ऍनिमल फार्म

जुन्या काळातील इंग्लंडमधील वातावरण आणि गुरांचा डॉ़क्टर असणारा एक तरूण आणि त्याचे अनुभव ही सहसा न आढळणारी पार्श्वभूमी असलेली ही कादंबरी नुकतीच वाचली आणि त्याची ओळख सगळ्या उपक्रमींना करून देण्यासाठी हा लेख लिहावासा वाटला.

जेम्स् हॅरियट हा ब्रिटिश व्हेटर्नरी सर्जन. त्याने त्याच्या प्रॅक्टिस सूरू करण्याच्या दिवसांपासून ते लग्न करून आयुष्यात स्थिर होईपर्यंतचा काल 'ऍनिमल फार्म' या कादंबरीत लिहिलेला आहे. या कादंबरीचा अनुवाद मराठीत अनंत मनोहर यांनी 'देवाघरची लेकरे' या नावाने केला आहे. मी नुकताच हा अनुवाद वाचला आणि मला तो खूपच आवडला.

जेम्स् जेव्हा पाच वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून प्रॅक्टिस करण्यासाठी बाहेर पडला तेव्हा इंग्लंडमधे शेतकर्‍यांना वाईट दिवस सुरू होते. आणि त्यामुळे मुख्यतः शेतकर्‍यांची गुरे हे रूग्ण असणार्‍या गुरांच्या डॉक्टरांनाही विशेष चांगले दिवस नव्हते. अशा परिस्थितीत जेम्स् सिग्फ्रीड फर्नान नावाच्या एका मूळ जर्मन परंतु इंग्लंडमधे स्थायिक झालेल्या एका व्हेटकडे असिस्टंट म्हणून कामाला लागतो. सुरूवातीलाच एका अवघड केसमधे योग्य निदान करून सिगफ्रीड्चे मन जिंकतो. आधी सिगचा आग्रह धरणारे शेतकरी हळूहळू जेम्सवरही विश्वास ठेवू लागतात आणि जेम्सपण त्या निष्पाप पण आपल्या गुराढोरांवर मनापासून प्रेम करणार्‍या माणसांमधे रमतो. शहरी शिष्टाचार माहित नसलेल्या त्या शेतकर्‍यांची प्रेम दाखवण्याची अनोखी पद्ध्त आपल्यालाही भावते.

सिगचा भाऊ असलेला ट्रिस्टन हे एक 'आनंदी प्राणी' या सदरात मोडणारे व्यक्तिमत्व. हा पण व्हेट्चा अभ्यासक्रम शिकत असतो, पण आपल्या खाक्याने. सिगचे त्याच्याबद्दलचे मत म्हणजे तो एक आळशी आणि भावाच्या पैशांची उधळपट्टी पोरी आणि दारू यांच्यावर करणारा नालायक असे असले तरीही तो जेव्हा सुट्टीसाठी सिगकडे यायचा तेव्हा तो त्याच्यावर प्रेमच करायचा. ट्रिस्टनला काहीतरी उद्योग हवा म्हणून सिग डुकरे पाळण्याचा निर्णय घेतो. तो सगळा प्रसंग अतिशय मजेशीर आहे. तसेच ट्रिस्टनचा वेंधळा स्वभाव आणि सिगचा विसरभोळा स्वभाव यातून निर्माण होणारे किस्से हे देखिल मुळातून वाचण्यासारखे आहेत.

आपल्या ट्रिन्की या कुत्र्यावर मुलासारखे प्रेम करणारी एक श्रीमंत विधवा आणि त्या प्रेमापोटी त्याला केक खायला घालून घालून त्याची तब्येत बिघडल्यावर जेम्सला बोलावणी पाठवणारी एक असहाय मलकीण हे एक असेच पात्र. ही बाई या ट्रिंकीचा काका म्हणून जेम्सला हाक मारायलाही कमी करत नाही! (यावेळी पु. ल. देशपांड्यांच्या 'पाळीव प्राणी'मधील विकी ही कुत्री आठवल्याशिवाय रहात नाही.)

अशातच जेम्स हेलन नावाच्या एका तरूणीच्या प्रेमात पडतो. त्यांचे प्रेम, कोर्टिंग आणि अखेर लग्न हा सगळा प्रवासही मजेशीर आहे. स्वतः अविवाहित असूनही जेम्सच्या लग्नाबाबतीत आग्रही असलेला सिग्फ्रीड आपल्याला आवडून जातो. जागेच्या अडचणीमुळे लग्न टाळणार्‍या आपल्या सहकार्‍यासाठी आपल्याच राहत्या घरात आणि व्यवसायात त्याला भागीदारी देतो. त्याचा दिलदार स्वभाव कुणालाही आवडेल असाच आहे. आजच्या गळेकापू स्पर्धेच्या दिवसांत तर हा स्वभाव विशेषच वाटतो.

अशी ही वेगळ्या विषयावरची कादंबरी एकदा तरी नक्कीच वाचण्यासारखी आहे.

Comments

वेगळी

कादंबरीची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. कथेवरून डिकन्सची आठवण होते पण बहुधा डिकन्सच्या बहुतेक कथांइतकी दु:खी नसावी. ऍनिमल फार्म हे शीर्षक वाचून थोडा गोंधळ झाला कारण याच नावाची जॉर्ज ऑर्वेलची कादंबरी आहे.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

चुकीची दुरूस्ती

मला वाटते तुमची शंका बरोबर आहे. मी मूळ पुस्तकाचे नाव चुकीचे दिले आहे. महाजालावर शोध घेतल्यावर असे दिसते की मूळ कादंबरी 'ऑल क्रीचर्स ग्रेट ऍन्ड स्मॉल' असावी. त्याचेच पुढचे भाग 'ऑल थिंग्स् ब्राइट ऍन्ड बियुटिफुल', 'द गॉड लॉर्ड मेड देम ऑल' वगैरे आहेत.

आवडली.

बाबूरावला,कादंबरीची ओळख आवडली.ऍनिमल फार्म वाचल्यावर पोयट्री फार्म बद्दल काही माहिती इथे मिळणार असे वाटले.

''मुक्त छंदात मात्रे नसतात हे म्हणने चूक असेल तर अभ्यासक खूलासा करतील.संपादक मंडळाने प्रतिसाद उडवायचे काय कारण ''?

वेगळा विषय

वेगळ्या विषयावरील आणि वेगळी पार्श्वभूमी असलेले लेखन मनाला सुखावून जाते. आपण पुस्तकपरिचय छान करून दिला आहे.
आपला
(वैविध्यप्रेमी) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"

मलाही

वा!
छान ओळख करून दिलीत. आवडली.
आता वाचायला हवी असे वाटले. वेगळ्या वातावरणाची गुंडोपंतांना नेहेमीच भूल पडते!
असे अजूनही येवू देत! वाचायला आवडेल.

पण मलाही वाटले होते की ही जॉर्ज ऑरवेलचीच कादंबरी आहे की काय!

असो. राजेंद्र त्यावरही लिहा ना काहीतरी... साम्यवाद गेला तरी आजच्या 'इक्वल ऑपॉर्चूनीटीच्या गप्पा मारणार्‍या जगातही' त्यातली मजा आहेच! (असेही बर्‍याच दिवसात काही लेखन आले नाहिये तुमच्या कडून. कुठेच 'गार पाणी न पडल्याने' खुप दिवसात मी वैचारीक आंघोळच केली नाही की काय असे वाटते आहे ;)) (ह. घ्या) )

आपला
पारोसा
गुंडोपंत

प्रयत्न करतो

राजेंद्र त्यावरही लिहा ना काहीतरी... साम्यवाद गेला तरी आजच्या 'इक्वल ऑपॉर्चूनीटीच्या गप्पा मारणार्‍या जगातही' त्यातली मजा आहेच!

गुंडोपंत,
आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. बघू या काय जमते ते. अर्थात कितपत वैचारिक असेल कल्पना नाही, कदाचित गरम पाण्याची आंघोळ होऊन जाईल. गंमत म्हणजे इकडे वैचारिक लेखनाचा आग्रह होतोय आणि तिकडे उखाण्यांचा. :-)

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

छान!

एका चांगल्या कादंबरीची ओळख करून दिल्या बद्दल आभार! नाव वाचल्यावर मलाही जॉर्ज ऑर्वेलोंचीच आठवण झाली कारण त्यांची ही कादंबरी जगप्रसिसध्द 'क्लासिक' आहे असो पुन्हा आभार!!

 
^ वर