संवादकला -१: सभाधीटपणा

समाजातील सर्व व्यक्तींना ज्याची कायम भीती वाटते अशा काही समान गोष्टी आहेत. मृत्यू, साप वगैरे. सभेत बोलण्याची भीती ही अशीच एक सर्वसामान्य गोष्ट.. सभा याचा अर्थ येथे व्यक्तींचा समुदाय असा घ्यावा. 'वक्ता दससहस्त्रेषु' याचे कारण हेच असावे. चार लोकांसमोर देण्याचे प्रेझेंटेशन असो किंवा हजार लोकांच्या सभेत करायचे भाषण असो, नवीन वक्त्याची अवस्था साधारण सारखीच असते. हृदयाची धडधड वाढणे, तोंडाला कोरड पडणे, आवाज थरथरणे, पाय कापणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्मरणशक्तीने पूर्ण दगा देऊन काहीही न आठवणे. याचा परिणाम म्हणून मग तोंडातल्या तोंडात पुटपुटणे, अतिशय गडबडीने बोलणे आणि लवकरात लवकर आपले भाषण संपवणे अशी नवख्या वक्त्याची प्रतिक्रिया होते. 'नको ती सभा आणि नको ते बोलणे' म्हणून असे प्रसंग टाळण्याकडेच लोकांचा कल असतो.

या सगळ्या प्रतिक्रियेचे कारण अतिशय आदिम आणि भौतिक आहे. संकटाला सामोरे जायची वेळ आली की एकतर त्याचा सामना करणे किंवा त्याच्यापासून पळून जाणे हे प्राणिमात्रांच्या रक्तात फार पूर्वीपासून भिनले आहे. 'फाईट ऑर फ्लाईट' रिस्पॉन्स म्हणतात तो हाच. दोन मांजरे एकमेकांची भांडताना जशी आपल्या अंगावरचे सगळे केस फुलवून आपला आकार आहे त्यापेक्षा मोठा दाखवण्याचा प्रयत्न करतात, तसेच हेही. संकटाशी सामना करायची वेळ आली की अंगावरचे केस उभे रहाणे, रक्तातल्या विशिष्ट हार्मोन्सचे प्रमाण वाढून हृदयाच्या स्पंदनाचा वेग वाढणे, मलमूत्र विसर्जनाची भावना होणे (अनावश्यक वजन कमी करुन अधिक वेगाने पळून जाता यावे या कारणासाठी) ही सगळी अगदी सामान्यतः आढळणारी लक्षणे आहेत. भीती वाटली की थोड्याफार प्रमाणात सगळ्यांची हीच अवस्था होते.

पण चार लोकांसमोर बोलताना हे असे का व्हावे? ही भीती नेमकी कशाची आहे? भीतीचे कारण कळाले की भीतीवर मात करणेही सोपे जाते असे सोपे मानसशास्त्र आहे. अंधार्‍या बोगद्यात जायची आपल्याला भीती वाटते याचे कारण अंधार नव्हे. अंधारात भिण्यासारखे काही नाही, हे आपल्यालाही माहिती असते. हे भय असते अंधारात दबा धरुन बसलेल्या अज्ञाताचे. विजेरीच्या प्रकाशात बोगद्यात काही नाही हे कळाले, की हे भयही नष्ट होते. 'फिअर ऑफ दी अननोन'. सभेत बोलण्याचेही असेच आहे. ही भीती चार लोकांसमोर बोलण्याची नाही. तर बोलताना आपले काहीतरी चुकेल आणि श्रोते आपल्याला हसतील आणि आपल्या आत्मसन्मानाला जखम होईल, हे ते भय आहे. आता भयाचे हे कारण समजून घेतले तर त्या भयावर मात करणेही शक्य झाले पाहिजे. सभेत बोलण्याचे भय कमी करुन सभाधीटपणा कसा वाढवता येईल याची काही सूत्रे आपण येथे पाहू.

