नवीन कवितेतल्या मात्रा कशा मोजतात?

मला पडलेल्या एका प्रश्नाबाबत कोणी जाणकार मराठी शिक्षकाने मदत करावी.
(हे मुक्तछंद कवितेबद्दल नव्हे. मुक्तछंद काव्य ही मला खूप आवडते, पण मुद्दाम छंद-बद्ध कवितांबद्दल उत्तरे दिली तर मला चांगली मदत होईल. शिवाय इथे छंद, वृत्त, 'जाती' कसल्याही विषयी मला माहिती दिली तरी उपयोगी आहे. आधुनिक मराठीतली द्या, कारण जुन्या पद्धतीची आणि संस्कृताची चर्चा अन्यत्र सहज सापडते.)

छंद-बद्ध कविता करताना ओळीतली लघु-गुरू अक्षरे मोजतात. त्याचा हा मनोगतावरील दुवा. या प्रकारच्या चर्चांत जी उदाहरणे देतात तीत जुन्या पद्धतीने मराठीचे उच्चार करावे लागतात. (मुख्य फरक - सर्व 'अ'कारांचा पूर्ण उच्चार करावा लागतो, आधुनिक बोलीत तसा होत नाही. कवितेत "हिवे हिवे गा गालिचे", अधोरेखित अक्षरांचा "पूर्ण" उच्चार होतो; आधुनिक बोलीत "हिर्-वे हिर्-वे गार् गालिचे" असा उच्चार बरोबर आहे). कविता वाचताना कवीच्या मनात पूर्वीचा की आधुनिक उच्चार अभिप्रेत होता ते कळले पाहिजे. म्हणजे कविता वाचताना कवीच्या ओठात जी गेयता किंवा ठेका होता त्याचाही आपल्याला आनंद मिळतो.

इथे मुद्दामून विंदा करंदीकर या एकाच कवीची काही उदाहरणे देतो.
१.
> सारे तिचे होते, सारे तिच्यासाठी;
> हे चंद्र, सूर्य, तारे, होते तिच्या पाठी.
इथे आधुनिक म्हटले तर ठेका धरता येत नाही :
> सारे तिचेच् होते, सारे तिच्याच्साठी;
> हे चंद्र, सूर्य, तारे, होते तिच्याच् पाठी.
("साठीचा गझल" मधून)

२.
> कानावती हा,
> त्यातूही येती स्व.
> म्हणू म्हतो ओ शिसे,
> सांभा, सांभा, लागे पिसे!
!!!??? इथे तर जुन्या पद्धतीने 'अ' सगळीकडे उच्चारून मला तरी ठेका धरता येत नाही
> कानावर्ती हात्र्,
> त्यातून्ही येतील् स्वर्.
> म्हणून् म्हण्तो ओत् शिसे,
> सांभाळ्, सांभाळ्, लागेल् पिसे!
("मना माझ्या बन दगड" मधून)

३. आणि काही ठिकाणी दोन्ही उच्चार चालतात, वेगवेगळा, तरी ठेका धरता येतो.
> फारा दिवसांनी आली
> मागारी माहेराला;
> स्टेशना भेला नि
> ओखीचा टांगेवाला.
किंवा -
> फारा दिवसांनी आली
> मागारीण् माहेराला;
> स्टेशनात् भेट्ला नि
> ओळ्खीचा टांगेवाला.
(पुढच्या कडव्यात 'भ्रांत'ला 'आत'चे यमक जोडल्यामुळे जुने उच्चार करावेच लागतात. पण या कडव्यापुरते तरी दोन्ही उच्चार चालतात.)
("थोडी सुखी थोडी कष्टी...." मधून)
(सर्व उदाहरणे "संहिता" संग्रहामधून.)

पण तीनही उदाहरणे कुठल्यातरी प्रकारे छंद-बद्ध आहेत हे ओठातून उच्चार करताना स्पष्टच कळते. तर मग आधुनिक उच्चारातल्या कवितेत मात्रा कशा मोजतात? याचा अभ्यास झाला आहे का?

दुवा दुरूस्त केला आहे. - संपादन मंडळ.

Comments

नवीन कविता आणि गेयता

पहिले उदाहरण. सारे तिचेच्‌ होते.--ठेका धरता येतो, पण चालीवर गाता येत नाही. नवीन उच्चारात ठेका आहे, पण माधुर्ययुक्त गेयता नाही.
उदाहरण २.
> कानावरती हा त्यातूनही येती स्वर.--हे 'कानावर्ती' आणि 'त्यातुही ' केले तरी चाल बसते.
> म्हणून म्हणतो ओ शिसे,--यात १० अक्षरे आहेत
> सांभाळ, सांभाळ, लागेल पिसे!--आणि यात अकरा.. त्यामुळे या दोन ओळी मात्रावृत्तात किंवा एखाद्या अ-मुक्त छंदात पण नाहीत.
पुन्हा पायमोडके उच्चार केले तर ठेका येतो पण गेयता येत नाही.

उदा. ३
फारा दिवसांनी आली
> मागारीण माहेराला;--'मागारिण माहेराला'असेच हवे. तरच चाल बसते.
> स्टेशनात भेटला नि
> ओळखीचा टांगेवाला.--शेवटच्या दोन ओळी वृत्तात/छंदात बसणार्‍या नाहीत.
अक्षरांचे पायमोडके उच्चार केले तर ठेका येईल पण काव्यसौंदर्याची हानी होईल.--वाचक्‍नवी

ह्या चालीत म्हणून बघा की

पहिले उदाहरण:

सारे तिचेच होते

सारे जहाँ से अच्छा

च्या चालीत म्हणून बघा की.

