वाहन अपघात आणि सुरक्षा सुविधा
कधी कार/दुचाकी शर्यतीशी संबंधित रोड रॅश, क्रेझी कार इ.इ. संगणकीय खेळ खेळला आहात काय? सर्व किती सोप्पं असतं ना? एकदा कडेला जाऊन किंवा शत्रूच्या वाहनाचा धक्का लागून आपलं वाहन मेलं की दुसरा डाव चालू. असे तीन डाव संपून 'गेम ओव्हर' झाला तरी परत खेळ 'स्टार्ट न्यु गेम' म्हणून चालू. खर्या आयुष्यात मात्र अशा 'दुसर्या डावाची' किंमत अघोरी. एखादा अवयव, प्रचंड खर्च,मनस्ताप आणि प्रसंगी कोणाचातरी जीव सुद्धा. आज आपण मुख्यतः चारचाकी वाहनांचे अपघात,काही संभाव्य कारणे आणि वाहनकंपन्यांनी ते टाळण्यासाठी/कमी करण्यासाठी केलेल्या काही सुरक्षा व्यवस्था याबद्दल थोडे वाचणार आहोत.
अपघाताची संभाव्य कारणे:
१. रस्त्याची अवस्था/स्वरुप/रस्त्यावरील अडथळे: घाटातल्या वेड्यावाकड्या वळणांवर अपघात होणं तर बर्याचदा नेहमीच्या पाहण्यातली गोष्ट. पण सरळ सोट रस्त्यावर सुद्धा खड्डा चुकवण्यासाठी,मध्ये आलेल्या कुत्र्याला/लहान मुलाला वाचवण्यासाठी घेतलेलं एखादे अकस्मात वळण बर्याचदा खूप मोठी अद्दल घडवतं. तसेच पावसाने/तेल इ. पदार्थ सांडून निसरडे झालेले रस्ते.
२. वाहनातील अकस्मात उद्भवलेला दोषः भरधाव वेगात एखादे चाक पंक्चर होणे, इंधनटाकीची गळती, ब्रेक मध्ये बिघाड, क्लच मध्ये बिघाड इ.इ, दरवाजा नीट बंद केलेला नसल्यास तो उघडला जाऊन बाहेर फेकले जाणे.
३. वाहनचालकाची मानसिक/शारीरीक स्थिती: वाहन चालवताना चक्कर/आकडी येणे, खूप वेळ वाहन चालवत असताना स्वतःच्या नकळत एखादी डुलकी लागून वाहनाचे नियंत्रण जाणे, दृष्टीदोष,मन अस्वस्थ असताना वाहन चालवणे.
४. सभोवतालची वाहने: ट्रकचालकाचे नियंत्रण सुटून भरधाव येणारा ट्रक, प्रकाश पुरेसा आणि आवश्यकता नसतानाही हेडलाईटची वाढवलेली प्रखरता, चुकीच्या बाजूने पुढे जाण्याचा प्रयत्न, लवकर जाण्यासाठी स्वतःची बाजू सोडून दडपून विरुद्ध वाहनांसाठी असलेल्या बाजूला घुसणे.
५. मद्य/बेपर्वाई: वाहनचालकाचे किंवा अपघातात सामिल इतर वाहनचालकाचे अती मद्यप्राशन आणि 'वेगाची नशा.'
६. वाहनाच्या उत्पादनातील त्रुटी: अपघातसमयी/आग लागल्यावर वाहनाची दारे त्यांची कुलपे नादुरुस्त होऊन उघडता न येणे, सुरक्षिततेसाठी दिलेले आणि वाहन आदळल्यावर फुगून चालकाला कपाळमोक्ष होण्यापासून वाचवणारे फुगे नादुरुस्त होणे इ.
वाहनातील सुरक्षा उपकरणे/सोयी:
१. सीट बेल्ट उर्फ आसनाला असलेला सुरक्षा पट्टा. या पट्ट्याची रचना अशाप्रकारे असते की ठराविक वेगापेक्षा जास्त वेगाने पट्ट्याला झटका बसल्यास तो आहे त्या स्थितीत अडकणार, आणि बसलेल्या थांबवणार, थोडक्यात अपघातप्रसंगी समोर जोरात आदळून चालकाचा/शेजारच्याचा होणारा कपाळामोक्ष,आपटण्याआधीच सुरक्षित अंतरावर थांबवून टाळणार.
