उडत्या तबकड्या

दैनिक सकाळ - बुधवार दिनांक ५ सप्टेंबर २००७
उडत्या तबकड्या - अंतराळ युगातील अंधश्रद्धा
(जयंत नारळीकर)

अधूनमधून वृत्तपत्रांत बातमी येते, की अमुक अमुक ठिकाणी तमुक व्यक्तीला आकाशात फिरणारी प्रकाशवान वस्तू दिसली, जिची नीट ओळख पटू शकली नाही. "ती वस्तू काही काळ दिसली, मग अदृश्‍य झाली' अशा बातमीपासून "त्या वस्तूतून काही परकीय जीव आले' अशांसारखी विधाने पाहणाऱ्याने केलेली असतात.
सामान्यपणे आकाशात "उडणारी' अपरिचित वस्तू किंवा "अनआयडेंटिफाईड फ्लाईंग ऑब्जेक्‍ट्‌स' ("यूएफओ') म्हणजे परकीय जीवसृष्टीकडून आलेले यान, हा समज एक अंधश्रद्धेचाच प्रकार समजावा.

याला सुरवात झाली २४ जून १९४७ रोजी! केनेथ आर्नोल्ड हा एक व्यापारी स्वतःचे विमान चालवत जात असताना वॉशिंग्टन राज्यात माऊंट शेनियरजवळ त्याला बश्‍यांच्या आकाराची याने माळेच्या रूपात उत्तरेकडून दक्षिणेकडे उडत जाताना दिसली. वृत्तपत्रांना त्याने ही माहिती दिल्यावर तेथे तिला पुष्कळ प्रसिद्धी मिळाली. उडत्या तबकड्या (फ्लाइंग सॉसर्स) ही संज्ञा तेथूनच जन्माला आली.

आर्नोल्डच्या वक्तव्यानंतर "आम्हाला अमुकतमुक विचित्र गोष्ट उडताना दिसली', असे सांगणारे इतर अनेक लोक वेळोवेळी पुढे आले. पुढे पुढे अशी विधाने केली जाऊ लागली, "परकीय जीवांची याने पृथ्वीवर येत असतात... अमेरिकी वायुसेनेला त्यांची माहिती आहे; पण ते ती गुप्त ठेवतात... वायुसेनेच्या आणि सीआयएच्या लेखागारात ही गुप्त माहिती आहे, इत्यादी इत्यादी.' अखेर या वक्तव्यांना आवर घालण्यासाठी वायुसेनेने चौकशी समित्या वेळोवेळी स्थापन केल्या. त्यांना प्रकल्प साइन (१९४८), प्रकल्प ग्रज (१९४९) आणि प्रकल्प ब्लू बुक (१९५२-६९) अशी नावे दिली. त्या सर्वांचे निष्कर्ष होते, की उडत्या तबकड्यांचा देशाला कसलाही धोका नाही. त्या दृष्टिभ्रम किंवा चुकीचे निष्कर्ष किंवा जाणूनबुजून दिलेल्या खोट्या वृत्तान्तावर अवलंबून असतात, असे दिसून आले. कोणी "यू.एफ.ओ.' पाहिल्याचा दावा केला, म्हणजे त्याचा अर्थ सकृद्दर्शनी त्याला ओळखता आली नाही अशी वस्तू त्याने आकाशात पाहिली, असा होतो. हा दावा खरा मानला, तर ती वस्तू काय असू शकेल? काही पर्याय असे आहेत -

शुक्र ग्रह कधी कधी सूर्यास्तानंतर किंवा सूर्योदयापूर्वी क्षितिजाजवळ असतो. अशा वेळी तो झाडा/घराआडून डोकावताना दिसतो. मोटारसायकलवरून जाणारा माणूस तिकडे पाहत असेल, तर त्याला असे जाणवेल, की तो आपला पाठलाग करतोय! अशा वेळी "उडती तबकडी' आपल्याशी शिवाशीव करती होती, असे वाहनचालकाला वाटते. केनेथ आर्नोल्डला दिसलेल्या "तबकड्या' दृष्टिभ्रमाचा प्रकार असेल, असा वायुसेनेच्या तज्ज्ञांचा अंदाज होता. वाळवंटात तापमान उंचीप्रमाणे कमी होत जाते व त्याचा परिणाम मृगजळ दिसण्यात होतो. आर्नोल्डचे विमान साधारण ९५०० फुटांवरून जात होते. तेथे वातावरण स्वच्छ, निरभ्र होते. अशा स्थितीत तापमानाचा क्रम उलटल्यामुळे (वर वाढत गेल्याने) मृगजळ दिसते; पण आकाशात! वैमानिकांना याचा अनुभव येतो. हे थंड वातावरणात आकाशात दिसणारे मृगजळ.

अंतराळ युगाला सुरवात झाल्यापासून मानवनिर्मित उपग्रह मोठ्या संख्येने पृथ्वीभोवती फिरत आहेत. सूर्योदय व सूर्यास्त होत असताना ते प्रामुख्याने दिसू शकतात. ते "यूएफओ' म्हणून अनेकांनी पाहिलेले असतात. काही प्रकरणांत "यूएफओ'चा दावा करणारा, घटनेचा साक्षीदार हा मानसिक वैगुण्याने प्रभावित असा सापडला आहे. आपल्याला प्रसिद्धी मिळावी म्हणून त्याने रचलेली ही गोष्ट असते. कधी कधी ती इतकी स्वाभाविक असते, की सांगणाऱ्याला आपण लोणकढी ठेवून दिलीय, याची जाणीवही नसते आणि काही बाबींत तर आगाऊ योजना करून फसवण्याचे उपक्रम केले गेले. यामागे मानसिक कारण नसून, ही हकिगत रचण्यामागे धनलाभ व्हावा, हे उद्दिष्ट होते.

अशी एक घटना न्यू मेक्‍सिको राज्यात सोकोरोजवळ घडली. झामोरा नावाचा एक ट्रॅफिक पोलिसमन एका वेगमर्यादा ओलांडून जाणाऱ्या गाडीचा पाठलाग करत होता. अशा वेळी त्याला डोक्‍यावरून एक आकाशयान जाताना दिसले. आपला पाठलाग सोडून झामोरा त्या यानामागे लागला. जवळच एका टेकडीवर ते यान उतरले आणि स्थिरावले. त्यातून पांढरे कपडे घातलेल्या दोन व्यक्ती उतरल्या. झामोरा आपली गाडी थांबवून बाहेर आला आणि यानाच्या दिशेने चालू लागला. यानातल्या लोकांना काही मदत हवी आहे का ते विचारायला; पण त्या व्यक्ती यानात शिरल्या व यानातून धूर, आग आणि आवाज येऊ लागल्यावर घाबरून झामोरा आपल्या कारकडे पळाला. वाटेत त्याचा चष्मा खाली पडला. तो उचलून कारपर्यंत गेला तेव्हा ते यान निघण्याच्या तयारी होते. ते लवकरच आकाशाकडे झेपावले आणि नाहीसे झाले. पुढे यान जेथे उतरलेले झामोराने पाहिले तेथे यानाची "पदचिन्हे' दिसली.

