पर्यायी इंधनांवरील वाहने

पेट्रोल आणि डिझेल या परंपरागत इंधनांऐवजी सीएनजी आणि एलपीजी अशी पर्यायी इंधने आता उपलब्ध आहेत. मारूती, ह्युंडाइ आणि टाटा या कंपन्यांनी पर्यायी इंधने वापरणारी वाहने बाजारात आणली आहेत. पर्यायी इंधनांमुळे खर्चात बचत तर होईलच पण पर्यावरणाचे होणारे नुकसानही कमी होईल. सामान्य वापरकर्त्यांवर पर्यायी इंधनांवरील वाहने वापरताना काय काय परिणाम होतील याची चर्चा करण्यासाठी हा प्रस्ताव आहे. चर्चेच्या सोयीसाठी काही मुद्दे इथे प्रस्तुत करत आहे. सदस्यांनी याशिवायही इतर संलग्न मुद्द्यांवर आपले विचार कळवावेत ही विनंती.

  • पर्यायी इंधने सुलभतेने उपलब्ध आहेत का?
  • परंपरागत आणि पर्यायी इंधनांवरील वाहने चालवण्याच्या अनुभवात काय फरक आहे? (त्वरण (ऍक्सेलरेशन), नियंत्रण इ.)
  • सुरक्षिततेसंबंधी काय धोके आहेत? अपघात झाल्यास इंधनधारकाचा स्फोट होण्याची शक्यता आहे का?

आपले अनुभव किंवा माहिती द्यावी ही विनंती.

आपला
(वाहनचालक) वासुदेव

Comments

उत्तरे

काही रिक्षाचालकांशी झालेल्या चर्चेतून मिळालेली माहिती.

  • पर्यायी इंधने सुलभतेने उपलब्ध आहेत का?
  • नाहीत. पिंपरी चिंचवडमधील रिक्षाचालकांना यलपीजी/सीयनजी भरण्यासाठी आरटीओ जवळील ग्यासपंपावर जावे लागते. तो ग्यासपंप चिंचवडपासून १८ किमी दूर आहे! चिंचवड परिसरात नुकतेच एक यलपीजी स्टेशन सुरु झाले आहे मात्र तेथे यलपीजी भरण्यासाठी ग्यास असल्यास सुमारे ७ ते ८ तास लागतात. ग्यास नसल्यास ग्यास येईपर्यंतचा वेळ एकूण वेळेत मिळवावा. (आडात नसल्यामुळे पोहर्‍यात उपलब्धता नाही.)

  • परंपरागत आणि पर्यायी इंधनांवरील वाहने चालवण्याच्या अनुभवात काय फरक आहे? (त्वरण (ऍक्सेलरेशन), नियंत्रण इ.)
  • गाडीचे इंजिन लवकर खराब होते. "कोरड्या" इंधनामुळे आवश्यक ते ल्युब्रिकेशन इंजिनाला मिळत नाही.

  • सुरक्षिततेसंबंधी काय धोके आहेत? अपघात झाल्यास इंधनधारकाचा स्फोट होण्याची शक्यता आहे का?
  • अधिकृत यंत्रणा बसवून घेतल्यास धोका नाही. मात्र सीनजी/यलपीजी च्या अनुपलब्धतेमुळे स्वयंपाकाच्या ग्यासवर गाड्या चालवल्या जातात व स्वयंपाकाच्या ग्यासच्या टाकीतून गाडीच्या ग्यासच्या टाकीत हातपंपसदृश उपकरणाने ग्यास हलवावा लागतो. या प्रकियेत काही अपघात झाल्याचे ऐकले आहे.

(रिक्षाग्राहक) आजानुकर्ण

माझी उत्तरे...

राम राम वासुदेवशेठ,

काय कसं काय, बरं आहे ना? :)

पर्यायी इंधने सुलभतेने उपलब्ध आहेत का?

असे वाटत नाही. सीएनजी रिक्षावाल्यांना ठाण्यात तरी इंधनाकरता बराच वेळ रांगेत उभे असलेले पाहतो.