२. लहान मुलांसाठी विशीष्ठ आसने(चाइल्ड सीट): आसनाचे सुरक्षा पट्टे किंवा हवेच्या पिशव्या लहान मुलांसाठी त्यांच्या उंची व लहान आकारामुळे तितकेसे प्रभावी ठरत नाहीत व त्यांच्यासाठी जास्त सुरक्षा देणारी खास लहान मुलांसाठीची आसने वाहनकंपन्या बनवतात. दुर्दैवाने भारतात ही कल्पना अजून तितकीशी वापरली जात नाही.
३. एअर बॅग उर्फ पुढची आसने व मोटारीचा समोरचा भाग यात असलेल्या पिशव्या/फुगे. वेगात अचानक झालेली अनैसर्गिक घट (जी वेगातले वाहन एखाद्या वस्तूवर/भिंतीवर आदळल्यास होऊ शकते आणि मोटारीच्याच वेगाने प्रवास करणार्या प्रवाश्याला मात्र जडत्वामुळे/संवेग अक्षयतेच्या नियमाने वेग असा कमी न करता आल्याने पुढे आदळावेच लागते) आतील संवेदनाशील उपकरणाच्या(सेन्सरच्या) साहाय्याने ओळखून काही सेकंदात या हवेच्या पिशव्या फुगवून पुढे आपटल्याने होऊ शकणारी इजा कमी करणे.
४. सुरक्षित काच(सेफ्टी ग्लास): काचेच्या दोन तुकड्यांत पातळ पॉलीथीनचा पडदा घालून बनवल्या गेलेल्या या काचा फुटल्या तरी आजूबाजूला उडत नाहीत,आणि अगदी आतला थर तुटून उडाल्या तरी टोकदार तुकडे होत नाहीत त्यामुळे गोळा करणे इ. सोपे. तसेच यायोगे वाहनचालक व शेजारच्याचे या काचा घुसून होणार्या इजेपासून रक्षण होते.
५. चाइल्ड लॉक.
आता आपण या एकेक उपकरणाचे जरा तपशीलात वर्णन पाहू.
१. आसनाला बांधलेला सुरक्षा पट्टा(सीटबेल्ट):
सीटबेल्टचे मुख्य कार्य म्हणजे अपघातप्रसंगी बसलेल्याला पुढे आपटू न देता मागेच थोपवून धरणे. पण मुळात असा पुढे आपटायचा प्रसंगच का यावा? कारण सर्व सजीव निर्जीव वस्तूंचा जडत्व हा गुणधर्म (इनर्शिया ऑफ मोशन.) म्हणजे बघा, तुम्ही रस्त्यावरुन मोटारीत बसून ८० किमी/तास वेगाने सुसाट चाललाहात, मोटारीच्या वेगाइतका वेग तुमच्या शरीरालाही मिळाला आहे. पण त्याच वेगाने प्रवास करणार्या मोटारीत तुम्ही बसल्याने तुम्हाला आपण स्थिर बसलो आहोत असे वाटते. आता समजा, ही मोटार जोरात जाऊन झाडावर आदळली, तर मोटारीचा वेग अचानकपणे ० किमी/तास होणार..पण त्याच मोटारीत बसलेल्या तुमचा वेग ८० किमी प्रती तास वरुन शून्य होण्यासाठी, म्हणजे हा इनर्शिया ऑफ मोशन जिंकून थांबण्यासाठी तुम्हाला मात्र मोटारीच्या पुढच्या काचेवर किंवा सुकाणू(स्टियरिंगवर) जोरात आदळावे लागणार.डोके फुटणार.क्वचित प्रसंगी छातीलाही लागणार.पण तुम्ही जर सीटबेल्ट लावलेले असतील तर सीटबेल्ट एका जागी अडकून तुम्हाला योग्य प्रकारे थोपवणार. तेही डोके/मान अशा नाजूक भागांना अपाय न करता बल(स्टॉपिंग फोर्स) माकडहाड,फासळ्या अशा दणकट भागांवर लावून.