दुसरे उदाहरण:

कानावरती हात धर, त्यातूनही येतील स्वर

ह्या ओळी लयीत म्हणता येतात म्हणजे त्या कुठल्या वृत्तात असायलाच्या हव्यात असे नाही. इथे इंग्रजीतल्या सारखी आघातांवर आधारित लय अपेक्षित असावी. इथे विंदांना गेयता बिलकुल अपेक्षित नसावी:)


तिसरे उदाहरण:

तिसरे उदाहरण अष्टाक्षरीचे आहे. अष्टाक्षरीच्या पारंपरिक चालीत म्हटले तर ठेका येतो आणि काव्यसौंदर्यही वाढते. अष्टाक्षरींशी परिचित असलेला कुणीही वाचक 'मागारिण' असे म्हणणार नाही.

फारा दीसांनी आली
मागारी माहेराला
स्टेना भेला नी
खीचा टांगेवाला

अधोरेखित अक्षरांचा उच्चार दोन अक्षरांएवढा दीर्ध केल्यास अडचण येत नाही, बाधा पोचत नाही.

चू. भू. द्या घ्या.

आघातबद्ध लय

होय. मला वाटते की ही मराठीतली एक नवी पद्धत असावी. मी पुढे "आघात"ऐवजी "बलस्थान" शब्द वापरून एक प्रतिसाद दिला आहे - बघा तुम्हाला पटतो का...

अष्टाक्षरी

हे पटण्यासारखे आहे. अष्टाक्षरी पद्धतीने म्हटले की चालीत गाता येते. म्हणजे परत श्री. धनंजयांची बलस्थाने मोजायची पद्धत, किंवा मी सांगितली तशी मात्रा मोजायची. अधोरेखित अक्षरांच्या दोन नाहीत तर तीन मात्रा होतील. --वाचक्‍नवी

शुद्धिपत्र : फारा दिवसांनी आली

तसे "शुद्धिपत्र" नाही, पण एक 'अ' मुळातल्या संदेशात अधोरेखित करायचा राहिला

> फारा दिसांनी आली...

> फारा दिव्सांनी आली

गझल

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
कवि विन्दा करंदीकर यांची
"सारे तिचेच होते, सारे तिच्याचसाठी;
> हे चंद्र, सूर्य, तारे, होते तिच्याच पाठी.
ही रचना गझल वृत्तात आहे.(तुम्ही लिहिलेच आहे).ती चालीवर म्हणताना त्यातील प्रत्येक 'च' चा उच्चार;श्री वाचक्नवी लिहितात त्या प्रमाणे पूर्णाक्षरी करायला हवा. हलन्त नको."आरंभी हे वृत्त मराठीत मोरोपंतांनी प्रचारात आणिले.त्या पद्यावरून ह्यास 'रसना' हे नाव पडलें."[मराठी साहित्य व व्याकरणःमोरेश्वर सखाराम मोने.].मोरोपंतांचे ते पद्य असे:

रसने न राघवाच्या| थोडी यशांत गोडी||
निंदा स्तुती जनांच्या |वार्ता वधू-धनाच्या |
खोट्या व्यथा मनाच्या | कांही न यांत जोडी||

आणखी काही सुपरिचित 'रसना' रचना:
"

आनंद कंद ऐसा | हा हिंददेश माझा |"
"आहे हुशार भारी |माझी मनी गुणाची|"

२/..."फारा दिवसांनी आली
> मागारीण माहेराला;
> स्टेशनात भेटला नि
> ओळखीचा टांगेवाला." यातही योग्य चाली साठी ण,ट, त ही अक्षरे (एक मात्रा) मानावी. व्यंजने नव्हेत.
३/ "हिरवे हिरवे गार गालिचे" ही पादाकुलक जातीतील रचना आहे.(एक तुतारी द्या मज आणुनि| या चालीची) यात प्रत्येक चरणात १६ मात्रा (आठ आठ चे दोन भाग असतात.)

गज्जल ऊर्फ रसना

यनावालांनी म्हटल्याप्रमाणे पहिली गझल. आणखी उदाहरणे:--

भवानी आमुची आ,ई । शिवाजी आमुचा रा,णा ।
मराठी आमुची बो,ली । गनीमी आमुचा का,वा ॥

..किंवा..

मुकी बिचारी कुणी हका, अशी मेंढरे बनू नका ॥

प्रत्येक ओळीत मात्रा--१२ + २. (१२ नंतर यती.)
माझ्या मते दुसरी आणि तिसरी कविता ..बालानंद ऊर्फ अचलगती या सम-जातिवृत्तात आहे. प्रत्येक ओळीत ८ + ६ मात्रा. प्रत्येक अकाराचा पूर्ण उच्चार. अगोदरच्या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे दुसर्‍या कवितेत 'त्यातुनही' हवे , 'तु' दीर्घ नको. शेवटची ओळ बरोबर नाही . ती काहीशी अशी हवी...सांभा(ळ्‌), सांभा(ळ्‌), गेल पिसे. ( एक 'ला' काढावा लागतो.)
तिसरी कविता..तेच वृत्त. अगोदर लिहिल्याप्रमाणे मागारिण हवे, 'री ' नको. तिसरी-चौथी ओळ काहीशी अशी..
स्टेशनामधे सापडला । ओळखिचा टांगेवाला ॥
आणखी उदाहरणे..आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिंकडे...किंवा ये ये ताई, पहा पहा, गंमत नामी, किती अहा । ।
यनावाला म्हणतात त्याप्रमाणे हे पादाकुलक नसावे. पादाकुलकात ८,८ मात्रा असून एका जोडओळीत १६ मात्रा येतात. उदा..........