झामोराची जबानी पुष्कळ वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाली. "यूएफओ' दिसले ती जागा पाहायला पुष्कळ पर्यटक आले, तेव्हा तिकडे जायला म्युनिसिपालिटीने पक्का रस्ता बांधला. शास्त्रज्ञांनीदेखील त्या जागांना भेटी दिल्या; पण झामोराने नक्की काय पाहिले यावर एकमत होऊ शकले नाही. पुढे फिलिप क्‍लास या पत्रकाराने याचा छडा लावला. झामोराच्या जबानीत पुष्कळ विसंगती दिसल्या. उदाहरणार्थ - टेकडीपासून जवळच एक शेतकरी राहत होता, त्याला यातले काहीच दिसले नाही. झामोराच्या वर्णनानुसार मोठा आवाज झाला तो त्याला ऐकू यायला पाहिजे होता, तसेच आगही दिसायला हवी होती; पण त्याने हे काहीच अनुभवले नव्हते. क्‍लासने आणखी एक पत्ता लावला. जेथे यान उतरल्याचा दावा झामोराने केला ती जागा, ती टेकडीच गावातल्या पौरांची होती. तेव्हा त्यांच्या जागेकडे पक्का रस्ता बांधायचे काम "यूएफओ'च्या निमित्ताने म्युनिसिपालिटीच्या खर्चाने झाले. अशा तऱ्हेने "यूएफओ' आले, गेले; पण फायदा मेयरसाहेबांना झाला.

क्‍लासने आपल्या पुस्तकात (शीर्षक ः यूएफओज एक्‍सप्लेन्ड ः "यूएफओ'ची कारणमीमांसा) अशा अनेक अनाकलनीय वाटणाऱ्या घटनांमागचे रहस्य उकलून दाखवले आहे. असे म्हणायला हरकत नाही, की आजवर अनेक यूएफओच्या घटनांची छाननी झाली; पण अद्याप परकीय जीव इथे येऊन गेले हे सिद्ध करणारी एकही घटना समोर आली नाही.

एक गोष्ट या संदर्भात नमूद करण्याजोगी आहे. आपल्याकडे वाहनांची दोन टोकाची उदाहरणे म्हणजे बैलगाडी आणि जेट विमान. यांत किती साम्य आहे? काहीच नाही. कारण जसे वाहनांचे तंत्रज्ञान बदलत जाते, त्यांचा आकारही बदलतो. याच नियमाप्रमाणे अंतराळात दूरदूरचे प्रवास करायचे तंत्रज्ञान आपल्या सध्याच्या चंद्रा-मंगळाकडे जाणाऱ्या यानांच्या तंत्रज्ञानापेक्षा पुष्कळ वेगळे असायला हवे; पण आजवर वेगवेगळी "यूएफओ' प्रेक्षकांनी "पाहिलेली' याने त्यांच्याच वर्णनानुसार आपल्या विमानांपेक्षा किंवा अंतराळ यानांपेक्षा फार वेगळी नाहीत. हे कसे संभवते? जर यूएफओ ही अनेक प्रकाशवर्षे अंतरांवरून अतिवेगाने इकडे आली, तर त्यांचे तंत्रज्ञान आणि आपले आजचे अंतराळ तंत्रज्ञान यात जमीन-अस्मानाचा निदान जेट विमान - बैलगाडीतला फरक असायला हवा! तेव्हा अशी शंका घ्यायला वाव आहे, की ज्या लोकांनी यूएफओ पाहिल्याचे दावे केलेत त्यांची कल्पनाशक्ती फार मोठी झेप घेऊ शकली नाही.

आणि "यूएफओ'ची छायाचित्रे पाहिल्याची उदाहरणे आहेत. छायाचित्रे खोटे बोलत नाहीत त्याचे काय? यावर क्‍लासच्या पुस्तकात एक खरा किस्सा आहे, तो पाहा. दोन शाळकरी मुलांनी यूएफओची छायाचित्रे स्थानिक वृत्तपत्रात छापली. ते यान दुरून जवळ येताना आणि मग लांब जाताना त्यांनी छायाचित्रित केले. छायाचित्रात गोल यान खिडक्‍यांसकट होते. काही काळ शास्त्रज्ञदेखील चक्रावले; पण अखेरीस छायाचित्रांच्या निगेटिव्ह्‌जवरील क्रमांक वेगळाच क्रम दाखवत होते. मग विशेष उपकरणे वापरून छायाचित्रांची तपासणी केली तेव्हा रहस्य उलगडले. कार्डबोर्डचे मॉडेल बारीक निळ्या सुताने झाडाच्या फांदीला टांगून निळ्या आकाशाच्या पार्श्‍वभूमीवर फोटो घेतले होते. त्यांत सूत दिसत नव्हते.

(लेखक ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत.)

"यूएफओ' आणि "परकीय जीव'
- आकाशात "उडणारी' अपरिचित वस्तू म्हणजे परकीय जीवसृष्टीतील यान हा गैरसमज
- परकीय जीव पृथ्वीवर येऊन गेल्याचे सिद्ध करणारी घटना नाही.
- "यूएफओ' पाहिल्याचे दावे करणाऱ्यांची कल्पनाशक्ती अपुरी.

लेखनविषय: दुवे:

Comments

लेखक ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत

लेखक ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत याची जाणीव ठेवूनच खालील प्रतिसाद देते.

लेख ठीक आहे. व्यक्तिशः मला अतिशय त्रोटक आणि एकांगी वाटला. २००७ साली छापलेल्या या लेखात १९८७* (की १९७७??) साली छापलेल्या लेखापेक्षा तसूभर वेगळी माहिती नाही.

लेखाचे स्वरूप अतिशय एकांगी असून लेखकाचा मुद्दा पटवून देण्यासाठी केलेला उदाहरणांचा वापर फारसा रुचला नाही. जसे, जगात देव नाही हे सांगताना, मुंबईच्या महापूरात अमुक देऊळ वाहून गेले त्यामुळे जगात देव कसा असणार हे सांगणारा. जनमानसावर याचा उपयोग फारसा होत नाही.

यूएफओ हे पुरातन काळापासून दिसले आहेत. कोलंबसला आणि त्याच्या खलाशांना सागरीप्रवासा दरम्यान दिसले होते ही कथा तर प्रसिद्ध आहेच परंतु केवळ एका व्यक्तिला न दिसता ते संपूर्ण गावाला, अनेक सोकॉल्ड सुशिक्षितांना, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना, इतर देशांतील सेनापतींना, अनेक वैमानिकांना (एकत्रित - एकेकट्याला नाही) दिसल्याचे प्रकारही घडले आहेत. आरनॉल्ड, झामोरा आणि दोन शाळकरी मुलांचे किस्से देताना लेखकाने काही मोठ्या व्यक्तिंचे किंवा समूहदर्शनाचे किस्से लिहायला हवे होते.

