आसपासच्या तारखेचा वारः एक अगणिती बिनडोक पद्धत

तुम्हाला आजचा वार माहीत आहे ना?
मग कुठल्याही दुसर्‍या तारखेचा वार सांगता येईल का? तत्त्वतः हो, पण प्रत्यक्ष कठीण वाटते ना?
तशी काही लोकांना कोणत्याही तारखेचा वार सांगण्याची विद्या अवगत असते. पण हे करण्यासाठी काही विशिष्ट सूत्रे पाठ करावी लागतात व बरीच आकडेमोड करावी लागते. पण होते काय की स्मरणशक्ती धड नसणार्‍या माझ्यासारख्या माणसाला अमुक तारखेचा वार कोणता हे शोधण्यासाठी या सगळ्या पद्धतींचा काहीच उपयोग होत नाही.

शेवटी आठवायला फार कष्ट न पडणारी व किचकट आकडेमोड करायला न लागणारी एक सोपी पद्धत मला मिळाली ती खाली देत आहे.
[अर्थात सोपी असल्यामुळे हिच्या सहाय्याने आसपासच्या तारखांचेच वार मिळू शकतात हे आधीच सांगतो.]

तुम्हाला एकच वार लक्षात ठेवायचा आहे.
आणि
४/४, ६/६, ८/८, १०/१०, १२/१२,
९/५, ५/९,
११/७, ७/११,
फेब्रुवारीअखेर.

हे काय आहे? तर कोणत्याही वर्षातील लक्षात राहण्याजोग्या १० तारखा आहेत.
४ एप्रिल, ६ जून, ८ ऑगस्ट, इ.
फेब्रुवारीअखेर ही त्या त्या वर्षाप्रमाणॅ बदलू शकते (२८ किंवा २९).
असे बारापैकी १० महिने आटोक्यात आले.

आश्चर्यकारक गम्मत म्हणजे या सर्व तारखांना एकच वार असतो -
या वर्षी (२००७ मध्ये) तो बुधवार आहे.

आता आपल्याला हवी असलेली तारीख कुठेतरी या तारखांच्या आसपास असणार.
उदा. आजची तारीख २६ सप्टेंबर.
आपल्याला माहीत आहे की ५ सप्टें ला (५/९) बुधवार आहे, म्हणून ५-१२-१९-२६ ला बुधवार.
म्हणजे २६ सप्टें ला बुधवार.
अशा प्रकारे ह्या वर्षातील कोणत्याही तारखेच्या आसपासची एखादी तारीख पाहून सहजपणे वार शोधता येईल.

पण हे वर्ष सोडून इतर वर्षांचे काय?
तर २००६ साली हा वार एक अलीकडचा म्हणजे मंगळवार होता. २००८ साली ते लीप वर्ष असल्यामुळे २ घरे सरकून शुक्रवार होणार.
एकदा एवढे कळले की पुढे सगळे सोपे आहे नाही का?

कसे वाटते?

(स्रोत: महाजाल)

लेखनविषय: दुवे:

Comments

अरे वा!

चांगली पद्धत आहे. विशेषतः संभाषणात एखाद्या तारखेचा वार आठवत नसल्यास ही पद्धत सोपी आहे. वारंवार वापरली तर वार न् वार सांगता येऊ शकेल. :) (थैल्लर्ययुक्त विनोदाबद्दल क्षमस्व.)

आवडली

पध्दत आवडली. आता प्रयत्न करू.

दिगम्भा तुम्ही कमी का लिहता. जरा अजून पण लेख लिहा.

फारच छान

अगदीच जानेवारीतला वार हवा असेल तर आदल्या वर्षाचा आधार घ्यावा लागतो.
म्हणजे २००७ चे सर्व ४/४, ६/६... वर सांगितल्याप्रमाणे, आणि २००८ चा २/१ (जानेवारी २) : सर्व बुधवार

फेब्रुवारीचे दिवस २८-२९ असे बदलत असल्यामुळे २००८-जानेवारी २००७-वर्षाच्या जवळची. फार पूर्वी वर्षगणना मार्च-सुरू ते फेब्रु-अंत अशी चालायची.

४/४/ ६/६ ८/८ १०/१० १२/१२ या सगळ्यांचे वार एकच असणार हे दिगम्भांनी सांगितल्यानंतर लख्ख दिसले - पण अशी "उघड गुपिते" पहिले बघणारे निरीक्षण म्हणजे कमाल!

जानेवारी?

फ़ेब्रुवारी आणि मार्चच्या तारखांचे वार एक असतील हे आपण समजू शकतो. पण जानेवारीचे काय ? का ते ऑक्टोबरसारखे हे लक्षात ठेवायचे ? पण काही म्हणा रीत अतिशय सोपी आहे. अगदी अगणिती आणि बिनडोक!
पण नेहमीची सर्वसमावेशक रीत, थोडी आकडेमोड असली तरी, काही फार अवघड नाही.
महिन्याचे संकेतांक लक्षात ठेवावे : जा-फ़े-मा-ए= १-४-४-०; मे-जू-जु-ऑ= २-५-०-३; स-ऑक्टो-नो-डि= ६-१-४-६.
थोडक्यात: १,४,४,०;२,५,०,३; ६,१,४,६. (लीप वर्षासाठी जानेवारी ०, फ़ेब्रुवारी ३.)
एकविसाव्या शतकातील (संकेतांक उणे १) २६ सप्टेम्बर '७ साठी:
वर्ष--------------------------------------७
मिळवा(७ भागिले चार; बाकी उरल्यास सोडून द्या.)---१
महिना सप्टे-संकेतांक--------------------------६
तारीख -----------------------------------२६
शतक(एकविसावे)-संकेतांक-----------------(-)१
बेरीज------------------------------------३९
३९ भागिले ७, बाकी उरली ४. म्हणजे रविवार पहिला धरून चौथा वार-बुधवार.

विसाव्या शतकासाठी-संकेतांक शून्य. १९व्यासाठी२, अठराव्यासाठी ४. या पद्धतीने १४ स्प्टेंबर १७५२ च्या पुढल्या कुठल्याही तारखेचा वार काढता येतो. --वाचक्‍नवी

 
^ वर