एकतर श्रोते आपल्याला हसतील, आपली टिंगल करतील ही भावना नष्ट करण्याचा प्रयत्न करा. असे करण्याचे बरेच मार्ग तज्ञांनी सुचवले आहेत. श्रोते अजिबात महत्वाचे नाहीत अशी कल्पना करणे, श्रोते हे विदूषकी टोप्या घातलेली तीन चार वर्षांची मुले आहेत अशे चित्र डोळ्यासमोर आणणे किंवा ते चक्क नग्नावस्थेत बसले आहेत अशी कल्पना करणे वगैरे. माझ्या मते हे सगळे मार्ग नकारात्मक आहेत. माझ्या मते सगळ्यात योग्य मार्ग म्हणजे सगळे श्रोते हे आपल्या बाजूने आहेत, आपले मित्र आहेत आणि आपण एखादी चूक केली तरी फारसे गंभीर काही होणार नाही अशी कल्पना करणे. येथे भीती या नकारात्मक उर्जेचा आपण सकारात्मक उपयोग करुन घेतो. एकदा असे झाले की मग तुमचा आत्मविश्वास वाढतो, तुमची देहबोली सुधारते आणि हळूहळू तुमचे भाषण अधिकाधिक प्रभावी होऊ लागते.

पण फक्त श्रोत्यांची भीती गेली म्हणजे सगळे झाले असे नव्हे. एखादे छोटेसे प्रेझेंटेशन असो, किंवा दीड तासाचे व्याख्यान असो, कसून तयारी करण्याला पर्याय नाही. तुमच्या विषयातली सखोल आणि अद्यावत माहिती मिळवा, भाषणाचा कच्चा आराखडा तयार करा,( 'टेल देम व्हॉट यू आर गोईंग टु टेल देम, टेल देम, टेल देम व्हॉट यू हॅव टोल्ड देम') त्यातले कच्चे दुवे शोधा, कोणत्या मुद्द्यांवर प्रश्न विचारले जातील याचा अंदाज घ्या, त्याची उत्तरे तयार करा. शक्य होईल तेंव्हा पॉवर पॉइंट, किमान ओएचपीच्या स्लाईडस वापरा. पण सर्वस्वी त्यांवर अवलंबून राहू नका. पीपीटी न उघडणे, वीज जाणे असे होऊ शकते. बॅकअप म्हणून एका छोट्याशा कार्डवर महत्वाचे मुद्दे लिहून ते स्वतःजवळ ठेवा. भाषण पाठ करु नका, फक्त महत्वाचे मुद्दे लक्षात ठेऊन उत्स्फूर्तपणे बोलण्याचा प्रयत्न करा. सवयीने हे जमते.

तुम्ही पहिल्यांदाच भाषण देत असाल किंवा एखादे महत्वाचे भाषण द्यायचे असेल तर त्याची रंगीत तालीम जरुर करा. आरशासमोर राहून स्वतःशी अधिकाधिक नेत्रसंपर्क साधण्याचा सराव करा. श्रोत्यांशी सहजसोपा आणि नैसर्गिक नेत्रसंपर्क साधता येणे हे आत्मविश्वासाचे द्योतक आहे. जमिनीकडे, छताकडे किंवा खिडकीबाहेर बघत बोलणारा वक्ता न्यूनगंडाने पीडित असतो. किमान श्रोत्यांना तरी तसेच वाटते. तुम्हाला जर विशिष्ट कालमर्यादेत भाषण द्यायचे असेल तर तुमचे भाषण रेकॉर्ड करा. भाषणाची कालमर्यादा न पाळणे हे अव्यावसायिक समजले जाते. अगदी शेवटी काही जवळच्या मित्रांसमोर तुमच्या भाषणाची रंगीत तालीम करा. मित्र असे असावेत की जे तुमचे दोष आणि तुमच्या चुकाही तुम्हाला मोकळेपणाने सांगू शकतील.

एखाद्या नवीन ठिकाणी भाषण द्यायचे असेल तर त्या ठिकाणाला आधी जरुर भेट द्या. व्यासपीठ, श्रोत्यांची बसण्याची रचना, ध्वनीवर्धक हे तुमच्या परिचयाचे होऊ द्या. व्यासपीठावरील जागेचा तुम्हाला प्रभावी वापर करता आला पाहिजे.