हिरवे हिरवे ,गार गालिचे
हरित तृणांच्या, मखमालीचे

..किंवा..अशी तुतारी द्या मज आणुनि.... आणखी एक..

अवघड गड, अस्मानी डोले
वरती बघता, फिरतिल डोळे.

--वाचक्‍नवी

पादाकुलक

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.वाचक्नवी लिहितातः" स्टेशनामधे सापडला । ओळखिचा टांगेवाला ॥
आणखी उदाहरणे..आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिंकडे...किंवा ये ये ताई, पहा पहा, गंमत नामी, किती अहा । ।
यनावाला म्हणतात त्याप्रमाणे हे पादाकुलक नसावे ".....पण याला मी पादाकुलक म्हटलेलेच नाही.
"हिरव हिरवे गार गालिचे" याचे वृत्त पादाकुलक असे म्हटले आहे.लक्षणेही (८/८) सोळा मात्रा दिली आहेत.

पादाकुलक

श्री. यनावालांनी ३/ आकडा टाकून पुढे पादाकुलक लिहिल्यामुळे हे तिसर्‍या कवितेसंबंधी आहे असा माझा गैरसमज झाला. परत वाचल्यावर खुलासा झाला. नीट न वाचता घाईघाईने प्रतिसाद पाठवल्याची माफी असावी.--वाचक्‍नवी

गझल वृत्त ?

गझल ही अनेक वृत्तांत लिहिली जाऊ शकते. गझल किंवा गज्जल नावाचे कुठलेही वृत्त अस्तित्त्वात नाही.

गझल

बहुतेक तुम्ही उर्दूतल्या गज़लबद्दल बोलत आहात? ती वेगवेगळ्या वृत्तांत लिहिली जाऊ शकते हे खरेच. पण इथे यनावाला आणि वाचक्नवी एक विशिष्ट मराठी प्रकाराविषयी सांगत आहेत, असे वाटते.

विशिष्ट प्रकार?

बहुतेक तुम्ही उर्दूतल्या गज़लबद्दल बोलत आहात? ती वेगवेगळ्या वृत्तांत लिहिली जाऊ शकते हे खरेच. पण इथे यनावाला आणि वाचक्नवी एक विशिष्ट मराठी प्रकाराविषयी सांगत आहेत, असे वाटते.

धनंजयराव, मी मराठीतल्या गझलेबद्दलदेखील बोलत होतो. मराठी गझल देखील वेगवेगळ्या वृत्तांत लिहिली जाऊ शकते.

हा मराठीतला गझल, गजल, गज्जल किंवा कुठलाही विशिष्ट प्रकार जो यनावाला आणि वाचक्नवी ह्यांना अभिप्रेत आहे तो वृत्तप्रकार आहे की काव्यप्रकार आहे, ते काही स्पष्ट होत नाही.

माधवराव पटवर्धनांनी फारशी, उर्दू भाषेतील अनेक वृत्ते मराठीत आणली त्याला ते गज्जल वृत्त असे म्हणायचे. गज्जलांजली ह्या काव्यसंग्रहाचे प्रयोजनच ते होते. "भावगीतात एखाद्या द्विपदीचा मागील वा पुढील द्विपदीशी काही भावसंबंध नसणे हा दोष होय. हा दोष मराठी गझलांत टाळला आहे," असे त्यांनी एकेठिकाणी लिहिले आहे. त्यावरून गझल किंवा गज्जल हा काव्यप्रकार माधवरावांना कळला नाही आणि ते गझलेला भावगीत समजायचे हे कळते.

यनावाला आणि वाचक्नवी ह्यांचीही कदाचित माधवरावांसारखीच गल्लत झालेली दिसते.

असो. चूभूद्याघ्या आणि लोअ.
चित्तरंजन

गज़ल काव्यप्रकार

अच्छा - म्हणजे मत़्ल'अ ने सुरू होऊन मक़्त़'अ ने संपणारा काव्यप्रकार म्हणायचा आहे का?

अशा काव्यांसाठी कुठली वृत्ते मराठीत वापरण्याची प्रथा आहे? ती आघातबद्ध असतात की लघु-गुरु-मात्राबद्ध? उर्दूत मात्रा मोजताना त्याला 'वजन' म्हणतात, आणि हे थोडेफार 'आघात'च्या जवळ जाते. मराठीत कसे?

माझे मत

मतला आणि मक्ता असणारा काव्यप्रकारच म्हणायचा होता. ह्या काव्यप्रकाराशिवाय गझल, गज्जल, गज़ल नावाचा कुठलाही काव्यप्रकार मराठीत नाही असेच मला वाटते. [ अवांतर: उर्दूचे प्रकांड पंडित रशीद हसन ख़ान ह्यांनी 'ऐन' चा उच्चार करू नये असे सांगितले आहे. जसे मालूमचा उच्चार म'आलूम असा करू नये. तसेही मतला आणि मक्ता ह्या शब्दांत अंती 'ऐन' येत नाही. 'हे' असतो.

पोटफोड्या 'ष' चा उच्चार आता मराठीच 'श' सारखाच होतो. संस्कृतातला 'ष' मराठीत चालवू नये, असे मला एका भाषाशास्त्राच्या विद्वानांनी एकदा सांगितले होते ते आठवले. ]

तर गझल ह्या काव्यप्रकारासाठी कुठलेही अक्षरगणवृत्त किंवा मात्रावृत्त वापरता येते. हे वृत्त स्रगिणी, भुजंगप्रयात, सुमंदारमालेपासून बहरे हजज़ पर्यंत कुठलेही असू शकते.