* १९८७ म्हणजे २० वर्षांपूर्वी असे म्हणायचे आहे. लेखकाने हल्लीच झालेल्या घटनांची आणि अमेरिकेबाहेर इतरत्र झालेल्या घटनांची दखल घेणे गरजेचे होते.

येथे मला यूएफओ म्हणजे परग्रहावरील याने आहेत इ. इ. म्हणायचे नाही याची कृपया दखल घ्यावी परंतु ज्येष्ठ शास्त्रज्ञांकडून यापेक्षा सकस माहितीची गरज वाटली.

काही मुद्दे

२००७ साली छापलेल्या या लेखात १९८७* (की १९७७??) साली छापलेल्या लेखापेक्षा तसूभर वेगळी माहिती नाही.

शक्य आहे. वक्ता तोच व विषय तोच असेल तर फक्त श्रोते बदलत असतात. तरिदेखिल मधल्या काळात या विषयावर काय नवीन काय झाले हा प्रश्न राह्तोच.

आरनॉल्ड, झामोरा आणि दोन शाळकरी मुलांचे किस्से देताना लेखकाने काही मोठ्या व्यक्तिंचे किंवा समूहदर्शनाचे किस्से लिहायला हवे होते.

ते किस्से असतील पण त्याचे चिकित्सक पातळीवर संशोधन केल्याचा पुरावा हा जास्त मह्त्वाचा. तो कदाचित नसेल.

लेखकाने हल्लीच झालेल्या घटनांची आणि अमेरिकेबाहेर इतरत्र झालेल्या घटनांची दखल घेणे गरजेचे होते.

हे मात्र पटले.

येथे मला यूएफओ म्हणजे परग्रहावरील याने आहेत इ. इ. म्हणायचे नाही याची कृपया दखल घ्यावी

मग आपल्याला काय अर्थ अभिप्रेत आहे?

प्रकाश घाटपांडे

चिकित्सा

ते किस्से असतील पण त्याचे चिकित्सक पातळीवर संशोधन केल्याचा पुरावा हा जास्त मह्त्वाचा. तो कदाचित नसेल.

तसे नसावे. यूएफओ सायटींगचे बरेचसे किस्से आजही फाईल केले जातात. त्याची व्यवस्थित छाननी होते. असे अनेक किस्से मी एनजीसी आणि डिस्कवरी चॅनेलवर पाहिले आहेत. ते नारळीकरांच्या किशश्यांप्रमाणे नक्कीच नाहीत. मी वर म्हटल्याप्रमाणे एका व्यक्तिचा दृष्टीभ्रम होतो, एक व्यक्ती फसवणूक करू शकते. अनेक व्यक्ती तसे करताना खचितच थोडा विचार करतात. (अर्थात सामूहिक मानसिकता हा प्रकार असतोच. जसे, मुंबईतील एका प्रसिद्ध बाबांच्या दर्शनाला आलेल्या भक्तांना ब्रह्मांड दर्शन होते म्हणे. अर्थात, हे सर्व भक्तगण चमत्कार पाहण्यासाठीच जमलेले असतात हे विसरून चालणार नाही. या प्रकारात बरेचदा अचानक असा प्रकार नजरेस आल्याने गोंधळलेली मनस्थिती नाकारता येत नाही.) नारळीकरांनी अशी समूहाची उदाहरणेही द्यावयास हवी होती. मला वेळ झाला तर अशाप्रकारचा एखादा किस्सा लिहूनही काढेन. सध्या गेल्यावर्षी घडलेल्या शिकागोच्या ओ'हेर विमानतळावरील किस्सा येथे वाचता येईल. हा प्रकार विमानतळ कर्मचारी आणि वैमानिकांसह अनेकांनी बघितल्याचे सांगितले जाते. त्यामुळे हा प्रकार फसवणूकीचा किंवा सनसनाटी निर्माण करण्याचा नक्कीच नसावा. (सामूहिक मानसिकता असे म्हणता येईल कदाचित.)

येथे मला यूएफओ म्हणजे परग्रहावरील याने आहेत इ. इ. म्हणायचे नाही याची कृपया दखल घ्यावी. मग आपल्याला काय अर्थ अभिप्रेत आहे?

जे इतर शास्त्रज्ञ मांडतात त्यांच्या मुद्द्यांत तथ्य आहे की एखादा वेगळा ढग, एअर बलून, हवाईदलाची विमाने किंवा नव्या धाटणीची विमाने यांच्या चाचण्या करताना, तर कधी दृष्टीभ्रम, फसवणूक यांतून असे प्रकार होण्याची शक्यता आहे. परंतु जेव्हा विमाने नव्हती, एअर बलून नव्हते तेव्हाही अनेकांनी असे प्रकाश किंवा विमानांचे वर्णन केले आहे - तेव्हा विषयांत संदिग्धता आहे.

आता पुन्हा मूळ लेख पाहा, नारळीकर म्हणतात:

जर यूएफओ ही अनेक प्रकाशवर्षे अंतरांवरून अतिवेगाने इकडे आली, तर त्यांचे तंत्रज्ञान आणि आपले आजचे अंतराळ तंत्रज्ञान यात जमीन-अस्मानाचा निदान जेट विमान - बैलगाडीतला फरक असायला हवा!


हे अगदी पटले पण जेट विमान आणि उडत्या तबकड्या सारख्या दिसतात का? मला तरी नाही दिसत आणि अनेकांना दिसत नसणार. उड्डाण, वेग याबाबत लोक जेट विमान आणि यूएफओ यांत फरक असल्याचेच सांगतात. (जसे, आकाशात स्थिर असणे आणि अचानक क्षणार्धात वेग घेऊन नाहीसे होणे. जेट विमानाला हे अद्याप शक्य आहे का याची फारशी माहिती नाही.)
दोन्ही वाहनांत कमालीचा फरक असायला हवा हे नारळीकरांचे म्हणणे अगदी खरे पण शास्त्रज्ञ म्हणून तो फरक कसा असायला हवा यावर लेखक एका वाक्याचे भाष्यही करत नाहीत. याचा अर्थ त्यांचे म्हणणे चुकीचे आहे असे नाही. ते नंतर म्हणाल्याप्रमाणे यूएफओ आणि एलियन्सची कल्पना प्रसिद्ध साहित्यकृतीतून घेतलेली आहे हे मला पटते.

म्हणून म्हटले की त्यांच्या मतावर माझा आक्षेप नाही किंवा ते पटत नाही असे नाही पण नारळीकरांचा विचार करायचा झाला तर लेख खूपच अघळपघळ आहे.

---
* वर दिलेल्या यूएफओचा फोटो खरा आहे याची शाश्वती नाही.

