ही कवीता / बालगीत माहीती आहे का?

लहानपणी एक बालगीत ऐकले होते. त्याच्या काही ओळी अश्या आहेत. कोणास संपूर्ण बालगीत माहीत असेल तर कृपया कळवावे

ऐकू न येते...
.....बघा बघा ती गुलू गुलू गालातच कशी हासते
कशी माझी छबी बोलते..
मला वाटते तिला बाई सारे काही सारे कळते..

लेखनविषय: दुवे:

Comments

काही ओळी आठवतात

ऐकू न येते.. ऐकू न येते
बघा बघा कशी माझी छबी बोलते..
मला वाटे तिला बाई सारे काही सारे कळते..
गुलूगुलू गालातच कशी हासते
घारे, घारे डोळे बघा कसे फिरविते
शहाणी कशी, शहाणी कशी
साडी, चोळी नवी ठेवी जशीच्या तशी!

या ओळी आठवतात.
"बाहुली" नावाची कविता बहुदा (१९८०च्या आसपास तिसरीच्या?) बालभारतीत होती.

सुरुवात

मला वाटतं, सुरुवात

या बाई या,
बघा बघा कशी माझी बसली बया

अशी आहे.

मलाही

या बाई या,
बघा बघा कशी माझी बसली बया

मला ही हेच आठवले होते पण नक्की आठवत नव्हते पुढचे...

आपला
गुंडोपंत

या बाई या

या बाई या, बघा बघा कशी माझी बघते बया
...............
याची एक स्टँडर्ड चालसुद्धा होती
रेरेसारे, रेपमपरे नींसा रेरेसासा

१९८० नव्हे आणि बालभारतीही (ही फार नंतर आली) नव्हे. म्हणजे तेव्हाही असेल, पण १९६० च्याही आधी ही कविता मी शिकलेलो आहे (ज्या काळात ग. ह. पाटील वगैरे कवी होते) . वाचनमालेचे नाव आठवत नाही. "आठवणीतल्या ... " मध्ये मिळावी.
- दिगम्भा

ग. ह. पाटील

हे आमच्या मंचर गावचे कवी. :) (माहितीसाठी सांगतो)

"या बाई या" ही कविता आम्हालाही अंगणवाडीत साधारण १९८५-८६ मध्ये शिकवत असत. पण कविता सुरात म्हणत नसल्याने धपाटे घालणार्‍या बाईंची भीती वाटून "जा बाई जा" असे म्हणायचा मोह होई.

नकटे

विसुनाना , मीराताई, दिगम्भा प्रतिसादाबद्दल धन्यवाद

नकटे नाक उडवीते अशी पण काहीशी ओळ आहे का?

आपल्यात मिळून होईल का ही कवीता पुर्ण? अजुन कोणास काही आठवते आहे का? दिगम्भा म्हणतात तशी चाल आठवते आहे.

कदाचीत
लहान माझी बाहूली उंच तिची सावली
घारे डोळे फिरवीते, नकटे नाक उडवीते

ह्या कवीतेबरोबर गडबड होतीय माझी?

भावली

लहान माझी भावली | मोठी तिची सावली

असे यमक साधण्याकरता म्हणत असत.

नकटे नाक

'नकटे नाक' वाली कविता काहीशी अशी आहे.

लहान माझी बाहुली
मोठी तिची साऊली
घारे डोळे फिरवीते
नकटे नाक उडवीते

भात केला कच्चा झाला
वरण केलं पातळ झालं
पोळया केल्या करपून गेल्या
तूप सगळं सांडून गेलं

असे भुकेले नका जाऊ
थांबा करते गोड खाऊ

केळीची शिकरण करायला गेली
पडले दोनच दात
आडाचं पाणी ओढायला गेली
धपकन् पडली आत
------------------------
हे आठवणीतून लिहिले आहे. काही शब्द इकडे तिकडे झाले असतील.

आणखी दोन ओळी

दात कध्धी घासत नाही
तोंड कधी धूत नाही

अशा दोन ओळी यात मध्ये कुठेतरी होत्या, असे वाटते.
चूभूद्याघ्या.

- परीवश

हो हो!

ह्या ओळी बहुतेक नकटे नाक उडवीते नंतर असाव्यात्.

आणखी एक - ये गं गाई

बडबडगीत / बालगीतांवर चर्चा सुरू आहे म्हणून -
(अधिक माहितीसाठी) आणखी एक बडबडगीत ;)

ये गंS गाई गोठ्यात
बाळाला दुदु दे वाटीत
बाळाची वाटी मांजर चाटी
मांजर गेले रागाने
तिला खाल्ले वाघाने
वाघमामा डुलSSSतो
अस्वलमामा पोळ्या करतो
एक पोळी करSSपली
दुधासंगे वरSSपली
दूध लागले कSSSडू
बाळाला आले रSSSडू
बाळ गेले झोSSSपी
बाळाला आली टोSSSपी

हे कोणी लिहिले आहे की लोकगीत आहे? जाणकारांनी खुलासा करावा.

