तर्कक्रीडा ४५ :यमस्तु हरति प्राणान्

डॉ.साने उठून उभे राहिले.त्यानी केवळ मान हालवली.कुप्रसिद्ध खंडणीगुंड मोटासिंग याच्या बाबतीत डॉक्टरांना आणखी काही करण्या सारखे उरलेच नव्हते. मोटासिंगने शेवटचा आचका दिला.त्याचा मृतदेह जमिनीवर अस्ताव्यस्त पसरला.ज्या पिस्तुलातील गोळी लागून त्याचा मृत्यु झाला होता ते शेजारीच पडले होते.
......गुंड मोटासिंगच्या टोळीतील आणखी तीन जण तिथे होते.त्यातील प्रत्येकाने पुढील प्रमाणे दोन विधाने केली:

गोटासिंगः.."मी खून केलेला नाही.सोटासिंगनेच मोटासिंगला गोळी घातली.
सोटासिंग :.." लोटासिंगने मोटाचा खून केला. मोटा आत्महत्या करणे शक्यच नाही.
लोटासिंगः.." मोटासिंगने आत्मघातच केला. सोटासिंगने त्याचा खून केलेला नाही."

यातील प्रत्येकाचे एक विधान सत्य तर एक असत्य आहे.
मोटासिंगने आत्महत्या केली नाही हे निश्चित. तसेच या गोष्टीत समाविष्ट असलेल्या व्यक्तींपैकी एकाने मोटासिंगचा खून केला हेही निश्चित.
तर खुनी कोण ?

लेखनविषय: दुवे:

Comments

स्पष्टीकरण

"मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी
***********************************
सोटासिंग चे दुसरे विधान :"मोटा आत्महत्या करणे शक्यच नाही." याचा अर्थ "मोटासिंगने आत्महत्या केलेली नाही." असाच आहे. किंबहुना सोटासिंगची विधाने पुढील प्रमाणे आहेत असे मानावे.
सोटासिंग :.." लोटासिंगने मोटाचा खून केला." "मोटासिंगने आत्महत्या केलेली नाही."

तर्क.४५

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
आता पर्यंत सहा सदस्यांनी उत्तरे पाठविली. त्यातील एकही उत्तर तर्कशुद्ध निष्कर्षाला धरून नाही.
श्री.क्लिंटन लिहितातः "मला वाटते की या कोड्यात काहीतरी गडबड आहे."
.....पण तसे काही नाही...यनावाला.

मोटासिंग

आत्महत्या करणे शक्य नाही याचा अर्थ शक्यपण आहे असे धरून मी उत्तर पाठवले होते. आता परत विचार करायला पाहिजे.--वाचक्‍नवी

आत्मघात/आत्महत्या

ह्या दोन शब्दाव्या अर्थात काही फरक आहे का? फरक नसेल तर कोड्यात नक्कीच काहीतरी गडबड आहे. की एकाने गोळी घातली आणि दुसर्‍याने खून केला?--वाचक्‍नवी

असेच

कोड्यात नक्कीच काहितरी गडबड आहे. तर्कदृष्ट्या विचार केल्यास सोटा गोटा लोटा तिघेही निर्दोष ठरतात.

डॉक्टर तुम्हीसुध्दा?

होके तिनो भी सरदार
एकठ्ठा जबानी पर सारी दारोमदार
सरदारोंका हो गया बेडा पार
पुलीसवाले थे वालावालकर
डॉ़क्टर साने हो गये गिरफ्तार

अगर गलत हुआ अन्सर
तो गोलीसे डालो मु़झे भी मारकर


रेफरन्स् - >> तर्कदृष्ट्या विचार केल्यास सोटा गोटा लोटा तिघेही निर्दोष ठरतात.
>>तसेच "या गोष्टीत" समाविष्ट असलेल्या व्यक्तींपैकी एकाने मोटासिंगचा खून केला हेही निश्चित.

पटले!!

पटले!!

आणखी ...सानेच

१. मोटासिंग याच्या बाबतीत डॉक्टरांना आणखी काही करण्या सारखे उरलेच नव्हते.
२. ......गुंड मोटासिंगच्या टोळीतील आणखी तीन जण तिथे होते.