मुद्दे मान्य

मला एवढेच म्हणायचे होते की वरील लेखात जर तो २० वर्षांपूर्वी आला असता तरी विशेष बदल नसता. नारळीकरांना वरील उदाहरणांपेक्षा (१ ले उदाहरण वेगळ्या धर्तीचे आहे पण राहिलेली दोन) वेगळी उदाहरणे त्यांना देता आली असती. यूएफओ म्हणजे फसवणूक किंवा मनोविकार हा सूर लेखातून वाटला तो थोडासा बायस्ड आहे. (जसे ऍलोपथीचे डॉक्टर आयुर्वेद आणि होमिओपॅथीकडे तुच्छ नजरेने पाहतात तसा. लेखकाला या विषयातील संदिग्धतेला स्पर्श करण्याची इच्छाही झाली नाही.) तो सूर टाळण्यासाठी वेगळी उदाहरणे घेणे गरजेचे वाटले. केवळ अमेरिकन उदाहरणे घेण्यापेक्षा भारतातील बंगलोर आणि दिल्लीतील यूएफओ सायटींगही (दोन्ही फाईल्ड सायटींग्ज) घेता आले असते. वाचकांना झामोरापेक्षा ते अधिक जवळचे वाटले असते. असो.

वाचकवर्गापैकी किती जणांस या विषयात किती खोलवर रस असू शकेल, याचे निदान अथवा अंदाज बांधणे कठीण - कदाचित अशक्य असावे.

यूएफओवर मला माहित असलेले पुस्तक ८० च्या दशकात प्रसिद्ध झाले असल्यास आणि ते पुस्तक अनेकांना माहित असल्याचे उपक्रमावरच वाचल्याचे आठवते. त्यावरून वाचकांना या विषयाची बर्‍यापैकी माहिती असावी असे वाटते. लेखकानेही वाचकांचे अवमूल्यन करू नये हे ही खरे.

पु.ल.

त्यामुळे मूठभर उपक्रमींना माहीत असलेले एखादे पुस्तक तमाम महाराष्ट्रवासीयांना माहीत असेलच, असे नाही.

खरे आहे टग्यापंत. पु. ल. वाचण्यात आणि आळवण्यातच मराठी समाजातील बहुसंख्यांचे जीवन सफल जाहले. नारळीकर कोण लागून गेले हो?

- राजीव.

टग्या - एक सन्मान्यनाम

१९२१ साली चित्रमय जगत या चित्रशाळा प्रेस च्या मासिकात फलज्योतिष संबंधी वाद प्रतिवाद होत असत. जुलै १९२१ च्या अंकात भारताचार्य चि.वि.वैद्यांचा "फलज्योतिषाचे निष्फलत्व" या लेखात मोघेशास्त्रींचा उल्लेख सामान्य ज्योतिषी झाल्याने झालेल्या गमतीशीर प्रसंगाचा उहापोह केला आहे. वस्तुतः वैद्यांनी त्यांना 'सन्मान्य' ज्योतिषी असे म्हटले होते. मुद्राराक्षसाच्या विनोदा ने ते सामान्य झाले होते. त्यावेळी वैचारिक प्रतिवाद खूपच अटीतटीचे (झुंज) होत. तर सांगायचा मुद्दा कि 'टग्या' हे सकृतदर्शनी निंदाजनक नाम वाटले तरी त्यांच्या लिखाणामुळे ते आमच्या साठी 'सन्मान्यनाम' झाले आहे.
टग्या यांनी मांडलेले मुद्दे मला फारच भावले. उदाहरणे अतिशय चपखल वाटली. तर्कबुद्धिच्या आधारे केलेले विश्लेषण ही वस्तुस्थितीच आहे. वैयक्तिक अनुभवाचे उदाहरण देण्याचा मोह आवरत नाही म्हणून सांगतो. माझ्या "ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .... प्रश्नोत्तरातून सुसंवाद " या पुस्तकाचे परिक्षण लोकसत्ता मध्ये नारळीकरांनी लिहिले.त्याचा परिणाम म्हणून ती आवृत्ती लगोलग खपली. त्यावर प्रकाशन व्यवसायातल्या एकाने मला विचारले काय हो तुम्ही नारळीकर कसे काय "मॅनेज" केले. ते तर सहसा कुणाच्या पुस्तकाला प्रस्तावना किंवा परिक्षण लिहित नाहीत, आणि ज्योतिषाच्याबाबत तर अजिबात नाही. त्यावेळी मी अवाक झालो. त्यावेळी मी त्यांना म्हटले "अहो नारळीकर हे काय 'मॅनेज' करण्यासारखे व्यक्तिमत्व आहे का?" ते म्हणाले ,"म्हणूनच तर विचारतोय". मग मी त्यांना काय घडलं ते सांगितले.
ज्योतिषाकडे जाण्यापुर्वीची प्रथम एक छोटे पुस्तक काढले.त्याच्या प्रकाशनाला मी डॉ नरेन्द्र दाभोलकर व ज्योतिषी नंदकिशोर जकातदार यांना बोलावले. दोघांचा वादप्रतिवाद व्यासपीठावर घडवून आणला. ते पुस्तक अंनिस व तत्सम वर्तुळातच खपले.[म्हणजे जो ज्योतिषाकडे जाणारा सर्व सामान्य वर्ग मला जो अभिप्रेत होता त्याच्या पर्यंत ते पोचलेच नाही] त्याची प्रत मी नारळी करांनाही आयुकात जाउन दिली. (म्हणजे त्यांच्या पीए ला) पुढे काहीच संपर्क नाही. मी मेल पाठवली/ला/ले. त्याचेही उत्तर नाही. नंतर एकदा सहज अरविंद परांजपे यांना भेटायला आयुकात गेलो. त्यावेळी मला कळले कि नारळीकर माझी चौकशी करत होते. मी त्यांच्या पीए कडे गेलो व केलेल्या मेल बद्द्ल सांगितले. ते म्हणाल मी उत्तर पाठवले होते. मला तर मेल मिळाले नव्हते. त्यांनी मला प्रिंट आउट दाखवला व बाउन्स ही झाले नसल्याचे सांगितले.{ अद्यापही मला ते कोडेच आहे} मग माझी व नारळीकरांची भेट झाली.{ मी त्यांना ज्येष्ठ वृद्ध व्यक्ति वाटली होती}अपॉईंटमेंट च्या वेळी माझ्या डोक्यात असलेली कल्पना अशी होती कि मी आत गेल्या वर ते चेंबर मधिल खुर्चीत मग्न बसले असतील. मानेनेच खुण करुन बसा म्हणण्याचे सौजन्य दाखवतील. पण घडले ते वेगळेच. मी आत गेल्यावर ते स्वत:च सुहास्य वदनाने उठून व्हिजीटर सोफ्यात कॉर्नरला येउन बसले व दिलखुलास गप्पा केल्या. हे पुस्तक लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली.पोलिस बिनतारी खात्यात मी एक सामान्य सहा. पो.उपनिरिक्षक या खालच्या दर्जाचा सामान्य तंत्रज्ञ. या पार्श्वभूमीवर मला तो धक्काच होता. त्यानंतर मी सुधारित दुसरी आवृत्ती २००३ घेउन गेलो.त्यावेळी तुम्ही चार शब्द लिहिले तर ते लोकांपर्यंत पोहोचेल.{ पुर्वीच्या सदिच्छेची आठवण करुन} आम्हाला कोण विचारतो? असा खडा टाकून पाहिला. त्यावेळी त्यांनी धुंडिराज लिमये यांच्या वास्तुशास्त्रावरील पुस्तकाला सदिच्छापर चार प्रस्तावनेसदृष चार शब्द लिहिले होते. त्याचा परिणाम म्हणुन मटा मध्ये त्यांच्यावर अंधश्रद्धेचे समर्थन म्हणून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. हा किस्सा सांगितला. मी ही ती वाचली होती. प्रत्यक्षात काय झाले होते कि त्यांच्या एका स्नेह्याने त्यांना या पुस्तकावर चार शब्द लिहिण्याची गळ घातली होती. कारण लेखक त्याचा कोणीतरी नातेवाईक होता. नारळीकरांनी ते पुस्तक वरवर बघून न वाचता चार शब्द लिहिले होते. मटात आल्यावर त्यांनी ते नीट वाचले व दिलगिरीचा खुलासा मटाला पाठवला होता. तेव्हापासुन त्यांनी ठरवले कि कुठल्याही पुस्तकावर काही लिहायचे नाही.{ मला वाटले आपला पत्ता कट झाला.} पण जेव्हा ते लोकसत्तेत छापुन आले तेव्हा मला आश्चर्याचा धक्का बसला.{ मनात गुदगुल्याही झाल्या. खोट कशाला बोला?} इथे ते आपल्याला वाचता येईल.
प्रकाश घाटपांडे