परंपरागत आणि पर्यायी इंधनांवरील वाहने चालवण्याच्या अनुभवात काय फरक आहे? (त्वरण (ऍक्सेलरेशन), नियंत्रण इ.)

पर्यायी इंधनावर चालवली जात असलेली वाहने त्वरणात त्या मानाने कमी पडतात असे ऐकून आहे.

सुरक्षिततेसंबंधी काय धोके आहेत? अपघात झाल्यास इंधनधारकाचा स्फोट होण्याची शक्यता आहे का?

हो, काही तज्ञांच्या मते असे होऊ शकते. ही वाहने त्या मानाने असुरक्षित आहेत असे ऐकून आहे.

पर्यायी इंधनांमुळे खर्चात बचत तर होईलच पण पर्यावरणाचे होणारे नुकसानही कमी होईल.

ही गोष्ट मात्र १०० टक्के खरी आहे!

आपला,
(ठाण्यातील रिक्षाचालक) तात्या.

अपारंपारीक उर्जा स्त्रोत

वासुदेव राव चांगला विषय सुरू केलात.

पर्यायी इंधने सुलभतेने उपलब्ध आहेत का?
खरे उत्तर नाही हेच आहे. पण अलिकडे उपलब्धता वाढण्याची दिशेने पावले पडताना दिसत आहेत. वनाज कंपनीने त्यांचा भारतातला २५ वा आणि पुण्यातले पहिले फक्त एल पी जी / सी एन जी स्टेशन सुरू केले आहे. स्थळः वारजे उड्डाण पुल संपल्यावर. हि संख्या वाढण्याची अपेक्षा आहे.

परंपरागत आणि पर्यायी इंधनांवरील वाहने चालवण्याच्या अनुभवात काय फरक आहे? (त्वरण (ऍक्सेलरेशन), नियंत्रण इ.)
खुप जास्त नसतो. अनेक वाहन चालक त्वरण अथवा शक्ति वाढवण्याकरता अशास्त्रीय बदल करतात. त्यामुळे मग पुढे प्रश्न उभे होतात.

सुरक्षिततेसंबंधी काय धोके आहेत? अपघात झाल्यास इंधनधारकाचा स्फोट होण्याची शक्यता आहे का?
वर लिहिल्या प्रमाणे अशास्त्रीय मार्ग अवलंबल्यास अपघात होण्याची शक्यता असणारच.

अवांतरः फ्रान्स मध्ये हवा इंधन म्हणून वापरण्याचा यशस्वी प्रयोग झाला आहे. त्या शोधकर्त्याला टाटांनी तत्काळ करारबद्ध केले आहे.

मराठीत लिहा. वापरा.

पर्यायी इंधनांचा वापर

चांगला विषय आहे वासुदेवराव!

वास्तव म्हणून अजानुकर्ण आणि तात्यांच्या उत्तराशी, तसेच होऊ घालणारे बदल म्हणून चाणक्यांच्या उत्तराशी सहमत आहे. यांच्या उत्त्रात थोडे अधिक:

पर्यायी इंधने सुलभतेने उपलब्ध आहेत का?

आत्ता नाही ते झाले, पण असे इंधन उपलब्ध करून देणे, याचा संबंध - वापर, त्यास लागणारा खर्च यांच्याशी आहे. म्हणू�� जो पर्यंत धोरणात्मक बदल घडत नाहीत तो पर्यंत या गोष्टी सुसंगतपणे वाढू शकत नाहीत. आणि धोरणात्मक बदल करताना देखील असल्या बाबतीत भविष्याचा विचार करावा लागतो. उ.दा. पेट्रोल पंपासारखी स्टेशन्स तयार करणे इत्यादी गोष्टी पर्यायी इंधनाच्या गाड्या विककत घेण्या इतक्या सोप्या नसतात. त्यात अजूनही एक गोष्ट आहे म्हणजे जशी पेट्रोलला सरकार सबसीडी देते तशीच (तीच) पर्यायी इंधनाला देणे महत्वाचे असते तरच ते किंमतीच्या स्परेधेत टिकू शकेल.