मोटासिंग स्वतःच्या टोळीत आहे असे म्हणण्यात फारसा दम नाही, म्हणजे साने देखील टोळीतच असावेत :)

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

पटले

पटले!

साने चौथे

लोटा, सोटा, गोटा आणि साने!

हिंट् समजली नाही!

प्रा.यनावालांनी शीर्षकात 'हिंट'ही दिली होती पण कोड्याचे उत्तर कळल्यावर ती लक्षात आली!

वैद्यराज नमस्तुभ्यं यमराजसहोदर |
यमस्तु हरति प्राणान् वैद्यः प्राणान् धनानि च|

यमस्तु हरति प्राणान् ....

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
कोणाचेच उत्तर बरोबर येईना तेव्हा " कोड्याचे शीर्षक वाचावे. त्यावरून काही सुचते का पहावे " असे लिहिण्याच्या बेतात होतो. एवढ्यात श्री.सहज यांचे उत्तर आले. तसेच दिगम्भा यांनी कळविले "शीर्षकावरून डॉ. खुनी असावे असे वाटते. नावातच असा सुगावा लागू देणे योग्य आहे का?" पण असा सुगावा लागणार नाही याचा मला विश्वास होता.

सही होते कोडे

जबरदस्त मजा आली. खूप त्रास दिला पण काय सही होते कोडे. कुठेच खोट नव्हती सगळे किती क्लिअर होते पण तेवढेच जबरी क्लिष्ट.

आऊटसाईड द बॉक्स विचार केला तेव्हाच झेपले. आपण आपले नेहमीच्या संशयीतांना घेऊन बसलो.

जाहीररीत्या उत्तर दिल्याबद्दल सरांची व आपल्या सर्वांची माफी मागतो.

गुप्तहेर अभिजित

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.अभिजित यांनी खुनी कोण ते बरोबर ओळखले. श्री.सहज यांचे उत्तर न वाचता अभिजित यानी स्वतंत्रपणे कोडे सोडविले असे त्यांच्या लिखाणावरून दिसते.

सहज शीघ्रकवी

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.सहज हे बघता बघता पद्यरचना करतात असे दिसते. त्यांचे पहिले उत्तर उत्साहाच्या भरात चुकले. पण त्यांनी रचलेले पद्य उत्तम आहे. त्यांचा ओढा हिंदीकडे अधिक दिसतो. त्यांनी मराठीतही कविता लिहावी.
या कोड्याचे अचूक उत्तर सर्व प्रथम त्यांनीच पाठविले.

यमस्तु हरति प्राणान्...

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. तो लिहितातः डॉ.साने हे गुंडांच्या टोळीतील होते. पण माझ्या मनात तसे नव्हते. मोटासिंगने डॉ.कडे २ कोटी रु. खंडणी मागितली. न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. म्हणून डॉं. ना खून करणे भाग पडले. "मोटासिंगच्या बाबतीत आणखी काही कण्याचे उरले नव्हते."म्हणजे करायचे ते करून झाले होते.गोळी वर्मी लागली होती. नाडी थंडावत चालली होती. (ती बघण्यासाठीच खाली बसले होते). डॉं. नी मान हालविली ती नकारदर्शक नव्हे तर खालीवर. "दोन कोटी हवे होते काय? " या अर्थी. प्रथम "डॉ. नी अर्थगर्भ मुद्रेने मान हालवली." असे लिहिले होते. पण कोणाला संशय येईल म्हणून ते बदलले. नाव सुद्धा " डॉ.साने" असे सोज्वळ आणि पापभीरू घेतले. असो.
पण यापेक्षा डॉ. ना टोळीतच सामील करण्याची श्री. तो यांची कल्पना अधिक चांगली आहे.
.....(मार्टिन गार्डनर यांचे एक कोडे सायंटिफिक अमेरिकन या मासिकातील मॅथेमॅटिकल गेम्स या सदरात वाचले होते. त्यावर हे कोडे आधारित आहे )

अरे देवा

आम्ही आपले धोपटमार्गाने उत्तर दिले.(अर्थातच चुकले.)
हल्ली डॉ. सुद्धा खून करायला लागले?