आणि अगदी भाषणाच्या आयत्या वेळी तणावरहित रहाण्याचा प्रयत्न करा. पाणी प्यावेसे वाटले तर ते भाषणाच्या आधी किंवा नंतर प्या. अगदीच मोठे भाषण असेल तर गोष्ट वेगळी. आपल्या जागेवरुन उठण्याआधी, प्रत्यक्ष भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी आणि प्रत्येक वाक्यानंतर एक मोठा श्वास घ्या. व्यासपीठावर पोचल्यावर बोलायला सुरुवात करण्यापूर्वी काही सेकंद शांत उभे रहा. याने श्रोत्यांचे लक्ष आता हा माणूस काय बोलणार आहे या उत्सुकतेने तुमच्यावर केंद्रित होईल. एखाद्या मित्राकडे पहा (गरज वाटत असेल तर अशा एखाद्या मित्राला मुद्दाम पहिल्या रांगेत बसवण्याची व्यवस्था करा), नंतर इतरांकडेही पहा आणि हसर्‍या मुद्रेने बोलायला सुरुवात करा. एखादा दर्जेदार आणि बहुतेकांना माहिती नसलेला विनोद, एखादा खेळकर प्रश्न यांनी भाषणाची सुरुवात करता आली तर पहा, पण ओढूनताणून तसा प्रयत्न करु नका. सावकाश आणि स्पष्टपणे बोला. भाषणाची सुरुवात नेहमी सकारात्मक ठेवा. 'हे माझे पहिलेच भाषण आहे, कृपया सांभाळून घ्या','हा काही फारसा रंजक विषय नाही, पण मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे' अशी सुरुवात टाळा. आधी झालेल्या भाषणांशी तुमच्या भाषणाची तुलना करु नका. धर्म, जात, राजकीय मते, शारिरीक व्यंग असे उल्लेख टाळा. स्वतःचे भाषण तुम्हाला स्वतःला 'ऍन्जॉय' करता आले पाहिजे. भाषणाचा शेवट एखाद्या हुकमी एक्क्याने करा. आपल्याला नक्की कुठे थांबायचे आहे याचे भान असू द्या, आणि तेथेच थांबा.

वक्तृत्वकला ही काही अंशी तरी प्रयत्नसाध्य आहे. एखादे सुरेख भाषण संपवल्यावर होणारा टाळ्यांचा कडकडाट मनात केवढे मोठे कारंजे फुलवतो, हे शब्दांत सांगता येणार नाही. आणि इतरांकडून होणारी प्रशंसा कशाला, 'दि रिवॉर्ड ऑफ अ जॉब वेल डन, इज हॅविंग डन इट' या न्यायाने एक चांगले भाषण संपवून खाली उतरताना हलकी झालेली पावले त्या भाषणाच्या तयारीसाठी घेतलेले सारे श्रम आनंदाने विसरायला लावतात, हे काय कमी आहे?

शुभेच्छा.

लेखनविषय: दुवे:

Comments

मस्तच

खूपच छान सांगीतले आहे तुम्ही. सूचना खूपच उपयोगी आहेत. हा एक महत्वाचा विषय आहे तो मांडल्याबद्दल धन्यवाद.

नशीब आम्हाला एका वर्गात कंपलसरी प्रात्याक्षीक करायला लावले म्हणून जरातरी हळूहळू जमले, स्वत:हून काही पूढे बोलायला जायला आम्ही प्रमोदराव नाही (म्हणजे तेवढा आत्मविश्वास, कौशल्य हा देवसाहेब). पहिली सूरवात थोडी गड्बड होणारच. शेवटी सरावानेच साध्य होणारी ही कला.

नो ऑफेन्स संजोपराव पण हा विषय थोडा प्रात्याक्षीकबेस्ड आहे म्हणजे पोहण्याचे पुस्तक छान असेल खूप उपयूक्त पण प्रत्यक्षात पाण्यात हातपाय मारले की मगच.....

थिअरी आणि प्रॅक्टीकल

तुमचे म्हणणे बरोबर आहे. विमान उडवण्यासाठी प्रशिक्षण देताना एक 'प्लाईट सिम्युलेटर' असतो. त्याच्याही आधी विमान उडवण्याची तांत्रिक माहिती देणारे धडे असतात. पण शेवटी विमान उडवणे हा अनुभव वेगळाच. ती तांत्रिक माहिती देण्याचा हा प्रयत्न. यातून धडे घेऊन प्रत्येकाने स्वतःचे विमान उडवायला शिकावे, ही अपेक्षा.
सन्जोप राव

बरोबर

एकदम सहमत.