सर्वसामान्य स्थितीत सीटबेल्टला आत एक स्प्रिंग असते. सीटबेल्ट(लावण्यासाठी) हळूच खेचला असता ही स्प्रिंग उलगडली जाते. जेव्हा आपण बेल्टची कळ दाबून तो लावून टाकतो आणि हात सोडतो तेव्हा ही स्प्रिंग परत आपल्या पूर्वस्थितीला येते आणि परीणामतः पट्टा कुठेही सैल न होता आपल्या खांद्या व छातीभोवती चपखल आणि बेताने बसतो.
अपघाताच्या वेळी अचानक धक्का बसून मोटारीचा वेग अत्यंत कमी वेळात शून्याकडे येतो. अशावेळी बेल्ट यंत्रणेच्या खाली लावलेले वजन जडत्वाने(इनर्शिया ऑफ मोशन) पुढच्या बाजूस कलते आणि त्याला जोडलेला अडसर कलता होऊन सीटबेल्ट गुंडाळलेल्या दातेरी आरीला(रॅचेट गियर) अडकून सीटबेल्टला उलगडण्यापासून थांबवतो. म्हणजे सीटबेल्ट आहे त्या स्थितीत अडकून बसलेल्या मनुष्याला पुढे आदळण्यापासून वाचवतो.
नवनवीन तंत्रज्ञानाबरोबर सीटबेल्ट यंत्रणेत अधिकाधिक सुधारणा होत आहेत. अर्थात जर मोटारीचा वेग खूप जास्त असेल तर थांबवण्यासाठी सीटबेल्टने शरीरावर लावलेले बल(स्टॉपिंग फोर्स) ही प्रचंड असेल. त्याने शरीराला अपाय होण्याचीच शक्यता जास्त. म्हणून बर्याच बेल्ट यंत्रणांमध्ये बलनियंत्रक(लोड लिमीटर) म्हणून बेल्टच्या थोड्या भागाला शिवण घातलेली असते. मर्यादेपेक्षा खूप जास्त वेगाने अपघात झाल्यास शिवण उसवून तितका भाग उघडला जातो. त्यामुळे पट्टा माणसाला अगदी गच्च न आवळता थोडा सैल होतो आणि पट्ट्याने शरीराला होणारे अपायांची तीव्रता कमी होते.
२. लहान मुलांसाठीची आसने :
सामान्य सीट बेल्ट त्याच्या मोठ्या माणसांसाठी योग्य उंचीमुळे लहान मुलांना तितकासा उपयोगी ठरत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी वेगळ्या कमी उंचीच्या सीट असाव्या.
३. एअर बॅग(हवेची पिशवी):
हवेच्या पिशव्या अशा प्रकारे मोटारीच्या समोरच्या भागात(डॅशबोर्डमध्ये) ठेवलेल्या असतात, ज्यायोगे अचानक वेगात बदल झाल्यास या पिशव्या वेगाने फुगतात आणि समोर बसलेल्या चालक व शेजारच्याला छाती/कपाळ मोटारीच्या पुढच्या भागावर आदळून होणार्या इजेपासून वाचवतात. हवेची पिशवी घडी केलेल्या अवस्थेत स्टियरिंग(सुकाणू) मध्ये आणि चालकाच्या शेजारच्या सीटसमोरच्या भागात असते. क्रॅश सेन्सर(अपघात ओळखणारी यंत्रणा) वेगदर्शकाला(स्पीडोमीटरला) जोडलेली असते. जास्त असलेल्या वेगात अचानक झालेला शून्याकडे जाणारा बदल(जो अपघात, टक्कर यामुळे होतो) तो ओळखला जाऊन त्याने एक कळ दाबली जाते व फुगा फुगवणारी यंत्रणा कार्यरत होते. सामान्यतः सोडियम ऍझाइड व पोटॅशियम नायट्रेटची क्रिया होऊन गरम नत्रवायू(नायट्रोजन) तयार होतो आणि तो वेगाने हवेच्या पिशवीत भरला जाऊन पिशवी फुगते आणि लगेच परत तिच्यातली हवा काढून ती सपाट होऊ लागते. ही क्रिया अक्षरशः निमीषार्धात होते. (अंदाजे १/२० सेकंदात.) हा पिशवी भरल्यासाठी वापरला जाणारा वायू कधीकधी अरगॉनही असतो.