युक्तिवाद पटला नाही.

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
डॉक्टरांनी मारले हा युक्तिवाद पटला नाही. तेही गोळी मारून मारले हे जरा अतीच वाटते. विषप्रयोग करून मारले असे म्हटले असते तर कदाचित जमून गेले असते.पण त्यासाठी कोड्याची भाषा बदलावी लागेल.
एकूणच हे कोडे मांडण्यात बरीच गफलत झालेय असे वाटते.तीन्ही गुंडांची परस्पर विरोधी विधाने बघितल्यावर त्यांना संशयाचा फायदा देता येऊ शकतो;पण डॉक्टरांना त्यात गोवण्याची कल्पना तितकीशी पटत नाही.असो.
तरीदेखिल उत्तर मान्य करणे क्रमप्राप्त आहे.

युक्तिवाद पटला नाही?

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
कोड्यात लिहिले आहे "मोटासिंगने आत्महत्या केली नाही हे निश्चित. तसेच या गोष्टीत समाविष्ट असलेल्या व्यक्तींपैकी एकाने मोटासिंगचा खून केला हेही निश्चित." गोष्टीत केवळ पाच व्यक्ती समाविष्ट आहेत.(डॉ.साने आणि चार सिंग).त्यातील एकाचा खून झाला.त्याअर्थी उर्वरित चारांतील एक खुनी. तर्काच्या आधारे तीन सिंग निर्दोष. म्हणून डॉ.साने यांनीच खून केला असा तर्कशुद्ध निष्कर्ष निघतो.त्यात न पटण्या सारखे काहीच नाही. तर्काने जे सिद्ध होते ते ,कितीही असंभवनीय आणि अप्रिय वाटले तरी, मान्य केलेच पाहिजे. नाहीतर लॉजिक तुमच्या मानगुटीवर बसून ते मान्य करवून घेईल.

हेही पटले नाही!

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
तर्काने इतर तिघे(गुंड) हे निर्दोष ठरतात म्हणून डॉक्टर खुनी आहेत असे म्हणणे हा सोयिस्करपणा आहे.
साधारणपणे लोक जीव वाचवायला डॉक्टरकडे जातात ते औषधाच्या गोळ्या खाण्यासाठी, पिस्तुलाच्या गोळ्या नव्हे.
आता डॉक्टरांनाच खुनी ठरवायचे आहे म्हणून ते चौघे गुंड खंडणी मागायला तिथे आले आणि त्यातल्या मोटासिंगचा डॉक्टरांनी खून केला अशी गोष्ट रचता येते. पण तयारीत आलेल्या सराईत गुंडाला एक डॉ. पिस्तुलाच्या गोळीने मारतो आणि ते देखिल त्या गुंडाचे तीन साथीदार बरोबर असताना हे कसे पचवायचे?उपचारादरम्यान डॉक्टरने इंजेक्शन देऊन मारले असे म्हटले तर ते तर्कसंगत होईल.
आणि इतर तीन गुंड काय आपण त्याचा खून केलेला नाही असे विधान करायलाच केवळ आले होते काय? मोटासिंगला मारल्यावर डॉ. पिस्तुल तशीच बाजूला टाकतात आणि तिघे गुंड आपण खून केला नाही असे म्हणतात. अजबच तर्क आहे.
चार जणातला एक खुनी आहे आणि तीन्ही गुंड निर्दोष आहेत म्हणून डॉक्टर खुनी हा तर्क वरवर बघता पटतो;पण तर्कदुष्टतेच्या कसोटीवर खरा उतरत नाही असे खेदाने नमूद करावेसे वाटते.

हे कोडे मांडण्यात आपली निश्चितच गफलत झालेय. असो. ह्या कोड्याचे कर्ते-धर्ते आपणच असल्यामुळे आपलाच तर्क शेवटी 'नाईलाजाने' मान्य करावा लागतोय.

का पटले नाही?

हे कोडे मांडण्यात आपली निश्चितच गफलत झालेय.