तुमचे इंस्ट्रकशन मॅन्युअल मात्र खरेच छान आहे.

भाग् २ ची जास्त वाट बघायला लावू नका. :-)

मस्त

लेख आवडला, रावसाहेब. पहिल्यांदा असं भाषण करायची जेव्हा वेळ आली तेव्हा झालेली 'सीदन्ति मम गात्राणि, मुखं च परिशुष्यति' ही अवस्था आठवली लेख वाचून.

आता भयाचे हे कारण समजून घेतले तर त्या भयावर मात करणेही शक्य झाले पाहिजे. -- हे सूत्र पटले, आवडले. हा आपल्या अध्यापनाचा विषय/विषयाचा एक भाग असल्याने (खरडवही-डोकावणारा टॉम-गिरी), या लेखमालेच्या पुढील भागांची उत्सुकतेने वाट पाहतो आहे.

नंदनशी सहमत!

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
माझ्या पहिल्या भाषणाचा(अर्थात पाठ केलेल्या) किस्सा मी ह्या आधी आपल्यासमोर मांडलेलाच आहे. माझीही परिस्थिती नंदन म्हणतो तशीच झाली होती.
पुलंचे एक वाक्य आहे " सार्वजनिक सभेत भाषण करताना जर पहिल्या तीन वाक्यात हशा वसू्ल नाही केलात तर तो फाऊल धरला जातो" !
ह्यातला गमतीचा भाग जरी सोडला तरी त्यातून आपल्या स्वत:मध्ये(वक्ता) आणि श्रोत्यांमध्ये एक संवाद प्रस्थापित होतो . आपला आत्मविश्वास वाढतो आणि श्रोतेही आपले पुढचे बोलणे ऐकायला उत्सुक होतात.
संजोपरावांनी अतिशय मुद्देसुद पणे हा विषय मांडलाय त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद;पण सहजराव म्हणतात त्याप्रमाणे निव्वळ शाब्दिक सुचनांनी हे प्रत्येकालाच जमणार नाही. तिथे प्रात्यक्षिक जास्त चांगल्या प्रकारे काम करू शकेल.

फाऊल

" सार्वजनिक सभेत भाषण करताना जर पहिल्या तीन वाक्यात हशा वसू्ल नाही केलात तर तो फाऊल धरला जातो" !

पुण्यात बरंका..

अभिजित...
कोंबडी पळाली गाण्यावर नाचलं की भरपूर व्यायाम होतो.

वा

रावसाहेब,
मह्त्त्वच्या विषयावर आणि सुंदर लेख आहे.
आपले सर्वच मुद्दे अतिशय चांगले आहेत.

माझ्या पहिल्या मुलाखतीच्या वेळेला आणि पहिल्या प्रेसेंटेशनच्या वेळेला मला या सर्वांतून जावे लागलेच. पण मी आरशा समोर सराव केला होता :). तसेच समोरचे लोक मला का हसतील? तर माझी चूक झाली आणि ते मला आणि इतरांना जाणवले तर मी लगेच हसून-क्षमा मागून पुढे जाईन. असे स्वतःला समजावून सांगितले होते. त्या सर्वाचा उपयोग झाला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे बोलायचे आहे ते आपल्याला पक्के महित असेल तर बोलायला लगले की सर्व भीति जाते हेच खरे.

-- लिखाळ.
मला समजते असे मला अनेकदा वाटते हेच माझ्या असमंजसपणाचे निदर्शक आहे.

मस्त

रावसाहेब, बर्‍याच दिवसांनी चांगला लेख वाचला उपक्रमावर. अनेकांना याचा नक्किच फायदा होइल.

मराठीत लिहा. वापरा.

उत्तम लेख

लेख उत्तम आहे. थिअरी माहित असली की प्रॅक्टिकल करण्यास मदतच होते. आपल्या लेखात मला अजून एक मुद्दा जोडावासा वाटतो, तो म्हणजे ज्या विषयात आपला अधिक अभ्यास अथवा कौशल्य आहे, शक्यतो अशा विषयावरच भाषण करावे, म्हणजे भाषणात सहजता व मुद्देसूदपणा येतो.

