाधारण जनतेमध्ये याचे प्रमाण एक टक्का आहे.
म्हणजे या एक टक्कयाला तात्काळ मानसिक उपचारांची आवश्यकता आहे तर! तसेच मी असे वाचले आहे की जसे प्रत्येक माणसाला वार्षिक वा द्विवार्षिक शारिरीक चिकित्सा आवश्यक आहे तसेच मानसिक चिकित्सा सुद्धा आवश्यक आहे. म्हणजे जेवढे शल्यचिकित्सक आहेत साधरणपणे तेवढेच मानसोपचार तज्ञ आवश्यक आहेत. पण ते शक्य आहे का? सामजिक धुरिनांचे (तज्ञांचे) असे म्हणने असते की योग्य व्यासंग (वाचन, चर्चा-प्रवचनांना जाणे) बर्‍याच अंशी मानसोपचाराचे काम फत्ते करू शकतो. पण आजकालच्या परिस्थितीत प्रवचने म्हटले की भोंदू बाबा आणि त्यांच्या मागे असणारे हजारो अंधश्रद्धाळू असे चित्र दिसते. काही चांगले समाज सुधारक आहेत अन त्यांनाचा हे काम पेलावे लागणार आहे. जे काम शिवकालीन संतांनी केले ते करण्याची जबाबदारी या अधुनिक संतांवर आहे असे वाटते. तुमच्या सारखे विद्वान या कार्यांत मौलिक हातभार लावू शकतात हे सुद्धा तितकेच खरे.

आपला,
(निरोगी मनाचा :) ) भास्कर

आहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,
महाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥

धुरनि

धुरनि की धुराणी (धुरा वाहणारे)?

~~ 'तो ' सवडीत 'हे' वाचतो! ~~

लहानपण

लहानपणीच असे पुल बांधायला शिकवले जाते का?
किंवा तोडायलाही.
आमच्या शेजारी एक काका रहायचे, ते लहान मुलांना खेळवायचे पण जर एखाद्या मुलाने दुसर्‍या मुलाला
काही मदत केली तर लगेच म्हणायचे 'तु नौकर आहेस् का त्याचा'
म्हणजे या लेखासंदर्भात पुल तोडायलाच लावायचे.
मी घरी हाच प्रयोग केल्यावर आजोबांकडून मार बसला.
मी संगुन टाकले की ते अजोबा असं म्हणतात. मग मझे अजोबांची आणी त्यांची चांगली जोरदार खडाजंगी झाली. (माझे आजोबा मिलिटरीवाले असल्याने तेच जिंकले, म्हणजे मोठ्या आवाजामुळे तेच जिंकायचे सगळीचकडे)

पण मग ते आजोबा असे बोलायचे बंद झाले.

पण अशा लहानपणच्या घटनांचा मोठा परिणाम आयुष्यभर रहात असावा अस वाटते.
-शिवानी

लहान पण

पण अशा लहानपणच्या घटनांचा मोठा परिणाम आयुष्यभर रहात असावा अस वाटते.

लहानपणच का? मोठेपणातल्या घटनांचा देखिल मोठा परिणाम आयुष्यावर रहात असतो. There is a hidden child in every Adult. अशा घटनांचा गुंता स्वप्नाद्वारे कधी कधी बाहेत पडतो. आपल्या "मोठेपणामुळे" आपण त्या कबूल करत नाही इतकेच.
प्रकाश घाटपांडे

पूल 'संवादाचा'

खरं तर ५० टक्के प्रश्न हे केवळ संवादाने सुटतात.
हे सो कॉल्ड एटिकेट्स,मॅनर्स वगैरे संवादात अडथळा निर्माण करतात.
संवादातून आपले अंतरंग उघडे पडेल कि काय याची भीती.
वाद नको म्हणून संवादच नको.
संवाद आपल्याला कोषातून बाहेत काढतो.पण कोषातून बाहेर पडले कि असुरक्षिततेचे भय. म्हणून संवाद नको अस्तो.
संवाद हा नातं निर्माण करतो. नातं अपेक्षा निर्माण करतात. अपेक्षा निर्माण झाल्या कि अपेक्षाभंगाची भीती. म्हणून संवाद नको.
अनोळखी माणसे बोलण्यात गुंगवून लुबाडतात हे अनेक ठिकाणी वाचले असते,म्हणून भीती.
संवाद आपल्या खाजगीपणात हस्तक्षेप करतो.
मूळातच संवाद हा उभयपक्षी मान्य असेल तरच होतो. स्वत:शीच मनातल्या मनातल्या मनात केला तर ते आत्मपरिक्षण ठरते. पंण असा संवाद जर मोठ्याने म्हणजे दुसर्‍याला ऐकायला जाईल अशा पद्धतीने केला तर या 'स्व' च्या मैत्रीला लोक काय म्हणतात हे सुज्ञास सांगणे नलगे.
थोडक्यात असा संवाद हा सुसंवादाकडे नेण्याऐवजी विसंवादाकडे नेईल याची भीती.
प्रकाश घाटपांडे

सुसंवाद विसंवाद आणि सौजन्य (एटिकेट)

संवादाचा रोख सुसंवादाकडे आहे, आणि विसंवादापासून दूर आहे, इतपत लक्ष दिले, तर तेवढे एटिकेट पुरे होतात. सौजन्याच्या कर्मकांडांचा त्यापेक्षा अधिक बाऊ केला तर संवाद खुंटतो. पण तितकीही चाड राखली नाही तरी संवादाचा विपर्यास होतो.

पूल बांधताना जोडणारे रिवाज राखायचे, आणि तोडणार्‍या रीती त्यागायच्या असा विवेक करावा.

 
^ वर