मला आधी असेच वाटले होते. पण कोड्यातील एका महत्वाच्या वाक्याकडे माझे दुर्लक्ष झाले (बहुदा मोनिकाचा विचार चालू होता बहुतेक) आणि म्हणून मला तसे वाटले. ते वाक्य म्हणजे
तसेच या गोष्टीत समाविष्ट असलेल्या व्यक्तींपैकी एकाने मोटासिंगचा खून केला हेही निश्चित.

सर्व प्रकारचे युक्तिवाद वापरून सोटा,लोटा आणि गोटा यापैकी कोणीही खून केला नाही हे दाखवता येऊ शकते. मग राहिले कोण? डॉ.साने, बरोबर?

साधारणपणे लोक जीव वाचवायला डॉक्टरकडे जातात ते औषधाच्या गोळ्या खाण्यासाठी, पिस्तुलाच्या गोळ्या नव्हे.

नक्कीच.पण अशा प्रकारच्या कोड्यांमध्ये दिलेली माहिती प्रमाण मानूनच पुढे जायचे अन्यथा कोड्याचे उत्तर शोधणे कठिण होऊन जाईल. नॅशनल टॅलेन्ट सर्च परिक्षेत बुध्दिमत्ता चाचणी या विषयात अनेकदा कोड्यांमध्ये 'सर्व घोडे हे ढग आहेत. काही ढग झाडे आहेत. यावरून काही घोडे झाडे आहेत असा निष्कर्ष काढता येऊ शकेल का' अशाप्रकारचे प्रश्न सोडविल्याचे आठवते. दिलेली माहिती-- सर्व घोडे ढग आहेत ही प्रमाण मानली नाही तर कोड्याचे उत्तर काढणे कठिण बनेल.

क.लो.अ.

---विल्यम जेफरसन क्लिंटन (मोनिकाचा पूर्वीचा प्रियकर)

सहमत

डॉ़क्टर खून वगैरे करू शकतो हे खरे असले तरी,
सराईत गुंडाला एक डॉ. पिस्तुलाच्या गोळीने मारतो आणि ते देखिल त्या गुंडाचे तीन साथीदार बरोबर असताना हे कसे पचवायचे? आणि आणि तिघे गुंड आपण खून केला नाही असे म्हणतात.. हे जरा फारच ओढून ताणून..'कसं गंडवलं ?' करण्यासाठी निर्मिलेले वाटते.

(गंडलेला) कोलबेर

मित्रांनो

अहो कोडं आहे हे. यात फक्त कोड्यातली मेख सोडवणे अपेक्षित आहे.

हेच कोडं जरा असं वाचा. चार जण डॉक्टरांकडे खंडणी मागतात. पण डॉक्टर पोलिसांना सांगतात. मग जेव्हा खंडणी न दिल्याबद्दल सानेंना देवाघरी पोचवायला चार सिंग येतात. पण पोलिस सी. आय. डी. मालिकेतल्याप्रमाणे डॉक्टरांकडे स्वसंरक्षणासाठी पिस्तूल देऊन ठेवतात आणि तिथेच दबा धरून बसतात. चार जण खोलीत येतात. आणि तेवढ्यात भारनियमनाच्या कृपेने अंधार होतो. क्षणात ठो ठो असे तीन चार आवाज खोलीत घुमतात. इन्वर्टरच्या कृपेने लाईट परत येते. पोलिस धाड टाकतात आणि पाहतात तो काय एक **सिंग रक्ताच्या थारोळ्यात. पोलिसांनी तर एकही गोळी झाडलेली नसते. सर्वांना ताब्यात घेऊन चौकशी करताना उरलेले तीन ** सिंग खालील जबाब देतात.
१...कृ वर वाचा.
२.
३.

आता सोडवा.

अभिजित...
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.