जयेश

खरे आहे

ज्या वेळी विषयाच्या निवडीचे स्वातंत्र्य असते त्या वेळी आपल्या आवडत्या विषयावर बोलावे, हे खरे आहे.
सन्जोप राव

सभा जिंकणे

वक्त्याने सभा जिंकली तर मग हरतं कोण? वक्ता ट्रान्समीटर व श्रोता रिसिव्हर अशी विभागणी केली तर ती मला त्यात दरी दिसते. काहींचे भाषण हे भाषण न वाटता तो संवादच वाटतो.उदा. अनिल अवचट. काही वक्ते श्रोत्यांना असे गुंगवून टाकतात कि प्रश्नांकित असलेला विषयाचे उत्तर मिळाले नाही तरी त्याला मिळाल्यासारखे वाटते. कमी वेळात मुद्देसुद व आशयपूर्ण बोलणे मात्र तंत्र आहे ( कि कला?)
प्रकाश घाटपांडे

टोस्टमास्टर्स्

टोस्टमास्टर्स् नावाच्या संस्थेच्या गावोगावी पसरलेल्या शाखांमधून या फिअर ऑफ अननोन चा नि:पात करण्याचा पध्दतशीर प्रयत्न केला जातो. सदस्य महिन्यातून एक दोनदा जमतात. प्रत्येक सेशनला कोणी एक टाईमकीपर होतो, तर कोणी प्रत्येक वक्त्याचं "अं अं अं" मोजून त्याचा हिशोब ठेवतो, वगैरे. सदस्य एकमेकांच्या साक्षीने, मदतीने, आणि प्रोत्साहनाने सभाधीट होत जातात, आणि वरवरची आव्हानं (उस्फूर्त भाषणं, वगैरे) पेलत जातात.

इथे पुण्यातही काही शाखा आहेत. पत्ते वरील दुव्यावरून मिळतीलच.

- कोंबडी

चांगला लेख्!

लेख चांगला झाला आहे. (स्वतःचे अनुभव आठवले)

या वरून आठवलेला एक किस्सा:
असे म्हणतात की माणसांना मृत्यूपेक्षाही जास्त भीती कसली वाटत असेल तर ती सभेत बोलण्याची. हे खरे असेल तर एखाद्या शोकसभेत बोलणार्‍या माणसाला थडग्यात (किंवा चितेवर) अधिक सुरक्षित वाटेल का?
(हा जावईशोध माझा नाही - जेरी साईनफेल्डच्या एका कार्यक्रमात ऐकले होते. शिवाय मूळ इंग्रजी विनोदाचे न-भाषांतर झाले असे वाटते आहे; रसभंगाबद्दल हार्दिक दिलगिरी!)
------------------------------------------
तुम्ही सध्या हे वाचत आहात.

यस

जेरी साईनफेल्डच्या एका कार्यक्रमात ऐकले होते

आठवले.

वा!

उशीर झाला प्रतिसाद द्यायला.
आपला लेख खुप आवडला.
शक्य होईल तेंव्हा पॉवर पॉइंट, किमान ओएचपीच्या स्लाईडस वापरा. पण सर्वस्वी त्यांवर अवलंबून राहू नका. पीपीटी न उघडणे, वीज जाणे असे होऊ शकते. बॅकअप म्हणून एका छोट्याशा कार्डवर महत्वाचे मुद्दे लिहून ते स्वतःजवळ ठेवा. भाषण पाठ करु नका, फक्त महत्वाचे मुद्दे लक्षात ठेऊन उत्स्फूर्तपणे बोलण्याचा प्रयत्न करा. सवयीने हे जमते.

हे फार महत्वाचे आहे. अनेकदा केवळ तंत्रज्ञानाने दगा दिला म्हणून बोलण्याच्या तयारीनीशी आलेल्या चांगल्या वक्त्यांची वाट लागलेली पाहिली आहे.

पहिल्याच संवादात जर हशा मिळाला तर उत्तमच आहे! संवाद सोपा होतो असे वाटते.
वक्ता खुप काही 'शिकवायला' आला आहे असे जानवले तर श्रोते ही वाट लावू शकतात. तेव्हा "मी ही शिकतोच आहे... हे मला कळले..कदाचित चुकीचेही असेल पण सांगतो" असा काहीसा पवित्रा मदत करून जातो असेही वातते.