हेच गाणे जरा वेगळे

हेच गाणे माझी आई मला निजवताना पुढीलप्रमाणे म्हणत असे -

ये गं ये गं गाई गोठ्यात
बाळाला दुदु दे वाटीत
बाळाची वाटी मनीमाऊ चाटी
मनीमाऊ गेली रागाने
तिला गं खाल्ले वाघाने
वाघ मोठ दमणीचा
डोळा फुटला बबनीचा
बबन बिचारी तडफडली
हंडीमडकी गडगडली
हंड्यात बबनचे मेहुणे
ते दरसालचे पाहुणे
पाहुणे गेले गं ताकाला
विंचू डसला नाकाला

यात विंचू डसला 'क्ष'च्या नाकाला असे म्हणून क्ष च्या जागी लहानग्याचे/नहानगीचे नाव गुंफता येते आणि नाकाला हलकासा चिमटा काढून विंचू डसला असेही दाखवता येते :) :)

- परीवश

इथं इथं बस रे मोरा/अटक मटक

पुढची ओळ नक्की आठवत नाही. पण

चारा खा.. पानी पी
भुर्रकन उडुन जा
(हे खूप लहान मुलांचं झालं का?)

१.बाळाचे दोन्ही हात धरून हे गाणे म्हणतात.
२.गाण्यातला "पानी" हा शब्द असाच म्हणतात. ;)

अटक मटक चवळी चटक
चवळी झाली गोड गोड
जिभेला आला फोड फोड
फोड काही फुटेना
घरचा पाहूणा उठेना
;)

इथं इथं बैस रे मोरा

इथं इथं बैस रे मोरा
तान्हं बाळ घालतंय चारा...
चारा खा, पाणी पी
भुरर्कन उडून जा...

योगेशराव, अजून बाप नाही झालेला आहात असे दिसते! ;) (ह्.घ्या.)

शहाणी बाहुली

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
हे पूर्ण गाणे पुढील प्रमाणे:
.................शहाणी बाहुली.........................
[चालः ला बाई ला, बेलाचे पान माझ्या महादेवाला ]

या बाई या,

बघा बघा कशी माझी बसली बया......१

ऐकुं न येते,

हळुहळु अशि माझी छबि बोलते.......२

डोळे फिरवीते,

टुलु टुलु कशि माझी सोनि बघते......३

बघा बघा तें,

गुलुगुलु गालांतच कशि हंसते......४

मला वाटते ,

इला बाई सारें काही सारे कळते......५

सदा खेळते,

कधि हट्ट धरुनि न मागे भलते......६

शहाणि कशि!

साडिचोळी नवि ठेवि जशिच्या तशि......७
.......... कवि: दत्तात्रय कोंडो घाटे....................................................................

सो स्वीट

काय मस्त वाटलं ही कविता परत वाचून !! यनावाला ह्यांना धन्यवाद !

वाहवा

मस्त. सर तुम्हाला व अर्थात कवि: दत्तात्रय कोंडो घाटे यांना अनेक धन्यवाद.

वा! वा!

कवितेशी पुनर्भेट झाली. पुन्हा लहान झाल्यासारखे वाटले.
यनावालासाहेब, आभार!
एकूण चर्चा मस्तच!

ह्या गाण्याची तबकडी!

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
कुमारी फैयाज आणि इतर ह्यांच्या आवाजातील ही तबकडी मुंबई आकाशवाणीवरून बर्‍याच वेळा ऐकलेली आहे.

संपूर्ण कविता--माझी बाहुली

संपूर्ण कविता अशी आहे:

लहान माझी बाहुली
मोठी तिची साऊली
घारे डोळे फिरवीते
नकटे नाक उडवीते
फुसके गाल फुगवीते
दात काही घासत नाही
तोंड काही धुवत नाही
तसेच घरकुल मांडीते
मांडता मांडता पाडीते

भात केला कच्चा झाला
वरण केलं पातळ झालं
पोळया केल्या करपून गेल्या
तूप सगळं सांडून गेलं

असे भुकेले नक्का जाऊ
थांबा करते गोड खाऊ..

केळीचे शिकरण करायला गेली
पडले दोनच दात
आडाचं पाणी ओढायला गेली
धपकन् पडली आत (.)