न दिलेल्या गोष्टी

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"डॉ.साने मेडिकल प्रॅक्टिशनर आहेत.त्यांचा दवाखाना आहे. दवाखान्यात चार गुंड गेले. त्यांनी खंडणी मागितली. डॉं. नी इतर तिघांच्या समक्ष एकाचा खून केला." असे काहीही लिहिलेले नाही.कोड्यात जे दिलेले नाही ते गृहीत धरू नये. अनेक पर्याय संभवतात. आपल्या मनातलाच खरा असेल असे नाही. इथे दुसरी (पहिली अभिजित यांनी लिहिली आहे.) एक शक्यता अशी:
....मोटाची डॉं. ना फोनवर धमकी.इतरांच्या नकळत...."पैशांची बॅग तुमच्या इमारतीच्या टेरेसवर ठेवा. दोन दिवसांनी येतो."......चौघे गाडीने निघाले.इमारत आली...मोटा : "इथे टेरेसवर काम आहे. आत्ता येतो. तुम्ही थांबा."..तो गच्चीवर.तिथे थोडी अडगळ.एका टेबलावर नवी बॅग. मोटा सावध. सगळीकडे कानोसा...सामसूम...बॅगेला हात..तेवढ्यात जुन्या कपाटातून डॉ.बाहेर...ठो$. कोसळतो.बॅगेसह डॉ. झटकन खाली. आपल्या क्लिनिक मधे...इकडे लोटा" "मोटा अजून आला नाही.बघून येतो." गच्चीवर..मोटा पडलेला. लोटाला पाहून "डॉ..."असे क्षीण आवाजात.वाटते डॉ.ला बोलवायचे...तो डॉ.च्या शोधात.इकडे सोटा : "दोघेही आले नाहीत .बघून येतो." गच्चीवर येतो....रक्ताच्या थारोळ्यातील मोटाचे ओठ हालतात.ऐकण्यासाठी जवळ जातो. वाकतो. इतक्यात गोटाही तिथे येतो........इकडे लोटा डॉ.साने कडे येतो....सांगतो... डॉ.एक गोळी देतात. "ही त्याच्या तोंडात घाला. मी इंजेक्शन इ. घेऊन आलोच "...डॉ.पोलीसांना फोन करून बॅग घेऊन वर...... पुढे काय ते कोड्यात आहे....
खरे तर लिहिण्याची आवश्यकता नाही. पण एक पर्याय लिहिला. अनेक कल्पिता येतील.

अमान्य

हे कोडे मांडण्यात आपली निश्चितच गफलत झालेय.

एकदम अमान्य देवसाहेब. कोड्यात (ऍज अ कोडे)काही चूक नाही. हे विरंगुळा, (तर्क्)विचार ह्यात मोडते,सत्यकथा, विश्वसनीय घटना यात नाही. बर्‍याच लोकांना हे कोडे सोडवायला इतका वेळ लागला ह्यातच ह्या कोड्याचा व सरांचा विजय.

यनावालासरांनी लवकरात लवकर असेच सुंदर कोडे घालावे हा विनंतीप्रस्ताव.

देवसाहेब जाऊदे हो. डॉ. ने खून का केला, का अजुन कोणी तेथे होते हे पुढच्या एपीसोडमघे बघायला व चर्चा करायला दुरचित्रवाणी मालीका आहेत ना. :-) येथे सोडून द्या. ह.घ्या.

सहमत आहे!

कोडे सोडवायला जमले नसले तरी कोड्यात (ऍज अ कोडे)काही चूक नाही. हे विरंगुळा, (तर्क्)विचार ह्यात मोडते,सत्यकथा, विश्वसनीय घटना यात असल्याच पाहिजेत असे नसावे.

नृत्यांगणात गफलत

मध्ये मध्ये मी आमच्या येथील सर्व नृत्यांगणांत आळीपाळीने जाऊन आलो. एक-दोन ठिकाणी काळाकुट्ट अंधार होता, ती ठीक होती. पण बाकी सगळ्यांमध्ये फरशा भलत्याच वेड्यावाकड्या बसवलेल्या होत्या. म्हणून आजकाल आमच्या शहरातल्या डिस्कोथेकमध्ये जाणे मी जवळजवळ बंदच करून टाकले आहे. शहराच्या महापौरांनी याच्याकडे जरूर लक्ष द्यावे!

सोटा, गोटा, आणि लोटा यांनी एकच सत्य आणि एकच असत्य का सांगितले? आमच्या टोळीत तर एका सत्याबरोबर फाडफाड चारपाच असत्ये सांगायची पद्धत आहे.

:-)

 
^ वर