एअर बॅग ही अपघातात जीवनदायी, पण तिच्या फुगण्याच्या वेगामुळे कधीकधी जीवघेणी सुद्धा. एअर बॅग यंत्रणा आपल्या मोटारीत असेल तर खालील मुद्द्यांचीही नोंद घ्या:
प). समोरासमोरुन झालेल्या टकरीत एअर बॅग ने रक्षण होत असले तरी वाहनाला बाजूने आणि मागून लागलेल्या धक्क्यांपासून संरक्षण कमीच. (आता साइड एअर बॅगही बाजारात आहेत, ज्या पुढच्या दोन्ही दारांत बसवलेल्या असतात.)
फ). १/२० सेकंद इतक्या कमी वेगात ही हवेची पिशवी फुगते, या फुगण्याच्या टप्प्यात तुम्ही फार जवळ असाल तर अपाय होऊ शकतो. (साधारण न फुगलेल्या एअर बॅगच्या २-३ इंचात किंवा जवळ आपण असाल तर धोका आहे.) म्हणून एअर बॅग यंत्रणेपासून १० इंच अंतर राखणे सर्वात चांगले.(हे अंतर सीट बेल्ट लावून आणि गरज पडल्यास आपले आसन थोडे मागे कलवून(रिक्लाइन करुन) मिळवता येईल.)
ब). पिशवीची रचना साधारण अशी की फुगल्यावर ती सरासरी उंचीच्या माणसाच्या छातीच्या भागावर यावी. पण पुढच्या सीटवर मूल/अगदी कमी उंचीचा मनुष्य/स्त्री असल्यास काय होईल? एअर बॅग वेगाने फुगून चेहर्याला/मानेला इजा पोहचवेल. (एअर बॅग फुगून आदळल्यामुळे मान मोडून १-२ लहान मुलांचे मृत्यू झाल्याच्याही घटना आहेत.)
भ). मोटारीचे सुकाणू चाक(स्टियरिंग)ची दिशा हलवता येण्याजोगी असल्यास त्याची दिशा किंचीत बदलून त्यातली एअर बॅग यंत्रणा आपल्या छातीच्या समोर येईल अशी व्यवस्था करा.
म). १२ वर्षाखालील मुले शक्यतो पुढच्या आसनावर बसायला नको, बसल्यास त्यांनी नीट सीटबेल्ट बांधले आहेत व आपल्या वाहनातले सीटबेल्ट/(ते बसलेली आसने) त्यांच्या वयाला साजेशी आहेत ना याची खात्री करुन घ्या.
य). अगदी लहान मूल(०-२ वर्षांचे) पुढच्या सीटवर नको.
र). तुमची उंची अगदी कमी आहे, व एअर बॅग यंत्रणा तुमच्या चेहर्यासमोर येते आहे(पिशवी फुगल्यावर तुमच्या चेहर्याला किंवा मानेला अपाय होऊ शकेल,) अशी परिस्थिती असल्यास आपल्या आसनाची उंची वाढवून घ्यावी.(ही उंची वाढवण्याची सोय सर्व मोटारींना नाही.)