तिकडे त्या ग्रहावर

* वर दिलेल्या यूएफओचा फोटो खरा आहे याची शाश्वती नाही.

मला खात्रीच आहे, 'तिकडे, त्या ग्रहावर पण' असाच वाद चालला असणार...!
; -)

आपला
युफोपंत

चुकुन

आधी चुकुन

उडत्या छबकड्या

असे वाचले! ;०
आता कळले!

(विषय शिळा आहे. खुपच चर्वणही झाले आहे. पण त्यातला रस काही कमी होत नाही.
बाकी वरील चर्चा लेखन कसे करावे यातच मोडते की काय असे वाटले!)

असो,
काय हरकत आहे अशा 'तबकड्या येतात' किंबहुना येवू शकतात हे मान्य करायला?
आता अशा तबकड्या 'येणारच नाहीत' अशी हमी तरी कुठे कोण देतंय?

मला वाटते की विज्ञानात 'शक्यता ओपन ठेवणे' याला खुप महत्व आहे असे वाटते.
मात्र नारळीकर स्वतः शास्त्रज्ञ असतांनाही त्यांनी "शक्यता नाही चे धोरण" घेणे मला काहीसे विसंगत वाटते.

असो,
मला वाटते की 'शक्यता आहे' असे मानणे योग्य कारण, अनेक गोष्टींचा छडा अजूनही लागलेला नाही, इंग्लंड मधले रचलेले दगड वगैरे वगैरे. सूज्ञांना तज्ञांना उदाहरणे माहीत आहेतच/असावीत; नाहीतर त्याला विचारा 'तो' लगेच दुवे देईलच! ;)

आपला
ग्रहवासी
गुंडोपंत

विचारवंत 'एक कल्पना' घेतात

पण नारळीकरां विषयी मला पुर्वी 'वा! काय भारी वेगळा विचार करणारा माणूस आहे' असे वाटायचे आत ते मला ते अगदीच सामान्य नि चकोरीबद्ध वाटतात.
अजिबातच नवीन कल्पनांना संधी नाही!

बहुतेक सगळेच विचारवंत 'एक कल्पना' घेतात नि
तीच व तीच आयुष्यभर तासत बसतात असेच दिसते.
अगदी 'वेगळ्या विचारांचा विचार' मांडणारा एडवर्ड डि बोनो ही त्यातलाच.
१९७० साली मांडलेले विचारच अजुनही सांगत फिरतो नि म्हणतो, "बघा अगदी नवीन ताजे विचार! आत्ताच काढले!!!"
बाकी त्याने हे ' जुनेच विचार विकले' बाकी लै भारी!
नि अजुनही विकतोय म्हणजे कमाल आहे!

इथे लोक सकाळचे बटाटेवडे दुपारी घेत नाहीत हो! आणी हे पहा...

म्हणूनच नवीन पीढीकडेच नावीन्यासाठी पाहण्याशिवाय जगाला पर्याय नसतो असे दिसून येते.

असो, मुख्य विषयावर
खालील पुस्तक व द्वैमासीक
नावः The biological universe : the twentieth-century extraterrestrial life debate and the limits of science
लेखक: Dick, Steven J.
प्रकाशक: Cambridge ; New York : Cambridge University Press, 1996.

द्वैमासीक
नाव :Skeptical Inquirer
ISSN:0194-6730
फॉरमॅट:Magazine/Journal

वाचनीय ठरावे असे वाटते.

आपला
अन इंप्रेस्स्ड
गुंडोपंत

~जे बोललेले व लिहिलेले 'कळते' तो भाषेचा प्रकार शुद्धच असतो.
त्यामुळे शुद्धीचा फाजील आग्रह येथे धरू नये.~

स्केप्टिकल एन्क्वायरर

द्वैमासीक
नाव :Skeptical Inquirer
ISSN:0194-6730
फॉरमॅट:Magazine/Journal

हे अंनिस साठी जवळपास प्रमाणसाहित्य. " अंनिस वार्तापत्र साठी याचा फार उपयोग होतो. आपल्या कडे या धर्तीवर Indian sceptic हे केरळातील बी प्रेमानंद यांनी चालवले होते.
प्रकाश घाटपांडे

अकारण..

नारळीकरांबद्दल मला आदर आहे आणि त्यांचे लिखाण वाचायला आवडते, पण ते माहीतीपूर्ण असले तर...

उडत्या तबकड्यांवर सकाळमधे आत्ता लेख लिहायचे कारण काही समजले नाही. वास्तवीक त्यांना लिहीता येण्यासारखे अनेक विषय त्यांच्याकडे आत्तापण आहेत ज्याने वाचकांच्या ज्ञानात (चांगला) फरक पडू शकतो. हां आता त्यांना कोणी सांगीतले असेल की पर्वतीवर "प्रभातफेरी"स जाताना अचानक उडती तबकडी दिसली वगैरे तर गोष्ट वेगळी!

बरं गंमत म्हणजे (आठवणी प्रमाणे) त्यांनी त्यांच्या "खगोल शास्त्राचे विश्व" या पुस्तकात सांख्यीकी तर्काने पाहील्यास माणसापेक्षा अतिप्रगत जीवसृष्टी या विश्वाच्या पसार्‍यात कुठेतरी असणार असे म्हणले आहे आणि ते ही एकाच नाही तर हजाराच्या किंवा त्याहूनही जास्त ठिकाणी...