हा काव्यप्रकार तुम्ही म्हणता तसा लघु-गुरू-मात्राबद्ध आहे.छंदात मात्र गझल लिहीत नाहीत. उर्दूत मात्रा मोजण्याच्या प्रकाराला 'तख्ती' पाडणे म्हणतात. तख्ती पाडणे म्हणजे गण पाडणे. उर्दूत हे गण तीन, चार, पाच अक्षरी असू शकतात.

जसे "बुझा दिए हैं खुद अपने हाथों मुहब्बतों के दिये जला के" किंवा "सुन्या सुन्या मैफलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे" ह्या ओळींचे उर्दूत असे गण पडतील "मफाइलातुन, मफाइलातुन, मफाइलातुन, मफाइलातुन" ह्या वृत्ताला मराठीत हिरण्यकेशी असेही नाव आहे. उर्दूत वृत्ताला बहर म्हणतात.

उर्दूतले वज़न आणि इंग्रजीतला आघात जवळपास जातात, असे मला वाटत नाही. मात्र उर्दूत एखादी ओळ वाचताना वृत्तानुसार काही शब्द लघू उच्चारतात. 'मेरी', 'तेरी' चे 'मिरी', 'तिरी' करतात. आपणांस कदाचित ते सुचवायचे असावे.ग़ालिबची 'कोई मेरे दिल से पूछे तेरे तीरे नीमकश को' ही ओळ 'कोइ मेर दिल स पूछे तिरे तीर नीमकश को' अशी म्हणताना अनेक जुन्या खोड्यांना ऐकले आहे.
जुबाँ पे मुहर लगी है तो क्या के रख दी है
हर एक हल्का ए ज़ंजीर पर जुबाँ मैंने
ह्या फैज़ च्या शेरातल्या वरच्या ओळीला काही लोक
"ज़ुबाँ प मुहर लगी है त क्या के रख दी है"
असेही वाचतात.

तूर्तास एवढेच. चुभूद्याघ्या आणि लोअ.

मोरोपंतांची गज्जल

माधव जुलियनांची गज्जलांजली १९३३ मध्ये प्रकाशित झाली. अर्थात त्यापूर्वी रविकिरण मंडळात त्यातील रचना वाचल्या गेल्या असतील . त्यांनी गझलेचे अनेक प्रकार सांगितले आहेत.
श्री.धनंजयानी लिहिल्याप्रमाणे मी आणि श्री. यनावाला म्हणतो आहोत ते कविवर्य मोरोपंतांनी मराठीत रचलेल्या गज्जल किंवा रसना या काव्यप्रकारासंबंधी. मोरोपंत(मोरेश्वर रामाजी पराडकर-जन्म १७२९, मृत्यू १७९४) वयाच्या २५ वर्षांपर्यंत पन्हाळ्याला होते. तेथील पंडित केशव आणि गणेश पाध्ये या विद्वान बंधुद्वयाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काव्यरचना करायला सुरुवात केली. वयाच्या पंचविसाव्या वर्षी ते बारामतीला बाबुजी नाईक या कोट्यधीश सावकाराच्या आश्रयाने राहिले.
"सुश्लोक वामनाचा, अभंगवाणी तुकयाची ।
ओवी ज्ञानेशाची, आर्या मयूरपंतांची ॥" या उक्तीत म्हटल्याप्रमाने मोरोपंतांची आर्या प्रसिद्ध असली तरी त्यांनी, अनुष्टुभ्‌, अभंग, अमृतध्वनि, आर्यागीती, उद्‌गीती, उपगीती, ओवी, गीती, घनाक्षरी, द्रुतविलंबित, दिंडी, पुष्पिताग्रा, पृथ्वी, प्रहरिणी,भुजंगप्रयात,
मंदाक्रान्ता, मयूरी, मालिनी, माल्यधरा, रथोद्धता, वसंततिलका, साकी, स्रग्धरा, स्वागता, विबुधप्रिया इत्यादी २८ गण-मात्रा वृत्ते आणि छंदांत सुमारे ७० हजाराहून अधिक काव्यपंक्ती रचल्या. फार्शीमधली गझल त्यांनी गज्जल या नावाने मराठीत आणली. त्यांच्या खालील कवितेमुळे या वृत्ताला रसना हे नाव पडले.
रसने न राघवाच्या । थोडी यशांत गोडी॥धृ॥
निंदा स्तुती जनांच्या । वार्ता वधू-धनाच्या ॥
खोट्या व्यथा मनाच्या । कांहीं न यांत जोडी ॥१॥
साधूचिया सदातें । सुख देतसे सदा ते ॥
श्रवणी सुधा, मदातें । सोडोनि, हात जोडी ॥२॥

माधव ज्युलियनांनी गज्जलाचे अनेक प्रकार सांगितले आहेत, मोरोपंतांचे तेवढे नाहीत.
मोरोपंतांच्या गज्जलेत चरणांच्या जोड्या फक्त पाच ते सात. सर्व जोडीतील दुसर्‍या चौथ्या व सहाव्या ओळीत यमक हवे. शिवाय प्रत्येक जोडीतील उरलेल्या चरणांती यमक पाहिजे.
अगदी उर्दू गझलेसारखे काफ़िया, रदीफ़ आणि अलामत यासारखी घट्ट बांधणी नसली तरी मोरोपंतांची 'रसना' ऐकायला गोड वाटते.--वाचक्‍नवी

किंचित सुधारणा

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री वाचक्नवी यांनी एक आर्या दिली आहे :
"सुश्लोक वामनाचा, अभंगवाणी तुकयाची ।
ओवी ज्ञानेशाची, आर्या मयूरपंतांची ॥ " ती पुढील प्रमाणे असावी.तरच् ती योग्य चालीत म्हणता येईल.
**********************************
सुश्लोक वामनाचा, अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची ।
ओवी ज्ञानेशाची, तैशी आर्या मयूरपंतांची ॥

