तर्कक्रीडा:४४:रत्‍नहार

"वा! काय छान नक्षीदार पेट्या आहेत ! काय आहे हो या तीन पेट्यांत? "
"एका पेटीत आहे रत्नहार. एकीत आहे विषारी नाग.एक आहे रिकामी.प्रत्येक पेटीवर चिठ्ठी आहे. त्यावर काय लिहिले आहे ते वाचा पाहू."
"...सोन्याच्या पेटीवर आहे: "रजतमंजूषेत नाग आहे. ",
चांदीच्या पेटीवर आहे :"ताम्रमंजूषा रिक्त आहे" ,
तांब्याच्या पेटीवर आहे : "ही मंजूषा रिक्त आहे."... हे सर्व खरे आहे काय? "
"ज्या पेटीत रत्नहार आहे त्या पेटीवरील विधान सत्य आहे. ज्या पेटीत नाग आहे त्या पेटीवरील विधान असत्य आहे."
"आणि रिकाम्या पेटीवरील वाक्य?"
"ते सत्य असेल अथवा असत्य. निश्चित सांगता येणार नाही."
"बापरे! डो़क्याला तापच आहे हा! त्यापेक्षा पेट्या उघडूनच बघतो कसा."
"सावधान! नाग असलेली पेटी उघडली गेली तर तो दंश करणारच.आधी प्रत्येक पेटीत काय आहे ते ओळखा. मग योग्य ती पेटी उघडून रत्नहार घेऊन जा."
"हार घेऊन जाऊ म्हणता? मग विचार करतोच."
"करा. उत्तर व्यनि. ने कळवा."
"ठाऊक आहे ते, सांगायला नको."
**************************************************
प्रा. रेमंड स्मुलियन यांच्या एका कोड्यावर आधारित......यनावाला.
**************************************************

लेखनविषय: दुवे:

Comments

मंजूषा

ताम्रमंजूषा = तांब्याच्यी पेटी, बरोबर?

मंजूषा हे मुलीचे नाव असते ना?

प्रश्न्नमंजूषा हा पण शब्द ऐकला आहे.

नक्की काय अर्थ म्हणायचा "मंजूषा" ह्या नावाचा?

मंजूषा

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
या शब्दाचा अर्थ 'पेटी' असा आहे. हा शब्द संस्कृत असून मराठीतही रूढ आहे. "प्रश्नमंजूषा" म्हणजे "क्वेश्चन बँक " .पेटीत काहीतरी साठवतात, असे मानले जाते.

मंजूषा

म्हणजे "मंजूषा" हे नाव आत्तापर्यंत ऐकायला ठीक होते पण आता दरवेळी "मंजूषा" (पेटी) नावाची व्यक्ती समोर आली की तिच्या घरच्यांनी अजून जरा चांगले नाव का बरे शोधले नाही (किंवा काय बरोब्बर ठेवले आहे) हा विचार येणार. :-)

"पहीली बेटी धनाची पेटी " हे ऐकले होते. नंतर शाळेत गेल्यावर जेव्हा पेपरमधे जवळजवळ रोज एखादे तरी हुंडाबळी प्रकरण वाचायचो, त्या गरीब बापाची करुण कहाणी वाचुन कोणा गरीब माणसाच्या मुलीचे लग्न ठरले की "पहीली बेटी धनाची पेटी , रिकामी करुन जाय"असे म्हणायचो. :-)

रत्‍नहार

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
पुढील पाच जणांनी या कोड्याचे उत्तर योग्य युक्तिवादासह पाठविले आहे.सर्व उत्तरे बरोबर आहेत.
.मीरा फ़ाटक....लांबलचक पण पटणारा युक्तिवाद. सर्व शक्य पर्यायांचा विचार.
.श्री. सहज .अगदी थोडक्यात पण परिपूर्ण युक्तिवाद. यांच्या मते कोडे अगदीच सोपे आहे.
.श्री. धनंजय...बूलियन बैजिक समीकरणे लिहून कोड्याची उकल.
४. श्री. तो...थोडक्यात उत्तर.
५. श्री. परीवश..

रत्नहार

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
कोणतीही पेटी न उघडता श्री. वाचक्नवी यांनी प्रत्येक पेटीत काय आहे ते नेमके ओळखले आहे. युक्तिवाद लिहिणे त्यांना आवश्यक वाटले नाही. ते ठीकच आहे.

युक्तिवाद?

युक्तिवाद लिहिणे आवश्यक होते? कोड्यात तशी सूचना नव्व्हती.--वाचक्‍नवी

युक्तिवाद

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
लिहिण्याची तशी आवश्यकता नाही. पण बहुतेक जण लिहितात. नाही लिहिला तरी ठीकच आहे.

आणखी एक उत्तर

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
अनु यांनी प्रत्येक पेटीत काय आहे ते बरोबर ओळखले आहे.

तर्कक्रीडा ४४: रत्‍नहार उत्तर

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
ज्या पेटीत हार ,त्या पेटीवरील वाक्य खरे. तांब्याच्या पेटीवर "ही मंजूषा रिक्त आहे." म्हणून त्या पेटीत हार नाही.
समजा सोन्याच्या पेटीत हार. तर तिच्यावरील वाक्य सत्य. म्ह. चांदीच्या पेटीत नाग. मग तिच्यावरील वाक्य असत्य.म्ह. तांब्याची पेटी रिकामी नाही. म्हणजे तिच्यात हार .पण ते शक्य नाही हे आधीच सिद्ध. म्ह. सोन्याच्या पेटीत हार नाही.म्ह.चांदीच्या पेटीत हार. तिच्यावरील वाक्य सत्य. ताम्र मंजूषा रिक्त. सुवर्ण मंजूषेत नाग.

 
^ वर