शहरांचे नूतनीकरण
नुकतीच माझी भारतात एक फेरी झाली आणि अनेक वर्षांनी भारतात सलग दीड-दोन महिने राहण्याचा योग आला. तेही पुण्यात. पुणे खूप बदलले आहे आणि झपाट्याने बदलते आहे हे कोणीही मान्य करेल. तेव्हा पुण्यासारख्या शहरात झालेले आणि होऊ घातलेले बदल एकाच वेळी न्याहाळायची आणि शासकीय यंत्रणांचे आणि बिगर सरकारी संस्थांचे कार्य जवळून बघण्याची संधी मला मिळाली. आणि त्यातून आपल्यासारख्यांच्या आयुष्यावर बरेच बरेवाईट परिणाम करू शकेल अशा एका शासकीय योजनेची (सरकारी पद्धतीची असली तरी ) जी काही माहिती मिळाली ती तुमच्यापुढे ठेवावी असे वाटले म्हणून हा लेख.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
"एखादे शहर अस्तित्वात का येते, कारण मला वाटते की आपल्यापैकी कोणीही पूर्णपणे स्वावलंबी नाही, तर प्रत्येकाच्या अनेक गरजा आहेत ज्या त्याला स्वतःच्या स्वतःला पूर्ण करता येत नाहीत म्हणून. अजून काही कारण आहे का?" - सॉक्रेटिस
माणसाच्या वस्त्या प्राचीन काळापासून अस्तित्वात आल्या. कळपाने एकत्र राहणे, फिरणे, शिकार करणे इत्यादी पासून सुरुवात होत माणसाने सूत्रबद्ध समाजाची रचना केली. या समाजाला रहायला नदीकाठी, तलावांकाठी जागा शोधून काढल्या, लहान लहान गावे, नगरे वसवली. काही ठिकाणी अशी वस्ती हळूहळू वाढत गेली, तर काही ठिकाणी आपत्ती आल्या आणि असलेल्या नगरांची वाताहात झाली. लोक लांब-लांब पसरले, आणि जेथे गेले तेथे परत छोट्या वस्त्या त्यांनी वसवल्या. असे हे चक्र आज न जाणो किती वर्षे सुरू आहे. परंतु सध्याच्या उदारीकरणाच्या काळात नवीन व्यवसायाच्या/नोकरीच्या ज्या संधी उपलब्ध झाल्या आहेत, त्यामुळे हे चक्र ज्या गतीने फिरते आहे ती गती अनपेक्षित नसली तरी हेलपाटून टाकणारी आहे. आणि ह्या गतीचा भारतासारख्या देशाला खूपच मुळातून विचार करावा लागणार आहे. माहिती तंत्रज्ञान आणि औषधे (फारमॅसुटिकल्स) यात भारतीयांच्या सहभागामुळे आज भारतातील शहरी भागांत रोजगाराच्या पूर्वी विचारही न करू शकलेल्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे शेतीसारख्या परंपरागत व्यवसायांकडून उद्योगाच्या या नव्या संधींकडे, पर्यायाने गावांकडून शहरांकडे ही नवीन पिढीची वाटचाल सुरू झाली आहे. हे देशाच्या दृष्टीने सर्वस्वी योग्य ठरणार आहे किंवा कसे ह्याचे भविष्य समाजकारणी आणि अर्थतज्ञांनी वर्तवले पाहिजे, ते काम आपण त्यांच्यावर सोडून देऊ. पण ह्या सर्व उलथापालथीचा नजिकचा परिणाम आपल्यासारख्या शहरी भागांत राहत असलेल्या अनेकांना भोगावा लागणार आहे आणि त्याची जितकी जास्त सकारात्मक काळजी आपण आत्ता घेऊ तितके आपले भविष्य अधिक सुखकर होईल.
आज देशातील जवळजवळ २७.८% लोक शहरी भागात राहत आहेत. भारताने जागतिक उदारीकरणाची जे धोरण स्वीकारले आहे त्यामुळे २०२१ सालापर्यंत जवळजवळ भारतातील सुमारे ४०% जनता शहरी भागांकडे वळण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. २०११ सालापर्यंत भारताच्या दरडोई उत्पन्नापैकी सुमारे ६५% भाग हा शहरी भागांकडून येईल अशी शक्यता वर्तवली गेली आहे. या सर्वाचा परिणाम म्हणून आज आपल्यासारख्या अनेकांना शहरीकरणाचे तडाखे बसत असताना जाणवत आहेत. पिण्याचे पाणी, सांडपाणी, रस्ते -दळणवळण, वीज यांसारख्या नागरी सुविधा यावर मोठा भार पडत असल्याचे जाणवते आहे. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात मुंबईत लोकलला लोंबकळून किंवा पुण्यात तासन् तास स्कूटरवर काढत शहरी भागातील अनेक लोक आलेला दिवस ढकलतात. नुसता शहरी भागातील मूलभूत सोयींसंबंधीच्या विषमतेचा अंदाज घ्यायचा ठरवला तर २००१ च्या पहाणीप्रमाणे शहरी भागातील ५० .३% जनतेला नळाने पाणीपुरवठा न होता पाण्याच्या इतर स्त्रोतांवर अवलंबून रहावे लागते, तर ४४% लोकांना स्वच्छतेच्या/शौचालयांच्या सोयी नाहीत. शहरांमधील २३.६% जनता ही दारिद्र्यरेषेखाली आहे तर १४.१ % जनता ही झोपडपट्ट्यांत राहते. बृहन् -मुंबईतील आकडे कदाचित याहूनही भयंकर असतील.
त्यामुळेच शहरातील अनेकांना नळाद्वारे पाणी उपलब्ध नाही, शौचालयांच्या सोयी उपलब्ध नाहीत, जरा पाऊस पडला की घरांमध्ये पाणी चढले, घरातील सामानाची वाताहात झाली अशा बातम्या आणि रोगराई, अपमृत्यु, बालमृत्यु इत्यादीची रोज वर्तमानपत्रांतून येणारी वर्णने आपण वाचत असतो. यामुळे एक गोष्ट मात्र झाली आहे की पुण्यात सकाळसारख्या वृत्तपत्राने घेतलेला समाजाभिमुख पवित्रा, आणि लोकशिक्षणाची मोहीम यातून नागरिकांपर्यंत योग्य माहिती पुरवली जाते आहे. परंतु तरीही अनेकांना शहरांसंबंधी शासनाच्या योजना नक्की काय आहेत आणि त्यांचा आपल्या स्वतःच्या आयुष्यावर नक्की काय परिणाम होणार आहे यासंबंधी फारच थोडी माहिती असते. ही माहिती प्रत्येकाने करून घेणे जरूरीचे आहे. परंतु रोजीरोटी कमावणे, मुलांना शाळेत नेणे-आणणे-सोडणे, घरातली कामे करणे आणि एकंदरीतच वेळेवर असलेली बंधने अशा दैनंदिन व्यवहारांनी गांजलेल्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्या नागरी कर्तव्यांचा आणि अधिकारांचा देखील विसर पडणे सोपे आहे. यासाठी केंद्र सरकारच्या नगर विकास आणि शहरी रोजगार आणि गरिबी निवारण खात्यांच्या "जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहर नवीकरण (नूतनीकरण) मिशन (जे एन् एन् यू आर् एम्)" या योजनेची माहिती देण्याचा हा प्रयत्न आहे. या योजनेअंतर्गत अनेक जुन्या शहरांचे नवीन विकास आराखडे होऊ घातले आहेत.
या योजनेअंतर्गत देशातील ६३ शहरांची निवड झाली आहे. यातील शहरांचे लोकसंख्येप्रमाणे ४० लाखांवर वस्ती असलेली ७, १० -४० लाख वस्ती असलेली २८ तर १० लाखाहून कमी वस्ती असलेली २८ शहरे अशा प्रकारे वर्गीकरण केले गेले आहे. यामध्ये ज्या शहरांना फायदा मिळेल अशातील महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचे शहरे म्हणजे बृहन्-मुंबई (४० लाखांवर वस्ती) , पुणे, नाशिक, आणि नागपूर (१०-४० लाख वस्ती). देशातील अशा ६३ शहरांना मिळून वर्षाकाठी साधारण १७, २१९ कोटी रुपयांची गरज लागणार आहे असा अंदाज आहे.
भारतातील अनेकजण परदेशी असलेल्यांच्या भाग्याचा हेवा करताना आणि भ्रष्टाचाराबद्दल शासनयंत्रणेला दोष देताना आढळून येतात. परंतु परदेशी असलेल्या सुविधांचे एक महत्त्वाचे कारण असे आहे की येथे उत्पन्नाचा जवळजवळ १/३ हिस्सा हा कर म्हणून थेट पगारातून कापला जातो. एका ठराविक उत्पन्न रेषेच्या खाली उत्पन्न असणाऱ्या लोकांना हे कापलेले पैसे वर्षाअंती परतही मिळतात. परंतु जनतेच्या स्थावर आणि इतर मालमत्तेची पूर्ण कल्पना शासनाला असल्याने करातून मिळणाऱ्या पैशातून अमेरिकेसारख्या देशात शासनाला अनेक कार्यक्रम राबविता येतात. मालमत्तेच्या सर्वक्षणासारख्या बाबतीत असाधारण पारदर्शकतेची भूमिका स्विकारल्यामुळे असे करदाते उत्तम पायाभूत सेवा - जसे पाणीपुरवठा, दळणवळण, रस्ते इत्यादी सेवांचा लाभ घेऊ शकतात. याउलट आपल्याकडच्या सध्याच्या पद्धतीतील प्रमुख दोष असा आहे की नागरिक, व्यापार आणि शासनयंत्रणा काळ्या बाजारासारख्या शासनयंत्रणेला साधारणत: समांतर अशा व्यवस्थेचा एक भाग होऊन बसल्या आहेत. त्यामुळे लोकांकडील मालमत्तेचे कसलेही मापन करताना त्यात बरीच लपवाछपवी आणि भ्रष्टाचार झालेला आढळतो. सुस्पष्ट आणि लोकाभिमुख अश्या जमीन आणि मालमत्ता सर्वेक्षण योजनेअभावी एखाद्या नगरपालिकेला त्या नगरातील व्यक्ती, व्यापार आणि संस्था यांच्याकडील मालमत्तेचे मापन आणि पर्यायाने मूल्यांकन करता येत नाही आणि यांवर योग्य मालमत्ता कर आकारणी करणे हे दुरापास्त होऊन बसते. परिणामी शहरातील विकास कामे करण्यासाठी लागणारा पैसा मिळवता येत नाही व अधिकच अव्यवस्थेला आणि भ्रष्टाचाराला आमंत्रण दिले जाते. आता या अवस्थेबद्दल कोण सर्वात जास्त दोषी आहे ह्याचा उहापोह न करता ती अधिकाधिक पारदर्शक कशी करता येईल याकडे लक्ष देणे जरूरीचे आहे.
याचाच भाग म्हणून वरील योजनेअंतर्गत काही आवश्यक सुधारणा खालीलप्रमाणे राबविल्या जातील -
१. स्थानिक तसेच राज्य स्तरावरील संस्थांचा आर्थिक कारभार हा डबल एंट्री पद्धतीप्रमाणे राबवला जाईल.
२. ई-गवर्नंन्स मध्ये जी आय एस तसेच एम आय एस चा वापर तसेच मालमत्तेच्या कराच्या सुधारणेसाठी जी आय एस (जिओग्राफिक इन्फर्मेशन सिस्टम) भू-माहिती प्रणाली) चा वापर
३. ग्राहकांकडून योग्य सेवाशुल्काची आकारणी
तसेच महत्त्वाचे म्हणजे राज्यशासनाकडून खालील महत्त्वाच्या कायद्यांत सुधारणा व्हावी असे सुचवण्यात आले आहे -
१. शहरी कमाल जमीन धारणा आणि नियमन कायदा (अर्बन लँड सीलींग अँड रेग्युलेशन ऍक्ट)
२. भाडे नियंत्रण कायदा (रेंट कंट्रोल ऍक्ट)
अर्थातच या कायद्यांमध्ये बदल झाल्यास त्याचे परिणाम आपल्या जमिनीच्या विकासावर होणार हे स्पष्ट आहे.
ऐच्छीक (ऑप्शनल) सुधारणा याप्रमाणे सुचवल्या आहेत-
१. इमारतींच्या बांधकामासाठी लागणाऱ्या परवान्यांसंबंधित तसेच जमिनीच्या विकासासाठीचे उप-कायदे ("बाय-लॉज") सुधारणे
२. शेतजमिनीचे बिगरशेतजमीनीत रूपांतरण करण्यासाठी लागणाऱ्या कायदेकानूंचे सुलभीकरण
३. जमीन तसेच मालमत्तेच्या नोंदणीची संगणकीय योजना
४. पाण्याचा फुकट न घालवता योग्य वापर तसेच पावसाच्या पाण्याची साठवण हे "आवश्यक" करण्यासाठी उपकायद्यांची दुरुस्ती करणे
५. पुनर्चक्रित पाण्याचा वापर करण्यासाठी नवीन उपकायदे तयार करणे
६. गृहप्रकल्पांतील विकसित जमिनीपैकी २०-२५ % जमिनीची आर्थिक दृष्ट्या दुर्बळ तसेच कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी "क्रॉस सबसिडी"च्या योजनेने तरतूद.
या योजनेतर्फे ही यंत्रणा सुधारण्याचे एक पाऊल उचलले गेले आहे याबद्दल आनंदच आहे. ही योजना कितपत यशस्वी होणार हे मात्र प्रत्येक शहरातील नागरिकांना शहरसुधारणेच्या कामात किती उत्साह असेल आणि ते शहराचा विकास योग्य तऱ्हेने होण्यासाठी किती कार्यशील राहणार यावर अवलंबून राहील असे वाटते. तसेच नुसत्या यंत्रणा तयार भर न देता त्या स्वयंपूर्ण व्हाव्यात आणि कार्यक्षम रहाव्यात यावर लक्ष दिले जावे अशी अपेक्षा आहे. या योजनेची दोन उपध्येये असतील. एक म्हणजे शहरी पायाभूत सुविधा आणि व्यवस्थापन आणि दुसरीकडे शहरातील गरिबांसाठी प्राथमिक सुविधा पुरवठा. यामधील शहरी पायाभूत सुविधा आणि व्यवस्थापन या अंतर्गत -
१. अरूंद आणि जुन्या रस्त्यांचे रूंदीकरण, औद्योगिक आणि व्यापारी क्षेत्राला शहराच्या अंतर्गत भागातून बाहेर हलवणे
२. पाणी-पुरवठा आणि स्वच्छता यांची सोय
३. गटारे तसेच सांडपाणी यांची सोय
४. शहरी मोठे रस्ते (हायवे, एक्स्प्रेस वे), एम आर टी, मेट्रो इत्यादी प्रकल्प, तसेच पार्किंगसाठी पब्लिक -प्रायवेट पार्टनरशीप
५. इतिहासकालीन जागांचा विकास
६. पाणीसाठयांचे रक्षण
तर गरिबांसाठी प्राथमिक सुविधा देताना-
१. एकत्रित झोपडपट्टी विकास, गृह योजना आणि तेथील पायाभूत सुधारणांची उभारणी
२. शौचालये आणि स्नानगृहे इत्यादीची उभारणी
३. रस्त्यावरील दिवे
४. सांडपाणी आणि गटारे योजना
इत्यादी प्रमुख योजना राबवल्या जाव्यात अशी अपेक्षा आहे.
या योजनेच्या ध्येयात प्रत्येक नागरिकाला एका ठराविक प्राथमिक पातळीवरील तरी सुविधा मिळाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली गेली आहे. प्रमुख (कोअर) सुविधा ई-गवर्नन्स (शासन) मुळे लोकांपर्यंत कमी पैशात आणि अधिक कार्यक्षमतेने पोचतील अशी अपेक्षाही व्यक्त केली गेली आहे. हे म्हणताना असे लक्षात ठेवले पाहिजे की हे सर्व या योजनेचे "एक्स्पेक्टेड आउटकम" किंवा अपेक्षित परिणाम आहेत, ह्या गोष्टी होणे हे "मॅनडेटेड" अर्थात "जरूरी" नाही. तेव्हा जर ही योजना यशस्वी व्हायची असेल आणि शहरातील नागरिकांची अपेक्षा यातून आपल्या पदरात योग्य गोष्टी पाडून घ्यायची असेल तर त्यांनी आपल्या हितार्थ अतिशय जागरूक राहणे आणि संघटित होणे अत्यंत जरूरीचे आहे.
या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्याची अपेक्षा करणाऱ्या प्रत्येक शहराला स्वत:चा विकास आराखडा तयार करावा लागेल. यात शहराच्या विकासाची धोरणे, कार्यक्रम, कार्यआखणी आणि आर्थिक योजना स्पष्ट कराव्यात अशी अपेक्षा आहे. यानुसार अर्थसहाय्यासाठी योग्य प्रकल्प निवडले जातील. या प्रकल्पांना लागणारे अर्थसहाय्य हे राज्यशासनाच्या अखत्यारीतील एखाद्या बिंदूरूप संस्थेकरवी अशा प्रकल्पांकडे वळवले जाईल, अर्थातच कोणत्याही
एखाद्या नगरपालिकेला पैशाचा पुरवठा थेट केला जाणार नाही. पैसे हे कर्जाऊ, किंवा अनुदान किंवा अंशतः दोन्ही प्रकारे म्हणून दिले जाणार किंवा कसे हे प्रकल्प कसला आहे त्यावर अवलंबून असेल. ही योजना २००५-२००६ पासून ७ वर्षे कार्यरत राहील.
या योजनेतील सर्व मुद्द्यांचा या लेखात उहापोह करता येत नाही. तसेच या सर्व निर्णयांची अंमलबजावणी होताना ती कशी होईल, कोणत्या सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणाच्या प्रश्नांना सामोरे जावे लागेल याचा विचार स्थानिक लोकांनी आणि त्यांच्या संघटनांनी करणे आवश्यक आहे, यासंबंधीचा उहापोह देखील या लेखात केलेला नाही आहे ही या लेखाची मर्यादा आहे. फक्त एवढेच लक्षात ठेवण्यासारखे आहे की विकासाच्या ह्या सूत्रांमध्ये जरी कालानुरूप परकीय कल्पनांचा समावेश केला तर ते आपल्याकडील लोकांच्या मानसिकतेत कितपत बसते हेही पाहणे आवश्यक आहे नाहीतर अपेक्षित विकास न होता फक्त शहरांमध्ये विकसित बेटे तेवढी तयार होतील.
संदर्भः JNNURM
यापुढील लेख: पुण्याच्या विकास आराखड्यातील महत्त्वाचे मुद्दे
Comments
उत्तम लेख!
उत्तम लेख. शहरांचा वाढण्याचा वेग समाज व्यवस्थाच ढवळून टाकतो आहे. खेडं म्हणण्या सारखी गावे शोधुनही सापडत नाहीत. पण ही गावे आपण म्हंटल्या प्रमाणे 'मुलभूत सुवीधां' पासून वंचीतच आहेत. ना ती धड शहरे आहेत ना शहरे खेडी आहेत.
पण हे चित्र बदलावे या साठी असा विचार होत आहे हे वाचून बरे वाटले.
या शिवायही अनेक मुद्दे उहापोह करण्यासारखे आहेतच.
मात्र
शासनाला असल्याने करातून मिळणाऱ्या पैशातून अमेरिकेसारख्या देशात शासनाला अनेक कार्यक्रम राबविता येतात.
हे आपल्या कडेही कागदावर होतेच. पण कार्यक्रम राबवतांना खुपसे पैसे म्हणजे रुपयाला ९५ पैसे) मधेच गळून अनेकंच्या खिशात जातात असे ऐकुन आहोत!
आपला
गुंडोपंत
~जे बोललेले व लिहिलेले 'कळते' तो भाषेचा प्रकार शुद्धच असतो.
त्यामुळे शुद्धीचा फाजील आग्रह येथे धरू नये.~
आभार
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
कार्यक्रम राबवतांना खुपसे पैसे म्हणजे रुपयाला ९५ पैसे) मधेच गळून अनेकंच्या खिशात जातात असे ऐकुन आहोत!
हेही मान्य. पण शेवटी जेव्हा या अशा मार्गे आर्थिक व्यवहारांत पारदर्शकता येऊ लागेल तेव्हा या गोष्टी सुधारतील अशी अपेक्षा करता येईल.
नुकतेच मुंबईतील पावसाचे पाणी योग्य तर्हेने निचरा व्हावे (Brihan Mumbai Storm Water Drainage ) यासाठी केंद्राने १२०० कोटींचे आर्थिक सहाय्य घोषित केले आहे.
येथे पहा
ह्या प्रकल्पालाही सुरू व्हायला बराच उशीर लागलेला आहे - पण त्यातून निदान मुंबईकरांचे दर पावसाळ्यात होणारे हाल थांबले ते स्वागतार्ह असेल. अर्थात ह्या अशा योजनांचे राजकीय फायदे इत्यादी मिळण्यासाठी सर्व प्रयत्नशील आहेत हे खरे - पण निदान त्यासाठी तरी कामे झाली तर बरे होईल.
शैथील्य
आपल्याकडे चांगल्या योजना आहेत, पैसा देखील आहे पण नियोजन व इंप्लीमेन्टेशन्/एक्झीक्यूशन (अमलात आणणे??) नाही.
निद्रीस्त नोकरशाही, अप्रामाणीक नेतृत्व..(एक कोणीतरी शेषन बर्यापैकी आहेत त्याच अधीकाराचा वापर करुन काम करतो व पूर्ण भारताला बर्यापैकी चांगल्या निवडणूक म्हणजे काय ते कळते. तसेच खैरनार, चंद्र्शेखर..)
मला तरी असे वाटते की प्रत्येक सरकारी विभागाला काही उद्दीष्टे एका विशीष्ट कालावधीत साध्य करायला लावली पाहीजेत नाही तर शिक्षा..जर शासनच आला दिवस निभवा, उद्याचे उद्या बघू करत राहीले तर् हे सगळे असेच चालू रहाणार.
राजकारण्यांच्या सत्तेवर टाच येते तेव्हा लगेच ते उपाय करतात पण निद्रीस्त नोकरशाहीचे काय करायचे?
कोणते चंद्रशेखर?
पंतप्रधान का आयुक्त?
आपले इतर मुद्दे पटण्यासारखे आहेत, पण झोपलेल्या जनतेतूनच निद्रिस्त नोकरशाही जन्माला येते. त्यामुळे विकास आराखड्यांचा आपल्या शहरांवर काय परिणाम होणार हे सर्व नागरिकांनी समजून घेणे आवश्यक आहे. जनमताचा पुरेसा प्रभाव नसल्याकारणाने शासन निद्रिस्त राहण्याची चैन करू शकते.
कोणते चंद्रशेखर?
कोणते चंद्रशेखर? - आयुक्त ठाण्याचे..बदली झाली असेल म्हणा.
जनता झोपली नक्कीच नाही पण जनतेला कायद्याची माहीती तसेच पाठींबा कमी आहे असे दिसते व ह्याचा नेमका फायदा नोकरशाही उचलते. एका कामासाठी कितिवेळा खेपा माराव्या लागतात. माहीती नसल्याने सामान्यांची फसवणूक, पिळवणूक होते. नोकरशाही कोणाला जुमानत नाही की तिला कसले भय नाही. परफॉर्मन्स् दाखवला नाही तर सजा मिळेल हे जोवर होणार नाही तोवर कित्येक योजना कागदावरच राहतील अन प्रत्यक्षात चित्र वेगळे असेल.
चंद्रशेखर
सर्वप्रथम चांगला आणि माहीतीपूर्ण लेख, पुढच्या लेखाच्या प्रतिक्षेत..
सहज यांनी जनतेसंदर्भात केलेल्या विधानाशी अंशतः सहमत. थोडेसे चंद्रशेखर यांच्या संदर्भातः त्यांनी केलेले काम (निदान ठाण्यातील) ह्याला नागरीकरण, नगराचे अधुनिकीकरण असे कोणी म्हणू नये असे वाटते, इतके ते वाईट काम केले आहे.
ठाण्यातील राम-मारूती रस्ता हा एक टूमदार रस्ता होता जेथे घरे जवळ असली तरी झाडे चांगली वाढलेली आणि एकंदरीतच नागरी दृष्ट्या चांगला वसलेला होता. पण स्थानीक जनतेस कुठलीही जाणीव करून न देता तसे अचानकच काम चालू केले, कुठलीही पूर्वसुचना न देता अचानक आमच्या (आणि इतरांच्या) घरासमोरील अंगण खोदायला सुरवात झाली. कुठेही काही माहीती नाही, कोणा नगरसेवकची मदत नाही (कारण चंद्रशेखरांवर त्या वेळेस ठाकर्यांनी वरदहस्त ठेवला होता!) . पण लोकं चिडून जेंव्हा बाहेर आले तेंव्हा ताबडतोब काय (कुणाकडवी स्वतः अथवा अख्हद्या अधिकार्यास पाठवून नाही) सांगीतले तर मधाचे बोट लावण्यात आले की तुम्हाला जेव्हढी जागा समोरची जात आहे तेव्हढा "एफएस आय" वाढवून दिला जाईल. अर्धे लोकं हुरळून गेले. शेवटी तो भाग अत्यंत चुकीच्या पद्धतीने विकसीत झाला, जो राहण्याचा भाग होता, तो राहणे आणि धंदे यांनी एकत्रीत झाला घरासमोरची जागा तर गेलीच, गाड्यांनापण नीट जागा नाही. समांतर इतर रस्ते न विकसीत केल्याने येथील रहदारी नको इतकी वाढली आणि एका चांगल्या भागाचे नुकसान झाले. हे सर्व होत असताना चंद्रशेखर जे कोणी भेटायला जात त्यांच्याशी फार सभ्यपणे वागल्याचे ऐकीवात नाही (उलटे मात्र ऐकले आहे!) . या सर्वाचे कारण म्हणजे स्थानीक लोकांना नसलेली जाणीव - हक्काची अथवा चांगल्या राहणीमानाचे नसलेले महत्व (Quality lifestyle). हे मी अनुभवत असताना अमेरिकेतून काही दिवसासाठी आलो होतो. थोडा वाद घालून काही काळ काम लांबवणे या व्यतिरिक्त संपूर्ण लोकांच्या सहभागा अभावी तेथे काही थोड्या वेळेत करण्यास मर्यादा होत्या (आणि त्याने प्रचंड त्रागा पण झाला). त्या भागातून नंतर अपरिहार्यता समजून आम्ही कालांतराने बाहेर पडलो. बाहेर राहात असल्याने या सर्व गोष्टींची जाणीव वेगळ्या अंगाने झाली असे वाटले, पण जर मी ही तिथेच असतो तर समजले असते असे वाटत नाही.
त्यानंतर येथे (अमेरिकेत) "अर्बन डेव्हलपमेंटशी" वेगळ्याच अनुषंगाने संबंध आला आणि अजूनही ते काम चालू आहे. त्यावर नंतर याच चर्चेत अथवा वेगळे लिहीन. पण नागरीकांची स्वतःच्या भागबद्दल असलेली आस्था येथे खूपच जाणवली. त्याचा कधी कधी अतिरेक होतो असे वाटते पण आपल्याकडील अनास्थेपेक्षा दूरगामी चांगल्या राहणीमानाच्या आणि नागरी विकासाच्या हिताची असते असे वाटले.
चंद्रशेखर
आयुक्त चंद्रशेखर यांची कारकीर्द जवळून पाहिली आहे. एखाद्या गावात बाहेरून येऊन शिरून बेधडक हवे तसे निर्णय घेणे म्हणजे विकास करणे नाही. विकासनी दिलेल्या वरील उदाहरणावरूनही हे लक्षात येईल. रस्ते रूंदीकरण बेधडक कोठेही राबवून गावाचे असलेले रूप घालवणे आणि बसलेली घडी विस्कटणे यात कर्तबगारी नाही. शिवाय आयुक्त म्हणून बदली झाली की मागे सोडलेल्या गावाचे काय होते हे बघण्याचीही गरज नाही. त्यांची कारकीर्द वादग्रस्त नक्कीच होती. म्हणूनच वरील लेखात सुचवले आहे की स्थानिक जनतेने विकास प्रक्रियेत स्थान मिळवले पाहिजे.
असो.
ओके
अहो मी जे काय वर्तमानपत्रात वाचले (चटकन जी नावे आठवली, बहूदा सनदी अधीकार्यांची नावे वर्तमानपत्रात भ्रष्टाचाराच्या मथळ्याखालीच्) ते लिहले हो. नसतील चंद्रशेखर मी उल्लेख केल्याप्रमाणे. माझा मुद्दा असा होता की क्वचित एखादा अधिकारी त्याला असलेल्या पॉवरचा जनतेसाठी सदुपयोग करतो व बरेच काही लोकांसाठी साध्य करू शकतो. बाकीचे बरेचसे फक्त स्वतःसाठी.
>>स्थानिक जनतेने विकास प्रक्रियेत स्थान मिळवले पाहिजे.
१००% नक्कीच मान्य
१००% मान्य पण
परफॉर्मन्स् दाखवला नाही तर सजा मिळेल हे जोवर होणार नाही तोवर कित्येक योजना कागदावरच राहतील अन प्रत्यक्षात चित्र वेगळे असेल.
हे आपले म्हणणे १००% मान्य. इतकेच नव्हे तर अशी कार्यप्रणाली त्वरेने अंमलात आणणे अतिशय हितावह ठरेल. पण कोण आणणार? गळ्यात घंटा कशी बांधणार?
पण तरीसुद्धा प्राप्त परिस्थितीत व या चर्चेच्या संदर्भात आपण काय करू शकतो हेच पाहणे महत्वाचे ठरेल असे वाटते.
आपला
गुंडोपंत
कोण
>>पण कोण आणणार? गळ्यात घंटा कशी बांधणार?
हम्म्म् गेले काही वर्षात "माहीती अधीकार" असे काहीतरी नवीन (निदान ऐकण्यात नवीन) आले आहे ना. की एका ठरावीक मुदतीत काही माहीती मिळाली पाहीजे. त्या धर्तीवर "अर्बन डेव्हलपमेंटशी" संबधीत काही ठरावीक निकष शहराच्या, गावाच्या नियोजन, विकासात एका विशिष्ट मुदतीत योग्यरित्या पार पडलेच पाहीजेत ??? मी ह्या बाबतीत जाणकार नाही. (कशातच नाही म्हणा)
हे टी .चंद्रशेखर
हे टी चंद्रशेखर अगोदर नागपुरला होते.नंतर ठाण्याला, आता बृहन्मुंबई विकास प्राधिकरण. पुण्याच्या स.गो. बर्वे या पालिका आयुक्तांबदल सुद्धा कणखर व अभ्यासू व्यक्तिमत्व होते असे जुने लोक सांगतात. स्वारगेट च्या जवळील रस्त्याच्या मध्ये असलेली मशिद कि दर्गा एका रात्रीतून साफ केला होता. सकाळी बघतात तर रस्ता गुळ्गुळीत डांबरी. हाच न्याय मध्ये असलेल्या मंदिराला पण. जंगली महाराज रस्ता केला त्यावेळी काहींनी एवढा मोठा रस्ता काय करायचा आहे? पालिकेचे पैसे कशाला वाया घालवताय? अशी पत्रे सकाळला पाठवली होती.
[यातील पुण्याबाबतची माहीती जुन्या व जाणत्या लोकांकडून मिळाली आहे, गुंडोपंतांना सायटेशन देऊ शकणार नाही]
प्रकाश घाटपांडे
हे सहीच!
आवांतर: (पण तरीही.. ;) )
स्वारगेट च्या जवळील रस्त्याच्या मध्ये असलेली मशिद कि दर्गा एका रात्रीतून साफ केला होता. सकाळी बघतात तर रस्ता गुळ्गुळीत डांबरी. हाच न्याय मध्ये असलेल्या मंदिराला पण.
हे सही! काहीच हरकत नाही असे करायला!
असे ही हल्ली अतिक्रमण निर्मुलन शनिवारी सुरु करतात. कोर्टाला सुटी असल्याने स्टे आणता येतच नाही म्हणे!
जुने जाणते म्हणतात...? बरं बॉ नको मला सायटेशन! :)))
(सायटेशन निर्मुलन की काय???? काय खेचताय माझी उगाच?)
आपला
गुंडोपंत
योजनाबद्ध विकास.
शहराच्या विकासाचे अनेक पैलू असू शकतात. कोणत्याही भागाचा विकास हा तो भाग कशा पद्धतीने विकसित करायचा आहे हे ठरवल्यावर केला पाहिजे. एखाद्या आयुक्ताचा निर्णय किंवा धडाडी वगैरे ठीक आहे, पण जर त्या निर्णयामागे शहराचे हित जपणार्या नागरिकांचा सहभाग असला तर असा आयुक्त नसतानाही विकास योग्य दिशेने होईल. या प्रत्येक निर्णयाचे दूरगामी परिणाम होत असतात. (म्हणूनच रेंट कंट्रोल आणि लँड सीलींग कायद्यांमध्ये बदल होत असल्यास त्याकडे काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. याबद्दल विस्तृत परत केव्हातरी).
पण नुसता निनाद किंवा परीवश यांनी म्हटल्याप्रमाणे रूपाचा किंवा रूपबदलाचा विषय निघाला त्याप्रमाणे जेव्हा मुंबईत अनेक वाहतुकीसाठी उड्डाणपूल बांधण्यात आले, तेव्हापासून वाहतुकीचा प्रश्न सुटला असेल पण मुंबईचे रूप तर नाहीसे झाले हे मला वाटते कोणी मान्य करेल. शीव (सायन) वगैरे भागात मी पाहिले आहे ज्या इमारती रहायला एकेकाळी चांगल्या होत्या त्यांकडे पुलावरून डोकावून पाहिले तर घरातले सर्व दिसेल (काही ठिकाणी तर शिडी वगैरे लावून घरात उतरताही येईल) अशा उंचीचे पूल बांधले गेले आहेत. पण मुंबईकर सहनशील आहेत बिचारे. अगदीच जास्त झाले, डोक्यावरूनच गेले तरच कटकट करतात. नाहीतर नाही.
आपत्कालीन व्यवस्थापन कुठे गेले?
जर भर रस्त्यातून एखादा उड्डाणपूल बांधला आणि हैदराबाद सारखी एखादी दुर्घटना झाली तर अपघातग्रस्तांपर्यंत मदत कशी पोचणार? उड्डाणपुलांनी ट्रॅफिकचा प्रश्न सुटेल, पुढचे काय?
पूर्ण बातमी इथे वाचा.
पैसा आहे
इ-सकाळ बातमी
केंद्राच्या ग्रामविकास विभागाकडे एक लाख ७६ हजार कोटींचा निधी असून महाराष्ट्र सरकार याचा फायदा घेण्यास असमर्थ ठरत आहे, अशी खंतही श्रीमती पाटील यांनी या वेळी व्यक्त केली. निर्मल ग्राम आणि पंतप्रधान ग्राम सडक योजनेसाठी आम्ही राज्य सरकारकडे वारंवार आराखडा द्या, अशी विनंती केली. मात्र सरकारने अद्याप आराखडा सादर केलेला नाही, असे त्यांनी सांगितले. राज्याने ग्रामविकासाचे सूत्रबद्ध आराखडे पाठविल्यास सुमारे दोन हजार कोटींचा निधी राज्याला मिळवून देण्यासाठी मी स्वत: पुढाकार घेईन. मात्र निधी दिल्यानंतर योजनेतील कामे वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. खर्च केलेल्या निधीचा हिशेबही द्यावा. यात दिरंगाई करून नंतर मिळणारा निधी अडवून ठेवण्याची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका, अशी कोपरखळीही श्रीमती पाटील यांनी हाणली.
हा विभाग वेगळा शहर नुतनीकरणाचा संबध काय असे म्हणले जाईल म्हणून् हे टिपण -
पैसे आहेत पण कोणी जबाबदारी घेउन काम करत नाही. ना नोकरशाही ना राजकीय नेतृत्व. त्यात राजकीय नेतृत्व आज सत्तेत आहे उद्या नाही पण नोकरशाही तर कायम आहे. पुढाकार घेऊन् सचोटीने काम करत् नाही. सगळ्यांना आज काही ना काही वैयक्तीक काम करायचे आहे. देशाचे भले करायची पडली नाही. भारत अजीबात गरीब देश नाही आहे पण पुअरली मॅनेज्ड देश आहे. असेच राहीले तर गरीब होईल.
मुद्याची गोष्ट
भारत अजीबात गरीब देश नाही आहे पण पुअरली मॅनेज्ड देश आहे. असेच राहीले तर गरीब होईल.
१००००००% बरोबर!
बरोबर
भारत अजीबात गरीब देश नाही आहे पण पुअरली मॅनेज्ड देश आहे. असेच राहीले तर गरीब होईल.
मान्य.
उत्तम लेख
उत्तम लेख, मुद्देसूद आणि अभ्यासपूर्ण. आवडला. "पुण्याच्या विकास आराखड्यातील महत्त्वाच्या मुद्द्यां"ची प्रतीक्षा आहे.
सहमत आहे.
मांडणी आणि विषय दोन्ही आवडले. पुढील लेखाच्या प्रतिक्षेत.
आभार
प्रियाली , शशांक
आभार
असेच
पुढील लेख वाचायला आवडेल.
लेख आदर्श आहे, पण..
चित्राजी,
सदर लेखनाकडे केवळ एक 'लेख' म्हणून पाहिल्यास तो एक आदर्श लेखच म्हणायला हवा. कारण अमूक करायला पाहिजे, तमूक केले पाहिजे, अमूक करणार आहे या पद्धतीच्या अनेक घोषणा सदर लेखात सापडतात. अहो पण आपल्याला हे माहित्ये का, की आत्तापर्यंत अश्या कित्येक योजना आल्या आणि केवळ कागदावरच राहिल्या!
आपण ज्या योजनेबद्दल लिहिले आहे त्यात भारताच्या बेसुमार लोकसंख्यावाढीबद्दल/ती रोखण्याच्या हेतूने/किंवा कुटुंब नियोजनाच्या बाबतीत काहीही उल्लेख नाही, काहीही ठोस उपाय नाहीत! आणि जो पर्यंत लोकसंख्या रोखण्याबाबत, कुटुंब नियोजनाबाबत काही ठोस उपाययोजना/कायदेकानू होत नाहीत तो पर्यंत कितीही नव्या नव्या योजना राबवल्या/कोणताही पक्ष सत्तेवर आला तरी इस देश का कुछ नही हो सकता!
हा आपला चॅलेंज आहे!
असो, परदेशात राहूनदेखील भारताबद्दल असलेल्या आपल्या सामाजिक जाणीवेचे व अभ्यासाचे मात्र कौतुक वाटते!
आपला,
(लोकसंख्यावाढीच्या कॅन्सरची धास्ती घेतलेला एक निवासी भारतीय) तात्या.
कुटुंबनियोजन
कौतुकाबद्दल आभार तात्या. लोकसंख्यावाढ हा मुद्दा या योजनेत नाही हे खरेच. पण मुळात लोकांच्या झुंडींची खेड्यांकडून किंवा छोट्या शहरांकडून मोठ्या शहरांकडे वाटचाल योग्य आहे का नाही किंवा भारताचे (दूरगामी) आर्थिक हित कशात आहे ह्याचा विचार तरी या योजनेत कुठे आहे?
मानवी आणि सामाजिक चलनवलन ( human and social dynamics) हा एक मोठा गहन विषय आहे - मला त्याची लांबून ओळख फक्त आहे - अभ्यास केलेला नाही. पण पर्यावरणातील बदल, राजकिय प्रक्रिया, नैसर्गिक आणि सामाजिक आपत्ती यामुळे मानवी समाज (मनापासून किंवा पर्याय नाही म्हणून) एका ठिकाणाहून दुसरीकडे हलतो, तेव्हा व्यक्तिगत आणि सामजिक पातळीवर खूप बदल घडत असतात. हे सर्व बदल कायदे करून "नियंत्रित (कंट्रोल)" करणे हे भारतासारख्या लोकशाही देशात तरी शक्य वाटत नाही (चीनमध्ये आहे). लोकसंख्यावाढ थांबवायला मुळात स्त्री-पुरुषांना शिक्षण देणे भाग आहे, पणा जेथे प्राथमिक शिक्षणापासूनही अनेक लोक वंचित आहेत तेथे याबद्दल काय बोलावे? त्याला मर्यादा आहेत एवढेच म्हणते.. म्हणून एखाद्या क्रियेचे किंवा निर्णयाचे काय परिणाम होणार याचे जे अंदाज बांधलेले आहेत (आणि ते अंदाजच असतात) त्यावरच अशा योजना आखल्या आणि राबवल्या जातात. त्यामुळे या योजनेमुळे रोगावर कायमचा इलाज नाही तरी मलमपट्टी तरी होईल. आज अनेक आर्थिक दृष्ट्या दुर्बळ लोक आपापल्या कुटुंबांना कोरडी स्वच्छ घरे, स्वच्छ पिण्याचे पाणी देखील देऊ शकत नाहीत हे सत्य आहे. अशांपैकी काहींना तरी या विकासाचा फायदा झाला तर ते चांगलेच आहे.
उत्तम
अभ्यासपूर्ण, माहितीपूर्ण आणि कदाचित त्यामुळेच उत्तम लेख आहे. फार आवडला. निव्वळ सुविधा पुरवण्याच्या दृष्टीने विचार न करता सुशोभिकरणाच्या अनुषंगानेही शहर विकासाचा विचार व्हायला हवा, अशा निर्णयाप्रत महाराष्ट्र राज्य सरकार आल्याचे समजते. याच अनुषंगाने आजच्या लोकसत्तामधील मुंबईच्या सुशोभिकरणाची सुरुवात राज्य सरकारच्या कार्यालयीन इमारतींपासूनच करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची बातमी आठवली. सविस्तर वृत्त येथे वाचता येईल.
- परीवश
विकास आराखडा
विकास आराखड्यावर आता जरा टंकायचा कंटाळा आला आहे . कृपया इथे बघा."विकास आराखडा कि आखाडा?"
प्रकाश घाटपांडे
आभार
परीवश, शशांक प्रतिसादाबद्दल आभार. घाटपांडेसाहेब, आपल्या लेखाचा संदर्भ दिल्याबद्द्ल आभार - त्यातील मुद्दे अगदी कळीचे आहेत, शासन विकासप्रक्रियेत लोकांना सहभागी करून घेताना उत्साह दाखवेल असे नाही, पण लोकांनीच हा पुढाकार घ्यायला हवा.
शासन व महाजाल
शासन विकासप्रक्रियेत लोकांना सहभागी करून घेताना उत्साह दाखवेल असे नाही, पण लोकांनीच हा पुढाकार घ्यायला हवा.
वा योग्य मुद्दा आहे. पण तरी हा सहभाग कसा घ्यावा यासाठी आप्ल्या कडे कोणतेही मार्ग सहजतेने दिसत नाहीत.
यासाठी खरं तर जाला चा उपयोग अतिशय परिणामकारकरित्या करता येईल असे मला जाणवत राहते. मात्र त्याचवेळे सगळी यंत्रणाच महाजाल अभिमुख करण्यशिवाय पर्याय नाहीये हे शासनाला कळतच नाही याचाही खेद वाटतो.
सध्यातरी 'काही माहितीची बेटे' असे शासनात या तंत्राचे स्वरूप आहे असे दिसते.
"सामान्यांशी संपर्क होण्यासाठी शासन व महाजाल याचा संयोग" (व शासन यंत्रणांना एकत्र आणणारी एखादी तंत्र-प्रणाली) या विषयी भविष्यकालीन योजना मांडणारी एखादी समीती आहे की नाही याची कुणाला कल्पना आहे का?
आपला
गुंडोपंत
जुना चेहरा
शहरे बदलण्याच्या नादात आपण अनेकदा सुरेख असा वारसाही हरवून बसतो आहोत असे वाटते. पुर्वी नाशकात अनेक जुने वाडे होते, अप्रतिम नक्षिकाम असलेले. पण बिल्डर्सनी ते पाडून त्याजागी आता कॉंक्रीटचे ठोकळे उभे केले आहेत.
पंचवटी, सीता गुंफा हा भाग तर अतिशय विद्रूप करून सोडला आहे. येथे देशभरातून लोक बघायला येतात. त्यांचा मोठाच अपेक्षाभंग होत असला पाहिजे.
केवळ काळाचा महिमा म्हणून हे सोडून देणे योग्य वाटत नाही. पण थांबवण्याचा मार्गही दिसत नाही. आशा आहे या मुद्याचाही आपण म्हणता त्या प्रस्तावात विचार असेल.
-निनाद
वारसा
आशा आहे या मुद्याचाही आपण म्हणता त्या प्रस्तावात विचार असेल.
आपला मुद्दा अतिशय योग्य आहे. या योजनेत मुद्द्याचा उल्लेख नाही, केवळ "हेरिटेज" स्थळांचा विकास" एवढाच भाग आहे पण या योजनेचा भर हा जास्त करून मूलभूत सुविधा - जसे रस्ते, पाणी, गरिबांना कमी खर्चात गृहयोजना अशावर असल्याने हा उल्लेख नसावा. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ऐतिहासिक जागांचा विकास यामध्ये पूर्वीच्या स्थानिक आर्किटेक्चरचा विचार करणे ही अपेक्षा असते. नवीन बांधलेल्या जागाही काहीश्या त्याच पद्धतीने विकसित व्हाव्यात अशीही अपेक्षा असते. पण भारतात ते होताना दिसत नाही - यासाठीही बदल आहेत ते स्थानिक पातळीवर झाले पाहिजेत.