*************************************

उर्दूतील लघु-गुरु अर्धवट आघातस्थानासारखे, पण पूर्णपणे तिथे नाहीत

उर्दूतले वज़न आणि इंग्रजीतला आघात जवळपास जातात, असे मला वाटत नाही. मात्र उर्दूत एखादी ओळ वाचताना वृत्तानुसार काही शब्द लघू उच्चारतात. 'मेरी', 'तेरी' चे 'मिरी', 'तिरी' करतात. आपणांस कदाचित ते सुचवायचे असावे.ग़ालिबची 'कोई मेरे दिल से पूछे तेरे तीरे नीमकश को' ही ओळ 'कोइ मेर दिल स पूछे तिरे तीर नीमकश को' अशी म्हणताना अनेक जुन्या खोड्यांना ऐकले आहे.

होय. हेच सुचवायचे होते, आघात-स्थानावर न येणारे काहीकाही स्वर यदृच्छेने एकमात्रिक किंवा द्विमात्रिक होतात, आणि अशा रीतीने "गणाची" कालमर्यादा हवी तेवढी राहाते. 'मेरे'ऐवजी ज्या गजल-ओळीत 'मिरे' म्हटले गेले आहे, तिथे 'मि'वर आघात कधीच येणार नाही. पण त्यानंतर लघुगुरू मोजायचे, म्हणजे पूर्णपणे इंग्रजीसारखे आघातमूलकही नाही.
मराठीतील उर्दू धाटणीच्या गजलेची उदाहरणे सापडतील का?

गझल

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
*
" हे चंद्र सूर्य तारे, सारे तिच्याच साठी | "
*
"रसने न राघवाच्या, थोडी यशांत गोडी |
*
आनंदकंद ऐसा , हा हिन्ददेश माझा |
*
सारे जहाँसे अच्छा, हिन्दोसतां हमारा |
*
अजुनी रुसूनी आहे, खुलता कळी खुलेना |
*
आई म्हणोनी कोणी, आईस हाक मारी|
*
शतजन्म शोधीताना, शत आर्ति व्यर्थ झाल्या |
*
कोलाहलात सार्‍या , माणूस शोधतो मी |
*
स्वप्नातल्या कळ्यांनो, उमलूं नकाच केव्हा|
*
डोळे तुझे बदामी, देती मला सलामी|
त्यानेच हा असा मी, झालो गडे निकामी|
*
वरील सर्व गाण्यांना वेगवेगळ्या चाली लावल्या असल्या तरी त्यांचे वृत्त एकच आहे. प्रत्येक चरणात मात्रा १३/१२ आहेत.अनिलांच्या रचनेत (अजुनी रुसूनी...) किंचित अनियमितता दिसते.या वृत्तालाच प्रारंभी गझल असे नाव होते. या रचनेला विषयाचे बंधन नव्हते,हे वरील उदा.वरून ध्यानी येतेच.
प्रेम,प्रेयसीचे वर्णन,प्रेमातील विफलता,तसेच एकूणच जीवनातील वैफल्य असे विचार (विशेषतः हिंदी,ऊर्दू भाषी रचना) या वृत्तात मांडले जाऊ लागले. त्यामुळे अशा विषयांवरील कोणत्याही वृत्तात्तील रचनेला 'गझल' असे नाव पडले. (जसे कोणत्याही वनस्पती तुपाला डालडा म्हटले जाई).
आज गझल हे वृत्त राहिले नसून उपरिनिर्दिष्ट (आणि काही तत्सम) विषयांवरील पद्य रचनेला गझल म्हटले जाते. त्यामुळे या संदर्भातील श्री. धनंजय यांचे विधान खरेच आहे.

नवीन कवितेतील मात्रागणना

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
पद्यरचना, अगदी मुक्तछंदी असली तरी,त्यात काही लयबद्धता असावी. काही ताल,ठेका असावा असे मला वाटते.पण अनेक नवीन कविता या कसोटीलाही उतरत नाहीत असे दिसते. गणवृत्तातील निर्दोष रचना तर आजकाल दिसतच नाही. स्वतःला कवी म्हणवणारी काही हौशी माणसे लग्न समारंभात स्वरचित मंगलाष्टके म्हणत्तात तेव्हा शार्दूलविक्रीडित वृत्तासाठी अक्षरांची किती ओढाताण केली जाते ते आपण ऐकलेच असेल. [नाही म्हणायला मनोगतावर "प्रेमाची सुनीते" म्हणून ज्या रचना आहेत त्या मात्र रचनेच्या दृष्टीने निर्दोष शार्दूलविक्रीडितात असून आशयही उत्तम आहे.ती परिपूर्ण सुनीते आहेत. अनेकांनी वाचली असतील.अशा उत्कृष्ट रचना क्वचितच दिसतात.}
...मात्रा आणि छंदोवृत्तांविषयी पुढच्या प्रतिसादात.

इथे एक ऐकीव उदाहरण : मंगेश पाडगावकर

करंदीकर आपल्या त्या कविता कशा म्हणत ते मला माहीत नाही. पण यू-ट्यूबवरती मंगेश पाडगावकर स्वतःची एक कविता वाचून दाखवतानाचे एक उदाहरण (दुवा) आजच सापडले.

आता पाडगावकर गाणीही लिहितात म्हणजे त्यांना सवयीने गेयताही अभिप्रेत आहे, पण इथे कविता "म्हणून" दाखवलेली आहे. "म्हणणे" हे "सांगणे" आणि "गाणे" यांच्या मध्ये कुठेतरी येते.