आपला
वाचाळ
गुंडोपंत

चांगले

चांगले जमले आहे. लवकर भाग २ येऊ द्यात!
(अवांतरः आपण १५ ऑगस्टला शास्त्रीय तानाबिना असलेले समूहगान गात असताना समोर कोणी जांभया देत असले तर 'आय कॉन्टॅक्ट' चा प्रयोग पडतो आणि आपल्याला हसू कोसळते असा स्वानुभव. (म्हणजे टारगट श्रोत्याशी आय कॉन्टॅक्ट हास्यस्फोटक ठरु शकतो.))

सहमत

भाग दुसराही येऊ द्या.


आम्हाला येथे भेट द्या.

न झाला तरच बरे!

(म्हणजे टारगट श्रोत्याशी आय कॉन्टॅक्ट हास्यस्फोटक ठरु शकतो.))
काही श्रोत्यांकडे न बघितलेलेच बरे असते यात शंका नाही!
पण हे गाणे म्हणतांना 'संवाद' साधणे अवघडच असते. पण साधता येतो हे ही तितकेच खरे!
(हे कुणाचे तरी पाहून म्हणतोय, गुंड्या काही गाणे म्हणत नाही... म्हणजे झेपत नाही!)
आपला
गुंडोपंत

छान विषय

संजोपजी,
संवादकला हा विषयच खूप छान आहे, लेख तर आवडलाच, भाग २ लवकर येऊ देत.
आपण ज्या श्रोत्यांपुढे बोलणार आहोत,त्यांचा वर्ग (कॅटेगरी? )ध्यानात घेतला तर उपयोग होतो असे वाटते.उदा: कामगार वर्गासमोर देण्याचे भाषण, शाळाकॉलेजातील मुलांसमोर भाषणातून साधलेला संवाद ..समोरच्या श्रोत्यांनुसार भाषेत,दिल्या जाणार्‍या दाखल्यात,उदाहरणात थोडा बदल करावा लागतो. एकच विषय वेगळ्या पध्दतीनी पेश करावा लागतो. तुम्हाला काय वाटते?
स्वाती

ते तर आहेच

समोरच्या श्रोत्यांनुसार भाषेत,दिल्या जाणार्‍या दाखल्यात,उदाहरणात थोडा बदल करावा लागतो. एकच विषय वेगळ्या पध्दतीनी पेश करावा लागतो.
असे तर आहेच. तिथेच वक्त्याचे खरे कौशल्य असते. सभेचा, प्रतिसादाचा अंदाज घेऊन आपले भाषण 'फाईन ट्यून' करणे ही पुढची पायरी.
सन्जोप राव

आणखी काही...

१. तुम्ही जे बोलणार आहात, ते प्रेक्षकांनी स्लाईडमध्ये आधीच वाचू नये याची खबरदारी घ्या.
२. स्लाईडमध्ये १६ पेक्षा कमी आकाराचा टंक वापरू नका.
३. एका स्लाईडवर सहा ओळी/मुद्दे आदर्श. नुसतेच मुद्दे लिहा, वाक्ये नको.
४. ऍब्रिव्हिएशन वापरत असाल तरी देखील उच्चार पूर्ण शब्द समुहाचा करा. (अर्थात नवखा असेल तर)
५. शक्यतो मासॉची पुरवलेली डिजाइन्स वापरा. ऐनवेळी बदल करणे सुलभ होईल. ;)
६. स्लाइडवरची माहिती अपुरीच असू द्या. याने तुमच्यी बोलण्याकडे लक्ष देणे अपरिहार्य ठरेल.
७. नोंद घ्यावे असे काही असेल तर ती माहिती मात्र स्लाईडस् वर द्या.
८. शक्य तिथे स्त्रोत, संदर्भ दर्शवा. (हे सांगितलेच नाही तरी चालतील.)

(अवांतर : पीडीएफ मध्येही सुरेख सादरीकरण करता येते. (बनवता नव्हे) अशीही एक वाचनमात्र कॉपी जवळ बाळगा.)