म्हणजे एअर बॅग काही धोकादायक परिस्थितीत फुगल्या नाही पाहिजेत, किंवा कमी फुगल्या पाहिजेत. यासाठी एक प्रस्ताव म्हणजे एअर बॅगनेच समोर कोणत्या उंचीचा माणूस/मूल/प्राणी बसला आहे ते 'ओळखणे'. यासाठी एक योजना म्हणजे (श्रवणातीत)अल्ट्रासॉनिक लहरी सीटकडे पाठवून/विद्युत क्षेत्र निर्माण करुन त्या लहरी/क्षेत्र कोणत्या कोणत्या उंचीवर अडतात त्याप्रमाणे एअर बॅग किती फुगवायच्या/अजिबात फुगवायच्याच नाहीत हे अपघाताच्या वेळी ठरवले जाईल. तसेच दोन पिशवी फुगवणार्या यंत्रणा दिल्या जातील, जास्त वेगाने टक्कर जाल्यास एअर बॅग वेगाने फुगवणारी, व कमी वेगाने सौम्य टक्कर झाल्यास एअर बॅग फुगवण्याचा वेग मंदावणारी दुसरी यंत्रणा फुगवायला वापरली जाईल.(सध्या व्होल्वो, बी एम डब्ल्यु,सिट्रॉन,भारतात टाटा मोटर्स ची सफारी डायकोर आणि अशाच काही प्रगत मोटारींमध्ये अशा 'इंटेलिजंट एअरबॅग' उपलब्ध आहेत.)
४. सुरक्षा काच/सेफ्टी ग्लास/लॅमिनेटेड ग्लासः
मोटारींच्या काचा अशा प्रकारे बनवलेल्या असतात की अपघातप्रसंगी फुटल्या तरी त्यांचे तुकडे इकडे तिकडे उडत नाहीत. यासाठी दोन काचांमध्ये पातळ प्लॅस्टिकचा थर(पी व्ही बी-पॉलीव्हिनाइल ब्युटिरल) दाबून बसवलेला असतो. या प्लॅस्टिकमध्ये तन्यता असते, म्हणजे काही मर्यादेपर्यंत ताणले गेले तरी ते फाटत नाही. अशा काचेचा उपयोग अपघातात इजेपासून संरक्षणासाठी तर होतोच, शिवाय या काचेने काही प्रमाणात अतिनील(अल्ट्राव्हायोलेट) किरणेही अडवली जातात. भूकंप किंवा वादळ वगैरे अशा नैसर्गिक आपत्तींत काचा त्यांच्या बैठकीतून सहजासहजी निखळत नाहीत.
५. चाइल्ड लॉक(मोटारीच्या दारातले विशीष्ठ कुलूप, जे लहान मुलाला आतून उघडता येत नाही.)
चाइल्ड लॉक हे लहान मुलांनी वाहन वेगात असताना चुकून/मुद्दाम दार उघडू नये म्हणून असते. चाइल्ड लॉक लावल्यास मागच्या आसनांजवळचे दार मुलांना आतून उघडता येत नाही. हे दार बाहेरुनच उघडता येते.
अशा प्रकारे योग्य प्रकारे, योग्य प्रसंगी, योग्य ती सुरक्षा साधने आपल्या मोटारीत वापरल्यास बर्याच अपघातांची तीव्रता कमी होऊ शकते.
जबाबदारीतून मुक्ततेचे मुद्दे(डिसक्लेमर):
१. माहिती प्रत्यक्ष अनुभवावरून लिहीलेली नाही, त्यामुळे सुधारणेला वाव असू शकतो. चुका दाखवणार्यांचे/सुधारणा सुचवणाऱ्यांचे स्वागत आहे.
२. लेखन व चित्र संदर्भ: विकीपीडीया, हाऊस्टफवर्क्स, बी एम डब्ल्यु,टाटा मोटर्स संकेतस्थळे, व्हायफाइल्स.ऑर्ग.
३. हा लेख मनोगत व उपक्रम या संकेतस्थळांवर प्रकाशित.
४. (विशेष आभार या क्षेत्रात काम केलेल्या व वेळोवेळी माहिती पुरवणाऱ्या मनोगती/उपक्रमी चाणक्य यांचे.)
Comments
इतरांचे काय?
.
आपन मस वापर्लि , पन ईत्रांन्नी न्हाई वापर्ली मंग काय करायच? आपन् मस सम्दे प्रबोधानाचा फुगा फुग्वू पन यखांद्याक् जर टाचनि आसल् तर काय करायचं? यकनाथ म्हाराजा वानी 'इच्वाचा धर्म् इच्वाला पाळूं द्या मपला मला' अस म्हन्ल तर प्रबोधनाचा फुगा भास्कुनि फुस्कायचा. टाच्निवाला अप्ला बस्लाय मजा पघतं!