बहुतेक असे आहे

फुसके गाल फुगवीते
गुबरे गाल फुगवीते

तोंड काही धुवत नाही
अंग काही धुवत नाही

आणखी एक बालगीत-छोटे घरकुल

छोटे घरकुल


छोटे घरकुल, छोटे घरकुल
पण पहा कशी मांडली आहे कोपर्‍यात चूल ।
तांदुळ होते सात , तांदुळ होते सात
पण पहा कसा झाला आहे पातेलीभर भात॥
चिमुटभर पीठ, चिमुटभर पीठ
पण पहा कशा झाल्या आहेत भाकर्‍या तीन ।
पिठ्ठले केले, पिठ्ठले केले
खरं सांगा तोंडाला ना पाणी सुटले ॥.

हे बालगीत हवं आहे

बघ आई आकशात सुर्य हा आला
पांघरुनी अंगावर भरजरी शेला,
निळ्या ह्याच्या महालाला आत झालरी,
सोनियाचे लावियले....

बरेच दिवस शोधतोय पण सापडत नाही . कोणास माहीत असेल तर कृपया कळवा.

हेमंत

बघ आई आकाशात....

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
या कवितेचे पहिले कडवे असे:

बघ आई आकाशात सूर्य हा आला
पांघरूनी अंगावरी भरजरी शेला
निळ्या याच्या महालाला खांब सोनेरी
मोतियांच्या लावियेल्या आत झालरी

.........१
..........................................................
पूर्ण कविता उपलब्ध झाल्यावर लिहितो.

झकास

जरूर लिहा यनावालासाहेब. लहानपणी आईकडुन ऐकली होती. पण आता आठवतच नाही.

हेमंत

आणखी थोड्या ओळी


बघ आई आकाशांत सूर्य हा आला
पांघरून अंगावर भरजरी शेला
निळ्या याच्या महालाला खांब सोनेरी
मोतियाच्या लाविलेल्या आंत झालरी
केशराचे घातले हे सडे भूवरीं
त्यावरून डौलानें ये त्याची ही स्वारी
डोंगराच्या आडून हा डोकावी हळूं
गुलाबाचीं फुलें आणि लागे उधळूं


बस्स. एवढेच आठवते आहे. बाकी समस्यापूर्ती यनावालांनी करावी.--वाचक्‍नवी

या बाई या, बकुळीच्या झाडाखाली फुले वेचू या

या बाई या, बघा बघा कधी माझी बसली बया ह्या बरोबरच आणखी एक् या बाई या कविता होती. मला आठवते आहे ती अशी -

या बाई या
बकुळीच्या झाडाखाली फुले वेचू या

ऊन पडले
पान फूल दिसे कसे गडगोडुले

गोडगोडुले
मोतियाचे दाणे कुणी खाली पाडले

रान हालले
पहाटेला शुकदेव गाणे बोलले

शुकदेव

छोट्या मुलांचा शुकदेव म्हणजे शुक्राची चांदणी.--वाचक्‍नवी

शुक शुक!

शुक म्हणजे पोपट का? बहुधा नसावा... पोपट कुठे गाणे म्हणतो?

-राजीव.

गोडगोडुली कविता

फारच छान! यापूर्वी कधी न ऐकलेली 'या बाई' कविता. ही पुण्या-मुंबईच्या शालेय पुस्तकात नव्हती. विदर्भातल्या एखद्या कवीची तिकडील पुस्तकात असावी. गोडगोडुले हा शब्द तसा आधुनिक, पण शुकदेव जुन्या काळचा. त्यामुळे ही कविता किती जुनी आहे याचा अंदाज बांधता येत नाही. --वाचक्‍नवी

शालेय पुस्तके

माझ्यामते महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक महामंडळाची पुस्तके शालेय अभ्यासक्रमासाठी असतात्, जी पुण्या-मुंबईला आणि विदर्भात सारखीच असतात. विद्यापिठांचा अभ्यासक्रम वेगवेगळा असला, तरी शालेय अभ्यासक्रमाचे मात्र तसे नाही. माझे शिक्षण विदर्भामध्ये झालेले नाही, पण माझ्या शालेय पुस्तकामध्ये ही कविता असेल तर त्यावेळी त्याच यत्तेत विदर्भामध्ये आणि पुण्या-मुंबईमध्ये शिकणार्‍या व्यक्तीच्या शालेय पुस्तकातही ती असणार.

शालेय पुस्तके

ही हल्लीची गोष्ट. ज्या काळात इतक्या सुंदर कविता पाठ्यपुस्तकात असायच्या त्याकाळी पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ तर सोडूनच द्या, एकाच गावातल्या दोन शाळांतली पुस्तके वेगवेगळी असायची. त्यावेळी उत्तम पुस्तक देण्यासाठी प्रकाशकांमध्ये चुरस असायची. --------वाचक्‍नवी

मला

आईकडून ऐकलेल्या
१. आजीचे घड्याळ
२. मोत्या शीक रे अ आ ई
तसेच्
३. एक झोपलेल्या हमालाची कविता

ह्या सर्वच आवडतात.

 
^ वर