कवितेला यमके आहेत. आणि यमकांचा हवा तसा परिणाम होण्यास कालबद्धता आवश्यक असते, आणि येथे ती आहे. (संगीतातल्या समेसारखे, यमक योग्य ठिकाणी आले नाही तर ऐकायला बरे वाटत नाही) तर इथे मात्रा कशा मोजणार? (इथे पाडगावकरांचे "चुकले" हा पर्याय मी सुरुवातीलाच बाद करून टाकतो आहे.)

यूट्यूब वरती प्रत-अधिकाराचे उल्लंघन झाले असेल-नसेल, पण माझ्या या चर्चेत झालेले नाही, याबद्दल मी निश्चिंत आहे. पण प्रताधिकाराच्या कारणाने ते यूट्यूबवरून काढले जाऊ शकेल म्हणून नेहमीप्रमाणे लिहिल्यानंतर श्रवणप्रत्ययी ही देणार आहे.

(कवितेचे नाव : गाण्यावरचं बोलगाणं, कविता वाचन : आल्फा मराठी चॅनल)
गाय जवळ घेते की वासरू लुचू लागतं
आपण गाऊ लागलो की गाणं सुचू लागतं

गाणं जसं जनात आपण गाऊ शकतो
गाणं आपल्या मनात आपण गाऊ शकतो
...

(कवीच्याच तोंडून, श्रवणप्रत्ययी, चिह्ने ह्रस्व आ॑, ए॑, ओ॑, दीर्घ अऽ)
(तुम्हाला मुळात ऐकता आले, तर याची काही गरज नाही, हे तंतोतंत बरोबर मी उतरवले नसेलही.)
गाय् जवऽळ् घे॑तेऽ कि वास्-रू लुचू ला॑ग्-तंऽ
आपण् गा॑ऊ ला॑ग्-लो कि गाणं सुचू लाग्-तंऽ

गाणंऽ जसंऽ जनात् आ॑पण् गाऊ शक्-तोऽ
गाणं आप्-ल्या मनाऽत् आपण् गाऊ शक्-तोऽ
...

यमके अगदी योग्य ठिकाणी येतात हे पाडगावकरांचे ऐकून आपल्याला कळतेच - म्हणजे ओळींची लांबी एकसारखी आहे. मग इथे मात्रा कशा मोजायच्या? मी प्रस्ताव करतो की इथे मात्रा मोजायच्याच नाही, आणि केवळ बलस्थाने मोजायची. बलस्थानावर नसलेले "आ" "ए" "ओ" ह्रस्व करायची मुभा मराठी उच्चारात वैकल्पिक आहे. त्यामुळे पूर्ण ओळीची कालमर्यादा आपोआप फक्त बलस्थानांच्या संख्येवर अवलंबून राहील. शेवटचे बलस्थान मात्र महत्त्वाचे. त्याच्या पुढे (यमकात) जर बलरहित अक्षरे आली, तर ती ताणता येत नाहीत.

(०) गाय | जळ | घेते | की वासरू | लुचू | लागतं ||
ण | गा | लागलो | की गाणं | सुचू | लागतं ||

काव्यातले सौंदर्यस्थान दाखवण्यासाठी बलस्थान थोडेसे विचलितही करता येते.
ण | गा | लागलो की | गाणं | सुचू | लागतं
असा उच्चार कवीने एकदा केला आहे.

अर्थात वाटेल तेवढ्या बलरहित अक्षरांची भरणा नाही करता येणार. गाण्याची जाण असलेल्या कवींची आधुनिक बोलीतली काव्य रचना मोठ्या प्रमाणात ऐकून वर्णन नीट करता येईल असे वाटते.

बलस्थाने

बलस्थानांची संख्या जुळली की ठेका(चाल नव्हे) जुळतो, या म्हणण्यात तथ्य दिसते. ही कविता अशा लिहिली तरी ठेका जुळतो. ........
गा ज ते । वा चू ते । क का की । नि कू के कै । ।
मात्रा मोजायच्या असतील तर त्या मोजण्यासाठी पूर्वीच्या पद्धतीऐवजी खालील नवीन पद्धत अंमलात आणली पाहिजे.
१. हलन्त अक्षराच्या शून्य मात्रा.
२. अवग्रह चिन्ह असलेल्या अक्षराच्या ३ मात्रा.
३. शेवटच्या अक्षरापुढे अवग्रह चिन्ह असेल तर ३ किंवा विकल्पाने २ मात्रा.
या कवितेत--गाऽय्‌(३) जवऽळ्(४) घेतेऽ(५)--१२ मात्रा.
कि(१) वास्‌रू (४) लुचू(३) लाग्‌तंऽ(४)--१२ मात्रा.
आपण्(३) गाऊ(४) लाग्‌लोऽ(५)--१२ मात्रा.
कि(१) गाणंऽ(४) सुचू(३) लाग्‌तं(४)--१२ मात्रा.
असे केले की ही कविता गीति, शशिकान्ति किंवा महती या जातिवृत्तांतल्या अर्ध्या भागासारखी होते. पहा:
शल्य म्हणे राधेया(१२) । ++++++++
अर्जुन तीव्र शरांनी(१२) । ++++++++(गीति.)

अवचित या मेघांनी(१२) । ++++++++
तैसे या मेघांनी(१२) । ++++++++++(शशिकान्ति.)

महत्त्व भारी आहे (१२)। +++++++++
त्याहुन काही मोठी(१२) । +++++++++(महती)
--वाचक्‍नवी

क्या बात है !!!!!