प्रकाश घाटपांडे
चित्रे
माफी. चित्रे जिओसिटीज वर टाकली होती. जिओसिटीज ची साठवण क्षमता फुकट वाल्यांसाठी कमी आहे. त्यामुळे ती अधूनमधून दिसणार नाहीत. आता फ्लिकर वर चित्रे टाकली आहेत. ती http://www.flickr.com/photos/7527155@N04/ इथे आहेत..संपादक मंडळाने चित्रांच्या दुव्यांत बदल केल्याबद्दल आभार.आता चित्रे कायम दिसायला हरकत नसावी. तरीही न दिसल्यास चित्रे दुव्यावर पाहा..
प्राधान्य
म्हणूनच वाहतुक समस्या ही प्राधान्याने अग्रक्रमावर घेतली पाहिजे. पण क्रमवारीतच वैचारिक संघर्ष होतात. निराकरण बाजूलाच राहते.
प्रकाश घाटपांडे
ट्र्याफिक
सुरक्षा उपकरणांची छान माहिती दिली आहे. आपल्याकडे सीटबेल्ट कितपत गंभीरपणे घेतात कल्पना नाही. भारतात असताना क्वचितच सिटबेल्टचा उपयोग होताना पाहिला.
काही वर्षांपूर्वी पुण्यात मला अशा प्रसंगाला तोंड द्यावे लागले होते. दुचाकीवर असताना म्हशींचा लोंढा (कळप? :) ) रस्त्यावर आला आणि नियंत्रण सुटून अपघात झाला. उजवा हात मोडला आणि पुढचे जवळपास एक वर्ष चिंतन-मनन करण्यात गेले. असो.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
माहिती आवडली
माहिती आवडली ,पण भारतीय स्वभाव असा आहे की,
सुरक्षा उपकरणे असूनही त्याचा वापर करावा असे वाटतच नाही.
(फ्लिकरवर जाऊन चित्रे पाहिली पण या लेखासोबतच ती चित्रे उघडली असती तर अधिक बरे वाटले असते.)
अवांतर;) दुचाकी कितीही सरळ चालवा भारतीय रस्त्याचे माहित नाही,
पण आमच्या औरंगाबादच्या रस्त्यावर कोण कधी कुठून ठोकेल याचा नेमच नाही ! :)
चित्रे / माहिती सुंदर
अनु, आवडला लेख. उपयुक्त आणि समजायला सोपा.
असेच
कोणतीही माहिती रंजक कशी करावी हे आपणाकडून शिकण्यासारखे आहे.
आम्हाला येथे भेट द्या.
रंजन व प्रबोधन
हो ना! लॉजिक गेट विषयी अनु ने ( तृतीया विभक्ती प्रथम वचनी तरिही आदरार्थी 'ने') खरच अत्यंत लॉजिकल लिहिले आहे , तितकेच मनोरंजक.
प्रकाश घाटपांडे
उपयुक्त
उपयुक्त लेख आहे. आवडला. चित्रांमुळे माहिती रंजक वाटली. अजानुशी सहमत!
असे लेख वाचायला आवडतील.
तेच
म्हणतो...
अनुताई, अशीच समाजोपयोगी माहिती देत रहा.
लेख छान आहे
पण् महत्वाचे म्हणजे माहिती उपयोगी आहे, भारत सरकार ला एअर बॅग् हा विकल्प म्हणजे ऐषारामी वस्तू वाटते त्यामुळे असा विकल्प असणार्या गाड्या भरमसाठ कर देऊन विकत घ्याव्या लागतात.
भारतीय नागरीक कसेही मरो त्याचे कुठल्याच राजकीय् पक्षाला घेणे देणे नसते. राज्यात् रस्ते नसून् खड्डेच् असले तरी आपण प्रत्येक् टोल भरतो, पेट्रोल-डिझेल् वर् राज्याचा अतिरीक्त् कर् भरून् रस्त्यांची मलमपट्टी कधी होणार् ह्याची वाट् पाहात् राहतो.
सुमीत, नावा प्रमाणेच असलेला "चांगला मित्र"
माहितीपूर्ण
आवडला.