त्याहूनही अजून एक गोष्ट आठवते: बर्‍याच वर्षांपूर्वी त्यांनी "पुराणातील वांगी" नावाने म.टा. मधे लेख लिहीला. सुरवातीस स्वतःच म्हणले की मी पुराण काही वाचलेले नाही पण त्याचा अर्थ आत्ताच्या घटनांना लावणे (त्यात दिलेले उदाहरण होते "ब्रम्हदेवाचे एक वर्षे म्हणजे कशी मानवी अनेक् वर्षे असतात" हे). वर्तक बाकी तर्कट वाटू शकतील असे व्यक्तीमत्व, पण त्यांनी "न वाचताच कसा निष्कर्ष काढता" असे म्हणत त्यांच्या दृष्टीने वैज्ञानीक उत्तर दिले ज्याला नारळीकर काहीच बोलू शकले नाहीत. आणि आता मात्र त्यांचे म.टा. मधील खालील उद्गार वाचा:

विश्वाचं वय किती याचा हिशोब लावताना ' ब्रह्मादेवाची एक रात्र ' या कोष्टकाचा संदर्भ उपयोगी पडला. त्यात सांगितलेला हिशोब तंतोतंत जुळतो. आपल्याकडच्या वाङ्मयात असे काही काही संदर्भ लागत जातात. म्हणूनच मी भागवत , विष्णूपुराणातील संदर्भ चाळत असतो

थोडे अवांतरः दोन दिवसांपूर्वी मुलीला गंगेची गोष्ट असलेले अमर चित्र कथा वाचत होतो. त्यात गंगा कशी स्वर्गात निघून गेली, समुद्रात लपलेल्या राक्षसांना शोढण्याच्या नादात समुद्रच कसा लुप्त झाला (अगस्तींनी प्यायल्या मुळे), त्यामुळे लोकांचे पाण्यासाठी कसे हाल झाले, सगराचे पुत्र पाताळात जाऊन तिथल्या पृथ्वीला "सपोर्ट" करणार्‍या हत्तीस धक्का दिल्याने पृथ्वीकशी हलली, धरणिकंप झाले, गंगेस परत भूतलावर आणण्यासाठी किती पिढ्या आणि वर्षे जावी लागली हे सर्व वाचताना पूर्वीपण "पर्यावरण बदल" झाला होता का आणि ती गोष्ट् (काय किंवा पाश्चात्यांमधील नोहाची नौका काय ) ह्या गोष्टींचे अर्थ आणि अन्वयार्थ ह्यात फरका आहे की काय असे वाटते.

वा

वा विकासराव,
सुरेखच प्रतिसाद!
अगदी योग्य रीतीने आपण नारळीकरांच्या लेखनाची/व दृष्टीकोनाचीही समीक्षा करून टाकली आहे!
आशा आहे खुद्द नारळीकरच ही चर्चा कधी तरी वाचतील! ;)

हां आता त्यांना कोणी सांगीतले असेल की पर्वतीवर "प्रभातफेरी"स जाताना अचानक उडती तबकडी दिसली वगैरे तर गोष्ट वेगळी!

हा भारीच 'स्टोरी प्लॉट' आहे! मराठे चित्रपट येईल का कधी अशा विषयावर...?

असो, असे झाले तर आपली लोकं; शोधाशोध सोडा, पर्वतीवर 'तबकडी मंदीर' बांधायला कमी करणार नाहीत! :))
आणी दर्शनाला रांग. शिवाय पार्कींग चे पैसे वेगळे हां!
आपला
तबकडोपंत

बाबा वाक्यम् प्रमाणम्!

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
असे मानणारा आपला समाज आहे. त्यामुळे कुणा एका व्यक्तीला एखाद्या विषयात महत्ता प्राप्त झाली की आपण त्या विशिष्ट बाबतीतले त्याचे मत ग्राह्य धरतो. कधी कधी ते तर्कदृष्टीला पटलेले नसले तरी. हा देखिल एक प्रकारचा अंधःविश्वास असतो असे म्हणता येईल. तसे पाहायला गेलो तर ह्या जगात कैक अशा गोष्टी सदोदित घडत असतात(कधी कधी खोट्या घडवल्याही जातात) की त्यांचे तर्कशुद्ध विश्लेषण करणे कठीण असते. मग विज्ञान मानणारे लोक त्या घटनेकडे काही तरी अगम्य वैज्ञानिक भाषेतले स्पष्टीकरण देऊन फारसे लक्षच देत नाहीत आणि अध्यात्मिक नेते हा कसा दैवी चमत्कार आहे वगैरे सांगत त्याचे गोडवे गातात/लोकांना त्याची भिती घालतात. थोडक्यात, लोकांना ह्या दोन्ही पंथांच्या महानुभावांची मते पटोत अथवा न पटोत मानावी लागतात कारण स्वतःकडे तेव्हढी अक्कल नसते.

अध्यात्मिक क्षेत्रात तर बुवा-बाबांचे प्रकरण हे नेहेमीचेच होऊन बसलेय. पण आता असे दिसून येतेय की विज्ञान हेच सर्वस्व मानणारे आणि प्रत्येक गोष्टीचा विज्ञानाच्या कसोटीवर पंचनामा करणारे लोकही कैक गोष्टी हसण्यावारी वा थट्टेवारी नेत असतात.आपण जे जाणतो त्या पलीकडे ह्या जगात काही नाहीच अशीच त्यांची धारणा असते आणि मग कोणत्याही नव्या गोष्टीकडे पूर्वग्रहदूषित नजरेने पाहण्यात ते धन्यता मानतात.हे आजकालचे नवे बाबा म्हणता येतील.

मी स्वतः विज्ञानवादी आहे आणि नेहमीच अध्यात्मिक लोकांची खिल्ली उडवण्यात धन्यता मानत आलेलो आहे. डॉ. नारळीकर आणि तत्सम वैज्ञानिक मंडळींबद्दल मला नेहेमीच अतीव आदर वाटत आलेला आहे.पण आता मात्र त्यांची अशी परस्पर विधाने(श्री. विकास ह्यांनी त्यांच्या प्रतिक्रियेत नोंदवलेली) ऐकून मला आपल्या भुमिकेचा पुनर्विचार करण्याची वेळ आलेली आहे असे वाटते.

प्रत्येक नव्या गोष्टींचा विचार खुल्या मनाने व्हावा आणि त्यासाठी वैज्ञानिक आणि अध्यात्मिक आणि तिथे आणखी कोणती पद्धती लागू पडत असेल त्या पद्धतीने साकल्याने विचार करूनच मग् एखाद्या निष्कर्षाप्रत यावे असे वाटायला लागलेय.

नकळत पणे आपण शास्त्रज्ञांना देखिल 'बाबा' बनवून बसलोय. त्यामुळे त्यांचे वचन हे अंतिम असे समजून आपली बोलती बंद होते आणि हे प्रगतीच्या दृष्टीने मारक आहे. तेव्हा ह्यांवर उपाय एकच 'अनुभवाविण मान डोलवू नको रे'!

जियो!

नकळत पणे आपण शास्त्रज्ञांना देखिल 'बाबा' बनवून बसलोय.
वा जियो काका जियो!!!
क्या बात कही वा! योग्य प्रतिसाद.
बाकी माझेही नारळीकरांच्या बाबत असेच झाले हो! :(

असो, डोळे तर उघडले ना... ठीक! पुढचे आता बघुन चालूया!