ही कविता अशा लिहिली तरी ठेका जुळतो. ........
गा ज ते । वा चू ते । क का की । नि कू के कै । ।

वा ! वा !
क्या बात है !!!
माशाल्लाह !

ठेका चुकू दे, पण आपली कविता मात्र आम्हाला फारच आवडली.
ह्यातली भावना आमच्या मनाला स्पर्शून गेली.
विशेषतः पहिल्या आणि दुसर्‍या चरणात जे "गा ज ते" तेच "वा चू ते" हे तर हृदय विदारक सत्यच आपण मांडलेत.
आणि त्यापुढे "क का की" असे बाळबोध लिहून, बालकांच्या तोंडीच असे हृदयस्पर्शी सत्य प्रकटते, हेदेखील सुचवलेत. वा !!!!
पण नंतर माणूस सत्यापासून दूर जातो, आणि साध्या "क का की" चे "कू के कै", म्हणजेच कैच्या कैच होते, हे सुचवण्याची आपली शैली खूपच आवडली.
कोणीतरी दिवाळी अंक काढतोय म्हणे, त्यांना मी ही कविता रेकमेंड करणार आहे.

- तथागत

--
|| बुद्धं सरणं गच्छामि ||

गा ज ते वा चू ते

गा ज ते । वा चू ते ।
विशेषतः पहिल्या आणि दुसर्‍या चरणात जे "गा ज ते" तेच "वा चू ते" हे तर हृदय विदारक सत्यच आपण मांडलेत.

हे गुप्त आणि विदारक सत्य मांडले पाडगावकरांनी - त्यांच्या कवितेतल्या ओळीत ती बलस्थाने आहेत... वाचक्नवी कोडी सोडवण्यात माहीर आहेत! :-) ह.घ्या.

छान

मात्रांच्या नव्या गणनेबाबत विचार आवडला. आणखी उदाहरणे मिळाली तर पुढे चालवू, लागू पडतो का बघू.

मराठी व्याकरण् हवे

मात्रांच्या नव्या गणनेबाबत मांडलेले विचार रंजक आहेत.
मराठीचे व्याकरण नाही, आहे ते संस्कृतचे आहे असा विद्वान मंडळीचा एक आक्षेप आहे. ह्याबाबत मराठी संधिनियमांचा विचार होणे अगत्याचे आहे. त्यातून मात्रागणनाला दिशा मिळेल असे वाटते.
देऊन + टाक = देउण्टाक असे असायला हवे अशा तर्हेचा विचार (अर्जुनवाडकरांचा?) वाचनात आलेला आहे.
असे केल्यास 'कानावर्ती हाद्धर' असे लिहावे लागेल (म्हणताना तसे म्हणतोच आहोत).
वातावर्णी थण्डी आहे का?
सांगा थोडी ब्रॅण्डी आहे का?
वरील विचारानुसार ह्या ओळी केवळ पादाकुलक ह्या जातिवृत्ताच्या न राहता रूपोन्मत्ता ह्या अक्षरगणवृत्ताच्या होतात.

छान

योगायोगाने याच बाबतीत मी विचार करत आहे.

'कानावर्ती हाद्धर' याच्या मात्रा "गागागागा गागा " अशा व्हाव्यात
'कानावरती हात धर' अशा "गागाललगा गाल लल" होऊ दिल्यात तर नेहमीच्या बोलण्यापेक्षा वेगळी लय येते.

आणखी थोडं

ह्या अनुषंगानेच आणखी सूक्ष्म विचारही शक्य आहे -
जोडाक्षरांचे स्वतंत्र स्थानसौंदर्य आणि आघातसौंदर्य आहे. उदाहरणार्थ "पुरुषोत्तम" हे वृत्त पाहू-

पुरुषोत्तम वीरव्र
यमुनाद्भुत तीरस्थि
मुरलिध्वनि पूरक्रि
सुरभिव्रज नादप्रि

ह्या ओळींमध्ये जोडक्षरे न घेताही दुसरे शब्द वापरून लगक्रम साधता येईल. पण वृत्ताची मजा जाईल.
जोडाक्षरविशिष्ट गणवृत्ते आहेत का असा शोध घेण्याचा प्रयत्न मी मागे केला होता. आग्नेय आशियायी भाषांमध्ये आणि तामिळमध्ये 'ल्ग' चा समावेश असणारी गणवृत्ते आहेत असे केतकरांच्या ज्ञानकोशात वाचल्याचे आठवते.

नवीन कवितेतल्या मात्रा कशा मोजतात?

सौरभ
" कानावरती हात धर,
त्यातूनही येतील स्वर.
म्हणून म्हणतो ओत शिसे,
सांभाळ, सांभाळ, लागेल पिसे!"
मला प्रश्न पडलाय तो एव्हढाच की तुम्हाला या कवितेतील मात्रा मोजायची गरज का वाटवी ?
प्रत्येक काव्य हे छन्द, वृत्त, मात्रा, गण, इ. निकसांवर खरे उतरावे ही अपेक्सा मला जराशी अवाजवी वाटते.
क्समा करा पण या ठिकाणचे टङ्कलेखनाचे नियम बदललेतसे वाटते. पोटफोड्या श काही केल्या उमटतच नाही.

गरज आणि अपेक्षा यांच्यातील फरक

गरज तर कधीही कसलीच नसते. (अन्न-वस्त्र-निवारा, आहार-निद्रा-अभय-मैथुनं ची सोय, सोडल्यास)

येथे मात्रांचे काही गणित आहे, त्याची अपेक्षा मात्र मला वाजवी वाटते. ही कविता लयीत म्हणता येते, आणि काहीतरी नियमित ठेका धरता येतो. त्यामुळे यात काहीतरी नियमित निश्चित मोजता येईल अशी अपेक्षा काही वावगी नाही.