दुभाजक
वाहन अपघातात हानी कमी होण्यासाठी हल्ली दुभाजकांची संरचना सुद्धा बदलते आहे. गुगलवर शोधल्यास माहिती मिळु शकेल.
वाहनांच्या आसनांची रचना हा सुरक्षिततेसाठीचा एक मोठा मापदंड आहे. यासाठी अनेकदा वाहनांची आणि आसनांची रचना मुळातुनच बदलावी लागते. पुर्वी मर्सडिज बेंझ कंपनी अभिमानाने मिरवायची कि त्यांच्या वाहनात बसलेला प्रवासी क्लिष्ट अपघातात सुद्धा जीवंत राहु शकतो. पण भारताबाहेर डायनाचा मृत्यु आणि भारतात पतंगराव चिरंजीवांचा मृत्यु यांनी त्यांचा हा दावा खोटा ठरवला आहे.
मराठीत लिहा. वापरा.
अनुभव
"सीट बेल्ट उर्फ आसनाला असलेला सुरक्षा पट्टा. या पट्ट्याची रचना अशाप्रकारे असते की ठराविक वेगापेक्षा जास्त वेगाने पट्ट्याला झटका बसल्यास तो आहे त्या स्थितीत अडकणार, आणि बसलेल्या थांबवणार, थोडक्यात अपघातप्रसंगी समोर जोरात आदळून चालकाचा/शेजारच्याचा होणारा कपाळामोक्ष,आपटण्याआधीच सुरक्षित अंतरावर थांबवून टाळणार."
पण ह्याच्यामुळे जीव धोक्यात देखील येऊ शकतो..
स्वः अनुभव :
ह्याच वर्षी ज्यावेळी मला अपघात झाला होता तेव्हाची गोष्ट.
इंडीकामध्ये मी एकटाच होतो व एन.एच.८ वर जास्तवेगाने नाही पण नियमाप्रमाणे ९० -१०० चा वेग ठेऊन गाडी चालवत होतो व अचानक काही कळायच्या आत माझ्या डाव्याबाजूने एका वाहनाने [जीप] मला इंजिनबाजूला टक्कर मारली व माझी गाडी अत्यंत वेगाने उजव्याबाजूला फिरली व रस्ताच्या मधोमध असलेल्या डीवाडर वर जाऊन आदळली पण दोन्ही रस्ता वर खाली अश्या प्रकारचा होता ज्या मार्गावर मी होतो तो उलटमार्गाच्या ६-७ फूट उंचीवर असल्यामुळे माझी गाडी ही तिरकी डिवाडर वर उभी राहीली व झुलू लागली मी सीट बेल्ट बाधला असल्यामुळे व जोरदार झटका लागल्यामुळे तो माझ्या शरिराला चिटकूनच एकदम अडकुन बसला होता व मी किती ही जोर लावला तरी निघत नव्हता व गाडी माझ्या बाजूला कलडणार त्याच्या १ मिनिट आधी मी माझ्या जवळ असलेल्या मिलट्री नाईफ [सर्वौपयोगी] ने तो पट्टा तोडला व बाहेर पडलो पण नशीब फारच चांगले नव्हते व गाडी जेव्हा कलडली त्यावेळी मी गाडीतून बाहेर आलो होतो पण माझा डावा हात हा गाडीच्या वर ठेवला गेला असल्यामुळे गाडी च्या व दरवाजाच्यामध्ये मधोमध हात अडकला व तुटला. पण नशीब हातावरच निभावले , कारण ज्यावेळी ती गाडी कलडली त्यावेळी जर मी गाडी मध्ये असलो असतो तर शक्यतो जीव देखील शिव [शंकराचे दुसरे नाव] म्हणाला असता व मी वर... देवा जवळ .... व तुम्ही सगळे मित्र-मंडळी माझ्यावर एखाद-दुसरी चर्चा करत बसला असता ;}
अनुभवावरुन सांगत आहे, मशीन्स् वर स्वतः पेक्षा जास्त विश्वास ठेवणे म्हणजे स्वतःचा व दुस-यांचा जीव धोक्यात घालणे.
राज जैन
*********
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "