कर्मण्येवाधिकारस्ते ...........

आजकालच्या इष्टांकपूर्तीला महत्व असलेल्या औद्योगिक युगांत "कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन" या उपदेशाला फारसे स्थान नाही असे आपल्यापैकी बहुतेकांना वाटत असण्याची शक्यता आहे. पण ते ऐहिक प्रगतीसाठीही उपयुक्त असे एक मर्गदर्शक तत्व आहे. कसे ते पहा.

जेव्हा माणूस एखादे काम ठरवून करतो तेव्हा त्याचा दुहेरी परिणाम होतो. पैकी बाह्य जगावर जो परिणाम होतो त्याच्या बदल्यांत त्याला बाह्य जगांतून फळ मिळते. आणि स्वतःवर जो परिणाम होतो तो म्हणजे त्याला आपल्या क्षमतेची जाणीव होते.

बाह्य जगांतून मिळणारे फळ त्याला सुखोपभोग देते. ते केलेल्या कर्माच्या प्रमाणांत आणि म्हणूनच मर्यादित असते. त्यांत रममाण झालेला माणूस कर्म करायचे विसरला की काही काळाने फळ व सुखोपभोग संपुष्टांत येतात. मग माणसाला आणखी सुख पाहिजे असेल तर पुन्हा कर्म करून ते मिळवावे लागते.

याउलट, सुखोपभोगांपेक्षा माणूस स्वतःच्या वाढत्या क्षमतेच्या जाणीवेंत रममाण होत असेल तर तिचा अधिकाधिक अनुभव घेण्यासाठी तो अधिक आव्हानात्मक व अधिक फलदायी काम हातांत घेईल. हे चक्र असेच चालू राहिले तर स्वतःमधल्या अनंत सामर्थ्याचा साक्षात्कार होण्याच्या दिशेने त्याची वाटचाल होत राहील. दुसर्‍या बाजूला कर्मफलसिद्धांताप्रमाणे बाह्य जगांतून अधिकाधिक सुखोपभोग त्याच्या वाट्याला येतच राहतील.

औद्योगिक क्षेत्रांतले उदाहरण द्यायचे तर सुखोपभोगाच्या नादांत वाहावत गेलेला माणूस धंद्यांतील एखाद्या व्यवहारांत मिळालेला नफा संपेपर्यंत चैनींत राहणार्‍या माणसासारखा असतो तर स्वतःच्या वाढत्या क्षमतेकडे लक्ष देणारा माणूस अधिक धाडस करायला सरसावणार्‍या उद्योजकासारखा असतो.

वरील विवेचन आपणांस कितपत पटते?

लेखनविषय: दुवे:

Comments

आयला! :)

वरील विवेचन आपणांस कितपत पटते?

१०० % पटले!

आयला कोर्डेकाका, तुम्ही प्रवचनं केव्हापासून करायला लागलात? (ह घ्या) :)

धन्यवाद!

प्रतिसादाबद्दल आभार.
कधीकधी प्रवचन करण्याची हुक्की येते खरी!

गोट्या आठवला

कर्मण्येवाधिकारस्ते.. हा शब्द ऐकल्यावर "गोट्या"चे भाषांतर आठवले... "कर्माच्या अधिकारावरून रस्त्यात वाद का घालायचा"? (अर्थात बिचार्‍याला मास्तरांकडून मार मिळतो!).

बा़की आपले म्हणणे पटले. या विषयावर, पेनसिल्व्हेनियातील "आर्श विद्यागुरूकुलम्" चे स्वामी दयानंद सरस्वती यांचे खूप मजेशीर (humorous) पण पटणारे भाषण ऐकले होते..

हो! पटले

वा!
आपले औद्योगिक क्षेत्रांतले उदाहरण मस्त आहे.
वरील विवेचन व उदाहरण वाचून
आपण 'कॉर्पोरेट ट्रेनर' आहात की काय असे वाटले!

आपला
व्यायामशाळेतला ट्रेनर ;)
गुंडोपंत

कॉर्पोरेट ट्रेनर

आपण 'कॉर्पोरेट ट्रेनर' आहात की काय असे वाटले!

पूर्वी कॉर्पोरेट ट्रेनर चे काम केले आहे. या ट्रेनिंगमध्ये कामगारांना ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्यामुळे कामगारांना मनापासून काम करणे स्वतःच्या हिताचे आहे असे पटण्याचा व त्यामुळे त्याचा "लढाऊपणा" नाहीसा होण्याचा "धोका" असतो. म्हणून कामगार पुढारी कॉर्पोरेट ट्रेनर हा व्यवस्थापनाचा हस्तक आहे असे कामगारांच्या मनांत भरवत असतात.

सहमत

विवेचन नक्कीच पटण्यासारखे आहे. प्रयत्न करणे माणसाच्या हातात असते. पण प्रयत्न करूनही समजा फळ मिळाले नाही तर आपण नेमके कुठे कमी पडलो हे लक्षात येण्यासाठी आत्मपरिक्षण करता आले पाहिजे. गीतेमधील बरेचसे तत्वज्ञान कुठल्याही काळात उपयोगी पडेल असे वाटते.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

बरोबर

पटले.

 
^ वर