तेवढेच 'ज्ञानप्रकाशां'त

प्रसिद्ध नाट्यछटाकार कै. शंकर काशिनाथ गर्गे उर्फ 'दिवाकर' यांच्या काही निवडक नाट्यछटा इथे देण्याचा मानस आहे . त्यात पहिल्यांदा....

तेवढेच 'ज्ञानप्रकाशां' त

"... हो, बरोबर, दोनदा आपल्याकडे येऊन गेलो मी. - नाही, काल नाही, संध्याकाळी आलो होतो ते परवा आणि सकाळचे जे म्हणता ती कालची गोष्ट. असो, गाठ पडली. चला. - हो ते विचारणारच होतो, की शेजारी एवढी गडबड कसली? सारख्या मोटारी अन् गाड्या येताहेत! बायकांची तर ही गर्दी लोटली आहे! - केंव्हा? आता मगाशी सहाच्या सुमारास? - नाही बोवा, तुम्ही सांगेपर्यंत वार्तासुद्धा नव्हती याची मला! आज बरेच दिवस आजारी आहेत, फारशा कुठे जात-येत नाहीत, येवढे ठाऊक होते! पण इतक्यात काही होईलसे.. बाकी बर्‍याच थकल्या होत्या म्हणा! ...साठ का हो! साठाच्या पलीकडे खास गेल्या होत्या!..असो.चला! मोठी एक कर्तीसवर्ती बाई गेली! पेशवाईनंतर महाराष्ट्रात इतक्या योग्यतेची मला नाही वाटत दुसरी कोणी असेलशी! खरे आहे.अगदी खरे आहे! मनुष्य आपल्यामध्ये असते, तोपर्यंत आपल्याला त्याची कल्पना नसते! - स्वभावाने ना? वा! फारच छान! अतिशय मनमिळाऊ आणि शांत! कटकट म्हणून नाही! - हळूहळू, थोडं थोडं , पण खरोखर मोठं कार्य केलं! अन् फारसा गाजावाजा न करता! - आधीच थोरामोठ्यातली ती! अन् रावसाहेबांचे वळण! मग काय विचारता! - बोलणे काय, चालणे काय आणि - हो! लिहिणेसुद्धा - तेच म्हणतो मी - की 'आठवणी' कशा नमुनेदार लिहिल्या आहेत! - मराठीत असे पुस्तक नाही आहे! - ते काय विचारायला नको! आज गर्दी म्हणजे - सगळा गाव लोटायचा आता! मोटारी आणि गाड्यांचा चालला आहे धडाका! - काय? खूपच लोटली आहे हो! दर्शनासाठी दिवाणखान्यातच ठेवलेले दिसते आहे त्यांना! चला येत असलात तर... जाऊ म्हणतो! इतकी माणसे जात आहेत तेंव्हा- हो गर्दी तर आहेच्! - राह्यलं. तब्येत बरोबर नसली तर नाही गेले! मला तरी कुठे येवढे जावेसे वाटते म्हणा! कारण आता गेले काय, अन् न गेले काय सारखेच! पण् बोवा 'अमुक एक फलाणे प्रोफेसरद्वय आले होते शेवटच्या दर्शनाला!' तेवढेच 'ज्ञानप्रकाशा'त....'

Comments

प्रकाश पाडावा ही विनंती :)

रावसाहेब नमस्कार.
दिवाकरांच्या नाट्यछटा येथे वाचायला मिळाव्यात हा योग चांगलाच आहे. आपणाला धन्यवाद.
शाळेत, 'बोलावणे आल्याशिवाय नाही' या शिवाय आमचा दिवाकरांशी परिचय नाही.
त्यामुळे आपली लेखमाला स्वागतार्ह आहे. पुन्हा एकदा धन्यवाद.

दोन दिवस विचार करूनही वरिल नाट्यछटेचा शेवट समजला नाही. म्हटले एक् दोन प्रतिसाद आले की अंदाज येईल. उगीच स्वतःच्या आकलन शक्तीची जाहिरात उपक्रमावर स्वतःच का करा? असा सूद्न्य विचार करून थांबलो होतो :) आज तुमचा याच शीर्षकाचा एक प्रतिसाद इतरत्र वाचूनही डोक्यात प्रकाश न पडल्याने हा प्रतिसाद लिहावा आणि ते समजून घ्यावे असे वाटले.

आपलाच,
-- (असमंजस) लिखाळ.

ज्ञानप्रकाश!

ज्ञानप्रकाश हे त्याकाळचे एक मान्यताप्राप्त दैनिक होते आणि त्यात ही बातमी (निधनाची) येईल तेव्हा अमुक अमुक हजर होते असे लिहून (तेव्हढेच 'ज्ञानप्रकाशात')येईल असे 'त्यां' ना म्हणायचे आहे

अरे बापरे !

हे समजणे फारच मुश्कील होते हो !!
प्रमोदराव, आपण प्रकाश टाकल्याबद्दल आपले आभार.
-- लिखाळ.

खरंय

शिवाय 'ज्ञानप्रकाशा'वर श्लेष अभिप्रेत असावा का?
ही नाट्यछटा येथे दिल्याबद्दल आभार.

-- नंदन

आवडले

थोडक्या शब्दात बरेच काही व्यक्त करणारे लेखन. तुम्ही दुसर्‍या एका लेखात दिलेली पार्श्वभूमी कळल्यावर अधिकच आवडले. पुढील नाट्यछटेच्या प्रतीक्षेत.

 
^ वर