परंपरागत आणि पर्यायी इंधनांवरील वाहने चालवण्याच्या अनुभवात काय फरक आहे? (त्वरण (ऍक्सेलरेशन), नियंत्रण इ.)

बाकीचे अनुभव आणि चुका (उ.दा. स्वतःच मूळ तंत्रज्ञानात बदल करणे आणि मग गाडी नीट चालत नाही म्हणणे इत्यादि) वर आलेल्या आहेत. यात एकच गोष्ट जास्तीची म्हणजे "बायो डिझेल". बायो डिझेलचा अनुभव चांगला आहे, त्यामुळे प्रदूषण पण कमी होते आणि इंजीनला वंगण पण मिळते. परंतू आधी म्हणल्याप्रमाणे (येथे अमेरिकेतील मॅसेच्यूसेटसपुरते बोलतोय..) पेट्रोलच्या तुलनेशी सबसीडी न मिळाल्याने अजून महाग पडते. तसेच त्याला लागणारे "इन्फ्रास्ट्रक्चर" तयार केले गेलेले नाही. त्यात सरकारी कारभार जसा असतो तसेच खाजगी कंपन्यांचे (येथे तेलाशी संबधीत) राजकारण असते. जे अमेरिकेत तेच भारतात पण...

सुरक्षिततेसंबंधी काय धोके आहेत? अपघात झाल्यास इंधनधारकाचा स्फोट होण्याची शक्यता आहे का?

चाणक्यांच्या प्रतिक्रीयेत सर्वकाही आले.."अशास्त्रीय मार्ग अवलंबल्यास अपघात होण्याची शक्यता असणारच"

फास्ट फूड

भारतात सर्वत्र होणारे तळण जमेत धरल्यास, बायो डिझेल चांगला पर्याय ठरू शकेल.

एका माणसाने (अमेरिकेतील) पूर्व ते पश्चिम किनार्‍यापर्यंत मॅकडोनाल्ड/बर्गरकिंग मधून तळून झालेले "वेस्ट फूड ऑईल" वापरून गाडी चालवल्याचे ऐकले होते. अर्थात हे प्रयोग असतात आणि त्यामुळे "स्टँडर्डायझेशन" होऊ शकत नाही.

चाणक्य, आपण लिहिलेले "हवा हे इंधन" ह्याविषयी अधिक माहिती मिळू शकेल का ?

मला वाटते, चाणक्यंना "हायड्रोजन फ्युएल" म्हणायचे असेल. त्यावर बरीच माहीती मिळू शकेल. "शेवी" च्या या गाड्या पहा.

पर्यायी इंधनांपेक्षा सध्या मला ऑटोरिक्शा साठी नवीन सायलेन्सर (मफलर) बनवण्याची अत्यंत निकड आहे असे वाटते.
एकदम मान्य

हवा हे इंधन

येथे वाचा. हे सुद्धा वाचा.

मराठीत लिहा. वापरा.

मफलर/सायलेन्सर

पर्यायी इंधनांपेक्षा सध्या मला ऑटोरिक्शा साठी नवीन सायलेन्सर (मफलर) बनवण्याची अत्यंत निकड आहे असे वाटते.

हे तुम्ही वायुप्रदुषणाच्या दृष्टीकोनातुन बोलत आहात का ध्वनी प्रदुषणाच्या? कारण जर वायुप्रदुषणाच्या दॄष्टीने बोलत असाल तर दोष हा मफलर मध्ये नसून काही रिक्षावाले इंधनात बचत करण्यासाठी रॉकेल मिसळतात त्याचा आहे असे वाटते. पण खरोखरच हा दोष मफलरचा असेल तर आधी सर्व सार्वजनिक बसेस चे मफलर बदलावे लागतील असे वाटते.

एक चांगला संदर्भ

पर्यायी इंधनांवरील वाहने यावर हा माहीतीपूर्ण संदर्भ पहा.

धन्यवाद!