आपला
गुंडोपंत डोळस

फक्त एकच लक्षात ठेवावे

भारतीय (कदाचीत इतरत्रही) व्यक्तीगत आणि समूह (मॉब या अर्थाने) आपण लंबकासारखे वागतो. म्हणजे एखादी व्यक्ती आवडली की डोक्यावर घेणार मग त्यात आपण वर अचूक म्हणल्याप्रमाणे "शास्त्रज्ञांना पण 'बाबा' बनवणार" आणि आवडली नाही की दुसरे टोक...मला फक्त तसे करू नये असे वाटते.

नारळीकर ज्यात चांगले आहेत त्यात आहेतच (आणि अशा अनेक गोष्टी आहेत) पण म्हणून ते सगळ्यातच कुशल, ज्ञानी आहेत असे समजणे फक्त नको. आपल्याकडे "नीरक्षीर" हा जो शब्द आहे तो शक्यतितका या आणि इतर बाबतीत वापरावा (१००% कुणालाच शक्य नसतो) असे वाटते.

थोडे अवांतर होऊ शकते पण, असे अजून एक उदाहरण मला सतत जाणवते ते म्हणजे "अमर्त्य सेन" यांचे. ते पण तसे साधे आहेत. त्यांचा विषय "इकॉनॉमिक्स" पण ते स्वतःला आता "फिलॉसॉफर" म्हणत कशावरही बोलतात आणि आपली लोकं पण "सेन वाक्यं प्रमाणम्" करतात ते खटकते.

एकंदरीत या बाबतीत जर एखादी व्यक्ती खूप जाणून वागायची म्हणले तर नजीकच्या भूतकाळात (आपल्या सर्वांच्या जन्माआधी..) तर लोकमान्य टिळकांव्यतिरिक्त कुठलेही उदाहरण आठवत नाही. अनेक व्यक्तिंशी "कॉन्फ्लि़क्ट" आणि तरी "आदरणीय अथवा प्रेमाचे" संबंध ही तारेवरची कसरत या माणसाने जाणीव ठेवून केली. प्राच्य विद्या संशोधनाचे भांडारकर हे त्यांचे गुरू. आपल्या गुरू बद्दल अतिव आदर त्यांना होता. पण जेंव्हा ह्या गुरूचे विचार स्वातंत्र्यचळावळीच्या मधे येऊ लागले तेंव्हा त्यांच्या विरोधातील भूमिका त्यांनी घेतली. जेंव्हा लोकांनी विचारले की अहो ते तुमचे गुरू आहेत ना मग असा विरोध कसा? त्यावर टिळकांनी खालील संस्कृत ओळ सांगीतली:

गुरू वा बाल वृध्दैवा ब्राम्हणं वा बहुश्रुतम् आततायीनाम् आयांतम् हन्यतेवा विचारयन (आठवणीतून् लिहीला, चु.भू. द्या.घ्या.)

थोडक्यात - गुरू, बाल वृद्ध, ब्राम्हण(कुठल्याही विषयातील ज्ञानी), बहुश्रूत यातील कोणी कितीही योग्य असले पण ते जर वैचारीक आततायीपणा करत असतील तर त्यांचे (विचारांचे) खंडण करावे.

अर्थात तसे वागून त्यांचे आणि भांडारकरांचे व्यक्तिगत संबंध कुठे दुखावले नाहीत. (हा अर्थात टिळक कुठल्या बाजूने विचार करताहेत हे समजून नको तिथे गैरसमज न करण्याचा भांडारकरांचाही मोठेपणा होता).

विकास आणि प्रमोद काका

विकास आणि प्रमोदकाका,
आपल्या दोघांची मते वाचली. त्यात मला एक गोष्ट अशी जाणवली की शास्त्रज्ञ हा नवीन शिकणारा हवा असे मत असताना त्याने नवी गोष्ट आत्मसात केली तर ती आपल्याला आवडली नाही असे येथे दिसते.
विकासराव म्हणतात,
बर्‍याच वर्षांपूर्वी त्यांनी "पुराणातील वांगी" नावाने म.टा. मधे लेख लिहीला. .....
आणि आता मात्र त्यांचे म.टा. मधील खालील उद्गार वाचा: .....
या दोन घटनांनध्ये काही वर्षांचा काळ लोटला आहे असे वरिल वाक्यांतून दिसते. मग अशी शक्यता नाही का, की पूर्वी पुराणग्रंथ हा भंपकपणा आहे असे वाटले असल्याने नारळीकरांनी तसे लिहिले. कालांतराने त्यांनी वरिल वादात गप्प बसावे लागल्याने (?!) पुराणांचा अभ्यास केला आणि त्यात त्यांना काही उपयुक्तता जाणवली आणि त्यानंतर नव्या लेखात त्यांनी ती कबूल केली. याला आपण खुला दृष्टिकोन, नवे शिकण्याची आणि जूनी मते बदलण्याची वृत्ती, अभ्यासूपणा इत्यादी विशेषणांनी न भूषवता त्यांच्या बोलण्यात विसंगती आहे असे का मानता?

प्रमोदकाकांनी जी इतर मते नोंदवली आहेत जसे की शास्त्रज्ञांनांवरील अंधश्रद्धा इत्यादी ती काही इतर बाबतीत मला पटतात. वि़ज्ञान हे काही सर्वजाणत नाही हे माहिती असूनसुद्धा लोक आज विज्ञानाला जे पटते ते पटवून घेतात. तसेच अनुभवातून मत बनवावे असे असून सुद्धा, अध्यात्मातले लोक जर सांगतात की या गोष्टी साधनेने स्वतः अनुभवता येतात त्याकडे काणाडोळा करतात. विवेकानंद म्हणतात की धर्म / अध्यात्म ही बडबडण्याची गोष्ट नसून अनुभवण्याची आहे. तरी अनुभव न घेताच लोक देव शब्द आला की तलवारी उपसतात (वादी-प्रतिवादी दोघेही ).
-- लिखाळ.

मला फ्लोरिष्टाच्या शॉपामधल्या मुलिगत होयाचे हे ! (ती फुलराणी-पुल)

नीरक्षीर विवेक

प्रेषित


नारळीकरांबद्दल प्रत्येक मराठी माणसाच्या मनात अतीव आदरच आहे. त्यामुळे वर ज्यांनी त्यांच्या मताचे खंडन केले ते नारळीकरांना कमी लेखायला बोलत आहेत असे मला वाटत नाही. (तसे बहुधा तुम्हालाही वाटत नसावेच. :) )

असो, चर्चेत फारच विषयांतर होते आहे. चर्चा आहे परग्रहावरील तबकड्या आणि परग्रहवासीयांवर.

नारळीकरांचे प्रेषित हे पुस्तक आठवते का? (सुपरमॅनची आठवण का येते बुवा! श्रेयनामावलीत डीसी कॉमिक्सचे नाव होते का?) त्यातील नायक हा परग्रहवासी आणि यानातून येथे आलेला असतो. प्रेषित - पाठवलेला. ;-)

प्रेषितच्या या मुखपृष्ठावरील चित्रात आकाशात पाहा काय दिसते.