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

अजून काही मुद्दे

लेख आणि लेखाचा विषय दोन्ही आवडले. काही मुद्दे थोड्याफार स्वानुभावातून आणि निरीक्षणातून सांगावेसे वाटतातः

एखाद्याने वक्ता होयचे का नाही हा एक वेगळा प्रश्न असेल पण लोकांमधे निर्भिडपणे बोलायला शिकलेच पाहीजे. याचा अर्थ कुणाचा उपमर्द अथवा कुणावर टिका करूनच असा नाही, तर मुद्देसूद बोलता आणि आपले विचार इतरांपर्यंत पोचवता यायला हवेत. त्यासाठी पण राव साहेबांनी सांगीतलेले मुद्दे महत्वाचे वाटतात.

अमेरिकेत अजून एक प्रकार घडतो (भारताबाहेर इतरत्र माहीत नाही) की इंग्रजी बोलण्याचा "ऍक्सेंट" वेगळा असू शकतो. एक गोष्ट नक्की की ऍक्सेंटची नक्कल करायच्या ऐवजी आपल्याच उच्चारात बोलल्यास ते जास्त चांगले दिसते. काही अपवाद लक्षात ठेवावे लागतात, उ.दा. शेड्यूल नाही तर स्केज्यूल, मॅसॅच्युसेट्स मधे "Worcester" नावाचे गाव आहे त्याचा उच्चार भारतीयच काय पण बाहेरील अमेरिकन्स पण "वुरसेस्टर" करतात, पण इथल्या पद्धतीने तो "वुस्टर" असा आहे! तर असे काही स्थानीक शब्द.. बाकी आत्मविश्वास.

जशी भाषणाच्या बाबतीत तयारी करावी लागते तशीच श्रोत्यांची जाणपण असावी लागते. आपण कुठे, कुठल्या विषयावर आणि कोणत्या प्रकाराच्या समुदायात बोलतो ते माहीत असणे महत्वाचे असते. विषयाबाबत माहीती असणे हे शास्त्रीय बाबतीत सहज शक्य असू शकते, पण जर असेच "पब्लीक स्पिकींग" जर सामाजीक गोष्टींबद्दल करण्याची गरज आली तर केवळ विषय माहीत असून चालत नाही तर तळमळ आणि आवड असणे गरजेचे असते तरच समोरच्याला आपले बोलणे आवडू शकते, पटू शकते (आणि गरज असेल तर समोरच्यास चारी मुंड्या चीत करू शकतो). Impromptu असेल तर अवांतर गोष्टी पण माहीत असाव्या लागतात. (हे पण अनुभवाचे बोल आहेत).

आचार्य अत्र्यांच्या "मी वक्ता कसा झालो?" ह्या पुस्तकातील पहीला लेख याच संदर्भातील आहे आणि मजेशीर तसाच वाचण्यासारखा आहे.

अवांतरः याच विषयाप्रमाणे दुसरा विषय म्हणजे मुलाखतीचा. एक खरा ऐकलेला किस्सा (थोडा जुन्या पिढीतला जेंव्हा कपड्यांचे नॉर्म्स विशेष नव्हते). नोकरीच्या मुलाखतीच्या वेळेस "टेन्शन आलेली एक व्यक्ती, (कदाचीत मुलाखतीच्या शेवटाला असेल) उभ्या उभ्या भावी साहेबाबरोबर बोलत होती. बोलता बोलता न खोचलेला बुशशर्ट हाताचे चाळे करत खालती ओढत सरळ करणे चालू होते. बाहेर आल्यावर लक्षात आले की बुश शर्टच्या ऐवजी अंगातील बनीयन शर्टच्या बाहेर काढून ती व्यक्ती ओढत होती!

देहबोली

देहबोली / हावभाव की काय ते इथून शिका.

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

क्यूऊऊऊऊऊट्!

शिकणं बिकणं सोडून द्या हो! मुलगी फारच क्यूट् आहे. फुल हाऊस मधल्या धाकटीची आठवण झाली.
धन्यवाद.

सहमत!

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
मीराताईंशी पूर्णपणे सहमत! खरेच मुलगी खूप गोड आहे आणि तिचे हावभावही तितकेच गोड आहेत.

लहान मुलं आणि एक्स्प्रेशन्स,

या वरून हा व्हिडिओ आठवला.. भाषा कोणती आहे माहीत नाही. ( या लेखाशी संबंधीत नसेलही कदाचित, क्षमस्व.. )
बाकी, हा लेख खुपच उपयुक्त आहे ! भाग २ येउद्या..

ही मुलगीही..

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
गोड आहे आणि तिचे हावभावही!

 
^ वर