सर्व प्रतिसादी आणि वाचकांचे आभार! आपणा सर्वांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. चर्चेच्या अनुषंगाने काही अधिक मुद्दे असे.
ज्या वाहनांत पर्यायी इंधन वापरण्याची सोय आहे त्या वाहनात पर्यायी इंधनाबरोबरच परंपरागत इंधन वापरण्याचीही सोय असते असे मध्यंतरी वर्तमानपत्रात वाचले. उदाहरणार्थ, ह्युंडाइ या कंपनीच्या सीएनजी वाहनात पेट्रोल वापरणारे यंत्रही असते (हे वेगळे असते की एकच याबाबत अधिक तांत्रिक माहिती दुर्दैवाने माझ्याकडे नाही.) त्यामुळे सीएनजी नसताना पेट्रोलवर हे वाहन चालू शकते.
इंधन उपलब्धतेचा प्रश्नही कालांतराने सुटेल अशी आशा आहे.
सुरक्षिततेच्या बाबतीत मात्र काही खात्रीशीर माहिती मिळू शकली नाही. गाडीला अपघात होऊन जर इंधनधारकाचे नुकसान झाले तर वायुगळती होऊन अपघात अधिक भीषण होण्याची शक्यता वाटते. याबद्दल वाहननिर्मात्यांचे मत काय आहे यावरच या पर्यायीइंधनचलित वाहनांचे भवितव्य अवलंबून आहे.
आपला
(चर्चाग्रस्त) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"

दुचाकींसाठी इंधन पर्याय!!

मला वाटतं कि वरील सर्व पर्याय / प्रतिसाद वाचूनसुद्धा सर्व वाहनांना समान असा इंधन पर्याय असला पाहीजे.
नाहीतर फक्त तीनचाकींसाठी व चारचाकींसाठींच ही सोय / पर्याय म्हणून राहील. उलट दुचाकींसाठी ही सोय झाल्यास असंख्य लोकांचे दुवे मिळतील. पैकी ईंधन उपलब्धता चांगली राहण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे राहील.
ईंधन साठवायला जागा कमी लागते हा एक विशेष गुण. याचा फायदा घेतला तर छोटे छोटे पंप उभे करता येतील.

प्रसाद

विधायक सूचना

प्रसादराव,
आपण अगदी योग्य सूचना केली आहे. दुचाकींसाठीही अशी सोय होणे आवश्यक आहे.
आपला
(सहमत) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"

असहमत

भारतात दुचाक्यांचा नको इतका सुळसुळाट झाला आहे. पर्यायाने जास्त इंधन वापर. दुचाक्या कमी होउन सुनियंत्रीत सार्वजनिक वाहतुक व्यवस्था असणे गरजेचे आहे. शहरात जिथे लोकांना जागा नाही तिथे पंप किती आणि कुठे उभे करणार?

मराठीत लिहा. वापरा.

मला वाटले

टायटल पाहुन मला वाटले की हाय्ड्रोजन अथवा इथेनॉल वगैरे अशा अपारंपारीक इंधनाची चर्चा असेल. पण येथे गॅस व पेट्रोलच दिसले.
असो.
गॅस वरची वाहने धोकादायक वाटतात खरी! पियुसी सारखी त्याची वार्षीक तपासणी वगैरे असते का?
-निनाद

हायड्रोजन कार

हायड्रोजन कारसाठी येथे जा. शक्य असल्यास चलचित्र उतरवुन घेउन पहा.

मराठीत लिहा. वापरा.

इंधने

टायटल पाहुन मला वाटले की हाय्ड्रोजन अथवा इथेनॉल वगैरे अशा अपारंपारीक इंधनाची चर्चा असेल. पण येथे गॅस व पेट्रोलच दिसले.

चर्चाप्रस्तावात एलपीजी आणि सीएनजी या दोन इंधनांचाच उल्लेख केला आहे याचे कारण केवळ चर्चाप्रस्तावकाचे मर्यादित ज्ञान इतकेच आहे. चर्चा केवळ प्रस्तावातील मुद्द्यांवरच राहू नये, इतर संबंधित मुद्देही पुढे यावेत अशीच इच्छा आहे. हायड्रोजन, इथेनॉल किंवा इतर इंधनांवर आपल्याला असलेली माहिती अवश्य द्यावी, आम्ही वाचण्यास उत्सुक आहोत.

आपला
(वाचनोत्सुक) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"

 
^ वर