त्याच प्रकारे, कुठले गाणे घेतले, तर त्याच्या तालात मात्रा आहेत असा विचार करण्याची काहीच गरज नसते. पण त्याच्या नियमित ठेक्यावरून मात्रा नियमित असाव्यात अशी अपेक्षा जरूर करता येते.

"छंद मात्रा गुण" हे निकष नव्हेत. वर्णनात्मक शब्द आहेत. त्यावर कुठल्या कवितेने "खरे" ठरायचे नसते.

"मराठीत अ-आ-इ-ई... वगैरे स्वर असतात" हे एक वर्णनात्मक वाक्य आहे. ते म्हणायची काही गरज नाही, आणि "स्वर" म्हणजे काय हे कळण्यापूर्वी मूल उत्तम मराठी बोलू शकते. इतकेच काय वेगळेच कुठलेतरी स्वर असलेली भाषा कोणी बोलले तरी छानच!

तरी कोणी मराठीत बोलला असे आपल्याला जाणवले (वरील कवितेवर ठेका धरता येतो हे आपल्याला जाणवले) अ-आ-इ-ई... स्वर असतात अशी अपेक्षा करणे (वरील कवितेत मोजण्यासारख्या मात्रा आहेत ही अपेक्षा करणे) साहजिक आहे.

कोणी काही साधे-सरळ-तथ्य-नसलेले बोलले, पण आपल्याला सौंदर्यानुभूती झाली, खोल अर्थानुभूती झाली, समजा. तर "तिथे अलंकार आहेत" अशी वर्णनात्मक अपेक्षा करणे साहजिक आहे.

त्या वर्णनाला नाव देणे हे सोयीचे असते.
"अमुक कवितेत ठेका धरताना मला दर अमुक अक्षरांनी टाळी वाजवावीशी वाटते, श्वास घ्यायला तमुक अक्षरांनंतर थांबावेसे वाटते" असे वर्णन करता येईल. प्रत्येक वेळी असेच वाक्य पुन्हापुन्हा म्हणता येईल. पण अशा लांब वाक्याच्या ऐवजी "अनुष्टुभ्" किंबा "पादाकुलक" असे म्हणून श्वास आणि शाई वाचवणे खूप सोयीचे :-)

(क्ष = x; ष = shh)

तुमचे विचार पटले

सौरभ
तुमचे विचार पटले.
टंकलेखन साहाय्याबद्दल धन्यवाद.

दुर्मिळ

तुमचे विचार पटले.
हे वाक्य मसवर इतके दुर्मिळ आहे की वर्षातून एकदा कुठे दिसले आवर्जून याची नोंद घ्यावीशी वाटते. :-)
अवांतर : तुमच्या प्रतिसादांमध्ये तुमचे नाव सुरूवातीला का येते आहे?

----
परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो.

छान चर्चा

छान चर्चा...

दुर्मिळ

अहो राजेंद्र साहेब, या संकेतस्थळावर प्रतिसाद पाठविताना डावीकडील वरच्या कोपर्‍यात आपले नाव आपोआप येते. प्रतिसाद लिहायला सुरुवात करताना ते खोडून काढायचे असते हे मला माहीतच नव्हते. तुम्ही ते लक्षात आणून दिलंत हे छानच केलंत.

'तुमचे विचार पटले' हे वाक्य खरोखर इतकं दुर्मिळ झालंय का हो ? असेल बुवा ! मी तर एखाद्याचे विचार पटले की लगेच मान्य करून टाकतो. तसं करणं हे खूप सोप्पं असतं. नाहीतर 'तुमचे विचार का पटले नाहीत' हे सांगण्याकरिता कित्ती खुलासे करत बसावं लागतं ? :-)

'छंदोरचना'ची पीडीएफ फाईल उपलब्ध

सुरेशभट.इन ह्या संकेतस्थळावर 'छंदोरचना'ची पीडीएफ फाईल उपलब्ध करून देण्यात आली आहे. फाईल तिथेच वाचता किंवा उतरवून घेता येईल.

दुवा :
'छंदोरचना'ची पीडीएफ फाईल

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

खजिना आहे!

उतरवून घेत आहे. पण न राहावल्यामुळे दोन-चार पाने चाळली.

त्यात मुक्तछंदाची उत्कृष्ट मीमांसा सापडली - पान ४४पासून पुढे. त्यातले एक वाक्य तर मला फार आवडले -
"प्रतिज्ञापूर्वक बेबंद लिहिणार्‍याचेंहि पद्य लयबद्ध होतें."

मुक्तछंद प्रभावीपणे लिहू शकणार्‍या कवीला भाषेच्या लयीची आंतरिक जाणीव अगदी उच्च कोटीची लागते. कधीकधी प्रारंभिक कवींना वाटते, की मुक्तछंद हा बद्धछंदापेक्षा सोपा. म्हणून छंदोबद्धतेचा जुलूम आणि मुक्तछंदाचे गोडवे ते सांगू लागतात. चार-पाच छंदमुक्त कविता लिहिल्यानंतर कोणालाही जाणवावे - लयीची आंतरिक जाणीव जर कच्ची असेल तर तो बेढबपणा मुक्तछंदात सर्वांच्या समोर प्रदर्शित होतो.

मुक्तछंदात उच्च स्वयंभू प्रतिभा दाखवायचे स्वातंत्र्य मिळते, तसे हास्यास्पद लयपंगुत्व दाखवायचे स्वातंत्र्य मिळते. वगैरे.

ता.क. पीडीएफ उतरवून घेताना अडकली. पुन्हा काही वेळाने प्रयत्न करतो.

 
^ वर