.
.
.
.
.

आस्तिक किंवा नास्तिक अशी भूमिका न घेता, नारळीकरांनी ऍग्नोस्टिक ही भूमिका घ्यायला हवी होती असे मला व्यक्तिशः वाटते.

खरं आहे!

नारळीकरांनी ऍग्नोस्टिक ही भूमिका घ्यायला हवी होती हे खरंय!
प्रेषीत खुपच आवडले होते! मस्तच होते ते!
आयुष्यातला काही काळ नारळीकरांनी दिलेल्या वैज्ञानिक कल्पनांनी भारलेला गेला हे कबूल केलेच पाहिजे!

आपला
गुंडोपंत

उपक्रमाच्या जेलात गेल्यावर (म्हणजे लिखाण बंद!) बाहेर यायचा मार्ग काय आहे हे ही नको का कळायला? की थेट जन्मठेपच?

भूमिका

आस्तिक किंवा नास्तिक अशी भूमिका न घेता, नारळीकरांनी ऍग्नोस्टिक ही भूमिका घ्यायला हवी होती असे मला व्यक्तिशः वाटते.

पुरोगामी लोकांत कुणी काय भूमिका घ्यायला हवी होती ही चर्चा नेहमीच होत असते. मी अमक्याच्या जागी असतो तर मी असा वागलो असतो. यातल तो 'अमका 'जो आहे त्याच्या जागी स्वतःला रिप्लेस करताना आपण आपल्या पिंडासकट रिप्लेस होत असतो. आपण त्याच्या पिंडाशी आपला पिंड पिंडांतरीत करत नसतो. शेवटी "पिंडे पिंडे मतिर्भिन्नः " अज्ञेय वादाची भुमिका ही सुरक्षित असते.

प्रकाश घाटपांडे

चंद्र नाही!

चंद्र नाही यान आहे. ज्यातून कथानायक (आणि हो डीसी कॉमिक्समधील सुपरमॅन-क्लार्क केंटही अस्साच) आला होता.

फ्रीहँड वर्तुळ एखादं शाळकरी पोर यापेक्षा बरं काढू शकतं, असं म्हणावं लागेल.

हो ना!

अर्थात, पडलो तरी पाठ जमिनीला नाही लागली! ;-)

बरं! बरं! कळतंय!! पाठवून देते - प्रेषित - नारळीकरांचं. वाचून खात्री करा.

हा लघुपट पहा

नुकतंच हैती ह्या देशात काहींना अज्ञात विमानसद्रुश वस्तुचे दर्शन झाले त्याचा हा तथाकथित लघुपट - हा पटण्यासारखा आहे, पण ह्यानंतर कुठल्याही प्रतिष्ठित माध्यमात ह्यावर बातमी आली नाही म्हणून कदाचित फसवा असेल असे वाटते
http://www.youtube.com/watch?v=up5jmbSjWkw

खिरे

वाचकांचे पत्र दै. सकाळ दि.२७ सप्टेंबर २००७

अंधश्रद्धा की अनाकलनीय कोडे?

थोर शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचा "उडत्या तबकड्या- एक अंधश्रद्धा' हा लेख वाचला. विज्ञानाचा एक विद्यार्थी म्हणून मला डॉ. जयंत नारळीकरांची मते योग्य वाटत नाहीत. मी स्वतः गेली वीस वर्षे यू.एफ.ओ.संबंधीच्या विविध पैलूंचा अभ्यास करतो आहे. यासंबंधी लिहिल्या गेलेल्या काही निवडक पुस्तकांतील महत्त्वाच्या मुद्‌द्‌यांची टिपणे ठेवून मी सतत या विषयासंबंधीच्या नवीन माहितीचा शोध घेत असतो. इंटरनेटवर तर अनेक लोकांचे अनुभव आणि विचार त्यांच्या लिहिलेल्या लेखांतून व्यक्त झाले आहेत. यावरून कोणा एका माणसाच्या अनुभवावरून उडत्या तबकड्या (यू.एफ.ओ.) असण्या-नसण्याचा कोणताही निर्णय घेणे धाडसाचे ठरेल. चीन, रशिया, फ्रान्स, जपान, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, इराक, इंडोनेशिया, पोर्तुगाल, स्पेन इत्यादी देशांतील लोकांनी यासंबंधी सांगितलेले आणि वर्तमानपत्रांतून वेळोवेळी प्रसिद्ध झालेले अनुभव आणि या विषयातील तज्ज्ञांनी वेगवेगळ्या प्रसंगी मांडलेले विचार, तसेच संरक्षण दलातील महत्त्वाची पदे सांभाळणाऱ्या लोकांनी वेळोवेळी सादर केलेले अहवाल हे सर्व खोटे असण्याची शक्‍यता खूपच कमी आहे. इतर देशांतील लोकांचे अनुभव क्षणभर बाजूला ठेवले तरी सात-आठ वर्षांपूर्वी खुद्द भारतातील राजस्थान आणि गुजरातमधील लोकांनी या उडत्या तबकड्या आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्याच्या बातम्या त्या वेळी वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झाल्या होत्या. डॉ. नारळीकर यांनी त्यांच्या लेखात म्हटल्याप्रमाणे शुक्र ग्रहाच्या झाडामागच्या दर्शनाने एखाद्या व्यक्तीस जसा भास होतो तसा उडत्या तबकड्या हासुद्धा भास असावा, हे पटत नाही. कारण ज्या व्यक्ती एकमेकांना कधीही भेटणे शक्‍य नाही अशा निरनिराळ्या देशांतील आणि निरनिराळ्या काळातील व्यक्तींनी यू.एफ.ओ.चे जे वर्णन केले आहे त्यामध्ये खूपच साम्य आढळून ये
ते. त्या वर्णनात अतिशय तेजोमय, डोळे दिपविणारे प्रकाशगोलक, अवर्णनीय अशा झपाट्याने आकाशात वर-खाली चोहीकडे होणारी हालचाल आणि नंतर हे प्रकाशगोलक लुप्त होणे, आदी गोष्टींचा उल्लेख सर्वांनीच केला आहे. हे परकीय ग्रहावरून होणारे आक्रमण नसेलही, परंतु तसे ते असले तर जगातील सर्व देशांनी आपापले मतभेद विसरून एकत्रपणे त्याचा प्रतिकार करण्याची तयारी केली पाहिजे, असे मत १९८५ मध्ये जीनिव्हा येथे अमेरिकेचे त्या वेळचे अध्यक्ष रेगन आणि रशियाचे सर्वेसर्वा मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्यात झालेल्या वाटाघाटीत नोंदविले गेल्याचा उल्लेख कागदोपत्री केलेला आहे. तेव्हा उडत्या तबकड्या (यू.एफ.ओ.) ही अंधश्रद्धा नसून, एक न उलगडलेले वास्तव आहे, अशा दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले पाहिजे.

- श्रीधर करकरे, पुणे.

 
^ वर